Sunday, November 23, 2008

शाळेतले शिक्षण (भाग ३)

मी पहिल्या भागात जो अनुभव सांगितला आहे तो होता 'मराठी' मुलांच्या शाळेतला म्हणजे प्राथमिक शाळेतला. आजूबाजूच्या गांवांमधल्या मराठी व कानडी माध्यम असलेल्या मुला व मुलींच्या निरनिराळ्या शाळांमधल्या सगळ्या विद्यार्थ्यासाठी तालुक्याच्या गांवी एकच 'हायस्कूल' होते. त्यात शिक्षणाच्या माध्यमानुसार वेगळ्या तुकड्या असायच्या. त्यातल्या प्रत्येक तुकडीत मुले आणि मुली या दोघांचाही समावेश असला तरी क्लासरूममध्ये मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगळे विभाग आणि बसण्यासाठी वेगवेगळी बाकडी असत. वर्गाच्या दोन्ही बाजूंना लांबलचक कॉरीडॉर होते, त्यांमधून येण्याजाण्यासाठी वेगळे दरवाजे असत. एका व्हरांड्यामधून फक्त मुलांना आणि दुस-यातून फक्त मुलींना चालायला परवानगी होती. मुले आणि मुली आपापली वेगवेगळी कोंडाळी करून हिंडत. त्यांच्यात सतत एक प्रकारचे शीतयुध्दाचे वातावरण असे. आपापसात बोलतांनाच विरुध्द बाजूला ऐकू येतील असे टोमणे व खोडसाळ ताशेरे मारणे, टिंगल किंवा नक्कल करणे वगैरे नेहमी चालायचे, पण सख्खे बहीण भाऊसुद्धा शाळेच्या आवारात कधीही अमोरासमोर उभे राहून एकमेकांशी बोलत मात्र नसत. त्यामुळे सहशिक्षण होते पण सहजीवन नव्हते अशातली परिस्थिती होती.

आमच्या हायस्कूलमध्ये सुरुवातीपासूनच म्हणजे आठवीपासून बरेच शिस्तबद्ध वातावरण होते. आधीच्या 'इंग्रजी' शाळेचेच हे नवे रूप होते आणि इंग्रजांच्या काळातील जुने शिक्षक आता मुख्याध्यापकाच्या पदावरून तिचा कारभार चालवत असल्यामुळे बरेचसे पूर्वीचे वातावरण शिल्लक राहिले असावे. त्या काळात मुलांना सक्तीचा गणवेष नव्हता, मात्र त्यांनी अंगात नीटनेटके कपडे घालणे आवश्यक होते. मुलींना उपजतच चांगल्या वेषभूषेची हौस असते आणि शाळेत मुली आहेत म्हंटल्यावर आपसूकच मुलांनाही आपण जरा बरे दिसावे असे वाटत असणार! आठवड्याचे वेळापत्रक होते आणि त्यानुसार वेगवेगळे विषय शिकवण्यासाठी त्या त्या विषयांचे तज्ञ गुरूजी नियमितपणे येऊन आपापले तास घेत. आज हे ऐकायला अगदी सामान्य वाटत असले तरी 'मराठी' शाळेतून 'हायस्कूल' मध्ये गेल्यानंतर आम्हाला त्या वेळेस त्याचे केवढे कौतुक वाटायचे?

आम्ही शाळेत असतांनाच राज्यपुनर्रचना होऊन 'मुंबई प्रांता'त असलेला आमचा भाग 'मैसूर' राज्यात गेला. तिकडच्या शिक्षणपध्दतीत बराच फरक होता असे ऐकले होते. आधीच पुण्यामुंबईकडच्या शिक्षणतज्ञांनी ठरवलेला अभ्यासक्रम आमच्या गांवापर्यंत नीटपणे पोचत नव्हता. त्यात हे बंगलोरचे तज्ञ आणखी काय करणार आहेत या काळजीने कांही लोक चूर झाले. मध्यंतरीच्या काळात धारवाड हुबळीकडची मंडळी त्यात समन्वय आणण्याचे काम करतील असे ठरवले गेले म्हणे. 'मॅट्रिक'ची परीक्षा जाऊन तिच्या जागी अकरावी इयत्तेची 'एसएसएलसी' नांवाची शालांत परीक्षा आली.

परीक्षा घेणा-या बोर्डाने अनेक विषय ठेवले असले तरी आमच्या शाळेत भाषा, गणित, समाजशास्त्र आणि विज्ञान एवढे ठराविक विषयच शिकवण्याची सोय होती. मराठी माध्यमात शिक्षण घ्यायचे तर 'मराठी भाषा' हा विषय आलाच. तो मला अत्यंत प्रिय होता. पुरातन कालातल्या संतकवींपासून तत्कालिन लोकप्रिय लेखकांपर्यंत सर्वांचे विविध प्रकारचे साहित्य वाचायची मला आवड होती. वर्गात शिकवले जाणारे धडे त्यापुढे यःकश्चित वाटायचे. राष्ट्रभाषेतले बरेचसे शब्द लता, आशा, मुकेश, रफी यांच्या गोड गळ्यातून कानावर पडत असल्यामुळे ती भाषा ऐकायला गोड आणि समजायला सोपी वाटायची. त्या काळात तिच्यावर 'टपोरी', पंजाबी किंवा भोजपुरी बोलींचे आक्रमण झालेले नसल्यामुळे हिंदी सिनेमातले नटनट्या बरीच शुध्द भाषा बोलत असत हे मला मोठा झाल्यानंतर कळले. गांवात एकही हिंदीभाषी कुटुंब नसल्यामुळे प्रत्यक्ष जीवनात ती कधी कांनावर पडलीच नाही आणि "सिनेमाच्या नादाने मुले बिघडतात." असे वडीलधारी मंडळींचे ठाम मत असल्यामुळे सिनेमा पाहून त्यातून हिंदी शिकायची संधी मला शाळेत असतांना मिळाली नाही. कानडी मुलुखात रहात असल्यामुळे लहानपणापासून त्या भागातली प्रचलित बोली बोलता येतच होती. तिची मुळाक्षरे आणि सोपी शुध्द वाक्ये शिकण्याची संधी शाळेत मिळत होती ती सोडण्यात अर्थ नव्हता.

मला कॉलेजात जायचे होतेच, त्यासाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवणे अत्यावश्यक होते. तिची लिपी, उच्चार, वाक्यरचना वगैरे सगळेच फार वेगळे असल्यामुळे ते सारे चार वर्षात आत्मसात करणे जडच जात होते, पण त्याला इलाज नव्हता. मी जर कधी मनाविरुध्द अभ्यास केला असेल तर तो याच विषयाचा! ज्यांना कॉलेजात जायचेच नव्हते अशी मुले मात्र इंग्रजी भाषा कठीण म्हणून सोडून देत असत. 'भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती।' असे जिचे कौतुक केले जाते ती संस्कृत भाषा शिकण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. तिच्यातले 'अ'कारांत, 'आ'कारांत वगैरे अनेक प्रकारचे अंत असलेल्या, विभिन्न लिंगे असलेल्या शब्दांच्या तीन वचनानुसार बदलणारी सात विभक्त्यांमधली विविध रूपे "रामः रामौ रामाः" करीत पाठ करणे मुलांच्या सहनशक्तीचा अंत पहात असे आणि वेगवेगळ्या प्रकारचे धातु तीन वचनांमध्ये आणि अनेक काळांमध्ये "गच्छामि गच्छावः गच्छामः" करीत 'चालवतांना' त्यात आमचीच 'गच्छंती' होत असे. बहुतेक मुलांना असले प्रचंड पाठांतर करायची मुळीच हौस नसायची आणि गरजही वाटत नव्हती, त्यामुळे ते तिच्यापासून दूर रहायचे.
.... ...... (क्रमशः)

No comments: