Monday, August 26, 2013

दुनियादारी, टाईम प्लीज आणि गेट् वेल् सून

सुमारे सात आठ वर्षांपासून मी आंतरजालावर (इंटरनेटवर) मराठी अक्षरे वाचायला आणि लिहायला लागलो आहे. या सगळ्या काळात एक ओरड आणि एक रड अधून मधून समोर येत आली आहे. "इंग्रजी आणि हिंदी भाषांकडून होत असलेल्या आक्रमणामुळे मराठी भाषा अधिकाधिक भ्रष्ट होत चालली आहे." अशी ओरड आणि "मराठी भाषा आता लुप्तच होत चालली आहे, तिला कोणी वाली उरला नाही." अशी रड सारखी नजरेसमोर येत राहते. "यात नवे किंवा जगावेगळे असे काही नाही, जगातल्या सगळ्या भाषांमध्ये काळानुसार बदल होतच आले आहेत, मराठी लिहिणा-या आणि वाचणा-यांची संख्या शिक्षणाच्या प्रसारामुळे वाढतच आहे, ग्रामीण लोकांचे बोलणेसुध्दा आता जास्त शुध्द होत आहे." वगैरे संख्यात्मक आणि गुणात्मक मुद्दे मांडून मी माझे विचार अनेक वेळा व्यक्तही केले आहेत. पण गेल्या महिन्याभरात मी दोन मराठी चित्रपट आणि एक मराठी नाटक लागोपाठ पाहिले त्यांची नावे पाहून मलाही थोडे अस्वस्थ वाटले. ती नावे आहेत 'दुनियादारी, टाईम प्लीज आणि गेट् वेल् सून'. त्यांच्या निर्मात्यांना योग्य असे मराठी शब्द का सापडू नयेत? असा प्रश्न पडला. याच अर्थाचे मराठी शब्द वापरायचे असल्यास 'दुनियादारी'ला 'जगरहाटी' असे म्हणता आले असते, पण 'टाईम प्लीज' च्या ऐवजी 'कृपया वेळ' एवढे पुरले नसते. त्याच्यापुढे 'दे, घे, द्या, घ्या' असे काहीतरी यायला हवेच आणि हे कोणी कोणाला म्हणायचे या प्रश्नाभोवती तर त्या सिनेमाचे कथानक फिरते. 'गेट् वेल् सून' याचेसुध्दा "लवकर बरा हो, बरी हो, बरे व्हा, ब-या व्हा" वगैरे अर्थ काढता येतात आणि त्यातला कोठला अर्थ काढायचा हे या नाटकातले रहस्य आहे. शिवाय यातले कोठलेही पर्याय सिनेमा किंवा नाटकाचे शीर्षक म्हणून आकर्षक वाटत नाहीत. मी तरी असल्या शीर्षकाचे नाटक वा सिनेमा पहायला बहुधा कधी गेलो नसतो. त्यापेक्षा इंग्लिश नावच प्रेक्षकांना आकर्षक वाटेल यात शंका नाही. अखेर प्रेक्षकांनी यावे हाच तर या नाटक सिनेमाच्या निर्मितीच्या प्रपंचामागे असलेला मुख्य उद्देश असतो ना!

दुनियादारी हा चित्रपट एका प्रसिध्द कादंबरीवरून काढला असला तरी मी काही ती कादंबरी वाचलेली नाही. त्यामुळे थेटरात जातांना माझी पाटी कोरीच होती. सुरुवातीलाच सई ताम्हणकरला चांगली वयस्क दाखवली आहे आणि माझी समजूत चुकली नसेल तर ती तिच्या नातीला पूर्वीच्या काळातली गोष्ट सांगते आहे असे दाखवून फ्लॅशबॅकमध्ये मुख्य कथानक सुरू होते. तसे असेल तर सुरुवातीच्या सीनमधली सई (तिचे पात्र) सुमारे माझ्या वयाची असावी आणि या सिनेमातल्या कथानकाचा काळ मी पुण्यात कॉलेज शिकत असतांनाचा असायला हवा. त्या काळातसुध्दा एस पी कॉलेज, अलका टॉकीज आणि ससून हॉस्पिटल होते, पण त्या ठिकाणांमधले वातावरण, रस्त्यातली रहदारी, माणसांचे कपडे, बोलणे. चालणे वगैरेतले काहीच मला ओळखीचे वाटले नाही. या कादंबरीची कथा कालातीत आहे, त्यामुळे तिचा विशिष्ट 'पीरीयड' मुद्दाम दाखवण्याची गरज नाही असे म्हणता येईल. पण तसेच करायचे असेल तर सुरुवातीचा आणि शेवटचा सीन कापून टाकायलाही काही हरकत नव्हती. त्या दोन्ही सीन्समध्ये सिनेमाच्या गोष्टीवर काही परिणाम होईल असे काहीच घडत नाही. शेवटच्या सीनमध्ये सगळ्या पात्रांच्या चेहे-यावर सुरकुत्या रंगवायचा आणि त्यांच्या केसात चंदेरी छटा दाखवायचा मेकअपमनचा त्रास तरी वाचला असता.

अंकुश चौधरी आणि जितेंद्ग जोशी हे दोघेही गुंड मवाली असले तरी त्यातला अंकुश हा नीच नाही असे तो स्वतःच एका प्रसंगात सांगतो आणि तसे वागतो.  चुलबुल पांडे सारखे दबंग डीएसपीचे (नावापुरता) पात्र त्याने टेचात रंगवले आहे. जितेंद्र मात्र गुंडही आहे आणि नीचही आहे असे दाखवले असले तरी तो मला तरी तसा दिसला नाही. टीव्हीवर त्याला अनेक वेळा 'इनोदी' काम करतांना पाहिलेले असल्यामुळे त्याच्या चेहे-यावर बसलेली ती छाप काही केल्या जात नाही. उलट त्याला असा निगेटिव्ह रोल देणे हाच मला एक विनोद वाटला. सिनेमाच्या तिकीटांचा काळाबाजार आणि दारूचे गुत्ते वगैरे उद्योग करणा-या त्यांच्या टोळक्यातल्या मुलांना (खरे तर बाप्यांना) कॉलेजात नावे घालण्याची काय गरज पडली तेच जाणोत. त्यांचे गँगवॉर खेळायला त्यांना पुण्यात आणखी कुठे जागा नव्हत्या का? मी कॉलेजात शिकत असतांना तरी पुण्यातल्या कॉलेजांचे असे स्वरूप पाहिले किंवा ऐकले नव्हते. आता तसे झाले असले तर ते भयंकर आहे.

निरागस आणि गोड चेहेरा असलेला स्वप्निल जोशी लहानगा कृष्ण म्हणून टीव्हीवर आला तेंव्हा जबरदस्त लोकप्रिय, अगदी सुपरहिट, झाला होता. त्यानंतरही मी त्याला बहुतेक वेळा चॉकलेट हीरोच्या रूपातच पाहिला आहे. दुनियादारीमध्ये त्याला थोडा वेगळा आणि थोडा त्याच्या प्रतिमेला साजेसा असा रोल मिळाला आहे. यात केवळ मैत्रीखातर तोसुध्दा एका गँगमध्ये सामील होतो, पण गँगस्टर लोकांना सद्बुध्दी देण्यासाठी प्रयत्न करत राहतो. "यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी।.. ये दोसती हम नही छोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे।... यारबिना चैन कहाँ रे।." वगैरे गाण्यांना साजेल असे तो बोलत आणि वागत असतो. "तेरी मेरी पक्की यारी आणि xxमध्ये गेली दुनियादारी" अशा प्रकारचे एक पालुपद नेहमी म्हणत असतो. पण त्याच्या अंतर्मनात एक उदात्त, महान वगैरे आत्मा नेहमीच वास करत असतो. स्वप्निलने हे दुहेरी पात्र मोठ्या ताकदीने उभे केले आहे.

सई ताम्हणकर हे एक अजब पात्र या सिनेमात आहे. ती काही डॉक्टरसारखी दिसत नाही असे सिनेमातलेच एक कॅरॅक्टर एकदा सांगते, पण काही प्रसंगांमध्ये ती डॉक्टरसारखी दिसते आणि तसे वागतेसुध्दा. एरवी ती अगदी चंट बनून बिनधासपणे वावरत असते, पण चार लोकांसारखे आपण सुखाने जगायचे नाहीच असे तिने मनाशी ठरवले असावे. कथेतल्या एका व्यक्तीसाठी ती एवढा मोठा त्याग का करते आहे असा प्रश्न पडतो किंवा तो तिचा  मूर्खपणा वाटतो, आणि दुस-या व्यक्तीसाठी मोठा त्याग केल्यामुळे ती एकदम महान वाटायला लागते. कथेनुसार हे तिचे निरनिराळ्या प्रकारे दिसणे, न दिसणे आणि वागणे वगैरे तिने अप्रतिम साधले आहे. ऊर्मिला कानेटकरने केलेला  सुंदर अभिनय अपेक्षित होता. इतर पात्रांनीही आपापली कामे ठीक केली आहेत.

'दुनियादारी' या शब्दाचा अर्थ 'जगरहाटी', 'जनरीत' वगैरे असावा असे मी समजत होतो. घरी आल्यावर मी हिंदी शब्दकोश उघडून त्याची खात्रीही करून घेतली. पण 'आपले हित सोडून विनाकारण दुस-याच्या फंदात पडणे' असा काहीसा या शब्दाचा अर्थ या चित्रपटात ध्वनित होतो. तो अर्थ जो काही असेल तोसुध्दा फक्त xxमध्ये जाण्यापुरताच आहे. त्याव्यतिरिक्त मला तरी या गोष्टीत कुठेच सर्वसामान्य जगरहाटी दिसली नाही. कदाचित माझ्या माहितीतले जगच वेगळे आहे की काय असे वाटायला वागले. असे सगळे असले तरी हा चित्रपट पाहतांना आपण त्यात गुंतत जातो, कोणता माणूस कुठे आणि कोणत्या रूपात अचानक समोर येईल ते सांगतां येत नाही, त्यामुळे आपल्याला आश्चर्याचे धक्के बसतात, पुढे काय होणार याची उत्कंठा वाटते. हंसू येते, डोळ्यात पाणी येते, पण केंव्हाच जांभया येत नाहीत.  त्यामुळे थेटरामधून बाहेर येतांना पैसे वसूल झाल्यासारखे वाटते. सामान्य प्रेक्षकाला याहून आणखी काय हवे?

टाईम प्लीज या सिनेमात प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तुफान लोकप्रिय झालेल्या एका मालिकेमध्ये या दोघांनी एकत्र काम केले होते तेंव्हाच ते त्यांच्या जीवनातसुध्दा एकत्र येणार असल्याच्या बातम्या, वावड्या, अफवा उठल्या होत्या. त्यानंतरसुध्दा त्यांनी काही सिनेमे किंवा मालिकांमध्ये जोडीने काम केले असेल. या क्षेत्रातली माझी माहिती फारच तोकडी आहे. पण ती मालिका बंद होऊन बराच काळ लोटून गेल्यावर त्यांच्या लग्नाची बातमी आली. अर्थातच त्यांनी त्यासाठी बराच 'वेळ' (टाईम) दिला घेतला असणार. पण 'टाईम प्लीज' या चित्रपटात मात्र सुरुवातीलाच एका रेस्तराँमध्ये त्यांच्या पहाण्याचा कार्यक्रम होतो. "काहीच का बोलत नाहीस?", "काय बोलू?", "अशा वेळी काय बोलायचं असतं?" अशा प्रकारच्या दोन चार संवादात ती मुलाखत आटोपून लगेच त्यांचे शुभमंगल झाल्याचे दाखवले आहे आणि उमेशच्या घरात प्रिया रहायला येते. उमेश एका सॉफ्टवेअर कंपनीत मोठ्या हुद्द्यावर पोचून प्रतिष्ठित माणूस झालेला असतो, तर प्रिया वयाने वाढली असली तरी मनाने अजून शरतबाबूंची अल्लड 'बालिका बोधू'च राहिलेली असते. तिच्या निरागस वाटणा-या स्वच्छंदी वागण्याने आणि त्यात घडोघडी चुका करत राहण्याने आधी त्यामुळे होणारा त्रास भोगून सुध्दा उमेशचेही मनोरंजन होते. पण प्रियाचा बालमित्र सिध्दार्थ जाधव त्यांच्या घरी अचानक अवतीर्ण होतो आणि तिथेच ठिय्या मारून राहतो. त्यानंतर चित्र बदलते.

लहान मुले जशी एकमेकांशी वागतात तसेच प्रिया सिध्दूसोबत थिल्लरपणे नाचत बागडत असते, पण उमेशला ते आवडत नाही म्हणण्यापेक्षा सहन होत नाही, त्या दोघाच्याबद्दल उमेशच्या मनात संशय निर्माण होतो. याच काळात उमेशची भूतकाळातली प्रेयसी सई योगायोगाने त्याच्याच ऑफीसात कामाला लागते. मित्रत्वाच्या नात्याने आणि तिला नव्या जागी रुळण्यासाठी मदत व्हावी म्हणून उमेश तिला साथ देतो, तिला आपल्या ग्रुपमध्ये सामावून घेतो आणि कंपनीने एक अर्जंट काम त्यांना करायला दिले असल्यामुळे ते करण्यासाठी तिला रात्री अपरात्री घरीसुध्दा घेऊन येतो. आतापर्यंत मनाने लहान असलेली प्रिया आता या बाबतीत मोठी होते आणि असूयेच्या भावनेने पेटते. अशा त-हेने दोन्ही बाजूंनी संशयकल्लेळ सुरू होतो आणि वाढत जातो. त्यातच नको त्या वेळी, नको त्या ठिकाणी, नको ती माणसे अचानक दृष्टीला पडल्यामुळे गैरसमजुती होतात आणि गुंता वाढत जातो. चार दिवस दोघांनी एकमेकांपासून दूर रहावे आणि आपल्या नातेसंबंधाबद्दल शांतपणे विचार करून काय ते ठरवावे अशी 'टाईम प्लीज' सूचना उमेश करतो आणि प्रियाला तिच्या माहेरी पोचवून येतो. तिथे तिची आई आणखी एक गौप्यस्फोट करते. मनाशी काहीतरी ठरवून प्रिया घरी परत येते आणि आणखी एका गैरसमजाला बळी पडून परत जाते. तिचा फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड सिध्दूच त्याच्या भात्यामधून आणखी एक अस्त्र बाहेर काढतो आणि संशयपिशाच्च्याचे दमन करतो. अशा प्रकारे उमेश आणि प्रियाची लग्नानंतरची प्रेमकहाणी सफळ संपूर्ण होते.

उमेश आणि प्रिया यांनी सिनेमातल्या नायक नायिकांच्या भूमिका चांगल्या वठवल्या आहेत, पण सहकलाकार असलेला सिध्दार्थ जाधवच त्यांना झाकाळून टाकतो. थेटरमधले बहुतेक प्रेक्षक त्याच्या प्रत्येक वाक्याला आणि कृतीला उत्स्फूर्तपणे दाद देत असतात, ते बहुधा त्यालाच पहायला थेटरात आले आहेत असे वाटते. मला ते पात्र थोडे गरजेपेक्षा जास्त भडक आणि उथळ वाटले, पण ते प्रभावीपणे सादर करणा-या सिध्दार्थचे कौतुकही वाटले. या चित्रपटातले सईचे पात्रसुध्दा बरेच गुंतागुंतीचे आहे आणि त्यातल्या विविध छटा तिच्या अभिनयात तिने उत्तम प्रकारे आणल्या आहेत. अभिनयाचे इतके चांगले अंग असतांना तिने तिची भूमिका वठवण्यासाठी उगाच वेगळे कपडे घालण्याची आणि भसाभसा सिगारेटी फुंकत बसण्याची गरज नव्हती. या सिनेमातल्याच एका जोडप्याचा संसार आयुष्यभर वेळ देऊनसुध्दा धड चालत नाही आणि दुसरा त्याआधीच सहनशक्तीचा अगदी अंत पाहून अखेर मोडला असतो, असे असले तरीही. 'लग्न ठरवणे किंवा ते मोडणे यासारखे महत्वाचे निर्णय घाईघाईत घेऊ नयेत, त्यापूर्वी जोडीदाराला थोडा वेळ द्यावा, स्वतः थोडा वेळ घ्यावा.' असा संदेश या चित्रपटात दिला आहे. या चित्रपटाची मांडणी, त्यातले लहान लहान प्रसंग, संवाद, मुख्य पात्रांचा अभिनय, भावपूर्ण शेवट वगैरे सगळे मिळून एक चांगली भट्टी जमली आहे.        

'गेट वेल सून' हे एक चाकोरीबाहेरचे नाटक आहे. यात सेटच्या एका भागात आनंद या मानसोपचारतज्ज्ञाचा दवाखाना थाटला आहे, म्हणजे भिंतीवर काही चित्रे, एक टेबल, दोन चार खुर्च्या, एक कपाट वगैरेंधून तसा आभास निर्माण केला आहे आणि स्टेजच्या उरलेल्या भागात निरनिराळे सेट मांडून कथेमधले इतर प्रसंग दाखवले जातात. एक महिला पत्रकार डॉक्टरांची मुलाखत घेत असतात आणि मनोरुग्णांचे प्रकार, त्यातले व्यसनाधीन लोक, त्यांचे प्रकार, त्यांच्या व्यसनात अडकण्यातल्या आणि त्यातून बाहेर पडण्यातल्या स्टेजेस वगैरेंची वैद्यकीय माहिती डॉक्टरसाहेब त्या रिपोर्टरला देत असतात. या विषयावरील एक उद्बोधक डॉक्युमेंटरी आपण पहात आहोत असेच बरेच वेळा वाटते. हे सांगत असतांना डॉक्टर एका गोंडस सैतानाचा (लव्हेबल रास्कलचा) उल्लेख करतात आणि त्याची गोष्ट फ्लॅशबॅकमधून सुरू होते. पण दुनियादारी सिनेमाप्रमाणे आपल्याला ती भूतकाळात घेऊन जात नाही. दोन तीन वाक्यांचे छोटे छोटे तुकडे डॉक्टर सांगत आहेत अशा पध्दतीने ती कथा हळूहळू उलगडत जाते. त्या गोष्टीतसुध्दा एका व्यसनाधीन माणसाचे वागणे, त्याने व्यसनमुक्त होण्यासाठी प्रयत्न करण्याला आधी विरोध करणे, डॉक्टरांनी त्यांच्या संभाषणकौशल्याने त्याचे मन वळवणे वगैरे पहात असतांना ती मुक्तांगण किंवा अल्कोहोलिक अॅनॉनिमसवरची डॉक्युमेंटरी वाटते. पण स्वप्निल जोशीचा सुरेख अभिनय आणि चटपटीत संवादांमधून ती मनोरंजक बनवली आहे. मध्यंतराच्या वेळेस अचानक एक घटना घडते आणि ती महिला पत्रकार स्वतःच त्या कथेचा भाग बनते. व्यसनमुक्त झालेला स्वप्निल पुन्हा त्यात परत जाणार की काय अशी आशंका निर्माण होते. पण अखेर सगळे काही आलबेल होते, कोणी व्यसनमुक्त होतात आणि कोणी त्या मार्गाला लागतात.

या नाटतात डॉक्टर, स्वप्निल आणि महिला पत्रकार एवढी तीनच मुख्य पात्रे आहेत. स्वप्निलची पत्नी अधून मधून दिसते आणि डॉक्टरांकडे एक असिस्टंट आहे एवढे दाखवण्यापुरती येजा ती करत असते. डॉक्टरची भूमिका करणारे संदीप मेहता आणि पत्रकार सुमेधा गुरू यांनी आपापल्या भूमिका उत्कृष्ट वठवल्या आहेत. स्वप्निल जोशीचे रंगभूमीवरचे हे पहिलेच नाटक आहे. यापूर्वी मी त्याला सिनेमा आणि टीव्हीवरच पाहिले आहे. पण त्याने या नाटकातली लव्हेबल रास्कल प्रतीकची अवघड भूमिका अप्रतिम उठवली आहे. व्यसनी पण सुसंस्कृत माणसाच्या मनात चालत असलेले अंतर्द्वंद्व त्याने कुशलतेने दाखवले आहे. या सगळ्यांचे श्रेय रंगमंचावरील कलाकांरांइतकेच किंबहुना कणभर जास्तच या नाटकाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांना द्यावेसे वाटते. डॉ.आनंद नाडकर्णी या नावाजलेल्या नामसोपचारतज्ज्ञाने लिहिलेल्या कादंबरीवरून प्रशांत दळवी यांनी लिहिलेल्या या नाटकातले संवाद त्यांनी खूपच अभ्यासपूर्ण लिहिले आहेत. त्यांनी लिहिलेल्या संवादामधून त्यांनी कुठेही कंटाळवाणी न वाटता पण खूप उद्बोधक माहिती दिली आहे आणि त्याबरोबरच या नाटकाच्या कथेचा ओघही मनोरंजकपणे पुढे नेला आहे. त्यात थोडा रहस्यमय़ भाग आणला आहे. व्यसनग्रस्त माणसाची बदलती मनस्थिती, त्याच्या आप्तांची तळमळ, समाजाला व्यसनमुक्त करण्याचे कंकण हाती बांधलेल्या डॉक्टरांनी वेळोवेळी येणा-या अपयशाने निराश न होता होईल तितके करण्याचा गेतलेला ध्यास हे सगळे दळवींनी संवादामधून अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे. आवर्जून पहावे आणि इतरांना पहायला सांगावे असे वाटणारे हे नाटक आहे.   

सिनेमा किंवा नाटकाची गोष्ट आणि विशेषतः तिचा शेवट न सांगता त्यावर शेरेबाजी करीत  लिहिणे कठीण आहे, पण एका वाचकाने केलेल्या प्रेमळ सूचनावजा मागणीमुळे प्रेरणा घेऊन मी तसा एक लहानसा प्रयत्न मी करून पाहिला आहे.

No comments: