Monday, November 10, 2008

वृक्षांची रंगसंगती


उत्तर अमेरिकेत भ्रमण करतांना फॉल कलर्समध्ये रंगलेल्या वृक्षराजीचे अनुपम निसर्गसौंदर्य पहायला मिळाले. मात्र ते पहात असतांना ही किमया कशामुळे आणि कशासाठी घडत असेल याचे कुतूहल राहून राहून वाटतच होते. त्यामागची कारणपरंपरा समजल्यावर कुतूहलाची जागा अचंभ्याने घेतली.
इथे नेमके काय घडते ते समजण्यापूर्वी आपल्याला ठाऊक असलेल्या वनस्पतीशास्त्राची थोडक्यात उजळणी केली तर तुलनेसाठी ते सोपे जाईल. सगळ्या झाडांना फुटणारे कोवळे कोंब फिकट हिरव्या, पिवळ्या किंवा तांबूस रंगाचे तसेच मोहक, नाजुक, रसरशीत आणि तजेलदार असतात. ती पाने पाहतां पाहतां वाढतांना हिरवी गार होतात. थोडी जून झाल्यानंतर ती निबर होतात तसेच त्यांचा गडद हिरवा रंग जरासा काळपट वाटू लागतो. कालांतराने ती पाने पिकून पिवळी पडतात, सुकत जातात आणि अखेरीस गळून पडतात. बहुतेक झाडांना रंगीबेरंगी, सुरेख आणि सुवासिक अशी फुले लागतात. फुलपाखरे, भुंगे, मधमाशा अशासारखे कीटकांना ती फुले आपल्याकडे आकर्षित करतात. या कीटकांद्वारे फुलांचे परागकण दुस-या फुलांपर्यंत पोचतात आणि त्यामुळे फलधारणा होते. झाडांची फळेसुध्दा आपले रंग, रूप, चंव यांनी पक्ष्यांना व प्राण्यांना आपल्याकडे ओढून घेतात. त्यांच्याकडून या झाडांच्या बिया दूरवर पसरतात. यातून त्याच जातीची नवी झाडे उगवतात. अशा प्रकारे वनस्पतींचे प्रजनन चालत राहते.
आपल्याकडे दिसणारे वड, पिंपळ, आंबा, चिंच, बाभूळ, गुलमोहोर आदी मोठे वृक्ष अगदी लहानपणापासून पहाण्यात असतात. त्यातले कांही तर आजोबा, पणजोबांच्या काळातले असतात. म्हणजे त्यांचा बुंधा आणि मुख्य शाखा पूर्वीच्या असतात. फुले आणि फळे तर अगदी अल्पकाल झाडांवर असतात आणि पानेंसुध्दा बदलत राहतात. कांही विशिष्ट ऋतूंमध्ये या झाडांना जोमाने नवी पालवी फुटते आणि कांही काळात त्यांची पिकली पाने जास्त संख्येने गळतात असे दिसले तरी बाराही महिने ही झाडे मुख्यतः हिरवी गार असतात. हा हिरवा रंग पानांमधल्या क्लोरोफिल या रासायनिक तत्वामुळे त्यांना प्राप्त होतो. जमीनीतून मुळांनी शोषलेले पाणी आणि क्षार यांचा हवेमधील कर्बद्विप्राणिल वायूंबरोबर संयोग घडवून आणण्याचे काम हे क्लोरोफिल फोटोसिन्थेसिस या क्रियेमधून करते. यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते आणि यातून अन्न तयार होते. या अन्नावर झाडांची वाढ होते, तसेच हे अन्न खाऊन कीटक, पक्षी आणि शाकाहारी प्राणी जगतात. मांसाहारी प्राण्यांचा उदरनिर्वाह त्यांना खाऊन होतो. हे सारे पशुपक्षी श्वसनक्रियेत हवेतला प्राणवायू घेतात आणि कर्बद्विप्राणिल वायू हवेत सोडतात. अशा प्रकाराने सृष्टीमधील जीवनाचे संपूर्ण चक्र चालत राहते.
ऊष्ण कटिबंधात व समशीतोष्ण कटिबंधाच्या दक्षिणेकडल्या भागांत हे असे युगानुयुगे चालत आलेले आहे, पण त्याहून उत्तरेकडे वेगळ्या प्रकारचे हवामान असते. अमेरिकेच्या उत्तर भागात हिंवाळ्याच्या दिवसात तपमान शून्य अंशाच्या खाली जाऊन सगळीकडे बर्फाचे साम्राज्य पसरते. दिवसाचा कालावधी अगदी लहान होतो आणि त्या वेळेतही सूर्यनारायण क्षितिजावरून जेमतेम हांतभर वर येऊन पुन्हा खाली उतरतो. यामुळे कडक ऊन असे फारसे पडतच नाही. सगळे पाणी गोठून गेल्यामुळे झाडांची मुळे पाणी शोषून घेऊन त्याला फांद्यांपर्यंत पोचवू शकत नाहीत. त्यामुळे फोटोसिन्थेसिस ही क्रिया मंदावते. आपल्याकडली बारमाही हिरवी झाडे अशा वातावरणात तग धरू शकणार नाहीत. पण या थंड हवामानात वाढलेल्या वृक्षांच्या जातींनी या संकटावरचा मार्ग शोधून काढला आहे.
या वृक्षांना वसंत ऋतूमध्ये पानाफुलांचा बहर येतो. इथल्या उन्हाळ्यातले मोठे दिवस, त्यात भरपूर सूर्यप्रकाश आणि पाण्याचा मुबलक पुरवठा असल्यामुळे त्यांचा सदुपयोग करून ही झाडे झपाट्याने वाढतात, तसेच अन्न तयार करण्याचा कारखाना जोरात चालवून त्याचा भरपूर साठा जमवून ठेवतात. कडक थंडीत आणि अंधारात फोटोसिन्थेसिस होत नसल्यामुळे पानांचा फारसा उपयोग नसतो, त्याशिवाय त्यांचे क्षेत्रफळ जास्त असल्यामुळे त्यातून जास्त बाष्पीभवन होते, त्यावर जास्त बर्फ सांचून त्याचा भार वृक्षाला सोसावा लागतो असे तोटेच असतात. हे टाळण्यासाठी हे वृक्ष आधीपासूनच तयारीला लागतात.
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस हे वृक्ष आपली वाढ थांबवतात आणि त्यांच्या पानांमधल्या क्लोरोफिलचे विघटन होणे सुरू होते, तसेच पानांमधले रस झाडाच्या आंतल्या बाजूला शोषले जाऊ लागतात. ते फांद्या आणि खोडांमधून अखेर मुळांपर्यंत जाऊन पोचतात आणि सुरक्षितपणे साठवले जातात. झाडांना थंडीत न गोठण्यासाठी यांचा उपयोग होतो. पण यामुळे मरगळ येऊन ती पाने सुकायला लागतात आणि गळून पडतात. पाने नसल्यामुळे झाडांचे श्वसन जवळ जवळ बंद होते आणि मुळांकडून पाण्याचा पुरवठा थांबल्यामुळे रसांचे अभिसरण होऊ शकत नाही. त्यापूर्वीच ही झाडे झोपेच्या पलीकडल्या डॉर्मंट स्थितीत जातात. आपल्याकडचे योगीराज सर्व शारीरिक क्रिया अतिमंद करून वर्षानुवर्षे ध्यानस्थ राहात असत असे म्हणतात. ही झाडेसुध्दा दोन तीन महिने ध्यानावस्थेत काढून स्प्रिंग येताच खडबडून जागी होतात.
पानांमध्ये हिरव्या रंगाच्या क्लोरोफिलखेरीज कॅरोटिनाइड्स, क्झँथोफिल, अँथोसायनिन यासारखी पिवळ्या आणि तांबड्या रंगांची रसायनेसुध्दा असतात. एरवी क्लोरोफिलचे प्रमाण जास्त असल्यामुळे हे इतर रंग झाकले जातात. जेंव्हा क्लोरोफिल नष्ट होते तेंव्हा इतर द्रव्यांचे रंग दिसायला लागतात. कांही झाडे फॉलच्या काळात लाल रंगाचे अँथोसायनिन तयारही करतात. या द्रव्यांमुळे निर्माण होणारे रंग एकमेकात मिसळून त्यांच्या प्रमाणानुसार रंगांच्या वेगवेगळ्या असंख्य छटा तयार होतात. मात्र ही झाडे कोणालाही आकर्षित करण्यासाठी हे रंग धारण करत नाहीत. थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांची जी धडपड चाललेली असते त्यात ते बायप्रॉडक्ट्स तयार होतात. हे सगळे पाहता झाडांना फक्त जीव असतो एवढेच नसून त्यांना बुध्दी, विचारशक्ती आणि दूरदृष्टीसुध्दा असते की काय असे वाटायला लागते.

1 comment:

pravin said...

Really Nice information you wrote ..
Thanks..
Pravin.