Monday, January 05, 2009

मौंजीबंधन भाग ३



मुंजीच्या निमित्याने आहेर देण्याघेण्याची पद्धत कधी सुरू झाली हा एक संशोधनाचा मनोरंजक विषय ठरावा. पुरातनकाळातल्या कोठल्या कथेत अशा अर्थाचे उल्लेख ऐकल्याचे मला आठवत नाही. हा कार्यक्रम चाललेला असतांना भटजीबुवा बहुधा विश्रांती घेत असतात आणि त्यांच्या जागेवर स्थानापन्न असले तरी ते त्या अर्थाचे कसलेही मंत्र त्या वेळी म्हणत नाहीत. त्यामुळे माझ्या कल्पनेप्रमाणे प्राचीन काळात आहेराची प्रथा नसावी. या व्यक्तिगत आणि धार्मिक विधीला जेंव्हा समारंभाचे स्वरूप प्राप्त झाले त्या वेळेला त्यात आहेराचा समावेष झाला असावा. शंभर दोनशे वर्षापूर्वीच्या काळात आपल्याकडे धान्यादि खाद्यवस्तूंची सुबत्ता होती पण इतर खर्चासाठी रोकड रकम सहजासहजी पाहिजे तेवढी उपलब्ध होत नसे. त्या काळात एक मोठा समारंभ साजरा करण्यासाठी कुटुंबप्रमुखाला जो खर्च येत असे त्याचा भार थोडा कमी करण्याच्या उद्देशाने इतर आप्तजन समारंभाच्या सुरुवातीलाच आहेराच्या रूपाने त्यातला अल्पसा वाटा उचलत असावेत असा माझा अंदाज आहे. त्याखेरीज दीर्घकाल आपली आठवण रहावी म्हणून कांही टिकाऊ स्वरूपाची भेट देण्यासाठी हे एक चांगले निमित्य मिळायचे. आता त्याचे स्वरूप इतके बदलले आहे की त्यातला आनंदाचा भाग कमी होत चालला आहे आणि त्यावरून एकमेकांशी तुलना, मान अपमान, गैरसमज वगैरे गोष्टी होऊ लागल्या आहेत. शिवाय जरूरी नसलेल्या ढीगभर वस्तूंचे काय करायचे हा प्रश्न उभा राहतो आणि अशा अनावश्यक वस्तूंची अखेर नासाडी होते. त्यामुळे "आपण फक्त आपल्या शुभेच्छा द्याव्यात." अशी विनंती करण्याची नवी पद्धत आजकाल रूढ होऊ लागली आहे.


आहेराचा कार्यक्रम आटोपल्यानंतर भोजनाचा बेत होता. पुण्यामुंबईच्या कार्यालयांमध्ये ठरलेल्या वेळेच्या आधीच सगळे अन्नपदार्थ तयार असतातच, शिवाय टेबलखुर्च्या, ताटवाट्या वगैरे सारी जय्यत तयारी असते. जेवण सुरू करण्याचा इशारा मिळाला की लगेच ते सुरू करता येते. पण मध्यप्रदेशातल्या त्या लहान गांवात असे संपूर्ण कामाचे कंत्राट दिलेले नव्हते. कार्यालय म्हणजे फक्त चार भिंतींनी बंदिस्त असा हॉल होता. त्यात बसण्यासाठी खुर्च्या, गाद्या, जाजमे वगैरे वेगळी भाड्याने आणली होती. त्याचप्रमाणे स्वयंपाकासाठी लागणारी मोठी घमेली, कढया, झारे, शेगड्या तसेच जेवणासाठी ताटे, वाट्या , भांडी वगैरे सगळे सामान टेंटहाऊसमधून मागवले होते. स्वयंपाक करणारे आचारी आरामात उशीराने आले तेसुद्धा रिकाम्या हाताने. आल्यावर त्यांनी एकेक गोष्ट मागायला सुरुवात केली. मोठी भांडी आणतांना पोळपाट, लाटणी, चिमटा, काडेपेटी, केरसुणी असल्या क्षुल्लक वस्तूंकडे कोणी लक्ष दिले नव्हते आणि एकेक करून लागतील तशा त्या आणून पुरवल्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात झाली.


त्या दिवशी फक्त घरची मंडळी आणि परगांवाहून आलेले निकटवर्ती आप्तेष्ट एवढेच लोक तेथे होते आणि सकाळपासून फराळ चाललाच असल्यामुळे कोणाला जेवणाची इतकी घाई नव्हती. त्या दिवशी दुसरा कोणता कार्यक्रम नव्हता. आम्हाला तर जेवण झाल्यावर ताणूनच द्यायची होती. त्यामुळे विशेष फरक पडत नव्हता. पण स्थानिक मंडळींना दुसरे दिवशीच्या कार्याची तयारी करायची होती. बाहेरून आलेल्या मंडळींना कसलीच स्थानिक माहिती नसल्यामुळे या कामात त्यांना फारसा उपयोग होण्यासारखा नव्हता. संपूर्ण कंत्राट देणे आणि प्रत्येक गोष्टीची जुळवाजुळवी करणे यातला फरक जाणवत होता. अखेर भोजनाचा कार्यक्रम आटोपला. या वेळेस नेमकी थंडीची लाट आलेली असल्यामुळे बोचरे वारे अंगावर घेऊन फिरण्याचे धाडस करावेसे वाटत नव्हते. त्यामुळे सृष्टीसौंदर्य वगैरे पहाण्याचा मोह कोणाला झाला नाही. हॉलमध्येच गाद्या अंथरून त्यावर लोळत पडल्या पडल्या गप्पा रंगल्या. वेगवेगळ्या गांवाहून आलेल्या पाहुण्यांची चौकशी करून झाली. कांही जुन्या ओळखी जाग्या झाल्या. त्यातून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. कांही नव्या ओळखीही झाल्या. आता कोण कोण कुठे कुठे काय काय करताहेत वगैरेची खबरबात आणि त्यांच्या भविष्यकाळातल्या योजना वगैरे माहितीची देवाण घेवाण झाली. यासाठीच तर आम्ही इतक्या दूर तेथे गेलो होतो!


दुपारची जेवणे होताहोताच सायंकाल झाला होता. त्यामुळे रात्री कोणाला भूक नव्हतीच. थोडेसे अन्न पोटात ढकलून पुन्हा मैफल जमली. त्यात उत्स्फूर्तपणे विविधगुणदर्शनाचे कार्यक्रम झाले. गाणी, नकला, विडंबन, टवाळकी वगैरे सगळ्या प्रकारांनी तो चांगला रंगला. झोपी गेलेली माणसेसुद्धा जागी होऊन उठून बसली आणि त्यात भाग घेऊ लागली. अखेर दुसरे दिवशी लवकर उठायचे आहे याची आठवण करून दिल्यानंतर तो आटोपता घ्यावा लागला.
(क्रमशः)

No comments: