Saturday, July 12, 2008

घटना, बातम्या आणि प्रसिध्दी

मी मैसूरला असतांना कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यांची मतमोजणी होऊन त्या राज्यात सत्तापालट झाला. त्यासंबंधीच्या बातम्या रोजच मुखपृष्ठावर ठळक मथळ्यांसह येत असत. पण त्या रोचक बातम्यांच्या जोडीने या महिन्याभरात घडलेल्या तीन दुर्दैवी घटनांना मुखपृष्ठावर महत्वाची जागा मिळत होती. अपघात, आत्महत्या आणि खून यासारख्या घटना जवळ जवळ रोजच कुठे ना कुठे घडत असतात आणि त्यांच्या बातम्या छापून येत असतात. त्या आपले एवढे लक्ष वेधून घेत नाहीत. प्रसिध्द किंवा लोकप्रिय व्यक्तींच्या आयुष्यातल्या घटनांना त्यांच्या नांवलौकिकाच्या प्रमाणात कव्हरेज मिळते. पण मी ज्या घटनांबद्दल लिहिणार आहे त्यात गुंतलेल्या व्यक्ती अगदी अप्रसिध्द होत्या आणि त्या घटना घडल्या नसत्या तर त्यांची नांवे कानावर पडण्याची सुतराम शक्यता नव्हती आणि आतापर्यंत ती विस्मरणाच्या मार्गाला लागलीही आहेत. तरीही त्यांना अचानक एवढी प्रसिध्दी कशी मिळाली?

या तीन्ही घटना सुशिक्षित, सुखवस्तू किंवा श्रीमंत आणि सुसंस्कृत समजल्या जाणा-या कुटुंबात घडल्या. समाजाच्या या ' क्रीमी लेअर' मध्ये अशा घटना अपेक्षित नसतात. शिवाय एकाद्या धारावाहिक कथामालिकेप्रमाणे रहस्यमय रीतीने यांचा एक एक पदर रोज उलगडत जात होता आणि अजूनही त्या पूर्णपणे स्पष्ट झालेल्या नाहीत. या तीन्ही घटनांचा लैंगिकतेशी संबंध असावा किंवा कदाचित तो जोडण्यामुळे त्या बातमीचा खप वाढेल अशी ते वृत्त छापणा-यांची समजूत असावी. त्यामुळे त्या बाजूवर जरा जास्तच भर दिला जात होता.

पहिली दुर्दैवी घटना दिल्लीजवळ घडली. आरुषी नांवाच्या चौदा वर्षे वयाच्या बालिकेचा मृतदेह तिच्याच राहत्या घरी मिळाला, पण तिच्या मृत्यूबद्दल घरात कोणालाच कांही माहीत नव्हते. त्याच वेळी त्या कुटुंबात काम करणारा चाळीशीतला त्यांचा नोकर परागंदा झाल्याचे आढळल्याने त्याचा संशय येत होता. दुसरे दिवशी त्या नोकराचाच मृतदेह त्या इमारतीच्या टेरेसवर मिळाल्यामुळे चित्र बदलले आणि अज्ञात हल्लेखोराचा तपास सुरू झाला. त्यापुढे आरुषीच्या डॉक्टर वडिलांनाच दोन्ही हत्याकांडामागील संशयित म्हणून अटक झाली आणि मग अफवांचे पेवच फुटले. कोणी त्या डॉक्टरचा दुस-या एका महिला डॉक्टरबरोबर संबंध जोडला तर दोन्ही डॉक्टर दंपती गंमत म्हणून अदलाबदल करून विकृत मजा मारायची अशी आवई कोणी उठवली. पण याचा त्या दुहेरी खुनांशी काय संबंध? तर आरुषीला किंवा त्या नोकराला किंवा त्या दोघांना ही गोष्ट समजली होती, पौगंडावस्थेतील आरुषी त्याला प्रखर विरोध करत होती किंवा नोकर त्याचा बभ्रा करण्याची धमकी देऊन पैसे उकळत होता आणि हे मर्यादेबाहेर जात असल्याचे दिसल्यामुळे त्यांचा कांटा काढला गेला असा एक तर्क पुढे करण्यात आला. खरे तर दोघांपैकी एकालाच बाजूला सारायचे होते, पण दुस-याला त्या गुन्ह्याची माहिती मिळाल्यामुळे पुरावा मागे सोडू नये एवढ्यासाठी त्याला संपवावे लागले असा तर्क आणखी कोणी केला. या गोंधळात दोन्ही मृत व्यक्तींचा एकमेकांशी अनैतिक संबंध जोडण्यापर्यंत अफवांची मजल गेली. आणखी थोड्या दिवसांनी दुस-या एका नोकराची जबानी घेण्यात आली, त्याची चौकशी झाली आणि खुनांचा संशय आता तीन नोकरांवर आहे. तसेच त्यांनी आणखी बदमाशी केल्याचा आरोपही आहे. ही बातमी देणा-या वृत्तदसंस्थाच त्यात कांही कच्चे दुवे आहेत असेही सांगत आहेत. सर्व संबंधितांचे बोलणे खरे आहे की खोटे आहे ते ठरवणा-या चांचण्या घेण्यात आल्या. जी माहिती प्रसिध्द होत होती त्यात जी विसंगती दिसत होती त्यावरून त्यातले कोणीतरी (किंवा सर्वच) असत्यभाषण करत असेल असेच दिसते.

माझ्या लहानपणी 'बहुरंगी करमणूक' नांवाच्या पुस्तिकांची एक मालिका निघाली होती. कोड्यात दिलेल्या तीन किंवा चार व्यक्तींमधल्या कोणी नेहमीच खोटे बोलतात, कोणी नेहमी खरे बोलतात आणि उरलेल्यांचा कांही नेम नाही. अशा वेळी त्यांच्याकडून हमखास बरोबर अशी एक विशिष्ट माहिती पाहिजे असेल त्यांना कोणते प्रश्न विचारावेत अशी कोडी त्या पुस्तकांत असायची. ते कूटप्रश्न विचारून मिळालेल्या निरनिराळ्या उत्तरांवरून नेमके सत्य कसे तर्कशुध्दपणे शोधायचे हे दाखवणारी उदाहरणे त्यात दिलेली असायची. आरुषी प्रकरणाच्या बातम्या वाचतांना मला त्या पुस्तकाची आठवण झाली आणि अजूनही ती पुस्तके मिळत असतील तर वाचावीत असे वाटले.

या प्रकरणातील बातम्यांचा ओघ यायचे थांबेपर्यंत दुसरे प्रकरण पुढे आले. मुंबईत टीव्हीसाठी मालिका तयार करणा-या एका प्रसिध्द संस्थेत काम करणारा एक होतकरू तरुण अचानक गायब झाला. त्या बातमीला मैसूरला तरी मुळीच प्रसिध्दी मिळाली नव्हती. पण त्या तरुणाचा खून केल्याच्या आरोपावरून एक युवक आणि एक युवती यांना कोचीमध्ये अटक करण्यात आली. हे दोघेही मुळात मैसूरमधले असल्यामुळे ती बातमी तिथे सनसनाटी फैलावणारी होती. यश, कीर्ती, समृध्दी वगैरे कमावण्याच्या इच्छेने त्यातली युवती मुंबईच्या रुपेरी जगात गेली होती तर युवक इंजिनिअरिंग करून नौदलात प्रशिक्षण घेत होता. आंतर्जालावर त्या दोघांची ओळख होऊन तिचे प्रेमात रूपांतर झाले होते आणि सुखी संसाराला लागण्याच्या विचारात असतांनाच ते वेगळ्याच अर्थाने चतुर्भुज झाले होते. पण हे कृत्य कशामुळे घडले हे एक मोठे कोडे होते. बातमी देणा-या लोकांनी त्या घटनेला प्रेमाचा सरधोपट त्रिकोण बनवून तो मनसोक्त रंगवला. त्यातल्या व्यक्तींनी एकमेकांना कोणकोणत्या अवस्थेत पाहिले आणि त्या अवस्थेत आणखी काय काय प्रकार केले याचे अश्लील वाटण्याइतके आंबटशोकीन वर्णन आले, मृतदेहाचा अक्षरशः खिमा करून त्याची कशी विल्हेवाट लावली गेली असावी याचे बीभत्स तपशील आले आणि यातील तीन्ही व्यक्तींच्या घरातल्या वडीलधा-यांच्या मुलाखती आल्या. त्यात "आमचे घराणे अत्यंत सुसंस्कृत आहे. आमच्या सरळमार्गी मुलांनी असे वर्तन करणे आमच्या कल्पनेच्या पलीकडचे आहे. ते यांत कसे अडकले (की अडकवले गेले) तेच समजत नाही" असेच सर्वांनी सांगितले. भावनेच्या उद्रेकाने मनावरचा ताबा सुटल्यामुळे ही घटना अवचित घडली की ती पूर्वनियोजित होती याबद्दल संभ्रम कायम राहिला. मालिकांमध्ये अनेक वेळा दाखवतात त्याप्रमाणे त्यातली मृत (समजली गेलेली) व्यक्ती कालांतराने जीवंतपणे परत आली तरी त्याचे फार मोठे आश्चर्य वाटू नये!

या घटनेच्या बातम्या प्रसिध्द होणे थांबेपर्यंत तिसरी दुर्दैवी घटना घडली. कर्नाटकाच्या किनारपट्टीमधल्या प्रदेशातून निवडून आलेले एक विधायक आपले कर्तव्यपालन करण्यासाठी बंगलोरला गेले असतांना त्यांची सुविद्य पत्नी माहेरी जाण्यासाठी आपली गाडी स्वतः चालवीत घरातून बाहेर पडली आणि अदृष्य झाली. दोन दिवसांनी ती मोटार एका तिस-याच गांवी बेवारशी उभी असलेली पाहून तिथल्या गांवक-यांनी तक्रार केल्यानंतर ती कोणाच्या मालकीची आहे याची चौकशी सुरू झाली आणि त्यानंतर म्हणे ती बाई हरवली असल्याचे लक्षात आले. दोन तीन दिवस तिचा कसून शोध चालला होता. तिने कुठून तरी कोणाला तरी फोन करून संपर्क साधल्याची बातमी एका संध्याकाळी छापून आली, ती वाटून थोडे हायसे वाटले पण दुसरे दिवशी सकाळचे वर्तमानपत्र पाहिले तर तिचा मृतदेह दिल्लीतल्या एका घरात पंख्याला लोंबकळलेल्या अवस्थेत सांपडल्याचे वृत्त ठळकपणे दिलेले! कर्नाटकातल्या समुद्रकिना-यावरून ती महिला दिल्लीला कशी जाऊन पोचली? ती शुध्दीवर असतांना परिणामांचा विचार करून राजीखुषीने तिकडे गेली होती की तिला फसवून, धांक दाखवून किंवा पळवून नेण्यात आले होते? यात तिच्यासोबत आणखी कोण होते? जे होते त्यांचा यात व्यक्तिगत सहभाग होता की त्यामागे वेगळेच सूत्रधार होते? असे अनंत प्रश्न मनात उभे रहात होते, त्यातल्या एकाचेही उत्तर मला मैसूर सोडेपर्यंत मिळाले नाही. यातही तिस-या एका व्यक्तीबद्दल अपरोक्षपणे उलटसुलट मजकूर येत होता, पण त्या घटनेबद्दल मात्र खूपच सावधगिरी बाळगून लिहिले किंवा छापले जात होते. मुंबईला आल्यानंतर यासंबंधी पुढे कांहीच वाचण्यात आले नाही.

अपमृत्यूच्या तीन घटना, त्यासंबंधीच्या बातम्यांचे तपशील आणि त्यांना देण्यात आलेली प्रसिध्दी याच्या तीन त-हा मला एका महिन्यात लागोपाठ पहायला मिळाल्या.

No comments: