Saturday, July 19, 2008

शाकुंतल - कालिदासाचा परीसस्पर्श


कालिदास दिनाच्या निमित्याने 'हितगुज'च्या बैठकीत फलटणचे प्रा. विक्रम आपटे यांनी या विषयावर सुरेख आणि रसाळ असे व्याख्यान दिले त्याचा हा गोषवारा.

कालिदासाचे अभिज्ञान शाकुंतल हे नाटक जगप्रसिध्द आहे. एक अजरामर अशी 'ऑल टाइम ग्रेट' समजली जाणारी ही साहित्यकृती आहे. मात्र याची मूळ कथा कांही कालीदालाने स्वतः रचलेली नाही. किंबहुना त्याची सर्वच नाटके पौराणिक कथांवर आधारलेली आहेत. शेक्स्पीअरची नाटकेसुध्दा अशा इतरांनी सांगितलेल्या गोष्टींवरच रचलेली आहेत. पण मूळ कथाबीजांचा या महान लेखकांनी आपल्या कल्पकतेने आणि प्रतिभेने कसा विस्तार केला यावरून त्यांचे आगळेपण दिसते.

महाभारतात दुष्यंत शकुंतला आख्यानाची जी कथा दिली आहे तिच्यानुसार दुष्यंत राजा शिकार करता करता कण्व मुनींच्या आश्रमापाशी येतो. मुनींचे दर्शन घेण्यासाठी तो आश्रमात जातो तेंव्हा मुनी समिधा गोळा करून आणण्यासाठी अरण्यात गेले असतात. त्यांची मानसकन्या शकुंतला दुष्यंताचे स्वागत करते, प्रथमदर्शनीच दुष्यंत तिच्या प्रेमात पडून तिला लग्नाची मागणी घालतो. पण "माझ्या पुत्राला तुझ्या पश्चात राज्याधिकार देणार असशील तरच मी लग्नाला तयार आहे." अशी अट शकुंतला त्याला घालते. कामातुर राजा ही अट त्या क्षणी मान्य करतो आणि त्यांचा गांधर्वविवाह होतो. शकुंतलेला सन्मानाने राजवाड्यात बोलावून घेण्याचे आश्वासन देऊन दुष्यंत परत निघून जातो. परंतु तो आपले वचन पाळत नाही. शकुंतला कण्व मुनींच्या आश्रमातच एका पुत्राला जन्म देते आणि त्याचे नांव सर्वदमन असे ठेवते. तो सहा वर्षांचा झाल्यानंतर ती त्याला दुष्यंत राजाकडे घेऊन जाते. शकुंतलेचे म्हणणे साफ नाकारून दुष्यंत तिचा स्वीकार करत नाही. यावर ती रागाने थयथयाट करते आणि "असला खोटारडा आणि विश्वासघातकी माणूस तुमचा राजा कसा झाला? " असा प्रश्न त्याच्या दरबारातील मंडळींना करते. पण तरीही दुष्यंत तिला दाद देत नाही. ती निराश होऊन परत फिरते तेवढ्यात "शकुंतला हीच दुष्यंताची पत्नी आहे आणि तिचा मुलगा राजपुत्रच आहे. " अशी आकाशवाणी होते. ती ऐकल्यावर मात्र दुष्यंत राजा "आपल्याला सगळे आठवत होते, पण प्रजा काय म्हणेल? असा विचार करून आपण ते विसरल्याचे नाटक केले." अशी सारवासारवी करतो आणि शकुंतलेचा तिच्या मुलासह जाहीरपणे स्वीकार करतो.

या मूळ गोष्टीवर नाटक लिहिण्यापूर्वी कालिदासाने सखोल विचार करून त्यात अनेक फेरफार केले. अट घालून लग्नाला तयार होणारी शकुंतला आणि दिलेले वचन मोडणारा दुष्यंत त्याला पसंत नव्हते. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रानुसार नाटकांचे नायक व नायिका हे धीरोदात्त, निष्कलंक, चारित्र्यवान, सद्गुणी, समाजाला आदर्श वाटावा असे हवेत. त्यांनी मनापासून निखळ प्रेम केले असले पाहिजे. त्यात नफ्यातोट्याचा हिशोब असू नये. त्यांनी हेतुपुरःसर स्वार्थ किंवा ढोंग करणे उचित नव्हते. यामुळे अनेक उपकथानके आणि प्रसंग रंगवून, काल्पनिक पात्रे टाकून कालिदासाने हे नाटक निर्माण केले. त्याचे नांव ' अभिज्ञान शाकुंतल' म्हणजे 'शकुंतलेची ओळख' असे ठेवून त्यात शकुंतलेची ओळख पटणे याला केंद्रस्थानी धरले. यासाठी त्याने कोणते महत्वाचे बदल केले ते पाहू.

सुरुवातीलाच राजा दुष्यंत शिकार करण्यासाठी वनात हिंडत असतांना एका सुंदर हरिणावर नेम धरून बाण सोडणार असतो तेवढ्यात ते हरिण कण्वमुनींच्या आश्रमातले असल्याचे तिथला एक आश्रमवासी त्याला सांगतो. "मी इथला राजा आहे, मला पाहिजे ते मी करीन. " असा उन्मत्तपणा न दाखवता तो धनुष्यावर चढवलेला बाण मागे घेतो आणि अंगावरील राजवस्त्रे, अलंकार वगैरे उतरवून ठेऊन साध्या कपड्यात कण्वमुनींची भेट घेण्यासाठी आश्रमात जातो. इथेच दुष्यंताच्या व्यक्तीरेखेला सुसंस्कृततेची झालर लावणे सुरू होते. मूळ कथेनुसार समिधा आणण्यासाठी कण्वमुनी रानात गेलेले असतात. पण हे काम तासा दोन तासात पूर्ण होण्यासारखे आहे. दुष्यंत व शकुंतलेची भेट, प्रेम, मीलन आणि ताटातूट या सगळ्या गोष्टी घडवून आणण्यासाठी एवढा वेळ पुरेसा नाही. म्हणून कण्वमुनींना कुठले तरी व्रत करण्यासाठी कालिदास एका तीर्थक्षेत्राला पाठवून देतो आणि आपल्याला हवे तेवढे प्रसंग नाटकांत घालण्याची सोय करून घेतो.

दुष्यंत आणि शकुंतलेची भेट घडवून आणण्यासाठी कालिदासाने मोठ्या चतुराईने एक काव्यमय प्रसंग रंगवला भहे. शकुंतला वेलीवरची फुले तोडीत असतांना राजा दुष्यंत झुडुपांमागून तिला पहात असतो पण आपण होऊन पुढे होण्यात त्याला संकोच वाटत असतो. त्याच वेळी एक भ्रमर शकुंतलेच्या मुखकमलाजवळ फेऱ्या घालून तिला हैराण करतो. "याच्या त्रासातून कुणीतरी मला सोडवा गं." असे ती आपल्या सख्यांना सांगते. त्यावर एक सखी म्हणते, "शत्रूपासून तुझे संरक्षण करणे हे तर राजाचे काम आहे." झाले, लगेच झुडुपाआडून निघून समोर येण्यासाठी दुष्यंताला चांगले निमित्य मिळते. तो त्या भुंग्याला पिटाळून लावून शकुंतलेला त्याच्या त्रासातून मुक्त करतो आणि नकळतच आपल्या प्रेमाच्या जाळ्यात गुंतवतो.

शकुंतलेच्या ओढीमुळे दुष्यंताला तिकडून परत राजधानीकडे फिरायचे नसते, पण कण्व मुनींच्या आश्रमात तो थांबणार तरी कसा? यावर कालिदासाने तोड काढली. कण्वमुनींचे शिष्यच ते करत असलेल्या यज्ञकर्मांचे राक्षसांपासून संरक्षण करण्याची विनंती दुष्यंताला करतात आणि तो एका पायावर तयार होऊन त्यासाठी स्वतः जातीने तेथे थांबतो. दुष्यंताचे मन तर लगेच शकुंतलेवर जडलेले असते पण तिच्या मनात काय आहे हे त्याला कसे समजणार? त्याला भेटून जातांजाता तिच्या मनगटाला बांधलेली फुलांची माळ गळून पडते आणि ती आणण्याचे निमित्य करून ती त्याच्याकडे परत येते. यावरून दुष्यंत त्याला जे समजायचे असते ते समजतो आणि त्यांचे मनोमीलन होते.

पण कांही झाले तरी राजा आपल्या राज्याचा कारभार सोडून किती दिवस दूर राहणार? दुष्यंताला माघारी तर जावेच लागते. शकुंतलेला आणा भाका वचने वगैरे देऊन तो परत जातो. जाण्यापूर्वी आपली आठवण म्हणून आपली अंगठी तिच्या बोटात घालतो. आता यापुढे कथाभागाप्रमाणे या प्रेमिकांचा विरह व्हायला हवा. तो घढवून आणण्यासाठी कालिदासाने दुर्वासमुनींना नाटकात आणले. दुष्यंताच्या आठवणीत मग्न असल्यामुळे शकुंतलेला दुर्वास मुनी आश्रमात आलेले समजतच नाही. या अपमानाने क्रुध्द झालेले दुर्वास मुनी " ज्याच्या आठवणीत तू एवढी हरवून गेली आहेस तोच तुला विसरून जाईल. " असा शाप शकुंतलेला देतात. तिला बिचारीला ते ही समजत नाही. पण तिच्या सख्य़ा तिच्या वतीने रदबदली करून मुनींकडून उःशाप मागून घेतात. दुष्यंतानेच शकुंतलेला दिलेली एकादी वस्तू त्याला दिसली तर त्याची स्मृती जागी होईल असा तो उःशाप असतो. त्यामुळे सखी निर्धास्त होतात आणि शकुंतलेला यातले कांही सांगत नाहीत.

कण्वमुनी तीर्थक्षेत्राहून परत आल्यानंतर त्यांना सर्व हकीकत समजते. शकुंतला गर्भवती असल्यामुळे आता तिने पतीच्या घरी जाणेच श्रेयस्कर असते. "अर्थोहि कन्या परकीय एव।" याची जाणीव होताच ते तिची सासरी पाठवणी करायचे ठरवतात. शकुंतला तर कधी दुष्यंताचे बोलावणे येईल याची आतुरतेने वाट पहात असते, पण दुर्वासांच्या शापवाणीमुळे त्याला शकुंतलेचे विस्मरण झालेले असते. अखेर आश्रमातील दोन शिष्यांना सोबतीला घेऊन शकुंतला हस्तिनापुराला जायला निघते. त्यावेळी कण्वमुनींची तर दाटून कंठ येतो अशी अवस्था होतेच पण आश्रमातील हरिणी आणि इतर प्राणीच नव्हे तर फुलझाडेसुध्दा गद्गदून जातात असे हृद्य दृष्य कालिदासाने उभे केले आहे.

दुर्वास मुनींच्या शापाच्या प्रभावाखाली असल्यामुळे दुष्यंताला शकुंतलेची ओळख पटत नाही. तिचे सौंदर्य पाहून तिला स्वीकारण्याचा मोह त्याला क्षणभर होतो, पण ती गरोदर आहे याचा अर्थ आधीच ती दुसऱ्या कोणाची झालेली आहे हे पाहून तो आपल्याला झालेला मोह टाळतो. अशा प्रकारे पुन्हा त्याचे उदात्तीकरण केलेले आहे. दुष्यंताने दिलेली अंगठी त्याला दाखवावी म्हणून शकुंतला नाट्यमय पध्दतीने आपला पंजा पुढे करते आणि बोटात अंगठी नसल्याचे पाहून तिला धक्का बसतो. तिने सांगितलेल्या आपल्या कर्मकथेतले कांहीच आठवत नसल्याचे दुष्यंत सांगतो.

दुष्यंत राजाने न स्वीकारल्यानंतर शकुंतलेने कुठे जायचे हा प्रश्न उभा राहतो. तिचे म्हणणे खरे असेल तर तिने कसेही पतीकडेच राहिले पाहिजे आणि दुष्यंताचे सांगणे खरे असेल ती कुलटा ठरते आणि त्यामुळे आश्रमात जाऊन राहू शकत नाही. या दुविधा अवस्थेतून मार्ग काढण्यासाठी दुष्यंताचा अमात्य तिला आपल्या घरी घेऊन जातो आणि तिचे संगोपनाची जबाबदारी स्वतःकडे घेतो. पण शकुंतलेची माता मेनका स्वर्गातून पृथ्वीवर अवतरते आणि तिला उचलून घेऊन जाते. आकाशातून दिव्य विजेचा लोळ खाली उतरला आणि शकुंतलेला घेऊन अदृष्य झाला एवढेच त्याला दिसते आणि तो दिग्मूढ होऊन जातो. शकुंतलेच्या बाबतीत कांही तरी अद्भुत आहे एवढे त्याला समजते पण त्याला कांहीच करता येण्यासारखे नसते.

कांही दिवसांनी राजदूत एका कोळ्याला पकडून दुष्यंताच्या समोर आणतात. त्याने राजाची अंगठी चोरली आहे असा आरोप त्याच्यावर असतो. त्याचे असे झाले असते की सासरी जात असतांना वाटेत एक नदी लागते. नांवेत बसून ती पार करत असतांना शकुंतला पाण्यात हात घालून मजेत तो हलवण्याचे चाळे करीत असते. त्या वेळी ती अंगठी तिच्या बोटातून निसटून केंव्हा पाण्यात पडते ते तिलाही समजत नाही. त्यावेळी तिथून जात असलेला एक रावस मासा ती अंगठी गिळतो. आणि ती अंगठी त्याच्या पोटात जाते. एक कोळी त्या माशाला जाळ्यात पकडून घरी नेतो. खाण्यासाठी तो मासा कापताच ती अंगठी त्याला सापडते. नदीमातेनेच आपल्याला हे धन दिले अशा समजुतीने तो कोळी ती अंगठी विकण्यासाठी बाजारात घेऊन जातो. त्यावरील राजमुद्रा पाहताच ती अंगठी राजाचीच आहे हे सराफ लगेच ओळखतो आणि त्या कोळ्याला शिपायांच्या स्वाधीन करतो. कोळ्याच्या सांगण्यावर कोणीच विश्वास ठेवीत नाही आणि प्रत्यक्ष राजाचाच अपराध त्याने केला असल्याने राजानेच त्याला दंड करावा म्हणून ते त्याला दुष्यंताच्या समोर उभे करतात.

दुर्वास ऋषींनी दिलेल्या उःशापानुसार ती अंगठी पाहताच दुष्यंताला सारे कांही एकदम आठवते आणि शकुंतलेच्या विरहाने तो व्याकुल होतो. तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो पण ती अदृष्य झाली आहे एवढेच त्याला समजते. पश्चात्ताप दग्ध झाल्यामुळे त्याला राज्यकारभारातही रस रहात नाही आमि तो सैरभैर होऊन जातो. याच अवस्थेत फिरत असतांना एक चमत्कार घडतो. एक दिवस त्याचा विदूषक मित्र अचानकपणे हवेत तरंगू लागतो. "ही कसली गंमत आहे?" असे विचारताच तो सांगतो," मी आपल्या मनाने उडत नाही आहे. कोणीतरी मला हवेत वर उचलत आहे." त्याला वाचवण्यासाठी दुष्यंत आपले धनुष्य आणि बाणांचा भाता घेऊन येतो आणि अदृष्य अशा शक्तीला मारण्याचे अस्त्र धनुष्यावर चढवतो. ते पाहताच इंद्राचा सारथी मातली तिथे प्रकट होऊन दुष्यंताला वंदन करून सांगतो, "हे राजन, इंद्रावर कोण्या बलाढ्य असुराने हल्ला केला असून त्याला तुमच्या मदतीची गरज आहे. त्यामुळे तुम्हाला नेण्यासाठी मी इथे आलो आहे." हे ऐकून दुष्यंताचा क्षात्रधर्मजागा होतो आणि तो मातलीबरोबर युध्दाला निघून जातो.

दैत्याचे पारिपत्य करून पृथ्वीकडे परततांना त्याला एक अत्यंत रमणीय अशी जागा दिसते म्हणून तो मातलीला आपला रथ तिकडे न्यायला सांगतो. मारिच ऋषी आणि त्यांची पत्नी आदिती यांचा आश्रम तिथे असतो. आश्रमात गेल्या गेल्या दुष्यंताला एक लहानगे मूल सिंहाच्या छाव्याबरोबर खेळतांना दिसते. दोन्ही हातांनी त्याचा जबडा उघडून त्याला सिंहाच्या छाव्याच्या तोंडातले दांत मोजायचे असतात. त्या मुलाच्या या अजब हट्टाने त्याच्याबरोबर असलेली आश्रमकन्या भयभीत होऊन " या मुलाला कांही तरी समजाऊन सांगा" असे दुष्यंताला सांगते. त्या बालकाला पाहून दुष्यंताच्या मनात प्रेमाचे भरते येते आणि तो त्याच्याशी संवाद करू लागतो. इतक्यात दुसरी एक आश्रमकन्या तिथे येते. बाजूच्या झाडावर बसलेल्या शकुंत पक्ष्याला पाहून ती आपल्या सखीला "पश्य शकुंतलावण्य। " असे म्हणते. त्यातील शकुंतला एवढे ऐकताच चमकून तो मुलगा " माझी आई कुठे आहे?" असे विचारतो. ते ऐकताच दुष्यंत राजा चपापतो. "हा मुलगा आपला तर नाही ना?" असा विचार त्याच्या मनात चमकतो.

त्याच वेळी आणखी एक घटना घडते. त्या बालकाच्या दंडाला बांधलेला मंतरलेला ताईत निसटून खाली पडतो. जमीनीवरून तो उचलून पुन्हा त्या मुलाच्या दंडात बांधण्यासाठी दुष्यंताने खाली वाकताच ती आश्रमकन्या त्याला ओरडून थांबायला सांगते. त्या ताइतात अशी जादू असते की त्या बालकाचे माता आणि पिता याखेरीज इतर कोणीही त्याला स्पर्श करताच त्याचे रूपांतर एका विषारी सर्पात होऊन तो त्या माणसाला दंश करेल. पण दुष्यंताला थांबवण्याच्या आधीच त्याने तो उचललेला असतो आणि त्याचा साप बीप कांही होत नाही हे पाहून त्या आश्रमकन्येला आश्चर्य वाटते. एवढ्यात प्रत्यक्ष शकुंतला तेथे येते. तिच्याशी नजरानजर होताच दुष्यंत अत्यंत खजील होऊन तिची माफी मागतो. शकुंतला त्याला झाल्या प्रकाराबद्दल दोष देत नाही. "कदाचित विधीलिखितच असे असेल आणि त्याप्रमाणे घटना घडत गेल्या असणार" असे ती शांतपणे सांगते. एवढ्यात मारिच ऋषी तिथे येतात आणि दुर्वासमुनींच्या शापामुळे हे घडले असल्याचे त्यांनी सांगितल्यावर कोणाच्याही मनात किंतू रहात नाही आणि नाटकाचा पडदा पडतो.

अशा प्रकारे एका साध्या कथेला कालिदासाने अत्यंत रोचक बनवले आहे आणि त्यातल्या अनेक प्रसंगांचे धागे एकमेकांबरोबर व्यवस्थित जुळवले आहेत. त्यात अनेक व्यक्तीरेखा त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांसह समर्थपणे उभ्या केल्या आहेत. कोणाच्याही वागण्यात विसंगती नाही, कोणीही दुष्टपणाने वागत नाही, कसलेही कपट कारस्थान नाही, तरीही नाटकाची कथा रहस्यमय पध्दतीने उलगडत जाते. यातून चांगल्या वर्तनाचे वस्तूपाठ मिळतात, प्रणयातला शृंगाररस, भावनातिरेकाचा करुण रस आणि इतर रसांचा अनुभव येतो. हे सगळे कालिदासाच्या परीसस्पर्शामुळे घडते.

No comments: