Friday, July 26, 2013

स्मृती ठेवुनी जाती - ७ - काळे रावसाहेब

काळे रावसाहेब माझ्या वडिलांचे मित्र आणि एके काळचे सहकारी होते. त्यांच्या करीयरच्या सुरुवातीच्या काळात ते दोघेही जमखंडी संस्थानच्या राज्यकारभाराचे काम पहात होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्व संस्थानांचे विलीनीकरण करण्यात आले आणि संस्थानांच्या सरकारी नोकरीत असलेल्या सेवकांना राज्य सरकारांच्या सेवेमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले. स्थानिक सरकारेच बरखास्त होणार असल्यामुळे राज्यात दुसरीकडे जिथे रिकामी जागा असेल तिथे त्यांना जावे लागणार होते. काळे रावसाहेबांचा गावात मोठा वाडा होता, जमीन जायदाद, खूप मानसन्मान, प्रतिष्ठा वगैरे होती, आर्थिक दृष्ट्या सुस्थिती होती. ते जमखंडीतच राहिले किंवा नोकरीसाठी बाहेरगावी न जाता तिथेच रहायचे त्यांनी ठरवले असेल. माझ्या वडिलांकडे हा पर्याय उपलब्ध नव्हता. त्या काळच्या मुंबई इलाख्याच्या स्टेट गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये ते रुजू झाले आणि जिथे पोस्टिंग मिळाले तिथे चालले गेले. त्यानंतर सुध्दा त्यांच्या एका गावाहून दुस-या गावात अशा सारख्या बदल्या होत राहिल्या. आमचे मोठे एकत्र कुटुंब जमखंडीच्या घरातच रहायचे आणि वडील परगावी नोकरीच्या ठिकाणी एकटेच रहायचे. दर महिन्या दोन महिन्यात एकदा घरी येऊन नोकरीच्या जागी परत जायचे. मला समजायला लागल्यापासून माझे वडील रिटायर होईपर्यंत हीच परिस्थिती राहिली होती.

संस्थान खालसा झाल्यानंतरसुध्दा भूतपूर्व राजांचा राजवाडा आणि इतर बरीच स्थावर जंगम मालमत्ता पटवर्धनांकडे राहिली होती. उमारामेश्वर नावाचे जमखंडी गावातले सर्वात सुंदर आणि त्या काळातल्या मानाने आधुनिक बांधणीचे आणि प्रेक्षणीय असे देऊळ होते. गावातल्या त्या एकाच देवळात छान सजवलेला मोठा सभामंटप होता, तिथे जमीनीवर गुळगुळीत (कदाचित संगमरवरी) फरशा आणि छताला हंड्याझुंबरे टांगलेली होती. समोर मोठी मोकळी जागा होती. हे मंदिरही बहुधा भूतपूर्व राजाच्या खाजगी मालकीचे असावे. त्याच्या सगळ्या मालमत्तेसंबंधीचे काम सांभाळण्यासाठी उमारामेश्वराच्या देवळाच्या आवारातच एक कचेरी होती. काळे रावसाहेब जमखंडीमध्ये राहून त्या कचेरीचे काम पहात होते. माझे वडील जेंव्हा जेंव्हा आम्हाला भेटायला जमखंडीला यायचे तेंव्हा तिथल्या स्थानिक मित्रमंडळींना गप्पा मारायला घरी बोलावत असत किंवा त्यांच्यापैकी कोणाकडे सगळे मित्र जमत असत. या मित्रांच्या यादीत काळे रावसाहेबांचे नाव सर्वात पहिले असायचे.

मी अगदी लहान म्हणजे पाच सहा वर्षांचा असतांना एकदा काळे रावसाहेब माझ्या वडिलांना भेटायला आले होते आणि बैठकीच्या खोलीत बसले होते. माझ्या हातात पिण्याच्या पाण्याचे तांब्या भांडे देऊन त्यांना नेऊन द्यायला सांगितले गेले. ते घेऊन मी त्या खोलीत गेलो पण हातातल्या वस्तू तशाच हातात धरून इकडे तिकडे पहात उभा राहिलो.
"अरे असा का उभा आहेस? पाणी आणलं आहेस तर ते पटकन दे ना." असे वडिलांनी म्हणताच मी म्हणालो, "मला काळे रावसाहेबांना पाणी नेऊन द्यायला सांगितले होते, ते कुठे आहेत?"
"हे काय इथे बसले आहेत. दिसत नाहीत का?"
"पण हे तर गोरे पान दिसताहेत."
त्यांचा गोरा पान रंग आणि रुबाबदार व्यक्तीमत्व पाहून त्यांचे आडनाव 'काळे' असू शकते हे माझ्या बालबुध्दीला पटतच नव्हते. हा किस्सा नंतरही अनेक वेळा मला ऐकायला मिळाला. विशेषतः वडिलांनी ठेवलेल्या मित्रांच्या बैठकीचे आमंत्रण द्यायचे काम करतांना मला त्याची आठवण करून दिली जात असे. त्या काळात टेलीफोन नव्हते आणि आमच्याकडे नोकरचाकर नसल्यामुळे कुणालाही कसलाही निरोप कळवण्यासाठी घरातल्या मुलांनाच निरोप देऊन धाडले जात असे. आम्हालाही त्याची मौज वाटायची, अनेक लोकांच्या घरी आमच्या वयाची मुले म्हणजे आमचे मित्र असायचे, त्यांच्याबरोबर खेळायची किंवा गप्पा मारायची आयती संधी मिळायची आणि घरातल्या काकूंकडून हातावर पेढा, लाडू, वडी असा काही खाऊसुध्दा ठेवला जायचा. माझा स्वभाव थोडा भिडस्त असला तरी ओळखीच्या लोकांकडे जायला मला आवडत असे. थोडासा विरोध करून मी हळदीकुंकवाचे निरोपसुध्दा पोचवायचे काम केले आहे.

ज्यांच्याकडे निरोप घेऊन जायला मला आवडत असे त्यात काळे रावसाहेबांचे घरही होते. मुख्य म्हणजे त्या काकांचे उमदे आणि हसतमुख व्यक्तीमत्व. मला पढवून पाठवलेला निरोप मी सांगितल्यावर तुसडेपणाने "बरं आहे" म्हणून किंवा नुसतीच मुंडी हलवून ते माझी बोळवण करत नसत. थांबवून घेऊन अत्यंत आपुलकीने माझी चौकशी आणि कौतुक करत, थोडी थट्टामस्करीही करत, एकादे सोपे कोडे घालत. त्या काळातला जनरेशन गॅप फारच मोठा असायचा. काही तिरसट मोठी माणसे लहान मुलांशी धड बोलायलासुध्दा तयार नसत. जॉली स्वभावाचे काळे रावसाहेब त्याला अपवाद होते. त्यामुळे मला ते आवडत असत.

त्यांची मुलेही अतीशय हुषार होती. दोघेही मुलगे शालांत परीक्षेमध्ये बोर्डाच्या मेरिट लिस्टमध्ये आले. त्याच्या वीस पंचवीस वर्षे आधी किंवा त्याच्याही पूर्वी जमखंडीचे रानडे (ते नंतर गुरुदेव रानडे म्हणून प्रसिध्द झाले) बोर्डात आले होते. त्यांचे उदाहरण आम्हाला नेहमी दाखवले जात असे. काळे रावसाहेबांचे दोन्ही मुलगे पुढेही चांगले शिक्षण घेऊन उत्कृष्ट प्रतीचे इंजिनियर झाले आणि आपापल्या क्षेत्रात खूप वरच्या पदावर जाऊन पोचले. माझ्या पिढीमधली आमच्या ओळखीतली ही बहुतेक पहिलीच इंजिनियरिंगची उदाहरणे होती. आमच्या गावातल्या सुशिक्षित लोकांमध्ये हाताच्या बोटावर मोजता येतील इतके थोडे डॉक्टर होते, अनेक वकील होते, त्याहून जास्त शाळामास्तर होते, पण निदान आमच्या ओळखीत तरी एकही मात्र इंजिनियर नव्हता.


मी जेंव्हा कॉलेजला गेलो तेंव्हा शिक्षणाची कोणती शाखा घ्यायची हे मार्गदर्शन करू शकणारे लोक गावात फार कमी होते. काही लोकांनी तर भीती दाखवायचे सत्कार्य सुध्दा केले. इंजिनियरिंगचा अभ्यास खूप भयानक असतो तो मला कसा जमणार? त्यात खूप शारीरिक कष्ट करावे लागतात. ते मला पेलणार आहेत का? त्या शिक्षणाला खूप खर्च येतो तो करायची आमची कुवत किंवा तयारी आहे का? वगैरे अनेक शंकाकुशंका काढल्या गेल्या. त्या सगळ्यांमध्ये तथ्य नव्हते असे म्हणता येणार नाही. पण त्यामुळे मला नैराश्य वाटायला लागले होते. काळे रावसाहेबांची मुले इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिकत असल्यामुळे माझ्या वडिलांसह मी त्यांना भेटायला गेलो. त्यांनी मात्र अगदी स्पष्ट मार्गदर्शन केले आणि संभाव्य अडचणींची यथार्थ कल्पनाही दिली. या शिक्षणाचा फार मोठा बाऊ करण्याची आवश्यकता नाही, पण ही वाट काही प्रमाणात खडतर आहे. निर्धार आणि काबाडकष्टांची मनाची तयारी ठेवली तर काही कठीण जाणार नाही. अॅडमिशन मिळणे हा पहिला सर्वात मोठा अडथळा पार केला तर मी बिनधास्त पुढे जावे असाच सल्ला त्यांनी दिला. संभ्रमाच्या त्या अवस्थेत तो निर्णायक ठरला.

मी कॉलेजमध्ये शिकत असतांनाच माझे वडील निवर्तले आणि घर कोलमडून गेले. त्यानंतर मला जमखंडीला जायची गरज किंवा कारण उरले नाही. तिथल्या लोकांशी संपर्क उरला नाही. काळे रावसाहेब गेले असे कधीतरी कोणाकडून कानावर आले आणि डोळे आपोआप पाणावले.  


No comments: