Sunday, July 06, 2008

कानडा राजा


पांडुरंगकांती दिव्यतेज झळकती। रत्नकीळ फांकती प्रभा ।।१।।
अगणित लावण्य तेज पुंजाळले। न वर्णवे तेथची शोभा।।२।।
कानडा हो विठ्ठलु कर्नाटकू। येणे मज लावियला वेधू।।३।।
खोळ बुंथी घेऊनी खुणेची पालवी। आळविल्या नेदी सादु।।४।।

शब्देविण संवादु दुजेवीण अनुवादू। हे तव कैसेनि गमे।।५।।
परेहि परते बोलणे खुंटले। वैखरी कैसेनि सांगे।।६।।

पायां पडू गेले तंव पाउलचि न दिसे। उभाचि स्वयंभू असे।।७।।
समोर की पाठीमोरा न कळे। ठकचि पडिले कैसे।।८।।

क्षेमालागी मन उतावीळ माझे। म्हणवोनी स्फुरताति बाहो।।९।।
क्षेम देऊं गेले तंव मीचि मी एकली। आसावला जीव राहो।।१०।।

बाप रखुमादेवीवरू हृदयीचा जाणुनी। अनुभवु सौरसु केला।।११।।
दृष्टीचा डोळा पाहों मी गेले तंव। भीतरी पालटु झाला।।१२।।

संत ज्ञानेश्वरांचा हा अजरामर अभंग आशा भोसले यांच्या आवाजात सर्वांनीच ऐकला असेल. त्यामधील 'कानडा हो विठ्ठलु कर्नाटकू ' या ओळीमुळे विठ्ठल हे दैवत कर्नाटकातून महाराष्ट्रात आले की काय असे कांही लोकांना कदाचित वाटेल. पंढरपूरपासून कर्नाटकाची सीमा तशी जवळच आहे. सीमेपलीकडील उत्तर कर्नाटकामध्येसुद्धा वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने आहे. 'विठोबा','पांडुरंग' ही नांवे तिकडे सर्रास ठेवली जातात. विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेल्या हंपी येथे विठ्ठलाचे सुरेख देऊळ तेथील राजाने बांधले होते. पंढरीच्या विठ्ठलाने तेथे वास्तव्य केले होते अशा आख्यायिका तिकडे प्रसृत आहेत. कर्नाटकातील संत पुरंदरदास विठ्ठलाचे परमभक्त होते. त्यांच्य़ा प्रत्येक पदाचा शेवट 'पुरंदरविठ्ठला' या शब्दांने होतो. हे सगळे खरे असले तरी वर दिलेल्या ज्ञानदेवांच्या अभंगामधील 'कानडा' या शब्दातून मात्र वेगळा अर्थ निघतो.

मी असेही ऐकले आहे की 'कानडा' हा शब्द श्रीकृष्णाच्या 'कान्हा' या नांवावरून आला असावा. विठोबाची 'रखुमाई' म्हणजे 'रुक्मिणी' हे तर उघड आहे. श्रीकृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार आहे तर पांडुरंग हे विष्णूचेच रूप आहे. भक्त पुंडलीकाला दर्शन देण्यासाठी तो अवतीर्ण झाला त्या वेळी पुंडलीक भीमा नदीच्या तीरावरील वाळवंटात आपल्या मातापित्यांची सेवा करीत होता. ती अर्ध्यावर सोडून प्रत्यक्ष भगवंताला भेटायलासुद्धा तो तयार नव्हता. पण आलेल्या पाहुण्याचे स्वागत तर केले पाहिजे. त्या ठिकाणी त्याला बसण्यासाठी पाट किंवा सतरंजी तो कोठून आणणार? त्याने जवळच पडलेली एक वीट श्रीविष्णूच्या दिशेने भिरकावून दिली आणि तिच्यावर थोडा वेळ उभे राहण्याची विनंती केली. त्या विटेवर उभा राहून तो 'विठ्ठल' झाला तो कायमचाच अशी त्याची कथा आहे. त्यावरून विष्णू या शब्दाचा इष्टू, इट्टू असा अपभ्रंश होत त्याचा विठोबा झाला आणि विष्णू म्हणजेच कृष्ण म्हणजेच कान्हा आणि त्यावरून कानडा हे नांव आले अशी उपपत्ती कोणी सांगितली. परंतु या अभंगाची रचना करतांना ज्ञानराजांना मात्र हा अर्थसुद्धा अभिप्रेत नव्हता असे अनेकांचे मत आहे.

या अभंगाला अत्यंत मधुर अशी चाल पं.हृदयनाथ मंगेशकरांनी लावली आहे. त्यांच्याच 'भावसरगम' या कार्यक्रमात त्यांनी हा अभंग गातांना त्याविषयी थोडी माहिती सांगितली. 'कानडा हो विठ्ठलू'ची भाषा कानडी होती त्यामुळे पुढे 'बोलणेच खुंटले' आणि 'शब्देविण संवादू' झाला असे कोणाला कदाचित वाटेल, पण ते तसे नाही. कानडा या शब्दाचा अर्थ या अभंगात 'आपल्याला न समजण्यासारखा, अगम्य, अद्भुत' असा आहे. तो नाना त-हेची नाटके रचत असतो, त्याची लीला दाखवीत असतो. ती पाहून मन थक्क होऊन जाते. त्याची सगुण आणि निर्गुण अशी दोन्ही रूपे विलक्षण असतात. त्याच्या दिव्य तेजाने डोळे दिपतात, त्याचे अवर्णनीय लावण्य पाहून मन मुग्ध होते. अवाक् झाल्यामुळे बोलायला शब्द सांपडत नाहीत, पण मनोमनी संवाद होतो. त्याच्या दर्शनाने दिग्मूढ होऊन कांही कळेनासे झाले. पाया पडायला गेले तर पाऊल सांपडेना इतकेच नव्हे तर त्याचे अमूर्त रूप आंपल्याकडे पाहते आहे की पाठमोरे उभे आहे ते सुध्दा समजत नाही. त्याला भेटण्यासाठी दोन्ही हांतानी कवटाळले पण मिठीत कांहीच आले नाही. असा हा 'कानडा हो विठ्ठलू' आहे. चर्मचक्षूंना तो उमगत नाही पण मनःचक्षूंना त्याची खूण पटते, शरीरातील इंद्रियांकरवी तो जाणता आला नाही पण हृदयाने त्याचा रसपूर्ण अनुभव घेतला. असे त्याचे अवर्णनीय वर्णन ज्ञानोबारायांनी या अभंगात केले आहे.

"ज्ञानियाचा वा तुक्याचा तोचि माझा वंश आहे।" असे अभिमानाने सांगणा-या आजच्या युगातील महाकवी ग.दि.माडगूळकरांनी त्यांच्या शब्दात पंढरीच्या या 'कानडा राजा'चे वर्णन "वेदांनाही नाही कळला अंतपार याचा" असे केले आहे. निर्गुण निराकार अशा ईश्वराने कंबरेवर हात ठेवलेले सावळे सुंदर मनोहर रूप तर घेतलेच, त्याशिवाय वेळोवेळी आपल्या भक्तांच्या जीवनात विविध रूपे घेऊन तो कसा सामील झाला याचाही थोडक्यात उल्लेख या गीतामध्ये गदिमांनी केला आहे.

वेदांनाही नाही कळला अंतपार याचा।कानडा राजा पंढरीचा।।
निराकार तो निर्गुण ईश्वर। कसा प्रकटला असा विटेवर।
उभय ठेविले हांत कटीवर। पुतळा चैतन्याचा।।१।।

परब्रम्ह हे भक्तांसाठी। मुके ठाकले भीमेकांठी।
उभा राहिला भाव सावयव। जणु की पुंडलिकाचा ।।२।।
हा नाम्याची खीर चाखतो। चोखोबाची गुरे राखतो।
पुरंदराचा हा परमात्मा। वाली दामाजीचा।।३।।

3 comments:

abhijit said...

खूप सुंदर ब्लॉग आहे तुमचा. घरी होतो तेव्हा बाबा टेप वरती लावायचे तेव्हा ऐकायचो. अभंगाचा अर्थ लावायचा असतो हे कळत नव्हते त्या वयात आणि आता सुद्धा. तुम्ही दिलेल्या विश्लेषणामुखे थोडा अर्थबोध झाला. धन्यवाद. हा उपक्रम चालू ठेवावा.
अत्यंत आभार.
एक शंका कानडा हा शब्द आणि त्या मागचा अर्थ समजला पण "कर्नाटकू" हा शब्द का आला असावा?
भक्तगण कर्नाटकात असल्याचा आणि इथे हा शब्दा येण्यामागचा संबंध उमजला नाही.

Anand Ghare said...

माझ्या समजुतीप्रमाणे ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या कर्नाटकू या शब्दाचा अर्थ नाटक करणे किंवा लीला दाखवणे असा होतो.

Unknown said...

खूप सुंदर.