Sunday, March 01, 2009

माझा मराठी बाणा

नुकताच मराठीदिन होऊन गेला. त्या निमित्याने थोडे हलकेफुलके .....

भारताला स्वातंत्र्य मिळून चांगली साठ वर्षे होऊन गेली असली आणि सगळे इंग्रज कधीचे मायदेशी परत गेले असले तरी त्यांनी मागे ठेवलेली इंग्रजी भाषा मात्र आजही आपल्या माय मराठीवर आक्रमण करतेच आहे. "तुझा काय प्रॉब्लेम आहे? तो सॉल्व्ह करायला मी त्यात हेल्प करू कां?" अशा प्रकारची वाक्ये नेहमी आपल्या कानावर पडतात. त्यातच जसा 'भय्या हातपाय पसरू' लागला आहे तशी त्याची हिंदी देखील मराठी भाषेत पसरू लागली आहे. "वाहवा", "अच्छा", "क्या बात है","जाने दो","चलता है" यासारख्या शब्दप्रयोगांची फोडणी मराठी लोकांच्या बोलण्यात सारखी पडत असते. सिनेमा, टीव्ही आणि पेपर या सा-या प्रसारमाध्यमातून इंग्रजी व हिंदीमिश्रित मराठीचा जो खुराक रोज मिळत आहे, त्यामुळे भावी पिढी या खिचडीलाच मराठी भाषा समजेल आणि मूळ मराठी भाषा भ्रष्ट होऊन नष्ट होऊन जाईल अशी गहन चिंता अनेक मराठी भाषाप्रेमी लोकांना सतावते आहे. मराठी नाही तर महाराष्ट्र राहणार नाही, महाराष्ट्राशिवाय राष्ट्राची काय गत होईल आणि आपल्या महान राष्ट्राखेरीज मानवजातीला तारणहार नाही इथपर्यंत ही चिंता वाढत जाते.

अशा प्रकारचे लेख वाचून अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आता आपण कांही तरी करायलाच पाहिजे म्हणून मी स्वतः शुध्द मराठीचा उपयोग करायला सुरुवात करायचे ठरवले. याची सुरुवात कुठून करायची हे विचारपूर्वक ठरवायला पाहिजे होते. पूर्वीच्या काळी सगळीकडे गर्द वनराई असायची. त्या काळातले लोक कुठल्याशा वृक्षाखाली पद्मासन घालून ध्यानस्थ होऊन बसत आणि चिंतन, मनन वगैरे करत असत म्हणे. त्यातून त्यांना ज्ञानबोध होत असे. आता मुंबईत तसली सोय राहिली नसल्यामुळे मी आपला अंथरुणावर पडूनच जमेल तेवढा विचार वगैरे करतो. टीव्हीवर सासू, सून, नणंदा, भावजया वगैरेंचे हेवे दावे, रुसवे फुगवे, लावालाव्या वगैरेचे कार्यक्रम चालले असतात तेंव्हा चिंतन करण्यासाठी मला निवांत वेळ मिळतो. शुध्द मराठीच्या भवितव्याचे विचार डोक्यात घेऊन पडल्या पडल्या मलाही एक बारीकसा साक्षात्कार झाला आणि इतर भाषेतील शब्द मराठी भाषेत कां शिरू लागले आहेत याचे मुख्य कारण काय असावे ते माझ्या लक्षात आले. आजकाल आपण आपल्या परंपरागत चालीरीती सोडून नवनव्या परकीय गोष्टींचा उपयोग रोजच्या जीवनात करू लागलो आहोत आणि त्या वस्तू आपापल्या नांवानिशी आपली परिभाषा घेऊन आपल्या जीवनात येत आहेत आणि आपली भाषा भ्रष्ट करीत आहेत हे एक महत्वाचे कारण बहुधा त्याच्या मुळाशी आहे असे मला सुचले. तेंव्हा 'मूले कुठारः ' घालून निदान माझ्यापुरता हा प्रश्न निकालात काढायचा असे मी ठरवले. (संस्कृत भाषा मराठीची जननी असल्यामुळे मराठी भाषेला संस्कृत भाषेचे प्रदूषण चालते, किंबहुना ती समृध्द झाल्यासारखे वाटत असावे.) त्यानंतर मला जराशी शांत झोप लागली.

सकाळी उठून नेहमीप्रमाणे स्वच्छतागृहात गेलो. आमच्या गांवाकडच्या वाड्यातल्या न्हाणीघरात पाण्याचा मोठा दगडी हौद होता, झालंच तर पाणी तापवायचा तांब्याचा बंब, हंडा, कळशी, बिंदगी, घमेली, तपेली, तांब्ये वगैरे अनेक आकारांची भांडी होती, कपडे आपटण्यासाठी एक मोठा थोरला टांके घातलेला दगड होता. असल्या कोणत्याच वस्तू इथे नव्हत्या. साधी सांडपाण्याची मोरीसुध्दा नव्हती. इथे तर पायाखालची फरशी आणि बाजूच्या भिंतींवर सगळीकडे भाजलेल्या चिनी मातीचे चौकोनी तुकडे बसवले होते आणि त्याच पदार्थापासून तयार केलेली विचित्र आकाराची परदेशी बनावटीची पात्रे होती. पण आणीबाणीची परिस्थिती आलेली असल्यामुळे मला त्यांच्याबद्दल विचार करायलाही वेळ नव्हता. नाक मुठीत धरून त्या जागी आंग्ल संस्कृतीचे झालेले अतिक्रमण सहन करून घेण्याखेरीज त्या वेळी मला गत्यंतर नव्हते.

पण सकाळी उठल्यावर पहिल्याच क्षणी झालेल्या या पराभवाने मी खचून गेलो नाही. "पराजय ही विजयाची पहिली पायरी असते" असे म्हणत दुप्पट निर्धाराने मी दुस-या पायरीकडे वळलो. अनेक रसायने मिसळून बनवलेला एक लिबलिबीत पदार्थ आणि तो दातांना फासण्याचा बारीक कुंचला या गोष्टींनी रोज दांत घासायची मला संवय होती. या दोन्ही गोष्टींच्या वेष्टनावर ठळक अक्षरात त्यांची इंग्रजी नांवे लिहिलेली होती. शिवाय त्या लिबलिबित पदार्थाने भरलेली नळी, तो कुंचला आणि त्यावरचे केस सुध्दा इंग्रजी नांव असलेल्या आधुनिक द्रव्यापासून बनवले गेले होते. ते पाहून माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली. रोजच्या वापरातील या गोष्टी मी तिरीमिरीने केराच्या टोपलीत टाकून दिल्या. गांवाकडून येऊन गेलेल्या कोठल्याशा पाहुण्याने आणलेली माकडछाप काळी भुकटी खणात राहून गेलेली होती. ती हातात घेतली. पण तिच्या डब्यावर 'दंतमंजन' या मराठी शब्दाऐवजी आंग्ल भाषेत लिहिलेले शब्द पाहिले आणि ती भुकटी तयार करणा-याचे नांवसुध्दा मराठी वाटत नव्हते. ते वाचल्यानंतर त्या भुकटीच्या शुद्धतेची खात्री वाटेना.

पूर्वीच्या काळात मराठी माणसे दांत घासण्यासाठी राखुंडीचा उपयोग करतात असे ऐकले होते किंवा ग्रामीण मराठी चित्रपटात कुठे ते पाहिले होते. पण या राखुंडीत नक्की कशाची राख मिसळलेली असते याची मला कल्पना नव्हती. घरात तर औषधाला राख मिळाली नसती. अगदी आयुर्वेदिक औषधी भस्मसुध्दा नव्हते. "संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी" असे म्हणतात. इथे तर त्याच्याही आधी संन्यास घेण्यासाठी (अंगाला फासायला) लागणा-या राखेपासून तयारी करावी लागणार होती.

या निमित्ताने माझ्या भिकार लिखाणाचे सगळे चिटोरे जाळून टाकावेत अशी एक सूज्ञ सूचना समोर आली, नाहीतरी परकीय शब्दांनी बरबटलेल्या त्या लिखाणाची होळी कधीतरी पेटवायचीच होती. पण त्या राखेने घासून दांत स्वच्छ होतीलच अशी खात्री नव्हती. शिवाय त्यात कांही स्फोटक सामुग्री आहे अशी थाप मारून मी त्यांना तात्पुरते जीवदान दिले. "तुमच्या दांतघासण्यात मीठ आहे कां?"असे जाहिरातीतली एक बाई ज्याला त्याला विचारत सारखी धांवत असते. तेंव्हा आपण साध्या मिठानेच दांत घासावेत असे म्हणून ते आणायला स्वयंपाकघरात गेलो, तेवढ्यात ताता नावाच्या कोणा पारशाने त्यातही 'आयो'पासून सुरू होणारे एक मूलद्रव्य मिसळले असल्याची जाहिरात कानावर आदळली. धन्य आहे हो या पारशाची ! समुद्रातून निघालेल्या शुध्द मिठात चक्क परदेशी द्रव्याची भेसळ करतो आणि वर त्याचीच फुशारकी मारतो आहे ! चिमटीत घेतलेले मीठ मी सरळ टाकून दिले.

खडेमीठ विकत आणण्यासाठी पिशवी घेऊन वाण्याकडे गेलो. तो मुळातला मारवाडी असला तरी माझ्याशी अशुध्द मराठीत बोलायचा. त्याची भाषाशुध्दी नंतर केंव्हातरी करायला पाहिजे असा विचार करून मी त्याला "मला पावशेर खडेमीठ दे" असे सांगितले. ते ऐकताच तो ताडकन उठून उभा राहिला आणि हळूच माझ्या तोंडाजवळ नाक नेऊन त्याने हुंगून पाहिले. मी पावशेरच काय पण नौटाक, छटाकभर देखील 'मारलेली' नाही याची खात्री करून घेतल्यावर म्हणाला, "शेठ, पावशेर, अच्छेर वगैरे कवाच बाद झाले. आमचा समदा व्यापार आता किलोमंदी होतो."
मी म्हंटले, "तुझा होत असेल, पण मी या आंग्ल शब्दांचा उच्चार माझ्या जिभेने करणार नाही."
असे म्हणत मी समोरच्या पोत्यातले बचकाभर खडेमीठ उचलून त्याच्या तराजूच्या पारड्यात टाकले आणि त्याचे वजन करून किती पैसे द्यायचे ते सांगायला सांगितले. मराठीसहित बावीस भाषांमध्ये मूल्य लिहिलेले कागदी चलन त्याला दिल्यावर त्याने कांही नाणी परत केली. पण त्यांवर फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषा होत्या. आंकडे तर फक्त इंग्रजी होते. त्यामुळे ती नाणी न स्वीकारता त्याबद्दल हवे तर मूठभर शेंगदाणे किंवा फुटाणे द्यायला त्याला सांगितले.
"अहो, माझी मस्करी करता काय? मी अजून शेंगादाणे मोजून द्यायाला सुरू केलेलं नाही." असे म्हणत त्याने मला लिमलेटची एक गोळी देऊ केली. तिच्यावरील कृत्रिम पदार्थाच्या पातळ वेष्टनावर सुध्दा 'रावळगाव' हा मराठी शब्द इंग्रजीत लिहिलेला पाहताच मी ती गोळी दुकानात आलेल्या एका मुलाला देऊन टाकली. पोरगं म्हणालं, "काका, मी रोज तुमच्याबरोबर दुकानात येईन, मला बोलवा बरं"
त्या खडेमीठाचे चूर्ण करण्यासाठी माझ्या घरी जाते, पाटा वरवंटा, खलबत्ता असले कोणतेच साधन नव्हते. त्यामुळे त्यातले थोडे खडे एका रुमालात गुंडाळून, खिडकीत ठेऊन त्यांना कुलुपाने ठेचले. त्यात तो रुमाल भोके पडून वाया गेला, एक फटका बोटावर बसल्याने बोटात कळ आली, कुलुपाचे काय झाले कोणास ठाऊक, पण थोडे चूर्ण मिळाले. ते दांत घासण्यासाठी वापरले. असल्या खरबरीत पदार्थाची संवय नसल्यामुळे या खटपटीत दोन तीन जागी हिरड्या खरचटल्या जाऊन थोडे रक्तही आले, पण ध्येयाच्या साधनेसाठी रक्त सांडण्यातही एक प्रकारचे अद्भुत समाधान मिळते असे म्हणतात. त्याची प्रचीती आली. त्यामुळे मी माघार घेतली नाही.

"आधी केले, मग सांगितले" हे माझे ब्रीदवाक्य असल्यामुळे माझा कृतनिश्चय मी अजून कोणाला सांगितला नव्हता. घरातील मंडळींनी आपला नेहमीचा दिनक्रम सुरू ठेवला होता. रोजच्याप्रमाणेच त्यांनी अमृततुल्य ऊष्ण पेय प्राशन केले. या परकीय पेयाला जरी आपण प्रेमाने मराठी नाव दिले असले आणि आता ते भारताच्या इतर राज्यांत मुबलक प्रमाणात पिकत असले तरी महाराष्ट्रासाठी ते परकीयच आहे. त्याच्या सोबतीने आलेली इतर पेये अजून आंग्ल नांवानेच ओळखली जातात. शिवाय त्याच्या बरोबर किंवा त्यात बुडवून खाण्याच्या भट्टीत भाजलेल्या मैद्याच्या गोल किंवा चौकोनी चकत्याही आल्याच. त्यांनी आपले आंग्ल नांव सोडले नसल्यामुळे त्यांचा त्याग करणे आवश्यक होते. त्यामुळे मी स्पष्ट नकार दिला.

स्नान करण्यासाठी न्हाणीघरात गेलो. इथे पाणी तापवण्याच्या तांब्याच्या बंबाचा प्रवेश कधी झालाच नव्हता. विद्युल्लतेच्या वहनाला अवरोध करून निर्माण होणा-या ऊष्णतेचा उपयोग त्यासाठी केला गेला होता. पण त्या साधनाचे फक्त इंग्रजी नांवच मला माहीत होते. ते सुरू करावयासाठी अंगुलीस्पर्श करायच्या जागेला मराठीत कळ असे म्हणतात असे ऐकले होते पण आयत्या वेळी ते कांही आठवेना. अहो, घरात कोणीच त्याला कळ म्हणत नाहीत आणि बाजारात देखील 'कळ' मागायला गेलो तर मिळत नाही. काय करावे ते न कळल्यामुळे नळराजाची तोटी सोडली आणि थंड गार पाण्याची धार डोक्यावर घेतली.
त्यामुळे अंगात हुडहुडी भरली पण डोके जरा जास्तच तल्लखपणाने काम करायला लागले आणि डोक्यात एक नवीनच प्रकाश पडला. त्यातून आता मात्र मोठाच प्रश्न समोर उभा राहिला.

अंग पुसण्यासाठी जे रेषारेषांनी युक्त असे चौकोनी फडके मी ठेवले होते त्याचे फक्त इंग्रजी नांवच मला ज्ञात होते. ते बाजारातून विकत आणल्यापासून वापरतांना,
धुवून वाळत घालतांना किंवा घडी करून कपाटात ठेवतांना अशा सर्व प्रसंगी त्या अंगपुसण्याचा उल्लेख त्याच्या आंग्ल नांवानेच होत असे. त्याच्या बदल्यात राजापुरी पंचा आणायला हवा होता. एवढेच नव्हे तर माझ्या अतर्वस्त्रावरील 'वायफळ इब्लिस परदेशी' या शब्दांची इंग्रजी आद्याक्षरे मला वाकुल्या दाखवीत होती. आतापर्यंत मी बाहेर जातांना जे कपडे अंगात घालत आलो होतो त्यांची नांवे देखील इंग्रजी होती तर घरात वापरात असलेले कपडे परप्रांतातून आलेले होते. मराठी बाणा जपायचा झाल्यास मला कंबरेला पंचा किंवा धोतर गुंडाळून वर कुडते, बंडी, बाराबंदी, उपरणे असे कांही तरी परिधान करायला पाहिजे. ही वस्त्रे तर माझ्याकडे नव्हतीच. शिवाय ती कोणत्या दुकानात मिळतात हे सुध्दा मला ठाऊक नव्हते.

दोन हजार वर्षापूर्वी कोठलासा वेडा शास्त्रज्ञ "सापडले, सापडले" असे ओरडत न्हाणीघरातून निघाला आणि रस्त्यातून विवस्त्र स्थितीत पळत सुटला होता म्हणे. आता मीसुद्धा "कोठे सापडेल? कोठे मिळेल कां?" असे ओरडत रस्त्यातून धांवतो आहे या विचाराने मला हुडहुडी भरलेल्या स्थितीत दरदरून घाम फुटला आणि
मी खडबडून जागा झालो.

4 comments:

Anonymous said...

अतिशय सुंदर झालाय लेख. इतकं शुध्द मराठी लिहायला खुप त्रास झाला असेल ह्याची मला पुर्ण खात्री आहे . बरेचदा लिहितांना ऍप्रोप्रिएट मराठी शब्द आठवत नाहित..

Anand Ghare said...

त्रास कसला, लिहितांना मजा आली. योग्य शब्द आठवून आठवून लिहावे लागले एवढेच.

साधक said...

सिनेमा, टीव्ही आणि पेपर

Anand Ghare said...

सिनेमा, टीव्ही आणि पेपर या शब्दांऐवजी चित्रपट, दूरचित्रवाणी आणि वर्तमानपत्र हे शब्द लिहितांना सर्रास वापरले जातात, पण बोलतांना ते जिभेवर येत नाहीत, कारण ते बोजड वाटतात. त्यातही गंमत अशी आहे की पेपर हा शब्द फक्त वृत्तपत्रासाठी उपयोगात येतो. इतर कागदांना कागद असेच म्हणतात. याचे कारण तो सोपा शब्द वृत्तपत्रांच्या जन्माच्या आधीपासून वापरात होता.