Saturday, June 20, 2009

न्यू जर्सी

 न्यू जर्सी (पूर्वार्ध)

Friday, June 19, 2009 

जर्सी' नांवाच्या जातीच्या गायी भारतात आल्यानंतर इथे श्वेतक्रांती झाली, दुधाचा महापूर वगैरे आला आणि मुख्य म्हणजे भल्या पहाटे उठून दुधाच्या बाटल्या हातात धरून दूधकेंद्रापुढे रांगेत उभे राहण्याच्या कामातून माझी मुक्तता झाली. त्यामुळे 'जर्सी' या नांवाबद्दल माझ्या मनात प्रेमभाव उत्पन्न झाला. पुढे भडक रंगाचे, दाट वीण असलेले कॉलरवाले बनियान 'जर्सी' या नांवाने बाजारात आले. हे असले कपडे कोण घालेल असे म्हणत पाहता पाहता सगळ्यांनी ते विकत घेतले आणि त्याची फॅशन झाली. पुढे स्पोर्टशर्ट, टीशर्ट वगैरे नांवाने ते ओळखले जाऊ लागले. एकादी गोष्ट नाहीशी झाली आणि तिचे नांव तेवढे सिल्लक राहिले तर आपण ती 'नामशेष' झाली असे म्हणतो. या बाबतीत 'जर्सी' हे नांव 'वस्तूशेष' झाले असे म्हणता येईल. कोणाकोणाचा मुलगा किंवा मुलगी, नाहीतर मित्र, शेजारी, नातेवाईक असे कोणीतरी हल्ली अमेरिकेतल्या न्यू जर्सी इथे असतात असे वरचेवर ऐकायला येऊ लागले. त्याबरोबर हे न्यू जर्सी न्यूयॉर्कला अगदी खेटून आहे अशी माहितीही मिळाली. कांही लोक तर न्यूजर्सीमध्ये राहतात आणि न्यूयॉर्कला कामाला जातात असेसुध्दा ऐकले. त्यामुळे मुंबईला लागून ठाणे व नवी मुंबई ही शहरे आहेत तसेच न्यूयॉर्कला लागून न्यूजर्सी हे दुसरे मोठे शहर असावे आणि न्यूयॉर्क या महानगराच्या वाढीचा भार ते उचलत असावे अशी माझी धारणा झाली. दोन वर्षांपूर्वी माझी भाची लग्न होऊन पतीगृही न्यूजर्सीला गेली तेंव्हा ती विमानाने इथून न्यूयॉर्कला गेली असे ऐकल्यामुले ही भावना अधिकच दृढ झाली.

अॅटलांटाला जाण्यासाठी आमचे तिकीट नेवार्कमार्गे निघाले तेंव्हा हा शब्द पहिल्यांदा माझ्या समोर आला. एकाद्या शब्दाचे पहिले, शेवटचे आणि मधली कांही अक्षरे बरोबर असली तर आपला मेंदू त्यातील स्पेलिंगच्या चुका माफ करून ओळखीचा शब्द बरोबर वाचतो असे प्रयोगातून सिध्द झाले आहे असे म्हणतात. त्यानुसारच पहिल्या वेळी मी 'NEWARK' हा शब्द बहुधा 'NEWYORK' असाच वाचला असावा. लक्षपूर्वक वाचनानंतर हा फरक जाणवला तेंव्हाही ती स्पेलिंगमधली चूक वाटली. ती दुरुस्त करण्यासाठी जास्त माहिती गोळा केली तेंव्हा नेवार्क हे न्यूजर्सीमधले विमानतळ आहे असे समजले. त्याबरोबरच न्यूयॉर्कच्या विमानतळाला जेएफके (केनेडी यांचे संक्षिप्त नांव) एअरपोर्ट म्हणतात असेही कळले. त्यामुळे अशाच प्रकारे न्यूजर्सीतल्या विमानतळाला कुटल्याशा मिस्टर नेवार्कचे नांव दिले असेल असे वाटले. माझी भाचीसुध्दा बहुधा नेवार्कलाच गेली असेल, पण तिलाही नेवार्क आणि न्यूयॉर्क यांमधला फरक कदाचित नीटसा माहीत नसल्यामुळे त्यावरील चर्चा टाळण्यासाठी तिने आपण न्यूयॉर्कला जात आहोत असेच बहुधा सर्वांना सांगितले असावे. आम्हाला या विमानतळावर फक्त एका विमानातून उतरून दुस-या विमानात बसायचे होते. त्यामुळे ती जागा अॅटलांटाच्या वाटेवर अमेरिकेत कुठेतरी आहे एवढी माहिती आम्हाला पुरेशी होती.

विमानतळावर पोचल्यावर तिथल्या बोर्डावर आमच्या फ्लाईटच्यापुढे नेवार्क असेच लिहिले होते आणि विमान सुटतांना झालेल्या घोषणेत तेच नांव होते. मुंबईहून उड्डाण केल्यानंतर माझ्या अपेक्षेनुसार पश्चिमेकडे अरबी समुद्रावरून जाण्याऐवजी ते उत्तरेला जमीनीवरून उडू लागले तेंव्हा मी थोडा गोंधळात पडलो होतो, पण ते उत्तर ध्रुवावरून जाणार असल्याचे लक्षात आले आणि उत्कंठेत भर पडली. उत्तर ध्रुवाजवळ गेल्यानंतर त्याने अॅटलांटिक महासागराला पूर्णपणे टाळून पूर्व गोलार्धातून पश्चिम गोलार्धात प्रवेश केला आणि कॅनडामार्गे ते यूएसएमध्ये नेवार्कला जाऊन उतरले. अमेरिकेच्या (यूएसएच्या) भूमीवर माझे पहिले पाऊल नेवार्क इथे पडले असे लाक्षणिक अर्थाने म्हणता येईल, पण प्रत्यक्षात आम्ही हवाई पुलावरून थेट विमानतळाच्या इमारतीत गेलो आणि तिथल्या वरखाली करणा-या सरकत्या जिन्यांवरून आणि सरकणा-या पट्ट्यांवरून पुढे पुढे जात अखेर दुस-या हवाईपुलावरून दुस-या विमानात प्रवेश केला. नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर आपले ऐतिहासिक पहिले पाऊल टाकले तेंव्हा त्याच्या बुटाचा ठसा चंद्रावरल्या जमीनीवर उमटला होता. त्या ठशाच्या छायाचित्राला अमाप प्रसिध्दी मिळाली होती. मात्र नेवार्कच्या भूमीचा आमच्या बूटांनासुध्दा स्पर्श झाला नाही. पुढे अॅटलांटाला गेल्यानंतरच अमेरिकेच्या भूमातेचा स्पर्श माझ्या पायांना झाला.

आम्ही अमेरिकेला जायला निघालो तेंव्हा तिकडे थंडी पडायला सुरुवात झाली होती म्हणून आम्ही भरपूर गरम कपडे सोबत घेतले होते, पण मुंबईत ऑक्टोबर हीटने जीव हैराण होत असल्यामुळे ते अंगावर चढवणे शक्यच नव्हते. गळ्याभोवती आणि कंबरेभोवती गुंडाळून ते कसेबसे विमानात नेले आणि विमानाने पूर्ण उंची गाठल्यानंतर आंतला गारवा वाढायला लागला तेंव्हा ते अंगावर चढवले. नेवार्कला पहाटेच्या वेळेला विमान पोचले तेंव्हा तिथले तापमान शून्य अंशाच्या आसपास होते. त्यामुळे गरम कपडे घालूनसुध्दा थोडी थंडी वाजत होती. निदान दहा तरी 'कटिंग' मावतील एवढ्या जंबो ग्लासात चहा घेऊन तो घोटघोटभर घशाखाली उतरवला तेंव्हा अंगात जराशी ऊब आली. अॅटलांटाला पोचलो तेंव्हा तिथले हवामान मात्र सुखद होते, पण न्यूयॉर्क आणि त्याहून उत्तरेच्या भागातली थंडी वाढतच जाणार असल्यामे तो भाग लगेच पाहून घ्यायचे ठरले होते. त्यामुले दोन दिवस अॅटलांटाला राहून जेटलॅग थोडा घालवला आणि आम्ही पुन्हा नेवार्क गांठले.

अॅटलांटा ते नेवार्क हा प्रवास जवळजवळ मुंबई ते कोलकाता एवढा असेल. त्यामुळे आम्ही एवीतेवी नेवार्कला उतरलेलो असतांना दोन दिवसांसाठी अॅटलांटाला जाून परत यायची काय गरज होती असे कोणालाही वाटेल. त्यापेक्षा न्यूजर्सीमध्येच राहून आधी तिकडला भाग पाहून अॅटलांटाला गेलो असतो तर वेळ, कष्ट आणि पैसे या सर्वांची बचत झाली असती असे पोक्त विचार मीसुध्दा पूर्वी केला असता. पण आता काळाबरोबरच काळ, काम, वेगाची गणिते सुध्दा बदलली आहेत. नेवार्कहून अॅटलांटाला जाण्यात आणि परत येण्यात दोन दिवस गेले होते खरे, पण आता माझ्याकडे भरपूर रिकामा वेळ असल्यामुळे तो वेळ वाया गेला असे न वाटता तो मजेत गेला असे वाटले. विमानाचा प्रवास आरामदायी झाला असल्यामुळे इतक्या वेळात घरी कांही काम करण्यात किंवा हिंडण्याफिरण्यात जेवढे शारीरिक कष्ट पडले असते तेवढेसुध्दा त्या प्रवासात पडले नाहीत. अमेरिकेतल्या मुक्कामासाठी भारतातून भरून आणलेल्या सर्व बॅगा बरोबर घेऊन हिंडण्यात मात्र नक्कीच जास्त मेहनत करावी लागली असती. राहता राहिला खर्चाचा मुद्दा. आजकाल विमानाच्या तिकीटांचे भाव शेअरबाजाराप्रमाणे वरखाली होत असतात. खूप आधीपासून तिकीटे काढून ठेवली असतील तर ते त्यातल्या त्यात स्वस्तात पडते. त्यानुसार आम्ही चारपांच महिन्यापूर्वी बुक केलेले मुंबई ते अॅटलांटापर्यंतचे तिकीट आणि महिनाभरापूर्वी काढलेले अॅटलांटा ते नेवार्क आणि वापसीचे तिकीट यांची एकंदर किंमत त्या वेळी मुंबई पासून फक्त नेवार्कपर्यंतच जितके भाडे पडले असते त्यापेक्षा कमी पडले होते. या व्यवहारात एकंदरीत फायदा झाला म्हणून आपली पाठ थोपटून देखील घेतली. त्याशिवाय अॅटलांटानिवासी कुटुंबियांना भेटण्याची आस लागलेली होती, इकडून नेलेले त्यांच्या खास आवडीचे खाद्यपदार्थ शिळे होण्याच्या आत त्यांना खाऊ घालायचे होते, अशी इतर अनेक कारणे थेट त्यांच्याकडे जाण्यामागे होतीच.

चार दिवस फिरतांना लागतील एवढे जरूरीपुरते कपडे लहानशा बॅगेत घेऊन आम्ही भ्रमंतीला निघालो. अमेरिकेतल्या विमानतळावर कोणालाही प्रवेश करायला मुभा असते आणि सिक्यूरिटी चेकपॉइंटपर्यंत बेलाशक जाता येते. त्यासाठी तिकीट वगैरे काढावे लागत नाही. सुरक्षा तपासणी मात्र जरा कडकच असते. त्यासाठी खिशातल्या एकूण एक वस्तू तर बाहेर काढाव्या लागतातच, शिवाय डोक्यावरची कॅप, अंगातले जॅकेट, कंबरेचा पट्टा, पायातले बूट, मंगळसूत्रासकट अंगावर असतील नसतील ते सर्व दागीने वगैरेसुध्दा काढून ते एका ट्रेमध्ये ठेवावे लागतात. अमेरिकेतल्या नियमांनुसार हँडबॅगेजमध्ये काय काय न्यायची परवानगी आहे आणि कुठल्या वस्तू नेण्याला मनाई आहे हे नीट माहीत नसल्यामुळे आम्ही आपल्या हातातल्या बॅगा सरळ चेकइन करून टाकल्या आणि हात हलवत विमानात जाऊन बसणार होतो. विमानात बसण्याच्या दहा मिनिटे आधीच विमानात कांही खायला प्यायला मिळणार नाही अशी घोषणा झाल्यामुळे प्रवासात सोबत अन्न असावे ही जुन्या काळातली शिकवण आठवली आणि समोरच्या स्टॉलवरून बरेच खाद्यपदार्थ पॅक करून आणले. ही घोषणा कदाचित त्या दुकानदारांनी प्रायोजित केलेली असावी. कारण विमानप्रवास अगदीच निर्जळी उपासाचा नव्हता. निरनिराळी ऊष्ण आणि शीत पेये घेऊन एक ट्रॉली फिरवली गेली आणि ज्याला जे पेय हवे असेल ते दिले गेले. त्याबरोबर तोंड चाळवण्यासाठी इवल्याशा पाकिटात कांही तरी देत होते. त्यांची अमेरिकन अॅक्सेंटमध्ये उच्चारलेली इंग्रजी नांवे कांही मला समजली नाहीत. त्यामुळे त्यातले काय पाहिजे हे सांगायला माझी पंचाईत झाली. कशाचेच नांव न घेता "त्या दोन्ही मिळतील कां ?" असे विचारताच त्या दोन्ही पुरचुंड्या मिळाल्या. त्यातल्या एकीत रुपयाच्या नाण्याएवढ्या आकाराची दोन क्रॅकर बिस्किटे होती आणि दुसरीत मोजून दहा बारा भाजलेले शेंगदाणे होते. आम्ही घरातून निघतांना पोटभर नाश्ता हाणून घेतला असल्यामुळे भूक लागली नाहीच. विमानात दिलेल्या खाद्यपेयांच्या सोबतीला विकत घेतलेले थोडे वेफर्स आणि कुरकुरे खाऊन टाइम पास केला. बाकीचे पदार्थ घरीच न्यावे लागले.

अमेरिकेतल्या विमानतळांच्या प्रवेशद्वारातून जसे कोणालाही आंत जाता येते तसेच प्रवाशांनी बाहेर पडण्याच्या मार्गानेसुध्दा बाहेरून आंत जाता येते. आम्ही नेवार्कला उतरून बॅगेज कलेक्शनच्या बेल्टपाशी आलो तो आम्हाला घेण्यासाठी आलेला सौरभ तिथे येऊन उभा होता. त्याच्या गाडीत बसून घरी जायला निघालो. त्या दिवशी त्याचे जीपीएसचे यंत्र कांचेच्या आंतल्या बाजूला चिकटून बसायलाच तयार नव्हते, ते सारखे खाली घसरत होते, त्यामुळे मी ते हातात धरून बसलो. विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर निरनिराळ्या दिशांना जाणा-या वाटा फुटल्या. जाणारे व येणारे रस्ते एकमेकांना न भेटताच उड्डाणपुलावरून किंवा लहानशा बोगद्यातून एकमेकांना पार करत होते. अजस्त्र अशा रस्त्यांचे एवढे मोठे जाळे बांधणा-यांचे जास्त कौतुक करावे की त्या जंजाळातून नेमकी आपली वाट शोधून देणा-या त्या इवल्याशा मार्गदर्शकाचे (जीपीएसचे) करावे याचा संभ्रम मला पडत होता. विमानतळाहून निघाल्या नंतर वाटेत कोठल्याही नाक्यावर क्षणभरही न थांबता सलगपणे वीस पंचवीस मिनिटे गाडी चालवून आम्ही घरी पोचलो.

विमानतळावर बसल्या बसल्या क्षितिजापर्यंत जितके दृष्य समोर दिसत होते त्यात गगनचुंबी इमारतींचे जंगलही नव्हते किंवा हिरवी गार नैसर्गिक वृक्षराई किंवा विस्तीर्ण पसरलेली सपाट शेतजमीनही नव्हती. न्यूजर्सीच्या पहिल्या दर्शनात त्याचे स्वरूप कांही समजले नाही. घरी पोचेपर्यंत वाटेत बहुतेक रस्त्यांच्या दुतर्फा रांगेत लावलेल्या उंच झाडांची मानवनिर्मित वनराई होती. अधून मधून कांही इमारती, चर्चेस, दुकाने, हॉटेले, मैदाने वगैरे दिसली, पण आपण एका महानगरातून जात आहोत असे मुळीच वाटले नाही. घरी गेल्यावर मी सौरभला विचारले, "न्यूजर्सी विमानतळाच्या पलीकडल्या बाजूला आहे कां?" त्यावर तो म्हणाला, "कां? आपण आतासुध्दा न्यूजर्सीमध्येच आहोत."
"पण मला तर मोठ्या शहरात आपण आल्यासारखे कुठे वाटलेच नाही." मी म्हणालो.
"न्यूजर्सी हे इकडल्या स्टेटचे नांव आहे." सौरभ.=
न्यूजर्सीला प्रत्यक्ष जाऊन पोचल्यानंतर माझ्या डोक्यात पहिल्यांदा प्रकाश पडत होता.

न्यू जर्सी (उत्तरार्ध)

June 19, 2009


मी म्हंटले, "ओके, न्यूजर्सी हे एक शहर आहे आणि नेवार्क हे इथल्या एअरपोर्टचं नांव आहे अशी माझी समजूत होती. पण न्यूजर्सी हे स्टेटचे नांव आहे तर नेवार्क काय आहे?"
"ओह, नेवार्क हे एक शहर आहे आणि लिबर्टी इंटरनॅशनल हे तिथल्या एअरपोर्टचे नांव आहे, पण ते जेएफकेएवढे विशेष प्रचलित नाही." सौरभने माहिती दिली.
"तुमचं हे पारसिपानी म्हणजे न्यूजर्सी शहराचे उपनगर असेल असेही मला वाटले होते." माझी आणखी एक शंका मी व्यक्त केली.
"पारसिपानी हे एक स्वतंत्र शहर आहे आणि ते न्यूजर्सीमध्येच येते, पण नेवार्कशी त्याचा कांही संबंध नाही."
माझ्या अज्ञानाचे पापुद्रे निघत गेले. बरेच वेळा ऐकीव माहितीचे असेच होते याचा मला अनुभव आहे. कांही लोक मात्र कुठेतरी कांहीतरी अर्धवट ऐकलेल्याच्या आधारावर ठामठोक विधाने करत असतात आणि ती बरोबरच आहेत म्हणून वाद घालतात तेंव्हा ऐकतांना मजा येते.
"तुमच्या पारसिपानीत मुसोलिनी, मार्कोनी यासारख्या इटालियन लोकांची वस्ती आहे कां?" मी गंमतीने विचारले.
त्याच अंदाजात त्याने उत्तर दिले, "इटालियन आहेत की नाहीत ते माहीत नाही, पण लाखानी, अंबानी यासारखे गुजुभाई मात्र भरपूर आहेत, थोडे अडवानी गिडवानीसुध्दा आहेत."त्यांच्या भागात अनिवासी भारतीयांचे (एनआरआयचे) वास्तव्य मोठ्या संख्येने आहे. कांही मराठी लोकसुध्दा आहेत, पण सर्वाधिक संख्या तेलुगूभाषिकांची आहे. शहरातून फिरतांनादेखील शहा, पटेल, भाटिया वगैरे नांवांच्या पाट्या बंगल्यांवर आणि दुकानांवर दिसत होत्या. ही मंडळी पूर्वीच येऊन इथे स्थायिक झाली होती आणि त्यांनी तिथे मालमत्ता संपादन केली होती. पूर्वीच्या पिढीत आलेले जास्त करून गुजराथी आणि नव्या पिढीतले अधिकांश आंध्रवासी असेच प्रमाण मी अल्फारेटालासुध्दा पाहिले.

दुपारचा चहा घेऊन शहरात भटकायला बाहेर पडलो तेंव्हा हवेत गारवा असला तरी वातावरण प्रसन्न होते. पण हे हवामान आता थोडेच दिवस असे राहणार होते. थंडी वाढून हिमवर्षाव सुरू झाला आणि दिवस लवकर मावळून अंधार पडायला लागला की संध्याकाळी असे मजेत फिरायला मिळणार नव्हते. म्हणूनच मोठ्या संख्येने लोक घराबाहेर पडलेले दिसले. त्यात पुन्हा भारतीय वंशाचेच खूप दिसले. अमेरिकन लोकांना पायी चालावे असे कधी वाटले तर ते आता बहुधा मोटारीत बसून जिममध्ये जातात आणि ट्रेडमिलवर वर्कआउट करतात, किंवा त्यासाठी घरातल्या एकाद्या खोलीत त्यांनी सगळ्या प्रकारची यंत्रे आणून ठेवली असतील. महानगरांमध्ये आपली गाडी पार्किंग लॉटमध्ये ठेवून कामाच्या जागेकडे तरातरा चालत जाणारे लोक दिसतात, पण मनात कसलाही उद्देश नसतांना रस्त्यातून केवळ रमतगमत फिरण्यातला आनंद बहुतेक भारतीयांनाच अनुभवता येत असावा. त्यात कांही मराठी माणसेसुध्दा दिसली, पण आता त्याचे एवढे अप्रूप वाटत नाही. त्यातून आम्ही त्या जागी चार दिवस राहणार असतो तर ती वेगळी गोष्ट होती, पण आम्हाला दुसरे दिवशीच निघायचे होते. पुन्हा कधी आम्ही अमेरिकेत आलो, त्यावेळी पारसीपानीला जवळचे कोणी रहात असले आणि त्यांना भेटायचे ठरले तर पुन्हा त्या गांवी येण्याची संभावना होती, ती अर्थातच कमीच होती. कदाचित आम्हाला दिसलेली मराठी मंडळीसुध्दा अशीच एकदोन दिवसांसाठी तिथे आलेली असतील आणि त्यांनी असाच विचार केला असेल, त्यामुळे त्यातल्या कोणांबरोबर संवाद साधला गेला नाही.

पारसीपानी हे एक टुमदार म्हणावे असे शहर आहे. एवढ्या आकाराची जवळ जवळ शंभर शहरे फक्त न्यू जर्सीतच आहेत आणि न्यू जर्सी तर यूएसएच्या नकाशात नीट दिसतसुध्दा नाही, इतके लहान राज्य आहे. यावरून कल्पना येईल, असे असले तरी सर्व प्रकारच्या सुखसोयी तिथे उपलब्ध आहेत. मोठ्या शहरांमध्ये जास्तीत जास्त एफएसआय मिळवण्यासाठी आजकाल कदाचित सरळसोट चौकोनी इमारती उभ्या केल्या जात असाव्यात. लहान लहान गांवात मात्र आता फार सुरेख बंगले पहायला मिळतात. भारतात मैसूरला मला असाच अनुभव आला होता. पारसीपानीलासुध्दा कांही बंगल्याच्या वास्तू अत्यंत प्रेक्षणीय वाटल्या. गांवात अमेरिकन पध्दतीची अनेक दुकाने होती, त-हेत-हेची हॉटेले होती, त्यात चिनी तर होतीच, एक भारतीयसुध्दा होते. अनेक घरांच्या माथ्यावर किंवा समोर अमेरिकेचे राष्ट्रध्वज लावलेले होते. कांही ठिकाणी न्यू जर्सी संस्थानाचा वेगळा ध्वजसुध्दा लावलेला दिसला. ही सारी खाजगी मालमत्ता होती, सरकारी कार्यालये नव्हती. त्यामुळे त्याचे नवल वाटले. अमेरिकेत झेंडा लावण्याचे वेगळेच प्रस्थ आहे. अमेरिकेच्या झेंड्यातले स्टार अँड स्ट्राइप्स रंगवलेल्या असंख्य प्रकारच्या वस्तू आणि कपडे बाजारात मिळतात, लोक ते विकत घेता त आणि हवे तसे वापरतात. त्यामुळे त्या ध्वजाचा अवमान होत नाही किंवा कोणाच्या नाजुक भावना त्यात दुखावल्या जात नाहीत.

पारसीपानीला एक विस्तीर्ण तलाव आहे. तलावाच्या काठाकाठाने फिरण्यासाठी छानसा रस्ता बांधला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत त्यात नौकाविहार करता येतो, मासे पकडायची व्यवस्था सुध्दा आहे. हिंवाळा सुरू झाल्यामुळे माणसांसाठी त्या बंद झाल्या होत्या, पण करकोच्यासारखा एक उंच मानेचा पक्षी ध्यान धरून उभा होता. आमच्यासमोर त्याला मत्स्यप्राप्ती झालेली दिसली नाही. आमची चाहूल लागताच तो भुर्रकन दूर उडून गेला. त्या भागात इतर जलाशयसुध्दा आहेत. पारसीपानी शहराच्या जवळच पाण्याची एक प्रचंड टाकी बांधलेली आहे. त्यातून बहुधा आजूबाजूच्या गांवांनासुध्दा पाणीपुरवठा होत असेल. तो टँक अमक्या नांवाच्या मेयरने बांधला असे त्या टाकीच्या भिंतीवर चांगल्या हातभर उंच अशा मोठमोठ्या ठळक आणि बटबटीत अक्षरात लिहिलेले वाचून मजा वाटली. बाजूच्या रस्त्यावरून सुसाट वेगाने धांवणा-या गाडीतील लोकांनासुध्दा वाचता यावे यासाठी ही योजना असावी. प्रसिध्दी मिळवण्याचा केवढा सोस ?

न्यू जर्सीहून परत आल्यानंतर त्या भागासंबंधी थोडीशी माहिती गुगलवरून काढली. न्यूयॉर्क हे महानगर त्याच नांवाच्या राज्याच्या आग्नेयेकडील अगदी टोकावर आहे. त्याला अगदी खेटून न्यू जर्सी हे एक वेगळे चिमुकले संस्थान आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने त्याचा पार सत्तेचाळीसाव्वा क्रमांक लागतो. अमेरिकेच्या नकाशात ते शोधून काढावे लागते. लोकसंख्येच्या बाबतीत मात्र त्याचा सातवा क्रमांक लागतो. अर्थातच हा तुलनेने दाट वस्तीचा प्रदेश आहे. नेवार्कपासून पारसीपानीपर्यंत आणि पारसीपानीपासून न्यूयॉर्कपर्यंत जेवढ्या भागात आम्ही फिरलो त्यात कोठेच अवाढव्य शेते किंवा घनदाट वृक्षराईने नटलेली जंगले दिसली नाहीत. कुठे दाट तर कुठे विरळ अशी मनुष्यवस्तीच जवळजवळ सलगपणे सगळीकडे दिसत होती. अधून मधून अमक्या शहराची हद्द इथे संपते आणि तमक्या शहराची हद्द सुरू होते अशा पाट्या वाचून आपण एका गांवातून दुस-या गांवात प्रवेश केला असे समजायचे. आपल्याकडील जिल्ह्याहून लहान आणि साधारणपणे तालुक्याएवढ्या आकाराच्या भूभागाला तिकडे काउंटी म्हणतात. न्यूयॉर्कच्या पश्चिमेकडे ईसेक्स कौंटीमध्ये नेवार्क शहर आहे. त्याच्या पलीकडे मॉरिस नांवाच्या काउंटीमध्ये असलेल्या पारसीपानीला आम्ही गेलो होतो. नेवार्क हे न्यूजर्सीमधले सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असले तरी या संस्थानाची राजधानी पार पश्चिमेकडल्या मर्सर कौंटीमध्ये असलेल्या ट्रेंटन या लहान शहरी आहे. हडसन कौंटीमधले जर्सी सिटी हे मोठे शहर तर न्यूयॉर्कचाच भाग वाटावा इतके त्याला जोडून आहे. सुप्रसिध्द स्वातंत्र्यदेवीचा पुतळा न्यूयॉर्कला आहे असले म्हंटले जात असले तरी तो ज्या द्वीपावर आहे ते लहानसे बेट न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी या दोन्ही राज्यांच्या किना-यांपासून अगदी जवळ आहे. त्या बेटावरून पाहिल्यास न्यूयॉर्कचा मॅनहॅटन भाग आणि जर्सी सिटी बाजूबाजूला दिसतात, त्यामुळे दोन्ही ठिकाणच्य़ा लोकांना त्या पुतळ्याबद्दल आत्मीयता आहे. नकाशात पाहिले तर न्यूयॉर्क शहराचा कांही भाग न्यूजर्सी स्टेटने वेढलेला दिसतो, तर जर्सी सिटी न्यूयॉर्क स्टेटचा भाग वाटते. या भागाच्या राज्यपुनर्रचनेचा विचार कोणी केला नसावा.


4 comments:

Anonymous said...

न्युअर्क या नावाचा उल्लेख नेवार्क करण्यामागे काय कारण आहे?

Anand Ghare said...

या जागेबद्दल मला कांही माहिती नव्हती हे मी लिहिलेले आहेच. भारतात व न्यूजर्सीमध्ये असतांना मी इतर लोकांच्या बोलण्यात नेवार्क असेच नांव ऐकले म्हणून तसे लिहिले. न्यूअर्क हा उच्चार असल्याचे मला माहीत नाही. तो तरी बरोबर आहे की याची मला खात्री वाटत नाही.

Anonymous said...

इटालियन आहेत की नाहीत ते माहीत नाही????

Kaka, NY khalokhal NJ madhyech sarvat jasti Italian rahatat. (tabbal 15 lakh).


http://en.wikipedia.org/wiki/Italian_Americans

Anand Ghare said...

छान. माझे गेसवर्क बरोबरच होते. माहितीसाठी आभार.