Thursday, August 15, 2013

अरिहंत आणि सिंधूरक्षक

नौकेमधून जलविहार, नावेमधून वाहतूक वगैरे क्रिया पुरातन काळापासून चालत आल्या आहेत. उतारूंना नदी पार करून नेणारा एक नावाडी रामायणात आहे आणि नौकेमधून व्यापार करण्यासाठी परगावी व परदेशी जाणारा साधूवाणी सत्यनारायणाच्या कथेत येतो. जेंव्हा जगबुडी आली होती तेंव्हा नोहाने पृथ्वीवरील सर्व पशुपक्षी, प्राणीमात्रांच्या प्रजातींना आपल्या नौकेमधून सुखरूप नेऊन वाचवले अशी पाश्चात्यांची दंतकथा आहे. लाकडापासून तयार केलेल्या होड्या, नावा, जहाजे वगैरे प्रवासाची साधने प्राचीन काळापासून सगळीकडे चालत आली आणि त्यातली काही साधने आजतागायत अस्तित्वात आणि उपयोगात आहेत. पोलादाच्या पत्र्यापासून जहाजांची बांधणी करण्याचे काम औद्योगिक क्रांतीनंतर सुरू झाले, त्यांचे कारखाने उभारले गेले आणि त्यांमधून लहान, मोठी, अतीप्रचंड, अती वेगवान वगैरे निरनिराळ्या प्रकारांच्या नौका, होड्या, तराफे, आगबोटी वगैरे तयार होत गेल्या. त्यातही मुख्यत्वे प्रवाशांची किंवा सामानाची वाहतूक करणारी आणि युध्दामध्ये शत्रूवर हल्ला करणारी असे दोन गट असतात. त्यांच्या गरजांनुसार त्यांची बांधणी केली जाते. एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंतच्या काळात नदी किंवा सागरामधील पाण्याच्या पृष्ठभागावरूनच या सगळ्या नौका तरंगत पुढे जात असत. काही कारणाने त्यातली एकादी नाव एकदा बुडली तर तिला कायमची जलसमाधी मिळत असे. पाण्याच्या पातळीच्या खाली राहून लपत छपत पुढे जायचे आणि शत्रूच्या मोठ्या आगबोटीच्या तळाला जोराचा तडाखा देऊन भगदाड पाडायचे प्रयत्न दोन तीन शतकांपासून केले जात होते. अशा प्रकारच्या लहान पाणबुड्या लाकडांपासूनसुध्दा तयार केल्या गेल्या होत्या. पण त्यांच्या बांधणीमध्ये अनेक त्रुटी उरलेल्या असल्यामुळे त्या फारशा भरोसेमंद किंवा परिणामकारक ठरत नव्हत्या. पहिल्या महायुध्दात मात्र जर्मनीने पाणबुड्यांचा चांगला वापर केला आणि शत्रूपक्षाची म्हणजे इंग्लंडची मोठी जहाजे बुडवून त्यांना चकित केले. इंग्लंड आणि अमेरिकेकडेसुध्दा पाणबुड्या तयार होत्याच. त्यांनीही त्यांचा वापर सुरू केला.

पाणबुडी आणि विमान या दोन्ही साधनांची भेदक शक्ती पहिल्या महायुध्दात दिसून आल्यामुळे त्यानंतर त्यांच्या विकासावर अगदी युध्दपातळीवर प्रयत्न केले गेले आणि दुस-या महायुध्दातील सागरी आणि हवेमधील युध्दातली ती प्रमुख अस्त्रे बनली. दुस-या महायुध्दाने क्षेपणास्त्रे आणि अण्वस्त्रे जगासमोर आणली. त्यानंतरच्या काळात या दोन्हींवर अधिकाधिक भिस्त टाकली जात आहे. देशाच्या संरक्षणाची ती आता प्रमुख साधने झाली आहेत. अरिहंत आणि सिंधूरक्षक या अत्याधुनिक पाणबुड्यांच्या संदर्भात ही पार्श्वभूमी महत्वाची आहे. ही दोन नावे गेल्या काही दिवसांमध्ये अचानक प्रमुख बातम्यांमध्ये समोर आली. अरिहंत या पाणबुडीवरील रिअॅक्टर अलीकडे कार्यान्वित झाला आणि अमेरिका, रशीया, चीन यांच्यासारख्या जगामधील निवडक प्रमुख देशांच्या पंक्तीत भारताला स्थान मिळाले ही उत्साहवर्धक बातमी होती तर सिंधूरक्षक या अत्याधुनिक पाणबुडीवर अचानक एक मोठा स्फोट होऊन त्यात ती जवळजवळ नष्ट झाली आणि तिथे काम करणारे अठराजण म्हणजे देशाचे १८ अनमोल हिरे आपण नाहक गमावले ही अत्यंत दुःखद आणि धक्कादायक दुर्घटना काल घडली. या दोन्ही पाणबुड्यांची अगदी त्रोटक माहिती पुढीलप्रमाणे आहे.

अरिहंत
लांबी ११२ मीटर, रुंदी १५ मीटर, पाण्यात बुडालेली उंची किंवा खोली १० मीटर, डिस्प्लेसमेंट सुमारे ६००० टन
प्रत्येक मजल्यावर दोन बेडरूम्सचे (टू बीएचकेचे) वीस वीस फ्लॅट असलेली तीन मजली बिल्डिंग साधारणपणे एवढ्या आकाराची असते. यावरून आकाराची कल्पना येईल. 
वेग पाण्यावर ताशी २२-२८ किलोमीटर, पाण्याखाली ताशी ४४ किलोमीटर
३०० मीटर खोलवर जाऊन काम करू शकते.
ऊर्जेचा स्त्रोतः अॅटॉमिक ऱिअॅक्टर 

सिंधूरक्षक
लांबी ७३ मीटर, डिस्प्लेसमेंट सुमारे ३००० टन
३०० मीटर खोलवर जाऊन काम करू शकते.
वेग ताशी ३३ किलोमीटर,
ऊर्जेचा स्त्रोतः डिझेल इलेक्ट्रिक

या दोन्ही पाणबुड्यांवर कोणत्या प्रकारची किती शस्त्रास्त्रे ठेवता येतील ही माहिती अर्थातच अत्यंत गुप्त ठेवली जाते. पूर्वीच्या काळातले योध्दे हातात तलवार किंवा गदा घेऊन अमोरसमोर येऊन एकमेकांशी झुंजत असत, काही वीर धनुष्यबाण, भाला, बरची वगैरे हाताने फेकून मारा करणारी शस्त्रास्त्रे घेऊन लढत असत. त्यात पिस्तुले, बंदुका, तोफा वगैरेंची भर पडल्यावर शत्रूपासून थोडे अंतर दूर राहून त्याच्या सैन्यावर मारा केला जाऊ लागला. पण तो मारा अचूकपणे फक्त सैन्यावरच करता येणे कठीण असल्यामुळे शत्रुपक्षाची शहरे, कारखाने, पूल, धरणे वगैरेंवर तोफांमधून आणि विमानामधून बाँबगोळे टाकणे सुरू झाले. सागरी युध्दामध्ये पूर्वीच्या काळात युध्दनौकाच एकमेकांमध्ये लढत, प्रवासी आणि मालवहातूक करणारी जहाजे बुडवणे नंतरच्या काळात सुरू झाले. त्यात पाणबुड्यांना त्या जहाजांच्या थोडे तरी जवळ जावे लागत असे. आता क्षेपणास्त्रांचे युग आहे. शेकडो किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या एकाद्या गुप्त ठिकाणामधून उडवलेली क्षेपणास्त्रे (मिसाईल्स) त्यांच्या लक्ष्याचा अचूक वेध घेतात. पण पहिल्यांदा वार करणा-या देशाने शत्रुपक्षाची अशा प्रकारची सगळी ठिकाणेच एका फटक्यात उध्वस्त केली तर त्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी (सेकंड स्ट्राईक केपेबिलिटी) असणे आवश्यक असते. या दृष्टीने रचल्या जात असलेल्या आजच्या युध्दनीतीमध्ये आवश्यक असलेली लांब पल्ल्याची अस्त्रे या दोन्ही प्रकारच्या पाणबुड्यांवर ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे.

अरिहंत हे नाव मी काही दिवसांपूर्वी पहिल्यांदा ऐकले आणि सिंधूरक्षक हे नाव तर कालच ऐकले. असे असले तरी या दोन्ही पाणबुड्यांशी माझा खूप दूरचा अप्रत्यक्ष संबंध पूर्वी येऊन गेला होता. अनेक वर्षांपूर्वी आमच्या कॉलनीमध्ये असलेल्या रस्त्यावरून रोज एक खास बस जात असे आणि त्यात नेव्हीचा गणवेश धारण केलेले लोक बसलेले दिसत. ते कदाचित आमची सुरक्षा पहायला आले असतील असे आधी वाटले, पण त्यासाठी रोज रोज येण्याचे काही कारण नव्हते. त्यांचा एकादा नवा सीक्रेट प्रॉजेक्ट असणार याची कल्पना आली. खात्यात इतकी गुप्तता बाळगली जाते की कोणता माणूस नेमके कोणते काम करतो हे कोणीही कधीही सांगू शकत नाही. पण एकाद्याच्या एरवीच्या बोलण्यात हल, डेक असे अनोळखी शब्द यायला लागले की त्याचा आगबोटीशी काही संबंध येत असणार असा तर्क करता येतो. ज्या कारखान्यांमध्ये आमच्या पॉवर प्रॉजेक्टसाठी लागणारी यंत्रसामुग्री तयार केली जाते त्याच कारखान्यात संरक्षण खात्यासाठी लागणारी विशिष्ट प्रकारची यंत्रसामुग्रीही बाजूलाच तयार होत असल्यामुळे तीही दिसत असे. त्यांची नावे आणि उपयोग त्या कारखान्यातल्या लोकांपासून सुध्दा गुप्त ठेवली जातात किंवा त्यांना मुद्दाम भलतीसलती नावे दिली जातात. असे असले तरी त्यांची रचना आणि आकार पाहून थोडा अंदाज येतो. अणुशक्ती, संरक्षण खाते आणि आगबोट या तीन्ही गोष्टी एकत्र आल्या तर त्याची परिणती न्युक्लियर पॉवर्ड सबमरीनमध्ये होणार असे वाटत होते. त्याची बातमी वाचल्यावर तो अंदाज खरा ठरला. पाणबुड्यांचे प्रशिक्षण घेण्यासाठी रशीयाला जाऊन आलेले एक गृहस्थ मला एकदा भेटले होते. पाणबुडी केवढी अवाढव्य असते आणि तरीही आतमध्ये ती कमालीची कंजस्टेड असते वगैरे मला त्यांच्याकडून कळले होते. आपल्या पूर्वीच्या उत्साही राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील एकदा पाणबुडीच्या आत जाऊन पाहणार होत्या, पण ते शक्य झाले नाही अशी बातमीही वाचली होती. सिंधूरक्षकची बातमी ऐकल्यावर त्याची आठवण झाली.   


No comments: