Friday, March 06, 2009

दू ऊऊऊ र दर्शन

मुंबई दूरदर्शनचे प्रक्षेपण सुरू होण्याच्या आधीपासून आम्ही, म्हणजे मी आणि माझी पत्नी अलका, इथे रहात आहोत आणि कलेच्या निमित्याने अलकाचा व विज्ञानाच्या संदर्भात माझा असा या दोन्ही क्षेत्रात आमचा थोडासा वावर आहे. त्यातल्या कोठल्या ना कोठल्या कार्यक्रमाचे चित्रीकरण चाललेले असतांना मधूनच प्रकाशाचा एखादा झोत क्षणभर आमच्यावर यायचा किंवा कॅमेर्‍याच्या अँगलमध्ये आमचा चेहेरा यायचा. कधी अचानकपणे ती फ्रेम आम्हाला आमच्या टी.व्ही.च्या पडद्यावर दिसायची किंवा "परवा तुम्हाला टीव्हीवर पाहिलं" असे कुणीतरी सांगायचे असे कित्येक वेळा होऊन गेले आहे. त्यामुळे टीव्हीवर झळकण्याचे मला फारसे अप्रूप वाटत नाही. एका प्रकल्पाच्या उभारणीवर माझी मुलाखतसुध्दा येऊन गेली. आयत्या वेळी विचारलेल्या सर्व खोचक प्रश्नांची समर्पक उत्तरे मुलाखतदात्याला कशी काय देता येतात या रहस्याचा त्या वेळी मला उलगडा झाला.

एकदा दूरदर्शनकेंद्रावर एका मराठी वाद्यवृंदाच्या कार्यक्रमाचे चित्रीकरण होणार होते. नेमके त्याच वेळी आम्ही अगदी योगायोगाने तिथे जाऊन पोचलो. प्रेक्षकांच्या गॅलरीमध्ये बसायला जागासुद्धा नव्हती म्हणून आम्ही परतच जाणार होतो, तेवढ्यात तिथे बसलेल्या एका परिचिताचे लक्ष आमच्याकडे गेले. त्यांच्या ग्रुपमध्ये सातआठजण होते. त्यांनी थोडे सरकून घेऊन आणि मुलांना मांडीवर बसून आम्हाला जागा करून दिली. लवकरच गायक व वादकांनी गाणे सुरू केले आणि शूटिंगला सुरुवात झाली, पण सगळे प्रकाशझोत आमच्या डोळ्यावरच पडत होते आणि कॅमेरे प्रेक्षकांवरच रोखलेले होते. दोन तीन सहाय्यक हातवारे करून प्रेक्षकांना टाळ्या वाजवून ताल धरायला तसेच चेहर्‍यावर हावभाव आणायला प्रोत्साहन देत होते. पंधरावीस मिनिटे हा प्रकार चालल्यानंतर सगळे शांत झाले.

"आता प्रेक्षकांनी वाटल्यास बसावे नाहीतर जायलाही कांही हरकत नाही. त्यांच्या चित्रीकरणाचा भाग संपला आहे" असे सांगून टाकले गेले. मुख्य कार्यक्रमाचे टेक रीटेक करीत पूर्ण शूटिंग संपवायला चांगले सात आठ तास लागणार होते, तोंपर्यंत कदाचित मध्यरात्रसुध्दा होईल. तेवढा वेळ एका जागेवर ताटकळत बसून राहणे प्रेक्षकांना जमणार नाही आणि ते एका जागी थांबले नाहीत तर कार्यक्रमात सलगपणा राहणार नाही म्हणून अशी युक्ती योजिली गेली होती. जितका वेळ त्या वाद्यवृंदाचा कार्यक्रम ऐकणे आम्हाला शक्य होते तितका वेळ तो ऐकला आणि आम्ही आमच्या घरी परत गेलो. पुढे त्या कार्यक्रमाचे प्रसारण कधी झाले तेही समजले नाही. त्यात आमचा चेहेरा दिसल्याचेही कोणी सांगितले नाही. प्रेक्षकांच्या गर्दीच्या या शॉटचा उपयोग कदाचित दुसर्‍याच एकाद्या कार्यक्रमासाठीसुद्धा करता आला असेल.

'मेरी आवाज सुनो'या स्टार टीव्हीवरील स्पर्धात्मक कार्यक्रमासाठी आमच्या चांगल्या परिचयातल्या चारुशीलाची निवड झाली होती. तिला मिळालेल्या पासावर तिच्या आईवडिलांसह आम्हालाही तिच्याबरोबर स्टूडिओत जायला मिळाले. तेथे प्रेक्षकात बसून टाळ्या वाजवून प्रोत्साहन देण्याचे काम तर केलेच, अँकर अन्नू कपूरने विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरेही मी सांगितली. जुन्या काळातील गाण्यांच्या चालीसुद्धा गुणगुणून दाखवल्या. त्यामुळे त्या कार्यक्रमाच्या प्रक्षेपणात आम्हाला पंधरा वीस सेकंदांचे फूटेज मिळाले. ते पाहिल्याबद्दल तामीळनाड व कर्नाटकापासून राजस्थान, मध्यप्रदेश व उत्तरप्रदेश या भागात राहणार्‍या माझ्या मित्रांनी वा नातेवाईकांनीसुद्धा फोन करून सांगितले. मुंबईतल्या लोकांच्या फोनचा तर आमच्यावर पाऊस पडला. हा सगळा त्या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेचा प्रभाव होता पण दोन दिवस आम्हाला आपणच 'स्टार' बनल्यासारखे वाटले होते. या रिअलिटी शोमध्ये मात्र त्यातील गाणी, प्रश्नोत्तरे, टाळ्या, शिट्या वगैरे सर्व खरेखुरेच होते. कार्यक्रम ठराविक वेळेत बसवण्यापुरती थोडी काटछाट त्यात करण्यात आली होती, पण आधीपासून ठरवून कांहीही शूट केलेले नव्हते.

ग्रँड युरोपच्या सहलीवरून आम्ही परत आलो तेंव्हा आमचे विमान मध्यरात्रीच्या सुमाराला विमानतळावर उतरले होते. त्यानंतर तिथले सोपस्कार पुरे करून घरी पोचून अंथरुणावर पडेपर्यंत अर्ध्याहून अधिक रात्र होऊन गेली होती. त्यामुळे सकाळी उन्हे अंगावर येईपर्यंत झोपूनच होतो. अचानक दूरध्नी खणखणला आणि "या वेळेला कुणाला आमची आठवण आली" असे चरफडत तो उचलला. अलकाच्या मैत्रिणीचा आहे हे समजल्यावर आनंदाने तिच्या स्वाधीन करून पुन्हा डोळे मिटून घेतले. अजून पुरती झोप झाली नव्हती आणि जेटलॅग ही अंगातून उतरला नव्हता. पलीकडून विचारणे झाले,"काय गं, तू मुंबईतच आहेस ना?"
"हो. आताच आलेय्. काय काम काढलं आहेस?"
"अगं, ईटीव्हीच्या शूटिंगला जायचा चान्स आहे."
"कसला प्रोग्रॅम आहे? मला ते अभिनय वगैरे करायला जमायचं नाही हं."
"नाही गं. तुझ्या आवडीचा गाण्याचाच कार्यक्रम आहे. श्रीनिवास खळ्यांच्या मुलाखतीवर आधारलेला प्रोग्रॅम आहे."
"पण त्यांची गाणी गायला फार अवघड असतात गं."
"अगं आपल्याला कुठे ती गायची आहेत? आपल्याला फक्त कार्यक्रमाला हजर राहून शोभा आणायची आहे. त्यासाठी त्यांना गाण्याची आवड असलेले प्रेक्षक पाहिजे आहेत म्हणे. मग तुम्ही दोघे येताय् ना?"
"अहो आपण जायचं का?" हा प्रश्न माझ्यासाठी होता.
मी फक्त अर्धेच संभाषण ऐकले असले तरी 'ता'वरून ताकभात एवढे ओळखून म्हंटले,"आता तर हो म्हणून दे. डीटेल्स समजल्यावर पाहू." तिने हो तर म्हणून दिले.

टूरवर असतांना पंधरा दिवस रोज प्रवास करून शरीराला थोडा शीण आलेला होता. घराची सफाई, कपडे धुणे यापासून वीज आणि टेलीफोनची बिले भरण्यापर्यंत न केलेल्या अनेक कामांचा मोठा ढीग साचला होता. परदेशातून मुद्दाम आणलेल्या भेटवस्तू ज्यांच्या त्यांना वाटायच्या होत्या. उन्हाळ्याची सुटी लागली असल्याने व लग्नसराई सुरू झालेली असल्याने त्या निमित्याने केंव्हाही अगांतुक पाहुणे घरी येऊन थडकण्याची शक्यता होती आणि आम्हालाही कांही समारंभांची आमंत्रणे आलेली होती. त्यामुळे खरे सांगायचे झाले तर मोकळा असा वेळ नव्हताच. पण टी.व्हीच्या पडद्यावर झळकायचे आकर्षण केवढे जबरदस्त असते!

दोन तीन दिवसांतच ते शूटिंग होणार दोते. त्याला 'जाणकार रसिक' म्हणून जायचे झाले तर त्यासाठी थोडी तरी तयारी करायलाच हवी. बहुतेक सारी लोकप्रिय मराठी गाणी माहीत असली तरी त्यातली श्रीनिवास खळ्यांनी स्वरबद्ध केलेली कोणती त्याची यादी बनवून त्यातली जी कॅसेट वा सीडीवर होती ती लक्षपूर्वक ऐकून घेतली. यादीचा कागद घडी करून खिशात ठेऊन घेतला. आधी ते चित्रीकरण सकाळीच होणार असल्याचे समजले होते. त्यामुळे भल्या पहाटे उठून जावे लागणार होते. पण ते दुपारी असल्याचे आदल्या दिवशी समजल्यावर ब्रंच घेऊन जायचे ठरले. अखेरीस ते संध्याकाळी व्हायचे ठरल्याने जेवणखाण करूनच गेलो. स्टूडिओवर पोचलो तेंव्हा आधी झालेले शूटिंग संपवून सुप्रसिध्द गाटक, गीतकार, संगीतकार वगैरे सबकुछ असलेले श्री.यशवंत देव परत जाण्यासाठी गाडीत बसलेले दिसले. त्यांना त्यांच्या निवासस्थानी पोचवून ती गाडी श्रीनिवास खळ्यांना आणायला जाणार असल्याचे ऐकले. त्यामुळे भरपूर वेळ शिल्लक होता. चांगली पोटपूजा करून तो सत्कारणी लावला, कारण एकदा स्टूडिओच्या आत गेल्यानंतर तिथे खाण्यापिण्याची कांही सोय होणे निदान आमच्यासाठी तरी कठीणच दिसत होते. परत आल्यावर बाहेरील खोलीतच बसून इकडच्या तिकडच्या गप्पा मारीत वाट पहात राहिलो. एक सहाय्यिका आली आणि तिने आत जाण्यापूर्वी आमचा 'रोल' आम्हाला समजावून सांगितला, तसेच त्याची दोघातीघांनी रंगीत तालीमही करवून घेतली.

सगळे चित्रीकरण व्यवस्थित पार पडले. तुषार दळवींनी सफाईने प्रश्न विचारले. खळेकाकांनी समर्पक व माहितीपूर्ण उत्तरे दिली. नव्या पिढीतल्या गुणी गायकांनी तसेच साथसंगत करणार्‍यानी उत्तम कामगिरी केली. तांत्रिक कारणांमुळे त्यात कांही रीटेक करावे लागले, पण तेवढे ते लागतातच असे कळले.
आम्हाला दिलेल्या जाणकार प्रेक्षकांच्या भूमिका आम्ही पार पाडल्या. त्यात चुका झाल्या असल्या तरी त्यामुळे त्या नैसर्गिक वठल्यासारख्या वाटल्या असाव्यात. अशा प्रकारे एक वेगळा अनुभव आणि अनोखा आनंद घेऊन मध्यरात्रीपर्यंत घरी परतलो.
त्यानंतर दिवस, आठवडे आणि महिने गेले तरी त्या कार्यक्रमाचे प्रसारण झालेच नाही. कदाचित त्यासाठी चांगला प्रायोजक मिळण्यासाठी वाट पहावी लागली असेल.त्यामुळे आम्ही त्याबद्दल ज्या लोकांना सांगितले होते त्यांनासुद्धा आमच्याबद्दल शंका वाटायला लागल्या होत्या. तो कार्यक्रम ईटीव्हीवर येणार असल्याचे एकदा अचानक समजले आणि घरातले सर्वचजण तो पाहण्यासाठी सज्ज होऊन टीव्हीसमोर येऊन बसले. सकाळी दहा वाजता बातम्यांचे प्रसारण झाले. ते संपल्यावर 'माझे जीवनगाणे'चा फलकही लागला पण त्यावर गजाननाचे वंदन सुरू झाले. त्याची प्रार्थना करून पुढे मुख्य कार्यक्रम सुरू होईल या आशेने पहात राहिलो, पण तो संपूर्ण भागच गणपतीला वाहिलेला निघाला. "चला, मालिका तर सुरू झाली, आता दर रविवारी पहात राहिलो तर कधी तरी त्यात आपणही दिसू." असे म्हणत निःश्वास सोडला.
रात्री नेहमीचे इतर वाहिन्यांवरील कार्यक्रम पाहतांना मध्येच आलेल्या एका कमर्शियल ब्रेकमध्ये रिमोटवर सहज बोटे फिरवतांना ईटीव्हीचा चॅनल लागला आणि त्यावर चक्क खळेकाकांचे दर्शन घडले. तुषार दळवीसुद्धा त्यांच्याबरोबर बोलत होता. नक्कीच हा आम्ही ज्यात सहभाग घेतला तो कार्यक्रम होता. सुरुवात चुकली तरी कार्यक्रम पहायला तर मिळाला. टीव्हीवर स्वतःला पहायला मिळाले. आम्हा दोघांना टीव्हीवर पाहून चिमुकल्या ईशा आणि इरा तर बावचळूनच गेल्या होत्या. आता आम्ही तिथे दिसणार आहोत बघ हां असे सांगितल्यापासून त्यांनी आम्हाला घट्ट पकडून ठेवले होते. त्या दिवशी आम्ही पुण्यात असूनसुद्धा तेवढ्या रात्री चार फोनही आले. आमचे दू ऊऊऊ र दर्शन यशस्वीरीत्या पार पडले म्हणायचे. जसे ते ध्यानीमनी नसतांना अचानकपणे ठरले होते तसेच ते अनपेक्षितपणे पहायलाही मिळाले होते. त्यानंतर जेंव्हा जेंव्हा श्रीनिवास खळे टीव्हीवर दिसतात, तेंव्हा त्या चित्रणाची आठवण झाल्याखेरीज रहात नाही.

1 comment:

Anand Ghare said...

तारापूर येथील ५४० मेगावॉट्स क्षमतेचा प्रकल्प पूर्ण झाल्यावर माझी दूरदर्शनच्या बातम्यांमध्ये लाइव्ह मुलाखत झाली होती. त्या काळात मी एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर या पदावर काम करत होतो. हा कार्यक्रम लाइव्ह प्रक्षेपणात सादर होत असला तरी निवेदिकेने मला कोणते प्रश्न विचारायचे हे आम्ही उभयतांनी बसून आधीच ठरवलेले होते. त्यात मुद्दाम काही खोचक प्रश्नही ठेवले होते. अर्थातच माझी उत्तरे तयार होती. सगळ्या रिअँलिटी शोजमधले लोक कशी पटापटा मुद्देसूद उत्तरे देतात या मला नेहमी पडत असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.