Friday, February 13, 2009

प्रेमदिन - व्हॅलेंटाईन डेउद्या व्हॅलेंटाईन डे आहे. इतिहासकाळात होऊन गेलेल्या एका ख्रिश्चन संताच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा दिवस पाळण्याची प्रथा सुरू झाली. या दिवशी आपल्या सगळ्याच प्रियजनांची आवर्जून आठवण काढावी असा उद्देश आधी त्यामागे होता. आपल्याला त्यात फारसे कांही वाटणार नाही. 'सातच्या आंत घरात' या चित्रपटातील मकरंद अनासपुरे याच्या शब्दांत सांगायचे तर "तुम्ही हे फादर्स डे आणि मदर्स डे पाळून जीवंतपणीच त्यांचे दिवस कसले घालता? आपल्याकडे प्रत्येक दिवसच फादर्स डे आणि मदर्स डे असतो." तसाच आपला प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन डे सुद्धा असतो. मात्र गेल्या कांही वर्षात, विशेषतः इंटरनेटचा प्रसार वाढल्यानंतर त्याला विमुक्त प्रणयाचे रूप आले आहे ते अजून तितकेसे सर्वमान्य झालेले नाही. पहायला गेलो तर राधा कृष्ण ते हीर रांझा, बाजीराव मस्तानी वगैरे सगळे आपलेच, पण वैयक्तिक आयुष्यात अशा जोड्या जोडणे म्हणजे लफडी, कुलंगडी व भानगडी. त्यामुळे कुठल्याशा सेंट व्हॅलेंटाईनच्या नांवाने दिवस साजरा करायचा!


प्रेमभावना काय असते याचे सुरेख वर्णन स्व.कवीवर्य कुसुमाग्रजांच्या शब्दात दिले आहे.याच विषयावरील माझा दुसऱ्या स्थळावर लिहिलेला लेख खाली दिला आहे. दि.१२-०२-२०२०

प्रेम या भावनेची व्याप्ती प्रणयभावनेपेक्षा खूप विस्तृत आहे. लहान मुलांना त्यांचे आजी, आजोबा आणि असले तर पणजी, पणजोबा  अत्यंत प्रिय असतात तर वृध्दांना त्यांची नातवंडे, पणतवंडे लाडकी असतात. यांच्यामधल्या सगळ्या पिढ्यांमधील आप्तांचे आपल्याशी मधुर संबंध असतात. शेजारी पाजारी, मित्रमैत्रिणी, सहकारी वगैरे अनेक लोकांशी आपला स्नेह जुळतो. अनेक नेते, अभिनेते, खेळाडू, गायक, गायिका आणि इतर कलाकार आपल्याला अगदी मनापासून आवडतात, झी टीव्हीवरले लिटल चँप्स आपल्या गळ्यातले ताईत बनले होते ते आपल्याला त्यांच्याबद्दल प्रेम वाटत होते म्हणूनच. इतकेच नव्हे तर ज्यांची नांवेसुध्दा आपल्याला ठाऊक नसतात आणि पुन्हा भेट होणे जवळ जवळ असंभव असते अशी कांही माणसे जीवनाच्या प्रवासात कुठल्याशा नाक्यावर भेटतात, त्यांच्याबद्दलसुध्दा मनात ओढ निर्माण होते. पशुपक्ष्यांचादेखील लळा लागतो. “भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे” असे पसायदान संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाकडे मागितले आहे. हे परस्परांचे मैत्र मनातल्या प्रेमभावनेमुळेच जडू शकते.

याचा अर्थ म्हणजे मांजराने उंदरावर प्रेम करावे काय असे यावर कांही लोक विचारतात. “घोडा जर गवतावर प्रेम करायला लागला तर त्याने खायचे काय” अशा अर्थाची म्हण हिंदीमध्ये आहे. विचारवंत लोकांना असा प्रश्न पडत नाही. वर दिलेल्या कवितेत कवीवर्य कुसुमाग्रज असे सांगतात, “ज्याला तारायचा आहे त्याच्यावर तर प्रेम करावेच, पण ज्याला मारायचे आहे त्याच्यावरसुध्दा करावे.” तारणे किंवा मारणे हे कर्तव्यानुसार ठरेल, पण शत्रूबद्दलसुध्दा मनात सूडबुध्दी, द्वेषबुध्दी बाळगायचे कारण नाही. महाभारतकालीन युध्दात कांही नीतीनियम असायचे. सूर्यास्त होताच युध्द थांबल्यावर शत्रूच्या गोटात जाऊन त्याची विचारपूस केली जात असे. युध्दात कामी आलेल्या शत्रूलासुध्दा आदराने वंदन केले जाई. कालमानानुसार आज असले नियम पाळता येण्यासारखे नाहीत, तरीही जिनिव्हा कन्व्हेन्शनप्रमाणे कांही संकेत घालून देण्यात आले आहेत. प्रेम ही दैवी भावनाच त्याच्या मुळाशी आहे.

माणसामाणसांनी परस्पर प्रेमबंधनात एकमेकांना गुंतवावे असा प्रचार इतिहासकाळातील ख्रिश्चन धर्मगुरू सेंट व्हॅलेंटाईन याने केला होता. त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी व्हॅलेंटाईन डे साजरा करणे सुरू झाले. पुढे त्याचे स्वरूप बदलत गेले. आजचे स्वरूप पाहता प्रेम या शब्दाचा अर्थच माणूस विसरत चालला आहे की काय अशी भीती संवेदनशील उदारमतवादी लोकांना वाटते आहे, तर हे सगळे भारतावर पाश्चिमात्य संस्कृती लादण्याचे कारस्थान आहे असा समज सनातनी विचाराच्या लोकांचा झाला आहे. यातून आपल्या मालाची विक्री वाढवून फायदा कमवायचा प्रयत्न व्यापारी करीत आहेत. एका बाजूच्या युवकांना धमाल मस्ती करायला एकादे निमित्य हवे असते, तर विरोधाचे निमित्य करून वेगळ्या प्रकारचा धिंगाणा घालायला दुसरे कांही लोक सदैव तयार असतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या कारणांनी दर वर्षी व्हॅलेंटाईन डे गाजतो. त्या सगळ्या कल्लोळात विसरली जात असेल तर ती आहे प्रेमभावना!

कुसुमाग्रजांच्या कवितेत वैश्विक प्रेमाचे गाणे असले तरी त्यात दिलेले एकूण एक दाखले श्रीकृष्णाच्या जीवनातल्या घटनांशी संबंधित आहेत. त्यामुळे कृष्णाचे नांवही न घेता त्याने सांगितलेल्या गीतेचा हा सारांश आहे असेसुध्दा म्हणता येईल. खाली दिलेल्या कवी मंगेश पाडगांवकरांच्या गाण्यात तुमच्या आमच्या ‘सेम’ असलेल्या प्रेमाचे मार्मिक दर्शन घडते.
प्रेम म्हणजे प्रेम असतं

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

काय म्हणता ? या ओळी चिल्लर वटतात?
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात ?
असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे !
तरीसुद्धा,  तरीसुद्धा,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं;
उर्दुमधे इश्क म्हणून प्रेम करता येत;
व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं;
कोन्वेंटमधे शिकलात तरी प्रेम करता येतं !

सोळा वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात,
जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लगतात !
आठवतं ना ? तुमची आमची सोळा जेव्हा, सरली होती,
होडी सगळी पाण्याने भरली होती !
लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो,
होडी सकट बुडता बुडता  वाचलो होतो !
बुडलो असतो तरीसुद्धा चाललं असतं;
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं !
तुम्हाला ते कळलं होतं, मलासुद्धा कळलं होतं !
कारण, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

प्रेमबीम झूट असतं म्हणणारी माणसं भेटतात,
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं मानणारी माणसं भेटतात !
असाच एक जण चक्क मला म्हणाला,
“आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही;
पाच मुलं झाली तरी प्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही !
आमचं काही नडलं का?
प्रेमाशिवाय अडलं का?”
त्याला वाटलं मला पटलं !
तेव्हा मी इतकंच म्हटलं,
“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं !”

तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने,
एक चॉकलेट अर्धं अर्धं खाल्लं असेल गोडीने !
भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन् तास फिरला असाल,
झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल !

प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !
दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं !
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !

No comments: