Saturday, November 29, 2008

शाळेतले शिक्षण (भाग ९)

आमच्या गांवात महाविद्यालयीन शिक्षणाची सोय नव्हती. त्यामुळे शाळा संपल्यानंतर उच्च शिक्षणासाठी कुठल्या तरी शहरात जावे लागणार हे ठरलेलेच होते. त्या गांवात पदवीधरांना नोकरी मिळण्याची संधी जवळ जवळ नव्हतीच। म्हणजे पुन्हा 'पोटासाठी भटकत जरी दूर देशी फिरेन' असे करावे लागणारच होते. त्यात 'मी राजाच्या सदनी' असण्याची मुळीच शक्यता नसल्यामुळे 'माळरानी फिरेन' हेच गृहीत धरून चालावे लागायचे. त्यामुळे शाळा सोडल्यापासून ते नोकरीत स्थिरस्थावर होऊन संसाराला लागण्याच्या दरम्यान निदान दहा वर्षाचा काळ बाहेरगांवी एकट्याने राहणे ठरलेलेच होते. समजायला लागल्यापासून त्याची पूर्वतयारी सुरू होत असे.

हल्ली कानाला मोबाईल लावून "आता पुढे काय करायचे?" हे विचारत भाजी फोडणीला टाकणे शक्य आहे. निवडून बारीक चिरलेल्या भाज्यांची तयार पाकिटे बाजारात मिळतात. झटपट करता येण्याजोगे पदार्थही शेकड्याने निघाले आहेत. "थोडे पालक आणा आणि थोडे पनीर आणा आणि ते फ्रीजमध्ये ठेऊन द्या. आता पातेल्यात थोडे पाणी घाला आणि अमक्या कंपनीचे पॅकेट फोडून ते त्यात ओता व गॅसवर ठेवा. दोन मिनिटात पालकपनीर तयार!" अशी त्याची रेसिपी एक पाच सहा वर्षाचा गोड छोकरा एका जाहिरातीत सांगतो. 'टेस्टमे बेस्ट' असा तयार मसाला कुठल्याही पदार्थात घातला की कोणतीही मम्मी 'बेस्ट कुक' बनून जाते. कोणे एके काळी बाजारातून वा शेतातून मसाल्याचे पदार्थ आणून, ते तळून व भाजून आणि त्यांना कुटून व दळून घरातच त्याची भुकटी बनवत असत हे बहुधा कांही दिवसांनी इतिहासाच्या पुस्तकात वाचायला मिळेल. माझ्या लहानपणी हे काम घरोघरी होत असे. कांही थोडे तयार किंवा अर्धवट तयार पदार्थ मुंबईपुण्याकडे मिळू लागले असले तरी खेडेगांवांपर्यंत ते पोचले नव्हते. त्यामुळे माहेरपणाला आलेल्या बहुतेक मुली सासरी जातांना मेतकूट, मसाले, सांडगे, पापड, लोणची वगैरेचा स्टॉक घेऊन जात असत तसेच त्याची कृती शिकून घेत असत.

"उद्या सासरी गेल्यावर तुला हे काम करता आलं नाही तर तू काय करणार आहेस?" असा प्रश्न विचारून जसे लहान मुलींना कामाला जुंपत असत अगदी त्याचप्रमाणे "उद्या कॉलेजला किंवा नोकरीच्या गांवी गेल्यावर तिथे हे काम करायला आई येणार आहे काय?" असे म्हणून मुलांवर घरातली छोटी छोटी कामे सोपवली जात असत. पण घरातले वातावरणच असे होते की मुले ते काम हौसेने किंबहुना चढाओढीने करतही असत। अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांशी निगडित असलेली घरात करण्याची जेवढी म्हणून रोजची कामे असतात ती सर्वांनी शिकून घेतलीच पाहिजेत असा दंडक होता किंवा आपल्याला ती करता यायला पाहिजेत असे सर्वजणच मानत असत. ज्याची त्याची आवड, कुवत आणि सवड लक्षात घेऊन रोजच्या कामांची एक अलिखित वाटणी झालेली असली तरी एकादी व्यक्ती कांही कारणाने जागेवर नसली तर इतर लोक तिचे काम बिनबोभाटपणे करून टाकत. लहान मुलांना त्यात जास्तच उत्साह असायचा. "आज अमक्याने पाटपाणी घेतलंय् बर कां! " किंवा "आज तमकीने कोशिंबीर बनवली आहे. " असे म्हणून त्याचे क्रेडिट मिळायचे आणि कौतुकही व्हायचे.

रोजच्या शाळेच्या वेळा आणि खेळण्याची वेळ चुकवून घरकाम करायची गरज सहसा नसे, पण सुटीच्या दिवशी आळीपाळीने कुठले तरी छोटेसे काम शिकून घेण्यासाठी कुणाबरोबर उमेदवारी करायची आणि हळू हळू ते काम अंगावर घेऊन पूर्ण करून शाबासकी मिळवायची. त्यात नव्या नव्या गोष्टी शिकायला मिळत आणि प्रयोग करून पाहण्याची संधीही मिळे. त्यातून कांही विचारले तर समजावून सांगणारी आणि चुकले तर ते सांवरून घेणारी मोठी मंडळी असतच. दिवाळीची सुटी लागली की घराची साफसफाई, सजावट, फराळाचे पदार्थ बनवणे वगैरे सारी कामे संयुक्तपणे होत आणि लहान मुले व मुली त्यात उत्साहाने भाग घेत. एकजण बांबूला कुंचा बांधून आढ्याजवळची जळमटे काढतो आहे, दुसरा मातीच्या भिंतीची डागडुजी करतो आहे, तिसरा त्यावर फुलापानांची नक्षी काढतो आहे. किंवा घरातली सगळी मंडळी एकत्र बसून गप्पागोष्टी व थट्टामस्करी करत शेंगा फोडून त्यातले दाणे काढत आहेत. एकादा द्वाड मुलगा कोणी पहात नाही असे पाहून हळूच दोन चार शेंगादाणे तोंडात टाकतो आहे. दुस-या मुलाने त्याला पाहिलेले असल्याने त्याची चहाडी न करताही त्याला बोलते करून त्याचे पितळ उघडे पाडत आहे किंवा सगळीजणे स्वयंपाकघरात कोंडाळे करून बसली आहेत, एकजण पोळपाटावर पु-या लाटते आहे, दोनतीन मुले त्यात सारण भरून आणि दुमडून त्यांना अर्धगोलाकार देत आहे, कोणी कातण्याने त्याला नागमोडी कडा देत आहे आणि शेवटी सर्वात एक्स्पर्ट त्या करंज्या तळून काढते आहे. अशी लहानपणाची दृष्ये दिवाळी आली की अजून माझ्या डोळ्यापुढे येतात.
. . .. . . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: