Saturday, April 19, 2008

लीड्सच्या चिप्स -भाग १५- हिंदू मंदिर


या मालिकेच्या सातव्या भागामध्ये गणेशोत्सवासंबंधी लिहितांना मी लीड्सच्या मंदिराचा उल्लेख केला होता. त्याबद्दल अधिक माहिती थोड्या विस्ताराने या लेखात देत आहे. लीड्सच्या आठ लाख लोकवस्तीमधील सुमारे आठ हजार हिंदूधर्मीय आहेत, पण शीख किंवा मुसलमान जसे शहराच्या विशिष्ट भागात मोठ्या संख्येने एकत्र राहतात तशा हिंदूंच्या वेगळ्या वस्त्या नाहीत. ते सर्व भागात विरळपणे विखुरलेले आहेत. ब-याच वर्षापूर्वीपासून तेथे रहात असलेल्या सधन गुजराथी व पंजाबी कुटुंबामधील दानशूर लोकांनी एकत्र येऊन येथील हाईड पार्क भागातील अलेक्झांड्रा रोडवर एक हिंदू मंदिर बांधले आहे. या भागात मुस्लिम धर्मीयांची मोठी संख्या आहे. तेथून जवळच त्यांनी बांधलेली एक भव्य मशीद सुद्धा आहे, तसेच अबूबेकर व मामूनिया ही भारतीय उपखंडातील लोकांना आवश्यक अशा खास वस्तु पुरवणारी मोठी दुकाने ही आहेत. मंदिराच्या प्रशस्त हॉलमध्ये एका बाजूला एकाला लागून एक पण वेगवेगळ्या छोट्या छोट्या गाभा-यात वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती स्थापन केल्या आहेत. त्याच छताखाली समोर शंभर दीडशे माणसे बसू शकतील एवढे सभागृह आहे. बाजूला एक छोटेसे कार्यालय व प्रवेश करण्याची खोली आहे. त्यांच्या माथ्यावर परंपरागत शिखर आहे.
श्रीगणेशजी, कार्तिकेय, अंबामाता, राधा कृष्ण, राम लक्ष्मण सीता व हनुमान यांच्या अत्यंत सुबक संगमरवरी मूर्ती इथे आहेत, तसेच पार्वतीच्या प्रतिमेसह शिवलिंग आहे. आपण कार्तिकेयाला ब्रह्मचारी समजतो पण दक्षिण भारतीय त्याची दोन अर्धांगिनीसह पूजा करतात. तशा त्य़ा इथेही कार्तिकेयासोबत आहेत. भगवान महावीराची प्रतिमा ठेऊन जैन बांधवांच्या पूजेअर्चेची सोय केली आहे. त्याशिवाय दशावतार, रामायण, महाभारतातील प्रसंग वगैरे दाखवणारी अनेक चित्रे व भित्तीशिल्पे लावून सभागृह सुशोभित केले आहे. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग या सगळ्या प्रांतातून आलेल्या भारतीयांना येथे येऊन आपापल्या आराध्य दैवतांचे दर्शन घेऊन त्यांची प्रार्थना करता येते. रोज सकाळी साग्रसंगीत पूजा व संध्याकाळी आरती केली जाते. ती मुख्यतः संस्कृत व कांही प्रमाणात हिंदी गुजराती या भाषांमध्ये होते. मुद्दाम या कामासाठी एका पंडितजीची नेमणूक केली आहे. त्यानंतर खोबरे, शेंगादाणे, बदाम, काजू, बेदाणे, केळी वगैरे प्रसाद वाटला जातो. सकाळी दहा पंधरा तर संध्याकाळी वीस पंचवीस लोक नेमाने त्या वेळी दर्शनाला येतात. सणवार असेल तर अधिक लोक मुलाबाळांसह येतात.
याशिवाय अनेक रविवारी भजन, कीर्तन, प्रवचन, व्याख्यान वगैरे ठेवतात. त्यात भाग घेणारे बहुतेक लोक स्थानिक हिंदूच असतात. कधी कधी भारतातून आलेल्या पाहुण्यांना पाचारण करतात. त्याद्वारे भारतीय संस्कृतीची, विशेषतः सणवार व चालीरीती यांची ओळख करून देण्याचे प्रयत्न सुरू असतात. बाजूलाच एका स्वतंत्र दुमजली इमारतीत दोन लहानसे हॉल आहेत. वाढदिवस, अभिनंदन, स्नेहभोजन अशासारख्या छोट्या छोट्या कार्यक्रमासाठी भारतीय वंशाचे लोक त्याचा वापर करतात. मात्र मद्यप्राशन किंवा मांसभक्षण या ठिकाणी वर्ज्य आहे. थोडी मोकळी जागा आहे. त्या जागेत दिवाळीची आतिषबाजी, होलिका दहन, रंग उडवून खेळणे वगैरे पारंपरिक हिंदू सण समारंभ एकत्र येऊन साजरे करतात. आठ हजारांपैकी जेमतेम शंभर लोक येत असतील, पण ज्यांना इच्छा व हौस आहे त्यांना या परमुलुखातसुद्धा ती भारतीय पद्धतीनुसार भागवण्याची सोय तर आहे.

No comments: