Saturday, April 19, 2008

लीड्सच्या चिप्स -भाग १६- लोह्डी आणि संक्रांत

भारतात असतांना नेहमीच्या जाण्यायेण्याच्या रस्त्यावरील देवळांच्या आत सुद्धा मी क्वचित कधी तरी डोकावीत असेन. मला त्याचे आकर्षण जरा कमीच वाटते. पण लीड्सला राहतांना मात्र कधी कधी मुद्दाम वाकडी वाट करून तिथल्या मंदिरात जावेसे वाटायचे. एक तर थोड्या काळासाठी आपल्या देशातल्या ओळखीच्या वातावरणात आल्याचा भास व्हायचा आणि दुसरे म्हणजे भारतीय वंशाच्या लोकांसाठी गांवात कुठे कुठे खास कार्यक्रम होणार आहेत ते तिथे हमखास कळायचे. १३ जानेवारीच्या संध्याकाळी 'लोह्डी दी रात' आणि 'मकर संक्रांत' यानिमित्त एक सार्वजनिक कार्यक्रम त्याच जागी करायचे ठरवले आहे असे एके दिवशी तेथे गेलो असतांना समजले. माझ्या वास्तव्यातला तो तिथला एकमेव सामुदायिक कार्यक्रम होता व त्यासाठी सर्वांना जाहीर निमंत्रण होते त्यामुळे एकदा जाऊन पहायचे असे ठरवले.
आमच्या लहानपणी संक्रांतीच्या आदले दिवशी 'भोगी' साजरी केली जायची. त्या दिवशीच्या जेवणात गरम गरम मुगाची खिचडी, त्यावर साजुक तुपाची धार, सोबतीला तळलेले पापड, तव्यावर भाजल्यानंतर आगीच्या फुफाट्यावर फुगवलेली बाजरीची भाकरी, अंधा-या रात्रीच्या आकाशात विखुरलेल्या तारकांसारखे काळसर रंगाच्या त्या भाकरीवर थापलेले तिळाचे पांढरे दाणे, त्यावर ताज्या लोण्याचा गोळा, मसाल्याने भरलेल्या लुसलुशीत कोवळ्या वांग्यांची भाजी असा ठराविक मेनू असायचा. हे सगळे पदार्थ अनेक वेळा जेवणात वेगवेगळे येत असले तरी कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून त्या दिवशी ते खास जेवण जेवण्यातली मजा और असायची. मुंबईला आल्यावर तिथल्या दिव्यांच्या झगमगाटात बहुतेक लुकलुकणा-या तारका लुप्त झाल्या आणि तीळ लावलेली ती बाजरीची भाकरीही स्मरणातून हद्दपार झाली. एखाद्या तामीळ किंवा तेलुगुभाषी मित्राने त्यांच्या पोंगल निमित्त त्याच नांवाचा खास पद्धतीचा भात खायला घातला तर त्यावरून आपल्या मुगाच्या खिचडीची आठवण यायची. रात्र पडल्यावर आसपास कोठेतरी एक शेकोटी पेटवली जायची आणि त्याच्या आजूबाजूला घोळका करून ढोलकच्या तालावर पंजाबी लोक नाचतांना दिसायचे. कधी कधी एखादा पंजाबी मित्र बोलावून तिकडे घेऊन गेला तर त्याच्याबरोबर जाऊन आपणही थोडे 'बल्ले बल्ले' करायचे. यामुळे 'लोह्डी' हा शब्द तसा ओळखीचा झाला होता. या परदेशात तो कसा मनवतात याबद्दल कुतुहल होते.
त्या संध्याकाळी हवामान फारच खराब होते. तपमान शून्याच्या खाली गेले होते, मध्येच बोचरा वारा सुटायचा नाहीतर हिमवर्षावाची हलकी भुरभुर सुरू व्हायची, त्यामुळे दिव्यांचा अंधुक उजेड आणखीनच धूसर व्हायचा. रस्ते निसरडे झालेले असल्यामुळे चालत जायची सोयच नव्हती. वाशीला घरातून बाहेर पडले की रिक्शा मिळते तसे तिकडे नाही. टॅक्सीला तिकडे 'कॅब' म्हणतात, ती सेवा चालवणा-या कंपनीला फोन करायचा, ते त्यांच्या वायरलेस नेटवर्कवर कोण कुठे आहे ते पाहून त्यातल्या त्यात जवळ असलेल्या कॅबला तिकडे पाठवतील. हे सगळे खर्चिक तर होतेच. शिवाय परत येतांना कुठून फोन करायचा हा प्रश्न होता. वातावरण जितके खराब असेल तशाच या सेवासुद्धा अधिकाधिक कठिण होत जातात. त्यामुळे देवळाकडे जायला मिळते की नाही याची शंका होती.
थोडी चौकशी करतां शेजारी राहणारे आदित्य आणि पल्लवी सुद्धा या प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता तिकडे जाण्याचे दिव्य करणार आहेत असे योगायोगाने समजले आणि त्यांच्या गाडीतून त्यांचेबरोबर जाण्यायेण्याची सोय झाली. तेथे जाऊन पोचेपर्यंत तेथील हॉलमध्ये बसूनच ढोलक वाजवून गाणी म्हणणे सुरू होते. तो हॉल माणसांनी असा गच्च भरलेला मी प्रथमच पहात होतो. भांगडा नाच खेळायला रिकामी जागाच उरली नव्हती. गर्दी होण्यापूर्वीच कोणी नाचून घेतले असेल तर असेल. लोह्डी आणि सुंदर मुंदरीची गाणी गाऊन झाल्यावर थोड्या वेळाने एक वयस्क गृहस्थ पुढे आले. त्यांनी सोप्या शब्दात लोह्डीच्या प्रथेशी संबंधित दुल्ला भट्टीची पंजाबी लोककथा सांगितली. या काळात शेतात नवीन पिके हाताशी आलेली असतात, वातावरण प्रफुल्ल असते, त्यामुळे लोकांना एकत्र येऊन हा सण धूमधडाक्याने साजरा करण्यात मोठा उत्साह असतो वगैरे सांगितले. भारतात जन्माला येऊन मोठेपणी तिकडे आलेल्या लोकांना 'देसमें निकला होगा चॉंद' वगैरे वाटले असेल. तिथेच जन्माला आलेली मुले आ वासून ऐकत होती.
लोह्डीसंबंधी सांस्कृतिक माहिती सांगून झाल्यावर थोडक्यात सूर्याच्या मकर राशीत होत असलेल्या संक्रमणाची माहिती दिली. संक्रांत जरी दुसरे दिवशी असली तरी वेळ वाचवण्याच्या दृष्टीने त्यासंबंधी करण्याची धार्मिक कृत्ये आताच उरकून टाकण्यात येणार आहेत असे त्यांनी सांगितले. हल्ली अस्तंगत होत असलेल्या, आपल्याकडील जुन्या काळातील प्रथेप्रमाणेच या वर्षी संक्रांत कुठल्या आसनावर बसून अमुक दिशेने येते, तमुक दिशेला जाते, आणखी कुठल्या तरी दिशेला पहाते वगैरे तिचे 'फल' पंडितजींनी वाचून दाखवले. त्याचा कशा कशावर कशा कशा प्रकारे परिणाम होणार आहे याचे भाकितही वर्तवले. कुणालाच त्यातले कांहीसुद्धा समजले नाही आणि कुणाचे तिकडे लक्षही नव्हते. सगळेच लोक पुढील कार्यक्रमाची वाट पहात होते. त्यानंतर रोजच्यासारखी सर्व देवतांची महाआरती झाली. आता पुढील कार्यक्रम गोपूजेचा असल्याची घोषणा झाली आणि सगळेजण कुडकुडत्या थंडीत हळूहळू बाहेरच्या प्रांगणात आले.
मंदिरात शिरतांनाच एक विचित्र प्रकारचा ट्रेलर प्रवेशद्वाराजवळ उभा असलेला मी पाहिला होता. त्या जागी त्याचे काय प्रयोजन असावे ते मला कळले नव्हते पण आत जाण्याची घाई असल्याने तो लक्षपूर्वक पाहिलाही नव्हता. सर्कशीतल्या वाघ सिंहांना ज्यात कोंडून ठेवतात तसला एक पिंजरा त्यावर ठेवला होता आणि त्या पिंज-याच्या आत चक्क एक विलायती जातीची सपाट पाठ असलेली गोमाता बसली होती. गांवाबाहेरील जवळच्या कुठल्या तरी गोठ्यातून तिचे या पद्धतीने आगमन झाले होते. तिलाही एक वेगळ्या प्रकारचे दृष्य प्रथमच पहायला मिळत असणार. तिचा मालक का रखवालदार जो कोण तिच्या बरोबर आला होता तो गोरा माणूस जवळच सिगरेट फुंकीत उभा होता. त्याने पिंज-याला लावलेले कुलूप उघडून आंत शिरण्याचा मार्ग किलकिला केला.
भटजीबुवा आणि मुख्य यजमान जरा जपूनच आंत गेले. दोन चार मंत्र गुणगुणत त्यांनी हांत लांब करून गोमातेला हळद, कुंकू, अक्षता, फुले वगैरे हलकेच किंचितशी वाहून घेतली. गायीपुढे आधीपासूनच भरपूर चारा ठेवलेला असल्याने तो खाऊन ती शांतपणे रवंथ करीत होती. हे भक्तगण तिला नाही नाही ते कांही खायला घालणार नाहीत ना इकडे त्या मालकाचे बारीक लक्ष होते. यादरम्यान एक सुरेख भरतकाम केलेली झूल बाहेरच्या मंडळींमध्ये कोणीतरी फिरवत होता. सर्वांनी तिला हात लावून घेतला. अशा प्रमाणे प्रतीकात्मकरीत्या सर्वांच्यातर्फे ती झूल त्या गायीच्या पाठीवर पांघरण्यात आली. दिवा ओवाळून तिची थोडक्यात आरती केली. ती तर भलतीच 'गऊ' निघाली. अगदी शांतपणे पण कुतुहलाने आपले सारे कौतुक पहात होती. बाजूला उभ्या असलेल्या तिच्या मालकाच्या डोळ्यातसुद्धा नेमका तोच भाव दिसत होता. आपापल्या लहानग्यांना कडेवर घेऊन त्यांचे मातापिता "ती पहा गाय, ती तिची शिंगे, ते शेपूट, ती अशी मूऊऊऊ करते" वगैरे त्यांना दाखवून त्यांचे सामान्यज्ञानात भर घालीत होते. ती आपल्याला दूध कशी देते हे सांगणे कठीणच होते, पूजाविधीमध्ये त्याचा अंतर्भाव नव्हता आणि ती क्रिया तिकडे यंत्राद्वारे करतात. पिंज-याच्या गजांमधील फटीतून घाबरत घाबरत हांत घालून कांही लोकांनी गायीची पाठ, पोट, शेपूट वगैरे जिथे मिळेल तिथे हस्तस्पर्श करून घेतला. तेवढीच परंपरागत भारतीय संस्कृतीशी जवळीक! या गोपूजेचा लोह्डी किंवा संक्रांतीशी काय संबंध होता ते मात्र मला समजले नाही.
आता लगेच अग्नि पेटवणार असल्याची बातमी कुणीतरी आणली आणि सगळी गर्दी तिकडे धांवली. इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत लाकडांचा ढीग व्यवस्थितपणे रचला होता. ती जाळण्यासाठी प्रदूषणनियंत्रक अधिका-याची रीतसर परवानगी घेतलेली होती. ती जळाऊ लाकडे कुठून आणली होती कुणास ठाऊक! जशी गाय आणली होती तशीच तीही ग्रामीण भागातून आणली असणार. मंत्रपूर्वक अग्नि चेतवून झाल्यानंतर अर्थातच सगळी मंडळी जितक्या जवळ येऊ शकत होती तितकी आली. उबदार कपड्यांची अनेक आवरणे सर्वांनी नखशिखांत घातलेली असली तरी नाकाचे शेंडे गारव्याने बधीर झाले होते, नाकाडोळ्यातून पाणी वहात होते. यापूर्वी कधीही शेकोटीची ऊब इतकी सुखावह वाटली नव्हती.
सगळ्या लोकांनी शेकोटीभोवती प्रदक्षिणा घातल्या. बहुतेक लोकांनी येतांना पॉपकॉर्नची पाकिटे बरोबर आणली होती, कांही लोकांनी रेवडीचे छोटे गोळे किंवा गजखच्या वड्या आणल्या होत्या. त्या पाहून तोंडाला पाणी सुटत होते, पण कोणीच ते तोंडात टाकत नव्हते. सगळे कांही अग्निनारायणाला अर्पण करीत होते. त्याला नमस्कार करून प्रार्थना करीत होते. नवीन लग्न झालेल्या मुलीची पहिली मंगळागौर, संक्रांतीला हलव्याचा सण वगैरे आपल्याकडे कौतुकाने करतात. पण तो संपूर्णपणे महिलामंडळाचा कार्यक्रम असतो. पंजाबी लोकांत पहिली लोह्डी अशीच महत्वाची मानतात व त्यात नव्या जोडप्याने जोडीने भाग घ्यायचा असतो. इथेही दोन तीन नवी जोडपी आलेली होती. त्यांना भरपूर महत्व मिळाले.
जेवण तयार असल्याची बातमी येताच सगळ्यांनी तिकडे धाव घेतली. हा कार्यक्रम आटोपून आपापल्या सुरक्षित घरट्यात परतण्याची घाई प्रत्येकालाच होती. 'मक्केदी रोटी और सरसोंदा साग'चा बेत होता. आपल्याकडे कांही देवस्थानात पिठलंभाकरीचा प्रसाद असतो तसा. आमचा त्या कार्यक्रमात श्रद्धायुक्त सहभाग नव्हताच. आमचे वरणभात पोळीभाजीचे जेवण घरी आमची वाट पहात होते. यामुळे आम्ही तिथूनच निरोप घेतला.
देवळातल्या समूहात बहुतेक गर्दी पंजाबी लोकांचीच होती. थोडे गुजराथी लोक असावेत. नखशिखांत कपड्यावरून लोकांना ओळखणे कठीणच होते. इंग्रजीव्यतिरिक्त इतर भाषांमधील जे शब्द कानावर पडत होते त्यावरूनच त्यांची भाषा कळत होती. आमच्याशिवाय कोणीच मराठी भाषेतून बोलणारे तिथे भेटले नाहीत. आपली खरी मकरसंक्रांत दुसरे दिवशी होती. त्या दिवशीसुद्धा लोकांनी आपापल्या घरीच तिळगूळ खाल्ला असणार. निदान तेवढ्यापुरती आपली संस्कृती अद्याप टिकून आहे. या दिवशी गांवभर फिरून आप्तेष्टांना भेटणे शहरांमध्ये तरी बंदच झाले आहे. त्यामुळे या सणाचे सामूहिक स्वरूप राहिलेले नाही. ई-मेल किंवा फोनने "तिळगूळ घ्या गोड बोला" चा संदेश दिला की झाले. भारतात ही परिस्थिती आहे तर परदेशात कोण काय करणार आहेत? महिलामंडळी मात्र यानिमित्त एखादा सोयीस्कर दिवस पाहून, त्या दिवशी हळदीकुंकू वगैरे करून थोडी किरकोळ गोष्टींची 'लुटालूट' करतात आणि त्या निमित्ताने चांगले कपडे परिधान करून दागदागीने अंगावर चढवायची हौस भागवून घेतात. तसे तिकडेही लहान प्रमाणात करून घेतले असेल पण तोपर्यंत आम्ही आपल्या स्वदेशात परत येऊन गेलो होतो.

लीड्सच्या चिप्स -भाग १५- हिंदू मंदिर


या मालिकेच्या सातव्या भागामध्ये गणेशोत्सवासंबंधी लिहितांना मी लीड्सच्या मंदिराचा उल्लेख केला होता. त्याबद्दल अधिक माहिती थोड्या विस्ताराने या लेखात देत आहे. लीड्सच्या आठ लाख लोकवस्तीमधील सुमारे आठ हजार हिंदूधर्मीय आहेत, पण शीख किंवा मुसलमान जसे शहराच्या विशिष्ट भागात मोठ्या संख्येने एकत्र राहतात तशा हिंदूंच्या वेगळ्या वस्त्या नाहीत. ते सर्व भागात विरळपणे विखुरलेले आहेत. ब-याच वर्षापूर्वीपासून तेथे रहात असलेल्या सधन गुजराथी व पंजाबी कुटुंबामधील दानशूर लोकांनी एकत्र येऊन येथील हाईड पार्क भागातील अलेक्झांड्रा रोडवर एक हिंदू मंदिर बांधले आहे. या भागात मुस्लिम धर्मीयांची मोठी संख्या आहे. तेथून जवळच त्यांनी बांधलेली एक भव्य मशीद सुद्धा आहे, तसेच अबूबेकर व मामूनिया ही भारतीय उपखंडातील लोकांना आवश्यक अशा खास वस्तु पुरवणारी मोठी दुकाने ही आहेत. मंदिराच्या प्रशस्त हॉलमध्ये एका बाजूला एकाला लागून एक पण वेगवेगळ्या छोट्या छोट्या गाभा-यात वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती स्थापन केल्या आहेत. त्याच छताखाली समोर शंभर दीडशे माणसे बसू शकतील एवढे सभागृह आहे. बाजूला एक छोटेसे कार्यालय व प्रवेश करण्याची खोली आहे. त्यांच्या माथ्यावर परंपरागत शिखर आहे.
श्रीगणेशजी, कार्तिकेय, अंबामाता, राधा कृष्ण, राम लक्ष्मण सीता व हनुमान यांच्या अत्यंत सुबक संगमरवरी मूर्ती इथे आहेत, तसेच पार्वतीच्या प्रतिमेसह शिवलिंग आहे. आपण कार्तिकेयाला ब्रह्मचारी समजतो पण दक्षिण भारतीय त्याची दोन अर्धांगिनीसह पूजा करतात. तशा त्य़ा इथेही कार्तिकेयासोबत आहेत. भगवान महावीराची प्रतिमा ठेऊन जैन बांधवांच्या पूजेअर्चेची सोय केली आहे. त्याशिवाय दशावतार, रामायण, महाभारतातील प्रसंग वगैरे दाखवणारी अनेक चित्रे व भित्तीशिल्पे लावून सभागृह सुशोभित केले आहे. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग या सगळ्या प्रांतातून आलेल्या भारतीयांना येथे येऊन आपापल्या आराध्य दैवतांचे दर्शन घेऊन त्यांची प्रार्थना करता येते. रोज सकाळी साग्रसंगीत पूजा व संध्याकाळी आरती केली जाते. ती मुख्यतः संस्कृत व कांही प्रमाणात हिंदी गुजराती या भाषांमध्ये होते. मुद्दाम या कामासाठी एका पंडितजीची नेमणूक केली आहे. त्यानंतर खोबरे, शेंगादाणे, बदाम, काजू, बेदाणे, केळी वगैरे प्रसाद वाटला जातो. सकाळी दहा पंधरा तर संध्याकाळी वीस पंचवीस लोक नेमाने त्या वेळी दर्शनाला येतात. सणवार असेल तर अधिक लोक मुलाबाळांसह येतात.
याशिवाय अनेक रविवारी भजन, कीर्तन, प्रवचन, व्याख्यान वगैरे ठेवतात. त्यात भाग घेणारे बहुतेक लोक स्थानिक हिंदूच असतात. कधी कधी भारतातून आलेल्या पाहुण्यांना पाचारण करतात. त्याद्वारे भारतीय संस्कृतीची, विशेषतः सणवार व चालीरीती यांची ओळख करून देण्याचे प्रयत्न सुरू असतात. बाजूलाच एका स्वतंत्र दुमजली इमारतीत दोन लहानसे हॉल आहेत. वाढदिवस, अभिनंदन, स्नेहभोजन अशासारख्या छोट्या छोट्या कार्यक्रमासाठी भारतीय वंशाचे लोक त्याचा वापर करतात. मात्र मद्यप्राशन किंवा मांसभक्षण या ठिकाणी वर्ज्य आहे. थोडी मोकळी जागा आहे. त्या जागेत दिवाळीची आतिषबाजी, होलिका दहन, रंग उडवून खेळणे वगैरे पारंपरिक हिंदू सण समारंभ एकत्र येऊन साजरे करतात. आठ हजारांपैकी जेमतेम शंभर लोक येत असतील, पण ज्यांना इच्छा व हौस आहे त्यांना या परमुलुखातसुद्धा ती भारतीय पद्धतीनुसार भागवण्याची सोय तर आहे.

Wednesday, April 16, 2008

उर्मिला कादंबरीच्या प्रकाशनाचा सोहळा

पूर्वार्ध

रामनवमीच्या दिवशी 'दोन प्रहरी, सूर्य शिरी थांबल्यावर' झालेल्या रामजन्माच्या उत्सवात भाग घेणे कांही या वर्षी मला जमले नाही, पण कै.डॉ.वसंतराव व-हाडपांडे यांनी लिहिलेल्या 'उर्मिला' या कादंबरीच्या प्रकाशनाचा, म्हणजेच जन्माचा, सोहळा संध्याकाळी पहायला मिळाला. 'वसंत व-हाडपांडे' हे नांव मराठी साहित्याच्या विश्वात सुपरिचित आहे. एक उत्कृष्ट कवि म्हणून तर ते ख्यातनाम आहेतच; त्याशिवाय कथा, कादंबरी, चरित्रकथा, प्रबंध, समीक्षण, बालवाङ्मय अशा विविध प्रकारचे त्यांचे विपुल साहित्य प्रकाशित झाले आहे. पुरातन तसेच समकालीन साहित्यिकांच्या निवडक वाङ्मयाच्या संपादनाचे कामसुध्दा त्यांनी केले आहे. मराठी वाङ्मयकोशाच्या निर्मितीमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे.

अकस्मात झालेल्या अपघाती निधनामुळे त्यांची साहित्यक्षेत्रातील यशस्वी घोडदौड अचानकपणे थांबून गेली. त्यांचे जितके साहित्य तोपर्यंत प्रकाशित झाले आहे त्यापेक्षाही जास्त साहित्यकृती अद्याप अप्रकाशित राहिलेल्या आहेत. डॉ.सौ. अंजली कुलकर्णी आणि डॉ.सौ.अनुराधा हरकरे या त्यांच्या कन्यका अथक प्रयत्न करून त्यांचे दर्जेदार साहित्य हर त-हेने जगापुढे आणण्याचे कार्य करीत आहेत. सुरेल चाली लावून लोकप्रिय गायक गायिकांच्या आवाजात गाऊन घेतलेला त्यांच्या निवडक कवितांचा पहिला आल्बम 'मस्त शारदीय रात' या नांवाने त्यांनी काढला. ती गाणी आता सर्व आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित होत आहेत, इतकेच नव्हे तर कॉलर ट्यूनच्या रूपात मोबाईलवर उपलब्ध आहेत. अशा रीतीने ती घरोघरी पोचत आहेत. तो उपक्रम यशस्वी झाल्यानंतर उर्मिला या कादंबरीच्या प्रकाशनाचा सोहळाही त्यांनी परवा घडवून आणला.

अणुशक्तीनगरातल्या समाजकेन्द्राच्या सभागृहात हा कार्यक्रम ठेवला होता. प्रख्यात ज्येष्ठ साहित्यिक श्री.के.ज.पुरोहित - 'शांताराम', सुप्रसिध्द लेखिका डॉक्टर विजया वाड, महाराष्ट्र टाइम्सचे सहाय्यक संपादक श्री.मुकेश माचकर, ग्रंथालीचे प्रमुख श्री.दिनकर गांगल, अभिनेता श्री. अविनाश नारकर आणि अभिनेत्री सौ. ऐश्वर्या नारकर हे दापत्य आणि नवतारका नृत्यांगना वेदांती भागवत ही मंडळी मंचावर होती. डॉक्टर रत्नाकर कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत करून समारंभाची सूत्रे सौ.अनुराधा हरकरे यांच्या स्वाधीन केली. डॉ.सौ. अनुराधा आणि डॉ.सौ.अंजली या भगिनींनी हृदयाला भिडणा-या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले. १९९२ साली झालेल्या एका भीषण अपघातात त्यांचे वडील कै.डॉ.वसंतराव व-हाडपांडे, आई सौ.वसुमती आणि दोघेही डॉक्टर बंधु डॉ.राजीव व डॉ.संजय या सर्वांना एका फटक्यात काळाने ओढून नेले. काळजाला गोठवून टाकणा-या या घटनेने सर्वांनाच सुन्न करून टाकले होते. या दुःखातून पूर्णपणे बाहेर येणे केवळ अशक्य आहे. त्या आघातातून जरा सांवरल्यानंतर आपल्या बाबांच्या दर्जेदार साहित्यकृती रसिकांसमोर आणण्याचा ध्यास घेऊन अशा प्रकारे त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्याच्या कार्याची सुरुवात केली. यासाठी त्यांनी 'स्मृतिगंध प्रकाशन' ही संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या विद्यमाने त्यांनी आधी वसंतरावांच्या गीतांचा आल्बम काढला आणि परवाच्या समारंभात त्यांच्या एका अप्रकाशित कादंबरीचे प्रकाशन केले. कार्यक्रमाची ही पूर्वपीठिका ऐकतांना प्रेक्षकांचे डोळेही पाणावल्याशिवाय राहिले नाहीत.

श्री. के.ज.पुरोहित यांनी आपल्या जुन्या काळातल्या मित्राच्या या कादंबरीला प्रस्तावना लिहिली आहे. आपल्याला जे कांही सांगायचे होते ते या प्रस्तावनेत दिले आहे त्यामुळे या समारंभात आपण कांही बोलणार नाही असे त्यांनी आधी सांगितले होते, पण आयत्या वेळी चार शब्द बोलण्याची इच्छा व्यक्त करून त्यांनी कै.वसंत व-हाडपांडे यांच्या कांही आठवणी सांगितल्या. मराठी वाङ्मयकोशाच्या निर्मितीसाठी नागपूर केंद्राचे कार्य सांभाळण्यासाठी त्यांना एका तळमळीने काम करणा-या माणसाची गरज होती. सभेमध्ये उत्कृष्ट बोलणारे वक्ते खूप सापडतात पण प्रामाणिकपणे मान मोडून प्रत्यक्ष काम करणारी माणसे दुर्मिळ असतात. वसंतरावांची एकंदर वाटचाल पाहता हे काम ते उत्तम रीतीने सांभाळतील असा विश्वास त्यांना वाटला म्हणून हे काम त्यांना दिले गेले आणि त्याचे त्यांनी सोने केले. या कामात एकदा मोठा विलक्षण पेचप्रसंग निर्माण झाला होता. संकलित केलेल्या भागाचे मान्यवरांच्या पुढे सादरीकरण करायचे ठरले असतांना ते कागद ठेवलेल्या गोदामावर एका भुरट्या चोराने डाका घातला आणि तिथले सारे कागद चोरून रद्दीच्या भावात त्याची विल्हेवाट लावली. अशा वेळी चिडून किंवा खचून न जाता व-हाडपांड्यांनी अगदी कमी अवधीत ते सारे दस्तऐवज पुन्हा निर्माण करून दिले आणि वाङ्मयकोशाच्या कार्याला गति दिली.
. . .. . .. . . . . . . . . . . ... .(क्रमशः)
---------------------------------------------------------

उत्तरार्ध


'उर्मिला' ही कादंबरी उत्तम निर्मात्याच्या हातात पडली तर जुन्या 'मानिनी'सारख्या अप्रतिम चित्रपटाची निर्मिती होऊ शकेल असे एका लेखात ख्यातनाम समीक्षक डॉ.हेमंत इनामदार यांनी लिहिलेले आहे. त्या दृष्टीने पावले उचलण्याचा संयोजकांचा मानस आहे असे सांगून श्री. मुकेश माचकर यांना असलेल्या चित्रपटसमीक्षणाच्या दीर्घ अनुभवाचा लाभ मिळावा अशी प्रस्तावना त्यांच्या भाषणापूर्वी केली गेली. "साहित्य हा आपला प्रांत नाही आणि एरवी आपण अशी जुन्या शैलीतली कादंबरी कदाचित वाचलीसुध्दा नसती." असे सांगत माचकरांनी भाषणाची सुरुवात केली. " 'आजचे वृत्तपत्र आणि उद्याची रद्दी' अशा प्रकारचे केवळ तात्कालिक महत्वाच्या विषयांशी संबंधित असलेले साहित्य रोज पहायची आपल्याला संवय आहे. त्यामुळे आपण या समारंभापासून दूर राहणार होतो, पण या दोघी भगिनींकडे विलक्षण परस्वेशन पॉवर आहे, त्यांच्या आग्रहपूर्वक विनंतीला आपल्याला नकार देताच आला नाही, मात्र ही कादंबरी हांतात धरल्यानंतर ती वाचून पूर्ण करेपर्यंत सोडावीशी वाटली नाही." असे त्यांनी सांगितले. "यातल्या कथेवर आधारलेला चित्रपट तयार करतांना मात्र तो कसा तयार होत आहे यावर बारीक लक्ष ठेवा. शब्दांपलीकडलं सारं शब्दांवाचून सांगण्याची किमया ज्याच्याकडे आहे असा संवेदनशील दिग्दर्शकच या कथेला योग्य तो न्याय देऊ शकेल. चटकदार संवाद घालण्याच्या मोहापोटी तिचा विचका होणार नाही एवढे पहा." असा सल्लाही त्यांनी दिला.

ग्रंथालीचे श्री. दिनकर गांगल यांनी थोडक्यात आपल्या शुभेच्छा दिल्या. डॉ.विजया वाड यांनी या कादंबरीच्या कथेबद्दल वाचकांच्या मनातली उत्सुकता वाढेल अशा पध्दतीने तिच्याबद्दल थोडे विस्ताराने सांगितले. उर्मिला आणि विश्वास ही यातली दोन प्रमुख पात्रे आहेत. आईवडिलांच्या इच्छेखातर विश्वास उर्मिलेबरोबर विवाह करतो, पण त्याचे मन आधीच दुसरीकडे गुंतलेले असते. उर्मिला मात्र विश्वासच्या सोबतीने सुखी संसाराची रंगीत स्वप्ने घेऊन आलेली असते. असा हा प्रेमाचा त्रिकोण आहे. अपेक्षाभंगाने दुखावली गेलेली उर्मिला आक्रस्ताळेपणाने आकांडतांडव करत नाही किंवा आपलं नशीबच फुटकं असं म्हणून ढसाढसा किंवा मुळूमुळू रडतही बसत नाही. अत्यंत धीरगंभीर वृत्तीने ती शांतपणे आपल्या अस्तित्वाचा लढा देत राहते. आपल्या मार्गावर खंबीरपणे चालत राहण्याचा आत्मविश्वास तिच्याकडे असतो आणि तिला जे हवे असते ते अखेर तिला प्राप्त होते. अशी या कादंबरीची सुखांत गोष्ट आहे. यातली उर्मिलेची व्यक्तीरेखा आक्रमक नाही, पण दुबळीही नाही. आजच्या मालिकांच्या कथानकात संसारांची सारखी तोडफोड होतांना जशा प्रकारे दाखवली जात असते त्या पार्श्वभूमीवर उर्मिलेची भूमिका जास्तच सहनशील वाटेल, पण हेच तिचे वैशिष्ट्य़ आणि बलस्थानही आहे. त्रिकालाबाधित शाश्वत अशी मूल्ये कधीच जुनी होत नाहीत. त्यामुळे वीस पंचवीस वर्षांपूर्वी लिहिली गेलेली ही कादंबरी आजच्या आणि उद्याच्या वाचकांनाही आवडेल असा विश्वास त्यांनी प्रगट केला.

डॉक्टर विजयाताईंनी आपले काही मजेदार अनुभवही सांगितले. जेंव्हा त्यांना पहिल्यांदा दिवस राहिले तेंव्हा त्या ज्या कार्यालयात काम करीत होत्या तिथले सहकारी त्यांना नेहमी "आता तो लाडू, तो पेढा असे पदार्थ खा, ती जिलबी, ती चकली वगैरे खाऊ नका, म्हणजे मुलगाच होईल." असा सल्ला देत होते आणि त्यांनी तो पाळला सुध्दा. पण " तुम्हाला मुलगी झाली" असं जेंव्हा नर्सने सांगितलं तेंव्हा क्षणभरच " ते कसं शक्य आहे?" अशी त्यांची प्रतिक्रिया झाली, पण दुस-याच क्षणी त्या गोंडस बाळाला पाहताच त्यांच्यातल्या मातृत्वाची अनुपम भावना जागी झाली पूर्वीचे सगळे विचार अदृष्य होऊन गेले. त्यांच्या संसारात बहार आणणा-या या पहिल्या कलिकेचे नांव त्यांना प्राजक्ता असे ठेवले. तिच्या पाठीवर आलेली निशिगंधा झाली. तीच सुप्रसिध्द अभिनेत्री निशिगंधा वाड! "या दोन मुलींच्या पाठीवर मुलगा झाला तर त्याचं नांव झेंडू ठेवा म्हणजे तुमची फुलबाग पूर्ण होईल." असे कोणी तरी खट्याळपणाने सुचवले . त्यावर त्यांच्या पतीने उत्तग दिले, "आमची फुलबाग आता पूर्ण झाली आहे. तेंव्हा वाटल्यास मलाच तिने झेंडू, गुलाब, मोगरा असे कांही म्हणावे."
सौ.अंजली आणि सौ.अनुराधा या दोघी भगिनी आपला वैद्यकीय व्यवसाय, घरगृहस्थी, मुलांचे संगोपन, त्यांचे शिक्षण वगैरे सगळे उत्तम प्रकारे सांभाळून आपल्या वडिलांची स्मृती जागृत ठेवण्यासाठी इतक्या धडपडत आहेत, त्यांच्या साहित्यकृती वेगवेगळ्या माध्यमांमधून जगापुढे येत रहाव्यात यासाठी त्यांचे इतके आटोकाट प्रयत्न चालले आहेत याची त्यांनी भरपूर प्रशंसा केली. त्यात त्यांना सहकार्य देणा-या त्यांच्या पतिराजांचेही कौतुक केले. "या मुलींना जेंव्हाही माहेरपणाची ओढ वाटेल तेंव्हा त्यांनी आपल्या घरी निःसंकोचपणे यावे." असे त्या म्हणाल्या. मुलींच्या प्रेमळ स्वभावाबद्दल बोलतांना "Sons are for a while, but daughters are for life! " असे एका प्रसिध्द इंग्रजी साहित्यिकाने लिहिले असल्याचेही त्यांनी सांगितले. त्या दिवशी रामनवमी असल्यामुळे मी सकाळपासूनच थोडे रामनामगुणगान ऐकत होतो. त्यामुळे या साहित्यिकाला श्रावणबाळाची किंवा प्रभू रामचंद्रांची कथा माहीत असती तर कदाचित तो म्हणाला नसता असा एक विचार माझ्या मनात चमकून गेला.

वक्त्यांची भाषणे झाल्यानंतर ते सभागृहात येऊन बसले आणि पुढला कार्यक्रम सुरू झाला. वेदांती भागवत आणि श्री. तिवारी या युगुलाने डॉ.व-हाडपांडे यांच्या एका गीतावर सुंदर नृत्य सादर केले. त्यानंतर ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर या दोघांनी कादंबरीतील अनुक्रमे उर्मिला आणि विश्वास यांचे स्वभाव, संस्कार आणि त्यांच्या मनात उठलेले तरंग दाखवणारे महत्वाचे भाग साभिनय वाचून दाखवले. कथेमध्ये थोडासा खलनायक वाटावा असा दिसणा-या विश्वासची कांहीशी लंगडी वाटणारी कां होईना पण एक जी कांही बाजू आहे, ती अविनाशने समर्थपणाने मांडली. उर्मिलेच्या पात्रातले गुंतागुतीचे भावाविष्कार ऐश्वर्याने छान रंगवले. 'या सुखांनो या' या मालिकेतली सरितावहिनींची जी सोज्ज्वळ प्रतिमा तिने प्रेक्षकांच्या काळजात कोरून ठेवली आहे तिच्याशी उर्मिलेची व्यक्तीरेखा सुसंगत अशीच आहे. ऐश्वर्याचे जे अभिनयकौशल्य आपण नाटकांतून आणि मालिकांमधून पाहतो त्यामुळे हे वाचन ती याहून अधिक प्रभावीपणे आणि सफाईने करू शकली असती असे मनात आले. माणसाची नेहमी स्वतःशीच स्पर्धा चाललेली असते किंवा तुलना होत असते असे म्हणतात ना?

मस्त शारदीय रात या आल्बममधल्या दुस-या एका गोड गीतावर वेदांती भागवतने केलेल्या नृत्याविष्काराने हा सोज्ज्वळ, सात्विक असा कार्यक्रम संपला. तत्पूर्वी श्री. प्रशांत हरकरे यांनी आभार प्रदर्शन केले आणि कार्यक्रमानंतर चहापानाने त्याची सांगता झाली. एक हृद्य तसेच नेटका सुनियोजित असा कार्यक्रम पाहण्याची आणि त्या निमित्य़ाने कांही प्रसिध्द व्यक्तींचे विचार त्यांच्या खास शैलीमध्ये ऐकण्याची संधी मला मिळाली. त्यबद्दल व-हाडपांडे कुटुंबियांचे आभार मानायलाच हवेत.

Wednesday, April 09, 2008

नववर्षदिनाबद्दल आणखी कांही

या वर्षी मुंबईच्या लोकांनी सहा एप्रिलला गुढी पाडवा साजरा केला तर नागपूरच्या लोकांसाठी तो सात एप्रिलला आला म्हणे. मुंबईलासुध्दा दरवर्षाप्रमाणे सकाळी उजाडताच गुढी न उभारता ती सुमारे दहा वाजता उभी करायची असे सांगितले गेले होते. हा फरक कशामुळे होत असेल असा प्रश्न मनात डोकावतोच ना? मुसलमानांच्या ईदबद्दल तर नेहमीच अनिश्चितता असते. ईदच्या सुटीचा दिवस आयत्या वेळी बदलला तर ईद आणि शनिवार रविवारच्या सुट्यांना जोडून रजा घेऊन चार दिवस बाहेरगांवी गेलेल्या लोकांची बरीच पंचाईत होते. इंग्रजी कॅलेंडरचे मात्र बरे असते. ठरलेल्या दिवशी मध्यरात्री ठरलेल्या वेळी बाराच्या ठोक्याला न्यू ईयरची सुरुवात होते म्हणजे होतेच.
ती सुध्दा जगभर सर्व ठिकाणी एका वेळेला होत नाहीच! आम्ही मध्यरात्री मुंबईत " हॅपी न्यू ईयर" चा जल्लोष करत असतो तेंव्हा जपानमध्ये पहाट झालेली असते तर युरोपमध्ये रात्रीच्या पार्टीची तयारी चालली असते. अमेरिकेतले लोक अजून ऑफीसात बसून आदल्या दिवसाची कामेच उरकत असतात. पृथ्वीचा आकार गोल असल्यामुळे तिचा सगळा भाग एकदम सूर्यासमोर येत नाही, थोडा थोडा भाग सूर्याच्या उजेडात येऊन तिथे दिवस होतो आणि त्याच वेळेस पलीकडच्या बाजूचा थोडा थोडा भाग काळोखात जाऊन तिथे रात्र होते यामुळे असे होते. आपापल्या देशातल्या घड्याळात सुसूत्रता आणण्यासाठी एक स्टॅंडर्ड टाईम ठरवली जाते. अमेरिका आणि रशिया यासारख्या अवाढव्य पसरलेल्या देशात तर वेगवेगळे टाईम झोन ठरवावे लागतात. अखेर ज्या विभागात जी प्रमाणित वेळ असेल तिच्याप्रमाणे ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता नवे वर्ष सुरू होते. तो नेमका क्षण ठरवला गेला असला तरी त्या क्षणी बाहेर निसर्गात कांही म्हणजे कांही विशेष घडत नसते. निदान साध्या डोळ्यांनी दिसण्यासारखे कांही नसते. नासाचे शास्त्रज्ञ त्यातही कांही अतिसूक्ष्म निरीक्षणे करून आपली घड्याळे कांही मिलीसेकंदाने मागेपुढे करून घेतात एवढेच!
इस्लामी पध्दतीत अमावास्येला गायब झालेला चंद्र आभाळात प्रत्यक्ष डोळ्यांना दिसल्यानंतरच प्रत्येक पुढील महिन्याची सुरुवात होते. हा 'ईदका चॉंद' किंवा ही 'प्रतिपच्चंद्ररेखा' अगदी पुसट असते आणि त्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर लवकरच चंद्रही अस्तंगत होतो. त्यामुळे कुठे तो दिसतो किंवा कुठे दिसत नाही. त्याच वेळी पश्चिमेच्या क्षितिजावर काळे ढग जमले तर तो दिसणे कठीणच! याचप्रमाणे वर्षाचा शेवटचा महिना संपल्यानंतर जेंव्हा चंद्रदर्शन होईल तेंव्हाच त्यांच्या नव्या वर्षाची सुरुवात होणार. त्यामुळे त्याचा सस्पेन्स अखेरपर्यंत कायम असतो.
आपले पंचांग तर अत्यंत शास्त्रशुध्द पध्दतीने अतीशय काटेकोरपणे तयार केलेले दिसते, मग त्यात सगळीकडे एका वेळी एक तिथी कां येत नाही? या प्रश्नातच त्याचे उत्तर दडलेले आहे. तिथी ठरवण्याच्या जटिल पध्दतीमुळेच ती वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या वेळी येते. दररोज रात्रीच्या बारा वाजता तारीख आणि वार बदलण्याच्या सोप्या सुटसुटीत पध्दतीची आपल्याला इतकी संवय झाली आहे की "आज इतके वाजेपर्यंतच चतुर्थी आहे, त्यानंतर पंचमी सुरू होते." असे कोणी पंचांग पाहून सांगितलेले आपण ऐकतो, त्याचा नीटसा अर्थ कळत नाही. कधी कोणत्या तिथीचा क्षय होतो आणि एकादशी तर बहुधा नेहमीच लागोपाठ दोन दिवस असते. ते सगळे कांही शास्त्रीपंडित जाणतात असे म्हणून आपण सोडून देतो. पण आपल्याला जरी ते ठरवता आले नाही तरी समजून घ्यायला तितकेसेकठीण नाही.
ज्या काळात पंचांग तयार करण्याचे शास्त्र निर्माण झाले तेंव्हा सूर्योदयापासून दिवस सुरू होत असे व त्याप्रमाणे वार बदलत असे. चंद्राच्या निरीक्षणावरून तिथी ठरवण्याची क्रिया बरीच गुंतागुंतीची आहे. आकाशात भ्रमण करत असलेला ( किंवा तसा दिसणारा) सूर्य आणि चंद्र हे दोघे अमावास्येला एकत्र असतात. त्यानंतर चंद्र सूर्यापासून दूर जातो आणि पौर्णिमेला तो सूर्याच्या समोर येतो. हे दोघेही क्षितिजापासून किती अंशाने वर किंवा खाली आहेत हे पाहून त्यातला फरक बारा अंशाने वाढला की शुक्लपक्षातली तिथी बदलते आणि त्या उलट तो बारा अंशाने कमी झाला की कृष्णपक्षातली तिथी बदलते. हे निरीक्षण त्या काळी कसे करत असतील कुणास ठाऊक? पण वर्षानुवर्षे केलेल्या सूक्ष्म निरीक्षणातून जी सूत्रे किंवा कोष्टके त्या काळात तयार केली गेली ती इतकी अचूक आहेत की तींवरून आजही पुढील काळातले पंचांग बनवले जाते. अमावास्येच्या सुमारास हे बारा अंशाचे अंतर लवकर कापले जाते आणि पौर्णिमेच्या सुमारास त्याला जरा अधिक वेळ लागतो असे दिसते. त्याचे शास्त्रीय कारण इथे देण्याची गरज नाही. पण हा बदलण्याचा क्षण दिवसा किंवा रात्री केंव्हाही येऊ शकतो. त्यामुळे आपल्या पंचांगातली तिथी रोज वेगवेगळ्या वेळी बदलत असते. सूर्योदयाच्या वेळेस जी तिथी असते ती सर्वसाधारणपणे त्या दिवसाची तिथी मानली जाते.
आपल्या देशातसुध्दा सगळ्या जागी एकाच वेळी सूर्य उगवत किंवा मावळत नाही. मुंबईच्या पूर्वेला असलेल्या कोलकात्याला नेहमीच तो मुंबईपेक्षा तासभर आधी उगवतो आणि तासभर आधी अस्तालाही जातो. बंगलोरच्या उत्तरेला असलेल्या दिल्लीला मात्र तो उन्हाळ्यात आधी उगवून उशीराने मावळतो आणि थंडीच्या दिवसात याच्या बरोबर उलट घडते, कारण दोन्ही ठिकाणचे दिवस आणि रात्र समान नसतात. अशा प्रकारे प्रत्येक गांवाच्या अक्षांश व रेखांशाप्रमाणे तिथल्या सूर्योदयाची तसेच चंद्रोदयाची वेळ निरनिराळी असते. त्यामुळे तिथी बदलण्याच्या वेळा देखील वेगळ्या येतात.
या वर्षी एक गंमतच झाली. ६ एप्रिलच्या सूर्योदयाच्या वेळी फाल्गुन अमावास्या चालू होती, ती सकाळच्या सुमारे साडेनऊ वाजता संपली आणि चैत्र शुक्ल प्रतिपदा सुरू झाली. पण ती देखील ७ एप्रिलच्या पहाटे सूर्योदय होण्याच्या आधीच संपून द्वितीया सुरू होते. म्हणजे या वेळेस प्रतिपदेचाच क्षय झाला! मग पाडवा कधी साजरा करायचा? अशा पेंचातून मार्ग काढण्याचा उपाय शास्त्रात दिला आहेच. त्याप्रमाणे ६ तारखेला अमावास्या संपल्यानंतर गुढी उभारायला मोकळीक दिली गेली. मुंबईच्या मानाने नागपूरला सूर्योदय लवकर होत असल्यामुळे ७ तारखेला त्या वेळेत प्रतिपदा संपत नव्हती, त्यामुळे ७ तारीखेलाच प्रतिपदा निश्चित होऊन त्या दिवशी गुढी पाडवा आला. खूप इंटरेस्टिंग आहे ना?

Saturday, April 05, 2008

गुढी पाडवा



हा ब्लॉग आधी दोन भागांमध्ये लिहिला होता. त्यांचे एकत्रीकरण आणि संपादन केले दि.१८-०९-२०२०
*************
गुढी पाडवा (पूर्वार्ध)

गुढीपाडव्यापासून हा ब्लॉग पुन्हा नियमितपणे सुरू करायचे ठरवले आहे. या मंगल दिनानिमित्य सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा.

आज गुढी पाडवा, नव्या वर्षाची सुरुवात करून देणारा आनंददिन, सगळे लोक उत्साहाने साजरा करत आहेत. उंच गुढ्या उभारून आणि दाराला तोरण बांधून आपल्या मनातला आनंद इतरांना दिसावा, समजावा, सर्वांच्या मनात तो पसरावा असा प्रयत्न करतात. पण हा आनंद नेमका कशासाठी आणि काय म्हणून तो व्यक्त करायला पाहिजे? असा प्रश्न चिकीत्सक वृत्तीच्या लोकांना पडणारच. कित्येक निरुत्साही लोक तसे बोलून दाखवतात सुध्दा! नव्या पिढीतली मुले तर हा नववर्षदिन मानतच नाहीत अशी खंत एका पोक्त बाईंनी व्यक्त केल्याचे वृत्त आजच्या वर्तमानपत्रात वाचले.

खरेच हा आनंद असलाच तर तो कशाचा असतो? कोणी म्हणतात की या दिवशी ब्रह्म्याने विश्वाची निर्मिती केली. म्हणजे तो सगळ्या विश्वाचाच ' बर्थडे' झाला. पण त्यात एक गोम अशी आहे की तिथी, वार, तारीख, महिना वगैरे सगळ्या गोष्टी आपण फक्त पृथ्वीवरील जीवनाच्या संदर्भात बोलू शकतो. पृथ्वीपासून थोडे दूर अंतराळात गेल्यास त्यांना कांहीही अर्थ उरत नाही कारण सूर्य तिथे कधी उगवतही नाही की मावळत नाही. तो सतत आभाळात तळपत असतो. म्हणजे एकीकडे कायमची उन्हाची अतीतीव्र अशी रखरख आणि त्याच बरोबर शून्याच्याही खूपच खाली इतके अतीशीत तपमान! मग दिवस,रात्र, हिवाळा, उन्हाळा केंव्हापासून केंव्हापर्यंत आणि कसा मोजणार? संपूर्ण विश्वाचा विचार केला तर आपली पृथ्वी धुळीच्या कणाइतकीसुध्दा नाही. तेव्हा पृथ्वीवरल्या तिथीला वैश्विक महत्व देता येणार नाही.

आणखी कोणी सांगतात की या दिवशी प्रभू रामचंद्रांचे लंकेहून अयोध्येत आगमन झाले. चौदा वर्षे वनवासात गेलेल्या आपल्या लाडक्या राजाचे पुन्हा दर्शन घडणार याचा अतीव आनंद सर्व अयोध्यावासीयांना झाला असणार. त्यातून रावणासारख्या बलाढ्य आणि दुष्ट शत्रूचे पारिपत्य करून तो येणार आहे याचे विशेष कौतुक त्यांना वाटले असणार. त्यामुळे त्यांनी आनंदोत्सव साजरा करणे अपेक्षित आहे. गुढ्या, तोरणे उभारून, कमानी वगैरे सजवून त्यांनी रामाचे स्वागत केले असणार. यानंतर रामासारखा सक्षम आणि न्यायप्रिय राजा मिळाल्यामुळे राज्यात सगळीकडे आबादीआबाद होऊन प्रजा अत्यंत सुखी होईल अशी आशाही त्यांच्या मनात निर्माण झाली असणार. त्या अपेक्षा फलद्रुप झाल्यामुळे त्याची आठवण म्हणून ते प्रजाजन दरवर्षी गुढी उभारून सण साजरा करत असतीलही. पण आता त्याचे काय प्रयोजन उरले आहे? रामावताराच्या समाप्तीबरोबरच रामराज्य देखील लयाला गेले आणि रावणापेक्षासुध्दा जास्त जुलमी व पापी राजवटी त्यानंतर इतिहासात येऊन गेल्या. तेंव्हा कधी काळी या दिवशी रामाने अयोध्येत प्रवेश केला होता या गोष्टीचे आज विशेष महत्व कोणाला वाटणार आहे? प्रत्यक्षात तसा आनंद कोणाला होतांना मला कधी दिसला नाही.

या दिवसाचे सर्वात जास्त महत्व त्या दिवसाला नसून त्याच्या आगेमागे सुरू होणाऱ्या वसंत ऋतूला आहे. त्याआधी शिशिरामध्ये कडाक्याची थंडी असते. थंड हवेच्या प्रदेशातली झाडे बर्फाने झाकून गेली असतात. इतर ठिकाणीसुध्दा बऱ्याचशा झाडांची पाने या काळात गळून पडतात. वसंत ऋतूमध्ये त्यांना नवी पालवी फुटते आणि पाहता पाहता हिरव्यागार पानांनी ती मढवली जातात. चेरीसारखी झाडे फुलांनी डंवरून येतात. ते दृष्य पाहण्यासारखे असते. ट्यूलिपच्या फुलांनी फुललेल्या बागा तर अविस्मरणीय दिसतात. आपल्याकडेही बहुतेक वनराई प्रसन्न असते. आंब्याच्या झाडाला मोहर येतो, त्याचा सुगंध चहूकडे दरवळतो आणि आणि छोट्या कैऱ्या दिसायला लागतात. रबीच्या हंगामातली पिके डोलायला लागली असतात. त्यामुळे "वसंत वनात जनात हांसे, सृष्टीदेवी जणू नाचे उल्हासे। गातात संगीत पृथ्वीचे भाट, चैत्रवैशाखाचा ऐसा हा थाट ।।" असा आनंदी आनंद असतो.
विजेचे दिवे येण्यापूर्वीच्या काळात रात्रीच्या वेळेला फारसे महत्व असायचे नाही. फक्त निशाचरांच्या दृष्टीने तिला महत्व होते. सर्वसामान्य माणसांचा दिवस सूर्योदयापासून सुरू होत असे आणि संध्याकाळपर्यंत तो संपत असे. दिवस आणि रात्र या दोघांना मिळून सुध्दा दिवस असेच म्हणतात. त्याला वेगळे नांव दिलेले नाही. चैत्राच्या नवपल्लवीपासून निसर्गाच्या चक्राची सुरुवात समजली जात असे आणि शिशिरात गळणाऱ्या पानाबरोबर ते चक्र संपत असे. यामुळे वर्षाची सुरुवात ही निसर्गाच्या नव्या ऋतुचक्राची सुरुवात असल्यामुळे उत्साहाचे वातावरण तयार होणारच. सूर्योदयाचा क्षण आपल्याला नेमका पाहता येतो तशी वसंताची नेमकी सुरुवात जाणवत नाही. चेरीब्लॉसमसारखा निसर्गाचा अद्भुत चमत्कार आपल्याला दिसत नाही. यामुळे चैत्र शुध्द प्रतिपदेचा सर्वांना समजू शकेल असा दिवस या समारंभासाठी ठरवला गेला. नववर्षाची सुरुवातही त्याच दिवशी होत असल्यामुळे तेही निमित्य झाले. फलज्योतिष्यावर विश्वास बाळगणारे लोक नववर्षात ग्रहमान कसे राहील ते पाहू लागले. नवीन वर्ष सुखात जावे असे प्रत्येकाला वाटणारच. तशी प्रार्थना करणे, तशा सदीच्छा व्यक्त करणे वगैरे ओघानेच आले. या कारणांमुळे गुढी पाडव्याचा सण लोकप्रिय झाला. . . . . . . . . . . .. . . (क्रमशः)

गुढी पाडवा (उत्तरार्ध)

गुढी पाडवा हा वसंतोत्सवाचे प्रतीक समजला जातो, पण "इकडे उन्हाने आमच्या जिवाची काहिली होते आहे आणि यांना वसंताचे आगमन कसले सुचते आहे?" असेच आज पुणेमुंबईकरांना वाटत असेल. तिथी, महिना आणि ऋतु यांच्यात ही एवढी तफावत कां दिसते आहे हे समजून घेण्यापूर्वी त्यांच्याबद्दलची थोडी माहिती असणे जरूरीचे आहे. पृथ्वी स्वतःभोवती एका दिवसात एक गिरकी घेते व सूर्याभोवती वर्षात एक फेरी मारते आणि चंद्र पृथ्वीला महिन्यात एक प्रदक्षिणा घालतो हे आता आपल्याला माहीत आहे. पण मुळात पृथ्वीच्या गिरकी घेण्याच्या कालावधीवरून दिवस ठरला, चंद्राच्या भ्रमणावरून सुमारे तीस दिवसांचा महिना आणि पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे बारा महिन्यांचे एक वर्ष ठरले गेले हे कदाचित सर्वांना ठाऊक नसते. आपण स्वतःच पृथ्वीच्या सोबत फिरत असल्यामुळे तिचा वेग आपल्या ज्ञानेंद्रियांना जाणवत नाही. विचारशक्ती आणि कल्पनाशक्तीच्या जोरावर आपल्या बुध्दीला त्याचे आकलन होते.

पूर्वीच्या काळात वेगळी परिस्थिती होती. नजरेच्या टप्याच्या पलीकडे जमीन पसरलेली दिसते, क्षितिजावर दिसणाऱ्या जागेकडे जातांना ते क्षितिजच पुढे पुढे सरकतांना दिसते. त्यामुळे जगाला कोठे अंत असणार नाही असे वाटते. भूकंपासारखे क्वचित येणारे प्रसंग सोडले तर एरवी धरती आपणा सर्वांना भक्कम आधार देते. तिच्या आधाराने आपली घरे आणि झाडे उभी असतात हे पाहिल्यावर पृथ्वी ही विपुला आणि अचला आहे अशी दृढ खात्री सर्वांना वाटत होती. तिचे असेच उल्लेख प्राचीन साहित्यात दिसतात. रोज सकाळी पूर्वेला उगवून व संपूर्ण आभाळाला पार करून संध्याकाळी पश्चिमेला मावळतांना प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणारा तेजस्वी पण आकाराने एकाद्या चेंडूएवढाच दिसणारा सूर्य विपुला पृथ्वीच्याही कोट्यवधी पटीने विशाल असेल आणि तो जागचा हलतही नसेल हे कुणालाही पटण्यासारखे नव्हते. क्वचित कोणा विद्वानांच्या मनात असे विचार आले असले तरी ते इतर विद्वज्जनांना मान्य होत नसत. जनसामान्य तर अशी कल्पनासुध्दा करू शकत नव्हते. त्यामुळे आभाळात चाललेल्या घडामोडी इथून आपल्याला कशा दिसतात याच्या आधारावरच खगोलशास्त्र निर्माण झाले, त्याचा अभ्यास होत गेला आणि अजून होत आहे. त्यात आढळलेल्या नियमित पुनरावृत्तीवरून कालगणना करण्याचे अद्भुत असे शास्त्र त्यातून तयार केले गेले.

अमावास्येला चंद्राचे अदृष्य होणे, त्यानंतर प्रतिपदेपासून कलेकलेने वाढत जात पौर्णिमेला त्याचे पूर्णबिंब दिसणे आणि त्यानंतर पुन्हा कलेकलेने लहान होत अमावास्येला गायब होणे हे चक्र सतत नियमितपणे चाललेले असते. या चक्राच्या कालावधीला ' महिना' असे नांव दिले गेले. प्रत्यक्षात तो कालावधी सुमारे साडेएकोणतीस दिवसांचा असतो. त्यामुळे आपल्या पंचांगातला महिना कधी तीस दिवसांचा तर कधी एकोणतीस दिवसांचा येतो. सुमारे ३५४ दिवसांत असे बारा महिने उलटून एक वर्ष संपते. सूर्य मावळताच आकाशात तारका दिसायला लागलेल्या असतात, पण चंद्र मात्र रोजच आदल्या दिवसाहून सुमारे दोन घटिका उशीराने उगवतो. त्यामुळे आदल्या रात्री ज्या तारका त्याच्या आजूबाजूला होत्या त्या दुसरे दिवशी त्याच्या तुलनेने पश्चिमेकडे सरकल्या असतात व आदल्या दिवशी ज्या तारका त्याच्या पूर्वेकडे होत्या त्या आता त्याच्या सोबतीला आलेल्या दिसतात. असे करता करता सत्तावीस दिवसांनंतर सुरुवातीला त्याच्यासोबत असलेल्या तारका पुन्हा त्याच्या आसपास असतात.

या सत्तावीस तारकापुंजांना अश्विनी, भरणी वगैरे नांवे दिली गेली. तसेच त्यांना नक्षत्र म्हणण्यात आले. त्याचप्रमाणे त्याच तारकांचे बारा समान आकाराचे पुंज करून त्यांना राशी असे नांव दिले गेले. या नक्षत्र व राशींच्या संदर्भात सूर्य, चंद्र, शनी, मंगळ आदी ग्रहगोलांचे निरीक्षण करणे सोयीचे झाले. सर्व सत्तावीस नक्षत्रांतून फिरून चंद्र सत्तावीस दिवसात परत आलेला असतो, त्यामुळे अमावास्येपर्यंत तो आणखी पुढे सरकतो आणि रोज नक्षत्र बदलत प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री वेगळ्या नक्षत्रात असतो. वर्षाच्या पहिल्या महिन्यात तो चित्रा नक्षत्रात असतो म्हणून तो चैत्र महिना आणि पुढल्या महिन्यात विशाखा नक्षत्रात असतो म्हणून वैशाख महिना अशी बारा महिन्यांची नांवे पडली.

सूर्याला कला नसतात, पण सतत सहा महिने दिवस आणि रात्री लहान लहान किंवा मोठ्या मोठ्या होत जातात, त्याचे एक चक्र असते, ते सुमारे ३६५ दिवसांचे असते. ते एक वर्ष धरले जाते. सूर्य आभाळात तळपत असतांना तेथे कोणत्याही चांदण्या दिसू शकत नाहीत, पण सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर अंधार पडल्यावर केलेल्या निरीक्षणावरून तो कोणत्या राशीत आहे ते समजते. एका राशीतून पूर्ण प्रवास करून पुढील राशीत जायला सूर्याला तीस ते एकतीस दिवस लागतात. त्या कालावधीलाही महिना असे नांव दिले गेले. अशा बारा महिन्यांचे चक्र सुमारे ३६५ दिवसांचे असते. जेंव्हा चंद्र आपल्या चक्रातून बारा वेळा फिरून आलेला असतो तेंव्हा ३५४ दिवस झालेले असतात, पण सूर्याला आपल्या पूर्वीच्या जागेवर यायला अजून ११ दिवस लागतात. तोपर्यंत चंद्राच्या पुढील महिन्याचे अकरा दिवस झालेले असतात.

पाश्चात्य देशात सुमारे ३६५ दिवसांचे सौर वर्ष पाळले जाते ते पूर्णपणे सूर्याच्या स्थितीवरच आधारलेले असते. त्याचा चंद्राशी कांही संबंध नसल्यामुळे कोणत्याही तारखेला पौर्णिमा, अमावास्या किंवा इतर कोणतीही तिथी येऊ शकते. दिवसांचे लहान व मोठे होत जाणे हे मात्र तारखेप्रमाणेच ठरत असल्यामुळे वर्षातला सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान दिवस ठरलेले आहेत. ते अनुक्रमे जून आणि डिसेंबर या महिन्यातच ठरलेल्या तारखेला येतात. उन्हाळा व हिवाळा या गोष्टी सूर्यप्रकाशामुळे घडत असल्यामुळे पाश्चात्य कॅलेंडरप्रमाणे त्या ठराविक महिन्यात येतात. पण भारतीय पंचांगातले महिने थोडे आगे मागे होत राहतात.

चंद्र आणि सूर्य यांच्या निरीक्षणावर आधारलेल्या कालावधीत फार जास्त अंतर पडू नये यासाठी भारतीय पध्दतीत दर तीन वर्षात एक अधिक महिना पाळला जातो. या वर्षीचा गुढी पाडवा सहा एप्रिलला आला असला तरी पुढील वर्षी तो याच तारखेला येणार नाही. ज्या वर्षात अधिक मास नसतो त्या वर्षानंतर तो त्या तारखेच्या सुमारे दहा दिवस आधी येतो आणि जर त्या वर्षात अधिकमास असेल त्यानंतरच्या वर्षात तो सुमारे वीस दिवस उशीराने येतो. मागच्या वर्षी तो १८ मार्चला होता, त्यानंतर अधिकमास आल्यामुळे  या वर्षी तो ६ एप्रिलला आला आहे आणि पुढल्या वर्षी २८ मार्चला येईल.

या अनिश्चिततेमुळे पंचांगातील महिने व निसर्गातील ऋतु यात फरक येतो. दुसरी गोष्ट अशी आहे की वर्षातले सहा ऋतु मानले असले तरी प्रत्येकाचा नैसर्गिक कालावधी समानच असण्याचे कारण नाही. सर्वसाधारणपणे उन्हाळा आणि हिवाळा हे प्रमुख ऋतू जास्त काळ जाणवत राहतात आणि वसंत किंवा शरदासारखे हवानामात बदल घडवून आणणारे दिवस थोडेच असतात. भौगोलिक परिस्थितीप्रमाणे प्रत्येक जागी वेगवेगळे हवामान असते. उत्तरेकडील युरोप खंडात कडाक्याची थंडी पडत असल्यामुळे त्यांना उन्हाळा अत्यंत सुखावह वाटतो आणि उन्हाळ्याची नुसती चाहूल देणारा वसंतसुध्दा त्यांना स्वागतार्ह वाटतो. मुंबईमध्ये प्रचंड उकाड्यामुळे उन्हाळा अगदी नकोसा वाटतो आणि गुलाबी थंडीचा शिशिर ऋतूच छान वाटतो. तो संपून वसंत सुरू होताच आनंद होण्यापेक्षा येणाऱ्या उकाड्याची चाहूल जास्त अस्वस्थ करते. किनारपट्टी सोडल्यास महाराष्ट्राच्या इतर भागात मात्र वसंत ऋतू बहरलेला जाणवतो.

ऋतूनुसार सणवार ठरवतांना भारतातील वेगवेगळ्या भागांचा विचार केला जात असल्यामुळे स्थानिक हवामानाप्रमाणे त्यांना कमी अधिक महत्व मिळत जाते. उत्तरेकडील पंजाबमध्ये बैसाखी अधिक लोकप्रिय होते तर महाराष्ट्रात दसरा आणि दिवाळी. तरीही गुढी पाडव्यालासुध्दा त्याचे म्हणून महत्व आहेच!



Monday, March 03, 2008

बोलू ऐसे बोल (भाग १ ते ७)

मी हा लेख पूर्वी सात भागांमध्ये लिहिला होता. या ब्लॉगवरील लेखांची संख्या मर्यादित करण्यासाठी हे सारे भाग एकत्र करून आणि थोडे संपादन करून हा लेख पुनर्प्रकाशित केला आहे. दि. १२-०१-२०२०.
--------------------

भाग १

केयूरा न विभूषयन्ति पुरुषं माला न चंद्रोज्ज्वलाः ।
न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालंकृता मूर्धजाः ।
वाण्यैका समलङ्करोति पुरुषं या संस्कृतार्धायते ।
क्षीयंते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम् ।।

असे एक संस्कृत सुभाषित आहे. स्नान करून चंदनाचा लेप लावणे, हातात फुलांचा गजरा आणि गळ्यात चंद्रासारखी उज्ज्वल मोत्यांची माळ परिधान करणे, केसात मोराच्या पिसाचा तुरा खोवणे वगैरे शृंगारामुळे पुरुषाला खरी शोभा येत नाही. त्याचे बोलणे हे त्याचे खरे आभूषण आहे असे सुभाषितकारांनी त्यात म्हंटले आहे. आताच्या काळात सांगायचे झाले तर सूट बूट आदि "एक नूर आदमी तर दस नूर कपडा" चढवून, केसांचा कोंबडा करून, पॅरिसचे परफ्यूमचा स्प्रे घेऊन भपकेबाज केलेले व्यक्तिमत्व कदाचित प्रथमदर्शनी छाप पाडेल पण एकदा बोलणे सुरू झाले की जो माणूस बोलण्यात चतुर असेल तोच बाजी मारेल. पण हे सर्व फक्त पुरुषांसाठी झालं.

स्त्रियांची गोष्ट जरा वेगळी आहे. सौंदर्य प्रसाधन किंवा खेडवळ भाषेत नट्टा पट्टा हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचाच एक अविभाज्य भाग असतो. दोन तीन वर्षाची चिमुरडी पोर सुद्धा वारंवार आरशात पाहून स्नोव्हाईटच्या सावत्र आईप्रमाणे त्याला "सांग दर्पणा कशी मी दिसते" असे विचारत असते. स्त्रियांच्या जागतिक सौदर्य स्पर्धा होतात, वैयक्तिक पातळीवर एकमेकींशी तुलना होतच असतात. शहरात जागोजागी त्यांच्यासाठी सौंदर्यवर्धन केंद्रे (ब्यूटी पार्लर्स) असतात आणि बहुतेक जणी चेहरा सजवण्याचे आपले साहित्य नेहमीच बरोबर बाळगतात. पण यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे वाग्देवीचे वरदान त्यांना जन्मतःच मिळते. या बाबतीत तिने स्त्रीवर्गाच्या बाजूने पक्षपात केला आहे असे दिसते. कुठल्याही विषयावर किंवा कुठल्याही विषयाशिवायसुद्धा बहुतेक महिला तासनतास बोलत राहू शकतात. हे मी टीका करण्याच्या उद्देशाने लिहिलेले नाही, कौतुकाने लिहिले आहे.

खरेच मला कधी कधी त्यांचा हेवा सुद्धा वाटतो कारण माझी गोष्ट मात्र बरोबर याच्या उलट होती.  मला लहानपणी मुखस्तंभ, मुखदुर्बळ वगैरे विशेषणे मिळायची. आता लोक तोंडावर मितभाषी, अबोल म्हणतात आणि पाठीमागे शिष्ट नाहीतर तुसडा म्हणत असतील. असतो एकेकाचा स्वभाव त्याला काय करणार? पण माझ्या आईला मात्र माझी फार काळजी लागली होती. इतर मुलांसारखा कांगावा, कागाळ्या आणि आक्रस्ताळेपणा करणे सोडाच पण साधी तक्रार करण्यासाठी किंवा काय पाहिजे ते मागून घेण्यासाठीसुद्धा तोंड न उघडणाऱ्या या मुलाला निष्ठुर जग कच्चे फाडून खाईल अशी भीती तिला वाटायची. त्यामुळे मला बोलके करण्याचे तिचे प्रयत्न सतत सुरू असायचे. कधी ती मला शेजारच्या रखमाकाकूकडे एक निरोप देऊन पाठवून द्यायची. मी धांवत धांवत जाऊन "आईनं तुम्हाला गुरुवारी शेवया करायला बोलावलं आहे." असे एका दमात सांगून उड्या मारीत परत येऊन जाई. आई विचारायची, "काय रे, काकू काय म्हणाल्या?" त्यांनी कांही म्हणायच्या आतच मी परत आलो आहे हे तिला समजायचं. मग ती सांगायची, "त्यांना वेळ आहे कां ते विचार आणि त्यांचं उत्तर मला येऊन सांग."

मी अनिच्छेनेच पुन्हा एकदा जाऊन "आत्ता मी तुम्हाला सांगितलं ना की आईनं गुरुवारी बोलावलंय् म्हणून? मग तुम्हाला वेळ आहे की नाही ते आईनं विचारलंय्." असे कांही तरी तुसडेपणाने विचारायचा. त्याकडे लक्ष न देता आवाजात मोठा गोडवा आणत त्या विचारायच्या, "हा बघ मी तुझ्यासाठी वाटीत लाडू काढून आणला होता. आधी बस, तो खाऊन घे बाळा." खरं तर त्यांनी केलेला लाडू मला फार आवडायचा, पण एक कडक लाडू खायला घालून तो हळूहळू खाऊन होईपर्यंत त्या सतरा प्रश्न विचारून आमच्याकडे कोण कोण आले गेले, ते काय म्हणाले वगैरे चौकशा करणार आणि ते सगळं तिखटमीठ लावून गांवभर करणार हे ओळखून मी उत्तर द्यायचा, "काकू, माझा एक दांत हलतो आहे, त्यामुळे आज मला लाडू खाता येणार नाही, पण तुम्हाला वेळ आहे की नाही ते सांगा ना!"
माझी आई बरेच वेळा मला बाजारातून चार वस्तू घेऊन यायला पाठवायची. जातांना नीट चौकशी करून सगळं सामान आणायला बजावून सांगायची. "त्यात कसली चौकशी?" या माझ्या प्रश्नावर ती सांगायची, "अरे, यात कोणकोणचे प्रकार आहेत? त्यांच्या किंमती काय आहेत? हा माल कधी आला? नवीन माल कधी येणार आहे? वगैरे सगळं विचारून, पाहून घेऊन, नंतर आपल्याला काय पाहिजे ते सांगायचं असतं, नाहीतर ते लोक कांहीही आपल्या गळ्यात बांधतात." अर्थातच त्या काळी आजच्यासारखी लेबले लावून पॅकबंद माल विकायला ठेवण्याची पद्धत नव्हती. मी आज्ञाधारकपणे चार वस्तूंची नांवे आणि चार प्रश्न लक्षात ठेवून घेत असे. त्या वयात स्मरणशक्ती जरा बरी होती, त्यामुळे आतासारखी चिठोऱ्यावर काही लिहून न्यायची गरज पडायची नाही. बहुतेक वेळी मी आणलेले सामान बरोबरच असे. त्यातूनही कधी गुळाचा दर्जा जरा कमी असला तर, "राहू दे, आपण आमटी भाजीत घालून संपवून टाकू." आणि तो जास्तच महागडा व उच्च दर्जाचा असेल तर, "या संकष्टीला आपण मोदकांचा नैवेद्य करू" असे कांहीतरी आई पुटपुटे, पण मला कांही बोलायची नाही कारण मी लगेच ते निमित्त करून "आपल्याला कांही तो बाजार बिजार जमत नाही." असे म्हणून मोकळा होऊन जाईन ही भीती होती, आणि मला बाजारात पाठवण्यामागे बाजारातून वस्तू आणायचा तिचा मूळ हेतू नसायचाच.

क्वचित कधी मी एकादा अगदीच टाकाऊ आणि निरुपयोगी पदार्थ आणलाच तर ती कांही न बोलता मला त्या दुकानात घेऊन जायची आणि दुकानदाराला सांगायची, "तुम्ही बहुधा चुकून कांही वेगळाच पदार्थ आज पाठवला आहे हो. अगदी समजा की या मुलानं वेगळं कांही तरी मागितलं तरी आम्ही नेहमी कुठलं सामान घेतो ते तर तुम्हाला माहीतच आहे ना? तुमच्याकडे काय आज पहिल्यांदा सामान घेतोय्?" दुकानदार निमूटपणे तो पदार्थ बदलून द्यायचा. येता येता मी म्हंटलं, "आई पण?" माझे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच ती विचारायची, "यात त्याची कांही चूक नाही असंच तुला म्हणायचंय ना? अरे मला ते माहीत आहे आणि त्यालाही हे माहीत आहे. त्यालाच माल बदलून द्यायला आपण सांगितलं असतं तर त्यानं उगीच नखरे दाखवले असते, वेळ घालवला असता आणि उपकाराचं ओझं आपल्या डोक्यावर चढवलं असतं. तसलं कांही झालं नाही, आपल्याला पाहिजे ती गोष्ट मिळाली आणि आपण त्याचंही कांही नुकसान केलेलें नाही. मग झालं तर. आपण काय बोलतो यापेक्षा सुद्धा त्यामागचा उद्देश आणि त्याचे परिणाम महत्वाचे असतात." आईने दिलेली हीच शिकवण तीस चाळीस वर्षानंतर एका पंचतारांकित हॉटेलामधील वातानुकूलित सभागृहात एका आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त व्यवस्थापन तज्ञाच्या तोंडून ऐकायला मिळाली तेंव्हा मलाच मनांत हंसू आलं.

असाच एक थोडासा मोठा झालेला पण बुजरा मुलगा एकदा आईने सांगितले म्हणून अनिच्छेने एका पार्टीला जायला निघाला. त्याच्या आईनं समजावलं, "जरा चार लोकात मिसळ, बहुतेक लोक क्रिकेटची मॅच किंवा पिक्चरबद्दल बोलत असतात, त्यात आपणही "हृतीकनं काय छान काम केलंय्?" नाहीतर "तेंडुलकरनं अशी सेंचुरी मारली" वगैरे ठोकून द्यायचं. तुला तर त्यातलं सगळं लेटेस्ट माहीत असतंच. आणि बायकांच्या बरोबर तर तुला कांही प्रॉब्लेमच येणार नाही, जे काय बोलायचं ते त्याच बोलतील. तू आपला "हो कां", "वा!वा!", "छान" म्हणत रहा. त्यातूनच वाटलं तर "लग्न झालं कां? किती मुलं आहेत?" वगैरे थोडी चौकशी केली की झालं." तो मुलगा "हो कां, वा!वा!, छान छान" असे घोकत घोकत पार्टीला गेला.

दारावरच त्याच्याच वयाच्या एका मुलीने त्याचे स्वागत केलं. आपल्या मैत्रिणींची वाट पहात ती एकटीच उभी होती. ओळख करून देण्यासाठी आपले आणि आपल्या आईवडिलांचं नांव त्याने सांगितल्यावर तो चांगल्या घरातला मुलगा आहे हे तिला समजले. दिसायलाही तो गोरा गोमटा होता. त्याच्याशी थोडे सूत जमले तरीही फारशी कांही हरकत नाही अशा विचारानं आपल्या मैत्रिणी येईपर्यंत त्याच्या बरोबर संभाषणाचा धागा धरून ठेवावा असे तिला वाटले. पांच दहा मिनिटं हवापाण्यावर बोलण्यात गेली. तो आपला "हं हूं वा!वा! छान" वगैरे म्हणत होता. शेवटी "तुला कांहीच बोलायचं नाही आहे का?" असे तिनेच विचारलं. तो लगेच म्हणाला, "तुझं लग्न झालंय कां?". हा भोळासांब दिसणारा मुलगा एकदम थेट मुद्यावर आला हे पाहून ती चाटच पडली. छानशी लाजून तिने खाली मुंडी घालत आपली मान नाजुकपणे हलवली. त्याने लगेच दुसरा प्रश्न विचारला, "तुला किती मुलं आहेत?". आता मात्र तिचा एकदम भडका उडाला. आपली कांही तरी चूक झाली असे त्यालाही वाटलं. तो दुसरीकडे गेला.

एक मध्यमवयीन बाई एका गृहस्थापुढे आपल्या सुखी संसाराची रटाळवाणी पोथी वाचत होती, त्या गृहस्थाने त्या मुलाला हाक मारून बोलावून घेतले आणि त्याला तिच्या ताब्यात देऊन संधी मिळताच कुणाच्या तरी हांकेला ओ देण्याचं निमित्त करून ते स्वतः तिथून सटकले. आपल्या मुलाचा अभ्यास, त्याचे खेळ, गिर्यारोहणाचा छंद, मुलीचं गाणं, नृत्यकला, चित्रकला, दोघांच्या खाण्यापिण्यातल्या आवडी निवडी, नखरे वगैरेचे त्या बाईंचे पुराण चालू होते.

कांही वेळाने त्या  मुलालाही "हं हूं वा!वा!छान" म्हणायचा कंटाळा आला. त्यानं आता प्रश्नांचा क्रम बदलून दुसरा प्रश्न आधी विचारला, "तुम्हाला किती मुलं आहेत हो?"
"म्हणजे काय? अहो दोनच ना! अभी आणि अस्मिता." तिने अभिमानाने सांगितले, "दोघंही आले आहेत ना! बघते हं मी ते कुठं आहेत ते."
असे म्हणत तिने मान थोडीशी फिरवली असेल तेवढ्यात तो दुसरा प्रश्न विचारून मोकळा झाला, "तुमचं लग्न झालंय कां हो?" त्यानंतर काय झालं असेल ते सांगायलाच नको. मी मात्र आपल्या  बोलण्यामागचा उद्देश, परिणाम वगैरे थोडे लक्षात ठेवत असल्यामुळे माझ्याकडून असा ब्रह्मघोटाळा कधी झाला नाही.

थोडे मोठे झाल्यावर एकदा मी एका मित्राकडे गेलो होतो. तो कुठे बाहेर गेला होता म्हणून मी त्याच्या येण्याची वाट पहात थांबलो होतो. त्याचा बारा तेरा वर्षांचा लाडावलेला मुलगा तिथेच टी.व्ही. पहात बसला होता. मी समोर पडलेले एक मासिक घेऊन चाळवत बसलो होतो. मध्येच तो मुलगा म्हणाला, "काका, मला जरा तो रिमोट द्या ना." मी डोळे वर करून पाहिले, आमच्या दोघांच्या मध्ये एक टेबल होते. त्यावर तो ठेवला होता. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा मासिक वाचनात गुंग झालो. तो मुलगा म्हणाला,"काका, मी तुम्हाला कांही तरी सांगितलं."
मी लगेच म्हणालो, "हो. मी ते ऐकलं."
"मग मला रिमोट देत कां नाही?"
मी म्हंटले,"असं आहे, मी आत्ता हिमालय चढत नाही आहे की समुद्रात उडी मारत नाही आहे, दाढी करत नाही आहे आणि सायकलही चालवत नाही आहे. आता मी कुठकुठल्या गोष्टी करीत नाही आहे याची कारणं सांगू? एखादी गोष्ट करण्याला कांहीतरी कारण असतं, न करण्याला ते असायची गरज नसते."
"पण मी तुम्हाला रिमोट मागितलाय ना?"
"म्हणून काय झालं? अरे, माझ्याजवळ एखादी वस्तु असेल आणि मला ती द्यावीशी वाटेल तरच मी ती देईन ना? मला एखादं तरी कारण दिसायला हवं ना?"
"पण हा रिमोट तर हा काय इथेच समोर पडला आहे."
"हो. मी पाहिला आणि म्हणूनच तुला दिला नाही. तुझ्या जागी एखादे आजोबा असते तर मी तो उचलून आदरानं त्यांना दिला असता आणि एकादा आजारी माणूस असला तर त्याला कष्ट पडू नयेत म्हणून मदत करायच्या भावनेनं दिला असता. पण तू स्वतः पाहिजे असल्यास तो सहज घेऊ शकतो आहेस हे मला दिसतय्. मग मी तुझ्यासाठी ते काम करावं असं मला कां म्हणून वाटेल? तूच सांग."
"पण माझी आई तर तिला कांहीही मागितलं की लगेच आणून देते."
"त्याला एक कारण आहे. तिनं तुला लहानाचं मोठं केलं आहे. तुला स्वतःला कांही करता येत नव्हतं तेंव्हापासून तुला लागेल ते सगळं आणून द्यायची तिला संवय लागली आहे. ते करण्यात तिला एक प्रकारचा आनंद मिळतो. पण आता तू मोठा झाला आहेस. आता तुलाच आपल्या गोष्टी आपण करायला पाहिजेत. तू मागितलंस म्हणून  तुझी आई ते लगेच देईल. पण इतर लोक ते कशाला देतील?"

आमचे हे सारे संभाषण त्याची आई बाजूच्याच स्वयंपाकघरात उभी राहून ऐकत होती. हातात एक ट्रे घेऊन बाहेर येतायेता ती पुटपुटली, "इतका मेला वाद घालण्यापेक्षा तो रिमोट देऊन टाकला असता तर काय विघडलं असतं?"
मी हंसत म्हंटलं, "खरंच हो, कांही सुद्धा बिघडलं नसतं." या वेळी त्या माउलीशी वाद घालण्याची माझी मुळीसुद्धा इच्छा नव्हती, कारण मला आपल्या मित्राची वाट पहात तिथे आणखी थोडा वेळ थांबायचे होते आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे तिने आणलेले बशीभर कांदे पोहे चवीने खायचे होते. पण तो मुलगा उठून आपल्या हाताने रिमोट उचलून घेतांना दिसला आणि माझ्या बोलण्याचा परिणाम होतांना मला पहायला मिळाला.

------------
भाग २

आमच्या बिल्डिंगमध्ये एक बाई रहायच्या, त्यांनाही असेच सरसकट सगळ्यांना हुकूम सोडायची संवय होती. कदाचित लहानपणी लागलेली ही संवय अजून गेली नव्हती. तशा त्या मनाने चांगल्या होत्या, त्यांच्या अंगी नानाविध कलागुण होते, कोणालाही कसलीही मदत करायला त्या सदैव तत्पर असायच्या. यामुळे इतर लोक त्यांची हडेलहप्पी चालवून घेत आणि प्रच्छन्नपणे त्यांची नक्कल करून टवाळी करीत. त्यांना त्याची कल्पना नसावी. एकतर त्यांचे वय आता संस्कारक्षम राहिलेले नव्हते, शिवाय त्या माझ्यापेक्षा मोठ्या होत्या त्यामुळे त्यांना कांही उपदेश करायला जायचा अधिकार मला नव्हता आणि त्यांनी तो ऐकूनही घेतला नसता. त्यामुळे त्यांच्याच वर्तनाचे प्रतिबिंब त्यांना आरशात दाखवावे असे मला वाटायचे. एकदा अचानक तशी संधी चालून आली.

त्या दिवशी कांही कारणाने मी ऑफीसला न जाता घरीच थांबलो होतो. तसे ऑफीसमध्ये कळवलेही होते. इतर कुणाला ते समजायचे कारण नव्हते. घरातल्या फोनची घंटी वाजली. या वेळी माझ्यासाठी घरी फोन येण्याची शक्यता कमीच होती. सगळे नवरे ऑफीसला गेल्यावर नोकरी न करणाऱ्या बायकांचे हितगुज सुरू होते याची मला कल्पना होतीच. मी फोन उचलून नेहमीच्या संवयीप्रमाणे "हॅलो" म्हंटले. पलीकडून हुकूम आला, "अरे, आईला बोलाव." मी ओळखीचा आवाज बरोबर ओळखला. मी ऑफीसला गेलो असणार आणि माझ्या मुलाने फोन उचलला असणार असे त्यांनी गृहीत धरले होते. आमच्या दोघांच्या आवाजात व उच्चारांमध्ये थोडे आनुवंशिक साम्य होतेच. त्यामुळे तसा समज होणे शक्य होते. तिच्याच टोनची नक्कल करीत तिच्या स्वरापेक्षा वरच्या पट्टीमध्ये मी सांगितले, "मी नाही बोलावणार." हे ऐकून तिला धक्काच बसला असणार. आपण एका लहान मुलाशीच बोलत आहोत याच भ्रमात ती अजून होती. त्याला दम भरण्याच्या उद्देशाने ती तार सप्तकात थरथरत किंचाळली, "क्कककोण आहेस रे तू आणि क्कककोणाशी बोलतो आहेस ततते तुला माहीत आहे कां?"

अत्यंत शांतपणे पण करारी आवाजात मी उत्तर दिले, "हे पहा, तू झांशीची राणी असशील नाहीतर इंग्लंडची महाराणी. पण या वेळी तरी तू फोन केला आहेस तेंव्हा तुला तो करायची गरज आहे असे मी समजतो. तेंव्हा तू नक्की कोण आहेस ते आधी सांग आणि नंतर माझी चौकशी कर." आता मात्र ती पुरती वरमली होती. नरमाईच्या सुरात म्हणाली, "मी मिसेस ..." तिचे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच मी शक्य तितक्या मुलायम आवाजात म्हंटले, "वहिनी, नमस्कार. सॉरी हं. अहो त्याचं काय झालं माहिती आहे? आत्ताच कुठल्या तरी टकल्या पप्पू की पपल्या टिक्कूचा रॉंग नंबर कॉल आला होता. तो असाच "भाईको बुलाव्" म्हणाला होता. त्यानं माझं डोकं जरा सणकलं होतं. त्यानंतर लगेच तुमचा फोन आला. मी म्हंटलं हे काय चाललं आहे? कोण मला भाईला बोलाव म्हणतो आणि लगेच कोणी आईला बोलावायला सांगते? तुम्हाला माझा राग नाही ना आला? आधीच आपलं नांव सांगितलं असतं तर हा गोंधळ झाला नसता ना. मी मिसेसला बोलावतो हं. ती स्वैपाकघरात काम करते आहे."

त्या नंतर दहा पंधरा दिवसांनी माझा मुलगा म्हणत होता, "त्या ऑंटीला काय झालंय् कोण जाणे ? मी मिसेस ... बोलतेय्. आई आहे कां घरी? तिला जरा बोलावशील कां? असं किती छान बोलायला लागलीय्?" मी मनात म्हंटलं, "गोळी बरोबर लागलेली दिसते आहे."

(क्रमशः)
-------------
भाग ३

गोड बोलत बोलत आपला उद्देश साध्य करण्यासाठी लोक बोलतांना काय काय युक्त्या लढवतात? चिंतोपंत त्याच्या चिकटपणाबद्दल प्रख्यात होते. विशेषतः आपली कुठलीही वस्तू इतर कुणाला वापरू देणे त्यांना अजीबात आवडत नसे. त्यांचे जवळच राहणारे बंडोपंत त्यांच्या बरोबर उलट स्वभावाचे होते. 'हे विश्वचि माझे घर' असे समजून त्यांचा सर्वत्र संचार असायचा, आपल्याकडील सगळ्या कांही वस्तू ते कुठल्याही गरजवंताला निस्संकोचपणे वापरायला देत. तसेच इतर कुणाचीही कुठलीही वस्तू हक्काने मागून वापरायला त्यांना मुळीच संकोच वाटत नसे.

एके दिवशी सकाळीच बंडोपंतांना स्वतःच्या घराकडून निघून आपल्या घराच्या दिशेने येत असतांना चिंतोपंतांनी खिडकीतून पाहिले. आता ही ब्याद आपल्या घरी असलेल्या सगळ्या वस्तू पाहणार आणि त्यातील कांही तरी नक्की मागून नेणार. मैत्री आणि शेजारधर्म यामुळे त्यावर आपल्याला नाही म्हणता येणार नाही या विचाराने ते चिंतातुर झाले. आज आपण त्यांना कांहीही द्यायचे नाही, त्यांनी एकादी वस्तू मागितलीच तर ती आपल्याकडे नाही किंवा कुणाला तरी आधीच दिली आहे असे सांगायचे असे त्यांनी ठरवले. कोणतीही वस्तू त्यांच्या नजरेलाच पडू नये यासाठी त्याला घरातच घुसू द्यायचे नाही या विचाराने ते लगबगीने बाहेर अंगणात आले. तिथेच पडलेले एक खुरपे हांतात घेऊन एका कोपऱ्यात जमीन उकरायला लागले. अपेक्षेप्रमाणे बंडोपंत बाहेरचे गेट उघडून अंगणात आले. त्यांनीसुद्धा चिंतोपंतांच्या हालचाली नजरेने टिपल्या असाव्या. आल्या आल्या विचारले, "काय चिंतोपंत, आज सकाळी सकाळीच बागकामाला सुरुवात केली वाटतं?"

चिंतोपंतांनी सांगितलं, "हो ना, बरेच दिवसांपासून हे काम पडून राहिलं होतं. आज विचार केला की गवत वाढले आहे आणि तण उगवले आहेत ते जरा काढून टाकावेत आणि फुलझाडांच्या खालची माती खणून थोडी भुसभुशीत करावी. अहो बाग लावायची म्हणजे काय कमी कामं असतात कां?"

बंडोपंत,"हे मात्र खरं हं. तुम्ही आहात म्हणून हे सगळं व्यवस्थित करता हो. मला पण तुमच्याकडून हे काम थोडं शिकायचंय्. आमची काय संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी म्हणतात ना त्यातली गत. अहो साधं खुरपं सुद्धा नाही बघा आमच्याकडे. खरंच तुमचं खुरपं किती छान दणकट आहे हो? त्याचा दांडा किती सुरेख आहे ना ? अशी खुरपी तर आजकाल कुठे पहायला सुद्धा मिळत नाहीत."

चिंतोपंत, "अहो म्हणून तर आम्ही हे खुरपं मुद्दाम गांवाकडच्या लोहाराकडून खास बनवून घेतलंय् आणि व्यवस्थित संभाळून ठेवलंय्. मी कधी ही ते दुसऱ्या कुणाच्या हातात देत नाही."

बंडोपंत, "पण मला मात्र तुम्ही मुळीच नाही म्हणणार नाही याची खात्री आहे. वाटलं तर अगदी तुमच्या नजरेखाली ते काळजीपूर्वक चालवीन. म्हणजे काय आधी मी फक्त दहा पंधरा मिनिटे चालवून बघेन. जमतय् असं वाटलंच तर एक दोन दिवसात मी बाजारातून मिळेल ते नवीन खुरपं आणीनच ना! आता ते तुमच्या खुरप्याइतकं चांगलं असणार नाही म्हणा, पण आपलं काम तर भागून जाईल. नाही कां?"

चिंतोपंत," अहो, आज तर मी दिवसभर माझ्या बागेत काम करणार आहे. मला मुळीसुद्धा वेळ नाही."

बंडोपंत, "पण मध्ये थोडी विश्रांति घ्यायला, चहा प्यायला तर उठाल ना? आज आमच्याकडेच पिऊ."

चिंतोपंत, "छे! छे! आज काम म्हणजे काम! चहाही इथेच बसून घेणार आणि वाटलं तर जेवणसुद्धा!"

बंडोपंत, "थोडं फिरायला जाणार असाल. झालंच तर भाजी आणायची असेल, वाण्याकडचं सामान आणायला जाणार असालच ना?"

चिंतोपंत, "आज कांही म्हणजे कांही नाही. मी सगळं सामान कालच आणून ठेवलंय् आणि इथेच मोकळ्या हवेत काम केल्यावर पुन्हा बाहेर मुद्दाम फिरायला जायची काय गरज आहे?"

बंडोपंत, "म्हणजे आज दिवसभरात तुम्ही कुठेही जाणार नाही, इथेच बसून काम करीत राहणार हे अगदी नक्की तर?"

चिंतोपंत, "नक्की म्हणजे काय अगदी काळ्या दगडावरची रेघ समजा."

बंडोपंत, "अहो त्याचं काय आहे की मला थोडं स्टेशनपर्यंत जाऊन यायचं होतं. तसं ते अंतर जरा लांबच आहे, कसं जावं ते कांही समजत नव्हतं. तुम्हाला विचारावं तर वाटायचं उगाच तुमचा खोळंबा व्हायचा. आता तुम्हाला कुठं जायचंच नाही म्हंटल्यावर हे मात्र फारच चांगलं झालं हं. तेंव्हा थोड्या वेळासाठी तुमची ही सायकल वापरायला घेऊ ना?"

----------
भाग ४

माणसाने कसे बोलावे यावर "सत्यम् ब्रूयात् प्रियम् ब्रूयात् न ब्रूयात् सत्यमप्रियम् । प्रियम् च नानृतम् ब्रूयात् एवं वदति पंडिताः ।" असे एक संस्कृत सुभाषित आहे. त्याप्रमाणे माणसाने खरे बोलावे आणि लोकांना रुचेल असे बोलावे. कटु सत्य सांगू नये आणि खोटेही बोलू नये. पण अनेक वेळा अशी परिस्थिती येते की हा उपदेश पूर्णपणे पाळणे केवळ अशक्य आहे असे वाटते.

आमच्या देशपांड्यांचा आप्तेष्ट आणि मित्रपरिवार इतका मोठा आहे की एका लग्नसराईच्या महिन्या दीड महिन्यात त्यांना १५-२० निमंत्रणे आली. आता इतक्या सगळ्या जागी कसे काय जाणार ? राजाभाऊंच्या सचिनचे लग्न तर दूर भिवंडीला होते. एरवी त्यांचे आपसांत फारसे जाणे येणेही नव्हते. त्यामुळे देशपांड्यांनी या लग्नाला जायचा कंटाळा केला आणि त्या ऐवजी शिवाजी मंहिरात एक झकास मराठी नाटक पाहून रविवारची सुटी सत्कारणी लावली. जोशीबुवांनीसुध्दा नेमके तेच केले.

त्यानंतर दोनतीन दिवसांनी देशपांड्यांना रस्त्यात कुठेतरी कुलकर्णी भेटले. ते तर सचिनचे सख्खे मामा. स्पष्टपणे खरे बोलून उगाच त्यांना दुखवायला नको म्हणून देशपांड्यांनी सांगून दिले, "अहो, मिसेसला एकदम थंडी वाजून जोरात ताप भरला आणि डॉक्टरकडे न्यावं लागलं. त्यामुळे आम्हाला तुमच्या सचिनच्या लग्नाला यायला कांही जमलं नाही." योगायोगाने कांही कामानिमित्त मिसेस देशपांड्यांचे मिसेस कुलकर्ण्याशी टेलीफोनवर बोलणे झाले. त्यात त्यांनी मिस्टर देशपांडे अचानक टूरवर गेल्याचे निमित्त सांगितले. हे क्षुल्लक संभाषण एकमेकांना सांगावे असं दोन्ही पतिपत्नींना वाटले नाही.

त्यानंतर सातआठ दिवसांनी पाटलांच्या गिरीशच्या लग्नात दोन्ही दांपत्ये भेटली. मिसेस कुलकर्ण्यांनी मिस्टर देशपांड्यांना त्यांचा प्रवास कसा झाला असे विचारले तर मिस्टर कुलकर्ण्यांनी मिसेस देशपांड्यांच्या नाजुक प्रकृतीची विचारपूस केली. दोघेही गोंधळलेल्या स्थितीत असतांनाच जोशी मंडळी तेथे आली. जोशीबुवांना कुणासमोर काय बोलावे याचा पोच तसा कमीच. आज तर त्यांच्या अंगात सत्यवादी हरिश्चंद्राचा संचार झाला होता. त्यांनीच सुरुवात केली, "हा हॉल किती छान आहे नाही? नाही तर आपल्या त्या कंजूस राजाभाऊंनी कुठलं आडगांवातलं कार्यालय शोधून काढलं होतं? नाहीतरी असल्या खडूस लोकांच्या घरच्या कार्याला कोण जातंय् म्हणा? आम्ही तर मस्तपैकी एक मराठी नाटक पाहिलं." एवढ्यावर न थांबता देशपांड्यांचेकडे अंगुलीनिर्देश करीत त्यांनी बॉम्बस्फोट केला."हे लोकसुध्दा तिथंच आलेले."

अर्थातच कुलकर्ण्यांनी रुद्रावतार धारण करून सर्वांनाच धारेवर धरले. केवळ त्यांना दुखवू नये म्हणून देशपांडे खोटं बोलले आणि गोत्यात आले. तर स्पष्टपणे खरे बोलल्यामुळे जोशांची खरडपट्टी झाली. म्हणजे दोन्ही पर्याय चुकीचेच. मग माणसालं करावं तरी काय?

 हे नाट्य घडत असतांनाच गोडबोल्यांनी एन्ट्री घेतली, "अरे वा! कुलकर्णी, देशपांडे आणि जोशी एकत्र! अलभ्य लाभ!" पण कुणीच टाळी देण्याच्या मूडमध्ये नव्हते. जोशांनी खंवचटपणेच विचारलं, "सचिनच्या लग्नाला तुम्ही गेलाच असाल ना?"
"सचिन म्हणजे आपल्या राजाभाऊंचा ना? अहो राजाभाऊ म्हणजे अगदी राजा माणूस बरं. एवढा मोठा माणूस, पण कणभरसुध्दा आढ्यता नाही हो त्यांच्या वागण्यात! त्यांनी आठवणीनं प्रत्यक्ष फोन करून आम्हाला अगत्यानं बोलावलं तेंव्हा अगदी धन्य वाटलं हो! लग्नात तर त्यांनी धमाल उडवून दिली असणार. किती हौशी स्वभाव आहे ना त्यांचा? खूप लोक आले असतील ना? कोण कोण आले होते हो?"
"श्रीकाका, सुधामावशी, करुणा, कविता ..." सौ.कुलकर्णी सांगायला लागल्या. पण त्यांना मध्येच अडवत जोशांनी शेरा मारला,"म्हणजे गोडबोले, तुम्ही नव्हतातच!"
"अहो आम्ही नक्की जाणारच होतो. म्हटलं त्यानिमित्तानं सगळ्यांच्या भेटीगाठी होतील. मुख्य म्हणजे तात्यासाहेबांची भेट होईल. अहो भेट काय म्हणतोय मी ? दर्शन घडेल म्हणायला हवं. अहो काय त्यांची विद्वत्ता? वाक्यावाक्यागणिक संस्कृत श्लोक, ज्ञानेश्वरांच्या ओव्या, तुकारामाचे अभंग आणखी कुठकुठली इंग्रजी कोटेशन्स यांची नुसती लयलूट! आता त्यांचं वय ऐंशीच्या घरात तरी असेलच. पण स्मरणशक्ती अगदी तल्लख बघा..." गोडबोले सांगत होते.
 त्यांच्या गाडीला ब्रेक लावत जोशांनी विचारलं, "अहो,सचिनच्या लग्नाला तुम्ही का गेला नव्हता ते सांगत होतात. त्याचं काय झालं?"
"त्यांना नसेल सांगायचं तर जाऊ द्या ना." देशपांड्यानाही या विषयातून बाहेर पडायचंच होतं.
"छे हो! ते एवढ्या आपलेपणानं विचारताहेत तर सांगायलाच हवं. आपल्या लोकांबरोबर कशाला लपवाछपवी करायची?" गोडबोल्यांनी उत्तर दिलं."तसं तुम्हा लोकांना सगळं माहीतच आहे म्हणा. आपलं मुंबईचं काय लाईफ आहे? नुसतं ऑफीसला जाऊन परत घरी येण्यातच अख्खा दिवस संपून रात्र होते. त्याशिवाय घरी, सोसायटीमध्ये आणि ऑफीसात किती प्रकारच्या इतर एक्टिव्हिटीज् सतत सुरू असतात त्यालाही वेळ द्यावा लागतो. शिवाय येणारे जाणरे, पाहुणे रावळे असतात..."
 "पण सचिनचं लग्न मुद्दाम रविवारी ठेवलं होतं, तुमच्या राजाभाऊंनी." जोशांनी शब्दात पकडायचा प्रयत्न केला.
 "मी तेच तर सांगत होतो. इतर दिवस कसे पहाता पहाता निघून जातात, त्यामुळे रविवारी करायच्या कामांची ही मोठी यादी तयार होते. कशाची दुरुस्ती, कुठली चौकशी, कसलं बुकिंग, कोणची खरेदी वगैरे वगैरे. त्यशिवाय लग्नं, मुंजी, बारशी, वाढदिवस, सत्कार किंवा निरोप समारंभ वगैरे कांही ना कांही कार्यक्रम होतच असतात. रविवार तरी अगदी मोकळा कधी असतो?" गोडबोले.
"मागच्या रविवारी त्यातला कुठला प्रॉब्लेम आला?" जोशांची चिकाटी वाखाणण्याजोगी होती.
"छे हो, प्रॉब्लेम कसला आलाय्? हे सगळं आपण आपल्याच हौसेनं करतो आणि त्यातून आपल्यालाच कांही ना कांही मिळत असतं. मग उगाच त्याला प्रॉब्लेम कशाला म्हणायचं? आता कुठल्या दिवशी काय काय करायचं ठरवलं होतं, त्यातलं किती झालं नि किती राहून गेलं हे कुठवर लक्षात ठेवायचं हो? त्यापेक्षा आज काय करायचं ते जास्त महत्वाचं. म्हणून दुसरी सगळी कामं बाजूला ठेऊन आज इथंच यायचंच असं ठरवलं. अहो त्यामुळे सगळ्यांच्या भेटी होतात. आणि इथल्या वातावरणातच किती चैतन्य भरलंय्? त्यातून एक प्रकारची एनर्जी मिळते असं वाटतं ना? खरंच तुम्ही लोक कुठला ज्यूस घेणार? ऑरेंज, ग्रेप्स का पाईनॅपल? फॉर ए चेंज टोमॅटो ट्राय करणार? मी वेटरला पाठवून देतो हं." असं म्हणत गोडबोले अंतर्धान पावले.
कुणीतरी लाऊडस्पीकरवर गाणं लावलं होतं, "बोला, अमृत बोला, शुभसमयाला गोड गोड बोला"
--------------------

भाग ५

आपण वरील भागांमध्ये व्यक्तिगत आयुष्यामध्ये बोलण्याचे कांही नमूने पाहिले. आता थोडेसे व्यावसायिक व सामाजिक जीवनातील बोलणे पाहू. हल्ली अनेक वेळा आपल्या घरातील दूरध्वनीची किंवा खिशातील भ्रमणध्वनीची घंटी वेळी अवेळी किणकिणते. "आत्ता या वेळी कुणाला आपली आठवण झाली?" असे म्हणत चडफडत आपण तो कानाला लावतो आणि त्यातून अतिशय मुलायम स्वरात कोणीतरी बोलते, "मी अमक्या अमक्या बँकेतून सौदामिनी बोलते आहे आपण मिस्टर तमुकच ना?"
 मनात थोडेसे विरघळलेले असलो तरी आवाजात शक्य तेवढा तुटकपणा आणीत आपण म्हणतो. "हो, पण आपलं काय काम आहे?"
"त्याचं असं आहे की आमच्या बँकेनं एक खास योजना आंखली आहे आणि त्यांनी काढलेल्या भाग्यवान विजेत्यांच्या यादीत तुमचं नांव निघालंय्. मग तुम्ही त्या योजनेत सहभागी होणार ना?" 'भाग्यवान' हा शब्द ऐकून आपल्या तोंडाला थोडं पाणी सुटलेलं असतं. आपला आवाज थोडा सौम्य करीत आपण विचारतो,"कसली नवीन योजना आहे?"
"आम्ही तुम्हाला एक नवीन क्रेडिट कार्ड द्यायचं ठरवलं आहे. ते वापरून आपण अमुक, तमुक, तमुक, तमुक, इतक्या गोष्टी सोयिस्कररीत्या करू शकाल. तुम्ही नुसतं हो म्हंटलंत की लगेच आमचा माणूस तुमच्याकडे एक कागद घेऊन येईल. तुम्हाला फक्त त्यावर एक सही करायची आहे. बाकी सगळं कांही तो भरेल. तुम्ही कुठं बरं राहता?"
आपला आवाज पुन्हा ताठर होतो, "अहो मला क्रेडिट कार्डांचे सगळे फायदे माहीत आहेत. मी कधीपासूनचा ती वापरतो आहे. आणखीन एका कार्डाची मला गरज नाही."
"हो कां? कुठली कार्डे? पण बघा, आमचं कार्ड की नाही अगदी नवीन निघालंय्. या पूर्वी कुणीही कधीही दिल्या नसतील इतक्या सुविधा आम्ही देणार आहोत. शिवाय अगदी मोफत आपला विमा सुद्धा उतरवून देणार आहोत. एकदा वापरून तर बघा. पुन्हा तुम्ही कुठल्याही जुन्या कार्डाकडे कधी वळणार नाही."
"मला नको आहे बाई तुझं कार्ड. एकदा सांगितलेलं समजत नाही का ?" आता आपण वैतागून एकेरीवर येऊन दम देतो.
आपली मनःशांति यत्किंचितही ढळू न देता ती म्हणते, "कांही हरकत नाही. निदान तुम्हाला खर्चासाठी कांही पैसै हवेच असतील ना? आमची बँक तुम्हाला अगदी सवलतीच्या दराने कर्ज देईल. तुम्ही ते तुम्हाला पाहिजे तितक्या काळात हप्त्या हप्त्याने परत फेडू शकता. तुमच्या नांवाने एक लाख रुपयांचा चेक लिहून तयार ठेवला आहे. तुम्ही फक्त हो म्हंटलंत की लगेच ...." पुढची रेकॉर्ड आणखी एकदा ऐकवली जाते.
"अहो मला खरच सध्या पैसे बैसे नको आहेत. ते लागतील तेंव्हा मी येईन तुमच्याच बँकेकडे येईन बरं. आणखी कांही?" आपण काकुळतीने म्हणतो.
आपल्या आवाजातील मार्दव जराही कमी होऊ न देता ती शेवटचा प्रयत्न करते, "बरं बाई. पण ही स्कीम कांही तेंव्हापर्यंत चालणार आहे की नाही कुणास ठाऊक. त्यापेक्षा आताच कर्ज घेऊन ठेवलेत तर ते तुम्हाला कधीही उपयोगी पडेल. नाही कां?"

आपण वैतागून कांहीही उत्तर न देता रिसीव्हर खाली ठेवतो. आता या मुलीला खरंच आपल्याबद्दल कांही आपुलकी कुठे वाटत असते? तिचा आणि आपला कसलाही संबंध नसतो. तिचे खरे नांवसुद्धा आपल्याला कधी कळत नाही. इतकेच नव्हे तर तिचा त्या बँकेशीही कांही संबंध नसतो. ती एखाद्या कॉल सेंटरवर काम करीत असते आणि तिला मिळालेले दूरध्वनिक्रमांक फिरवून त्यावर प्रत्येकाशी तेच ते गळेपडूपणाचे बोलत असते. ही 'साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी' पण तिचा 'बोलविता धनि दुसराची'असतो. तिला फक्त तसे गोड बोलण्याबद्दलच पगार मिळत असतो. तिने दाखवलेल्या आमिषांना किंवा दिलेल्या आश्वासनांना काडीइतका अर्थ नसतो हे त्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना कालांतराने समजते.

यावरून एक खूप जुना किस्सा आठवला. एक नवा भाट एका राजाच्या दरबारात गेला. त्याने तोंड फाटेपर्यंत त्या राजाची स्तुतिसुमने भरभरून गाऊन त्याला प्रसन्न केले. राजाने त्याला सांगितले, "वा! आज आम्ही तुझ्यावर खूष झालो आहोत. उद्या तू कोषाध्यक्षाकडून हजार मोहरा घेऊन जा." सगळे दरबारी लोक त्यावर गालातल्या गालात हंसले. आपल्या कवित्वाच्या प्रभावावर तो भाट भलताच खूष झाला. दुसऱ्या दिवशी मिळणार असलेल्या हजार मोहरांमधून आपण काय काय घ्यायचे याची शेख महंमदी स्वप्ने पहात त्याने ती रात्र कशीबशी घालवली. दुसरे दिवशी सकाळीच तो कोषाध्यक्षाकडे जाऊन पोचला. कोषाध्यक्षाने सरळ कानांवर हांत ठेवले. तो भाट कोषाध्यक्षाची तक्रार घेऊन चिडून आरडाओरड करीत पुन्हा राजदरबारात गेला. राजाने विचारले, "काय झाले?" त्याने तक्रारीच्या सुरात सांगितले, "महाराज, तुम्ही देऊ केलेले बक्षिस हा तुमचा माणूस मला देत नाही आहे."
महाराज म्हणाले, "मी कधी तुला बक्षिस देऊ केले होते? नीट आठवून पहा. मी फक्त तुला एवढेच सांगितले होते की उद्या तू कोषाध्यक्षाकडून हजार मोहरा घेऊन जा. तू हजार शब्द उच्चारून मला खूष केलंस, मी दोन वाक्ये बोलून तुला खूष केलं. मी तर तुझं काव्य लगेच विसरूनसुद्धा गेलो होतो तरी तू रात्रभर खुषीत होतास ना! मग फिटान् फिट झाली तर. आता तू जाऊ शकतोस."

टेलीफोनवर आजकाल आणखी एका प्रकारचे मंजुळ स्वर वाढत्या संख्येने ऐकू येऊ लागले आहेत. कोठल्याही मोठ्या संस्थेच्या मुख्य कार्यालयाला फोन लावला की लगेच, "अमक्या अमक्या स्थानावर आपले स्वागत आहे." एवढेच गोड आवाजात उच्चारलेले शब्द ऐकू येतात आणि सतार वाजायला लागते. कांही काळाने "आपले कुणाकडे कशा प्रकारचे काम आहे?" एवढा एक प्रश्न ऐकू येतो आणि त्याचे उत्तर देताच पुन्हा सतार वाजायला लागते. नंतर तिसरा एक आवाज कानावर येतो आणि आपण वाट चुकून भलत्याच एक्स्टेंशनवर आला असल्याची माहिती देऊन फोन बंद करतो. कांही स्थळांवर तर आपल्याला सूचनामागून सूचना मिळत राहतात. "आपल्याला हिंदीमधून माहिती पाहिजे असेल तर क्रमांक १ चे बटन दाबा, इंग्रजीमधून हवे असेल तर २ चे बटन दाबा." "आपला फोन संपूर्णपणे डेड झाला असेल तर अमुक बटन दाबा, आवाजात खरखर येत असेल तर तमुक" किंवा "आपल्याला गाडीचे आगमनाची माहिती हवी असेल तर गाडीचा क्रमांक टाईप करा, आरक्षणासंबंधी विचारणा असेल तर पीएनआरकोडचे सारे आंकडे दाबा" वगैरे वगैरे. ही सगळी माहिती जय्यत तयार ठेऊन फोन करणारे धन्य ते लोक! "आजकाल किती सुधारणा झाली आहे?", "सगळी माहिती कशी पटापट मिळायला लागली आहे?" वगैरे त्यांनी केलेली भलावण ऐकून तर आपल्या मनात जास्तच न्यूनगंड निर्माण होतो. कारण आपल्याला सजीव माणसांबरोबर संभाषण करण्याची संवय असते. आपल्याला काय पाहिजे ते तो समजून घेईल व त्याप्रमाणे योग्य ते मार्गदर्शन करेल अशी अपेक्षा असते. कदाचित अधिक कार्यक्षम अशा पण निर्जीव यंत्राला आपली काडीइतकी पर्वा करण्याची गरज नसते. त्याला जसे प्रोग्रॅम केले असेल तसे ध्वनि ते एकामागून एक काढत जाते आणि बंद होते. मानवी आवाज ऐकू आला तरी ते कोणाचेही 'बोल' नसतातच. ते असतात फक्त विशिष्ट 'ध्वनि'.

ऑफीसांमधील टेलीफोन्सचे असे यांत्रिकीकरण होण्याच्या पूर्वीची एक गोष्ट आठवते. अजूनही भारतात संपूर्ण यांत्रिकीकरण झालेले नाही. बहुतेक ठिकाणी टेलीफोन ऑपरेटर हे एक खास पद असते. अनेक ठिकाणी त्याची रिसेप्शनिस्ट वा डिस्पॅच क्लार्क यांचेबरोबर सांगड घातलेली असते. पण ते पद अजून नामशेष झालेले नाही. मधुर वाणी आणि संभाषणचातुर्य हे गुण ते काम करण्यासाठी आवश्यक समजले जातात. मी पूर्वी एक लघुकथा वाचली होती. त्यातील कथानायिका रंगाने काळी सांवळी आणि बेढब अंगाची असते. टेलीफोन ऑपरेटरची नोकरी मिळवण्यासाठी ती अनेक ठिकाणी अर्ज करते. तिच्या पात्रतेनुसार तिला ठिकठिकाणी मुलाखतीसाठी बोलावणीसुद्धा येतात. पण प्रत्येक वेळी नोकरी मिळण्यात तिचे रूप आडवे येत असते. शेवटी एका जागी ती मुलाखतीसाठी वेळेवर पोचलेली असते, पण तेथे येत असलेल्या इतर सुस्वरूप उमेदवारांना पाहून ती बाहेरच थांबते व जवळच्या एका सार्वजनिक टेलीफोन बूथवरून मुलाखत घेणाऱ्या प्रमुख व्यक्तीला फोन करून "कांही अपरिहार्य कारणाने आपल्याला यायला कदाचित थोडा उशीर होण्याची शक्यता आहे" असे आपल्या मंजुळ आवाजात व आर्जवी स्वरात सांगून याबद्दल त्यांची क्षमा मागते व तिला मुलाखतीसाठी सर्वात शेवटी बोलावण्याची विनंति करते. या वेळेस मात्र तिचा आवाज तिच्या आधी पोचलेला असल्यामुळे मुलाखत घेणाऱ्याला तो पसंत पडलेला असतो व त्यामुळे तिला ती नोकरी मिळते.
---------------------

भाग ६

देशोदेशीच्या राज्यप्रमुखांच्या भेटी होत असतात तशाच अनेकदा त्या मंत्र्यांच्या व सचिवांच्या पातळीवरही होत असतात हे आपण नेहमी वर्तमानपत्रात वाचतो, टी.व्ही. वर पाहतो. त्यांचे शब्दशः संभाषण कधीच आपल्याला ऐकायला मिळत नाही पण जो वृत्तांत वाचायला मिळतो त्यावरून एक गोष्ट निश्चितपणे लक्षात येते. ती म्हणजे जरी सर्व बोलणी मनमोकळेपणाने खेळीमेळीच्या वातावरणात झाली वगैरे लिहिले असले तरी त्या व्यक्तींना दिलखुलासपणे बोलणे फारसे शक्य नसते. त्या व्यक्ती ज्या राष्ट्राचे किंवा राज्याचे प्रतिनिधित्व करीत असतात त्याच्या धोरणांशी सुसंगत असे, त्याचे हितसंबंध जपणारे बोलणेच करणे त्यांना भाग असते. त्या व्यक्तीच्या मनात जे काय विचार किंवा भावना असतील ते सगळे उघडपणे बोलण्याची मुभा त्याला नसतेच. त्या व्यक्तीचा बोलतांनाचा चेहेरा आपल्याला दिसतो पण तिच्या बोलण्यामागील विचार तिच्या राज्यसंस्थेचा असतो.

दोन व्यापारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमधील चर्चासुद्धा सर्वसाधारणपणे तशाच स्वरूपाच्या होतात. इथेही ते लोक आपापल्या संस्थांचे प्रतिनिधित्व कसे करतात हे थोडे त्यांचे संभाषणावरून पाहू. मी एका कंपनीचा पदाधिकारी आहे आणि 'क' कंपनीच्या 'प' नावाच्या उच्च अधिकाऱ्या बरोबर माझी एक महत्वाची भेट ठरली आहे असे आपण कांही काळाकरता समजू. या भेटीमध्ये माझ्यातर्फे बोलायची तयारी मला करायची आहे.

सर्वप्रथम मी 'क' कंपनीची इत्थंभूत माहिती गोळा करीन. ती किती काळापासून कोठकोठल्या क्षेत्रात काम करते आहे, तिचेकडे असलेले मनुष्यबळ, आर्थिक सामर्थ्य, वार्षिक उलाढाल, विशेष प्राविण्य, देशविदेशातील तिचे सहभागी, आतापर्यंतचा प्रवास, भविष्यातील योजना वगैरेचा संक्षिप्त आढावा घेईन. त्यानंतर आपल्या कंपनीशी असलेले तिचे संबंध कसे आहेत ते पाहीन. कुठल्या क्षेत्रात ती आपले ग्राहक आहेत, कुठे आपण तिचे ग्राहक आहोत, कुठे आपली स्पर्धा आहे आणि कुठे कांहीच देणेघेणे नाही ते नीटपणे समजून घेईन. आतापर्यंतचा उभयतांना एकमेकांचा आलेला अनुभव जाणून घेईन, सध्या हातात असलेली कामे कुठपर्यंत आली आहेत याची तपशीलवार माहिती मिळवीन, नजिकच्या भविष्यात तसेच पुढेमागे कधीतरी आपले कसे संबंध जडण्याची किती शक्यता आहे व त्याचा आपल्या संस्थेला किती फायदा मिळण्याची शक्यता आहे याचा अंदाज घेईन.

ही मूलभूत माहिती जमवत असतांनाच गेल्या महिन्या दोन महिन्यातील महत्वाच्या तसेच मनोरंजक घटनांची नोंद घेईन. त्यात उभय कंपन्यांच्या व्यवसायाशी निगडित अशा देशांतर्गत वा आंतरराष्ट्रीय घडामोडीपासून ते 'क' कंपनी व 'प' ही व्यक्ती यांच्या बद्दल जे कांही कानावर येईल त्याचे टिपण ठेवीन. 'प' या व्यक्तीचे व्यक्तिमत्व, शिक्षण, पूर्वानुभव, त्याच्या आयुष्यातील बढती, बदली, विवाह यासारखी एखादी चांगली घटना वगैरे समजल्यास चांगलेच.

अशा प्रकारे माहिती जमवत असतांनाच तिचा कसा योग्य प्रकारे वापर करायचा यावर विचार चालूच असेल. 'प' च्या जीवनांत कांही महत्वाची चांगली घटना घडली असेल तर त्याचे बरोबर हस्तादोलन करतांनाच त्याचे हार्दिक अभिनंदन करायचे, वाटल्यास त्याची पाठ थोपटायची. गंभीर आजार, अपघात यासारखा कांही दुर्दैवी दुःखद प्रसंग येऊन गेला असल्यास माफक सहानुभूति व्यक्त करून आपल्याला शक्य असेल तेवढी मदत करायची इच्छा दाखवायची. व्यक्तिगत जीवनानंतर त्याच्या कंपनीच्या बाबतीतल्या घटनांबद्दल बोलायचे. मोठी कंपनी असेल तर हमखास कांही ना कांही बोलण्याजोगे असतेच. त्याबद्दल आपल्या सद्भावना प्रकट करायची हीच संधी असते. कोठल्या तरी क्षेत्रात तिने मिळवलेल्या देदिप्यमान यशाबद्दल अभिनंदन करण्याबरोबरच तिच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करायचे, एखाद्या ठिकाणी अपयश आले असेल तर त्याबद्दल हळहळ व्यक्त करून धीर द्यायचा, समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी सहकार्याचा हात पुढे करायचा, त्यांनी केलेल्या सहाय्याबद्दन कृतज्ञता व्यक्त करायची, त्यांच्या भावी योजना जाणून घेण्याची उत्सुकता दाखवायची, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा द्यायच्या आणि वाटलेच तर आपल्या अनुभवावरून शिकलेल्या दोन शहाणपणाच्या गोष्टी सांगत संभाव्य धोके दाखवायचे.

कसल्याच गोष्टीबद्दल कांहीच समजले नसले तरीही ती कंपनी आपल्या कंपनीपेक्षा खूप मोठी असेल तर "आमचे केवढे अहोभाग्य म्हणून आम्हाला ही संधी मिळते आहे." असे म्हणायचे आणि लहान असेल तर लहानपणाचे गुण गायचे. "आकारापेक्षा सुद्धा गुणवत्ता जास्त महत्वाची आहे नाही कां?" असे म्हणत त्यांना आपल्या कंपनीच्या मोठेपणाची जाणीव करून दिली तरी चालेल. ती कंपनी आपल्या कंपनीच्या तुल्यबल असेल तर "एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ" म्हणायचे. ती जुन्या काळापासून चालत आलेली असेल तर, "आपल्या दीर्घकालीन अनुभवाचा लाभ आम्हालाही मिळावा." अशी इच्छा प्रकट करायची आणि ती नवीन असेल तर, "नवे विचार, नव्या कल्पना, सळसळणारे चैतन्य " वगैरे आज काळाची गरज आहे असे सांगायचे.

निदान एखाद्या राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय महत्वाच्या अगदी ताज्या घटनेचा उल्लेख करून त्याचे आपल्या व त्यांच्या व्यवसायावर काय परिणाम होणार आहेत, कोणत्या नव्या संधी उपलब्ध व्हायची शक्यता आहे, कोणती आव्हाने समोर उभी राहणार आहेत, देशाचे, जगाचे व मानवजातीचे भवितव्य वगैरेवर अघळ पघळ बोलायचे. हे करतांना आपल्या शक्तीस्थानांची मोघम कल्पना द्यायची, कमजोरींचा अवाक्षराने उल्लेख होऊ द्यायचा नाही. आपले पांडित्य, हुषारी, बहुश्रुतता वगैरेची एखादी चुणुक दाखवणे एक अस्पष्टशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी पुरेशी असते. त्याचे प्रदर्शन इथे करायच्या मोहात पडायचे नाही. आपण केलेल्या पूर्वतयारीचा तर थांगपत्ता लागू नये. सगळे कसे उत्स्फूर्त आणि सहज सुचल्यासारखे वाटले पाहिजे.

ही भेट घडवून आणण्यात आपण पुढाकार घेतला असेल तर असल्या प्रास्ताविकात जास्त घोळ न घालता शक्य तो लवकर मुख्य मुद्यावर यायचे आणि त्या कंपनीने ती भेट ठरवली असेल तर गप्पांमध्ये इकडे तिकडे यथेच्छ भरकटत राहून अधिकाधिक माहिती गोळा करायची. कधीतरी कुठेतरी ती उपयोगाला येते. आपले उभयतांमधील सर्व व्यवहार सुरळीतपणे चालत असतील तर सहसा अशा भेटीची आवश्यकताच नसते. बहुधा त्यात कांही तरी गुंते झालेले असतातच. ते हळुवारपणे सोडवणे हा त्या भेटीचा मुख्य उद्देश असतो आणि ते करतांना आपल्या कंपनीचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल ते आपल्याला पहायचे असते. त्यामुळे त्यांनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल प्रशंसा करता करताच आपल्या अपेक्षा याहून अधिक असल्याचे सांगायचे आणि बिघडवलेल्या कामाबद्दल कानउघाडी करतांना आता यातून काय शिकायला हवे ते पाहू असे म्हणायचे. हातात घेतलेली कामे तत्परतेने कशी करता येतील याची चर्चा करतांना त्यांनी पूर्वी केलेल्या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त करायची.

या भेटीमध्ये त्यांच्या बाजूने कोणत्या मागण्या वा सूचना केल्या जाणार आहेत याची आगाऊ माहिती जमवणे किंवा त्याबद्दल अचूक अंदाज बांधणे अत्यंत महत्वाचे असते. त्याबद्दल आधीपासूनच आपल्या संस्थेतील संबंधित लोकांबरोबर चर्चा करून आपले धोरण निश्चित करायचे असते. ते करतांना त्यांच्या कोणत्या संभाव्य सूचना स्वीकारायच्या आणि कोणत्या मागण्या नाकारायच्या हे ही गुप्तपणे ठरवून ठेवायचे असते. सर्वात सोपी गोष्ट त्यांनी मागण्याआधीच "आम्ही आपण होऊनच असे ठरवले आहे." असे सांगून त्यांच्या बोलण्यातील हवा काढून घ्यायची. ते करतांना त्यात आपला केवढा मोठा त्याग आहे आणि त्यामुळे कोणाचे केवढे कल्याण होणार आहे ते रंगवून सांगायचे. दुसरी गोष्ट त्यांना सविस्तर सांगू द्यायची आणि "खरेच किती छान कल्पना आहे? आपल्याला तर बुवा सुचली नसती." असे म्हणत मानायची. तिसऱ्या सूचनेबद्दल "खरे तर हे फार कठिण आहे हो, पण तुमच्या शब्दाला मान देऊन आम्ही मान्य करू" असे म्हणत भाव खायचा. सर्वात महत्वाच्या चौथ्या प्रकारच्या सूचनांवर मात्र आपल्या अटी घालायच्या, देवाणघेवाणीनेच त्या अंमलात आणणे शक्य होईल असे निक्षून सांगायचे व त्यावर घासाघीस करायची.

ज्या मागण्या मान्य करायच्याच नसतील त्यातली एखादी मागणी "तुमच्या कडून कधी अशी अपेक्षाच केली नव्हती हो." असे म्हणत मोडीत काढायची. दुसऱ्या मागणीच्या अंमलबजावणीत केवढे प्रचंड धोके आहेत त्याचे विदारक दृष्य रंगवायचे. तिसरी मागणी "तशी छान कल्पना आहे, पण काय आहे की पूर्वीचा काही अनुभव नाही. उगाच कांही तरी नसता घोळ व्हायचा. त्यापेक्षा आहे तेच राहू द्यायला काय हरकत आहे?" असे म्हणत टोलवायची. आणि चौथ्या मागणीच्या बाबतीत, "तुमचे म्हणणे अगदी रास्त आहे, कोणालाही पटेल, पण काय करणार? आमचेही हांत बांधलेले असतात. इतके लोक आम्ही काय करतो हेच बघायला टपून बसलेले असतात. आपण अगदी शुद्ध हेतूने कांही केले तरी त्याचा ते विपर्यास करतात, त्यावर गोंधळ निर्माण होतात. त्यामुळे आम्हाला कांही गोष्टी मनात असून सुद्धा करता येत नाहीत बघा." वगैरे सांगत आपली असमर्थता दाखवायची.

आपले जवळ जवळ ९० टक्के संवाद आधीच ठरलेले असतात. त्यात कोणत्या वेळी कोणते दाखले द्यायचे, कोटेशन्स सांगायची, विनोद करायचे वगैरेंची यादी बनवलेली असते. इतकेच नव्हे तर विरुद्ध बाजूचेही ५० ते ६० टक्के संवाद अपेक्षित असतात. त्यातून आयत्या वेळी एखादा नवीन मुद्दा निघाला तर आपल्या एखाद्या मठ्ठ, तोतऱ्या किंवा बोलघेवड्या सहाय्यकाला त्यासंबंधी विचारायचे. मठ्ठ किंवा तोतऱ्याला तो मुद्दा समजावून सांगता सांगता विरुद्ध बाजूच्या लोकांची दमछाक होईल आणि वाचाळ माणूस "त्याचं काय आहे, खरं सांगायचं झालं तर, अशा प्रकारे विचार केला तर आणि तशा बाजूने पहायला गेलं तर" वगैरेची लांबण लावत पुरेसा वेळ खाईल तोपर्यंत आपण ती सूचना कोणच्या प्रकारात बसते ते ठरवून घ्यायचे. आणि नाहीच जमले तर, "या विषयावर असा तडकाफडकी निर्णय घेतलेलं बरं दिसणार नाही. आमच्याकडे त्यातले तज्ञ आहेत त्यांचा सल्ला घ्यायला हवा, शिवाय आणखी कुणावर काय परिणाम होईल ते जरा तपासून पहायला हवं." वगैरे सांगत एक नवीन प्रकार निर्माण करायचा.

आपण अशा प्रकारे जय्यत तयारी केलेली असली तर समोरचा माणूस कितीही टिपटॉप कपडे घालून आलेला असला, फाड फाड इंग्रजी बोलत असला किंवा मुलायम अदबशीरपणे वागत असला तरी हरकत नसते. त्याच्या व्यक्तिमत्वाचा आपल्यावर प्रभाव पाडूच द्यायचा नाही. तो आत्मस्तुती करणारा असेल तर फारच उत्तम. त्याच्या आत्मप्रौढीला हवा देत रहायचे आणि तो भरकटत बाजूला गेला की आपल्याला हव्या त्या मुद्यावर खेचून आणायचे. त्यानेही आपल्यासारखीच पूर्वतयारी केली असेल तर मात्र मुलाखतीचा खेळ छान रंगतो. निदान दोन चार बाबतीत आपले व त्यांचे हितसंबंध जुळत असतात, त्यावर एकमत होऊ शकते. ते करून "ही चर्चा अत्यंत खेळी मेळीच्या वातावरणात झाली, अनेक गैरसमज दूर झाले, कांही गोष्टींवर एकमत झाले. नव्या वाटा निर्माण झाल्या. प्रगतीचा मार्ग मोकळा झाला." वगैरे विधाने करायला आपण मोकळे.

----------------
भाग ७

आतापर्यंतची उदाहरणे पाहिल्यावर असे दिसते की व्यक्तिगत बोलणे असू दे किंवा व्यावसायिक, दोन्ही ठिकाणी कांही प्रमाणात तरी आपले संवाद आधीपासून ठरवून बोलले जातात. म्हणजे ते एक प्रकारचे नाटकच असते. भरतमुनींनी लिहिलेल्या नाट्यशास्त्रात त्यांनी सांगितलेल्या नवरसापैकी शांत, करुण, हास्य, रौद्र, आश्चर्य वगैरे निदान चार पांच रस सुद्धा नेहमी त्यात येतांना दिसतात. "हे जग हीच एक रंगभूमी आहे, इथे पात्रे प्रवेश करतात, आपापल्या भूमिका वठवतात व इथून प्रयाण करतात." अशा अर्थाचे कांही तरी विलियम शेक्सपीअरने म्हंटले आहे असे म्हणतात. त्याने ते नक्की कधी, कुठे आणि कां म्हंटले आणि कुणी ते ऐकले ते कांही माहीत नाही. पण इतके लोक सांगतात त्या अर्थी म्हंटलंच असेल. आणि ते खरेच आहे. वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या जागी आपण वेगवेगळ्या भूमिका वठवतच असतो. लहानपणी खोड्या करणारा मुलगा मोठेपणी शिस्तप्रिय बाप होतो, तसेच ऑफीसात दरारा निर्माण करणारा अधिकारी घरात अतिशय प्रेमळपणे वागतांना दिसतो. जगाच्या रंगभूमीवर आपण आपल्या भूमिका वठवत असतोच तर प्रत्यक्ष रंगमंचावर जाऊन नाटकात काम करण्यात आणखी वेगळे काय आहे? बाहेरच्या जगात आपले संवाद बहुधा आपणच ठरवतो, क्वचित कधी ते दुसरे देतात. इथे ते नाटककाराने लिहिलेले असतात. वेशभूषाकार, केशभूषाकार, रंगभूषाकार वगैरे मंडळी आपले जे सोंग रंगवतात ते आपण आपल्या परीने नाटकातील आपला भाग होईपर्यंत वठवायचे असते. आपण बाह्य रूपाने नाटकातील पात्र झालो असलो तरी आंत आपणच असतो. म्हणून तर श्रीराम लागू, दत्ता भट,  यशवंत दत्त आणि नाना पाटेकर या नटांनी साकारलेले नटसम्राट वेगवेगळे वाटतात आणि लक्षात राहतात.

सभामंचावर उभे राहून भाषण करणे ही त्या मानाने सोपी गोष्ट आहे कारण तिथे अंतर्बाह्य आपण आपणच असतो. त्यातसुद्धा भाषण, प्रवचन, व्याख्यान, कथाकथन, कवितावाचन, प्रबंधवाचन वगैरे अनेक उपप्रकार असतात. सभेचा प्रकार व विषय यांच्या अनुसार ते बदलतात, पण आपले बोल श्रोत्यांपर्यंत पोचवणे हाच त्या सर्वांचा मुख्य उद्देश असतो. आपल्या ज्ञानाचा प्रसार करणे, बरे वाईट अनुभव सांगणे, चांगली शिकवण देणे यापासून ते श्रोत्यांच्या मनावर आपली छाप पाडणे, त्यांना कांही क्रिया करण्यास उद्युक्त करणे यापर्यंत अनेक कारणासाठी हा सार्वजनिक जागी बोलण्याचा खटाटोप केला जातो.

याशिवाय व्यक्ती किंवा संस्थांचे वाढदिवस, वार्षिक सभा, स्नेहसंमेलन, कुणाचे अभिनंदन, सत्कार, निरोप देणे, श्रद्धांजली वाहणे वगैरे विविध प्रकारच्या कार्यक्रमात प्रसंगानुरूप बोलायची वेळ येते. त्या वेळी समोर बसलेले लोक पाहून त्यांना किती समजावे (वा समजू नये) हे ठरवून त्याप्रमाणे शब्दयोजना करावी लागते. एखाद्या तांत्रिक विषयावरील परिसंवाद असेल तर समोर सगळी तज्ञ मंडळी बसलेली असतात. त्यांच्यावर आपली छाप पाडण्यासाठी किचकट समीकरणे व जटिल शास्त्रीय प्रयोग त्यांच्या समोर माडून ते करतांनाच आपली तांत्रिक गुपिते मात्र ती न सांगता सुरक्षितपणे सांभाळायची असतात. त्याच विषयावर आपल्याच सहकाऱ्यांना प्रशिक्षण देत असतांना तो विषय सर्व विद्यार्थ्यांना मुळापासून समजेल अशा सोप्या भाषेत नेहमीच्या आयुष्यातील उदाहरणे देऊन सोपा करून सांगायचा असतो.

अनेक लोकांना सभेतील व्यासपीठावर उभे रहायचीच भीती वाटते. पहायला गेलो तर त्या ठिकाणी त्यांना कसला धोका असतो? ते नक्की कशाला घाबरतात? याचा विचार केला तर आपण अमक्या नटासारखे दिसण्यात देखणे नाही, आपल्याला त्याच्यासारखे ऐटबाजपणे चालता येणार नाही, तमक्या फर्ड्या वक्त्यासारखे अस्खलितपणे बोलता येणार नाही, त्यामुळे आपली फजीती होईल असे बहुतेक लोकांना वाटत असते . अशा प्रकारच्या तुलना तर दैनंदिन आयुष्यात सुद्धा होतच असतात, त्याला आपण तोंड देतोच ना? मग रंगमंचावर तरी वेगळी अपेक्षा कशाला करावी? "राजहंसाचे चालणे। भूवरी जालिया शहाणे। म्हणून काय आणिक कवणे। चालावेचि ना।।" असा परखड सवाल संत ज्ञानेश्वरांनी आठशे वर्षापूर्वी केला होता. राजहंसाने डौलदारपणे चालावे, बदकाने आपल्या संथ गतीने आणि कावळ्याने उड्या मारीत. कोणीही कुणाला हंसणार नाही. त्याच्या विपरीत कांही केले तर मात्र लोक "कौवा चला हंसकी चाल" म्हणून नांवे ठेवतील.

सगळ्या हंसांना तरी आपल्या श्रेष्ठत्वाची माहिती कुठे असते? हँन्स अँडरसन याच्या 'अग्ली डकलिंग' या सुप्रसिद्ध गोष्टीत व तीवर आधारलेल्या 'एका तळ्यात होती' या गाण्याच्या सुरुवातीला एका तळ्यात राहणाऱ्या बदकांच्या सुरेख पिलांच्या कळपात एक वेडे कुरूप पिल्लू असते. बदकांच्या इतर पिल्लांहून वेगळे दिसणारे ते भोळे पिल्लू त्यांच्यात मिसळू शकत नाही, कोणी त्याला आपल्याबरोबर खेळायला घेत नाही, त्याच्याकडे बोट दाखवून सगळे फिदी फिदी हंसत असतात यामुळे ते दुःखी कष्टी असते. न्यूनगंडाने ग्रस्त झालेले असते. पण एक दिवस पाण्यात पडलेल्या आपल्या प्रतिबिंबावर एक चोरटा कटाक्ष टाकतांना त्याला आपल्या वेगळेपणाची जाणीव होते. ते आपली मान डौलाने ताठ उभारून बघते व स्वतःच्या देखणेपणावर खूष होते, पंखांची फडफड करून त्यातील शक्ती आजमावते. त्याचा आत्मविश्वास जागा होतो आणि गोष्टीच्या शेवटी आभाळात उंचावरून उडणाऱ्या राजहंसांच्या थव्याबरोबर ते दूरदेशी उडून जाते.

ही एक रूपककथा आहे. प्रत्येक माणसाच्या अंतरंगात असे अनेक राजहंस लपलेले असतात. त्यांची त्यांना स्वतःला ओळख पटली की ते सुद्धा उंच उड्डाण करू शकतात. शांत, अबोल दिसणारी माणसे सुद्धा कधीकधी संधी मिळताच बरेच कांही मोलाचे बोल बोलून जातात.

बोलणे हा अथांग विषय आहे. त्याचे आणखी किती तरी पैलू आहेत. सगळ्याच प्रकारच्या बोलण्यांचा या ठिकाणी आढावा घेता येणार नाही. कांही ऐकलेले बोल, कांही अनुभवाचे बोल आणि कांही वाचनात आलेले किस्से मी या लेखमालिकेत गुंफले आहेत.
(समाप्त)

Sunday, March 02, 2008

दक्षिण ध्रुवावर उडी


पुण्याच्या शीतल महाजन या साहसी युवतीने १७ डिसेंबर २००६ रोजी १२००० फूट उंचीवरून आधी फ्री फॉल व त्यानंतर पॅराशूटचे सहाय्य या पद्धतीने दक्षिण ध्रुवावर उडी मारून एक गौरवास्पद जागतिक विक्रम केला. अशा प्रकारची उडी मारणारी ती जगातील पहिली महिला ठरली. या पूर्वीही १८ एप्रिल २००४ रोजी तिने हॅलिकॉप्टरमधून उत्तर ध्रुवावर उडी मारली होती. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील या मुलीने त्याआधी साधा विमानप्रवास केला नव्हता की आपल्या देशातलाच हिमालयातील बर्फाच्छादित प्रदेशसुद्धा पाहिला नव्हता. अशा तरुण वयात तिने थेट आभाळातून ध्रुवप्रदेशावर उडी मारण्याचे स्वप्न पाहिले आणि भगीरथ प्रयत्न करून ते यशस्वी रीत्या तडीस नेले, हे कर्तृत्व असामान्यच नव्हे तर अकल्पनीय आहे असे म्हणावे लागेल. अशा प्रकारचे धाडसी काम करण्यासाठी फारसे प्रशिक्षणसुद्धा तिला मिळाले नाही. पहिल्याच प्रयत्नात तिने हे यश संपादन केले. हॅट्स ऑफ टु हर.
त्या वेळी मी पुण्याला होतो. तेथील मराठी वर्तमानपत्रात ही बातमी ठळक अक्षरात छापून आली. ती वाचून सर्व वाचकांची छाती किती अभिमानाने फुलून आली हे सांगायला नको. महाराष्ट्रातील तसेच देशभरातील वर्तमानपत्रात ती कुठल्या ना कुठल्या पानांवर आली असेल. (या ठिकाणी दिलेली छायाचित्रे लोकसत्ता व डेली टेलिग्राफवरून घेतली आहेत. त्यांचे मनःपूर्वक आभार) ती वाचून इतर भारतीयांनाही आनंद झाला असेल, तिचे कौतुक वाटले असेल यात शंका नाही. पण किती लोकांपर्यंत ती पोचली असेल ते मात्र सांगता येत नाही. तिने उत्तर ध्रुवावर गाजवलेल्या पराक्रमाचा मला त्या वेळी पत्ताच लागला नव्हता. आता सुद्धा भारताबाहेरील प्रसार माध्यमांनी या बातमीला किती महत्व दिले असेल?, किती अमेरिकन वा रशियन नागरिकांनी ती वाचली असेल? त्यामुळे भारताबद्दल त्यांच्या मनात किती आदरभाव निर्माण झाला असेल? त्यामुळे सर्व जगात भारताची शान वाढली, मान उंचावली वगैरे आपण म्हणतो ते कितपत योग्य असते?
ब्रिटीश साहसवीर रॉबर्ट स्कॉट याच्या दक्षिण ध्रुवावर (त्या काळात अर्थातच पायी) जाण्याच्या मोहिमेबद्दलचे एक पुस्तक लहानपणी मी वाचले होते, त्याची आठवण झाली. या मोहिमेवर असतांना त्याने लिहिलेल्या डायरीवरून त्याला किती प्रतिकूल परिस्थितीशी झगडावे लागले, त्यात त्याचे किती वाईट हाल झाले, शेवटी तिथेच त्याचा मृत्यू झाला वगैरे वर्णने वाचून अंगावर शहारे आले होते. अतिशय बिकट प्रसंगांना सामोरे जात अत्यंत दुर्दम्य जिद्दीने मार्गक्रमण करून तो दक्षिण ध्रुवावर पोचला तेंव्हा त्याअगोदरच अमुंडसन याने तिथे फडकवलेला नॉर्वे देशाचा राष्ट्रध्वज पाहून स्कॉटच्या हृदयाचे कसे पाणी पाणी झाले त्याचे वर्णन वाचून तेंव्हा माझ्या डोळ्यातून पाणी आले होते. पण आता असे वाटते की अमुंडसनसुद्धा त्याच दिव्यामधून गेला होता. शिवाय स्कॉटला शर्यतीत हरवून त्याने त्याच्यापेक्षा मोठा पराक्रम केला होता. पण एका वाक्यात आलेला ओझरता उल्लेख सोडला तर आपल्याला त्याच्याबद्दल कांहीच माहिती नसावी? स्कॉटने सोसलेल्या हालअपेष्टा वाचून गलबलायला झाले. अमुंडसन जीवंत परत आला हे महत्वाचे आहे पण त्याने केलेल्या कष्टांबद्दल आपल्याला कांहीच कसे वाटले नाही?
यावेळीसुद्धा कांहीसा तसाच प्रकार झालेला दिसतो. शीतल महाजन आपल्या कर्तृत्वाने एकदम कीर्तीच्या उंच शिखरावर पोचली ते योग्यच आहे. त्याबद्दल यत्किंचित शंका नसावी. पण पहायला गेले तर तिथे ती एकटी नव्हती. ले.क.राजेश व ले.क.बिराजदार या भारतीय नौदलाच्या अधिका-यांनी तिच्यासोबत उडी मारून शिवाय दोन्ही बाजूने तिला धरून हवेमध्येच दक्षिण ध्रुवावरील योग्य त्या जागी बरोबर नेण्याचे काम केले. तिच्या सुरक्षिततेची काळजी घेतली. छायाचित्रकार मुस्तफा यांनीही उडी घेऊन खाली उतरतांनाची छायाचित्रे काढली. शून्याखाली अडतीस अंश तपमानात १२००० फुटावरून खाली बर्फाच्छादित प्रदेशात उतरण्याचा भीमपराक्रम या तीघांनीही केलाच, त्याशिवाय नेमून दिलेली इतर कामगिरीही केली. त्याबद्दल त्यांना पगार, टी.ए.डी.ए. वगैरे मिळाला असणार, खर्चाच्या काळजीचा डोंगर त्यांच्या डोक्यावर नव्हता वगैरेचा विचार करून सुद्धा त्यांनी केलेल्या शारीरिक कष्टांचे, मानसिक ताणाचे, दाखवलेल्या धैर्याचे व पत्करलेल्या धोक्याचे मूल्य कमी होत नाही. पण त्यांचा मात्र एखाद्या वाक्यात ओझरता उल्लेख आला न आला तेवढाच. आपण याबद्दल काय करणार म्हणा? "तेथेही कर माझे जुळती" म्हणून घ्यावे इतकेच.
------------------------------------------------------------------------------
ही गोष्ट वर्षभर जुनी आहे. तेंव्हा जमले नव्हते म्हणून आता या ब्लॉगवर टाकली आहे.

Saturday, March 01, 2008

योगायोगांचे गणित

मोंटू शाळेतून घरी आला तो एका हातात मिकी माऊसचे चित्र असलेली फूटपट्टी आणि दुस-या हातात नवीन रंगीत स्केचपेन नाचवतच. आल्या आल्या त्यानं सांगितलं, "आज की नाही शाळेत मज्जाच आली. आमच्या क्लासमधल्या दोन दोन मुलांचे बर्थडे आजच होते."
"त्यात काय एवढं? आमच्या पण वर्गात दोन मुलींचे वाढदिवस एकाच दिवशी आहेत." त्याची बहीण तो-यात म्हणाली.
"मला आठवतंय् आमच्या गणिताच्या शिकवणीच्या वर्गात सुद्धा अशी दोन मुलं होती आणि आमच्या ऑफीसात सुद्धा असे दोघेजण आहेत." बाबांना आठवण झाली.
"आणि आपल्या बिल्डिंगमधल्या त्या मिसेस खन्ना आणि मिसेस नायर, दोघींना नाही कां एकाच दिवशी बर्थडे विश करावं लागतं? एकीला केलं आणि दुसरीला नाही केलं तर मेल्या किती चडफडतात?" आईनं पुस्ती जोडली.
सगळ्यांना वाटलं, खरंच किती योगायोगाच्या गोष्टी!
"योगायोगावरून आठवण झाली."कोणीतरी म्हणालं,"आपले नाना, पुण्यश्लोक माणूस हो, एकादशीच्या दिवशी वैकुंठाला गेले."
"आणि ती रखमाकाकू एवढी कजाग, ती कशी काय शिवरात्रीला जाऊन कैलासवासी झाली कुणास ठाऊक?" कोणीतरी उद्गारलं.
"पिंकीच्या बर्थडेलाच तिच्या डॅडींना प्रमोशन मिळालं, तिला इतका अभिमान आहे त्याचा? काय कोइन्सिडेन्स नाही?"
"नाही गं, तिच्या मम्मीनं तो नवस केला होता ना? तो पूर्ण केला आणि महिन्याभरात त्याची प्रचीती आली."
कॉलेजात असतांना मी थोडे संख्याशास्त्र शिकलो होतो. म्हणालो, "खरं सांगू कां? हे असंच कांहीतरी नेहमी होत असतं. असं झालं नाही तरच आश्चर्य म्हणावं लागेल."
सगळ्यांना नवल वाटलं. "चल्, कांही तरी बाता मारू नकोस. कोणची गोष्ट कधी घडणार हे सगळे दैवी संकेत असतात बरं. असले योगायोग कांही आपोआप घडत नाहीत? तसे योग जुळून यावे लागतात."
"ठीक आहे, आता मी शक्याशक्यतेच्या शास्त्राबद्दल थोडं सांगतोच." मी सुरुवात केली."एका बाटलीत लेमनच्या आणि मॅंगोच्या अगदी तितक्याच गोळ्या मिसळून ठेवल्या आहेत, त्यातली कोणतीही एकच काढली तर ती लेमनची असायची किती शक्यता आहे?"
"त्यात काय मोठं? कोणीसुद्धा सांगेल की पन्नास टक्के म्हणून."
"बरोब्बर. आता समजा दोन गोळ्या काढल्या तर त्यातली एक लेमनची निघण्याची किती शक्यता आहे ?"
"पन्नास दुनी शंभर टक्के, किती सोपं ?"
"नाही हं, हे उत्तर चुकलं. दोन्ही गोळ्या मॅंगोच्याच निघू शकतात ना? पहिली गोळी लेमनची निघायची पन्नास टक्के शक्यता होती तशीच ती मॅंगोची निघायची पण पन्नास टक्के शक्यता होती. त्यापैकी दुसरी गोळी लेमनची निघायची शक्यता त्याच्या अर्धी होती. म्हणजेच दोन गोळ्या काढतांना त्यातील एक लेमनची गोळी निघायची शक्यता पंचवीस टक्क्यांनी वाढली. पण दोन्ही मिळून पंच्याहत्तर टक्केच झाले."
"हे मात्र खरं, शंभर टक्के कधी होणार?"
"गणितानुसार कधीच नाही. कारण तिस-या गोळीच्या वेळी टक्केवारी साडेबारा टक्क्याने वाढेल, चौथ्या गोळीला सव्वासहा टक्क्याने अशी कमी कमी प्रमाणात ती वाढत जाईल. म्हणजे शंभरातून जेवढे टक्के उरतील त्याच्या अर्ध्यानेच ती वाढत राहील. अशा प्रकारे सात गोळ्या काढल्यावर ती शक्यता नव्याण्णऊ टक्क्याहून जास्त झाली की शंभर टक्के होऊन गेले असे वाटले तर समजू. कारण याचा अर्थ शंभर वेळा प्रत्येक वेळी सात गोळ्या बरणीतून काढल्या तर त्यातल्या नव्याण्णऊ वेळा त्यात किमान एक तरी लेमनची गोळी निघणारच. प्रत्यक्षात तोपर्यंत मॅंगोच्या सगळ्या गोळ्या तरी संपून जातील नाहीतर आपला पेशन्स तरी संपेल. पण जर आपल्याकडे असंख्य गोळ्या असतील तर मात्र असंख्य प्रयत्न करून सुद्धा ती शक्यता शंभर टक्क्यावर कधीच पोचणार नाही."
"आपल्याकडे मोजक्याच गोळ्या असतील तर?"
"समजा बरणीमध्ये प्रत्येकी पांच पांच अशा दहाच गोळ्या आहेत. त्यातील पहिली गोळी मॅंगोची निघाली तर ती एकाने कमी होऊन चारच उरल्या, पण लेमनच्या पांच आहेत. यामुळे दुस-या वेळी ती निघण्याची शक्यता पन्नास टक्क्यांच्या पांच नवमांशने म्हणजे सुमारे अठ्ठावीस टक्क्याने वाढणार. तिस-या वेळी ती उरलेल्या टक्क्यांच्या पांच अष्टमांशने म्हणजे चौदा टक्क्याने वाढून ब्याण्णऊ टक्क्यांवर आणि त्यानंतर पांच सप्तमांशने वाढून अठ्ठ्याण्णऊ टक्क्यांवर जाईल. म्हणजे जवळजवळ शंभर टक्के झाले. पांचवी गोळी काढल्यानंतर मॅंगोच्या गोळ्या संपूनच जातील व यापुढे फक्त लेमनच्याच गोळ्या शिल्लक राहणार, अगदी शंभर टक्के खात्रीने."
"कोठल्याही एकाच प्रकारच्या दोन गोळ्या निघायची किती शक्यता असते?"
"पहिली गोळी कुठली कां असेना, दुसरी गोळी त्याच प्रकारची निघण्याची पन्नास टक्के शक्यता असणार आणि ती वेगळ्या प्रकारची निघाली तर तिसरी गोळी दोन्हीपैकी कुठल्या तरी एका प्रकारची असणारच याची अगदी शंभर टक्के खात्री आहे ना?"
"अरे तू योगायोगाबद्दल कांही सांगणार होतास ना, लिमलेटच्या गोळ्या काय चघळत बसला आहेस?"
"मला तेच सांगायचे आहे. आधी एक सोपे उदाहरण देऊन शक्याशक्यतेचं गणित कसं मांडतात याची थोडीशी ओळख करून दिली. आता जन्मतारखांचं पाहू.समजा एका वर्गात चाळीस मुले आहेत. ती वेगवेगळ्या चाळीस तारखांना जन्माला आली असण्याची भरपूर शक्यता आहे असे कोणालाही वाटेल कारण एका वर्षात ३६५ दिवस असतात. त्यांत चाळीस वेगवेगळे वाढदिवस साजरे करून पुन्हा तब्बल ३२५ दिवस उरतात किंवा वेगवेगळ्या ४० तारखा ९ वेळा घेऊन त्याशिवाय ५ तारखा रिकाम्या राहतात. वर्षभरातून ४० दिवस म्हणजे जेमतेम ११ टक्के झाले. दर नऊ दिवसामध्ये एकादा वाढदिवस येईल. असं असतांना एका वर्गातली दोन मुलं एका दिवशी कशाला जन्माला येतील?"
"आता जुळी असतील ती येतीलच म्हणा, पण ते सोडले तर असा योगायोग येणं दुर्मिळच असणार."
"आपण या मुलांना त्यांच्या रोल नंबरप्रमाणे क्रमांक देऊ. पहिल्या क्रमांकाच्या मुलाचा वाढदिवस असेल त्या दिवशीच इतर ३९ मुलांपैकी एकाचा वाढदिवस असण्याची शक्यता आहे. दुस-या क्रमांकाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशीसुद्धा इतर ३९ मुलांपैकी एकाचा वाढदिवस असण्याची शक्यता आहे, पण त्यापैकी पहिल्या मुलाच्या वाढदिवसाची शक्यता आधीच पाहिलेली असल्याकारणाने ३८ नव्या शक्यता निर्माण होतात. या क्रमाने पहात गेल्यास ३९, ३८, ३७, ३६ ... ३, २, १ या क्रमाने वाढत जाऊन आपल्याला एकंदरीत ७८० शक्यता मिळतील. म्हणजे कुठल्या तरी दोन मुलांचे वाढदिवस एकाच दिवशी येण्याच्या तब्बल ७८० शक्यता दरवर्षी येतील. त्यातील एक सुद्धा खरी ठरू नये?"
"हेही बरोबरच दिसतंय्. ३६५ दिवसात ७८० शक्यता म्हणजे खूप झाल्या नाही कां?"
"पण नकारार्थी विचार करणारे म्हणतील दोन वाढदिवस एका दिवशी न येण्याच्या शक्यता पाहिल्यात कां? अहो ३६५ दिवसापैकी ३९ दिवशी वाढदिवस असण्याच्या शक्यता असतील तर ३२६ दिवशी तो नसण्याची शक्यता असते त्याचे काय? अशा चाळीस शक्यतांची गोळाबेरीज केली तर ती तेरा हजारांवर जाईल त्याचं काय ?
"खरंच! कुठे तेरा हजार आणि कुठे फक्त ७८०?"
"तिथेच तर ग्यानबाची मेख आहे. आपण पुन्हा एकदा गोळ्यांचं सोपं उदाहरण पाहू या. पहिली गोळी लेमनची निघायची शक्यता पन्नास टक्के होती तशीच ती लेमनची न निघायची शक्यताही तितकीच म्हणजे पन्नास टक्के होती. पण दुसरी गोळी काढल्यावर दोन्हीपैकी एक तरी गोळी लेमनची निघण्याची शक्यता पन्नास टक्क्यावरून वाढून पंच्याहत्तर टक्के झाली पण ती सुद्धा न निघण्याची शक्यता कमी होऊन पंचवीस टक्केच उरली. तिसरी गोळी काढतांना ती निघण्याची शक्यता आणखी साडेबारा टक्क्यांनी वाढली तर ती न निघण्याची शक्यता पुन्हा अर्धी होऊन साडेबारा टक्क्यावर खाली आली. म्हणजे सुरुवातीला दोन्ही शक्यता समान होत्या, त्यातली पहिली बेरजेने वाढत गेली तर दुसरी गुणाकाराने कमी होत गेली. जेंव्हा आपण दोन किंवा अधिक शक्यतांचा विचार करतो तेंव्हा त्या अमुक किंवा तमुक असल्या तर त्यांची बेरीज होते तर अमुक आणि तमुकसुद्धा असेल तर त्यांचा गुणाकार करावा लागतो."
"हो ना! मुलांची संख्या जितकी जास्त तितक्या शक्यता वाढणारच हे पटते."
"आता आपण जन्मतारखांचं गणित मांडूया. प्रत्येक मुलाचा वाढदिवस वर्षातील ३६५ दिवसापैकी एका दिवशी असणार याचा अर्थ वर्षातील कोणत्याही दिवशी तो येण्याची शक्यता १/३६५ इतकी असते. पहिल्या क्रमांकाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशीच इतर ३९ मुलांचे वाढदिवस असण्याची शक्यता ३९/३६५ एवढी म्हणजे सुमारे १०.७ टक्के होती तर तो न येण्याची शक्यता ८९.३ टक्के होती. दुस-या क्रमांकाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी इतर ३८ मुलांचे वाढदिवस येण्याची शक्यता ३८/३६५ इतकी होती, पण पहिले १०.३ टक्के गेल्यावर उरलेल्या ८९.३ टक्क्यापैकी तिचा भाग ९.३ टक्के इतका झाला. त्यामुळे दोन्ही मिळून वीस टक्के झाले, तर न येण्याची शक्यता ऐंशी टक्क्यावर आली. असेच गणित चाळीस वेळा केल्यानंतर असे दिसते की कुठल्या तरी दोन मुलांची जन्मतारीख एकच असण्याची शक्यता सुमारे नव्वद टक्के आहे तर ती तशी नसण्याची शक्यता फक्त दहा टक्के आहे. आपण जर चाळीस मुले असलेले दहा वर्ग पाहिले तर त्यातील नऊ वर्गात एकच जन्मतारीख असलेले दोन विद्यार्थी बहुधा सांपडतील."
"अहो, इतक्या बेरजा, वजाबाक्या, गुणाकार आणि भागाकार यांची आंकडेमोड करणे किती जिकीरीचे काम आहे?"
"आहे खरं, पण संगणकाच्या सहाय्याने ते पटकन करता येते. इतकेच नव्हे तर वेगवेगळ्या संख्या घेऊन करता येते. एका ग्रुपमध्ये ५०, ५५, किंवा ६० लोक असतील तर त्यातील दोघांचा वाढदिवस एकच असण्याची शक्यता अनुक्रमे ९७, ९८.६ व ९९.४ टक्के इतकी वाढत जाते. म्हणूनच आपल्याला नेमकी एकाच जन्मतारखेला जन्माला आलेली दोन दोन माणसं अनेकदा भेटतात."
"या शक्यतांचे शंभर टक्के कोठल्या संख्येवर होणार?"
"३६५ दिवसापैकी प्रत्येक दिवशी एकेक जन्मतारीख यायची शक्यता अगदी सूक्ष्म असली तरी ती नाकारता येत नाही. ३६६ माणसांचा समूह असेल तर मात्र त्यातील निदान दोघांची जन्मतारीख एकच असण्याची शंभर टक्के खात्री देता येईल."
"आणि लहान ग्रुप असला तर?"
"फक्त दोन किंवा तीनच माणसे घेतली तर ती शक्यता एक टक्क्यापेक्षासुद्धा कमी असेल. तेंव्हा तसे झाले तर तो खराच योगायोग! पण समजा दहा किंवा पंधरा माणसे असतील तर ती बारा व पंचवीस टक्क्यावर जाईल. वीस आणि पंचवीस माणसांत ती अनुक्रमे एकेचाळीस आणि सत्तावन टक्के होईल. दोन्हींच्या मध्ये तेवीसच्या आकड्यावर दोन जन्मतारखांचा योगायोग जुळण्याची शक्यता तो न जुळण्याच्या शक्यतेला पार करून पन्नासावर जाईल. तीस माणसे जरी घेतली तरी ती शक्यता सत्तर टक्क्यांच्यावर गेलेली असते.""जीवनातील इतर घटनांबद्दल सुद्धा असेच असेल ना?"
"हो. जन्म व लग्न या गोष्टी सर्वात महत्वाच्या असतात. त्याशिवाय साखरपुडा, नोकरी लागणे, बढती, परदेशगमन वगैरेसारख्या चांगल्या घटना किंवा आजारपण, अपघात, प्रिय व्यक्तीशी ताटातूट यासारख्या वाईट घटना धरून आठ दहा तरी ठळक घटना प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. आपले आई वडील, भावंडे, मुले, मित्र, शेजारी वगैरेंच्या आयुष्यातील कांही महत्वाच्या घटना आपल्याला माहीत असतात. त्या सगळ्या मिळून तीस चाळीसावर गेल्या तर त्यातील दोन गोष्टी एकाच दिवशी घडण्याचा योगायोग आला तर आश्चर्य वाटायला नको. तसेच दसरा, दिवाळी, होळी यासारखे सणवार, १५ ऑगस्ट, २६ जानेवारीसारखे राष्ट्रीय दिवस, याशिवाय महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी असे सगळे धरून वीस पंचवीस तरी खास दिवस दरवर्षी येतात. हे दिवस निश्चित काळी येतात. फारफार तर दसरा आणि गांधी जयंती एका दिवशी येतील. तसे अपवाद सोडले तर त्यातील दोन तारखा कांही एकाच दिवशी येणार नाहीत, पण त्या दिवसांची संख्या जशी वाढेल तशी आपल्या आयुष्यातील महत्वाच्या घटना त्यातील एखाद्या दिवशी घडण्याची शक्यता सुद्धा वाढत जाते. पौर्णिमा, अमावास्या, चतुर्थी, एकादशी वगैरे तर दर महिन्याला येतच असतात आणि मंगळवार, गुरुवार व शनिवार दर आठवड्याला. गुरुपुष्यामृत योग हा स्वतःच एक योगायोग असतो पण तो ही वर्षातून दोन चार वेळा येतो. आपापल्या श्रद्धेनुसार कांही लोक त्यातील कांही दिवशी घडलेल्या घटनांची तेवढी नोंद घेतात पण इतर दिवशी घडलेल्या तत्सम घटनांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांची श्रद्धा अधिकच बळकट होते." "म्हणजे आपल्याला वाटते त्यापेक्षा अधिक प्रमाणात योगायोग येतात आणि योगायोगांची शक्यता वर्तवण्याचं सुद्धा गणित आहे तर?"
"हो. आणि ते सुद्धा दोन गोष्टी एकाच दिवशी घडण्याची शक्यता आणि त्या न घडण्याची शक्यता अशा दोन प्रकारे करून पाहता येते."
"आणि त्यांची उत्तरे सारखी आली म्हणजे ते बरोबर सुटले असेच ना?"
"अं हं, तशी दाट शक्यता असते असं म्हणावं. कारण दोन्ही जागी चुका केल्या असण्याची सुद्धा थोडी शक्यता असतेच ना?"

Friday, February 29, 2008

माझे जेवण खाणे

मधु आणि मंजुळा एक अनुरूप जोडपे. मधूला खाण्याची आवड तर मंजुळेला स्वयंपाक करण्याची. त्यामुळे दोघांचं ब-यापैकी जमायचं. पण मंजुळेला दुसरी एक आवड होती ती म्हणजे सतत गाणी गुणगुणण्याची. ती कांही मधूला आवडत नसे. त्यानं मंजुळेला एक सवलत दिली की गाण्यात खाण्याचा उल्लेख असेल तर ते गाणे त्याला चालेल.
त्यांच्या आयुष्यातला असाच एक सुटीचा दिवस उजाडतो. गोड भूपाळी म्हणत मंजुळा दिवसाची मंगलमय सुरुवात करते.
"उठा उठा हो सकळिक, वाचे स्मरावा गजमुख । ऋद्धी सिद्धीचा नायक, सुखदायक भक्तांसी ।। "
पुढचं कडवं ती गुणगुणत असते तेवढ्यात मधूला अंथरुणात चुळबुळ करतांना पाहून ती एकदम शेवटच्या कडव्यावर येते.
"कांसे पीतांबराची धटी, हाती मोदकाची वाटी। रामानंद स्मरता कंठी, तो संकटी पावतो ।।"
दारावरची बेल वाजते. ती उठून दूध घेते, तापवायला ठेवते, चहा करून आणते. मधू जागा होऊन लोळत पडलेला असतो. चहाचा कप त्याच्यापुढे धरून ती म्हणते.
"रात्रीचा समय सरुनि येत उषःकाल हा, घे रे चहा। कप भरला अति सुंदर । बशी ही किती नक्षीदार । अजून हवी का साखर, ढवळुनी पहा । घे रे चहा ।।"
चहापान आटोपल्यावर ते सकाळच्या कामांना लागतात. पेपर आल्यावर तो वाचणं सुरू होतं. थोड्या वेळानं मधूला वाटतं, आपण नुसताच पेपर काय वाचतोय्? त्याच्याबरोबर कांही नको? तो मंजुळेला हांक मारतो. हातात दुसरा कप घेऊन ती येते. आता तिचं शास्त्रीय संगीत सुरू झालेलं असतं. (राग काफी)
"कैसी ये कॉफी बनाई, बनाई, बनाई, बनाई, बनाआआई"
मधू म्हणतो "थांब. एक कप कॉफी बनाई बनाई किती वेळा सांगशील? एवढ्यानं माझं भागणार आहे काय?" तोपर्यंत तिनं हातात एक ट्रे आणलेला असतो. तो समोर ठेवीत ती अलहैया बिलावल रागात म्हणते,
"ब्रेड बटर ये, ले आयी हूँ मैं । ब्रेड बटर ये एएएए ........
ब्रेडको सेकके टोस्ट बनाय़ी, मक्खन जॅम उसे चुपडाय़ी । ये लो खाओ मोरे पिया मन भाय़ी ।
ब्रेड बटर ये एएएए....."
नाश्त्याचा कार्यक्रम झाल्यावर ती आंघोळीसाठी बाथरूममध्ये जाते. शॉवर सुरू करताच वरून जलधारा कोसळायला लागतात.
"घनघनमाला नभी दाटल्या कोसळती धारा । आता भज्यांचा घाणा तळते, करी घेउनि झारा ।
कोसळती धारा ।
गरम चहाने भरली किटली । सवे भज्यांची रास मांडली ।
मस्त मजेने फस्त करू त्या, दिन ओला न्यारा । कोसळती धारा ।"
मेघ मल्हार, मिया मल्हार वगैरे गाऊन झाल्यावर मंजुळा बाहेर येते. पॉवडर, कुंकू, नीट नेटके कपडे वगैरे करून पुन्हा स्वयंपाकघरात जाते. आता तिची अभंगवाणी सुरू होते.
"कांदा मुळा भाजी, अवघी आणू ताजी ताजी ।
काकडी आणि गाजर, किसून करू कोशिंबीर ।
हिरवी मिरची लसूण, घेऊ बारीक वाटून ।
बटाट्याच्या या काच-या, त्यांना परताव्या ब-या ।
कोबी फ्लॉवर मटार, रस्सा त्यांचा चवदार ।
पालकाची पातळभाजी, करी नवरोबाला राजी ।। कांदा मुळा..."
सगळं चिरणं, खिसणं, वाटणं, कुटणं वगैरे झाल्यावर ती गॅसकडे येते. आता ओव्या सुरू करते.
"अरे संसार संसार, गॅसवरचा कुकर । आधी येतसे प्रेशर, डाळ शिजते नंतर ।।
अरे संसार संसार, नाही भांडण तंडण । एकीकडे टाकू भाजी, दुसरीकडे वरण ।।
अरे संसार संसार, खोटा कधी म्हणू नये । पोळी लाटाच्या लाटण्या, सोटा कधी म्हणू नये ।।
अरे संसार संसार, दोन जिवांचा विचार । एकमेकांच्या सांगाती, दुधामधील साखर ।।"
सगळा स्वयंपाक तयार होतो. आज मंजुळानं खास मधूसाठी त्याच्या आवडीची कढी बनवलेली असते. ती पाहून तो आनंदाने "कढी, मार उडी" म्हणेल या कल्पनेनेच ती सुखावते. ताटे मांडून दोघे जेवायला बसतात. एक मिनीट, दोन मिनिटं, तीन मिनिटं होऊन चांगली चार मिनिटे व्हायला आली तरी इतका वेळ मंजुळा अजून कांहीच बोललेली नाही, तिने गाणंही म्हंटलं नाही हे लक्षात येऊन मधू अस्वस्थ होतो. तिला त्याचं कारण विचारतो. आता मंजुळेच्या मौनाचे बांध फुटतात. ती गाऊ लागते,
"कांही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही । जेवणाच्या ताटामध्ये तुझ्या पाहणार नाही ।।"
मधूला अजूनही कांही समजत नाही. सगळं तर सुरळीतपणेच चाललंय्. तो विचारतो, "अगं,पण कां?" मंजुळा पुढे म्हणते,
"तुझ्यासाठी कटाक्षाने आले घातले ठेचून । साजूक तुपामध्ये रे दिली फोडणी वरून ।
पहिली कढीची वाटी ना रे संपणार कां ही? कांही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही ।"
झाली गोष्ट आता मधूच्या लक्षात येते. सारवासारव करीत तो सांगतो, "अगं, मी वाटीतली गरमागरम कढी पाहिली होती. पण बोटांना चटका बसेल म्हणून चटणी कोशिंबिरीच्या चवी घेत थोडा वेळ थांबलो होतो." तो कढीचे भुरके मारायला सुरुवात करतो. एक वाटी संपते, दुसरी संपते, तिसरी संपायला येते. ते पाहून मंजुळा तृप्त होते. तिच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटतात. त्याला ऊत येऊन ओठावर शब्द येतात, "जेवणात ही कढी अशीच राहु दे । तुज भुरके घेतांना मला पाहु दे ।।
हळु बोटे चाटायचा छंद आगळा । आवडीचा त्याविण कां अर्थ वेगळा ।
ओघळ रे हातांवर, खुशाल वाहू दे । जेवणात ही कढी अशीच राहु दे ।।"
पोटभर जेवण झाल्यावर छान सुस्ती येते. दोघे वामकुक्षी घेतात. चार वाजतात.
"चार वाजले वेळ झाली, चहा करण्याची । चहा करण्याची, दुपारचा चहा करण्याची ।।"
असे म्हणत मंजुळा स्वयंपाकघरात जाते. तोंडाने भारुडे, गवळणी, जोगवा वगैरे पारंपारिक लोकगीते गुणगुणणे सुरू असते. थोड्या वेळाने कंटाळून मधू आंत जाऊन पाहतो. त्याला बघितल्यावर मंजुळा म्हणायला सुरू करते,
"चहाची किटअली, बिस्किटांचा डअबा । घेऊन मी येते थांबा । थोडा वेळ थांबा ।।
ग्लुको मोनॅको चविष्ट, खुसखुशीत मारी ।
क्रीम बिस्किटांच्या आंत व्हॅनिला स्ट्रॉबेरी ।
नव्या चवीही आणल्या, संत्रा आणि आंबा । थोडा वेळ थांबा, अगदी, थोडा वेळ थांबा ।।"
चहापान झाल्यावर दोघेही तयार दोऊन समुद्रकिना-यावर फिरायला जातात. ताज्या शुद्ध हवेबरोबरच पाणी पुरी, भेळ पुरी, पाव भाजी, दाबेली वगैरे खातात, मिक्स फ्रूट ज्यूस, ड्राय फ्रूट लस्सी पितात आणि सावकाशपणे घरी परततात. मंजुळाचे पोट गच्च भरलेले असते, आणखी कांही खाण्याची वासना तिला नसते. मधूने तर जास्तच हादडलेलें असल्याने त्यालाही इच्छा नसेल असं तिला वाटतं. पण फॉर्मॅलिटी म्हणून ती विचारून बघते. आता मधूलाही गाण्याची स्फूर्ती येते. तो गाण्यात म्हणतो,
"माझे जेवण खाणे, माझे जीवन खाणे ।
निशा असो वा दिवस असू दे । चमचमीत वा मधुर असू दे ।
भूक असो अथवा नसू दे । सततच चरत रहाणे । माझे जीवन खाणे ।।"
आता मात्र मंजुळाही कंटाळलेली असते. ती म्हणते,"ठीक आहे, दुपारचं थोडं अन्न उरलं आहे, त्याला ताजी फोडणी घालून देते. पण आता खूप उशीर झाला आहे, तुम्हाला थोडी मदत करावी लागेल." ती भैरवी सुरू करते,
"स्वैपाकघरा, याहो जरा । करि हा धरा, जपुनी सुरा ।
मी फोडणी, करिते तुम्ही । कोथिंबीर अन्, कांदा चिरा ।।"
कांदा चिरायच्या कल्पनेनंच मधूच्या डोळ्यात पाणी उभं राहतं. तो कांही म्हणायच्या आंत मंजुळा अंतरा सुरू करते,
"वस्त्रे जहाली, तंग ना । दम लागतो, चढता जिना ।
या ओळखूनी, लक्षणा । खादाडी आता, आवरा ।
उदरावरी, करुणा करा । स्वैपाकघरा, विसरू जरा ।।"

Thursday, February 28, 2008

लीड्सच्या चिप्स भाग १४ - रीसाचा बाप्तिस्मा

माझ्या २००६ या वर्षाची सुरुवात लीड्समध्ये अगदी वेगळ्या त-हेने झाली. मारिओ आणि नताशा या भारतीय जोडप्याच्या लग्नाचा पहिला वाढदिवस, त्यांच्या अपत्याचा, रीसाचा बाप्तिस्मा आणि नववर्षाचे स्वागत अशा त्रिवेणी निमित्त त्यांनी आपल्या घरीच एक छोटीशी लंच पार्टी ठेवली होती. क्रिस्टीना आणि बर्नार्ड हे एक स्थानिक वयस्कर जोडपं, ईव्हान हा चर्चमार्फत समाजकार्य करणारा युवक, मारिओचे ऑफीसमधील भारतीय सहकारी आणि त्यांचे कुटुंबीय अशी अगदी मोजकी मंडळीच होती. इथं लीड्सला आल्यापासून ख-या ब्रिटीश लोकांबरोबर गप्पा मारायची ही पहिलीच संधि मिळाली होती. बर्नार्डने बरीच वर्षे सैन्यदलात काढली होती. ते लोक कांही काळ सायप्रस व फॉकलंडलाही राहून आले होते पण तो त्याबद्दल किंवा एकंदरीतच फारसं बोलायला उत्सुक दिसला नाही. क्रिस्टीना मात्र खूपच बोलकी होती. जवळच्याच बीस्टन या गावात दोघांनीही घालवलेल्या रम्य बालपणापासून ते नुकत्याच तासाभरापूर्वी चर्चमध्ये घडलेल्या बाप्तिस्म्याच्या विधीपर्यंत अनेक विषयांवर रसभरीत भाष्य करीत तीच गप्पागोष्टींचं सूत्रसंचालन करीत होती. "हो ना"," कदाचित्"," नक्कीच" असे एक दोन शब्द बोलत बर्नार्ड मधून मधून तिला साथ देत होता.

समाजसेवेच्या निमित्ताने केलेल्या भ्रमंतीमध्ये आलेले कांही मजेदार अनुभव ईव्हानने सांगितले. तो वर्षभर बांगलादेशात राहून गेला होता त्यामुळे त्याल भारतीय उपखंडातील जीवनशैलीची थोडीफार कल्पना होती.क्रिस्टीना कुटुंबसंस्थेबद्दल खूपच भावूक होती त्यामुळे भविष्यकाळात आपल्या समाजाचं काय होणार याची तिला चिंता वाटत होती. कुणीतरी गंमतीनं म्हंटलं की आजकालच्या पालकांच्या मनात आपल्या वयात येत असलेल्या मुलांबद्दल एकच इच्छा असते की त्यांची लग्नं व्हावीत, ती ही मुलांची मुलीबरोबर आणि मुलींची मुलांबरोबर ! सगळ्या भारतीय लोकांनी जाहीर करून टाकलं की आपण बुवा मुलं मोठी व्हायच्या आत मायदेशी परतणार. इथलं वारं तिकडं पोचणारच नाही याबद्दल केवढा विश्वास ?