Sunday, November 09, 2008

दुरून डोंगर साजिरे


"बडा घर पोकळ वासा", "नांव सोनूबाई, हाती कथिलाचा वाळा", "वरून कीर्तन आंतून तमाशा" अशा "दिसतं तसं नसतं" या अर्थाच्या किंवा जे दिसतं आणि जे असतं यातला विरोधाभास दाखवणा-या अनेक म्हणी प्रचारात आहेत. "दुरून डोंगर साजिरे" ही तशीच एक म्हण आहे. या म्हणीचा "जवळ जाता द-या खोरी " हा उत्तरार्ध प्रचलित आहे. त्यातल्या खोल द-या जरी भयावह वाटल्या तरी त्यांची सांगड खो-यांबरोबर कां घालावी? खो-यांमध्ये झुळुझुळू वाहणारे पाण्याचे प्रवाह असतात, त्यांच्या काठाने झाडाझुडुपांचे विश्व बहरलेले असते, त्यांच्या आधाराने विविध प्राणी आणि पक्षी रहात आणि संचार करत असतात. अशी रम्य जागा जवळ जाऊन पाहतांना साजरी वाटत नसते कां? मला तर डोंगरसुध्दा जवळून पहातांना छानच वाटतात. त्यांवर चढउतार करण्याचा कष्टाचा भाग सोसला तर तिथले निसर्गसौंदर्य प्रेक्षणीय असते. म्हणून तर सारी हिल स्टेशन्स इतकी लोकप्रिय असतात. कित्येक लोक मुद्दाम डोंगराळ भागात गिरीसंचाराला (ट्रेकिंगला) जातात. हे सारे लोक या पर्यटनांत घेतलेल्या सुखद अनुभवांचे चर्वण वर्षानुवर्षे करतांना आपल्याला दिसतात. त्यामुळे डोंगर दुरून तर साजिरे दिसतातच, जवळ गेल्यावर अनेकदा ते मनोहारी वाटतात.
असे असले तरी "दुरून डोंगर साजिरे " या म्हणीचा एक अनपेक्षित असा वेगळाच अर्थ मागच्या आठवड्यात अचानकपणे माझ्या समोर आला. अमेरिकेच्या उत्तर भागातल्या रानावनांमधून आमची बस जात असतांना बाजूला दूरवर नजर पोचेपर्यंत फॉल कलर्सने रंगवलेल्या वृक्षराई दिसत होत्या. कांही ठिकाणी लाल, पिवळा, सोनेरी, केशरी आणि हिरवा या रंगांच्या विविध छटांनी सुशोभित झालेले अप्रतिम डोंगरमाथे क्षितिजापर्यंत पसरलेले दिसत होते. पण जेंव्हा मी कांही रंगीबेरंगी झाडे जवळ जाऊन पाहिली तेंव्हा मला धक्काच बसला. दुरून इतक्या सुंदर दिसणा-या या झाडांची पाने जवळून पहातांना मलूल दिसत होती. सूर्यप्रकाशात लाल, शेंदरी, सोनेरी रंगांत चमकणारी ही पाने जवळून निस्तेज, गरीब बिचारी अशी वाटत होती. त्यांची परिस्थिती दयनीय वाटावी अशीच झालेली होती, कारण आतां त्यांचे दिवस भरत आले होते. झाडांना जीव असतो हे तर आपल्या सर जगदीशचंद्र बसूंनी सिध्द करून दाखवले आहेच. त्यातल्या पानांना स्वतंत्र बुध्दी असेल तर त्यांनी आपल्या भाऊबंदांना गळून पडतांना पाहिले असणार आणि आपली गतसुध्दा आता तशीच होणार या विचाराने ती भयभीत होऊन किंवा निराशेने फिकट पडलेली असतील. ही सारी इतकी रंगीबेरंगी पाने गळून पडून या झाडांचे बुंधे आणि फांद्या यांचे फक्त काळवंलेले सांगाडे आता शिल्लक राहणार आहेत ही कल्पना माझ्याने करवत नव्हती.
शाळेत असतांना एक कविता शिकलो होतो ती अशी होती.

आडवाटेला दूर एक माळ । तरू त्यावरती थोरला विशाल ।

आणि त्याच्या बिलगूनिया पदासी । जीर्ण पाचोळा पडे तो उदास ।।
इथे तर हमरस्त्यापासून जवळच ओक, मेपल आदि ताडमाड उंच वृक्षांच्या रांगाच्या रांगा उभ्या होत्या आणि त्यांच्या पायथ्याशी गळलेल्या पानांचा इतका खच पडला होता की त्याखालची जमीन व त्यावर उगवलेली हिरवळ त्या पाचोळ्याच्या दाट थराखाली झाकली गेली होती. हे आता वाढतच जाणार होते आणि वा-याच्या झुळुकेने त्यातल्या कांही पानांना उडवले तरी ती बाजूला पडलेल्या पाचोळ्याचा थरच वाढवत होती.

1 comment:

Yawning Dog said...

मला पण मलूल पाने बघताना आज अगदी असेच वाटले -
btw "दुरून डोंगर साजिरे" चा उत्तरार्ध माहित नव्हता, तुमच्यमुळे कळाळा...धन्यवाद!