Friday, January 23, 2009

अल्फारेट्टा - भाग १


मुंबईहून प्रत्यक्षात वानवडी किंवा हिंगणे बुद्रुक अशा ठिकाणी जायला निघालेला माणूस बहुधा "पुण्याला चाललो आहोत" असेच सांगतो आणि मेहरौली किंवा नोइडाला जाणारा गृहस्थ "दिल्लीला जायला निघालो आहे" असेच म्हणतो. त्याचप्रमाणे "आम्ही अॅटलांटाला जाणार आहोत" असेच मी भारतातल्या सर्वांना सांगितले होते. 'अल्फारेट्टा' या शब्दाचा उल्लेख केल्याने त्यातल्या कोणाला कांही बोध होण्याची शक्यता कमीच होती. या नांवाचे गांव कदाचित ग्रीस किंवा मॅसिडोनिया असल्या कोणा देशात असावे असेही कोणाला वाटण्याची शक्यता होती.
इतरांचे सोडा, मला स्वतःलासुध्दा 'अल्फारेट्टा' या नांवापलीकडे त्या जागेची यत्किंचित माहिती नव्हती.
अॅटलांटा या महानगराचे ते मुंबईच्या भांडुप किंवा विक्रोळीसारखे आणि तेवढ्याच आकाराचे एक उपनगर असावे अशी माझी कल्पना होती. त्यात अॅटलांटा सुध्दा एक मुंबईसारखे महानगर असेल ही उपकल्पना समाविष्ट होती. पण तिथल्या विमानतळावर उतरल्यापासून जे दिसले ते सर्वस्वी वेगळ्या प्रकारचे आणि अनपेक्षित असे होते. असा अनुभव मला यापूर्वी इंग्लंड किंवा युरोपातसुध्दा आला नव्हता. कोठल्याही मोठ्या शहराचा आधुनिक विमानतळ त्याच्या मुख्य वस्तीपासून दूरच असतो. मुंबईचा विमानतळ बांधल्यापासून साठसत्तर वर्षे त्याच जागी असल्यामुळे वाढत्या वस्तीने त्याला वेढा घातला आहे. यामुळे नवा विमानतळ दूर पनवेलला बांधायचा विचार चालला आहे. अॅटलांटाचा अत्याधुनिक आणि भव्य विमानतळ सुध्दा अपेक्षेनुसार उजाड अशा जागीच होता.
तिथून निघाल्यावर दोन तीन वळणे घेऊन आमची गाडी एका महामार्गाला लागली. थोड्या वेळाने शहरातल्या गगनचुंबी इमारतींची शिखरे क्षितिजावर दिसू लागताच आपण आता त्या शहरात प्रवेश करणार असल्याचे वाटले. पण त्या उत्तुंग इमारतींना कधी बाजूला ठेऊन तर कधी त्यांच्या खाली असलेल्या भुयारातून वाट काढीत आमची गाडी वाटेत कोठेही न थांबता फुल स्पीडने चालत राहिली. थोड्याच वेळात दोन्ही बाजूंना उंच झाडे असलेल्या रुंद रस्त्यावरून आमची वाटचाल चालू झाली. अधून मधून आजूबाजूला कांही अंतरावर थोड्या इमारती दिसत होत्या, पण शहरात असते तशी दाटीवाटीची वस्ती अशी कांही कोठे दृष्टीला पडली नाही. थोड्या वेळाने महामार्ग अधिकच प्रशस्त झाला आणि बाजूची वनराई तेवढी घनदाट होत गेली.
हा आठ पदरी महामार्ग आहे. त्यातल्या चार लेन एका दिशेला जाण्यासाठी आणि चार लेन विरुध्द दिशेने
जाण्यासाठी आहेत. हे परस्परविरुध्द दिशांना जाणारे मार्ग कधी एकमेकांच्या जवळ येतात तर कधी
एकमेकांपासून खूप दूर जातात, पण कुठेही एकमेकांना मिळत नाहीत. दोन तीन किलोमीटर अंतरावर उजव्या बाजूला एकादे एक्झिट यायचे, ते येण्यापूर्वीच आपली लेन बदलून रस्त्याच्या कडेच्या सर्वात बाहेरच्या लेनमध्ये आपली गाडी आणायला हवी. उत्तरेकडे जाणा-या वाहनचालकाचा विचार बदलला आणि त्याला मागे वळावे असे वाटले तर आधी गाडी बाजूला घेऊन पुढील एक्झिटमधून बाहेर पडून निदान एक दोन किलोमीटरचा वळसा घालून एकाद्या पुलावरून तो महामार्ग क्रॉस करून उलट दिशेने जाणारा परतीचा रस्ता त्याला धरावा लागेल. पूर्वीच्या काळातल्याप्रमाणे चौकाचौकात थांबून, रस्ता विचारून पुढे जाण्याचे दिवस आता अमेरिकेत राहिलेले नाहीत.

जॉर्जियामधल्या हॉस्पिटॅलिटी हायवेवरून बराच वेळ मार्गक्रमण केल्यानंतर आम्ही एक्झिट क्रमांक १० घेऊन थोड्या लहान म्हणजे चौपदरी रस्त्याला लागलो. थोडे दूर गेल्यानंतर पहिल्यांदा रस्त्याच्या बाजूला मेडिकल सेंटरची उंच इमारत दिसली. तिच्यातल्या वरच्या मजल्यांवर कदाचित राहण्याच्या जागाही असतील. त्यानंतर थोड्या थोड्या अंतराने कांही इमारती दिसत राहिल्या, पण त्यांच्या आजूबाजूला किंवा रस्त्यावर चालणारा एकही माणूस कांही दृष्टीला पडला नाही. रस्त्यावर शेकडोंनी वाहने जात होती, ती चालवणारी अर्थातच माणसेच होती.
दोन तीन मिनिटांनी आम्ही त्याहून लहान म्हणजे दुपदरी रस्त्यावर आलो. रस्त्याच्या एका बाजूला 'एटीअँडटी' नांवाच्या कंपनीची मोठी इमारत होती. ती पाचसहा मजले उंच असली तरी तिची लांबी आणि रुंदी त्याहून जास्त असल्याकारणाने ती आडव्या ठेवलेल्या एका कांचेच्या प्रचंड ठोकळ्यासारखी दिसते. तिच्या सर्व बाजूंने शेकडो, कदाचित हजारावर मोटारींचा गराडा पडलेला दिसत होता. पुढे गेल्यावर एका बाजूला शाळेची इमारत दिसत होती आणि दुस-या बाजूला एका लहानशा इमारतीत रेस्टॉरेंट आणि लाँड्री होती. म्हणजे मनुष्यवस्ती सुरू झाली होती. पुढे जाताच लगेच कांही बंगले दिसले आणि आमच्या वसाहतीची पाटी दिसली.
या वसाहतीच्या आंत शिरण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठीसुध्दा दोन वेगवेगळे रस्ते आहेत आणि त्यांच्या मधल्या जागेत फुलझाडांचे सुंदर ताटवे लावले आहेत. आंत गेल्यानंतर दोन्ही बाजूंना तीन मजली इमारती आहेत. प्रत्येक मजल्यावर पांचसहा सदनिका असलेल्या अशा पंधरावीस इमारतींच्या या संकुलात सुमारे तीन साडेतीनशे घरे असतील आणि घरटी सरासरी तीन माणसे धरली तर हजारापर्यंत मनुष्यवस्ती असेल. अशा प्रकारच्या संकुलांना इकडे 'कम्युनिटी' म्हणतात.
राहत्या घरांशिवाय इथे एक सुसज्ज असे जिम्नॅशियम आहे. त्यात जागच्या जागी उभे राहून चालण्याची किंवा वजन उचलण्याची आणि बसून पॅडल मारण्याची वेगवेगळी यंत्रे आहेत. 'व्यायामशाळा' म्हंटल्यावर मला कोल्हापूरकडच्या तालिमींची आठवण येते. तिथे असतात तसे मुदगल किंवा कुस्ती खेळण्यासाठी मातीचे हौदे इथे नाहीत आणि कोणीही इथे दंड बैठका काढत नाहीत.
जिमच्या बाजूला एक पोहण्याचा उथळ तलाव आहे. त्यात उडी किंवा सूर मारणे शक्य नाहीच आणि कोणी ठरवले तरी तेवढ्या पाण्यात बुडू शकणार नाही. अगदी लहान मुलांना डुंबण्यासाठी त्याहून उथळ असा वेगळा तलाव आहे. हिंवाळ्याच्या दिवसात मात्र ते बंद असतात.
एका ठिकाणी बीच व्हॉलीबॉल खेळण्याची सोय आहे. एका जाळीबंद मैदानात दोन मोठी टेनिस कोर्टे आहेत. क्वचित कधी शनिवारी किंवा रविवारी कांही लोक त्यावर टेनिस खेळतांना दिसले. इतर दिवशी कधी कधी तिथे कोणत्याही आकाराचा चेंडू घेऊन लहान मुले त्याच्या मागे धांवतांना दिसली. लहान मुलांना खेळण्यासाठी सुरेख घसरगुंड्या, बोगदे, झोपाळे वगैरे ठेवलेली खास प्ले एरिया आहेच.
आमच्या घराच्या पत्यामध्ये 'लेक युनियन हिल वे' असे रस्त्याचे नांव लिहिले होते. त्यामुळे एका बाजूला हिरवीगार टेकडी, दुस-या बाजूला एक विशाल सरोवर आणि त्याच्या कांठाकांठाने जाणा-या रस्त्यावर घरे
बांधलेली असतील असे एक चित्र माझ्या मनात तयार झाले होते. पण प्रत्यक्षात पाहता हा लहानसा रस्ता आमच्या कम्युनिटीच्या आत सुरू होतो आणि वळणे वळणे घेत जेमतेम अर्धा किलोमीटर जाऊन कम्युनिटीच्या आतच त्याचा डेड एंड होतो. त्याच्या नांवाची ठळक अक्षरात लिहिलेली पाटीसुध्दा नाही. एक छोटीशी पाटी कोठे तरी लावलेली असेल.
तिथे जवळपास कुठेही वेगळी टेकडी नव्हतीच. अल्फारेट्टा शहरच उंचसखल जागेवर वसलेले आहे, त्यामुळे रस्त्याला सारखे चढ उतार लागतात. इमारतींच्या मागच्या बाजूला एक वाकड्या तिकड्या आकाराचा लांबटसा खूप मोठा खळगा आहे. बहुधा तिथली दगडमाती खणून काढून घरे बांधण्याच्या जागी त्याची भर घातली असावी. अशा प्रकारे तयार झालेल्या 'तलावा'त पावसाचे पाणी भरते, त्यालाच 'लेक' म्हणायचे. अशी तळी इकडल्या बहुतेक सगळ्याच कम्युनिटीजमध्ये असतात.
उन्हाळ्याच्या दिवसात या तळ्यात कमळेसुध्दा फुलतात याची साक्ष देणारी सुकलेली झाडे दिसली. त्यात मधोमध एक कारंजा ठेवला आहे, तळ्यात सांचलेल्या पाण्याचे अभिसरण त्यातून चालत राहते. रात्रीच्या वेळी त्या कारंज्यावर प्रकाशाचे झोत सोडल्यामुळे ते मनोरम दिसते. वीस बावीस गूज पक्ष्यांचा थवा या तलावात विहरण करत असतो. त्यांना पाहतांना मजा वाटते. केंव्हा केंव्हा हे पक्षी रस्त्यावरसुध्दा येतात आणि ते जाईपर्यंत मोटारवाले त्यांना पहात स्वस्थ उभे राहतात. त्यांना पळवून लावण्यासाठी कोणीही कारचा हॉर्नसुध्दा वाजवत नाही.
कम्युनिटीमध्ये अनेक प्रकारची फुलझाडे तसेच मोठमोठे वृक्ष लावलेले आहेत. बहुतेक मोकळ्या जागेवर कृत्रिम हिरवळ लावली आहे. त्या सर्वांची निगा राखण्यासाठी वनस्पतीतज्ञांचे टोळके फिरतांना नेहमी दिसते. नवी झाडे लावणे, झाडांना खतपाणी घालणे, त्यांच्या फांद्यांची काटछाट करणे, लॉनला समतल करणे वगैरे कामे ते करतांना दिसतात. उन्हाळ्यानंतर इथल्या बहुतेक मोठ्या झाडांची पाने झडत असतात, म्हणून त्याला 'फॉल सीझन' असेच नांव आहे. रस्त्यावर जिकडे तिकडे पानांचा नुसता खच पडत असतो. सुकून गळलेली ही सगळी पाने बाजूला सारून गोळा करणे हे एक मोठे काम सगळीकडेच चाललेले असते. या सगळ्या कामासाठी विविध प्रकारची यंत्रसामुग्री वापरलेली पहायला मिळाली.
कम्युनिटीमध्ये सारे कांही शांत शांत असते. इथे मात्र रस्त्यावरून चालणारी बरीच माणसे दिसतात. त्यात जगातल्या वेगवेगळ्या खंडातून आलेले सर्व वर्णांचे, सर्व वंशांचे लोक आहेत. पण ते आपापल्या लोकांचे घोळके करून त्यांच्यातच रमतात. वेगवेगळ्या लोकांनी एकत्र आलेले मी अजून तरी कधी पाहिले नाही. कदाचित ख्रिसमसमध्ये ती संधी मिळेल. इतकी माणसे इथे राहतात, पण कम्युनिटीच्या आवारात एकही दुकान नाही,
दूधवाले, पेपरवाले वगैरे रतीब घालणारे नाहीत की सामान घेऊन दारोदार फिरणारे विक्रेते नाहीत.
आपल्याकडल्यासारखी लहान लहान दुकाने मला इंग्लंडमध्ये दिसायची. त्यांना 'कॉर्नर शॉप' असे म्हणत.
दूध, चहा, ब्रेड, बिस्किटे, चॉकलेटे यासारख्या रोजच्या उपयोगाच्या वस्तू त्यात मिळायच्या. इथे मात्र
कोठलीही लहानसहान गोष्ट विकत घ्यायची असली तरी त्यासाठी मोटार काढून एकाद्या मोठ्या मॉलवर आवे लागते, किंवा इथले लोक जेंव्हा तिथे जातात तेंव्हा दिसतील तेवढ्या गरजेच्या वस्तू घरी आणून ठेवतात. 'किरकोळ व्यापारी' हा वर्ग निदान अमेरिकेच्या या भागातून नामशेष झाला आहे असे दिसते.
. . . . . . . . . .. . . . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: