Thursday, March 12, 2009

श्यामची आई


छम्‌ छम्‌ छम्‌ ..... छम्‌ छम्‌ छम्‌ ।
छडी लागे छ्मछ्म, विद्या येई घमघम ।।
छम्‌ छम्‌ छम्‌ ..... छम्‌ छम्‌ छम्‌ ।।

मोठ्या मोठ्या मिश्या, डोळे एवढे एवढे लाल ।
दंतोजींचा पत्ता नाही, खप्पड दोन्ही गाल ।
शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम ।।
छम्‌ छम्‌ छम्‌ ।।

तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी भिंती झाल्या घाण ।
पचापचा शिव्या देई खाता खाता पान ।
"मोऱ्या मूर्खा- !", "गोप्या गद्ध्या !", देती सर्वा दम ।।
छम्‌ छम्‌ छम्‌ ।।

तोंडे फिरवा, पुसती गिरवा, बघु नका कोणी ।
हसू नका, रडू नका, बोलु नका कोणी ।
म्हणा सारे एकदम, ओनामा सिद्ध्म्‌ ।।
छम्‌ छम्‌ छम्‌ ।।

हे गाणे माझ्या लहानपणी सगळ्या मुलांना अतीशय आवडत असे. माझ्या पुढच्या पिढीमधल्या मुलांनी ते क्वचितच ऐकले असेल, पण त्यानंतरच्या पिढीतल्या लिटल् मॉनिटर मुग्धा वैशंपायन हिने हे गाणे सारेगमप लिटल् चँप्सच्या स्पर्धेत सादर केले आणि सर्वांनी ते अक्षरशः डोक्यावर घेतले. सारेगमपच्या महाअंतिम फेरीत तिनेच ते गायिले, मुग्धावर झालेल्या खास भागात या गाण्याचा समावेश होता आणि वाशीला झालेला या लिटल् चँप्सचा एक कौतुकसोहळा मी पाहिला त्यातसुध्दा तिने सादर केलेल्या या गाण्याला अमाप टाळ्या पडल्या. पंडरत्न या नांवाने निघालेल्या सीडीमध्ये हे गाणे घेतलेले असल्याने अनेक लोक ते ऐकत राहणार आहेत. विख्यात कवी आणि गीतकार वसंत बापट यांनी लिहिलेले हे मजेदार गाणे सुप्रसिध्द संगीत दिग्दर्शक वसंत देसाई यांनी १९५३ साली निघालेल्या श्यामची आई या चित्रपटासाठी स्वरबध्द केले आणि त्यावेळी बालवयात असलेले आताचे ज्येष्ठ संगीतज्ञ पं.हृदयनाथ मंगेशकर यांनी ते गायिले होते. माझ्या आईच्या वयाच्या स्त्रिया एकत्र येऊन जेंव्हा गाणी वगैरे म्हणायच्या त्यात एक गाणे हमखास असायचे. त्याचे शब्द होते,

भरजरी ग, पितांबर, दिला फाडुन, द्रौपदिसी बंधु शोभे नारायण ।
हे गाणे त्या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक आचार्य अत्रे यांनी स्वतः लिहिले होते आणि आशा भोसले यांनी गायिले होते. कवी यशवंत यांचे एक अजरामर असे मातृप्रेमाने ओथंबलेले गीत आशा भोसले यांच्याच आवाजात या चित्रपटात घातले होते. ते होते,
’आई !’ म्हणोनी कोणी । आईस हाक मारी , ती हाक येइ कानी । मज होय शोककारी ।।
या गाण्यातली "स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी" हा ओळ तर आता मराठी भाषेतली एक म्हण बनली आहे. श्यामची आई या चित्रपटाला स्व. वसंत देसाई यांनी इतके मधुर संगीत दिले असले तरी गाणी हा कांही या चित्रपटाचा आत्मा नव्हता. स्व.साने गुरूजींनी लिहिलेल्या याच नांवाच्या पुस्तकातल्या
कथेवर तो काढला होता आणि या पुस्तकाद्वारे साने गुरूजींनी दिलेल्या शिकवणीवर त्याहून जास्त महत्व होते.
ही शिकवण समर्थपणे मांडलेला आणि या सर्व अमर गाण्यांनी नटलेला'श्यामची आई' हा अजरामर चित्रपट प्रदर्शित होऊन आता छपन्न वर्ष पूर्ण झाली. शुक्रवार, ६ मार्च १९५३ रोजी मुंबईच्या कृष्णा टॉकीज (आताचे ड्रीमलॅन्ड) मध्ये या सिनेमाचा पहिला खेळ श्री. आचार्य अत्रे ह्यांच्या मातोश्री, श्री. व्ही.शांताराम ह्यांच्या मातोश्री, श्री. साने गुरुजींच्या मावशी व भगिनी, श्री. माधव वझे ह्यांच्या मातोश्री आणि श्री. माधव अलतेकर ह्यांच्या मातोश्री या पंचमातांच्या उपस्थितीत झाला.
'श्यामची आई' हा मराठी बालसाहित्यातला अनमोल संस्कारांचा ठेवा आहे. हा ठेवा घरोघरी नेऊन पोचवण्याचे महान कार्य ७६ वर्षाचे श्री. पुराणिक हे गेली १३ वर्षे सतत करत आहेत. रोज एक तरी पुस्तक विकले गेलेच पाहिजे नाहीतर त्या दिवशी एक जेवण करायचे नाही असा त्यांचा संकल्प आहे, पण गेल्या तीन वर्षात अशी वेळ फक्त तीन दिवशी आली. सरासरीने पाहता त्यांची रोज तीन पुस्तके विकली गेली आहेत. "दुस-याकडून आदर, विश्वास, सत्याची अपेक्षा करण्याआधी स्वत: ते आधी आचरणे म्हणजेच संस्कार. संस्कार ही काही अचानक माणसांत येणारी शक्ती नव्हे. संस्कार हे घडवावे लागतात, हळूहळू रूजवावू लागतात." असे ते सांगतात. पुस्तकातला आणि चित्रपटातली श्यामची आईसुध्दा रोज घडणा-या लहान सहान प्रसंगातून वेळोवेळी श्यामला समज देऊन किंवा समजावून सांगून आणि स्वतःच्या आचरणातून त्याच्या मनावर संस्कार करत असते.
ही सर्व सचित्र माहिती मराठीवर्ल्ड या संकेतस्थळावर भाग्यश्री केंगे यांनी दिली आहे. मी त्यांचा आभारी आहे.

No comments: