Monday, July 07, 2008

राजस सुकुमार मदनाचा पुतळा

संत ज्ञानेश्वरांनी दाखवलेल्या विठ्ठलाच्या अनाकलनीय अशा 'कानडा' रूपाचे आणि संत जनाबाईने कल्पनेने रंगवलेल्या त्याच्या 'लेकुरवाळ्या' रूपाचे ओझरते दर्शन पहिल्या दोन भागात घेतल्यावर आता पंढरीच्या विठोबाच्या प्रत्यक्षातील मूर्तीचे वर्णन संतांनी कोणत्या शब्दात केले आहे ते थोडेसे पाहू.
माझ्या लहानपणी मी कधीकधी वडिलांच्याबरोबर विठोबाच्या देवळातल्या भजनाला जात होतो. पुरेशी मंडळी जमताच टाळमृदुंगाच्या तालावर "जय विठोबा रखुमाई"चा नामघोष सुरू होत असे. त्याने थोडे वॉर्मिंगअप होऊन एक टेंपो निर्माण झाला की संत तुकारामाच्या "सुंदर ते ध्यान" या अभंगाने भजनाची सुरुवात होत असे. वर्षानुवर्षे, कदाचित पिढ्यानपिढ्या, ही परंपरा तिथे चालत आली होती. श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेली आणि लता मंगेशकरांनी गायिलेली या अभंगाची मधुर चाल मी नंतर ऐकली, पण लहानपणी देवळामध्ये ऐकलेली परंपरागत चाल अजून स्मरणात आहे. तो अभंग असा आहे.
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनिया ।।१।।
तुळशीहार गळां कांसे पितांबर । आवडे निरंतर तेचि रूप ।।२।।
मकरकुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणी विराजित ।।३।।
तुका म्हणे माझे हेचि सर्वसुख । पाहून श्रीमुख आवडीने ।।४।।
विठ्ठलाच्या रूपाचे गुणवर्णन करणारा तुकाराम महाराजांचाच दुसरा एक लोकप्रिय अभंग पं.भीमसेनजींनी गायिलेला आहे.
राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलीया ।।१।।
कस्तुरी मळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठी वैजयंती ।।२।।
मुकुट कुंडले श्रीमुख शोभले । सुखाचे ओतले सकळही ।।३।।
कासे सोनसळा पांघरे पांटोळा । घननीळ सांवळा बाईयांनो ।।४।।
सकळही तुम्ही व्हागे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाही ।।५।।
विठ्ठलाच्या रूपाचे वर्णन करणारे हे दोन्ही अभंग वाचून पाहतांना त्याची वस्त्रे, अलंकार, सौंदर्य वाढवणारे लेप वगैरेचे वर्णन आणि ते रूप पाहून तुकारामांना कोणती अनुभूती होते यांचे दर्शन त्यात घडते. विठ्ठलाच्या मूर्तीमधील त्याची मुद्रा तेवढी सांगून 'सुंदर' एवढ्या एका शब्दात त्याच्या रूपाचे वर्णन पहिल्या अभंगात केले आहे आणि 'सूर्यचंद्रांनासुद्धा फिका पाडणारा राजस सुकुमार मदनाचा पुतळा' अशा उपमा आणि विशेषणे दुस-या अभंगात दिल्या आहेत. सर्वसाधारणपणे कोणाच्याही वर्णनात त्याचा चेहेरामोहरा, नाकडोळे, अंगकाठी वगैरेबद्दल सांगितले जाते. कपाळ, गाल, जिवणी, हनुवटी वगैरे अधिक बारकाईचा तपशील साहित्यामध्ये आढळतो. त्यावरून त्या व्यक्तीचे चित्र वाचकाच्या डोळ्यासमोर उभे रहावे अशी अपेक्षा असते. कदाचित विठ्ठलाची चिरपरिचित छवी आधीच सर्वांच्या मनात कोरलेली असल्यामुळे तिच्याबद्दल अधिक वर्णन करण्याची आवश्यकता भासली नसावी.
लहानपणीच मी दुस-या एका देवळात भजन ऐकायला जात असे. तिथली परंपरा वेगळी होती. तिथले भजन संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या विठ्ठलाच्या रूपाच्या अभंगाने सुरू होत असे. या अभंगातसुद्धा 'बरवा' एवढ्या एका शब्दात सारे वर्णन आले. उरलेल्या सा-या ओळी ज्ञानरायांचा भक्तीभाव दर्शवतात.
रूप पाहतां लोचनी । सुख जाले वो साजणी ।।१।।
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ।।२।।
बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठली आवडी ।।३।।
सर्व सुखाचे आगर । बाप रखुमादेवीवर ।।४।।
'रंगा येई वो ये' या दुस-या एका रचनेमध्ये संत ज्ञानदेवांनी खालील ओळीत दिल्याप्रमाणे विठ्ठलाचे थोडेसे वर्णन करून पुढे "असशील तसा इकडे धांवत ये" असा त्याचा धांवा केला आहे.
कटी कर विराजित, मुगुट रत्नजडित ।पीतांबरू कासिला, तैसै य़ेई कां धांवत ।।
पंढरपूरचा विठोबा हा साक्षात विष्णूच उभा आहे अशी भक्तांची श्रद्धा असल्यामुळे त्याची पाषाणाची मूर्ती कुणी व कधी घडवली वगैरेचा प्रश्नच उद्भवत नाही. आजचा सर्वसामान्य मूर्तीकार जी मूर्ती कोरतो तिचे ती एक शिल्पकृती म्हणून जे परीक्षण केले जात असेल तशा प्रकारचा विचारसुद्धा देवस्थानांमधील देवादिकांच्या प्रतिमांच्याबद्दल कोणी मनात आणू शकत नाही आणि सौंदर्यशास्त्राचे नेहमीचे मापदंड इथे मुळीसुद्धा लागू पडत नाहीत. दर्शन घेण्यासाठी उत्सुक असलेल्या आणि त्यासाठी भरपूर प्रयत्न करून तिथपर्यंत पोचलेल्या भाविकाच्या मनात आपल्याला हे दुर्लभ दर्शन घडते आहे याचाच इतका परम आनंद असतो की तो दुसरा तिसरा कोणता विचारच करू शकत नाही. "आज मी धन्य झालो" एवढाच विचार त्याच्या मनात येतो.

No comments: