आपण सर्वजण दरवर्षी १५ ऑगस्टला मोठ्या उत्साहाने स्वातंत्र्यदिन साजरा करत असतो. त्या दिवशी दिल्लीमधल्या लाल किल्ल्याच्या एका बुरुजावर देशाचे पंतप्रधान झेंडावंदन करतात. तो सोहळा पाहण्यासाठी खालच्या प्रांगणामध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक आणि मुले जमा झालेली असतात. त्यांच्यासमोर प्रधानमंत्री मोठे भाषण करतात, ते खरे तर सर्व देशाला उद्देशून केलेले असते आणि टेलिव्हिजनच्या सर्व वाहिन्या त्याचे थेट प्रक्षेपण करत असल्यामुळे देशभरातले कोट्यावधी लोक ते भाषण भक्तिभावाने ऐकत असतात. आमच्या लहानपणी गावातल्या सगळ्या शाळांमधली मुले त्या दिवशी सकाळी प्रभातफेरी काढून रांगेने गावातल्या मुख्य रस्त्यांवरून फिरून अखेर मामलेदार कचेरीच्या आवारात जमा होत असत आणि तिथे तालुक्याचे मुख्य अधिकारी व नेतेमंडळी झेंडावंदन करून चार शब्द उपदेश करत असत. मोठेपणी आमच्या अणुशक्तीनगर वसाहतीतसुद्धा प्रत्येक बहुमजली बिल्डिंगमधले बहुतेक रहिवासी खाली उतरून सार्वजनिक ध्वजारोहणाचा कार्यक्रम करत असू आणि त्यानंतर देशभक्तिपर गाणी गाऊन मिठाई वाटत असू.
आता पुण्यातल्या आमच्या ब्ल्यूरिज टाउनशिपमध्येसुद्धा आम्ही ती परंपरा जोपासली आहेच. मध्यंतरी कोविडमुळे दोन वर्षे खंड पडला होता. गेल्या वर्षी तिथल्या रहिवाशांनी दणकेबाज कार्यक्रम करून त्याची उणीव भरून काढली. त्या वर्षी मी तिथे हजर नव्हतो तरी वॉट्सॅपवर त्या कार्यक्रमांचे व्हीडिओ आणि फोटो पाहिले.
गेल्या वर्षी ४ जुलै म्हणजे अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाला मी तिथे होतो. त्या दिवशी सर्वांना सुटी होती पण ती कशी मजेत घालवायची याचाच विचार सगळेजण करत होते. न्यूजर्सीमध्ये आम्ही रहात असलेल्या भागात तरी कुठल्याच प्रकारची मिरवणूक, सभा असा काही प्रकार नव्हताच. संध्याकाळी अंधार पडल्यावर एका ठिकाणी सार्वजनिक फायरवर्कचा कार्यक्रम होता. तो पहायला म्हणून आम्ही मोटारीतून गेलो तर त्या पटांगणाकडे जाणारे सगळे रस्ते दूर दूर अंतरांवरच वाहतुकीसाठी बंद करून ठेवले होते. तो पत्ता देऊन जीपीएसवरून शोध घेतांना आम्ही वळत वळत पाचसहा मैलांचा फेरा घालत आणि पुन्हा पहिल्याच ठिकाणी परत येत होतो. वाटेत एका ठिकाणी काही मंडळी रस्त्याच्या कडेला असलेल्या लहानशा उंच जागेवर उभी असलेली दिसली. तिथे रस्त्यावर हवी तिथे गाडी उभी करता येत नाही. त्यामुळे त्या लोकांच्या पलीकडे मोकळी जागा पाहून दाटीवाटीने तिथे गाडी लावली आणि आम्हीही त्यांच्या घोळक्यात सामील झालो. तेवढ्यात दुरून आकाशात आतीशबाजी सुरू झालेली दिसायला लागली. एकामागोमाग एक अग्निबाण आकाशात उडून फुटत होते रंगीबेरंगी कण उधळत होते आणि विझून जात होते. आजकाल आपल्याकडे लग्नसमारंभामध्ये करतात तशाच प्रकारची ही रोशणाई होती आणि आम्ही ती खूप दुरून पहात असल्यामुळे फार आकर्षक किंवा डोळे दिपवणारी वाटली नाही. मी यापूर्वी युरोपअमेरिकेत काही ठिकाणी पाहिलेले लेजर शोज यापेक्षा अनेक पटींनी भव्यदिव्य होते.
मागील वर्षी १५ ऑगस्टला मंगळवार होता. त्या दिवशी अमेरिकेत सुटीचा दिवस नव्हता, सगळ्या लोकांना कामावर जायचे होते आणि सगळ्या मुख्य रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्थितपणे सुरु ठेवणे आवश्यक असते, त्यात व्यत्यय येऊ द्यायचा नसतो. म्हणून तिथल्या भारतीय रहिवाशांना आधीच्या आणि नंतरच्या रविवारी म्हणजे १३ आणि २० तारखेला स्वातंत्र्यदिवस साजरा करायला परवानगी मिळाली होती. आमच्या साउथ प्लेनफिल्ड गावातून जाणाऱ्या ओकट्री रोडवर पुढे लागणाऱ्या एडिसन या शहराच्या एका भागात पहिल्या रविवारी एक शोभायात्रा काढण्याचा कार्यक्रम ठेवला होता. त्या भागात आदल्या दिवसापासूनच रस्त्याच्या दोन्ही कडांना अमेरिकेचे आणि भारताचे राष्ट्रध्वज लावून ठेवले होते ते आम्ही पाहिले होते, पण त्या दिवशी आकस्मिक उद्भवलेल्या काही कारणामुळे आम्ही ती मिरवणूक पहायला जाऊ शकलो नाही. २० तारखेला न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन या मुख्य भागात एक खूप मोठी शोभायात्रा निघणार होती ती पहायचे ठरवले.
न्यूयॉर्कमधली प्रचंड रहदारी, तिथे पार्किंगसाठी जागा शोधण्याचे दिव्य आणि त्यासाठी भरावा लागणारा अव्वाच्या सव्वा भुर्दंड वगैरेचा विचार करता आम्ही तिथे ट्रेनने जायचे ठरवले. आमच्या घरापासून तीनचार मैलावर असलेल्या मेट्रोपार्क नावाच्या रेल्वे स्टेशनवर गेलो, तिथल्या प्रशस्त पार्किंग लॉटमध्ये गाडी उभी केली आणि तिकीटे काढून प्लॅटफॉर्मवर गेलो. इथली रेल्वेस्टेशने सपाट जमीनीवर एका लेव्हलला नसतात. तिथे जाऊन पोचल्यावरसुद्धा एलेव्हेटर (लिफ्ट) किंवा सरकत्या जिन्यांमधून वरखाली जावे लागते. आम्हाला ते शोधून प्लॅटफॉर्मवर जाऊन पोचायला जरा जास्तच वेळ लागला आणि आमची गाडी आमच्या डोळ्यासमोरून धडधडत जातांना दिसली. आता पुढची ट्रेन येईपर्यंत वाट पहात बसणे भाग होते. पण बसायला चांगल्या खुर्च्या होत्या आणि त्या सगळ्या रिकाम्याच होत्या. आम्ही एका जागी बसलो, बरोबर आणलेले डबे उघडले आणि सँडविचेस खाऊन घेतले.
आमच्या समोरच फक्त दोन तीन डब्यांची एक लहानशी ट्रेन येऊन उभी राहिली. माइकवर दिल्या जात असलेल्या घोषणांनुसार ती गाडीसुद्धा न्यूयॉर्ककडे जात होती. आम्ही उठून तिकडे जात होतो तेवढ्यात पुढच्या डब्यातून एक टीसीसारखा गणवेशधारी ऑफिसर उतरला आणि त्याने ही गाडी अमक्या तमक्या कंपनीची आहे, ज्यांनी आमच्या कंपनीचे तिकीट काढले असेल त्यांनीच फक्त या गाडीत चढावे असे ओरडून सांगितले. आमच्याकडे एनजे ट्रान्झिट या वेगळ्या कंपनीचे तिकीट होते म्हणून आम्ही त्या गाडीने जाऊ शकत नव्हतो. आणखी थोड्या वेळाने एनजेटीची ट्रेन आली. ती सिंगल डेकर होती. या रूटवर बहुतेक ट्रेन डबल डेकर असतात, पण या वेळेला साधी एकमजली गाडीच आली होती आणि ती प्रवाशांनी भरलेली होती. रविवार असल्यामुळे रेल्वेगाड्या रिकाम्या जात असतील असे आम्ही समजून होतो पण कदाचित त्या दिवशी भारतीय स्वातंत्र्यदिन पहायला आणखी बरेच लोक निघाल्यामुळे जास्त गर्दी झाली असेल. मला एक रिकामी जागा दिसली ती मी पटकन पकडली. नंतर इतरांनाही बसायला जागा मिळाल्या, पण निरनिराळ्या रांगांमध्ये.
चाळीस मिनिटांच्या प्रवासानंतर आम्ही न्यूयॉर्कच्या पेन स्टेशनाला पोचलो. आधी आम्ही गाडीत निरनिराळ्या ठिकाणी बसलो होतो आणि हा शेवटचा थांबा आल्यानंतर फलाटावर उतरून सगळे एकत्र आलो. हे पेन स्टेशनसुद्धा एक अजूबा आणि भूलभुलैयाच आहे. हे स्टेशन यायच्या आधीच आमची गाडी एका मोठ्या बोगद्यात शिरली आणि ती स्टेशनात जिथे येऊन उभी राहिली तो भागही पाताळातच होता. तिथून वर चढून बाहेर जाण्यासाठी अनेक सरकते जिने आणि कॉरीडॉर्स होते. अमूक ठिकाण या बाजूला आणि तमूक ठिकाण त्या बाजूला असे बाण दाखवणारे फलक जागोजागी दिसत होते, पण आमच्यासाठी अमूक, तमूक आणि ढमूक या सगळ्याच जागा अनोळखी असल्यामुळे त्यातून आम्हाला विशेष दिशादर्शन होत नव्हते. आम्ही आंधळ्यासारखे चाचपडत अखेर एका दरवाजामधून त्या अवाढव्य स्टेशनच्या बाहेर निघालो तेंव्हा कुठे सूर्याचा उजेड दिसला.
ही भारतीय परेड पाहण्यासाठी ३८नंबरच्या स्ट्रीटवर जायचे आहे एवढीच माहिती आमच्याकडे होती. तो रस्ता कुठे आहे हे शोधणे सुरू झाले. ७ की ८ नंबरचे दोन अॅव्हेन्यूज ओलांडून पुढे जात असतांना कुठेतरी ३३ की ३४ नंबरची पाटी दिसली त्यावर जाऊन पुढे शोधायचे होते. तेवढ्यात पोलका डॉटच्या एकसारख्या साड्या नेसलेल्या सातआठ भारतीय महिलांचा एक ग्रुप आमच्यामागून आला आणि झपाझपा पुढे गेला. त्यासुद्धा या मिरवणुकीला निघाल्या आहेत का एवढे आम्ही त्यांना विचारून घेतले आणि त्यांच्या मागेमागे जात ३८ नंबरच्या स्ट्रीटवर जाऊन पोचलो. आमच्या ओळखीची कुलकर्णी मंडळी तिथे होतीच. त्यांची मुलगी शोभायात्रेतल्या एका ढोलताशा पथकात भाग घेणार होती. खरे तर आम्ही त्यांना मेट्रोपार्क स्टेशनवरच भेटणार होतो आणि त्यांच्याबरोबर जायचे असे ठरले होते. पण आमची गाडी चुकल्यामुळे तिथे आमची चुकामूक झाली होती. ३८ नंबरच्या रस्त्यावर बरीच उत्साही भारतीय मंडळी शोभायात्रेच्या तयारीत उभी होती, पण आम्ही पोचेपर्यंत तो कार्यक्रम सुरू झाला नव्हता.
न्यूयॉर्क शहरातही मुंबईतल्यासारखे काही उत्तर दक्षिण जाणारे लांब हमरस्ते आहेत, त्यातलाच एक मॅडिसन अॅव्हेन्यू नावाचा रस्ता आहे. त्या रस्त्याचा एक लहानसा भाग भारत दिनाच्या परेडसाठी दुपारच्या तीन तासासाठी राखून ठेवला होता. तेवढ्या वेळासाठी त्या रस्त्याने होणारी वाहतूक दुसऱ्या रस्त्यांवरून वळवली होती. त्या हमरस्त्याला छेद देणाऱ्या ३७, ३८ सारख्या काही उपरस्त्यांवर अनेक लोक आपापले चित्ररथ आणि पथके घेऊन येऊन थांबले होते. त्यातच एक न्यूजर्सीमधील मराठी मंडळींचे जल्लोश नावाचे ढोलताशा पथक होते. या पथकात अनेक उत्साही तरुण आणि त्यांच्यापेक्षाही जास्त उत्साही युवती मोठमोठे ढोल आणि ताशे गळ्यात बांधून त्यांना सांभाळत आणि तालात बडवत होते, काही जणांनी मोठमोठ्या झांजा हातात घेतल्या होत्या तर अनेक मुली लेझिम वाजवत नाचत होत्या. मधून मधून कोणी तरी छत्रपती शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम्, भारतमाता की जय वगैरे घोषणा करत होता. काही जणांनी मोठमोठे तिरंगी झेंडे आणि इतर काही झेंडे सांभाळले होते. त्यातल्या एका झेंड्यावर जाणता राजा अशी अक्षरे लिहिली होती. सर्वांनी भारतीय आणि मुख्यतः महाराष्ट्रीय परंपरागत पद्धतीची वेशभूषा केलेली होती. अनेकांनी डोक्यावर पागोटी घातली होती.
त्या पथकात भाग घेणारी सुमारे पन्नास साठ मंडळी आणि त्यांचे शंभर दीडशे आप्त अशी सगळी गर्दी त्या ३८व्या रस्त्यावर जमा झालेली होती. अजून मुख्य शोभायात्रेची सुरुवात झालेली नसली तरी हे लोक त्याची पूर्वतयारी म्हणून जोरजोरात ढोलताशेझांजा बडवून जल्लोशाची वातावरण निर्मिती करत होते. तिथे आजूबाजूला कोण लोक रहात असतील आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया असतील त्या कदाचित तिथल्या लोकांच्या सोशल मीडियावर आल्या असल्या तरी त्या आम्हाला कळायचा मार्ग नव्हता. आम्ही थोडा वेळ तिथे थांबून इतर चित्ररथ पहात पहात पुढे जाऊन मॅडिसन अॅव्हेन्यूवर गेलो आणि एक मोक्याची जागा पकडली. तिथे रस्त्याच्या कडेला एका झाडाची थोडी सावली होती, मागे एक खाद्यपेयांचे दुकान होते आणि ते घेऊन बाहेर आणून खाण्यासाठी रस्त्यावर एक बेंचही ठेवला होता.
भारत दिनाची परेड दुपारी बारा वाजता सुरू होणार आहे अशी माहिती आम्हाला मिळाली होती आणि पहिली गाडी चुकली तरीही आम्ही तिथे वेळेवर जाऊन पोचलो होतो. रस्त्यावर अनेक सजलेले चित्ररथ तसेच पायी चालणारी मंडळी जय्यत तयारीत दिसत होती. अग्रभागी संचलन करणारे सुटाबुटातले गणवेशधारी युवकही तयार होते, त्यांचा बँडही समोर उभा होता, पण परेड का सुरू होत नव्हती, ती कुणासाठी थांबली होती ते समजत नव्हते. निरनिराळ्या आवाजात इतके कर्णे किंचाळत असले तरी या परेडबद्दल काही घोषणा होत नव्हती. बघे लोकही नुसतीच चुळबुळ करत होते.
बराच वेळ वाट पाहून झाल्यानंतर एकदाचा हिरवा कंदील मिळाला आणि शोभायात्रा हलायला लागली. सर्वात पुढे दोन घोडे हळूहळू चालत होते, त्यांच्या मागे न्यूयॉर्क पोलिसांचा बँड होता. त्याच्या मागे चार तरुण चार मोठे झेंडे घेऊन चालत होते. अर्थातच त्यातला एक अमेरिकेचा आणि एक भारताचा राष्ट्रध्वज होता. उरलेले दोन कदाचित न्यूयॉर्क राज्य व न्यूयॉर्क शहर यांचे किंवा पोलिसखात्यांचे असावेत. अमेरिकेत ज्याचा त्याचा स्वतंत्र झेंडा असतो आणि तो कुणी कुठे किंवा कधी लावावा अथवा लावू नये असे काही नसते. आम्ही ज्या भागात रहात होतो तिथल्या सात आठ घरांसमोर नेहमीच रंगीबेरंगी झेंडे फडकत असायचे. मिरवणुकीतल्या ध्वजधारकांच्या मागून न्यूयॉर्क पोलिसखात्यात काम करणारे भारतीय वंशाचे वीसपंचवीस अधिकारी त्यांच्या गणवेशात शिस्तीत चालत होते. एवढीच काय ती शिस्तबद्ध परेड होती, पण त्यांच्या मागे खूप चित्ररथ आणि पायी चालणारी अनेक पथके होती.
न्यूयॉर्कमधल्या पोलिसखात्यातील दोन विभागांच्या गाड्याही त्यांच्या संचलनामध्ये दिसत होत्या. एक संचलन पुढे निघून गेल्यानंतर मध्ये थोडी मोकळी जागा सोडून मागची पार्टी नाचत नाचत पुढे येत होती. तेलुगू लोकांच्या समूहात सगळ्यात समोर एक श्रीरामचंद्राची वेशभूषा केलेला धनुर्धर होता आणि त्याच्या बरोबर एक नखशिखांत सजलेली भारतमाता चालत होती. त्या दोघांच्या मागेमागे एक राक्षसासारखा दिसणारा माणूस दोन्ही हातात दोन आसूड घेऊन त्यांना स्वतःभोवती नुसताच फिरवत होता. मी लहानपणी कडकलक्ष्मी नावाचा एक प्रकार लहान गावातल्या रस्त्यांवर पाहिला होता हे सोंग तसेच काहीतरी दिसत होते, पण त्याच्या आसुडाचा फटका त्याला बसतच नव्हता. त्यांच्या चित्ररथावर एक मोठी गणपतीबाप्पाची मूर्ती आणि तिच्या आजूबाजूला मंदिराचा देखावा केलेला होता आणि अधून मधून ते लोक घंटा वाजवून गणेशाचा जयजयकार करत होते. त्यांच्या मागे जल्लोश पथक ढोलताशा, झांजा वगैरे वाजवत आणि लेझिम खेळत पुढे सरकत होते.
या शोभायात्रेसाठी आंतरराष्ट्रीय योगगुरु श्री श्री रविशंकरजी एक मुख्य अतिथि होते. त्यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगचा मोठा चित्ररथ बराच मागून येत होता, पण गुरुजी त्यांच्या अनेक शिष्य किंवा भक्तांच्या बरोबर पायीच चालत येतांना दिसले. खरे तर ते आजूबाजूच्या इतर उंच लोकांच्या मागे झाकून गेले होते, त्यामुळे मला त्यांचे अगदीच ओझरते दर्शन झाले. त्यांच्या मागे मागे मिशन इन लाइफ नावाचा फ्लोट येत होता. याशिवाय योगा कम्युनिटी या नावाचा एक वेगळा ग्रुप हातात काही फलके घेऊन या परेडमध्ये भाग घेत होता.
नवी दिल्लीमधील गणतंत्रदिनाच्या संचलनातले चित्ररथ भारत सरकारची निरनिराळी खाती आणि काही राज्य सरकारे यांनी तयार करवून घेतलेले असतात आणि दूरदर्शनाच्या माध्यमातून कोट्यावधी लोक ते पहात असतात. ते तयार करण्यासाठी भरपूर खर्चही केला जातो आणि वेळही दिला जातो. अर्थातच ते खरोखरच भव्यदिव्य असतात. न्यूयॉर्कच्या एका रस्त्यावरून काढलेली ही इंडिया परेड आमच्यासारख्या काही लोकांनी प्रत्यक्ष पाहिली असेल आणि आणखी काही लोकांनी ती नंतर यूट्यूबवर पाहिली असेल. त्यामुळे त्याला फारसे प्रसिद्धीमूल्य नव्हतेच. यातले सगळे चित्ररथ खाजगी संस्था किंवा कंपन्यांनी स्वखर्चाने तयार केले होते आणि त्यांचे बजेटही जास्त असायचे कारण नव्हते. त्यामुळे त्यांच्या गुणवत्तेबद्दल फार जास्त अपेक्षा ठेवण्यात अर्थ नव्हता. मुळात ते तयार केले गेले आणि काढले गेले यालाच महत्व होते.
या चित्ररथांमध्ये खूप विविधता होती. मिशन इन लाइफ या संस्थेकडून पर्यावरणाची काळजी घेण्याचा संदेश दिला जात होता, अन्न हवे असेल तर जमीनीची काळजी घ्या असे ते सांगत होते, तर न्यूजर्सी सिद्धीविनायक नावाचे मंडळ आपल्या गणेशोत्सवाला या असे आवाहन करत होते. एका संस्थेने स्कॉटिश बॅगपाइपर्सचा बँड आणला होता, तो चक्क हिंदी गाणी वाजवत होता. तसाच एक पनामातल्या लोकांचा बँड होता. त्यांचा त्या संस्थांशी किंवा भारताशी काय संबंध होता कोण जाणे! बॉलिवुडची एक अभिनेत्री जॅकेलिन फर्नांडिस ही आणखी एक सेलिब्रिटी होती. ती मात्र एका फ्लोटवर समोर उभी राहून सर्व प्रेक्षकांना अभिवादन करत होती. तो फ्लोट कुणाचा होता ते मला आता आठवत नाही. बादशाह मसाले ही भारतीय कंपनी आणि डंकिन डोनट्स ही अमेरिकन कंपनी आपापल्या जाहीराती करत होत्या. आहारामध्ये 'मिलेट्स' म्हणजे ज्वारी, नाचणी यासारख्या धान्यांचा वापर करा असा प्रचार करणारा एक चित्ररथ होता. पांढऱ्या शुभ्र वेशातले ब्रह्मकुमारींचे साधक आणि भगिनींचा एक मोठा जमाव भारताचे आणि त्या संस्थेचे ध्वज घेऊन चालत होता. जगभरातल्या अनेक देशांमध्ये भगवान स्वामीनारायणाची सुंदर मंदिरे बांधणाऱ्या बीएपीएस या संस्थेने दिल्लीतल्या अक्षरधामची प्रतिकृति असलेला सुंदर चित्ररथ आणला होता. स्टेटबँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय या बँकांच्या अमेरिकेतल्या मुख्य शहरांमध्ये शाखा आहेत. त्यांनी याबद्दल माहिती देणारे फ्लोट्स ठेवले होते. एका समूहात उत्तर अमेरिकेतले मुस्लिम एकत्र चालत होते, त्याचप्रमाणे अमेरिकेत रहाणाऱ्या काश्मीर, बिहार आणि झारखंड वगैरे ठिकाणच्या लोकांच्या संघटनांचे चित्ररथ होते. मला सगळ्यात जास्त आश्चर्य याचे वाटले की फलूनदफा अशा विचित्र नावाच्या एका समूहात पिवळा गणवेश घातलेले जवळ जवळ शंभर लोक होते आणि ते सगळे मंगोल वंशीय दिसत होते. टाइम्स नाउ आणि टीव्ही एशिया या माध्यमांनीही आपली उपस्थिति दाखवणारे फ्लोट्स आणले होते. अशा प्रकारे ती एक खूप मोठी मिरवणूक होती. फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्सतर्फे न्यूयॉर्कच्या रस्त्यावरून काढलेली ही मिरवणूक भारताबाहेरील भारतीयांनी केलेला सर्वात मोठा जाहीर सोहळा आहे अशी जाहिरात केली जात होती. ती पाहतांना मलाही देशाभिमानाबरोबर थोडे आश्चर्यही वाटत होते.
No comments:
Post a Comment