Sunday, June 09, 2024

एडिसन मेमोरियल पार्क



इंग्रजी भाषेतील डिस्कव्हरी (Discovery) आणि इन्व्हेन्शन (Invention) या दोन शब्दांसाठी मराठी भाषेत शोध हा एकच शब्द नेहमी वापरला जातो. माझे शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झाले असल्यामुळे मला आधी शोध हा एकच शब्द माहीत होता. मी त्या काळात ज्या प्रसिद्ध शास्त्रज्ञांची नावे वाचली होती त्यातल्या आर्किमिडीज आणि कोपरनिकस यांनी कदाचित एकेकच शोध लावला होता, तर न्यूटनने दहापंधरा शोध लावले असतील. त्यामुळे थॉमस आल्वा एडिसन नावाच्या माणसाने शंभरावर शोध लावले असे वाचले तेंव्हा मी मनाने त्याला जगातला सर्वात मोठा शास्त्रज्ञ ठरवले होते. पण सगळे लोक त्याला सोडून न्यूटन आणि आइनस्टाइन यांना का महान म्हणतात असा प्रश्न मला पडत होता. पुढे सायन्सचे शिक्षण इंग्लिशमध्ये घेत असतांना मला या दोन प्रकारच्या शोधांचे वेगवेगळे अर्थ समजायला लागले.

डिस्कव्हरी म्हणजे निसर्गाचे नियम, क्रम, पदार्थ किंवा ठिकाण  या आधीपासून अस्तित्वात असलेल्या गोष्टींची  माहिती  नीटपणे समजून घेऊन ती सर्वात आधी व्यवस्थितपणे जगाला सांगणे. जो माणूस हे काम करतो त्याने त्याचा शोध लावला असे सांगितले जाते, उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षण, सूर्यमालिका, प्राणवायू  इत्यादींचे शोध निरनिराळ्या शास्त्रज्ञांनी लावले. अनेक वेळा याचा विपर्यास करून न्यूटनच्या आधी जगात गुरूत्वाकर्षण नव्हतेच का? अशासारखे खोचक प्रश्न विचारले जातात. कोलंबसाला शास्त्रज्ञ म्हणत नाहीत, पण त्याने अमेरिकेचा शोध लावला होता असे म्हंटले जाते.

इन्व्हेन्शन याचा अर्थ एकादी वेगळी वस्तू सर्वप्रथम तयार करणे, उदाहरणार्थ  रेडिओ, मोटार, विमान इत्यादी. या वस्तू आधी होत्या, त्या कुठे तरी हरवल्या आणि कुणी तरी त्या शोधून काढल्या असे काही झाले नाही. थॉमस आल्वा एडिसनने विजेचा दिवा, ग्रामोफोन, सिनेमा यासारख्या शेकडो नव्या वस्तू तयार केल्या आणि जगाला देऊन माणसाचे जीवन पार बदलून टाकले. तेंव्हा तोसुद्धा महान शास्त्रज्ञ किंवा इंजिनियर होताच, पण इतर शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या निसर्गाच्या नियमांचा कौशल्याने उपयोग करून घेऊन त्याने या वस्तू तयार केल्या. त्याने स्वतः फारशी  डिस्कव्हरी केली नाही, पण तो सर्वश्रेष्ठ इन्हेन्टर होता यात शंका नाही. 

मी अमेरिकेत गेलो असतांना साउथ प्लेनफील्ड या गावात रहात होतो, तिथून जवळ असलेल्या शहराचे नाव एडिसन असे होते. एडिसन या शहराचा काही भाग म्हणजे न्यूजर्सीमधले मिनिइंडिया आहे. तिथे भारतीयांची अनेक दुकाने आणि हॉटेले  आहेत. काही रस्त्यांची नावे सुद्धा भारतीय वाटतात. त्या भागात फिरतांना भारतातल्या सगळ्या भागातली खूप मंडळी  दिसतात, काही त्या भागात राहतात तर इतर अनेक लोक न्यूजर्सीतल्या आजूबाजूच्या भागातून खरेदीसाठी तिथे येत असतात. मीसुद्धा अनेक वेळा त्या भागात जात होतो. पण मला थॉमस आल्वा एडिसनच्या नावाची पाटी तिथे कुठे दिसली नाही. चौकशी करता असे कळले की प्रसिद्ध संशोधक थॉमस आल्वा एडिसन याने पूर्वीच्या रारिटन नावाच्या गावातल्या मेन्लो पार्कमध्ये आपली पहिली प्रयागशाळा उघडली होती. तिला शोधांचा कारखाना (इन्व्हेन्शन फॅक्टरी) असे नाव त्याने दिले होते आणि खरोखरच तो तिथे एकामागोमाग एक अनेक शोध लावत गेला. पण पुढे त्याने आपला मुक्काम दुसऱ्या ठिकाणी हलवला आणि तिथे दहापट मोठी कार्यशाळा बांधली, तसेच राहण्यासाठी मोठा बंगला बांधला. त्याचा मेन्लो पार्कमधला कारखाना काळाच्या ओघात पडझड होऊन नाहीसा झाला, पण १९५४ साली रारिटनमधल्या रहिवाशांनी त्यांच्या गावाचेच नाव बदलून एडिसन असे ठेवले.

थॉमस आल्वा एडिसन जितका मोठा संशोधक होता तितकाच हुषार उद्योगपती होता. त्याने लावलेल्या नव्या शोधांचे तो लगेच पेटंट घेऊन ठेवत होता आणि त्या वस्तू कारखान्यात तयार करून चांगल्या किंमतीला बाजारात विकून त्यातून नफा मिळवत होता. त्याचा उद्योग व्यवसाय वाढल्यानंतर त्याने मेन्लोपार्कमधल्या जागेतून न्यूजर्सीमधल्याच वेस्ट ऑरेंज नावाच्या जागी स्थलांतर केले. मेन्लो पार्कमधला कारखाना पडझड होऊन नष्ट झाला पण  वेस्ट ऑरेंज या ठिकाणी त्याने बांधलेला कारखाना मात्र त्याच्या मृत्यूनंतरही सुव्यवस्थित ठेवला गेला आणि त्याचे रूपांतर थॉमस एडिसन नॅशनल हिस्टॉरिकल पार्कमध्ये केले गेले. एडिसनविषयी मनात खूप कुतूहल आणि आदर असल्यामुळे आम्ही तिथे जाऊन त्या स्मारकाला भेट दिली.


जुन्या काळातल्या आठवणींचे काळजीपूर्वक जतन करून, त्यांना अतिशय व्यवस्थितपणे मांडून त्यांचे आकर्षक असे प्रदर्शन करण्याची कला अमेरिकन लोकांनी फार चांगली विकसित केली आहे. मी मागे एकदा अॅटलांटाचे कोकाकोला म्यूजियम पाहिले होते तेंव्हाही मला याची प्रचीति आली होती. एडिसनचा हा कारखाना कदाचित जवळ जवळ शंभर वर्षांपूर्वीच बंद झाला असेल, आज तर त्यात कुठलेही नवे उत्पादन होतही नाही, तरीही हा संपूर्ण कारखाना एखाद्या वस्तुसंग्रहालयासारखा टिकवून ठेवला आहे. पूर्वीच्या काळातली सगळी यंत्रसामुग्री जिथल्या तिथे मांडून ठेवली आहे, इतकेच नव्हे तर ज्या कच्च्या मालांपासून निरनिराळ्या वस्तूंचे उत्पादन केले जात होते त्यांचे शेकडो नमूनेसुद्धा व्यवस्थित मांडून ठेवले आहेत. 


या हिस्टॉरिकल पार्कची रचना एकाद्या कारखान्यासारखीच आहे. एका तीन मजली इमारतीत मुख्य प्रयोगशाळा, हेवी मशीन शॉप आणि लाइट मशीन शॉप आहे. तीन निरनिराळ्या शेड्समध्ये मेटॅलर्जी लॅब, पॅटर्न शॉप आणि केमिस्ट्री लॅब आहेत. सिनेमा तयार करण्याच्या स्टूडिओची वेगळी शेड आहे. जगातला पहिला चित्रपट कुठे तयार केला गेला ती जागा राखून ठेवली आहे. पर्यटकांचे स्वागत करायच्या इमारतीत एका लहान सभागृहात बसून एडिसनचे जीवन आणि कार्य यावरील चित्रफिती पहाण्याची सोय आहे. दुसऱ्या एका सभागृहात  दर तासातासाला एक माणूस येऊन दहा पंधरा मिनिटांचे मनोरंजक व्याख्यान देतो आणि एडिसनने लावलेले मुख्य शोध प्रात्यक्षिकांसह चांगले समजावून सांगतो.


मुख्य इमारतीत तळमजल्यावर एका कारखान्यात प्रवेश करताच मला आमच्या इंजिनियरिंग कॉलेजमधले वर्कशॉप आठवले. मी साठ वर्षांपूर्वी तिथे शिकायला गेलो होतो तेंव्हा तिथे खूप जुन्या काळातली यंत्रे होती. एडिसन पार्कमधल्या या हॉलमध्येही एका ओळीत तसल्या सात आठ लेथ मांडून ठेवल्या होत्या आणि आठदहा फूट उंचावर आडव्या रेषेत फिरणाऱ्या एका लांबच लांब शाफ्टवरील चाकांना (पुलीजना) ती लेथ मशीन्स पट्ट्यांनी जोडलेली होती. एका टोकाला जोडलेले एक इंजिन किंवा मोटार त्या शाफ्टवरील चक्राला पट्ट्याने जोडले होते आणि ते एकटेच चाक तिथल्या सगळ्या यंत्रांना चालवेल अशी योजना होती. आम्ही गेलो तेंव्हा त्यातले काहीच प्रत्यक्षात चालवले जात नव्हते. पन्नास साठ वर्षांपूर्वीच जगातल्या सगळ्या कारखान्यांमधल्या प्रत्येक यंत्राला स्वतंत्र विजेची मोटर जोडून तिच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचीही सोय केली गेली. त्यामुळे कॉलेजनंतर मी कुठेच असा कॉमन शाफ्ट, पुलीज आणि बेल्ट पाहिले नव्हते, ते पन्नाससाठ वर्षांनी इथे पहायवा मिळाले. लेथ्सच्या बाजूला शेपिंग, मिलिंग, प्लेनिंग वगैरे इतर मशीनेही होती. हे एडिसनचे हेवी मशीन शॉप होते. वरच्या मजल्यावर लाइट मशीन शॉप होते, त्यात अधिक अचूक आणि नाजुक कामे करणारी यंत्रे होती. 


सर्वात वरच्या मजल्यावर प्रयोगशाळा होती, तसेच एडिसनने लावलेल्या विविध शोधांची माहिती दाखवणारे फलक, फोटोग्राफ्स आणि त्या शोधवस्तू मांडून ठेवल्या होत्या. त्याने विजेच्या दिव्याचा शोध लावला, पण पहिला दिवा यशस्वीपणे प्रकाश द्यायला लागला त्याआधी हजार वेळा त्याचे प्रयोग अयशस्वी झाले होते आणि यशस्वी झाल्यानंतर त्याने अनेक निरनिराळ्या आकारांचे दिवे तयार केले होते, त्यातले वीसपंचवीस प्रकार त्या प्रदर्शनात मांडून ठेवले होते. विजेचा दिवा लावायचा असेल तर आधी वीजही असायला पाहिजे. त्यासाठी एडिसनने वीज तयार करणारे जनरेटर तयार केले आणि आपल्या गल्लीत अनेक खांब उभारून त्यावर विजेचे दिवे लावले आणि त्यांना तारांनी जोडून प्रकाशमान केले. ते उदाहरण पाहून लोकांनी आपल्या घरांमध्ये वीज पुरवण्याचा आग्रह केला आणि एडिसनने ते काम केले. यात वाढ होत त्याने संपूर्ण न्यूयॉर्क शहराला वीजपुरवठा करण्याचे कंत्राट घेऊन पूर्ण केले. 


ग्रामोफोन आणि सिनेमा हे एडिसनचे इतर मुख्य शोध आहेत. त्यांचीही समग्र माहिती फलकांमधून प्रदर्शनात मांडली होती. याशिवायही त्याने अनेक लहानमोठे शोध लावले होते. केमिकल आणि मेटॅलर्जी विभागात अनेक निरनिराळी खनिजे, क्षार, धातू वगैरेंवर काम केले होते. त्यातून कित्येक नवे उपयुक्त पदार्थ तयार केले होते. त्याने हजारापेक्षा जास्त पेटंटे घेऊन ठेवली होती. त्यांच्या बाइंडिंग करून ठेवलेल्या पुस्तकांनीच सातआठ कपाटे भरली होती. तळमजल्यावरून वरच्या मजल्यांना जाण्यासाठी एक मेकॅनिकल लिफ्ट बसवली होती, पण तिचा उपयोग फक्त एडिसन स्वतःच करत होता. इतर कुणाला त्यातून जाण्याची परवानगी नव्हती. इतकेच नव्हे तर कामगारांनीसुद्धा आपला मजला सोडून कुठल्याही दुसऱ्या मजल्यावर किंवा आपली इमारत सोडून दुसऱ्या इमारतीत जाण्याला सक्त मनाई होती.


वरच्या मजल्यावरील एका हॉलमध्ये एक खास कार्यक्रम होत असे आणि तो पाहण्यासाठी त्या वेळी हजर असलेले सर्व पर्यटक तिथे जमत असत. एक वयस्क माणूस येऊन एडिसनच्या विविध शोधांची मनोरंजक माहिती देत असे आणि काही प्रात्यक्षिके करून दाखवत असे. यामध्ये ग्रामोफोनचे प्रात्यक्षिक महत्वाचे होते. त्यात एडिसनने तयार केलेला जुना ग्रामोफोन त्याने चालवून वाजवून दाखवला, तसेच त्याचा आवाज कमी अधिक करण्यासाठी काय योजना केली होती ती समजावून सांगितली. नंतरच्या काळात इलेक्ट्रॉनिक्सने हे काम अगदी सोपे केले, एक नॉब फिरवून किंवा बटन दाबून  हवा तेवढा व्हॉल्यूम अॅडजस्ट करणे शक्य झाले, पण अँप्लिफायरचा शोध लागायच्या आधी एडिसनने तयार केलेल्या ग्रामोफोनमध्ये एक लहानशी दांडी हलवून त्याच्या कर्ण्याचा आवाज मोठा किंवा बारीक करायची सोय केली होती हे पाहून आश्चर्य वाटले. 


सिनेमाचे यंत्र हा एडिसनचा आणखी एक क्रांतिकारक शोध होता.  एकापाठोपाठ एक अनेक चित्रे वेगाने पडद्यावर दाखवून  चालत्या बोलत्या चित्रांचा आभास दाखवणे ही कल्पनाच भन्नाट होती. एडिसनने त्यासाठी काय काय करावे लागेल याची योजना करून ती सगळी यंत्रसामुग्री निर्माण केली आणि प्रात्यक्षिके करून दाखवली. त्यासाठी एक वेगळी शेड तयार केली होती ती आजही दाखवला जाते.


एडिसनला प्रयोग करून पाहणे अत्यंत प्रिय होते आणि त्याच्याकडे कमालीची चिकाटी होती. प्रयोग केल्यामुळेच प्रगती होते यावर त्याचा ठाम विश्वास होता आणि मिळालेल्या अपयशाने डगमगून न जाता आपले साध्य गाठेपर्यंत तो असंख्य प्रयोग करत रहात असे. कार्यशाळा हीच त्याची प्रयोगशाळा होती आणि त्याने त्याला शोधांचा कारखाना (इन्व्हेन्शन फॅक्टरी) असे नाव दिले होते. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पहिल्याच प्रयत्नात सहसा पूर्ण यश मिळत नाहीच. पण जे अनपेक्षित परिणाम येतात त्यांची चिकित्सा करून कोणती तृटी राहिली याचे नेमके कारण शोधून काढून आवश्यक ती सुधारणा करून पुढील प्रयोग केले जातात. एडिसनला विज्ञानाची सखोल जाण असल्यामुळेच तो हे काम व्यवस्थितपणे करू शकत होता.


या संग्रहालयाच्या आवारात थॉमस एडिसनचा एक भव्य पुतळा आहे आणि दुसऱ्या एका ठिकाणी एडिसन आणि टेसला या दोघांचे पूर्णाकृति पुतळे जवळ जवळ उभे केले आहेत. अमेरिकेतल्या पद्धतीप्रमाणे कुणीही पर्यटक या पुतळ्यांच्या आजूबाजूला उभे राहून किंवा त्याच्याशी लगट करून आपले फोटो काढून घेऊ शकतो. एडिसनचा समकालीन प्रसिद्ध शास्त्रज्ञ निकोला टेसला हा डिस्कव्हरी आणि इन्व्हेन्शन या दोन्हीही गोष्टी करणारा महान शास्त्रज्ञ होता. विजेच्या उत्पादनाच्या आणि विजेचा उपयोग करून घेण्याच्या बाबतीत तो एडिसनचा प्रतिस्पर्धी होता. त्याने आल्टर्नेटिंग करंट (एसी) या प्रकारच्या विजेचा पुरस्कार केला आणि तिचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि वहन सुरू केले. एडिसनने विजेचे दिवे लावून जगाला अंधारातून प्रकाशात आणले तर टेसलाने विजेवर चालणारी यंत्रसामुग्री तयार करून यांत्रिकीकरणाला चालना दिली. मी नायगराचा धबधबा पहायला गेलो होतो तेंव्हा टेसलाचे स्मारक पाहिले होते आणि या वेळी एडिसनचे स्मारक पाहून या दोन्ही महान शास्त्रज्ञांची किमया पाहिली आणि धन्य झालो.

थॉमस आल्वा एडिसन यांच्या जीवनाबद्दल माहिती 

एडिसन, टॉमस अल्वा (११ फेब्रुवारी,१८४७ ते १८ ऑक्टोबर,१९३१).अमेरिकन संशोधक. तारायंत्र, ग्रामोफोन, प्रदीप्त दिवा (बल्ब), वीज पुरवठ्याचे देशव्यापी जाळे पसरविणारे विद्युत् जनित्र, चलच्चित्रपट प्रक्षेपक (सिनेमा प्रोजेक्टर), प्रत्याभरण (चार्जिंग) करता येणारी विद्युत् संचायक घटमाला (बॅटरी), पहिला बोलका चित्रपट, बेंझीन व कार्बोलिक अम्लाची निर्मिती यांसाठी एडिसन ओळखले जातात.

एडिसन यांचा जन्म अमेरिकेच्या ओहायओ प्रांतातील मिलान या गावी झाला. मिशिगन राज्यातील पोर्ट ह्यूरन येथील शाळेत ते तीन महिनेच शिकले.  बारा वर्षांचे असताना त्यांनी ग्रँड ट्रंक रेल्वेवर वर्तमानपत्र विकताना छपाई यंत्राशी खटपट व प्रयोग करायला सुरुवात केली. वयाच्या १५ व्या वर्षी ग्रँड ट्रंक वीकली हे साप्ताहिक सुरू केले आणि मालगाडीच्या डब्यातच प्रयोगशाळा थाटली. मात्र प्रयोगशाळेत स्फोट झाल्याने त्यांना प्रयोगशाळा बंद करावी लागली. रेल्वे स्टेशन अधिकाऱ्याच्या मदतीने ते तारायंत्र शिकले व तारायंत्र प्रचालक (ऑपरेटर) म्हणून नोकरी करू लागले.  या नोकरीच्या काळातच, त्यांनी त्यांचा महत्त्वाचा प्रचालकाशिवाय चालणाऱ्या, एकच संदेश विविध ठिकाणी पाठवू शकणाऱ्या स्वयंचलित यंत्राचा शोध लावला. त्यानंतर त्यांनी बॉस्टन शहरात नोकरी पत्करली आणि उर्वरित वेळ संशोधनासाठी दिला. तेथे त्यांनी एक मतदान यंत्र तयार केले, या करिता त्यांना १८६८ मध्ये पहिले एकस्व (पेटंट) मिळाले. न्यूयॉर्कमधील ‘गोल्ड अॅण्ड स्टाक’ तारायंत्र कंपनीत काम करत असताना तेथील यंत्रसामग्री व सेवाप्रणालीमध्ये त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणल्या. नोकरीतून उरलेल्या वेळात संशोधन करताना तारायंत्रासाठी जोडयंत्रणा तयार केली. त्यातूनच मिळालेल्या कमाईतून प्रयोगशाळा स्थापन करून स्वयंचलित वेगवान तारायंत्रणा तयार केली. त्यामुळे नेहमीच्या तारायंत्र तारांद्वारे अनेकपट अधिक संदेशवहनाची सोय झाली. त्याचवेळेस अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी शोधलेल्या टेलिफोनसाठी एडिसनने प्रेषक (ट्रान्समीटर) शोधून एक महत्त्वपूर्ण संशोधन केले.  सन १८७७ मध्ये, एडिसनने फोनोग्राफचा (मूळचा ग्रामोफोन) शोध लावला. यांत्रिक ऊर्जा वापरून प्रथमच कथिलाच्या (टीनच्या) पत्र्यावर आवाज लिहिला गेला आणि ध्वनिमुद्रण नावाचे नवीन विश्व उलगडले गेले.

विजेच्या दिव्याचा शोध जरी जोसेफ स्वॅान यांनी लावला असला, तरी विजेच्या दिव्याला लोकमान्यता मिळण्यासाठी एडिसनने सर्वांना परवडणारा, सहज हाताळता येणारा, टिकाऊ आणि सुरक्षित असा प्रदीप्त दिवा (बल्ब) तर तयार केलाच शिवाय विजपुरवठ्याचे देशव्यापी जाळे उभे केले. विजेच्या दिव्याचे घाऊक उत्पादन आणि वितरण केले.  त्यामुळे सर्वसामान्यांनी विजेच्या दिव्याला आपलेसे केले. याच विजेच्या दिव्यात नवनव्या सुधारणा केल्या. मोठ-मोठी विद्युत् जनित्रे बनविली आणि १८८२ मध्ये जगातला पहिला मध्यवर्ती वीजनिर्मिती प्रकल्प न्यूयॉर्क शहरात स्थापन केला. सन १८८८ मध्येच एडिसन यांनी चलच्चित्रपट प्रक्षेपक (कायनेटोस्कोप) शोधून काढला. यात सुटीसुटी चित्रे भराभर फिरवून हलती चित्रे अर्थात ‘सिनेमा’ निर्माण केला. चलच्चित्रपट प्रक्षेपक म्हणजेच सिनेमा प्रोजेक्टर. यानंतर एडिसनने पुनर्भारण (चार्जिंग) करता येण्याजोगी, लोह व निकेल वापरून अल्कधर्मी संचायक विद्युत् घटमाला (स्टोरेज बॅटरी) तयार केली.  ती भक्कम, टिकाऊ व उच्चक्षमतेची होती.   फोनोग्राफमध्ये सुधारणा करून व चलच्चित्रपट प्रक्षेपकाशी जुळवून पहिला बोलका सिनेमा तयार केला. विजेचे पेन, मिमिओग्राफ (सायक्लोस्टायलींग मशीन), तापमानातील अतिसूक्ष्म बदल दाखविणारा मायक्रोसिमिटर, धावत्या रेल्वेाशी संपर्क साधण्यासाठी बिनतारी  यंत्रणा अशा अनेक संशोधनानंतर एडिसनने रसायन उद्योगातही झेप घेतली. एडिसनने बेंझीन, कार्बोलिक अम्ल यांसारख्या रसायनांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणारी संयंत्र उभारून, त्यावर उत्पादन करून पहिल्या महायुद्धाच्या काळात साहाय्य केले. त्याने तापानुशीतन (अनिलींग) प्रक्रियाही शोधून काढली. ही धातू, मिश्रधातू व काच यांचा ठिसूळपणा कमी करणारी प्रक्रिया आहे. विजेवर चालणाऱ्या घरगुती व औद्योगिक यंत्राच्या क्षेत्रातील जगातील सर्वांत मोठी कंपनी ‘जनरल इलेक्ट्रीक’ एडिसननेच स्थापन केली. सन १९१५ मध्ये, अमेरिकन नौदल सल्लागार समितीचा अध्यक्ष असताना एडिसनने नौदलासाठी अनेक उपकरणे तयार केली.

एडिसन यांनी काळानुसार आधी बनविलेल्या उपकरणात अनेक सुधारणा घडवून आणल्या. सन १८८३ मध्ये एडिसन यांनी सूक्ष्म निरिक्षणावर आधारित ‘धातूच्या तप्त राखेतून इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह निघतो’ हा  महत्त्वपूर्ण शोध लावला.  हा शोध आधुनिक इलेक्ट्रॅानिक्स तंत्रज्ञानात मूलभूत आणि महत्त्वाचा ठरला. म्हणूनच या शोधाला ‘एडिसन इफेक्ट’असे नाव दिले गेले. ‘कठोर परिश्रमाला पर्याय नाही’ हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. त्यानुसार त्यांनी अपार कष्ट केले.

एडिसन यांनी विद्युत् क्षेत्र आणि संदेशवहन या क्षेत्रांमध्ये अत्यंत यशस्वी संशोधन केले असले तरी, १८८० ते १८९० च्या दशकात एडिसनने आपल्या प्रयोगशाळेत चुंबकीय खनिज अलग करण्याला प्राधान्य दिले होते.  त्यापूर्वीही प्रदीप्त दिव्यांसाठी प्लॅटिनमचा शोध घेत असताना खनिज विलग करण्यावर एडिसनने काम केले. त्याने वाळुतून लोहमिश्रीत खनिज प्लॅटिनम बाजूला करणारे उपकरण बनविले होते.  एडिसनने १४५ जुन्या खाणींचे स्वामित्व मिळविले होते. त्यातील न्यू जर्सीतील ऑक्डेन येथील खाणीवर एक मोठा पायलट प्लान्ट स्थापीत केला होता. त्यातून त्याला पैसे कमविण्याची संधी दिसत होती.  परंतु जेव्हा लोखंडाचे भाव धडाधड कोसळले तेव्हा त्यांनी ही कल्पना सोडून दिली. कोणतेही अपयश एडिसनच्या संशोधन वृत्तीला थांबवू शकले नाही. आपल्या वयाच्या ८० व्या वर्षीही त्यांचे संशोधन चालूच ठेवले.

आपल्या आयुष्यात एडिसन यांनी विद्युत्दीप आणि शक्ती संबंधी ३८९, फोनोग्राफसंबंधी १९५, टेलिग्राफ संबंधी १५०, संचायक विद्युत् घटमाला (स्टोरेज बॅटरी) संबंधात १४१ आणि दूरध्वनी  संदर्भात ३४ अशी एकूण ९०० च्या वर एकस्वे संपादित केली.

अमेरिकेशिवाय इंग्लंड, फ्रान्स व इतर देशांनी अनेक पुरस्कार, सुवर्णपदके इत्यादी देऊन एडिसन यांचा वेळोवेळी सन्मान केला. जनतेची कृतज्ञतेची पावती म्हणून एडिसनने व्रतस्थ राहून निर्मोही वृत्तीने त्यांचा स्वीकार केला. अनेक पराक्रमांनी आपले आयुष्य सार्थकी लावून एडिसन  न्यू जर्सीतील वेस्ट ऑरेंज येथे निवर्तले. सन १९५५ मध्ये एडिसन यांचे घर व प्रयोगशाळा अमेरिकन सरकारने राष्ट्रीय ऐतिहासिक वास्तू म्हणून घोषित केले.  मागच्या वर्षी म्हणजे २०२३मध्ये आम्ही या केंद्रालाच भेट दिली आणि त्याच्या निरनिराळ्या कार्यशाळा व प्रयोगशाळा प्रत्यक्ष पाहिल्या,


No comments: