Monday, July 21, 2008

मधुरबाला


हल्ली नेहमीच कोठे ना कोठे सौंदर्यस्पर्धा (खरे तर स्त्रीसौंदर्यस्पर्धा) होत असतात. त्यातून विजेत्या महिलांना नगरसुंदरीपासून विश्वसुंदरीपर्यंतचे बहुमान दिले जातात. त्या सौंदर्यवतींची छायाचित्रे आपण वर्तमानपत्रात पाहतो आणि विसरून जातो. ऐश्वर्या रायसारखी एकादीच दीर्घकाळपर्यंत प्रसिध्दीच्या झोतात असते, त्यामुळे तिचा चेहेरा लक्षात राहतो. इतर सिनेतारकासुध्दा त्यांना मिळालेल्या प्रसिध्दीनुसार कमीअधिक काळ डोळ्यासमोर असतात. त्यातले कांही चेहेरे कायम स्मरणात राहतात. असाच एक असामान्य सुंदर चेहेरा सुमारे साठ वर्षांपूर्वी जगासमोर आला आणि दहाबारा वर्षे सिनेजगतावर राज्य करून अस्तंगत झाला आणि अकाली काळाच्या पडद्याआड गेला. त्यालाही जवळजवळ चाळीस वर्षे होऊन गेली. तरीही तिच्या मृत्यूनंतर जन्माला आलेली आजची रसिकांची पिढी "तुझे देखके ऐ मधुबाला, मेरा दिल ये पागल झाला" असे म्हणत नाचते आहे. 'भारतीय सिनेसृष्टीमधील सर्वात सुंदर चेहेरा' हा तिला मिळालेला खिताब आजपर्यंत कोणी काढून घेऊ शकलेली नाही. कोणीतरी तिला ' भारतीय मेरिलिन मनरो' असे म्हणताच तिच्या एका चाहत्याने "यापेक्षा मेरिलिन मनरोला हॉलिवूडची मधुबाला" असे म्हणायला पाहिजे असे सुचवले.
मधुबालाचा जन्म दिल्लीच्या एका पठाण कुटुंबात झाला. तिचे नांव मुमताज असे ठेवले होते. तिला मिळालेले सौंदर्याचे वरदान घरची बिकट आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी कामाला येईल असा विचार करून तिच्या वडिलांनी मुंबई गाठली आणि प्रयत्न करून मुमताजला बाल कलाकार बनवले. बेबी मुमताज या नांवाने तिने अनेक सिनेमात काम करून अर्थार्जन केले. त्या काळातल्या परिस्थितीत बाल कलाकारांना तसा मर्यादितच वाव असायचा. पण वयाची चौदा वर्षाची झाल्यावर तिने केदार शर्मा यांच्या नीलकमल या चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत पदार्पण केले तेसुध्दा राजकपूर बरोबर! याच वेळी तिला पडद्यावर मधुबाला हे नांव देण्यात आले ते पुढे सर्व रसिकांच्या तोंडी झाले. त्यानंतर दोन वर्षांनी आलेला महल हा सिनेमा सुपरहिट झाला आणि मधुबाला तसेच लता मंगेशकर या दोघी या चित्रपटानंतर सुपरस्टार झाल्या. त्यातले आयेगा, आयेगा, आयेगा आनेवाला हे रहस्यमय गाणे आजसुध्दा अनेकांच्या टॉप टेनमध्ये आहे.
अनुपम सौंदर्याच्या सोबतीला मधुबालाकडे अभिनयकौशल्य होते, तसेच चांगले काम करण्यासाठी लागणारी जिद्द, चिकाटी, कष्ट करण्याची तयारी वगैरे अनेक गुण होते. घरच्या परिस्थितीमुळे तिला शालेय शिक्षण मिळाले नाही, पण तिने हिंदी उर्दूमध्ये तर प्राविण्य मिळवलेच, शिवाय 'गाँवकी गोरी' प्रकारचा रोल करत असतांना सहकलाकाराकडून ती फावल्या वेळात इंग्रजी शिकत असे. या वृत्तीमुळेच ती खेड्यातल्या गरीब अडाणी मुलीपासून ते शहरातल्या श्रीमंत किंवा मॉडर्न मेमसाहिबापर्यंत कुठलाही रोल सहजपणे करत असे.
तिने राजकपूरबरोबर काम करून सुरुवात केली आणि अशोककुमार, दिलीपकुमार, देवआनंद, भारतभूषण, प्रेमनाथ, प्रदीपकुमार,गुरुदत्त, सुनीलदत्त इत्यादीं तिच्या काळातील सर्व आघाडीच्या नायकांसोबत काम केले. त्यातल्या कांहींबरोबर तिचे नांव जोडले गेले, कांहींनी तिच्यावर एकतर्फी प्रेम केले, एकाशी तिचे सूत जमले होते वगैरे बातम्या त्या काळातल्या फिल्मी गॉसिपमध्ये चवीने वाचल्या जात असत. अखेरीस किशोरकुमारबरोबर तिचे लग्न झाले तोपर्यंत ती हृद्रोगाने व्याधीग्रस्त झाली होती.
मधुबाला ज्या काळात सिनेमा गाजवत होती तो काळ सिनेसंगीताच्या सुवर्णयुगाचा होता. त्यामुळे अनिल बिस्वास, नौशाद, शंकर जयकिशन, मदनमोहन, ओ.पी.नैयर आदि सर्व आघाडीच्या संगीत दिग्दर्शकांनी दिलेल्या मधुर चालींनी नटलेली गाणी तिने पडद्यावर गायिली आणि ती गाणी अजरामर झाली आहेत. अशाच निवडक गाण्यांचा खजिना अशोक हांडे यांनी आपल्या मधुरबाला या आपल्या नव्या कार्यक्रमात रसिक प्रेक्षकांपुढे आणला आहे. स्वतः श्री अशोक हांडे यांचे निवेदन, मधुबालाच्या जुन्या दुर्मिळ चित्रपटातली निवडक दृष्ये आणि नव्या पिढीतल्या वादकांच्या ताफ्याबरोबर नव्या दमाच्या गायकगायिकांच्या आवाजात मधुबालाने पडद्यावर म्हंटलेली गाणी असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. सादरीकरणाच्या बाबतीत हांडे तरबेज आहेतच. त्यांचे निवेदन, पडद्यावरील दृष्ये आणि लाइव्ह म्यूजिक हे तीन्ही इतके सफाईने एकमेकात मिसळले जातात की क्षणभराचाही खंड त्यात पडत नाही.
विस्मृतीच्या आड गेलेल्या जुन्या सिनेमांची थोडीशी झलक दाखवल्यानंतर महल मधले आयेगा आनेवाला हे जबरदस्त गाणे येते आणि प्रेक्षक सांवरून बसतात. त्यानंतर मिस्टर अँड मिसेस फिफ्टीफाय, गेटवे ऑफ इंडिया, काला पानी, हावडा ब्रिज, बरसातकी रात, हाफ टिकट वगैरे सिनेमातली एकाहून एक गोड गाणी येत राहतात. मुगले आजम आणि चलतीकी नाम गाडी हे दोन चित्रपट मधुबालाच्या आयुष्यात खास महत्वाचे आहेत. हे दोन्ही चित्रपट हिंदी सिनेमाच्या इतिहासात आपापल्या जागी लँडमार्क ठरले आहेतच. मुगले आजम या भव्य चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेस दिलिपकुमार आणि मधुबाला यांचे व्यक्तिगत संबंध पराकोटीचे बिघडलेले होते हे त्यातली प्रणयदृष्ये पाहतांना कोणाला खरे वाटणार नाही. चलतीका नाम गाडी बरोबर मधुबाला आणि किशोरकुमार यांच्या प्रेमसंबंधाची गाडी चालू लागली आणि त्याची परिणती अखेर त्यांच्या विवाहात झाली. या दोन्ही सिनेमातली गाणी या कार्यक्रमात अप्रतिम बसवली आहेत आणि प्रेक्षकांनीही वन्समोअरची मागणी करून त्यांना उत्स्फूर्त दाद दिली.
हा कार्यक्रम पाहतांना जुन्या आठवणींना उजळा मिळाला असे नेमके मला म्हणता येणार नाही कारण रेंगाळलेला मुगले आझम सोडून मधुबालाचा कोणताच चित्रपट माझ्या आठवणीत रिलीज झाला नाही. मधुबालाच्या बहराच्या काळात मी अजून सिनेमे पहायला सुरुवात केली नव्हती. त्यामुळे कधीकाळी मी तिचा फॅन असण्याचा संभव नव्हता. तिचा अभिनय असलेले बहुतेक चित्रपट मी मॅटिनीमध्येच पाहिले आहेत, तेंव्हाच ते खूप जुने झालेले होते. त्यानंतर ते टीव्हीवर अधून मधून पहायला मिळतात. पण इतक्या जुन्या काळात अस्तित्वात असलेल्या टेक्निकमधून केलेल्या कृष्णधवल छायाचित्रणातूनसुध्दा तिचे जे सौंदर्य दिसते ते लाजवाबच म्हणावे लागेल.

No comments: