Friday, November 14, 2008

राजकुमार साठ वर्षांचा झाला


"परीकथेतिल राजकुमारा स्वप्नी माझ्या येशिल कां ? भाव दाटले मनी अनामिक साद तयांना देशिल कां ?" अशी अस्फुट लकेर नवयौवनांत प्रवेश केलेल्या मुलींच्या मनात उठत असते. बालपणी वाचलेल्या परीकथांमधले राजकुमार झगमगते चिलखत अंगावर चढवून, रत्नजडित मुकुट डोक्यावर धारण करून, अबलख घोड्यांवर स्वार होऊन दौडत येतात, हातातल्या समशेरीने दुष्ट चेटकिणीला मारून तिच्या तावडीत सापडलेल्या राजकुमारीची मुक्तता करतात आणि तिला आपल्यासोबत घेऊन जातात. हे झाले परीकथेतले राजकुमार.
आजच्या जगातला एक प्रत्यक्षातला राजकुमार जन्माला आला तेंव्हा त्याचे आजोबा जगातल्या सर्वात मोठ्या साम्राज्याचे सम्राट होते. चार वर्षांनंतर त्याची आई महाराणी बनली आणि तो मुलगा त्या साम्राज्याचा राजकुमार . वेगवेगळे राजवाडे, किल्ले आणि महाल यांत खेळत बागडत तो मोठा झाला. आजच्या जगात एवढ्या तोलामोलाच्या राजकन्या राहिलेल्या नाहीत. पण इतर कुमारींचा गराडा त्याच्या सभोवती पडलेला असे. कधी कोणाचे कधी कुणाचे नांव त्याला जोडले जाई तसेच थोड्या दिवसांनी ते खोडले जाई.
स्वर्गातल्या अप्सरेसारखी एक सुंदर त्याला परी भेटली. त्या दोघांच्या प्रेमाला भरते आले. त्याने रीतसर तिच्या वडिलांकडे तिचा हात मागितला. परीकथेत शोभून दिसावा इतक्या थाटामाटात त्यांचा विवाह झाला. आजवर दुस-या कोणत्याही लग्नसमारंभाला मिळालेली नाही एवढी प्रसिध्दी त्या विवाहसमारंभाला मिळाली. जगातील कोट्यावधी लोकांनी तो सोहळा टीव्हीवर पाहिला आणि स्वतः कृतकृत्य झाल्यासारखे त्यांना वाटले. परी आणि राजकुमार या दांपत्याला दोन गोंडस पुत्ररत्ने प्राप्त झाली. साम्राज्याला वारसांची पुढची पिढी मिळाली. त्या बालकांचेही अमाप कौतुक झाले.
त्यानंतर कांही तरी बिनसले. दोघात अबोला झाला, एकमेकांपासून दूर जात जात अखेर ते वेगळे झाले. पंख तुटलेल्या परीचे पाय जमीनीवर उतरताच मळले. तिने एका गडगंज दुकानदाराच्या मुलाला जवळ केले. त्याच्याबरोबर असतांना तिच्या गाडीचा अपघात होऊन ती स्वर्गवासी झाली. राजकुमाराचे नांव पुन्हा कोणाकोणाबरोबर जोडले जाऊ लागले. त्यातले एक प्रकरण चव्हाट्यावर आले. अखेर पन्नाशीतल्या राजकुमाराने त्या प्रौढेबरोबर पाट लावला.
त्यानंतर त्या राजकुमाराचे नांव फारसे कुठे ऐकू येईनासे झाले. त्याच्या वयाला साठ वर्षे पूर्ण झाली असे आज अचानक बातम्यांमध्ये वाचले. विशीतली दोन मुले असलेल्या त्या राजकुमाराचे नांव आहे प्रिन्स चार्ल्स! हल्ली तो समाजसेवेची बरीच कामे करतो असे म्हणतात. त्यात त्याला उज्ज्वल यश मिळो आणि भविष्यकाळात त्याचे नांव सन्मानपूर्वक घेतले जावो अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा.

No comments: