Tuesday, July 09, 2013

विठ्ठल किती गावा ? (भाग १)

बरोबर पन्नास वर्षांपूर्वी जून महिन्यात मी पुण्यनगरीत पहिल्यांदा पाऊल ठेवले. त्यापूर्वी या शहराबद्दल माझ्या वाचनात थोडे फार आले होते. 'शिक्षणाचे माहेरघर', 'महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी' वगैरे पुण्याची ख्याती होतीच. महात्मा फुले, लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे आदि थोर पुरुषांची ती कर्मभूमी होती. ना.सी.फडक्यांच्या कादंब-यांमधली वर्णने वाचतांना हे एक रम्य आणि रोमँटिक ठिकाण वाटत होते. "रोज सकाळी फोडणीच्या वरणासोबत साधा भात आणि संध्याकाळी फोडणीचा भात आणि साधे वरण खाऊन उरलेली पै न पै शिल्लक टाकायची आणि त्या शिल्लकेमधून आयुष्याच्या अखेरीला (त्या काळातल्या गावाबाहेरच्या आणि ओसाड अशा) डेक्कन जिमखान्यावर 'श्रमसाफल्य' यासारख्या नावाची एक लहानशी बंगली बांधायची यात जीवनाची इतिकर्तव्यता मानणारा म्हणजे पुणेकर." अशा अर्थाचे वाक्य पुलंनी एका ठिकाणी असे लिहिले होते. वाचलेल्या अशा काही वर्णनांमधून पुण्याची एक प्रतिमा मनात तयार झाली होती. डेक्कन जिमखाना म्हणजे श्रमपरिहार करण्यासाठी नेहमी निवांतपणे आरामखुर्चीवर बसून राहणा-या वृध्दांचा शांत परिसर असावा आणि त्या भागातल्या शाळाकॉलेजांमधली मुले मुली थोडासा गोंगाट करून त्या शांततेचा भंग करीत असावेत अशी त्या भागासंबंधीची एक विचित्र कल्पना माझ्या मनात होती. त्यापेक्षा फारच वेगळे दृष्य मला पहिल्याच दिवशी तिथे पहायला मिळाले.

इंजिनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमधून निघून जंगली महाराज रोडवरून डेक्कन जिमखान्यापर्यंत फेरफटका मारतांना तो रस्ता माणसांनी तुडुंब भरलेला दिसला. बाजूच्या फर्ग्यूसन रोडवर तर त्याहीपेक्षा जास्त गर्दी होती. त्या काळातसुध्दा मुंबई म्हणजे अती गजबजलेले शहर होते, पण मला पुण्यामधली त्या दिवशीची गर्दी कमालीची वाटली. त्याहूनही जास्त आश्चर्याची गोष्ट अशी होती की धोतर नेसलेले, कपाळावर गंधाचा टिळा आणि बुक्का लावलेले आणि डोक्यावर पांढरी टोपी किंवा पागोटे धारण केलेले पुरुष आणि नऊ वार लुगडी नेसलेल्या स्त्रिया अशा खेडुतांची संख्या त्यात प्रचंड प्रमाणात होती. डेक्कन जिमखान्यासारख्या पॉश समजल्या जाणा-या भागात मला याची अपेक्षा नव्हती. होस्टेलवरच्या अनुभवी विद्यार्थ्यांकडून याचा उलगडा झाला. आळंदीहून निघालेली ज्ञानेश्वर महाराजांची आणि देहूहून आलेली तुकाराम महाराजांची अशा दोन्ही पालख्यांचा त्या दिवशी पुण्यात मुक्काम होता. त्यापूर्वी मला या पालख्यांची माहिती नव्हती. तिथून ते सगळे वारकरी पुढे पायी चालत पंढरपूरला जाणार होते आणि आषाढी एकादशीपर्यंत तिथे पोचणार होते. 'आषाढीकार्तिकी'ला पंढरपुरात 'चंद्रभागातीरी' गोळा होणा-या असंख्य 'भक्तजनां'विषयी मी ऐकले होते, पण तिकडे जायला निघालेल्या भक्तांचा तो पुण्यातच जमा झालेला महासागर पाहून मी चकित होऊन गेलो. त्या गर्दीतले सगळेच भाविक लोक 'विठूनामा'चा गजर करीत पंढरपूरपर्यंत चालत जाणारे नसले तरी न जाणारे लोक सुध्दा संतांच्या पालख्यांच्या दर्शनासाठी भक्तीभावाने तिथे जमले होते. मागे राहिलेले विठ्ठलभक्तसुध्दा एकादशीच्या दिवशी उपास करणार, घराजवळच्या देवळात जाऊन विठोबाचे दर्शन घेणार, निदान घरात ठेवलेल्या त्याच्या प्रतिमेची भक्तीभावाने पूजा करणार, त्याच्यासमोर अभंगवाणी गाऊन त्याची स्तुती आणि प्रार्थना करणार होते यात शंका नव्हती.

आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या वारीला पंढरीला जाणा-या भाविकांची गर्दी दरवर्षी वाढत जाते आणि त्याचे नवनवे उच्चांक स्थापित होतात असेच दिसते. इतक्या लोकांच्या मनात हा अमाप भक्तीभाव, ही गाढ श्रध्दा वगैरे भावना कशामुळे उत्पन्न होतात याचा तर्कशुध्द उलगडा मला आजवर झालेला नाही. ज्याला विठ्ठल, विठोबा, विठूराया, पांडुरंग वगैरे अनेक नावांनी त्याचे भक्त आळवतात, विठाई, विठू माउली अशा नावांनीसुध्दा ज्याला संबोधतात, अशा त्या विठ्ठलाचे एवढे जबरदस्त आकर्षण कशामुळे निर्माण होते याबद्दल अनेक संतांनी त्यांच्या रचनांमध्ये सांगून ठेवले आहे. पिढ्यानपिढ्या लहानपणापासून ज्या लोकांच्या कानावर हे अभंग पडत गेले असतील, त्यांच्या मनावर त्यांचा अर्थ खोलवर बिंबत गेला असणार, आपल्या परंपराप्रिय समाजात वारीला जाण्याची प्रथा सुध्दा वडिलांकडून मुलाकडे अशी पुढे पुढे चालत राहिली असणार. पण तो उपक्रम नुसताच जुलुमाचा रामराम असता तर पुढल्या पिढीतल्या लोकांनी एकादे निमित्य दाखवून कधीच बंद करून टाकला असता. तसे न करता अधिकाधिक लोक उत्स्फूर्तपणे यात सामील होऊ लागले आहेत, याचा अर्थ त्यातून त्यांना आर्थिक फायदा नसला तरी मानसिक लाभ तरी मिळत असणार.

दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमाराला मुंबईपुण्यासह सगळ्या शहरांमध्ये खास सांगीतिक कार्यक्रम केले जातात. योजना प्रतिष्ठान या संस्थेतर्फे झालेल्या या अभंगवाणीच्या कार्यक्रमाला मी ओळीने अनेक वर्षे हजेरी लावलेली आहे. स्व.पं.शिवानंद पाटील, अजित कडकडे, सुरेश वाडकर, साधना सरगम यासारख्या लोकप्रिय गायकांनी गायिलेले अभंग त्यात ऐकले आहेत. एकादशीच्याच दिवशी या कार्यक्रमाला येणे अनेक प्रेक्षकांना सोयीचे नसल्यास त्याच्या तीन चार दिवश आधीपासून ते ठेवले जातात. या वर्षी तर अशा प्रकारचा एक खास कार्यक्रम दोन आठवडे आधीच होऊन गेला. सर्व वयोगटांमधल्या श्रोत्यांनी त्याला चांगली हजेरी लावली आणि नवोदित कलाकारांच्या गायनाला देखील उत्स्फूर्त दाद दिली.  

या विठ्ठलाबद्दल इतिहासकाळामधल्या संतांपासून आजच्या युगातल्या गीतकारांपर्यंत अनेकांनी काय सांगितले आहे याचा अत्यंत त्रोटक आढावा या लेखमालिकेत घेण्याचा एक लहानसा प्रयत्न यंदाच्या वारीच्या निमित्याने मी करणार आहे. संतश्रेष्ठ तुकाराम यांच्यासाठी तर विठ्ठल हे त्यांचे सर्वस्व होते.  काया, वाचा. मनसा ते सतत त्याचेच ध्यान करत असत. तो त्यांच्या चित्ती वास करत असला तरीसुध्दा त्याचे नाव जिभेवर घेतांना, त्याची गीते गातांना त्यांना अतीशय आनंद वाटत असे. त्यांना लौकिक धनदौलतीचा मोह नव्हताच. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना उंची वस्त्रालंकारांचा नजराणा भेट म्हणून पाठवला तेंव्हा ही संपत्ती आम्हाला तृणासमान आहे असे म्हणून त्यांनी तो साभार परत पाठवला. विठ्ठलाचे भजन गात असतांना साथीसाठी उपयोगी पडणारे टाळ आणि चिरळ्या त्यांच्यासाठी अनमोल द्रव्यासारख्या होत्या. विठ्ठलाचे नाव घेतल्याने त्यांना अमृताचा घोट घेतल्याप्रमाणे संजीवनी प्राप्त होत असे. त्यातून त्यांच्या सर्वांगाला चैतन्य मिळत असे.

विठ्ठल हा चित्तीं । गोड लागे गातां गीतीं ॥१॥
आम्हां विठ्ठल जीवन । टाळ चिपुळिया धन ॥२॥
विठ्ठल विठ्ठल वाणी । अमृत हे संजीवनी ॥३॥
रंगला या रंगे । तुका विठ्ठल सर्वांगें ॥४॥

विठ्ठलाची गीते गातांना त्यांच्या अंतरंगात होणारे परिणाम या अभंगात आहेत, तर या गायनभक्तीमुळे सर्वांचाच उध्दार व्हावा यासाठी खाली दिलेल्या अभंगातून ते सगळ्या जनतेला उपदेश करत असतात. विठ्ठलाचे मनात स्मरण करावे, मुखाने त्याची गीते गावीत आणि विटेवर उभे असलेले त्याचे रूप डोळ्यांनी पहावे असे ते सांगतात. हे करण्यामध्ये त्यांचाच फायदा कसा आहे हे पुढील कडव्यांमध्ये दिले आहे. अनाथ लोकांसाठी तो भाऊ होऊन त्यांची काळजी घेतो. हाच आशय जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे या अलीकडच्या गाण्यामध्ये आहे. आपला सध्याचा जन्म म्हणजे एक पासिंग फेज आहे. याच्या आधी अनेक जन्म होऊन गेले असतील आणि नंतरही होणार आहेत अशी हिंदू धर्माची परंपरागत शिकवण आहे. संत तुकारामाच्या काळात तर याबद्दल कोणालाही शंका नव्हती. त्यामुळे सर्वगुणसंपन्न आणि सर्वशक्तीमान विठ्ठलाला जो कोणी शरण जाईल त्याला तो मुक्ती देईल हे खूपच मोठे आमिश त्यांनी दाखवले आहे. त्याचे नाव घेऊन त्याचे गीत गातांना त्यात तल्लीन होऊन समाधी लागली तर त्या अनुभवामधून तोंड तर गोडावणारच ना ? 

विठ्ठल गीतीं गावा, विठ्ठल चित्तीं ध्यावा ।
विठ्ठल उभा पहावा विटेवरी ॥१॥
   अनाथांचा बंधु विठ्ठल कृपासिंधु ।
   तोडी भवबंधु यमपाश ॥२॥
तो चि शरणांगतां विठ्ठल मुक्‍तिदाता ।
विठ्ठल या संतांसमागमें ॥३॥
    विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्वसिद्धि ।
    लागली समाधि विठ्ठल नामें ॥४॥
विठ्ठलाचें नाम घेतां झालें सुख ।
गोडावलें मुख तुका म्हणे ॥५॥

मागल्या आठवड्यात मी जो अभंगवाणीचा कार्यक्रम ऐकला त्यातल्या गायकाचे अस्पष्ट उच्चार, मायक्रोफोनमधून होणारे डिस्टॉर्शन आणि कदाचित माझ्या ऐकण्यात होणारी गफलत या सगळ्यांचा मिळून असा परिणाम झाला की मला हा अभंग सारखा "विठ्ठल किती  गावा" असा ऐकू येत होता. मग मनात विचार आला की संत तुकारामांचे शब्द वेगळे असले तरी निरनिराळ्या संतांनी, कवींनी आणि गायकांनी विठ्ठलाचे गुणगायन किती प्रकारे केले आहे हे सांगणारा एक लेख लिहिण्यासाठी 'विठ्ठल किती गावा' हे शीर्षक चांगले आहे

.  . . . . . . . . . . . .  . . . . . . . ..  . ..  .. . .  . . ..  . . . . ( क्रमशः)

No comments: