यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥
परित्राणाय साधूनां विनाशायच च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥
असे भगवंतांनी गीतेत सांगितले आहे. "जेव्हां जेव्हां धर्माला ग्लानि येऊन अधर्म बोकाळतो तेव्हां तेव्हां तो अधर्म आचरणाऱ्या दुष्टांचा नाश करून आणि धर्म आचरणाऱ्या सज्जनांचे रक्षण करून अधर्माचा नाश व धर्माचे पुनःप्रस्थापन करण्यासाठी मी (परमेश्वर) युगानुयुगे वारंवार अवतार धारण करतो" असा त्याचा अर्थ आहे. पण चराचरात भरून राहिलेला विश्वंभर असा परमेश्वर तर अनादि अनंत आहे, तो सदासर्वकाळ सगळीकडे भरलेला असतोच, मग त्याने वेगळे अवतार घेण्याला काय अर्थ आहे? असा प्रश्नही पडतो. सर्वसामान्य बुद्धीमत्ता आणि आकलनशक्ती असलेल्या लोकांना निर्गुण निराकार परब्रह्म समजणे फार कठीण किंवा जवळ जवळ अशक्य असते. गरज पडते तेंव्हा हा देव अवतार घेऊन प्रगट होतो आणि ठराविक काम करून पुन्हा अदृष्य होतो असे समजणे त्या मानाने सोपे असते. गीता सांगितली किंवा लिहिली गेली त्या काळात आतासारखे हिंदू, ख्रिश्चन, इस्लाम अशा नावांचे निरनिराळे धर्म नव्हतेच, त्यामुळे धर्म या संस्कृत शब्दाचा मूळ अर्थ नीतीमत्ता किंवा सर्वांनी योग्य प्रकाराने वागणे असा घेता येईल. सगळ्या समाजाची नीतीमत्ता रसातळाला जाते आणि समाज अधोगतीला लागतो तेंव्हा कुठल्या ना कुठल्या रूपाने देव अवतरतो आणि समाजाला पुन्हा रुळावर आणतो असा विश्वास माणसाला नकारात्मक विचारातून तग धरून राहण्याचा धीर देतो.
पुराणांमध्ये सांगितलेल्या निरनिराळ्या देवांच्या अवतारांच्या अनेक सुरस कथा पुराणिकबुवा आणि कीर्तनकारांनी रंगवून जनतेपर्यंत पोचवल्या आहेत. बहुतेक कथांची सर्वसाधारण गोष्ट अशी असते की एखादा दुष्टबुद्धि असुर खूप कठोर तपश्चर्या करतो, त्यावर प्रसन्न होऊन एक देव त्याला एक अद्भुत असा वर देतो, त्या वरामुळे त्या दानवाचे सामर्थ्य अचाट वाढल्याने तो सगळे जग जिंकून आपली मनमानी सुरू करतो. देवांनासुद्धा एकदा दिलेला वर परत घेता येत नाही, त्यामुळे सगळे देव, ऋषीमुनी वगैरे कोणा मोठ्या देवाकडे जातात आणि तो महान देव किंवा ती देवी प्रगट होऊन त्या राक्षसाचा संहार करते. यात कुठे शंकर (महादेव) हा सर्व देवांचा देव असतो, कुठे गणेश तर कुठे भगवान विष्णू . काहीवेळा सगळ्या देवांची शक्ती असलेली आदिशक्ती दुर्गा, काली, चामुंडा अशा रूपामध्ये प्रगट होऊन त्या राक्षसाचा नायनाट करते. असुराला मिळालेले वरदान आणि त्याचा विनाश करण्याची पद्धत अशा तपशीलामध्ये थोडा थोडा फरक असतो, पण मुख्य कथानक लहानसे आणि सोपे असते. सत्याचा असत्यावर किंवा चांगल्याचा वाइटावर विजय होणारच अशा अर्थाचे असते. अशा बहुतेक अवतारांमधले देव युद्ध करण्यापुरते प्रगट होतात आणि काम झाल्यावर लगेच अदृष्य होतात. त्यांच्या बाबतीत जन्म, बालपण, तारुण्य, वार्धक्य, देहावसान अशा अवस्था येत नसतात.
पण श्रीराम आणि श्रीकृष्ण या महाविष्णूच्या दोन अवतारांची विस्तृत चरित्रे मोठ्या महाकाव्यांमधून रंगवली आहेत. यातली कथानके या अवतारांच्या जन्माच्याही आधीपासून सुरू होतात आणि त्यांचे बालपण, तारुण्य, प्रौढावस्थांमधले अनेक प्रसंग त्यात तपशीलवार दाखवले आहेत. अर्थातच त्यासाठी इतर अनेक पात्रे त्यांच्या विशिष्ट व्यक्तीरेखांसह या कथानकांमध्ये येतात आणि त्या महाकाव्यांची रंगत वाढवतात. त्या कथानकांना सखोल बनवतात.
भागवतपुराणात भगवंतांच्या चोवीस अवतारांबद्दल लिहिले आहे असे म्हणतात, पण बहुतेक लोकांना फक्त दशावतार या नावाने प्रसिद्ध असलेले दहा अवतार माहीत असतात. उरलेले १४ अवतार बहुधा पुराण सांगणाऱ्या पुराणिकांना आणि कदाचित ते पुराण भक्तिभावाने ऐकणाऱ्या श्रोत्यांनाच माहीत असावेत. पहिल्या मत्स्य अवतारात प्रलय होऊन सगळी जमीन पाण्याखाली जाते तेंव्हा मोठ्या माशाच्या रूपाने आलेले विष्णू भगवान एक मोठी होडी घेऊन जमीनीवरील सकल प्राणिमात्रांना वाचवतात, तर दुसऱ्या कूर्मावतारात ते मंदार पर्वताला आपल्या पाठीवर आधार देऊन देवदानवांचे समुद्रमंथन शक्य करून देतात. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपु नावाचे दोन दैत्य जगाला फार त्रास देत असतात म्हणून वराह आणि नरसिंह असे दोन अवतार घेऊन त्या राक्षसांचा वध करतात. बळीराजा दानव असला तरी धार्मिक वृत्तीचा आणि देवभक्त असतो, वामन अवतारात गोड बोलून त्याच्याकडून पृथ्वी आणि स्वर्गाचे दान मागून घेतात, पण त्याला चिरंजीवत्व आणि पाताळाचे साम्राज्य देतात. पित्याच्या आश्रमातली दैवी गुण असलेली कामधेनु गाय सहस्त्रार्जुन हा मुजोर राजा बळजबरीने घेऊन जातो आणि त्याचा मुलगा पित्याला मारतो म्हणून सूडाने पेटलेले परशुराम त्या सर्वांना मारून टाकतात. अशा पहिल्या सहा अवतारांच्या संक्षिप्त कथा आहेत. गौतम बुद्धाला खरोखरच विष्णूचा नववा अवतार मानतात याबद्दल शंका आहे आणि दहावा कल्की अवतार अजून झालेलाच नाही. यातले मत्स्य, कूर्म, वामन आणि बुद्ध हे अवतार हातात शस्त्र धारण करतही नाहीत. बाकीचे अवतार दुष्टांचा नाश करतात.
विष्णूच्या या दहा अवतारांमधल्या नृसिंह आणि परशुरामाची मंदिरे काही थोड्याच ठिकाणी दिसतात, क्वचित कुठे वराहस्वामींची देवळे आहेत, पण मत्स्य, कूर्म, वामन या अवतारांची उपासना केलेली माझ्या पहाण्यात आली नाही. अनेक देवळांमध्ये प्रवेश करताच सुरुवातीलाच जमीनीवर एक दगडाचे कासव ठेवलेले असते, पण कूर्मावतार म्हणून कुणीही त्याला देवत्व दिलेले किंवा त्याची पूजा, अर्चना, प्रार्थना वगैरे करतांना दिसत नाही. बौद्ध धर्माचा प्रसार झाल्यावर जगभर अनेक ठिकाणी बुद्धाचे विहार किंवा देवळे बांधण्यात आली आणि तिथे गौतम बुद्धाच्या सुंदर किंवा भव्य मूर्तीही ठेवण्यात आल्या. पण मुळातच गौतम बुद्धाची शिकवण निरीश्वरवादावर भर देणारी आहे आणि हिंदू धर्मीय या मूर्तींकडे भक्तिभावाने पहात नाहीत.
श्रीराम आणि श्रीकृष्ण या दोन अवतारांचे मात्र असंख्य भक्त आहेत. उत्तरेतले संत तुलसीदास आणि महाराष्ट्रातले समर्थ रामदास यांनी श्रीरामाच्या भक्तीचा प्रसार केला, तर सूरदास, मीराबाई, चैतन्य महाप्रभू, नरसी मेहता आदींनी श्रीकृष्णाच्या भक्तीचा. त्यांनी सुरू केलेली भक्तीपरंपरा कित्येक शतके टिकून राहिली आहे आणि देशभऱ पसरली आहे. अलीकडच्या काळात ती वाढत असलेली दिसत आहे. मोठ्या गाजावाजाने अयोध्येत भव्य राममंदिर बांधले जात आहे आणि तिथल्या रामलल्लाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठानाचा सोहळाही देशभर भव्य प्रमाणावर साजरा केला गेला. इस्कॉन नावाच्या आंतरराष्ट्रीय संस्थेने जगभरात अनेक ठिकाणी श्रीकृष्णाची वैशिष्ट्यपूर्ण देवळे बांधली आहेत आणि ती पहायलाच पर्यटकांची गर्दी होत असते.
विठ्ठल आणि व्यंकटेश या दशावतारांमध्ये नसलेल्या विष्णूच्या दोन रूपांचे कोट्यावधी भक्त आहेत. त्यांची सविस्तर चरित्रे नाहीत, पण त्यांच्या महात्म्याच्या अनेक कथा किंवा गाथा आहेत. यातला पंढरपूरचा विठोबा दोन्ही हात कंबरेवर ठेऊन स्वस्थ उभा आहे, त्याच्याकडे कुठलेही शस्त्र नाही. तो कुठल्या भक्तासाठी दळण दळतो, कुणाची गुरे राखतो, कुणासाठी चंदन उगाळतो अशी आपल्या भक्तांची चाकरी करतो, तसेच त्यांच्यावर संकट आले तर त्यांना त्यामधून सुखरूपपणे वाचवतो अशा अनेक कथा आहेत आणि भाविकांची त्यावर गाढ श्रद्धा आहे, पण त्या कथांमध्येसुद्धा विठोबाने कुठल्याही प्रकारची हिंसा केलेली दिसत नाही. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम यासारख्या अनेक संतमंडळींनी रचलेल्या अभंगांमधून विठ्ठलाविषयी अपार भक्ती प्रस्तुत केली आणि कित्येक शतके उलटून गेली तरी आजही हे अभंग भक्तिभावाने गायिले जातात. त्या संतांनी सुरू केलेली वारकरी परंपरा कित्येक शतके टिकून राहिली आहे. आजसुद्धा आषाढी व कार्तिकी एकादशीला पंढरपूरला भरणाऱ्या यात्रेला लक्षावधी भाविक नेमाने नाचत गात जातात. महाराष्ट्रामध्ये रामकृष्णांपेक्षासुद्धा विठ्ठलाची जास्त देवळे आहेत आणि जास्त भक्त आहेत. विठ्ठल हा विष्णूचा नववा अवतार आहे असेही काही लोक मानतात.
आंध्रप्रदेशातील तिरुपति तिरुमल देवस्थानात श्रीव्यंकटेशाचे सुंदर मंदिर आहे. या देवाला उत्तर भारतात बालाजी असे म्हणतात. या तीर्थक्षेत्रात दर्शनाला येणाऱ्या भक्तांची नेहमीच प्रचंड गर्दी असते आणि हे भक्त तिथल्या हुंड्यांमध्ये इतकी दक्षिणा टाकतात की हे मंदिर भारतातले सर्वाधिक श्रीमंत देवस्थान समजले जाते. तिरुपती येथील चतुर्भुज व्यंकटेशाच्या दोन हातांमध्ये चक्र आणि गदा आहेत, पण या अवतारातही त्याने कुणा राक्षसाचे शिर छाटले किंवा दुष्टाचा चेंदामेंदा केला अशा प्रकारची कथा मी ऐकली नाही. व्यंकटेशस्तोत्र हे मराठीतले एक सुंदर स्तोत्र आहे. जुन्या काळात अनेक लोक हे स्तोत्र रोज म्हणत असत. "अन्नासाठी दाही दिशा", "उडदामाजी काळेगोरे" आणि "समर्थागृहीचे श्वान" अशासारख्या या स्तोत्रातल्या ओळी मराठी भाषेत वाक्प्रचार म्हणून वापरल्या जातात. तिरुपतीशिवाय इतर अनेक ठिकाणी श्रीव्यंकटेशाची मंदिरे आहेत. पुण्याजवळ केतकावली इथे बांधलेल्या मंदिराला प्रतितिरुपती असेही म्हंटले जाते. आमच्या जमखंडी गावाजवळ कल्हळ्ली नावाच्या जागी व्यंकोबाचे प्राचीन मंदिर आहे. त्या भागातल्या भक्तांना भेटण्यासाठी तिरुपतीच्या व्यंकटेशाने अवतार घेतला अशी मान्यता आहे.
देवांच्या अद्भुत कृती : पर्वत उचलणे
आपल्या पृथ्वीवरील जमीन सपाट नाही, ती डोंगर, दऱ्या, खोरी आदिंनी भरलेली आहे. टेकड्या, डोंगर, पर्वत हे सगळे भूपृष्ठावरील उंचवटे असतात, तिथले खडक इतर ठिकाणच्या जमीनीपेक्षा उंच वर डोकावत असतात. तरी तेही जमीनीच्या खाली असलेल्या खडकांशी जोडलेलेच असतात. इतकेच काय तर समुद्राच्या खालीसुद्धा खडकच असतात. पृथ्वी तयार होत असतांना तिचे एक खडकांचे बाह्य कवच तयार झाले. त्यातल्या खोलगट भागात पाणी साठत गेले आणि महासागर तयार झाले, त्यांनी पृथ्वीचा सुमारे दोन तृतियांश पृष्ठभाग व्यापला वगैरे गोष्टी आपण भूगोलात शिकलो.
पण पुराणातल्या काही गोष्टींमध्ये असे लिहिले आहे की कुणा देवाने एक पर्वत उचलून दुसरीकडे नेला किंवा जिथल्या तिथेच परत ठेवला. त्यामुळे पटावर सोंगटी ठेवावी किंवा पानात भाताची मूद ठेवावी तसे हे डोंगर सुटे असतात असे मला लहानपणी वाटायचे. पुराणकाळात देव आणि दानव किंवा सुर आणि असुर जन्माला आले तेंव्हापासून त्यांचे एकमेकांशी वैर असायचे आणि ते सदैव युद्ध करत असायचे. पण कसे कुणास ठाऊक त्यांनी सर्वांनी मिळून सागराचे मंथन करायचे आणि त्याने दडवून ठेवलेली रत्ने बाहेर काढून वाटून घ्यायची असे ठरवले. त्यांनी मंदार पर्वताला उचलून आणले आणि समुद्रात ठेवले. पण तो बुडू नये म्हणून महाविष्णूंनी कूर्मावतार घेतला आणि त्या पर्वताला आपल्या पाठीवर तोलून धरले अशी कथा आहे.
पुराणातल्या कथांमध्ये कैलासपर्वताचा उल्लेख अनेक वेळा येतो. ब्रह्माविष्णूमहेश या तीन मुख्य देवांमधल्या महेश किंवा शंकराचे कैलास हे वसतिस्थान आहे. ब्रह्म्याचा ब्रह्मलोक आणि विष्णूचा वैकुंठलोक यांचे पृथ्वीवर कुठे अस्तित्व नाही, पण कैलास नावाचा एक पर्वत हिमालयाच्या पलीकडल्या भागात म्हणजे तिबेटमध्ये आहे आणि चीनच्या ताब्यात आहे. पण काही भाविक किंवा उत्साही लोक चीनकडून परवानगी घेऊन कैलास मानससरोवराची यात्रा करतात. ती खूप कठीण असते असे तिथे जाऊन आलेले लोक सांगतात. आतापर्यंत एव्हरेस्ट या सर्वात उंच शिखरावर हजारो लोक चढून गेले असले तरी कैलासाच्या शिखरावर कोणीच चढून गेलेला नाही असे सांगतात. यात्रेकरू कैलासाच्या फक्त पायथ्यापर्यंत जाऊन परत येतात.
पण पुराणात अशी एक कथा आहे की दहा तोंडे आणि वीस हात असलेल्या रावणाने शंकरपार्वती यांच्यासह कैलास पर्वतालाच उचलून डोक्यावर धरले होते .हा प्रसंग दाखवणारे एक शिल्प वेरूळ इथे आहे.
रामायणात एक असा प्रसंग आहे. रामरावणयुद्धामध्ये रावणाचा मुलगा इंद्रजिताने लक्ष्मणावर एक शक्ती किंवा अस्त्र टाकले ते लक्ष्मणाच्या वर्मी लागले आणि त्याला मूर्छा आली. त्यामधून त्याचे प्राण वाचवण्यासाठी संजीवनी नावाच्या वनौषधाची आवश्यकता होती. ते वृक्ष द्रोणागिरी नावाच्या पर्वतावर होते आणि ते ठिकाण युध्दस्थळापासून खूप दूर होते. तिथे जाऊन ते औषध घेऊन येण्याचे काम फक्त हनुमानच करू शकत होता. तो लगेच उड्डाण करून मनोवेगाने त्या पर्वतावर गेला, पण त्याला वनौषधींची माहिती नसल्यामुळे त्यातली संजीवनी कुठली हे समजेना. यात वेळ घालवण्याऐवजी त्याने सरळ तो अख्खा डोंगर उचलला आणि एका हाताच्या तळव्यावर त्याला अलगद धरून तो लंकेला घेऊन गेला.
श्रीकृष्णाचे बालपण गोकुळामध्ये गेले. गायी पाळायच्या आणि त्यांचे दूध, दही, लोणी वगैरे मथुरेच्या बाजारात नेऊन विकायचे यावर तिथल्या गोपगोपिकांचा चरितार्थ चालत असे. आकाशातल्या इंद्रदेवाच्या कृपेने तो व्यवस्थितपणे चालतो अशी त्यांची श्रद्धा होती आणि इंद्राला प्रसन्न ठेवण्यासाठी ते लोक दरवर्षी इंद्राची पूजा आणि यज्ञयाग वगैरे करत असत. श्रीकृष्णाने लहानपणीच अनेक लीला दाखवून त्या लोकांच्या मनावर छाप पाडलेली होती. त्याने गोकुळवासियांना सांगितले की आपल्या गावाजवळचा गोवर्धन पर्वत हा आपल्या समृद्धीचे खरे कारण आहे. आपल्या गायी, गुरे या डोंगरावर जाऊन चरतात आणि धष्टपुष्ट होऊन भरपूर दूध देतात. म्हणून आपण या वर्षी इंद्राची पूजा न करता या गोवर्धन पर्वताची पूजा करावी. गोकुळातल्या लोकांनी त्याचा शब्द मानला.
पण त्यामुळे इंद्राला राग आला आणि त्याने ढगांना आज्ञा दिली की गोकुळावर जाऊन अतिवृष्टी करा. त्यामुळे अचानक तिथे मुसळधार पाऊस पडायला लागला आणि तिथले लोक घाबरून श्रीकृष्णाकडे गेले. श्रीकृष्णाने त्यांना अभयदिले आणि गोवर्धन पर्वताला उचलून आपल्या करंगळीवर तोलून धरले. सगळे गोपगोपी आपापली मुलेबाळे आणि गायीवासरे यांना घेऊन त्या गोवर्धन पर्वताच्या छताखाली सुरक्षितपणे उभे राहिले. अशा प्रकारे इंद्रदेवाचे गर्वहरण झाल्यावर त्याने श्रीकृष्णासमोर येऊन क्षमायाचना केली.
-------------------------
1 comment:
I read your blog and I really liked it. I have read another blog similar to this one, I liked the table very much click here
Post a Comment