Thursday, July 17, 2008

बोलणे आणि लिहिणे

'बोलका ढलपा' आणि 'वर्णमाला' लिहित असतांना बोलणे आणि लिहिणे याबद्दल कांही विचार मनात आले ते या लेखात मांडले आहेत. जन्माला येणारे प्रत्येक लहान मूल ट्याहाँ ट्याहाँ करीतच या जगांत येते. त्यानंतर थोड्याच दिवसात ते नाद, दृष्टी व स्पर्श या माध्यमातून इतर लोकांबरोबर संवाद साधू लागते. हा 'शब्देविण संवादू' आयुष्य असेपर्यंत तसा कांही प्रमाणांत चालतच असतो, पण बोलायला लागल्यानंतर 'बोलणे' हेच संवादाचे प्रमुख साधन बनते. बोलणारा व ऐकणारा या दोघांनी एका वेळी एका जागेवर हजर असणे मात्र यासाठी जरूरीचे असे.
आपला निरोप अक्षरांच्या माध्यमातून दूरवर पाठवता येतो व तो कालांतराने व पुनःपुनः वाचता येतो हे बोलक्या ढलप्याच्या गोष्टीमध्ये मी दाखवले आहे. अशा प्रकारे स्थळकाळाची बंधने ओलांडून संवादाच्या कक्षा लेखनाच्या माध्यमातून रुंदावता आल्या. माणसाने निर्माण केलेल्या या अद्भुत कलेला अनेक आकार प्राप्त झाले व प्राचीन काळातील भूर्जपत्रे, ताम्रपट, शिलालेख वगैरे पासून मध्ययुगातील पोथ्या, खलिते वगैरे अनेक मार्गाने ती विकसित झाली. कागदाची उपलब्धता निर्माण झाल्यानंतर व्यक्तिगत पत्रव्यवहार, नोंदवह्या वगैरे सुरू झाले. छपाईचे तंत्र आल्यानंतर एकाच मजकुराच्या अनेक प्रती बनवणे शक्य झाले. यामुळे पुस्तके, वर्तमानपत्रे वगैरे मोठ्या प्रमाणात प्रचारात आली व त्याद्वारे संवादाच्या कक्षा विस्तृत झाल्या.
गेल्या शतकात आलेल्या कांही साधनांमुळे बोलण्यावर असलेल्या स्थळकाळाच्या मर्यादा गळून पडल्या. ध्वनिक्षेपकांचा उपयोग करून आपला आवाज दूरवर बसलेल्या हजारो श्रोत्यांपर्यंत पोचवता येऊ लागला, दूरध्वनीमार्फत त्यापेक्षाही दूरच्या व्यक्तीबरोबर बोलता येऊ लागले आणि रेडिओच्या माध्यमातून एकाच वेळी तो अनेक ठिकाणच्या अनंत श्रोत्यांपर्यंत पोचू लागला. ध्वनिमुद्रित करून तो टिकवून ठेवताही आला व पुनःप्रसारित करता आला. त्यामुळे बोलक्या ढलप्याऐवजी अगदी आपल्या आवाजाची ध्वनिफीत पाठवता येऊ लागली. याच काळात लेखन व छपाईमध्येसुद्धा प्रचंड प्रगती होऊन ते अधिकाधिक सुकर झाले. दौत टांक जाऊन पेन आले, वेगवेगळ्या प्रकारचे व वेगवेगळ्या आकारांचे कागद वेगवेगळ्या रंगात वेगाने छापता आले, लहान मोठ्या आकारांची पुस्तके बनू लागली. या प्रगतीमुळे लेखन व वाचन यांचा प्रचंड विस्तार झाला तसेच त्याला विलक्षण गति प्राप्त झाली. संगणक आल्यानंतर व विशेषतः इंटरनेटच्या जमान्यात या दोन्ही क्रियांमध्ये अभूतपूर्व प्रगती होऊन ध्वनी आणि अक्षर या दोन्ही माध्यमातून जगभर पसरलेल्या लोकांबरोबर संवाद साधता येऊ लागला आहे.
आपल्याला हवे असलेले बहुतेक सर्व कांही या दोन्ही प्रकारे व्यक्त करता येते व दुस-या व्यक्तीपर्यंत ते पोचवता येते. जरी असे असले तरी बोलणे आणि लिहिणे हे संपूर्णपणे एकमेकांचे पर्याय कधीच बनले नाहीत. दहा वर्षांपूर्वी एस.टी.डी चे दर भारतातील कांही गांवासाठी स्थानिक टेलीफोनच्या दराच्या दहापट होते तर आय.एस.डी.चे दर शंभरपट होते व इंटरनेट सुविधा फक्त टेलीफोनमधूनच उपलब्ध होती. त्यामुळे चॅटिंगसाठीसुद्धा टेलीफोन लागायचाच. त्या काळात स्थानिक लोकांबरोबर मी कधीच चॅटिंग केले नाही, नेहमी त्यांच्याबरोबर टेलीफोनवरच बोललो, परगांवी असलेल्या लोकांबरोबर कधी चॅट तर कधी फोन आणि परदेशी राहणा-या आप्तांबरोबर मुख्यतः चॅटिंग करीत होतो. पण तरीसुद्धा दर तासभराच्या चॅटिंगमागे पांच दहा मिनिटे तरी फोनवर बोलल्याखेरीज चैन पडत नसे कारण 'शब्दांच्या पलीकडले' बरेच कांही जे आपल्या बोलण्यामधून व्यक्त होत असते, ते निर्जीव अक्षरात उतरत नाही. आनंद, मौज, काळजी, चेष्टा, उत्सुकता, वैताग यासारख्या भावना जशा आवाजावरून लगेच समजतात तशा तितक्या स्पष्टपणे व उत्कटपणे त्याच शब्दांच्या वाचनांत त्या जाणवत नाहीत. कदाचित याच कारणाने चॅटिंगची सोय करणा-या लोकांनी लवकरच 'व्हॉईस एनेबल' सुरू करून दिले.
टेलीफोन उचलताच 'हॅलो' म्हणायची पद्धत आहे. या एकाच शब्दाच्या उच्चारावरून आपणास निदान वीस पंचवीस लोकांचे आवाज लगेच ओळखता येतात. तसेच एकाच व्यक्तीच्या आवाजात भावनेनुसार फरक पडतो. उदाहरणादाखल 'कां' या एक अक्षरी शब्दाने कारण विचारतांना त्यामागे उत्सुकता, उत्कंठा, आश्चर्य, जाब विचारणे, अगतिकता असे वेगवेगळे उद्देश असू शकतात. त्यानुसार प्रत्येक वेळी त्याच अक्षराचा वेगळा उच्चार होतो. प्रसिद्ध संगीतकार श्री.यशवंत देव यांनी त्यांच्या 'शब्दप्रधान गायकी' या कार्यक्रमात एक सोपे उदाहरण दिले होते. 'हा रामा काल सकाळी कां आला नाही ?' हे एकच वाक्य वेगवेगळ्या शब्दांवर जोर देऊन वाचा, त्यातून वेगवेगळे अर्थ ध्वनित होतील. या जागी मला ते आवाज ऐकवता येणार नाहीत. वाचकांनी स्वतःच उच्चार करून पहावा.
१.हा.. रामा काल सकाळी कां आला नाही ?..... दुसरा कोठला तरी रामा आला.
२.हा रामा.. काल सकाळी कां आला नाही ? .... कदाचित गोविंदा आला.
३.हा रामा का..ल सकाळी कां आला नाही ? .... परवाच येऊन गेला किंवा आज उगवतो आहे.
४.हा रामा काल सका..ळी कां आला नाही ? .... दुपारी किंवा संध्याकाळी आला.
५.हा रामा काल सकाळी कां.. आला नाही ? .... कारण जाणून घेणे, काळजी, वैताग, राग इ.
६.हा रामा काल सकाळी कां आला.. नाही ? .... बहुतेक दुसरीकडे गेला असेल.
असेच "रोको मत जाने दो" हे शब्द दोन गवयांना दिले होते. एकाने गातांना "रोओओओको ... मत जाने दोओओओ" (त्याला थांबवा, जाऊ देऊ नका) असा उच्चार केला, तर दुस-या गवयाने तीच ओळ "रोको मअअअत ... जाआआआने दो" (त्याला थांबवू नका, जाऊ द्या) अशी गाइली.

No comments: