Sunday, January 14, 2024

अमेरिकेतली देवळे

 अमेरिकेत आता भारतीय लोकांची बरीच वस्ती झाली आहे आणि ते सगळे सुखवस्तू लोक आहेत. त्यांनी जागोजागी सुंदर मंदिरे बांधली आहेत. त्यांच्या गुणवत्तेत तसेच संख्येमध्ये सतत वाढ होत आहे. भारतातून अमेरिकेत फिरायला गेलेल्या लोकांना तर त्यांचे अप्रूप वाटते. ही सगळी देवळे गेल्या काही दशकांमध्येच बांधलेली असल्यामुळे त्यांना पौराणिक स्थानमहात्म्य नाही आणि अजूनतरी ती जागृत देवस्थाने झालेली नाहीत. त्यामुळे नवससायास करणाऱ्या भाविक लोकांना त्यांची ओढ नाही. सुटीच्या दिवशी किंवा विशिष्ट धार्मिक महत्वाच्या तिथींना थोडी जास्त गर्दी जमते.पण एरवीसुद्धा सगळीकडे माफक संख्येने भक्तजन दिसतात. काही देवळे वास्तुशिल्पाच्या दृष्टीने खूप सुंदर असल्यामुळे ती प्रेक्षणीय स्थळेही आहेत. आणखी काही वर्षांनी अमेरिकेतल्या मंदिरांची तीर्थयात्रा करण्याची टूम आणि टूर निघाली तर मला आश्चर्य वाटणार नाही.  मी इंग्लंडमधल्या लीड्स शहरात रहात असतांना तितल्या एकमेव 'हिंदू टेंपल'ला जात असेच, शिवाय बर्मिंगहॅम इथे बांधल्या जात असलेल्या प्रति तिरुपती व्यंकटेशाचे दर्शनसुध्दा घडले. माझी गणना 'भाविकां'त होत नसली तरी सुंदर मंदिरांमधले पवित्र आणि प्रसन्न वातावरण मला मोहित करते. आपोआप माझे पाय देवळांकडे वळतात.


मी पहिल्यांदा अमेरिकेत गेलो तेंव्हा अॅटलांटाजवळील अल्फारेटा या शहरात राहिलो होतो. तिथेही एक दोन लहानशी स्थानिक मंदिरे होतीच, पण अॅटलांटाजवळ लिलबर्न या ठिकाणी गुजराथी लोकांचे एक स्वामीनारायणाचे भव्य मंदिर होते, तसेच दक्षिण भारतीय समाजाचेही एक चांगले मोठे देऊळ होते. स्वामीनारायण मंदिराची इमारत छायाचित्रात बाहेरून जितकी सुबक दिसते त्याहूनही अधिक सुरेख ती आंतून दिसते. प्रत्येक खांबावर आणि छपरावर सुबक आणि रेखीव शिल्पकृती कोरल्या आहेत. त्यावर कलात्मक पध्दतीने टाकलेले प्रकाशाचे झोत रंग बदलत असतात. त्याने त्या शिल्पकृतींना अधिकच उठाव येतो. इंग्लंड अमेरिकेत बहुतेक सगळ्या मंदिरांमध्ये मुख्य देवतेशिवाय इतर अनेक देवांच्या मूर्ती ठेवलेल्या असतात. त्यामुळे सगळ्या भक्तांची सोय केली जाते. इथेही राधाकृष्ण, शिव- पार्वती, गणेश, श्रीराम, सीता आणि हनुमानाच्या मूर्ती आहेत, पण या मंदिरात पारंपरिक हिंदू देवतांपेक्षा स्वामीनारायण संप्रदायातील गुरूंना अधिक महत्व दिलेले दिसते.


माझ्या अमेरिकेच्या दुसऱ्या भेटीत मी लॉसएंजेलिसजवळ टॉरेन्स इथे रहात होतो. तिथे आमच्या घराहून सर्वात जवळ असलेले मंदिर पंचमुखी हनुमानाचे होते. मारुतीचे हे रूप मी तरी प्रथमच पाहिले. या देवळातसुद्धा हनुमानाशिवाय इतर मुख्य देवतांची स्थापना केली आहे. गणेशोत्सव, देवीचे नवरात्र वगैरे उत्सवसुद्धा त्या मंदिरांमध्ये साजरे केले जातात.  हे दक्षिण भारतीय लोकांचे मंदिर असल्यामुळे साग्रसंगीत पूजा, अभिषेक आणि मंत्रपठण वगैरे विधीवत प्रकार तिथे नेहमी चाललेले असतात.  त्या भेटीत मी लेक श्राइन नावाचा परमहंस स्वामी योगानंदांचा रम्य आश्रम पाहिला होता. या आश्रमात सर्वधर्मसमभाव आहे. योगानंदांची शिकवण जगातील सर्व धर्मीयांच्या कल्याणासाठी आहे.


गेल्या वर्षी मी पुन्हा अमेरिकेला गेलो तेंव्हा न्यूजर्सीमधल्या साउथ प्लेनफील्ड नावाच्या लहानशा गावात रहात होतो. तिथल्या रहिवासामध्येसुद्धा मला अनेक देवळांचे आणि देवतांच्या मूर्तींचे दर्शन घडले. तिथे गेल्या गेल्या आम्ही जवळच्या ब्रिजवॉटर इथल्या बालाजी मंदिरात जाऊन आलो. अनादि, अनंत, निर्गुण, निराकार, जगातील कणाकणात भरलेला असे परमेश्वराचे वर्णन असंख्य वेळा ऐकूनसुद्धा त्याच्या देवळात जाऊन त्याच्या मनोहर रूपाचे दर्शन घ्यायला लोकांना अतीशय आवडते. आंध्रप्रदेशातील तिरुपति येथील वेंकटेश किंवा बालाजीचे मंदिर जास्तीत जास्त भक्तगणांच्या गर्दीसाठी प्रसिद्ध आहे. हा भगवान विष्णूचा अवतार आहे अशी श्रद्धा असली तरी "परित्राणाय साधूनाम् विनाशायच दुष्कृताम् धर्मसंस्थापनार्थाय" यातल्या कुठल्या कारणासाठी हा अवतार घेतला गेला याची कथा मी कधी ऐकली नाही. 


तिरुपतीचा व्यंकोबा दोन भक्तांना दर्शन देण्यासाठी आमच्या जमखंडीजवळच्या कल्हळ्ळीच्या डोंगरावर अवतरला अशी तिथल्या लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे आम्ही लहानपणापासून त्या देवाचे दर्शन घेण्यासाठी "व्यंकटरमणा गोविंदा" या नामाचा घोष करत तिथे अनेक वेळा जात होतो. आमच्या परिवारातले अनेक लोक मुंबईपुण्याहून त्याच्या दर्शनासाठी जमखंडीला येऊन जात होते, अजूनही जात असतात. त्यांच्या बोलण्यात त्याचा उल्लेख येत असतोच. माझ्या आईने या कल्हळ्ळीचा व्यंकटेशावर कवने रचली होती.  लहानपणापासूनच व्यंकटेश या देवाबद्दल मनात खूप आपुलकी आणि भक्तीभाव होता. आम्ही दक्षिण भारताची सहल आधी तिरुपतीला जाऊन व्यंकोबाचे दर्शन घेऊन सुरू केली होती.


या देवाचे भक्त जगभर पसरलेले आहेत. त्यांनी इतर अनेक ठिकाणी बालाजीची सुंदर मंदिरे बांधली आहेत. पुण्याजवळील केतकावली इथले प्रतितिरुपति देऊळ प्रसिद्ध आहेच, मी तिथेही  दोनदा जाऊन आलो आहे. अमेरिकेतल्या न्यूजर्सीमधील ब्रिजवॉटर नावाच्या गावातसुद्धा एक अत्यंत सुंदर असे वेंकटेशाचे देऊळ आहे आणि अमेरिकेतले भारतीय वंशाचे लोक तिथे दर्शनासाठी येत असतात.  आम्ही या देवळात गेलो तेंव्हा तळमजल्यावर आत जाताच समोरील एका हॉलमध्ये बरीच गर्दी दिसत होती, पण आत जाऊन पाहिल्यावर ते लोक एकाद्या खाजगी धार्मिक कार्यक्रमासाठी जमले होते असे समजले. मुख्य मंदिर वरच्या मजल्यावर होते म्हणून आम्ही जिना चढून वर गेलो. तिथल्या भव्य हॉलमध्ये मधोमध श्रीव्यंकटेशाचे मुख्य मंदिर होते. तिथे आत जाऊन दर्शन घेतले. बाहेर आल्यावर देवळाला प्रदक्षिणा घालण्याच्या वाटेवर श्रीदेवी, भूदेवी, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वति, श्रीराम, श्रीकृष्ण, आंजनेय (मारुती), महागणपति, सुब्रह्मण्यम, नवग्रह इत्यादि सतरा देवतांच्या लहानलहान पण सुबक अशा घुमटी होत्या. मंदिराच्या संपूर्ण परिसरातली स्वच्छता आणि शांतताही वाखाणण्यासारखी होती. अपेक्षेप्रमाणे प्रसादाचा बुंदीचा लाडू मिळालाच. तिरुपतीला, केतकावलीला आणि ब्रिजवॉटरला मिळालेल्या प्रसादाची चंव अगदी एकसारखी होती इतके त्याचे जागतिक प्रमाणावर स्टँडर्डायझेशन झाले आहे.


मी अमेरिकेत असतांना आषाढी एकादशी आली होती. यानिमित्याने त्या भागात राहणाऱ्या काही मराठी मंडळींनी उत्साहाने काही कार्यक्रम केले होते. एका सुटीच्या दिवशी एका लहानशा मैदानात एक प्रतीकात्मक दिंडी काढून पालकीची मिरवणूक काढली होती. त्याला रिंगण असे नाव दिले होते. शंभर सव्वाशे लोक भारतीय पोशाख घालून हातात भरवा झेंडा घेऊन रामकृष्णहरी नामाचा घोष करत नाचत नाचत चालत होते. नंतर श्री.कुलकर्णी नावाच्या एका अमेरिकेतल्या भक्ताच्या घरी एक मोठा कार्यक्रम झाला. त्यांनी आपल्या बंगल्यातल्या एका शेडमध्ये श्रीविठ्ठलरखुमाईचे देऊळ तयार केले आहे. तिथेही आधी एका पालखीत विठोबारखुमाईच्या मूर्ती ठेऊन चाळीसपन्नास भक्तांनी त्याची मिरवणूक काढली आणि अमेरिकेतले रहदारीचे सगळे नियम पाळून तिला फूटपाथवरूनच मैलभर फिरवून आणले. त्यानंतर प्रवचन, भजन, भक्तीसंगीत वगैरेंचा सुरेल कार्यक्रम झाला, त्यालाही शंभरावर लोक आले होते.  ते आजूबाजूच्या शंभर मैलांच्या परिसरातून आले होते.माझी भारतात परतायची वेळ आली त्या सुमाराला असे कळले की न्यूजर्सीमध्येच भारताबाहेरील सर्वात मोठे असे अक्षरधाम मंदिर बांधले जात होते. त्याचे औपचारिक उद्घाटन ऑक्टोबरमध्ये होणार होते, पण त्याआधीच ते पाहून घ्यावे असा विचार करून आम्ही कारने रॉबिन्सविले या गावी त्या मंदिराच्या प्रांगणापर्यंत जाऊन पोचलो. तिथे पार्किंग लॉटमध्ये शेकडो मोटारी दिसत होत्या आणि आतमध्येही शेकडो लोक  फिरतांना दिसत होते. पण आम्हाला गेटपाशीच अडवले आणि फक्त पासधारकांनाच प्रवेश आहे असे सांगितले. हे पास आधीपासून ऑनलाइन बुकिंग करून मिळवले जात होते आणि आयत्या वेळी आलेल्या लोकांना तिथल्या तिथे काही शुल्क आकारून पास देण्याची काही व्यवस्थाच नव्हती. तिथे कडक पोलिसबंदोबस्त होता आणि गळ्यात पास धारण न केलेला कोणी इसम दिसल्यास स्थानिक अमेरिकन पोलिस आयोजकांवरच कडक कारवाई करणार असा धाक घातला होता. त्यामुळे अगदी काकुळतीने विनवण्या करूनसुद्धा आम्हाल प्रवेश मिळालाच नाही. अखेर मंदिराचे दुरूनच शिखरदर्शन करून घरी परत जावे लागले.
1 comment:

mukund said...

नवीन माहिती. उत्तम.