Wednesday, January 14, 2009

राणीचे शहर लंडन - भाग ५


राजाबाई टॉवर, आयफेल टॉवर वगैरे नांवावरून टॉवर म्हणजे एक उंचच उंच इमारत असणार असे वाटते. हल्ली बांधलेल्या कांही गगनचुंबी इमारती 'मित्तल टॉवर', रहेजा टॉवर' यासारख्या नांवांने ओळखल्या जातात. पण टॉवर ऑफ लंडनच्या गेटपाशी आल्यानंतर देखील जवळपास कुठेच कोणताही मनोरा दिसत नाही. मुंबईच्या फोर्ट भागात आता कुठे किल्ला दिसतो? पण दोनतीनशे वर्षांपूर्वी कधीतरी ब्रिटिशांनी त्या भागात किल्ला बांधला होता असा इतिहास आहे. टॉवर ऑफ लंडनमध्ये आपल्या अपेक्षेतला टॉवर नसला तरी त्या जागी एक अतीशय जुना किल्ला आहे आणि आजसुद्धा त्याचे बुरुज, तटबंदी वगैरे तिथे दिसतात. या किल्ल्यात असलेल्या सगळ्याच वीस पंचवीस इमारती 'अमका तमका टॉवर' या नांवाने ओळखल्या जातात. आजच्या काळात त्या फारशा उंच वाटणार नाहीत, पण पूर्वीच्या काळातल्या सामान्य इमारतींच्या मानाने त्या उंचच असणार. इथून जवळच 'टॉवर हिल' या नावाचे रेल्वे स्टेशन आहे ते तर चक्क जमीनीच्या खाली आहे आणि आसपास कोठे लहानशी टेकडीसुद्धा नाही. हा आणखी एक विनोद!


या किल्ल्याच्या आंत मध्यभागी व्हाईट टॉवर नांवाची चार मजली भव्य इमारत आहे. अकराव्या शतकातल्या विलियम दि कॉँकरर या राजाने ती बांधली. आज नऊशे वर्षानंतरदेखील ती सुस्थितीत ठेवलेली आहे. इंग्लंडच्या राजांच्या कित्येक पिढ्या या महालात राहिल्या. इतर महालात देखील कोणी कोणी राहून गेले किंवा अनेक ऐतिहासिक महत्वाच्या घटना घडल्या. कोणा राजपुत्राला कोठे बंदीवासात ठेवले होते तर कोणा राणीचा कोठे शिरच्छेद करण्यात आला. कोठे खजिना ठेवलेला असे तर कोठे शस्त्रागार होते. यातील कांही टॉवर्सचा उपयोग निरीक्षणासाठी केला जात असे तर कांहींचा संरक्षणासाठी. त्या किल्ल्यात फिरतांना तिथले मार्गदर्शक याबद्दल अनेक सुरस कथा सांगतात, पण मुळात इंग्लंडचा इतिहासच माहीत नसेल आणि त्यात कांही स्वारस्य नसेल तर त्यातले किती समजणार आणि किती लक्षात राहणार? हे मार्गदर्शकदेखील इतिहासकाळातला पोशाख घालून येतात. ते पाहतांनाच गंमत वाटते.


वेगवेगळ्या इमारतींमध्ये त-हेत-हेची संग्रहालये आहेत. कुठे बाराव्या तेराव्या शतकातले संपूर्ण वातावरण तयार केले आहे, कुठे पोशाख, तलवारी, बंदुका, चित्रे, हस्तलिखिते वगैरे वगैरे मांडून ठेवलेले आहेत. यातील सर्वातच महत्वाचे संग्रहालय तेथल्या रत्नखचित मुकुटांचे आहे. 'दि क्राउन ज्युवेल्स' या नांवाने प्रसिद्ध असलेल्या या प्रदर्शनात इंग्लंडच्या सर्व आजी व माजी राजाराण्यांनी वेळोवेळी धारण केलेले मुकुट अत्यंत कडक बंदोबस्तात ठेवले आहेत. यातल्या एका मुकुटात जगप्रसिद्ध कोहिनूर हा हिरा बसवलेला आहे. मुकुटमणी असलेल्या या हि-याखेरीज दोन हजार अन्य हिरे, माणके, पांचू आदि रत्नांनी हा मुकुट सजवलेला आहे. असे अनेक मुकुट या ठिकाणी आहेत, पण या मुकुटाची सर अन्य कोणाला नाही. हे प्रदर्शन पहाण्यासाठी खूपच गर्दी असते आणि जेंव्हा पहावे तेंव्हा त्या इमारतीसमोर लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. भारतातून आलेले पर्यटक हा मुकुट आवर्जून आणि निरखून पाहतात आणि इंग्रजांच्या नांवाने खडे फोडतात.

No comments: