Saturday, July 27, 2013

स्मृती ठेवुनी जाती - ८ - रवी काळे

जमखंडीच्या काळे रावसाहेबांचा धाकटा मुलगा रवी शाळेत माझ्याहून एक वर्षाने पुढे होता, वयाने कदाचित तो त्यापेक्षा जरासा जास्त मोठा असेल. तो नक्कीच माझ्यापेक्षा जास्त हुषार आणि समजूतदार होता. लहान वयात असतांना मला हे समजत असेल की नसेल कोण जाणे, पण माझ्या कळत नकळत मी त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत होतो एवढे मात्र खरे. त्या काळात त्याला माझ्याबद्दल काय वाटत होते किंवा काहीच वाटत नव्हते, त्याचे माझ्याकडे कितपत लक्ष होते वगैरे समजायचा मार्ग नाही. लहानपणी असले विचारसुध्दा कधी मनात आले नसतील आणि आता त्यावर विचार करून काही उपयोग नाही.

आमचे दोघांचेही प्राथमिक शाळेतले म्हणजे चौथीपर्यंतचे शिक्षण एका शाळेच्या इमारतीत, पाचवी ते सातवीसाठी मिडल् स्कूल दुसरीकडे आणि त्यानंतर हायस्कूलचे तिस-या ठिकाणी असे झाले. यामुळे आम्ही सलगपणे सगळी वर्षे एकाच शाळेत गेलो नाही, त्यात दोन वेळा खंड पडला. त्या काळात इयत्तेनुसार आणि त्यात पुन्हा तुकडीनुसार मुलांचे लहान लहान गट तयार होत असत. त्यामुळे माझ्या जवळच्या मित्रांचे कोंडाळे आणि रवीच्या दोस्तांचे टोळके वेगवेगळे होते. त्यात रवीचे जिगरी दोस्त नेहमीच त्याला वेढा घालून बसलेले असायचे. त्यामुळे मी त्याला थोड्या अंतरावरूनच पहात होतो. 'एक ओळखीचा मुलगा' याहून जास्त आणि 'जिवलग मित्र' याहून कमी असे एक नाते आमच्यामध्ये तयार होत गेले. लहानपणी आमची खूप गट्टी काही जमली नाही.

आपल्या वडिलांप्रमाणे रवीसुध्दा वर्णाने गोरा होता, अंगाने धष्टपुष्ट आणि दिसायला देखणा होता. कुशाग्र बुध्दीचे देणे त्याला मिळाले होते, दर वर्षी शाळेच्या प्रत्येक परीक्षेत तो पहिला नंबर मिळवत गेला. शिवाय वक्तृत्वस्पर्धा, निबंधस्पर्धा यासारख्या एक्स्ट्राकरिक्यूलर अॅक्टिव्हिटीजमध्येही भाग घेऊन बक्षिसे मिळवत होता. उत्साही आणि बोलका स्वभाव, हजरजबाबीपणा वगैरे गुणांमुळे शिक्षकांसह सर्वांनाच तो प्रिय होता. त्याच्यातल्या नेतृत्वगुणांमुळे त्याच्या मित्रमंडळींचा तो प्रमुख नेता होता. त्यांचा ग्रुप शाळेतल्या कट्यावर एकाद्या ठिकाणी जमून अगदी खळखळून हास्यविनोद, थट्टास्करी, टिंगलटवाळी वगैरे करतांना दिसत असे. एका शब्दात सांगायचे झाल्यास तो सर्वगुणसंपन्न होता. आमच्या शाळेतला त्या काळातला 'हीरो' होता. त्यामुळे त्याला फॉलो करावेसे वाटल्यास त्यात नवल नव्हते.

आम्ही शाळेत शिकत असतांना देशाची भाषावार राज्यपुनर्रचना झाली. मुंबई, मद्रास आणि हैदराबाद स्टेट्समधले कन्नडभाषी भाग मैसूर संस्थानाला जोडून त्याचे मैसूर राज्य करण्यात आले. काही वर्षांनंतर त्याला कर्नाटक हे नाव दिले गेले. यात आमचे गावसुध्दा मुंबईमधून मैसूरमध्ये गेले. पण राज्य बदलले की लगेच नवी पाठ्यपुस्तके, नवा अभ्यासक्रम, ते शिकवणारे प्रशिक्षित शिक्षक वगैरे तयार होणे शक्य नसते. त्यामुळे या राजकीय बदलाचे परिणाम शिक्षणक्षेत्रात होऊन नव्या राज्यांमध्ये सगळीकडे समान पाठ्यक्रम लागू व्हायला काही वर्षे जावी लागली. मध्यंतरीच्या काळात आमच्या सुरू असलेल्या अभ्यासक्रमात त्यामुळे लगेच काही बदल झाला नाही, फक्त आमच्या शालांत परीक्षा मैसूर राज्यातले बोर्ड घेऊ लागले. सुधीर काळेने म्हणजे रवीच्या मोठ्या भावाने या बोर्डाच्या पहिल्या दहांमध्ये नंबर मिळवला आणि आमच्या हायस्कूलचा नावलौकिक वाढवला. रवीने तो मान नुसता राखलाच नाही तर थेट बोर्डात पहिला नंबर पटकावला आणि शाळेच्या गौरवात मानाचा तुरा खोचला. 

कॉलेजच्या शिक्षणासाठी रवी पुण्याला गेला. त्यानंतर इंजिनियरिंगच्या शिक्षणासाठी मी पुण्याला गेलो तोपर्यंत तो मुंबईला आयआयटी मध्ये दाखल झाला होता आणि नोकरीसाठी मी मुंबईला गेलो तर त्याने पुण्यात नोकरी धरली. अशा प्रकारे आमची चुकामूक होत राहिली. पण कॉलेजच्या सुटीत तोही जमखंडीला येत असे तेंव्हा आमची तिथे भेट होत असे. मी इंजिनियरिंगला जाण्यापूर्वी माझ्या वडिलांच्याबरोबर काळे रावसाहेबांना म्हणजे रवीच्या वडिलांना भेटून आलो होतो आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्याचा मला फायदा झाला होता. त्याशिवाय रवीला भेटून मी इंजिनियरिंगचा अभ्यासक्रम कसा असतो, त्यानंतर कशा प्रकारचे काम असते वगैरेंबद्दल जमेल तेवढे विचारून घेत होतो. त्याने मेकॅनिकल इंजिनियरिंग घेतले होते. त्या शाखेची मी जास्त माहिती करून घेतली. त्याचा माझ्यावर एवढा प्रभाव पडला की मीसुध्दा मेकॅनिकल ब्रँचच घ्यायचे मनोमन ठरवून टाकले. 

पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या काळात सेलफोन किंवा इंटरनेट यासारखी सुलभ प्रसारमाध्यमे नव्हती. पत्र लिहून पोस्टात नेऊन टाकण्याचा भयंकर कंटाळा यायचा. अगदी जवळचे नातेवाईक सोडल्यास इतर कुणाला, त्यात पुन्हा कुठल्याही मित्राला मी कधी पत्र लिहिल्याचे किंवा मला कुणाचे पत्र आल्याचे आठवत नाही. अचानक किंवा ठरवून कोणा मित्राची भेट झाली तरच मग गप्पागोष्टींमधून सगळे काही सांगून आणि ऐकून घेणे होत असे. रवीचा एकादा मुंबईतला वर्गमित्र किंवा पुण्यात राहणारा माझा मित्र भेटला तर आता कोण कोण कुठे कुठे आहे आणि त्यांचे कसे चालले आहे याचे सगळे रिपोर्ट मिळत असत. रवी आता पुण्याला स्थायिक झाल्याचे त्यामधूनच मला कळले.

मध्ये दहा पंधरा वर्षे उलटून गेली. एकदा हैड्रॉलिक मशीन्स या विषयावरल्या एका सेमिनारला मी गेलो होतो. सुरुवातीच्याच एका प्रेझेंटेशननंतर प्रश्न विचारण्यासाठी एक डेलिगेट उभा राहिला. "आय अॅम पी.बी.काळे .." असे त्याने सांगताच मी कान टवकारले आणि वळून त्याच्याकडे पाहिले. रवीचे शाळेतले नाव वेगळे होते आणि त्याची आद्याक्षरे आमच्या हायस्कूलच्या आद्याक्षरांप्रमाणेच पी बी अशी होती हे मला ठाऊक होते. त्याचा आवाज ऐकल्यावर तर तो नक्की रवीच होता याची मला खात्री पटली. ते सेशन संपताच झालेल्या मध्यंतरात मी त्याच्या समोर जाऊन उभा राहिलो आणि 'रवी' अशी हाक मारली. त्यानेही मला लगेच ओळखले. आमच्या दोघांच्याही मेमरीमधल्या जुन्या फायली उघडल्या गेल्या. तो सेमिनार संपेपर्यंत आम्ही दोघे एकमेकाबरोबरच राहिलो आणि सेमिनारच्या कार्यक्रमातून जितका मोकळा वेळ मिळाला तितका वेळ एकमेकांशी बोलत राहिलो.

लहानपणच्या आठवणींची झटपट उजळणी झाल्यानंतर आमच्या संवादाची गाडी वर्तमानकाळात आली. योगायोगाने आम्ही दोघेही आपापल्या ऑफीसात एकाच प्रकारचे तांत्रिक काम करत होतो. किर्लोस्कर ऑइल इंजिन्सच्या फॅक्टरीत तयार होत असलेल्या यंत्रांचे निरनिराळे पार्ट बनवत असतांना त्यांना एका मशीनकडून पुढल्या मशीन मध्ये घेऊन जाण्यासाठी लागणारी ऑटोमॅटिक ट्रान्स्फर मेकॅनिझम्स तो तयार करवून घेत होता आणि पॉवर स्टेशन्ससाठी लागणारी निराळ्या पध्दतीची हँडलिंग मेकॅनिझम्स मी बनवून घेत होतो. या दोन्हींमध्ये हैड्रॉलिक मोटर्स, सिलिंडर्स आणि त्यांना कंट्रोल करण्यासाठी लागणारे पंप, व्हॉल्व्हज वगैरेंचाच मुख्यतः उपयोग केला जात असल्यामुळे त्या विषयावरील परिसंवादाला आम्ही तिथे गेलो होतो. रवीच्या कारखान्यातल्या यंत्रांबद्दल आणि ती डिझाइन करण्यापासून कार्यान्वित करण्यापर्यंत कोणकोणती दिव्ये करावी लागतात आणि त्यात यश मिळाल्यावर होणारा आनंद कसा अलौकिक असतो याबद्दल तो सांगत होता आणि माझे तशा प्रकारचे कडू गोड अनुभव मी सांगत होतो. अशा प्रकारच्या क्रिएटिव्ह कामाची दोघांनाही मनापासून आवड होती आणि दुसरीकडे ते कसे केले जाते हे समजून घेण्यात तितकीच उत्सुकता होती.  बोलताबोलता तो एकदम म्हणाला, "मी वाटल्यास एक जास्तीचा दिवस इथे राहतो, तुझे काम मला दाखवशील का?"
मी सांगितले, "अरे, इथे माझे फक्त ऑफीस आहे आणि त्यात फक्त माझे टेबल आणि खुर्ची आहे. माझी यंत्रे तयार करायचे काम भारतभरात विखुरलेल्या निरनिराळ्या कारखान्यांमध्ये चालते."
तो म्हणाला, "हे कसे शक्य आहे? आपण कागदावर रेघोट्या मारल्या, त्या दुस-याला समजल्या आणि त्याने त्याबरहुकूम काही तयार केले आणि ते अपेक्षेनुसार व्यवस्थित चालले असे होणे कधी तरी शक्य आहे का? त्याचा साधा एक लहानसा भागसुध्दा अगदी आपल्याला पाहिजे तसाच पहिल्या प्रयत्नात बनत नाही असा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे."
मी म्हंटले, "तुझे बरोबर आहे. माझासुध्दा अगदी तसाच अनुभव आहे. पण मला यातूनच मार्ग काढून काम करून घेणे भाग आहे. कागदावर मारलेल्या रेघोट्या इतरांना समजावून सांगून त्यातले महत्वाचे मुद्दे त्यांना दाखवून द्यावे लागतात. उत्पादन होत असतांना त्यामधील प्रत्येक स्टेपवर अत्यंत कडक क्वालिटी कंट्रोल करावा लागतो. आधी मॉडेल्स बनवून किंवा ट्रायल्स घेऊन त्यातली अनिश्चितता शक्य तेवढी कमी करावी लागते आणि यासाठी मी आणि माझे सहकारी सगळीकडे फिरून तिथल्या कारखान्यांमधल्या शॉपफ्लोअरवर जाऊन तिथे नेमके काय चालले आहे ते स्वतः पहात असतात. वगैरे वगैरे वगैरे."

रवीची काम करण्याची पध्दत आणि त्यामागे असलेल्या गरजा वेगळ्या होत्या. त्याच्या फॅक्टरीत जे नवे मेकॅनिझम पाहिजे असेल ते अगदी कमी वेळात तयार करवून घेणे अत्यंत आवश्यक होते. पूर्वीचा अनुभव आणि ज्ञान यांच्या जोरावर आधी पटापट एक कच्चा आराखडा तयार करायचा, मग स्टोअरमध्ये जाऊन कोणता कच्चा माल तिथे उपलब्ध आहे, कोणती उपकरणे स्टोअरमध्ये किंवा बाजारात लगेच मिळू शकतात ते पहायचे आणि त्यानुसार त्या आराखड्यात बदल करून स्केचेस बनवायची, वर्कशॉपमध्ये जाऊन तिथे कोणती यंत्रे मोकळी आहेत ते पाहून त्यांचा उपयोग कसा करून घ्यायचा याचा विचार करायचा अशा पध्दतीने झटपट काही तरी तयार करवून घ्यायचे, ते चालवून पहातांना जे जे अनपेक्षित असे घडेल त्याचा विचार करून लगेच त्यात फेरफार करायचा. असे करताकरता ते यंत्र अपेक्षेनुसार काम करायला लागले की कारखान्यात त्याची उभारणी करायची. हे सगळे करण्यासाठी त्याच्याकडे फक्त काही दिवस असत आणि अशी कामे एकापाठोपाठ येत असत. त्या मानाने माझ्या कामाची शेड्यूल्स बरीच ऐसपैस आणि लवचीक असत.

त्या वेळच्या भेटीमध्ये आम्ही काही इतर विषयांवरही संवाद साधला होता. सेमिनारमधल्या स्वादिष्ट आणि पौष्टिक जेवणामधले पदार्थ वाढून घेतांना रवी आपला हात थोडा आखडताच घेत होता. रोजच्या जेवणातसुध्दा तो मुख्यतः सॅलड आणि भाज्याच जास्त प्रमाणात घेतो हे त्याने सांगितले होते. त्यातून त्याचे वजन कमी झाल्यासारखे दिसत नसले तरी तो त्याबद्दल कॉन्शस होता. त्यासाठी आणखी प्रयत्न करायचे ठरवत होता. हे सगळे बोलणे झाल्यानंतर आम्ही एकमेकांच्या संपर्कात रहायचे कबूल केले, पण कामाच्या रगाड्यात आणि आपापल्या संसाराच्या विवंचनांमध्ये आम्ही अडकतच गेलो. पुरेशी व सुलभ अशी संपर्कसाधने नसल्यामुळेही संपर्क साधणे शक्य झाले नाही. हळूहळू आम्ही ही भेट विसरून गेलो. काही वर्षांनंतर पुण्यातल्या एका मित्राकडून कळले की रवीला अचानक मासिव्ह हार्ट अटॅक आला आणि त्यातून तो वाचू शकला नाही. आरोग्याच्या दृष्टीने तो करत असलेले प्रयत्न कदाचित पुरेसे नव्हते किंवा त्याला आधीच उशीर झाला होता. कदाचित जे घडले ते टाळण्यासारखे नसेलच. त्यानंतर फक्त त्याच्या आठवणीच शिल्लक राहिल्या.

No comments: