Friday, August 09, 2013

अनंता पेठे

'अनंत वासुदेव पेठे' असे त्याचे नाव शाळेच्या हजेरीपटावर होते. त्या काळात रोज रोज हजेरी घेण्याची रीत नव्हती. वर्गावर नजर फिरवताच कोण कोण आले आहेत ते मास्तरांना समजत असे. कधी तरी एकादे नवे शिक्षक क्लास घ्यायला आले आणि त्यांना वर्गातल्या मुलांची हजेरी घेण्याची इच्छा झाली तर इतर मुलांच्या नावांबरोबर ते अनंताचे पूर्ण नाव पण वाचत. एरवी शाळेत, घरी, गल्लीमध्ये आणि गावात सगळे लोक त्याला 'अंत्या' असेच म्हणायचे. त्याला 'अनंता' असेसुध्दा क्वचितच कोणी म्हंटले असेल, मला तरी ते ऐकल्याचे आठवत नाही. तो 'अनंतराव' झाल्यानंतर मला कधी भेटलाच नाही.

अंत्याचे घर आमच्या शेजारच्या आळीमध्ये होते. आमच्या घरापासून सात आठ घरे सोडून त्याचे घर होते आणि तिथून बारा तेरा घरे सोडून पुढे गेल्यावर आमची प्राथमिक शाळा लागत असे. शाळेमधून परत येतांना आम्ही दोघे नेहमी एकमेकांबरोबर येत होतो आणि त्याला त्याच्या घरी सोडून मी आमच्या घरी जात होतो. पण आमचे हायस्कूल एकदम विरुध्द दिशेला होते. त्यामुळे हायस्कूलमधून परत येतांना अंत्या आधी मला माझ्या घरी सोडून, वाटल्यास तिथे एकादा छोटा हॉल्ट घेऊन पुढे त्याच्या घरी जायचा. असे आम्ही जवळ जवळ दहा वर्षे करत होतो.

अंत्या एक सद्वर्तनी, सालस, समजूतदार, सुस्वभावी, मनमिळाऊ म्हणजे 'ए गुड बॉय' म्हणावा असा शहाणा मुलगा होता. अभ्यासात त्याची बरी गती होती. त्याची गणना वर्गातल्या स्कॉलर मुलांमध्ये होत नसली तरी तो सगळ्या परीक्षांमध्ये सगळ्या विषयात नेहमी व्यवस्थित पास होत असे. तो अंगापिंडाने आडदांड नसला तरी धट्टाकट्टा होता. मी मात्र वर्गातल्या सगळ्या मुलांपेक्षा वयाने आणि चणीनेही लहान असल्यामुळे इतर मुलांना थोडा घाबरत असे, पण अंत्यासारखा एकादा मित्र जवळ असला की मला सुरक्षित वाटायचे. त्यामुळे मी नेहमी त्याच्या जवळ रहात असे आणि त्यानेही कधी मला नको म्हंटले नाही. 

अंत्याचे वडील भिक्षुकी करत होते. त्यांचे स्वतःचे उदरभरण तरी झकास चाललेले असणार असे त्यांच्या तुंदिलतनूवरून दिसायचे. "भट्ट जेवले, तट्ट फूगले, घरा जाउनी स्वस्थ नीजले." असे त्या काळातले बडबडगीत ऐकतांना वासूभटांची मूर्ती डोळ्यासमोर येत असे. ते एका यजमानांकडे दुपारच्या भोजनाला गेले. त्या काळात पिटुकल्या चमच्याने जपून तूप वाढत नसत. एका लहान तपेलीमध्ये गरम केलेले तूप घेऊन वाढायला येत आणि पानातल्या भातावर किंवा पोळीवर त्याची धार धरत. वासूभटजींनी त्यांच्या पानात वाढलेल्या पुरणपोळ्यांच्या ढिगावर भरपूर तूप वाढून घेतले. यजमानांनी आग्रह करून आणखी वाढलेल्या पुरणपोळ्याही तुपात चांगल्या भिजवून घेऊन फस्त केल्या आणि तृप्त होऊन ते घरी येऊन झोपले ते कायमचेच. इतका धष्टपुष्ट आणि भरभक्कम असा चांगला चालता फिरता माणूस एवढ्या लहान वयात असा तडकाफडकी जातो हे समजण्यासारखे नव्हतेच, विश्वास ठेवण्यासारखेही नव्हते. कोणी म्हणाले, "त्यांना दृष्ट लागली.", कोणी म्हणाले, "त्यांच्यावर कुणीतरी करणी केली." "त्यांना जोराचा हार्ट अटॅक आला." असे डॉक्टरांनी सांगितले. मग "दृष्ट लागल्यामुळे हार्ट अटॅक आला." किंवा "हार्ट अटॅक यावा म्हणून करणी केली." असे तर्क करण्यात आले.

या दुर्दैवी घटनेमुळे अंत्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळले. दोन तीन खोल्यांचे राहते घर असल्यामुळे ते एकदम रस्त्यावर आले नाहीत, निवा-यासाठी त्यांच्या डोईवर छप्पर होते, पण खाण्यापिण्याचे काय ? थोडी वडिलोपार्जित संपत्ती असेल, वासूभटजींनीही त्यात भर टाकली असेल, जवळचे नातेवाईक असतील आणि त्या कुटुंबाचे गावात खूप मोठे गुडविल होते. यांच्या आधारानेच आता अंत्याला शिकवून तो मिळवता होईपर्यंत गाडा ढकलायचे काम त्याच्या आईवर पडले होते आणि त्या माउलीने ते चांगल्या प्रकारे सांभाळले.

त्या काळातल्या लहान गावांमध्ये वार लावून जेवण्याची पध्दत अस्तित्वात होती. खाऊन पिऊन सुखी असलेल्या कुटुंबांमध्ये एकादा होतकरू मुलगा दर आठवड्यातल्या एका ठराविक वारी जेवायला येत असे. अशी मुले सोमवारी सोमणांकडे, मंगळवारी कुळकर्ण्यांकडे वगैरे जाऊन जेवून येत. अंत्यालाही असे काही 'वार' मिळाले, त्यातला एक वार आमच्या घरी होता. त्या दिवशी घरी जेवणात जे काही अन्न शिजवलेले असेल ते सर्वांच्या जोडीने त्यालाही पोटभर वाढले जात असे. त्यात कसलाही पंक्तीप्रपंच केला जात नसे. आजकाल काही घरांमध्ये ईनमीन तीन माणसे असली तरी तीसुध्दा वेगवेगळ्या वेळी जेवतात आणि काही घरांमध्ये तर ते तीघे वेगवेगळे अन्नपदार्थ खातात. माझ्या लहानपणी तसे नव्हते, अजूनही सगळीकडे तसे झालेले नाही, पण शहरांमध्ये कुठे कुठे ते पहायला मिळते.

तेंव्हा आमच्याच नव्हे तर गावातल्या कोणाच्याच घरात डायनिंग टेबल नव्हते. स्वयंपाक तयार झाला की पाटपाणी करायची, म्हणजे जमीनीवर ओळीने पाट मांडायचे, त्यांच्या समोर ताटे, वाट्या, पाणी पिण्याची भांडी मांडून ठेवायची, पाण्याने भरलेले तांबे ठेवायचे. त्यानंतर घरातल्या सगळ्यांना जेवण करायला बोलवायचे. घरात जास्त माणसे असली आणि तेवढे पाट मांडायला जागा नसली तर मग मुलांची, पुरुषांची, बायकांची वगैरे निरनिराळ्या पंगती बसायच्या. जितके पाट मांडले असतील त्यावर बसणारी सगळी मंडळी येऊन स्थानापन्न झाल्यानंतर वाढायला सुरुवात होत असे. आधीच वाढून ठेवले तर त्या अन्नावर माश्या बसतील किंवा हळूच मांजर येऊन त्यात तोंड घालेल अशी भीती दाखवली जात असे. त्यामुळे हाक आली की सगळे पटापटा येऊन पाटावर बसत असत. आपल्यामुळे पंगतीचा खोळंबा होऊ नये म्हणून 'वार'करी मुलगा आधीच येऊन बसलेला असे. त्याप्रमाणे अंत्याही जेवणाच्या वेळेच्या थोडे आधी येत असे आणि माझ्याबरोबर गप्पा मारत किंवा खेळत बसत असे. काळानुसार परिस्थिती बदलत गेली आणि अंत्याचे आमच्या घरी जेवायला येणे थांबले. तरीही शाळेत आणि मैदानात आम्ही रोज भेटत असू, कधी कधी अभ्यास किंवा खेळण्यासाठी तो आमच्या घरीही येत असे. त्यामुळे आमच्या मैत्रीत काही फरक पडला नाही. शाळा संपेपर्यंत आमची चांगली गट्टी होती.

शालांत परीक्षेला पूर्वी मॅट्रिकची परीक्षा म्हणत असत. आमच्या वेळेपर्यंत त्याला आधी एसएससी आणि नंतर एसएसएलसी अशी नावे दिली गेली असली तरी मॅट्रिक हेच नाव सगळ्या लोकांच्या तोंडी येत असे. मॅट्रिक झाल्यानंतर सगळ्या मुलांची पांगापांग झाली. ती होणार हे आधीपासूनच सर्वांना माहीत असल्यामुळे सगळ्यांनी तशी मनाची तयारी केलेली होती. रिझल्ट लागल्यानंतर मी सायन्स कॉलेजसाठी मुंबईला चालला गेलो. अंत्या नोकरीच्या शोधात पुण्याला गेला असे समजले. दोन सव्वादोन वर्षे आमची भेट झाली नाही.

मी पुण्याच्या इंजिनियरिंग कॉलेजमध्ये दाखल होऊन तीन चार महिने झाल्यानंतर एकदा तो माझा पत्ता शोधत आमच्या होस्टेलवर आला. त्याला पाहताच माझ्या आनंदाची परमावधी झाली. मधल्या काळात शाळेतल्या सगळ्याच मित्रांशी संपर्क तुटला होता. आता अंत्याकडून पुण्यातल्या मित्रांचे पत्ते लागतील, सवडीने त्यांच्याही भेटी होतील वगैरे मांडे मी मनातल्या मनात खाल्ले. अंत्या कुठे नोकरीला लागला होता ते त्याने सांगितले, पण ते नाव ऐकल्यानंतर तो कारखाना होता की छापखाना होता की दुकान होते याचा मला उलगडा झाला नाही. मीही त्याला जास्त खोदून विचारले नाही. बहुधा त्याच भागात तो रहातही असावा, कदाचित तसे नसेलही. त्याने सांगितलेला त्याच्या राहण्याचा पत्ताही मला त्या वेळी समजला नाही. सरड्याची धाव कुंपणापर्यंत असते त्याप्रमाणे माझ्या पुण्याबद्दलच्या ज्ञानाची सीमा शिवाजीनगरपासून डेक्कन जिमखान्यापर्यंतच होती. लकडी पुलाच्या पलीकडे असलेल्या मुख्य पुण्यनगरीमधल्या निरनिराळ्या वारांच्या पेठा आणि त्यातले गणपती, मारुती, त्यांच्या नावांचे गल्लीबोळ वगैरेंच्या भूलभुलैयामध्ये शिरण्याचे धाडस मी अजून केलेले नव्हते. मला त्यासाठी वेळही मिळाला नव्हता आणि कारणही पडले नव्हते. अंत्याबरोबर दोन घटका बोलून जुन्या आठवणींची वरवर उजळणी झाली, काही ताज्या बातम्या समजल्या. त्याच्याच सहाय्याने आता पुणे समजून घ्यायचा विचार आणि तसे प्रयत्न मी बोलतांना करत होतो.

त्यानंतर दोन तीनच दिवसांनी सकाळीच अंत्या माझ्या रूमवर आला. मला लवकर ब्रेकफास्ट करून कॉलेज गाठायचे होते. त्यालाही माझ्या बरोबर मेसमध्ये घेऊन गेलो आणि गेस्ट म्हणून नोंद केली. तिथले ब्रेड, बटर, सॉस,  ऑम्लेट वगैरे त्याला भयंकर आवडले. इतके की दोन दिवसांनी तो पुन्हा सकाळी येऊन हजर झाला आणि येत राहिला. असे तीनचार वेळा झाल्यानंतर मात्र मला त्यावर विचार करावा लागला. त्या कालखंडात आमची आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती. शक्य तितकी काटकसर करून आणि आपल्या शिक्षणावर कमीत कमी खर्च करून तो भागवण्याचा प्रयत्न मी करत होतो. महिन्याचा सगळा जमाखर्च मला घरी पाठवावा लागत होता. अचानक माझे मेसबिल वाढणे मला परवडण्यासारखे नव्हते. शिवाय इतर मुलांनी रेक्टरकडे तक्रार केली तर त्याचा प्रॉब्लेम आला असता. यामुळे आता पुन्हा जेंव्हा अंत्या येईल तेंव्हा भीड न बाळगता त्याला स्पष्टपणे नकार द्यायचा असे मी मनात ठरवले. पण ती वेळ येणारच नाही हे मला त्या वेळी ठाऊक नव्हते.

दर रविवारी संध्याकाळी आमच्या मेसला सुटी असे. त्या दिवशी आम्हाला बाहेरच खावे लागत असे. काही मुले आपापल्या स्थानिक नातेवाईकांकडे जाऊन त्यांना भेटून आणि त्यांच्याकडे घरचे अन्न खाऊन पिऊन येत असत. माझ्या होस्टेलमधल्या चारपाच मित्रांसह मी जंगली महाराज रोडवरली चालती फिरती शोभा पहात आणि त्यावर भाष्य करत डेक्कनपर्यंत फिरत फिरत गेलो. त्यात आमच्या गप्पा मस्त रंगल्या होत्या. आम्ही पूना कॉफी हाउसपर्यंत जाऊन पोचलो तेवढ्यात समोरच्या फुटपाथवर मला अंत्या दिसला. त्याची आणि माझी नजरानजर होते न होते तेवढ्यात पीएमटीची एक बस आमच्या मध्ये येऊन ट्रॅफिक जाम मध्ये उभी राहिली. हीच घटना महिनाभरापूर्वी घडली असती तर मी आधी जागच्या जागी उभा राहिलो असतो, थोडे मागे किंवा पुढे जाऊन अंत्याला हात दाखवला असता, मी रस्त्याच्या पलीकडे गेलो असतो किंवा तो मधला रस्ता ओलांडून अलीकडे आला असता. माझ्या नव्या मित्रांना सोडून मी त्याच्याबरोबर कुठे तरी गेलो असतो.

पण त्या दिवशी मी तसे केले नाही. रस्त्याकडे पाठ फिरवून मित्रांच्या सोबत पूना कॉफी हाउसमध्ये चाललो गेलो. कमीत कमी किंमतीत जास्तीत जास्त भूक भागवणारा मसाला डोसा खाल्ला आणि मित्रांच्या टोळक्याबरोबर परत रूमवर गेलो. मी काही तरी चुकीचे वागलो अशी पुसटशी जाणीव मनात होत होती, पण दोन दिवसांनी अंत्या आला की आधी त्याला सॉरी म्हणायचे आणि नंतर ठरवलेल्या इतर गोष्टी त्याला सांगायच्या असा विचार करून मी शांतपणे झोपलो. अठरा वर्षाच्या मुलाने यापेक्षा वेगळे वागायलाच हवे होते असे मला नंतरही कधी वाटले नाही. पण त्या दिवसानंतर अंत्या माझ्याकडे आलाच नाही आणि त्यामुळे ती सल मनातच राहून गेली.

मला पूना कॉफी हाउसमध्ये शिरतांना अंत्याने नक्कीच पाहिले असणार. माझ्यासोबत कोणी होते की नाही हे त्याने कदाचित पाहिलेही नसेल. पण मला त्याच्याकडे पाठ फिरवून जातांना पाहून तो मनातल्या मनात काय समजायचे ते समजला किंवा त्याने नको तो गैरसमज करून घेतला कोण जाणे. त्यामुळे रागावून त्यानेही माझ्याकडे पाठ फिरवली की त्यामागे आणखी कोणते कारण होते तेही समजायचा मार्ग नव्हता. त्याच्या ऑफीसचा किंवा घराचा पत्ता मी लिहून घेतला नव्हता आणि "चिमण्या मारुतीच्या पुढे आणि कावळ्या गणपतीच्या अलीकडे" अशा प्रकारचा त्याने तोंडी सांगितलेला पत्ता मला तेंव्हाही लक्षात आला नव्हता, त्यामुळे मी तो विसरून गेलो होतो. त्या रविवारनंतर पहिले आठ दहा दिवस तो आला नाही याचे मला बरेच वाटले होते, पण त्यानंतर त्याने एकदा यावे, वाटल्यास आणखी एक दोन वेळा आमच्या मेसमधला ब्रेकफास्ट खावा असे वाटायला लागले. पण आता एवढ्या मोठ्या पुण्यात मी त्याला कुठे आणि कसा शोधणार होतो? रस्त्यामधून जाता येता माझी नजर भिरभरत त्याला शोधत असे. विशेषतः डेक्कन जिमखान्यावरल्या त्या स्पॉटवर मी पुन्हा पुन्हा रोखून पहात होतो, पण तो तिथेच पुन्हा कसा दिसणार? मी पुण्यात असेपर्यंत मला अंत्या कुठेच भेटला नाही. शिक्षण संपल्यावर मीही पुणे सोडून मुंबईवासी झालो. मागल्या गोष्टी विसरून पुढे जात राहिलो.

अंत्या मला पुण्यात भेटला होता तेंव्हाच अनंता झाला होता, अनंतरावही झाला असणार. पण तो आता कुठे आहे कोण जाणे. त्याला कधी तरी माझी आठवण येत असेल का?

No comments: