Saturday, January 10, 2009

राणीचे शहर लंडन - भाग १


"पुसी कॅट पुसी कॅट व्हेअर हॅड यू बीन? आय हॅड बीन टु लंडन टु लुकॅट द क्वीन." आणि "लंडन ब्रिज ईज फॉलिंग डाऊन" अशासारख्या नर्सरी -हाइम्समधून मुलांची लहानपणीच लंडनशी ओळख होते आणि त्यांच्या मनात त्या मायानगरीबद्धल कुतूहल निर्माण होते. भारतातली सगळी संस्थाने त्यात विलीन होऊन गेल्यानंतर आता इथे कोणी राणीसाहेब उरलेल्या नाहीत. इंग्लंडमध्ये मात्र अजून एक नामधारी सम्राज्ञी राजसिंहासनावर बसलेली आहे. यू.के.चा सारा राज्यकारभार तिच्याच नांवाने हांकला जातो. तिथल्या नाण्यांवर आणि नोटांवर तिचे चित्र असते.

एका काळी ब्रिटीशांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता. त्या काळी सर्व जगातील राजकीय आणि आर्थिक घडामोडीचे नियंत्रण लंडनहून होत असे. युद्धात जिंकलेली लूट, मांडलिक राजांच्याकडून घेतलेली खंडणी आणि व्यापारातला नफा अशा अनेक मार्गाने जगभरातल्या संपत्तीचा ओघ लंडनच्या दिशेने वहात होता. त्यामुळे आलेल्या सुबत्तेतला कांही भाग त्या नगरीच्या बांधणीमध्ये खर्च झाला आणि त्यातून तिथले विशाल प्रासाद आणि कलात्मक टोलेगंज इमारती उभ्या राहिल्या असतील. राजधानीचे शहर म्हणून तर लंडनचा दिमाख होताच. जागतिक व्यापाराचे केंद्र असल्यामुळे जगभरातील व्यापारी त्या शहराला भेट देत होते, त्यांनी आपल्या कंपन्यांची ऑफिसे तिथे थाटली. उच्च शिक्षणासाठी जगभरातले विद्यार्थी तिथे येऊन रहात होते. मोठमोठे विचारवंत, साहित्यिक, शास्त्रज्ञ, कलाकार वगैरेंनी लंडन ही आपली कर्मभूमी बनवली आणि तिचे सांस्कृतिक विश्व समृद्ध केले. शंभर वर्षांहून अधिक काळ लंडन ही जगातल्या सा-या महानगरींची महाराणी होती असे म्हणता येईल.

लंडनचा इतिहास देखील रोमइतकाच जुनापुराणा आहे. पण प्राचीन काळात त्या शहराला विशेष महत्व नव्हते. रोम या शहराचे नांव कसे पडले याबद्दल दुमत नाही, पण लंडन शहराच्या नांवाची व्युत्पत्ती नेमकी कशी झाली याबद्दल दहा संशोधकांची दहा निरनिराळी मते दिसतात. जगभरात सगळीकडे प्राचीन कालापासून नद्यांच्या कांठावर वस्ती करून माणसे रहात आली आहेत. त्यांच्या आपसातील लढाया, लुटारूंचे हल्ले, रोगराई, नैसर्गिक आपत्ती अशा अनेक कारणांमुळे त्यांच्या वस्त्या उजाड झाल्या आणि नव्या वस्त्या वसवल्या गेल्या. थेम्स नदीच्या कांठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या काळात मानवांनी वस्त्या निर्माण केल्या होत्या. आज लंडन शहर जेवढ्या विस्तृत भागात पसरले आहे त्यातल्या कित्येक जागी अशा प्रकारच्या पुरातन वस्त्यांचे अवशेष उत्खननात सापडले आहेत. ही प्रक्रिया शतकानुशतके चालू होती. त्याप्रमाणे अनेक खेडी या भागात वसवली गेली होती. लीड्स या छोट्या शहरातच पन्नासाहून अधिक
जुन्या काळातली खेडी सामावलेली आहेत तर लंडन या महानगरात मध्ये ती किती असतील?

रोमन साम्राज्याने इंग्लंडचा भागसुद्धा जिंकून घेतला होता आणि लंडनच्या भागात आपली छावणी बांधली होती. दळणवळणाची आणि संपर्काची साधने अत्यंत तुटपुंजी असलेल्या त्या काळात राजधानीपासून दूरवरच्या प्रदेशात जाऊन आणि सतत चालू असलेल्या लढायांमध्ये टिकाव धरून राहणे कठीणच असते. तेंव्हा रोमसारख्या मोठ्या इमारती त्या ठिकाणी बांधणे त्यांना कसे शक्य होणार? रोमन साम्राज्याचा प्रभाव कमी झाल्यानंतर व्हायकिंग, नॉर्मन आदि लोकांनी ब्रिटनवर आक्रमणे केली आणि सॅक्सन लोकांबरोबर त्यांच्या लढाया होत राहिल्या. त्यात विजयी झालेल्या जेत्यांनी आपापल्या जहागिरी, परगणे आणि राज्ये जागोजागी स्थापन केली होती. कांही शतकांचा काळ गेल्यावर या सर्वांचे एकत्रीकरण झाले आणि ब्रिटनवर एकछत्री अंमल सुरू झाला.

मध्ययुगाच्या काळात युरोपखंडातल्या सगळ्याच देशांचा झपाट्याने विकास झाला आणि या क्रांतिकारक प्रगतीमध्ये ब्रिटन आघाडीवर राहिला. त्या देशाने युरोपमधला कोठलाही दुसरा भाग जिंकून घेतला नाही, पण आशिया, आफ्रिका, अमेरिका व ऑस्ट्रेलिया खंडांतले प्रचंड भूभाग आपल्या आधिपत्याखाली आणले. या सर्व कालखंडात ब्रिटनची राजधानी लंडन येथे असल्यामुळे ते जगातील अव्वल क्रमांकाचे शहर झाले.
. . . . . . . . .. . . (क्रमशः)

No comments: