Monday, March 23, 2009

हा चमत्कार घडलाच नाही

श्री.आनंद यादव यांच्या लेखनातल्या कांही वादग्रस्त भागावरून उडालेल्या वादळात त्यांना मिळालेले मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदच गमवावे लागले. या सनसनाटी बातमीमुळे यंदाचे महाबळेश्वर येथे भरलेले साहित्यसंमेलन गाजले आणि विनाअध्यक्ष असे हे पहिले संमेलन ठरून नवा इतिहास घडला. मागच्या महिन्यात अमेरिकेत भरलेले मराठी वैश्विक साहित्य संमेलन सुध्दा पहिलेच असल्यामुळे गाजले आणि भविष्यकाळी कोणी अशा संमेलनांचा इतिहास लिहिला तर त्यात त्याचा उल्लेख होत राहील . कदाचित बातम्यांमधल्या या वेगळेपणामुळे असेल, पण माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी मराठी साहित्यसंमेलनाचे वृत्तांत वाचले असतील. तिथे काय घडले याहूनही काय घडले नाही यावरच अधिक भर दिला गेला होता.

शाळेतल्या वरच्या वर्गांत गेल्यावर त्या वर्गांना लावलेल्या मराठी भाषेच्या पुस्तकांमध्ये मराठी साहित्यातले निवडक उतारे शिकायला मिळायचे. प्रत्येक धड्याच्या सुरुवातीला किंवा त्याच्या खाली त्याच्या लेखकाचा किंवा कवीचा संक्षिप्त परिचय दिलेला असायचा. त्यात त्यांच्या सुप्रसिध्द साहित्यकृती आणि त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटनांची माहिती असायची. परीक्षेत गुण मिळवण्यासाठी ती महत्वाची असल्यामुळे आम्ही इतिहासातील सनावलीप्रमाणे पाठ करत असू. "अमक्या अमक्या साली तमक्या शहरात झालेल्या मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते." हे वाक्य त्यात हमखास असायचे. त्या संमेलनात नेमके काय घडत असेल याची सुतराम कल्पना मला त्या काळी सुध्दा नसायची आणि अजूनही ती फारशी स्पष्ट नाही.

शाळा सुटल्यानंतर पुस्तके आणि मासिके यांचे थोडे फार वाचन होत राहिले असले तरी साहित्यिकांची चरित्रे वाचून ती लक्षात ठेवण्याची गरज उरली नव्हती. त्यातला संमेलनाचे अध्यक्षपद हा तर फारच गौण भाग असायचा. कामाचा आणि संसाराचा व्याप वाढल्यानंतर वाचनही कमी कमी होत गेले. 'नेमेचि येतो बघ पावसाळा' या उक्तीप्रमाणे दरवर्षी कुठे ना कुठे साहित्यसंमेलने भरायची. पण त्या नेमाने येणार्‍या पावसाळ्याबद्दल सृष्टीचे कौतुक वाटण्यापेक्षा आता छत्र्या, रेनकोट, पावसाळी पादत्राणे वगैरे आणावी लागणार आणि सर्दीखोकला व पोटाच्या विकारांना सामोरे जावे लागणार याचीच या 'बाळा'ला जास्त तीव्रतेने जाणीव होत असे. घरात येणार्‍या इंग्रजी वर्तमानपत्राला या संमेलनाचे फारसे कौतुक असायचे नाही. त्यामुळे त्याच्या वृत्ताला त्यात महत्वाचे स्थान नसायचे. दूरदर्शनवर त्या संमेलनाचा सविस्तर वृत्तांत येत असे, पण साहित्याशीच संबंध न राहिल्यामुळे मुद्दाम लक्षात ठेऊन तो कार्यक्रम लावावा आणि टीव्हीसमोर बसून राहून लक्ष देऊन तो पहावा असे मात्र कधी वाटले नाही. चुकून दिसलाच तर पहातही असे. गेल्या वर्षीपर्यंत कुठे कुठे ही संमेलने झाली आणि त्यांचे अध्यक्ष कोण कोण झाले ते त्या त्या वेळी समजलेही असले तरी आता कांही माझ्या लक्षात राहिलेले नाही.

आमच्या घरातल्या कांही मंगलकार्यांच्या निमंत्रणपत्रिका आणि मंगलाष्टके वगळल्यास मराठी भाषेत माझे नांव कोठे छापले गेल्याचे मला स्मरत नाही. त्यामुळे एकाद्या साहित्यसंमेलनाचा सुगावा मला आधीपासून लागला असता आणि तिथे हजेरी लावण्याचा नुसता विचार जरी मनात आला असता, तरी तिथे कोण म्हणून मी आपले नांव नोंदवायचे?, त्यासाठी कोणती अर्हता लागते?, त्याचे प्रमाणपत्र कोणाकडून मिळवावे लागेल? त्यासाठी किती तिकीट असते?, ते दिवसागणिक असते की संपूर्ण संमेलनाचे एकत्र असते? असे अनेक प्रश्न मनात उठायचे. शिवाय ती जागा लातूर किंवा इंदूर सारखी दूर असली तर तिथे जाणेयेणे, राहणे, खाणे सगळे आलेच. आधीच तुटीच्या असलेल्या अंदाजपत्रकात या जादा खर्चाची तरतूद कशी करायची? त्यासाठी ऑफीसातून सुटी मागतांना कोणते कारण द्यायचे? वगैरे प्रश्न तर माझ्या आंवाक्याबाहेरचे होते. अगदी माझ्या घराजवळ ते अधिवेशन भरणार असते तरी ते भरवणारे लोक कांही आपणहून मला आमंत्रण द्यायला येणे शक्यच नव्हते. त्यामुळे वरील बहुतेक प्रश्न शिल्लक राहणारच होते.

या वर्षीचे अधिवेशन अमेरिकेत सॅन होजे नांवाच्या गांवात घ्यायचा निर्णय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्री.कौतिकराव ठाले पाटील यांनी घेतला असे वर्तमानपत्रात वाचले तेंव्हा जन्मात पहिल्यांदाच ही दोन नांवे ऐकली. अमेरिकेतली न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, शिकागो, सॅन फ्रॅन्सिस्को, लॉस एंजेलिस आदि कांही प्रमुख शहरे ऐकून ठाऊक होती. अल्फारेटा, बाल्टिमोर, पिट्सबर्ग वगैरे कांही अनोळखी नांवे तिकडे जाऊन राहिलेल्या लोकांकडून ऐकली होती. त्या यादीत सॅन होजे हे नांव नव्हते. त्याचप्रमाणे कौतिकराव ठाले पाटील यांच्या नांवाने प्रसिध्द झालेली एकादी कथा, कादंबरी, नाटक वगैरे माझ्या अत्यल्प वाचनात तरी कधी आलेले नाही. इतर लोकांनीसुध्दा कदाचित हे नांव ऐकले नसावे. त्यांनी घेतलेल्या या निर्णयावर गजहब सुरू केल्यामुळे ते नांव वर्तमानपत्रात पुनःपुन्हा छापून येत राहिले. पण पाटील महाशयांनी हा प्रश्न कमालीच्या कौशल्याने हाताळला. "इकडच्या लोकांना हवे असेल तर एक अधिवेशन महाराष्ट्रात घेऊ आणि तिकडच्यांना पाहिजे असेल तर एक तिकडे घेऊ. त्यात आहे काय आणि नाही काय?" असे म्हणत त्यांनी आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करून टाकले. या दोन्ही जागांशी माझे कसलेही सोयरसुतक नव्हतेच.

आमच्या शेजारच्या ठमाकाकूंनी ही बातमी टीव्हीवर ऐकली आणि "अगंबाई, खरंच कां? बघा, मराठी माणसानं केवढी प्रगती केली? त्या राघोबादादाने अटकेपार झेंडा लावला होता, आता तर तो सातासमुद्राच्या पार जाणार!" वगैरे उद्गार काढले. पुढे जेंव्हा आमचेसुध्दा अमेरिकेला जायचे ठरले तेंव्हा साहजीकच त्यांनी विचारले, "म्हणजे तुम्ही पण ते अधिवेशन का काय भरतंय् तिकडे चालला आहात कां?" त्यांना उगाच नाराज कशाला करायचे म्हणून मी हो ला हो म्हणून टाकले. पण एक सूक्ष्म असा किडा माझ्याही डोक्यात जन्माला आला. आम्ही सप्टेंबरमध्ये तिकडे जाणार होतो म्हणजे मार्चपर्यंत राहण्याची परवानगी मिळणार होती. हे अधिवेशन फेब्रूवारीत भरणार होते आमि मी तिथे रिकामटेकडाच राहणार होतो. तेंव्हा फिरत फिरत संमेलनाकडे एकादी चक्कर मारून यायला हरकत नव्हती. या वेळी रजेचा प्रश्न नव्हता आणि अमेरिकेतले यजमान लोक बाकीची व्यवस्था करतीलच अशी आशा होती. साहित्यदिंडीचे निशाण उचलून धरायला, नाही तर लोड, सतरंज्या जमीनीवर अंथरायला आणि उचलायला त्यांनासुध्दा मनुष्यबळ लागणारच ना? तिकडे ते अत्यंत दुर्मिळ आहे असे ऐकले होते. शिवाय तिकडे श्रमाला मोल आहे, त्यामुळे असली शारीरिक कष्टाची कामे केली तरी तिथे आपल्याला कोण विचारणार आहे? त्यातून स्थानिक उत्साही कलाकार कमी पडले आणि आपल्याला संधी मिळालीच तर सेटेजवर जाऊन कुठलं गाणं म्हणायचं किंवा नक्कल करून दाखवायची याचा मनोमनी शोध सुरू केला.

प्रत्यक्ष अमेरिकेत जाऊन पोचल्यावर असे समजले की आम्ही अमेरिकेच्या पूर्व भागात रहात होतो आणि हे सॅन होजे त्याच्या पश्चिम किनार्‍यावर होते. रूडयार्ड किपलिंगने काढलेले "ईस्ट ईज ईस्ट अँड वेस्ट ईज वेस्ट, दे शॅल नेव्हर मीट." हे उद्गार अमेरिकेत गेलेल्या भारतीयांना लागू पडतात असेही तिकडे गेल्यावर समजले. एकमेकांना ओळखणारी मुंबईतली किती तरी मुले आता तिकडे दोन्ही बाजूंना आहेत. सदैव त्यांची फोनाफोनी, चॅटिंग, ईमेल, स्क्रॅप्स वगैरे चाललेले असते. पण प्रत्यक्षात भेट मात्र कधी ते एकाच वेळी भारतात आले तर इकडेच घडते. स्थानिक प्रवास, हॉटेलात राहणे वगैरे खर्च डॉलरमध्ये कमाई असणार्‍या लोकांनाच भारी पडतात तर रुपये मोजून विकत घेतलेल्या डॉलरमध्ये मी ते कुठून भागवणार? आता एकादा दैवी चमत्कार घडला तरच मला त्या साहित्यसंमेलनात जायला मिळणार होते. माझा जरी चमत्कारावर विश्वास नसला तरी काय झाले? तो कांही मला विचारून घडणार नव्हता. कुठे तरी कोणी तरी कसली तरी चावी फिरवेल आणि मला घरबसल्या तिकीटांसह सॅन होजेला येण्याचे आमंत्रण आणून देईल म्हणून वाट पहात राहिलो.

पण हा चमत्कार घडलाच नाही.

पुढे श्री.आनंद यादव यांचे अध्यक्षपदाचे आसन अगदी शेवटच्या क्षणी डळमळीत झाल्याचे कळले. आता आयत्या वेळी "कोणी अध्यक्ष होता कां अध्यक्ष?" म्हणून संमेलनातच विचारणार आहेत की काय असा प्रश्न मनात उठला. पूर्वी एकाद्या हत्तीच्या सोंडेत फुलांचा हार ठेऊन तो हत्ती ज्याच्या गळ्यात हार घालेल तो राजा असे ठरवत असत म्हणे. तसे झाले तर आपल्यालाही चान्स मिळावा म्हणून महाबळेश्वरला जावेसे वाटले. पण मुंबईत इतका जीवघेणा उकाडा वाढला आहे की महाबळेश्वरला जाणार्‍या सगळ्या गाड्या कधीच फुल्ल झाल्या आहेत असे कळले. आता नगाला नग म्हणून एका आनंदाच्या बदल्यात दुसरा आनंद लॉटरी काढून निवडला गेला तरच थोडी शक्यता होती.

पण .... हा चमत्कारसुध्दा घडलाच नाही.

No comments: