Thursday, August 01, 2013

कोलेस्टेरॉल - काही गैरसमज आणि माहिती - पूर्वार्ध

परवा एका दवाखान्यात गेलो असतांना तिथे मी एक संभाषण ऐकले. एक महिला, आपण तिला 'प्रतिमा' म्हणू, तिच्या मैत्रिणीला सांगत होती. "अगं, मी तुला काय सांगू? काल आम्ही एका नातेवाईकांकडे गेलो होतो. त्यांनी मस्त टेस्टी आणि गरमगरम बटाटेवडे केले होते. पण म्हणून काय पाच सहा खायचे का? तरी मी प्रतीकला 'आता पुरे कर' असं सारखं सांगत होते, पण ते लोक आग्रह करताहेत आणि हा आपला खातोय् ! आता सकाळपासून जिवाला कसं तरी वाटतय् म्हणाला म्हणून त्याला इथे घेऊन आले. त्याचा ईसीजी काढायला पाहिजे असं डॉक्टर म्हणताहेत. कालच्या बटाटेवड्यातलं सगळं कोलेस्टेरॉल त्यात येणार बघ ! कालचे ते वडे त्या लोकांनी कसल्या तेलात तळले होते कोण जाणे !"
तिची मैत्रिण, वाटल्यास आपण तिला 'सुनीता' म्हणू , त्यावर उद्गारली, "अगं, सुशांत गेले कित्येक वर्षे नुसत्या कोरड्या पोळ्या खातोय्, भातावरसुध्दा थेंबभर तूप पडू देत नाही. तळलेल्या पापडाचा तुकडाही त्यानं कधी तोंडात टाकलेला नाही. पण त्याचा उपयोग काय ? डॉक्टर म्हणताहेत की त्याचं कोलेस्टेरॉल म्हणे खूप वाढलंय्. खरंच ते कसं शक्य आहे गं? यांचंही कायतरीच आपलं !"

अशा प्रकारची वाक्ये अलीकडे अनेक वेळा कानावर पडत असतात. वर्तमानपत्रे आणि टीव्हीवर या कोलेस्टेरॉलबद्दल कसल्या ना कसल्या तथाकथित माहितीचा आणि जाहिरातींचा इतका भडिमार सतत चाललेला असतो की हे इतके अवघड नावसुध्दा आता ज्याच्या त्याच्या तोंडी बसले आहे. पण 'तेल' म्हणजे 'कोलेस्टेरॉल' आणि 'ते आपल्या हृदयाला घातक' अशी त्याच्याबद्दलची ढोबळ समीकरणेही रूढ होऊन बसली आहेत. मग त्यावर उपाय म्हणून "स्वयंपाकात आमचेच तेल वापरा, त्यात कोलेस्टेरॉल नसते." अशा जाहिराती काही उत्पादक करत असतात. सुशांतसारखी काही माणसे अतीसावध किंवा थोडी घाबरट असल्यामुळे तेच विशिष्ट तेल वापरतात आणि प्रतीकसारखे मनमौजी लोकसुध्दा "आता हे तेल वापरले तर आपल्याला वाटेल तेवढे तळकट खायला हरकत नाही." असे समजून त्या खास तेलाचा अवलंब करतात. अखेर दोघेही आयसीयूमध्ये जाऊन पोचले की "आपलं काय चुकलं?" याचा दोघेही विचार करत राहतात.

कोलेस्टेरॉलविषयी प्रचलित असलेली अर्धवट माहिती आणि काही गैरसमज या सगळ्याच्या मुळाशी असतात. ते थोडेसे दूर करण्याचा एक प्रयत्न मी या लेखात करणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की कोलेस्टेरॉल हा कोणी राक्षस किंवा आपला शत्रू नसून आपल्या शरीरामधला एक अत्यावश्यक घटक आहे. मानवी शरीराच्या प्रत्येक पेशीच्या आवरणांध्ये कोलेस्टेरॉल असतेच असते. त्यामुळे आपले शरीरच हा घटक निर्माण करत असते.  सर्वसामान्य माणसाच्या रक्ताच्या तपासणीमध्ये जेवढे कोलेस्टेरॉल सापडते त्यातला सुमारे तीन चतुर्थांश भाग त्याच्या शरीरामध्येच तयार झालेला असतो आणि एक चतुर्थांश त्याच्या खाण्यामधून आलेला असतो. जेवणात जास्त स्निग्धपदार्थ खाल्ले तर त्यामुळे रक्तामधील कोलेस्टेरॉलचे प्रमाणदेखील वाढण्याची शक्यता असते, पण त्या प्रमाणाचा आणि आहारामधील कोलेस्टेरॉलच्या प्रमाणाचा गणितामधल्या समीकरणासारखा थेट संबंध नसतो. शरीरात तयार होत असलेल्या सगळ्याच द्रव्यांच्या निर्मितीवर त्याचे काटेकोर नियंत्रण असते. त्यामुळे खाण्यात जास्त स्निग्धपदार्थ आले तर ते शरीरात कमी तयार केले जाऊ शकतात. शरीरामधील पेशींची झीज होत असते त्याचप्रमाणे श्वसनामधून घेतलेल्या प्राणवायूशी संयोग होऊन त्यामधील द्रव्यांचे ऑक्सिडेशन होत असते. त्यात सारखे थोडे कोलेस्टेरॉल नष्ट होत असते, नवीन पेशींची रचना करण्यासाठी सुध्दा कोलेस्टेरॉलचा उपयोग केला जात असतो. यामुळे शरीरामधील कोलेस्टेरॉल अणूंच्या संख्येमध्ये घटही होत असते आणि आहारामधून मिळणारे व शरीरात तयार होणारे कोलेस्टेरॉल मिळून त्याची भरपाई करण्यात येत असते.

आपल्या पोटातली यकृत किंवा लिव्हर नावाची एक मोठी केमिकल्सची फॅक्टरी शरीराला लागणारे निरनिराळ्या प्रकारचे रस आणि श्राव तयार करत असते, त्यात कोलेस्टेरॉलचाही समावेश आहे. यकृत हा एक कारखाना आहेच. शिवाय ते एक तात्पुरते गोडाऊनसुध्दा आहे. रक्तामध्ये किती प्रमाणात साखर किंवा स्निग्ध पदार्थ असावेत याचे नियंत्रण करण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असतो. जास्तीचे पदार्थ यकृतात ठेऊन घेतले जातात आणि गरजेनुसार ते परत रक्तात पाठवले जात असतात. फक्त तेल आणि तूपच नव्हे तर पिष्टमय पदार्थ (कार्बोहैड्रेट्स) आणि प्रथिने (प्रोटीन्स) यांचेसुध्दा तिथे काही प्रमाणात स्निग्धपदार्थात रूपांतर केले जाते आणि ते पदार्थ हळूहळू रक्तप्रवाहात मिसळले जातात. शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त स्निग्ध पदार्थ मिळत असल्यास ते चरबीच्या रूपात ठिकठिकाणी साठवले जातात. ही सगळी उलाढाल रक्तप्रवाहामधूनच होत असते.

कोलेस्टेरॉल हा जर एक शरीराचा उपयुक्त आणि आवश्यक घटक आहे तर त्याची एवढी दहशत का निर्माण झाली आहे? काही लोकांच्या मते तर औषध कंपन्यांनी राईचा पहाड करणा-या प्रचारामधून ती मुद्दाम तयार केली गेली असावी. हा मुद्दा थोडा बाजूला ठेऊन कोलेस्टेरॉलच्या विरोधात कोणते मुद्दे आहेत, शरीरावर त्याचे कोणते वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे हे पाहू. कोलेस्टेरॉल एरवी जरी चांगले असले तरी 'अती तेथे माती' या म्हणीचे हे एक उदाहरण देता येईल. सर्वसामान्यपणे मुले आणि युवकांमध्ये शरीराला आवश्यक एवढेच कोलेस्टेरॉल वेळोवेळी तयार केले जात असते आणि शरीराच्या प्रत्येक अवयवाला त्याचा पुरवठा केला जात असतो. पण यावर नियंत्रण करणा-या यंत्रणेत मध्यम वयानंतर किंवा उतारवयामध्ये काही बिघाड झाला तर मात्र शरीरात गरजेपेक्षा जास्त कोलेस्टेरॉल तयार होत राहते आणि त्याचे रक्तामधले प्रमाण वाढत जाते. त्याच्या या वाढण्यामुळेही रक्ताभिसरणावर काही परिणाम होत नाही किंवा कोणत्या अवयवालाही कसलीही बाधा पोचत नाही. त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढण्याचे कसलेही बाह्य लक्षण दिसून येत नाही, पण हे जास्तीचे कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांना आतल्या बाजूला चिकटून राहते आणि कॅलशियमसारखी इतर द्रव्ये त्यात मिसळली गेली तर त्याचे थर तयार होतात. या थरांमुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात तसेच त्यांचा लवचीकपणा कमी होतो. त्यामुळे त्यांमधून वहात असलेल्या रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. हा प्रकार शरीरभर होत असला तरी हातापायांवर त्यामुळे मुंग्या येणे यासारखा सौम्य परिणाम दिसतो, पण हृदयाच्या कप्प्यांचे आकुंचन व प्रसरण करणा-या स्नायूंनाच जर पुरेसा रक्तप्रवाह मिळाला नाही तर ते व्यवस्थित काम करत नाहीत आणि त्यातून हृदयविकार निर्माण होतात. मेंदूमधल्या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण झाला आणि मेंदूला पुरेसे रक्त मिळाले नाही तर पक्षाघात (पॅरॅलिटिक स्ट्रोक) होऊ शकतो. या दोन्हींमध्ये प्राणहानी होण्याचीसुध्दा शक्यता असते.

वैद्यकीय शास्त्रात झालेल्या प्रगतीमुळे आता साथीचे रोग आटोक्यात आले आहेत, साप, विंचू चावणे किंवा वाघसिंहाने खाणे असले अपमृत्यूचे प्रकार तर आता इतिहासजमा झाले आहेत. यामुळे माणसाचे आयुष्यमान वाढले आहे. त्याची जीवनशैली बदलून सुखासीन झाली आहे. या कारणांमुळे हृदय आणि मेंदू यांच्या विकारांची टक्केवारी खूप वाढली आहे. ते जडण्याची भीती सर्वांना वाटते, कसलीही पूर्वसूचना न देता ते अचानक हल्ला करतात, त्यातून जे लोक वाचतात त्यांच्या हृदय किंवा मेंदूची झालेली हानी काही वेळा कधीच भरून निघत नाही. या शक्यतेमुळे त्या विकारांबद्दल वाटणा-या भयात आणखी भर पडली आहे. पण कोणतेही पूर्वलक्षण न दिसतांना रक्ताची तपासणी केली तरी कोलेस्टेरॉलचे वाढणे हे या रोगांचे एक संभाव्य कारण समजू शकते आणि त्यावर वेळीच उपचार केल्यास ते आटोक्यात आणता येणे शक्य आहे. यामुळे त्यावर आता प्रकाशझोत पडत आहे.

वर दिलेल्या विवेचनावरून हे स्पष्ट होते की प्रतिमाला वाटले त्याप्रमाणे आज खाल्लेल्या वड्यांमधल्या एकदोन चमचे तेलाचा लोंढा पोटातून थेट हृदयात जाऊन तिथे गडबड घोटाळे निर्माण करेल असे घडत नाही. अन्नामधील कोलेस्टेरॉल रक्तामध्ये जाऊन पोचण्याची आणि त्याचे प्रमाण वाढण्याची क्रिया खूप संथ असते. आपण खाल्लेले अन्न पचल्यानंतर त्याचा रस हळूहळू रक्तामधून शरीरभर पसरत असतो. त्यातले कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांना आतल्या बाजूला चिकटून त्याचे थर तयार होण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात. ही क्रिया आधीपासून घडत आलेली असेल, पण बाह्य लक्षण नसल्यामुळे ती कोणाच्या लक्षात आली नसेल. त्या अवस्थेत असतांना एकादे तात्कालिक निमित्य झाले तर ते कावळा बसायला आणि झाडाची फांदी मोडायला गाठ पडण्यासारखे असेल.

त्याचप्रमाणे एकाद्याने अजीबात तेलतूप खाल्लेच नाही तर त्याच्या रक्तात कुठून कोलेस्टेरॉल येणार? असे जे सुनीताला वाटते तेही शास्त्रीय दृष्ट्या बरोबर नाही. रक्तात कोलेस्टेरॉल येण्यासाठी ते अन्नामधल्या तेलकट तुपकट पदार्थांमधून पोटात जाण्याची मुळीच गरज नसते. इतर जनावरांच्या खाण्यात असे स्निग्ध पदार्थ कुठे येतात? पण त्यांच्या शरीरातसुध्दा कोलेस्टेरॉल निर्माण होतेच. पिष्टमय पदार्थ (कार्बोहैड्रेट्स) आणि प्रथिने (प्रोटीन्स) यांचेपासूनसुध्दा आपल्या शरीरात कोलेस्टेरॉल तयार केले जाते. भातावर तूप न घेता पण गरजेपेक्षा जास्त भात खाल्ला तरी त्यानेसुध्दा रक्तामधले कोलेस्टेरॉल वाढत जाऊ शकते.

रक्तामध्ये कोलेस्टेरॉलची मात्रा किती आहे याची तपासणी करणे, त्याच्या रिपोर्टाचा अन्वयार्थ लावणे, त्यावरील नियंत्रण वगैरे मुद्दे पुढील भागात पाहू.

.  . . . . . .  . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)
 

1 comment:

Marathi Blog KattaOnline said...

Thanks for this informative article. Looking forward to the next part.
I think our daily routine plays biggest role into having excessive blood cholesterol besides eating habits. Food provides means to generate energy but if it's not consumed properly due physically inactive or incorrect routine then it turns into stored energy aka cholesterol. Usually eating less in morning (due to rush to work) and having heavy dinner (because we're relaxed in evening) instead can lead to more cholesterol given less activity during night time.