Tuesday, January 27, 2009

स्वामीनारायण मंदिर


पूर्वीच्या काळी 'यात्रा' या शब्दाचा अर्थ बहुतेक वेळा 'तीर्थयात्रा' असाच व्हायचा. इतर कारणांसाठी त्या मानाने कमीच प्रवास होत असे. दळणवळणाची नवनवी साधने उपलब्ध झाल्यावर प्रवास सुलभ झाला. त्यानंतर यात्रेकरूंची संख्यासुध्दा शतपटीने वाढली आहे. पूर्वेला जगन्नाथपुरी, पश्चिमेला द्वारका , उत्तरेला बद्रीनाथ - केदारनाथ, वायव्येला अमरनाथ, ईशान्येला कामाख्यादेवी आणि दक्षिणेला रामेश्वर आणि कन्याकुमारी इथपर्यंत भारताच्या कान्याकोप-यातल्या विविध देवदेवतांचे दर्शन घेऊन आलेले कित्येक लोक अगदी आपल्या रोजच्या पाहण्यात असतात. भाविक लोक तुळजापूर किंवा पंढरपूरला मुद्दाम देवदर्शनासाठी जातात, पण सहज म्हणून सोलापूरला गेले तरी तिथल्या सिध्देश्वराच्या आणि बार्शीला गेले तर भगवंताच्या पाया पडून येतात. माझे सामान्यज्ञान एवढे चांगले नसेल, पण त्रिवेंद्रम शहरातच शेषशायी विष्णू भगवानाचे आणि विशाखापट्टणजवळ सिंहाचलम इथे नृसिंहाचे भव्य मंदिर आहे हे मी त्या गांवांत जाऊन पोचेपर्यंत मला ठाऊक नव्हते. पण तिथे गेल्यानंतर वेळ काढून त्यांच्या दर्शनाचा
लाभ घेऊनच परत आलो. घराजवळ असलेल्या कोठल्याही देवळात माझी हजेरी फारशी लागत नसली तरी काशी रामेश्वरासह बरीचशी तीर्थयात्रा मला कारणा कारणाने घडत गेली. इंग्लंडमधल्या लीड्स शहरात असतांना तितल्या एकमेव 'हिंदू टेंपल' ला मी जात असेच, शिवाय बर्मिंगहॅम इथे बांधल्या जात असलेल्या प्रति तिरुपती व्यंकटेशाचे दर्शनसुध्दा घडले. माझी गणना 'भाविकां'त होऊ शकत नसली तरी सुंदर मंदिरातले पवित्र आणि प्रसन्न वातावरण मला मोहित करते.
अल्फारेटाला आल्यानंतर अॅटलांटादर्शनाची सुरुवातच मी स्वामीनारायण मंदिरापासून केली. स्वामी नांवाची निदान दहा माणसे मला भेटली आहेत, नारायण नांवाची तर पंधरा वीस तरी असतील, एक नारायणस्वामी सुध्दा ओळखीचे आहेत, पण स्वामीनारायण हे नांव कोणाचे असलेले माझ्या ऐकण्यात आलेले नाही. नारायण म्हणजे विष्णूच्या राम आणि कृष्ण या अवतारांची तसेच विठ्ठल, व्यंकटेश किंवा बालाजी या रूपांची अनेक मंदिरे गांवोगांवी आहेत. वराह, नृसिंह आणि परशुराम या अवतारांची मंदिरे मी पाहिली आहेत, दिल्लीचे लक्ष्मीनारायण मंदिर बिर्लांच्याच नांवाने जास्त प्रसिध्द झाले आहे. स्वामीनारायणाची सुध्दा पन्नासावर मंदिरे भारतात आहेत, त्यातले एक सुंदर मंदिर दादरच्या मध्य रेल्वेच्या स्टेशनाच्या अगदी समोर आहे, पण कां कुणास ठाऊक, ते आम जनतेसाठी खुले नाही अशी माझी कदाचित चुकीची समजूत झाल्यामुळे मी त्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न कधी केला नव्हता.
स्वामीनारायण मंदिराला जाण्यासाठी अल्फारेटाहून जॉर्जिया ४०० हायवेने निघून दक्षिणेकडे बरेच अंतर गेल्यानंतर अॅटलांटा शहराचा टोल नाका येण्यापूर्वीच आम्ही एक वेगळा रस्ता धरला आणि लिलबर्न गांव गांठले. कांही जुन्या पध्दतीचे बंगले आणि कांही नव्या इमारती यांचे मिश्रण या ठिकाणी आहे. अमेरिकेतल्या गांवातली सगळी घरे एकमेकांपासून दूर दूर विखुरलेली असलेली पाहण्याची आता संवय झाली आहे. त्यामुळे त्याचे आश्चर्य वाटत नाही. त्या परिसरातच एका विस्तीर्ण प्लॉटवर स्वामीनारायण
मंदिराचे भव्य बांधकाम केले आहे. हे मंदिर हल्लीच बांधले गेले असल्यामुळे आधुनिक नगररचना आणि वास्तुशिल्पशास्त्राचा चांगला उपयोग त्यात केलेला आहे. कार पार्किंगसाठी आजूबाजूला खूप मोठी मोकळी जागा सोडली आहे. त्याचा आणखी विस्तार चालला होता. वाहनांना जाण्यायेण्यासाठी रुंद रस्ते ठेवले आहेत. समोर एक पाण्याचा तलाव आहे. त्याच्या चारी बाजूने फिरायला पदपथ आणि बसायला आसने बनवून ठेवली आहेत. उरलेल्या सगळ्या जागेवर हिरवळ आहे, सांवली देणारे कांही वृक्ष आहेत आणि अनेक सुंदर फुलझाडांनी सारा परिसर सुशोभित केला आहे. एकंदरीन मनाला प्रफुल्लित करणारे वातावरण या जागी तयार केले आहे.
सभामंडप आणि गर्भगृहे वगैरेने युक्त असलेली मंदिराची मुख्य वास्तू बरेच उंचावर आहे. त्यात प्रवेश करण्यासाठी सुंदर पाय-या चढून जावे लागते. पण पाय-यांच्या दोन्ही बाजूला खालच्या बाजूला अनेक खोल्या दिसतात. त्यामुळे मुख्य देऊळ दुस-या मजल्यावर आहे असे वाटते. पाय-या चढण्याच्या आधी बाहेरून मंदिराची छायाचित्रे घेण्याला परवानगी आहे, पण प्रवेश केल्यानंतर फोटो किंवा व्हीडिओ शूटिंगला सक्त मनाई आहे. आंतल्या सुंदर मूर्तींची चित्रे स्वामीनारायणाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
मंदिराची इमारत छायाचित्रात बाहेरून जितकी सुबक दिसते त्याहूनही अधिक सुरेख ती आंतून दिसते. प्रत्येक खांबावर आणि छपरावर सुबक आणि रेखीव शिल्पकृती कोरल्या आहेत. त्यावर कलात्मक पध्दतीने टाकलेले प्रकाशाचे झोत रंग बदलत असतात. त्याने त्या शिल्पकृतींना अधिकच उठाव येतो. आंत ओळीने अनेक गाभारे आहेत. त्यातल्या तीन गाभा-यात राधाकृष्ण, शिव- पार्वती, गणेश, श्रीराम, सीता आणि हनुमानाच्या मूर्ती आहेत आणि इतर ठिकाणी भगवान स्वामीनारायण यांच्या संप्रदायातील अक्षर पुरुषोत्तम महाराज, घनश्याम महाराज, हरिकृष्ण महाराज, ब्रम्हस्वरूप भगतजी महाराज, ब्रम्हस्वरूप शास्त्रीजी महाराज, ब्रम्हस्वरूप योगीजी महाराज आणि प्रगत ब्रम्हस्वरूप प्रमुख स्वामी महाराज यांच्या प्रतिमा आहेत. यातील पहिल्या तीन मूर्तींना सुंदर वस्त्राप्रावरणांनी विभूषवले आहे तर बाकीचे ब्रम्हस्वरूप स्वामी संन्यासाच्या वेषात दिसतात. पण एकंदरीत पाहता या मंदिरात पारंपरिक हिंदू देवतांपेक्षा स्वामीनारायण संप्रदायातील गुरूंना अधिक महत्व दिलेले दिसते.

या संप्रदायाची स्थापना दोनशे वर्षांपूर्वी झाली होती. सन १७८१ मध्ये रामनवमीच्या दिवशी उत्तर प्रदेशातील छपैया या गांवी जन्मलेले घनश्याम पांडे यांनी लहानपणी वयाच्या अकराव्या वर्षीच घर सोडून दिले आणि नीलकंठ वर्णी हे नांव धारण करून सात वर्षे देशभ्रमण केले आणि योगसाधना केली. त्यानंतर ते गुजराथमध्ये स्थायिक झाले. रामानंद स्वामी यांचे शिष्यत्व पत्करल्यानंतर त्यांना सहजानंद स्वामी असे नामाभिधान मिळाले. त्यांच्या गुरूंच्या पश्चात ते उध्दव संप्रदायाचे प्रमुख झाले आणि आपल्या शिष्यवर्गाला स्वामीनारायण मंत्र सागितला. त्यानंतर तो संप्रदायच स्वामीनारायण संप्रदाय या नांवाने ओळखला जाऊ लागला तसेच सहजानंद स्वामीच स्वामीनारायण झाले. त्यांनी वेदांतातील वैष्मवधर्मात सांगितलेल्या तत्वांचा जनतेत प्रसार केला. अनेक ग्रंथ लिहिले, देवालये बांधली आणि मोठी शिष्यपरंपरा निर्माण केली. सन १८३० मध्ये त्यांचा स्वर्गवास झाला. ज्या कालखंडात महाराष्ट्रातली पेशवाई लयाला चालली होती त्या काळात ते गुजराथेतील जनसमाजाला परमार्थाचे मार्गदर्शन करीत होते.
गेल्या शतकातल्या त्यांच्या संप्रदायातल्या महाराजांनी त्याचा विस्तार जगभर केला आहे. अनेक देशात ते समाजोपयोगी कामे करताहेत आणि त्यासाठी निरनिराळ्या संस्था उभ्या केल्या आहेत. त्यांचे सर्वात दृष्य स्वरूपाचे काम म्हणजे त्यांनी या काळातली अप्रतिम अशी अनेक मंदिरे उभी केली आहेत. गांधीनगर आणि नवी दिल्ली येथील अक्षरधाम मंदिरे त्यांच्या सौंदर्याने आणि भव्यतेने नांवाजली गेली आहेत. अमेरिकेतसुध्दा त्यांनी सुंदर मंदिरे बांधली आहेत. त्यातलेच एक अॅटलांटाच्या जवळ आहे. या मंदिरात रोजची पूजा अर्चा वगैरे नित्यनेमाने होतच असते, शिवाय रविवारी मुले, स्त्रिया, पुरुष वगैरेंच्या प्रबोधनासाठी वर्ग चालतात. सर्व हिंदू सण सार्वजनिक रीत्या साजरे करतात त्यात येथील भाविक लोक उत्साहाने सहभाग घेतात. आजकालच्या प्रसिध्दी आणि संपर्कतंत्राचा चांगला उपयोग या कामात केला जातो. स्वामीनारायण मंदिराला भेट देऊन एक वेगळाच अनुभव आला.
या मंदिराबद्दल सचित्र माहिती खाली दिलेल्या संकेतस्थळावर दिली आहे.http://www.swaminarayan.org/globalnetwork/america/atlanta.htm
' ' " " ? ! :

No comments: