Monday, March 02, 2009

मराठी भाषेची शुध्दता

मी कांही भाषातज्ज्ञ नाही. पण मला असे वाटते की कोणतीही जीवंत भाषा एकाद्या साचलेल्या पाण्याच्या डबक्यासारखी नसते. मागून आलेल्या प्रवाहातले थोडे पाणी आणि त्यातला गाळ कांठावर पसरवत आणि नवे ओहोळ, ओढे, नाले वगैरेमधून आलेल्या प्रवाहांना सामावून घेत नदीचा प्रवाह जसा पुढे जात असतो त्याचप्रमाणे उपयोगात नसलेले शब्दप्रयोग गाळून टाकत व निरनिराळ्या श्रोतांमधून आलेले नवनवे शब्दप्रयोग सामावून घेत भाषा वहात असते. आज मी जे शब्दप्रयोग आपल्या बोलण्यात व लिखाणात वापरतो ते सारे मी कुठे ना कुठे कधी ना कधी पुनःपुनः ऐकलेले किंवा वाचलेले असतात. सतत उपयोग होत असल्यामुळे ते चलनात असतात. उपयोग कमी झाल्यानंतर ते बाहेर फेकले जातात. त्याचप्रमाणे जीवनशैलीतील बदल, वाचन, प्रसारमाध्यमे आणि इतर लोकांशी होणारा संपर्क इत्यादींमधून त्यात अनेक नवनवे शब्द समाविष्ट होत राहतात. ही प्रक्रिया अत्यंत संथपणे आणि बिनबोभाटपणे सतत चाललेली असते. यासाठी एक अगदी रोजच्या बोलण्यातले उदाहरण देतो.

पन्नास वर्षांपूर्वी मी ज्या भागात रहात होतो त्या काळात तिथल्या बहुतेक प्रौढ स्त्रिया नऊ वारी 'लुगडे'
नेसत असत, तरुणी पांच वारी 'गोल पातळ' नेसत आणि लहान मुली 'परकर पालके' घालत. 'साडी' हा शब्द तेंव्हा फारसा प्रचारात नव्हता. खरे वाटत नसेल पन्नाशीच्या दशकातले राजा परांजप्यांचे मराठी चित्रपट लक्षपूर्वक पहावेत. लहान मुलींसाठी हौसेने 'पंजाबी ड्रेस' शिवत असत. या रोजच्या वापरातल्या वस्त्रांच्या कापडाचा पोत, वीण, रंग, त्यावरील नक्षीकाम, किंमत, टिकाऊपणा वगैरेंची चर्चा, त्यांचे कौतुक किंवा हेटाळणी, त्यांची निवड करण्यापासून ते अखेरीस बोहारणीला देण्यापर्यंत त्यांवर घरात होत असलेल्या क्रिया यांच्या संदर्भात हे शब्द रोजच कानावर पडत असत आणि बोलण्यात येत असत. आज पन्नास वर्षांनंतर मी ज्या सामाजिक स्तरात वावरतो आहे तिथे लहानपणचे हे ओळखीचे शब्द आता माझ्या कानावर फारच क्वचित येतात.

'लुगडे' नेसणा-या स्त्रियांची पिढी काळाआड गेली. 'गोल पातळ' जाऊन आलेली 'साडी' मध्यमवयीन व प्रौढ महिला नेसतात. बहुतेक तरुण मुली जीन्स किंवा कॅप्री आणि टॉप घालतात. पंजाबी ड्रेस आता 'पंजाबी' राहिला नाही, 'सलवार कमीज' किंवा 'सलवार सूट' या नांवाने तो सर्वच वयोगटात वापरला जातो. फ्रॉक, स्कर्ट आणि त्यांचे मिनि, मॅक्सी, मिडी वगैरे अनंत प्रकार येत आणि जात असतात. राजस्थानी, गुजराती किंवा लमाणी पध्दतीच्या कपड्यांचाही क्वचित कधी वापर होतांना दिसतो. नव्या पिढीतल्या मुली 'फंक्शन' किंवा 'ऑकेजन' च्या निमित्याने साडीही 'घालतात'. आणखी तीन चार दशकांनंतरही कोणत्या ना कोणत्या नांवाने साडी शिल्लक राहील पण 'नेसणे' हा शब्द कदाचित राहणार नाही असा माझा अंदाज आहे.

आपण ठरवू किंवा न ठरवू, बोलत असतांना आपल्या मनातले विचार आपोआप सोयीस्कररित्या व्यक्त होतात. त्या वेळेस आपण व्याकरणाचा किंवा भाषाशुध्दतेचा विचार करत नाही. आपले सांगणे ऐकणा-याला लगेच आणि नीट समजणे हे जास्त महत्वाचे असते. माझे आईवडील ज्या बोलीत माझ्या लहानपणी बोलत असत, त्या नंतरच्या काळात ज्या प्रकारे मी माझ्या मुलांशी बोलत होतो आणि आज ज्या भाषेत ते त्यांच्या मुलांशी संभाषण करतात या मराठी भाषेच्याच तीन भिन्न त-हा मी एकाच आयुष्यात पाहिल्या आहेत. 'हंडा', 'कळशी', 'बिंदगी', 'बंब' असे लहानपणी रोज उच्चारले जाणारे जुने शब्द मोठेपणी माझ्या बोलण्यात कधी आले नाहीत कारण त्या वस्तूंना माझ्या मोठेपणीच्या घरात स्थान नव्हते, तसेच 'सीडी', 'मॉल', 'रिमोट' आदि शब्दही लहानपणी कधीही माझ्या बोलण्यात आले नव्हते, कारण त्या संकल्पनासुध्दा तेंव्हा अस्तित्वात नव्हत्या.

आपले लेखन वाचणारे अनेक लोक असतात. निदान अशी सोयिस्कर समजूत करून घ्यायला काय हरकत आहे? आपल्याला अभिप्रेत असलेला नेमका अर्थच त्यातून जास्तीत जास्त लोकांना कळावा यासाठी ते प्रमाणभाषेत लिहिणे आणि त्या लेखनाच्या भाषेत शुध्दलेखनाच्या नियमांचे शक्य तितके पालन करणे आवश्यक असते. शुध्दलेखनाच्या चुका वाचतांना खटकतात आणि वाचक त्यात अडखळतो. या कारणासाठी त्या शक्य तोंवर टाळाव्यात. पण त्याचबरोबर त्यात वापरलेले शब्द मूळ मराठी आहेत (म्हणजे नेमके काय?), संस्कृतजन्य आहेत, आपल्याच देशातल्या परप्रांतातून आले आहेत की परदेशातून आले आहेत वगैरे मुद्यांपेक्षा किती लोकांना ते समजतील याकडे अधिक लक्ष द्यायला हवे असे आपले मला वाटते.

जीवंत भाषा ही प्रवाही आणि नव्या शब्दांना व शब्दरचनांना सामावून घेणारी असावी हे मी वर सांगितलेच आहे. माझ्या कल्पनेप्रमाणे इंग्रजी भाषा तशी आहे. कॉम्प्यूटर युग आल्यापासून आणि विशेषतः इंटरनेटच्या प्रसारानंतर त्यात कितीतरी नवे शब्द आले आहेत आणि 'रन', 'सेव्ह', 'डिफॉल्ट', 'स्क्रॅप' आदि जुन्या शब्दांना नवे अर्थ प्राप्त झाले आहेत. चॅटिंगसाठी तर नवी लिपीच तयार झाली आहे असे म्हणता येईल. आपण ते सगळे अगदी सहजपणे वापरतो. त्यांऐवजी मराठीत 'धांवा', 'वाचवा' वगैरे म्हणतांना निदान माझी जीभ तरी अडखळेल. उद्या एका मराठी माणसाने नव्याच तंत्रज्ञानावर आधारलेली एकादी नवी गोष्ट बाजारात आणली आणि सुरुवातीपासूनच तिचा वापर करतांना 'उचला', 'ठेवा', 'थांबा', 'चला', 'दाबा', 'सोडा' अशा सोप्या शब्दांचा प्रयोग केला तर त्या शब्दांचा उपयोग करायला मला मनापासून आवडेल. पण सध्या तरी जी गोष्ट ज्या नांवाने माझ्यापर्यंत पोचली त्या नांवाचाच मराठी भाषेत समावेश करावा लागेल असे माझे मत आहे.

No comments: