Wednesday, July 18, 2012

दिव्याची अंवस की गटार अमूशा ?

आपल्याला मदत करणारी माणसे, पशूपक्षी, वनस्पती इतकेच नव्हे तर निर्जीव वस्तूंबद्दल आपल्याला आत्मीयता किंवा आदर वाटावा आणि तो व्यक्त करावा अशा प्रथा आपल्या सणवारांमधून पाडल्या गेल्या आहेत. दिवा ही एक अशीच अत्यंत उपयुक्त वस्तू आहे. प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये दीपप्रज्वलन करावे लागतेच, त्या आधी त्या दिव्याची पूजाही केली जाते. दिव्याची अंवस हा सण तर खास दिव्यांसाठी साजरा केला जात असे. त्या दिवशी घरातील सर्व समया, निरांजने, लामणदिवे वगैरे घासून पुसून चकाचक करून त्यांची पूजा केली जाते, तसेच कणकेच्या वाट्या तयार करून त्यामध्ये तेल वात घालून दिवा लावतात. हे पिठाचे दिवे उकडून प्रसाद म्हणून तूप आणि गुळासोबत खाल्लेही जातात. दिव्याच्याच पूजेमध्ये दिव्यानेच दिव्याची आरती आणि दिव्याला दिव्यांचाच नैवेद्य ! काय गंमत आहे ना?


पंचतंत्र किंवा इसापनीतीमधील सगळे प्राणी माणसांसारखे बोलतात आणि वागतात. आपल्या कहाण्यांमध्येही असेच घडते. दिव्याच्या अंवसेच्या कहाणीतले उंदीर आणि दिवेसुध्दा माणसांसारखे बोलतात. यातली गोष्ट थोडक्यात अशी आहे.

एका राजाच्या सुनेने एकदा दिवशी घरांतला एक अन्नपदार्थ स्वतः खाल्ला, आणि त्याचा आळ उंदरांवर घातला. (राजाच्या सुनेला हे करायची काय गरज होती, तिला हवा तो पदार्थ मिळायला काय हरकत होती?) उंदरांना ते समजले. (कसे?) तिचा सूड घ्यावा म्हणून त्यांनी रात्रीं तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली. दुसरे दिवशी सासूदिरांनी तिला संशयावरून घरांतून हाकलून दिले. ती सून दिव्यांची चांगली काळजी घेत असे, दिव्यांच्या अंवसेच्या दिवशीं त्यांना चांगला नैवेद्य दाखवत असे. पण ती घरांतून निघाल्यावर ते बंद पडले. पुढे दिव्यांच्या अंवसेच्या दिवशी राजा शिकारीहून परत येत असतांना एका झाडाखाली थांबला. तिथे त्याला दिसले की गांवांतले दिवे अदृश्य रूप धारण करून (मग राजाला ते दिसले कसे?) त्या झाडावर बसून एकमेकांशी गप्पागोष्टी करीत आहेत. राजाच्या घरच्या दिव्याने त्यांना सून आणि उंदरांची गोष्ट सांगितली. दर वर्षी मनोभावे पूजा करणारी सून या वेळी राजवाड्यात नसल्यामुळे तो दिवा दुःखी झाला होता. हा सर्व प्रकार ऐकून आपल्या सुनेच्या चारित्र्याबद्दल राजाची खात्री झाली. त्याने आणखी चौकशी केली आणि सुनेला सन्मानाने घरी परत आणले.

कहाणीतल्या काळात फक्त तेलातुपाचेच दिवे असत. इंग्रजांच्या राजवटीत केरोसीनचे कंदील, चिमण्या वगैरे आल्यानंतर दिव्यांच्या अमावास्येला त्यांचीही पूजा व्हायला लागली. विजेच्या दिव्यांमुळे दिव्याखाली अंधार ही म्हणच रद्दबातल करून टाकली. हे दिवे भिंतीवर उंचावर बसवलेले असल्यामुळे आणि शॉक लागण्याच्या भीतीपोटी त्यांना घासण्यापुसण्यात कोणाला रस नव्हता. विजेची खात्रीलायक उपलब्धता वाढत जात असतांन दिव्याच्या अंवसेचे महत्व कमी कमी होत गेले.

मी मुंबईला आल्यानंतर सुरुवातीच्या काळात एकदा रात्रीचा सिनेमाचा शो पहायला गेलो होतो. बसमध्ये एक विचित्र प्रकारचा उग्र दर्प पसरला होता. थिएटरमध्येसुध्दा तोच घाण वास घमघमत होता. अगदी असह्य झाल्याने मी शेजारच्या सभ्य वाटणा-या माणसाला विचारले. त्याने आश्चर्याने मलाच विचारले, "आज गटारअमूशा आहे हे तुम्हाला ठाऊक नाही?" त्यानंतर मला कळले की हा गावठी दारूचा दुर्गंध होता आणि पुढे श्रावणमहिना येणार असल्यामुळे सगळे बेवडे तर्र होऊन फिरताहेत. पक्के दारुडेसुध्दा या बाबतीत खरेच धर्मनिष्ठ असतात की त्यांना पोटात दारू रिचवायला हे आणखी एक निमित्य मिळते तेच जाणोत. परवा आलेल्या रविवारी पुण्यातली सर्व मांसाहारी रेस्तराँ खचाखच गर्दीने भरली होती आणि या दिवसात अमूकशे की हजार टन चिकन, मटण, मासे वगैरेंचा खप झाला अशा बातम्या वर्तमानपत्रात आल्या होत्या.  दीप आमावस्या अशा अशा प्रकारे साजरी केली हे मात्र कोठे वाचले नाही.



आता बदलत्या परिस्थितीनुसार सणसुध्दा बदलले आहेत.

No comments: