Wednesday, April 16, 2008

उर्मिला कादंबरीच्या प्रकाशनाचा सोहळा

पूर्वार्ध

रामनवमीच्या दिवशी 'दोन प्रहरी, सूर्य शिरी थांबल्यावर' झालेल्या रामजन्माच्या उत्सवात भाग घेणे कांही या वर्षी मला जमले नाही, पण कै.डॉ.वसंतराव व-हाडपांडे यांनी लिहिलेल्या 'उर्मिला' या कादंबरीच्या प्रकाशनाचा, म्हणजेच जन्माचा, सोहळा संध्याकाळी पहायला मिळाला. 'वसंत व-हाडपांडे' हे नांव मराठी साहित्याच्या विश्वात सुपरिचित आहे. एक उत्कृष्ट कवि म्हणून तर ते ख्यातनाम आहेतच; त्याशिवाय कथा, कादंबरी, चरित्रकथा, प्रबंध, समीक्षण, बालवाङ्मय अशा विविध प्रकारचे त्यांचे विपुल साहित्य प्रकाशित झाले आहे. पुरातन तसेच समकालीन साहित्यिकांच्या निवडक वाङ्मयाच्या संपादनाचे कामसुध्दा त्यांनी केले आहे. मराठी वाङ्मयकोशाच्या निर्मितीमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे.

अकस्मात झालेल्या अपघाती निधनामुळे त्यांची साहित्यक्षेत्रातील यशस्वी घोडदौड अचानकपणे थांबून गेली. त्यांचे जितके साहित्य तोपर्यंत प्रकाशित झाले आहे त्यापेक्षाही जास्त साहित्यकृती अद्याप अप्रकाशित राहिलेल्या आहेत. डॉ.सौ. अंजली कुलकर्णी आणि डॉ.सौ.अनुराधा हरकरे या त्यांच्या कन्यका अथक प्रयत्न करून त्यांचे दर्जेदार साहित्य हर त-हेने जगापुढे आणण्याचे कार्य करीत आहेत. सुरेल चाली लावून लोकप्रिय गायक गायिकांच्या आवाजात गाऊन घेतलेला त्यांच्या निवडक कवितांचा पहिला आल्बम 'मस्त शारदीय रात' या नांवाने त्यांनी काढला. ती गाणी आता सर्व आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित होत आहेत, इतकेच नव्हे तर कॉलर ट्यूनच्या रूपात मोबाईलवर उपलब्ध आहेत. अशा रीतीने ती घरोघरी पोचत आहेत. तो उपक्रम यशस्वी झाल्यानंतर उर्मिला या कादंबरीच्या प्रकाशनाचा सोहळाही त्यांनी परवा घडवून आणला.

अणुशक्तीनगरातल्या समाजकेन्द्राच्या सभागृहात हा कार्यक्रम ठेवला होता. प्रख्यात ज्येष्ठ साहित्यिक श्री.के.ज.पुरोहित - 'शांताराम', सुप्रसिध्द लेखिका डॉक्टर विजया वाड, महाराष्ट्र टाइम्सचे सहाय्यक संपादक श्री.मुकेश माचकर, ग्रंथालीचे प्रमुख श्री.दिनकर गांगल, अभिनेता श्री. अविनाश नारकर आणि अभिनेत्री सौ. ऐश्वर्या नारकर हे दापत्य आणि नवतारका नृत्यांगना वेदांती भागवत ही मंडळी मंचावर होती. डॉक्टर रत्नाकर कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत करून समारंभाची सूत्रे सौ.अनुराधा हरकरे यांच्या स्वाधीन केली. डॉ.सौ. अनुराधा आणि डॉ.सौ.अंजली या भगिनींनी हृदयाला भिडणा-या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले. १९९२ साली झालेल्या एका भीषण अपघातात त्यांचे वडील कै.डॉ.वसंतराव व-हाडपांडे, आई सौ.वसुमती आणि दोघेही डॉक्टर बंधु डॉ.राजीव व डॉ.संजय या सर्वांना एका फटक्यात काळाने ओढून नेले. काळजाला गोठवून टाकणा-या या घटनेने सर्वांनाच सुन्न करून टाकले होते. या दुःखातून पूर्णपणे बाहेर येणे केवळ अशक्य आहे. त्या आघातातून जरा सांवरल्यानंतर आपल्या बाबांच्या दर्जेदार साहित्यकृती रसिकांसमोर आणण्याचा ध्यास घेऊन अशा प्रकारे त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्याच्या कार्याची सुरुवात केली. यासाठी त्यांनी 'स्मृतिगंध प्रकाशन' ही संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या विद्यमाने त्यांनी आधी वसंतरावांच्या गीतांचा आल्बम काढला आणि परवाच्या समारंभात त्यांच्या एका अप्रकाशित कादंबरीचे प्रकाशन केले. कार्यक्रमाची ही पूर्वपीठिका ऐकतांना प्रेक्षकांचे डोळेही पाणावल्याशिवाय राहिले नाहीत.

श्री. के.ज.पुरोहित यांनी आपल्या जुन्या काळातल्या मित्राच्या या कादंबरीला प्रस्तावना लिहिली आहे. आपल्याला जे कांही सांगायचे होते ते या प्रस्तावनेत दिले आहे त्यामुळे या समारंभात आपण कांही बोलणार नाही असे त्यांनी आधी सांगितले होते, पण आयत्या वेळी चार शब्द बोलण्याची इच्छा व्यक्त करून त्यांनी कै.वसंत व-हाडपांडे यांच्या कांही आठवणी सांगितल्या. मराठी वाङ्मयकोशाच्या निर्मितीसाठी नागपूर केंद्राचे कार्य सांभाळण्यासाठी त्यांना एका तळमळीने काम करणा-या माणसाची गरज होती. सभेमध्ये उत्कृष्ट बोलणारे वक्ते खूप सापडतात पण प्रामाणिकपणे मान मोडून प्रत्यक्ष काम करणारी माणसे दुर्मिळ असतात. वसंतरावांची एकंदर वाटचाल पाहता हे काम ते उत्तम रीतीने सांभाळतील असा विश्वास त्यांना वाटला म्हणून हे काम त्यांना दिले गेले आणि त्याचे त्यांनी सोने केले. या कामात एकदा मोठा विलक्षण पेचप्रसंग निर्माण झाला होता. संकलित केलेल्या भागाचे मान्यवरांच्या पुढे सादरीकरण करायचे ठरले असतांना ते कागद ठेवलेल्या गोदामावर एका भुरट्या चोराने डाका घातला आणि तिथले सारे कागद चोरून रद्दीच्या भावात त्याची विल्हेवाट लावली. अशा वेळी चिडून किंवा खचून न जाता व-हाडपांड्यांनी अगदी कमी अवधीत ते सारे दस्तऐवज पुन्हा निर्माण करून दिले आणि वाङ्मयकोशाच्या कार्याला गति दिली.
. . .. . .. . . . . . . . . . . ... .(क्रमशः)
---------------------------------------------------------

उत्तरार्ध


'उर्मिला' ही कादंबरी उत्तम निर्मात्याच्या हातात पडली तर जुन्या 'मानिनी'सारख्या अप्रतिम चित्रपटाची निर्मिती होऊ शकेल असे एका लेखात ख्यातनाम समीक्षक डॉ.हेमंत इनामदार यांनी लिहिलेले आहे. त्या दृष्टीने पावले उचलण्याचा संयोजकांचा मानस आहे असे सांगून श्री. मुकेश माचकर यांना असलेल्या चित्रपटसमीक्षणाच्या दीर्घ अनुभवाचा लाभ मिळावा अशी प्रस्तावना त्यांच्या भाषणापूर्वी केली गेली. "साहित्य हा आपला प्रांत नाही आणि एरवी आपण अशी जुन्या शैलीतली कादंबरी कदाचित वाचलीसुध्दा नसती." असे सांगत माचकरांनी भाषणाची सुरुवात केली. " 'आजचे वृत्तपत्र आणि उद्याची रद्दी' अशा प्रकारचे केवळ तात्कालिक महत्वाच्या विषयांशी संबंधित असलेले साहित्य रोज पहायची आपल्याला संवय आहे. त्यामुळे आपण या समारंभापासून दूर राहणार होतो, पण या दोघी भगिनींकडे विलक्षण परस्वेशन पॉवर आहे, त्यांच्या आग्रहपूर्वक विनंतीला आपल्याला नकार देताच आला नाही, मात्र ही कादंबरी हांतात धरल्यानंतर ती वाचून पूर्ण करेपर्यंत सोडावीशी वाटली नाही." असे त्यांनी सांगितले. "यातल्या कथेवर आधारलेला चित्रपट तयार करतांना मात्र तो कसा तयार होत आहे यावर बारीक लक्ष ठेवा. शब्दांपलीकडलं सारं शब्दांवाचून सांगण्याची किमया ज्याच्याकडे आहे असा संवेदनशील दिग्दर्शकच या कथेला योग्य तो न्याय देऊ शकेल. चटकदार संवाद घालण्याच्या मोहापोटी तिचा विचका होणार नाही एवढे पहा." असा सल्लाही त्यांनी दिला.

ग्रंथालीचे श्री. दिनकर गांगल यांनी थोडक्यात आपल्या शुभेच्छा दिल्या. डॉ.विजया वाड यांनी या कादंबरीच्या कथेबद्दल वाचकांच्या मनातली उत्सुकता वाढेल अशा पध्दतीने तिच्याबद्दल थोडे विस्ताराने सांगितले. उर्मिला आणि विश्वास ही यातली दोन प्रमुख पात्रे आहेत. आईवडिलांच्या इच्छेखातर विश्वास उर्मिलेबरोबर विवाह करतो, पण त्याचे मन आधीच दुसरीकडे गुंतलेले असते. उर्मिला मात्र विश्वासच्या सोबतीने सुखी संसाराची रंगीत स्वप्ने घेऊन आलेली असते. असा हा प्रेमाचा त्रिकोण आहे. अपेक्षाभंगाने दुखावली गेलेली उर्मिला आक्रस्ताळेपणाने आकांडतांडव करत नाही किंवा आपलं नशीबच फुटकं असं म्हणून ढसाढसा किंवा मुळूमुळू रडतही बसत नाही. अत्यंत धीरगंभीर वृत्तीने ती शांतपणे आपल्या अस्तित्वाचा लढा देत राहते. आपल्या मार्गावर खंबीरपणे चालत राहण्याचा आत्मविश्वास तिच्याकडे असतो आणि तिला जे हवे असते ते अखेर तिला प्राप्त होते. अशी या कादंबरीची सुखांत गोष्ट आहे. यातली उर्मिलेची व्यक्तीरेखा आक्रमक नाही, पण दुबळीही नाही. आजच्या मालिकांच्या कथानकात संसारांची सारखी तोडफोड होतांना जशा प्रकारे दाखवली जात असते त्या पार्श्वभूमीवर उर्मिलेची भूमिका जास्तच सहनशील वाटेल, पण हेच तिचे वैशिष्ट्य़ आणि बलस्थानही आहे. त्रिकालाबाधित शाश्वत अशी मूल्ये कधीच जुनी होत नाहीत. त्यामुळे वीस पंचवीस वर्षांपूर्वी लिहिली गेलेली ही कादंबरी आजच्या आणि उद्याच्या वाचकांनाही आवडेल असा विश्वास त्यांनी प्रगट केला.

डॉक्टर विजयाताईंनी आपले काही मजेदार अनुभवही सांगितले. जेंव्हा त्यांना पहिल्यांदा दिवस राहिले तेंव्हा त्या ज्या कार्यालयात काम करीत होत्या तिथले सहकारी त्यांना नेहमी "आता तो लाडू, तो पेढा असे पदार्थ खा, ती जिलबी, ती चकली वगैरे खाऊ नका, म्हणजे मुलगाच होईल." असा सल्ला देत होते आणि त्यांनी तो पाळला सुध्दा. पण " तुम्हाला मुलगी झाली" असं जेंव्हा नर्सने सांगितलं तेंव्हा क्षणभरच " ते कसं शक्य आहे?" अशी त्यांची प्रतिक्रिया झाली, पण दुस-याच क्षणी त्या गोंडस बाळाला पाहताच त्यांच्यातल्या मातृत्वाची अनुपम भावना जागी झाली पूर्वीचे सगळे विचार अदृष्य होऊन गेले. त्यांच्या संसारात बहार आणणा-या या पहिल्या कलिकेचे नांव त्यांना प्राजक्ता असे ठेवले. तिच्या पाठीवर आलेली निशिगंधा झाली. तीच सुप्रसिध्द अभिनेत्री निशिगंधा वाड! "या दोन मुलींच्या पाठीवर मुलगा झाला तर त्याचं नांव झेंडू ठेवा म्हणजे तुमची फुलबाग पूर्ण होईल." असे कोणी तरी खट्याळपणाने सुचवले . त्यावर त्यांच्या पतीने उत्तग दिले, "आमची फुलबाग आता पूर्ण झाली आहे. तेंव्हा वाटल्यास मलाच तिने झेंडू, गुलाब, मोगरा असे कांही म्हणावे."
सौ.अंजली आणि सौ.अनुराधा या दोघी भगिनी आपला वैद्यकीय व्यवसाय, घरगृहस्थी, मुलांचे संगोपन, त्यांचे शिक्षण वगैरे सगळे उत्तम प्रकारे सांभाळून आपल्या वडिलांची स्मृती जागृत ठेवण्यासाठी इतक्या धडपडत आहेत, त्यांच्या साहित्यकृती वेगवेगळ्या माध्यमांमधून जगापुढे येत रहाव्यात यासाठी त्यांचे इतके आटोकाट प्रयत्न चालले आहेत याची त्यांनी भरपूर प्रशंसा केली. त्यात त्यांना सहकार्य देणा-या त्यांच्या पतिराजांचेही कौतुक केले. "या मुलींना जेंव्हाही माहेरपणाची ओढ वाटेल तेंव्हा त्यांनी आपल्या घरी निःसंकोचपणे यावे." असे त्या म्हणाल्या. मुलींच्या प्रेमळ स्वभावाबद्दल बोलतांना "Sons are for a while, but daughters are for life! " असे एका प्रसिध्द इंग्रजी साहित्यिकाने लिहिले असल्याचेही त्यांनी सांगितले. त्या दिवशी रामनवमी असल्यामुळे मी सकाळपासूनच थोडे रामनामगुणगान ऐकत होतो. त्यामुळे या साहित्यिकाला श्रावणबाळाची किंवा प्रभू रामचंद्रांची कथा माहीत असती तर कदाचित तो म्हणाला नसता असा एक विचार माझ्या मनात चमकून गेला.

वक्त्यांची भाषणे झाल्यानंतर ते सभागृहात येऊन बसले आणि पुढला कार्यक्रम सुरू झाला. वेदांती भागवत आणि श्री. तिवारी या युगुलाने डॉ.व-हाडपांडे यांच्या एका गीतावर सुंदर नृत्य सादर केले. त्यानंतर ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर या दोघांनी कादंबरीतील अनुक्रमे उर्मिला आणि विश्वास यांचे स्वभाव, संस्कार आणि त्यांच्या मनात उठलेले तरंग दाखवणारे महत्वाचे भाग साभिनय वाचून दाखवले. कथेमध्ये थोडासा खलनायक वाटावा असा दिसणा-या विश्वासची कांहीशी लंगडी वाटणारी कां होईना पण एक जी कांही बाजू आहे, ती अविनाशने समर्थपणाने मांडली. उर्मिलेच्या पात्रातले गुंतागुतीचे भावाविष्कार ऐश्वर्याने छान रंगवले. 'या सुखांनो या' या मालिकेतली सरितावहिनींची जी सोज्ज्वळ प्रतिमा तिने प्रेक्षकांच्या काळजात कोरून ठेवली आहे तिच्याशी उर्मिलेची व्यक्तीरेखा सुसंगत अशीच आहे. ऐश्वर्याचे जे अभिनयकौशल्य आपण नाटकांतून आणि मालिकांमधून पाहतो त्यामुळे हे वाचन ती याहून अधिक प्रभावीपणे आणि सफाईने करू शकली असती असे मनात आले. माणसाची नेहमी स्वतःशीच स्पर्धा चाललेली असते किंवा तुलना होत असते असे म्हणतात ना?

मस्त शारदीय रात या आल्बममधल्या दुस-या एका गोड गीतावर वेदांती भागवतने केलेल्या नृत्याविष्काराने हा सोज्ज्वळ, सात्विक असा कार्यक्रम संपला. तत्पूर्वी श्री. प्रशांत हरकरे यांनी आभार प्रदर्शन केले आणि कार्यक्रमानंतर चहापानाने त्याची सांगता झाली. एक हृद्य तसेच नेटका सुनियोजित असा कार्यक्रम पाहण्याची आणि त्या निमित्य़ाने कांही प्रसिध्द व्यक्तींचे विचार त्यांच्या खास शैलीमध्ये ऐकण्याची संधी मला मिळाली. त्यबद्दल व-हाडपांडे कुटुंबियांचे आभार मानायलाच हवेत.

3 comments:

Anonymous said...

आनंद......खूप छान लिहिलं आहेस रे प्रकाशन सोहळ्याचं वर्णन. अगदी समोर बघतोय कार्यक्रम असं वाटलं. ह्या सोहळ्याचं फ़ार अगत्याचं आमंत्रण होतं पण सध्या कुवेतला असल्यामुळे जाता आलं नाही. पण तुझ्या ह्या दोन सुरेख लेखांमुळे जाता न आल्याचा सल कमी झाला.

अनुराधा हरकरे माझी बालमैत्रिण. काकांच्या ह्या नव्या कलाकृतीला भरपूर शुभेच्छा :)

तुझे मनापासून आभार :)

Anonymous said...
This comment has been removed by a blog administrator.
Anand Ghare said...

जयश्रीताई, प्रतिसादाबद्दल धन्यवाद. या कार्यक्रमात अभिजित राणेची भेट झाली. माझ्याबरोबर त्याची जुनी ओळख आहे. त्याच्याकडून तुमच्या कवितांच्या आल्बमच्या प्रकाशनाबद्दल समजले. (जग किती छोटे आहे ना?) माझ्याकडून (थोडेसे उशीराने) हार्दिक अभिनंदन.