Monday, May 09, 2016

स्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान .... (खास पुरुषांसाठी) - भाग १ ते ३

स्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान .... (खास पुरुषांसाठी)

 - भाग १  - प्रस्तावना


कोणे एके काळी चूल आणि मूल एवढेच स्त्रियांचे कार्यक्षेत्र असायचे असे मी लहानपणी कुठेतरी वाचले होते. त्या काळातले राजेरजवाडे, नबाब, सुलतान वगैरे लोक सतत एकमेकांच्या राज्यांवर चढाया, स्वा-या किंवा हल्ले करायचे आणि त्यामुळे पुरुषमंडळी नेहमी युध्दांच्या मोहिमांवर असायची. घरातल्या महिला 'चूल' आणि 'मूल' या दोन्ही कार्यक्षेत्रांवरील आपली निरंकुश सत्ता सुखेनैव उपभोगायच्या. इंग्रजांचे राज्य भारतावर आल्यानंतर या सगळ्या आपापसातल्या लढाया बंद झाल्यामुळे पुरुष घरी राहू लागले आणि त्यामुळे अडचणी यायला लागल्या. आता महिलांनी आपला मोर्चा बाहेरच्या क्षेत्रांकडे वळवावा या हेतूने कांही समाजसुधारकांनी स्त्रीशिक्षणसंस्था काढल्या. त्यातून तय्यार होऊन बाहेर आलेल्या स्त्रियांनी सर्वात आधी शिक्षणक्षेत्रच सर करून टाकले. तिथले 'सर' दिसेनासे झाले आणि मानिनीसारख्या चित्रपटातले आदर्श शिक्षक अदृष्य होऊन बाकीचे मास्तरसुध्दा मराठी ग्रामीण चित्रपटातले 'मास्तुरे' झाले. या जुन्या सिनेमांच्या वेळेवरच डीव्हीडी काढून त्या जतन करून ठेवल्या तर हे प्राणी कसे असायचे ते भावी पिढ्यांमधल्या मुलांना समजायला मदत होईल.

शिक्षण क्षेत्रानंतर किंवा त्याच्या पाठोपाठ अनेक महिलांनी ऑफिसांमध्येही शिरकाव करून तिथल्या कारकुंड्यांना हद्दपार केलेच, स्वागतिका (रिसेप्शनिस्ट), दूरध्वनिसंयोजिका (टेलिफोन ऑपरेटर) यासारख्या खास राखीव जागा तयार करून घेतल्या. वैद्यकीय (मेडिकल), अभियांत्रिकी (इंजिनियरिंग) इत्यादि विविध क्षेत्रांत आता महिलांची घोडदौड चालली असतांनाच परिवारनियोजनामुळे मुलांची संख्या घटून आता घरटी एकदोनवर आली आहे. ती मुले देखील बोलायला आणि चालायाला लागली की "बाबा, बाबा" करत बापाला चिकटतात आणि त्याच्या मांडीवर बसून टीव्ही, डीव्ही़डी आणि यूट्यूब पहात पटापट मोठी होऊन जातात. शिवाय प्लेस्कूल्स, पाळणाघरे वगैरे निघाल्यानंतर त्यांना कळायला लागायच्या आधीच ती मुले कांही काळ घराबाहेर राहू लागतात. पूर्वीच्या काळातल्या महिलांकडे 'बालसंगोपन' हा एक 'फुललाइफ'साठी 'फुलटाइम परमनंट जॉब' असायचा, तो या सगळ्यांमुळे आता 'शॉर्ट टाइम'साठी 'पार्टटाइम' झाला आहे. पण स्वयंपाकघराचे 'किचन' झाले आणि त्यातली चूल जाऊन तिच्या जागी गॅसची शेगडी, इलेक्ट्रिक हॉटप्लेट आणि मायक्रोवेव्ह ओव्हन वगैरे साधने आली असली तरी त्यावर घट्ट आवळून ठेवलेली आपली मजबूत पकड मात्र कोणत्याही महिलेने अजूनपर्यंत सैल केलेली दिसत नाही. "मी किचनमध्ये बिझी आहे तोवर जरा डॉलीकडे बघ ना प्लीज" किंवा "गिळायला पाहिजे असेल तर आपल्या कार्ट्याला सांभाळा" असे संवाद ऐकायला मिळतात, पण आई मुलाला मांडीवर घेऊन टॉम अँड जेरीची कार्टून पहात खिदळत बसली आहे आणि स्वैपाकघरात कांदे चिरत असलेल्या बाबाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहताहेत असे चित्र कांही केल्या माझ्या डोळ्यासमोर तरी येत नाही. पण ते लवकरच येण्याची शक्यता असल्याने मी त्यांना मदत करायचे ठरवले आहे. ही सगळी प्रस्तावना देण्याचे कारण म्हणजे आपल्या ख-या आयुष्यात मला स्वयंपाकघरात लुडबुड करायची फारशी संधी मिळाली नाही, पण आता आंतर्जालावरल्या ई जीवनातल्या मुदपाकखान्यात धुडगुस घालायच्या इराद्याने मी दाखल झालो आहे.

माझी मुळातलीच चिकित्सक वृत्ती आणि त्यातून विज्ञानतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दीर्घ काळ काम केल्यामुळे (आधीच मर्कट तशातचि मद्य प्याला .. वगैरे सिनर्जीच्या धर्तीवर) त्यांचा चश्मा आता माझ्या कवटीतच कायमसाठी फिट्ट होऊन रुतून बसला असावा. कांही केल्या तो निघतच नसल्यामुळे स्वैपाकघरातसुध्दा मला तिथले विज्ञान आणि तंत्रज्ञानच दिसते आणि मी या लेखात त्याच्याबद्दलच लिहिणार आहे.  वैज्ञानिक दृष्टीकोनातून पहातांना प्रत्येक गोष्टीचा जरासा मूलभूत विचार करावा लागतो. आपण सजीव प्राणी असल्यामुळे आपल्या शरीराला अन्नाची गरज लागते. रानातली हरणे, ससे, माकडे वगैरे शाकाहारी प्राणी झाडांची पाने, फळे, मुळे वगैरे तोडून त्यांना कच्चेच खातात आणि आतापर्यंत शिल्लक उरलेले वाघ, सिंह, तरस, लांडगे वगैरे मांसभक्षी प्राणी त्यांच्या शिकारींचे लचके तोडून ते कच्चेच गिळतात. गुरेढोरे वगैरे माणसाललेल्या प्राण्यांना कधीमधी शिजलेले आंबोण मिळत असले तरी त्यांच्या रोजच्या खाण्यात चारा, भुसा किंवा कडबाच असतो. कुत्र्यामांजरींसारख्या लाडावलेल्या प्राण्यांच्या खाण्यापिण्याचे कितीही लाड केले तरी हाडुक दिसले की कुत्री सुखावतात आणि मांजरीला उंदीर किंवा चिमणी दिसली की ती त्याच्यावर झेपावते. या प्राण्यांच्या हजारावर पिढ्या माणसांच्या सहवासात गेल्या असल्या तरी कच्चे अन्न खाण्याचे आपले सामर्थ्य त्यांनी अजून शाबूत राखले आहे. माणूस मात्र ते बहुतांशाने गमावून बसला आहे. आश्रमात रहाणारे कांही योगीराज आणि फक्त बदाम, पिस्ते, मनुका वगैरे सुका मेवा खाऊन जगणे ज्यांना परवडू शकते असे जुन्या काळातले थोर नेते किंवा हल्लीचे प्रशिक्षित अतिरेकी अशांचे अपवाद सोडले तर इतर सर्वसामान्य माणसांना रोज तीन्ही त्रिकाळ खाण्यासाठी शिजवलेले अन्न लागते. त्यामुळे पाकसिध्दी ही आपल्या जीवनातली अत्यावश्यक गोष्ट आहे यात शंका नाही.

स्वयंपाक कशासाठी करायचा ? या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यानंतर तो कसा करायचा याचा विचार करावा लागेल. पूर्वीच्या जमान्यात वर्षातून एकदा किंवा दोनदा शेतातली पिके घरात आली की ते धान्यधून्य पोत्यात किंवा पिपात भरून ठेवत असत आणि  त्यातले थोडे थोडे काढून ते नंतरच्या काळात उपयोगात आणले जात असे.  त्या धान्यांना अधूनमधून ऊन दाखवणे, मोठी छिद्रे असलेल्या पत्र्याच्या चाळणीतून चाळणे, सुपाने पाखडणे वगैरे कामे वर्षभर करावी लागत असत. शिवाय भुईमुगाच्या शेंगा फोडून त्यातले दाणे काढणे, हरभरा, तूर, मूग यासारखी द्विदल धान्ये जात्यावर भरडून त्यातल्या डाळींना त्यावरील कवचातून मुक्त करून एकमेकींपासून विलग करणे वगैरे संस्कार केल्यानंतर त्यांचा उपयोग स्वयंपाकात होत असे. अशा प्रकारची कामे मी लहानपणी नुसती डोळ्यांनी पाहिलेलीच नाहीत तर स्वतः हाताने करून अनुभवली आहेत. पण शहरातल्या पॉश घरांमध्ये या कामांसाठी जागा नसते, ती करण्यासाठी वेळही नसतो आणि साधनेही नसतात. आजकाल सगळ्या संस्करित (प्रोसेस्ड) वस्तू बाजारात आयत्या विकत मिळत असल्यामुळे त्या प्रकारच्या कामांची आता गरजही उरलेली नाही.  त्यामुळे  मी या लेखातल्या विज्ञानाची सुरुवात निसर्गातून मिळालेल्या अन्नपदार्थांच्या कच्च्या मालावर संस्कार करून ज्या स्वरूपात ते माल आपल्या घरी येतात तिथून करणार आहे.

बाजारात मिळणारे 'रेडी टू ईट' प्रकारचे तयार पदार्थ खाणा-या लोकांना त्यामागील कला किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञान समजून घेण्याची आवश्यकता नसते, कोणता पदार्थ कोणत्या खाद्यालयात किती रुपड्यांना मिळतो एवढे वाणिज्य समजणे पुरेसे असते. इंस्टन्ट नूडल्स, पुलाव मिक्स वगैरे झटपट तयार करता येण्याजोग्या पदार्थांच्या पाकिटांवर त्याची सविस्तर कृती छापलेली असते. ती देखील वाचायचा जे लोक आळस करत असतील ते महाभाग हा लेख वाचायचे कष्ट घेतील अशी शक्यता कमी आहे. त्यानाही या लेखाचा फारसा उपयोग नाही. 'रेडी टू कुक' असे पदार्थ घरी आणून त्यावर प्रक्रिया करण्यातले तंत्रज्ञान आणि त्यामागे असलेले विज्ञान मात्र एकदा समजून घेतले तर निदान अर्धे तरी नवे खाद्यपदार्थ खातांनाच ते कसे तयार केले याचा साधारण अंदाज येतो आणि एकदा वाचलेली रेसिपी सहज लक्षात येते असे मी स्वानुभवावरून सांगू शकतो.

स्वयंपाकाच्या क्रियेत कला आणि विज्ञान या दोन्ही शाखांचा सुरेख मिलाप असतो. विज्ञाननिष्ठ माणूस कोठलेही काम सुरू करायच्या आधी ते कसे करायचे याची रूपरेखा ठरवून त्यासाठी लागणारे साहित्य, उपकरणे वगैरे जमवून झाल्यानंतर ते काम पध्दतशीररीत्या करत जातो. कलाकार थोडा कलंदर वृत्तीचा असल्यामुळे तो सर्वच कामे उत्स्फूर्तपणे करतो. सायंटिफिकली आधी ठरवून तयार केलेला पदार्थ बहुतेक वेळा अपेक्षेच्या जवळपास पोचतो आणि एका किमान गुणवत्तेचा असतो. पुन्हा पुन्हा केला तरी तो तसाच दिसतो आणि त्याची चव तशीच लागते. आर्टिस्टिकली बनवलेल्या पदार्थाची भट्टी मात्र जमली तर तो केंव्हा केंव्हा अफलातून बनतो पण पुन्हा कधी तो तसा बनेलच याची ग्वाही देता येत नाही. याचे कारण कलाकार पूर्णपणे आपल्या तंद्रीत गेल्यावर आधी ठरवलेले त्याला आठवत नाही आणि त्यातून भानावर आल्यानंतर मागच्या बाबी त्याच्या लक्षात रहात नाहीत असा हा एक प्रकारचा मेंदूतला 'केमिकल लोचा' आहे.  पण सर्वच माणसांच्या अंगात सायंटिस्ट आणि आर्टिस्ट कमीअधिक प्रमाणात असतात. त्या दोघांचाही उपयोग स्वयंपाकात होतो असे म्हणण्यापेक्षा ते आपणहून त्यात शिरतातच.

निसर्गानेच स्त्रियांना अधिक प्रमाणात कलासक्ती दिलेली आहे. याचा पुरावा हवा असेल तर कोणत्याही कलामहाविद्यालयात जाऊन पहा. तिथे गोपिकांच्या मोठ्या घोळक्यात एकादाच कृष्ण आणि त्याच्या आसपास दोन तीन पेंद्या दिसतील. 'स्वयंपाकघरातले विज्ञान' हा मथळा वाचल्यानंतर किती महिला वाचक (की वाचिका ?)  हा लेख वाचतील याची मला शंका आहे. ''याला स्वयंपाकातलं काय डोंबल कळतंय्?", ''आमचा मेला सारा जन्म स्वैपाक करण्यात गेला, आता हा आणखी वेगळं असं काय सांगणाराय् ?'' हे तर आहेच. शिवाय "ते विज्ञान बिज्ञान नको बाई" वगैरे विचाराने या लेखावर त्या बहुधा टिचकी मारणार नाहीत असा माझा अंदाज आहे. एवीतेवी त्या हा लेख वाचणार नाहीतच असे वाटल्यामुळे मीच त्याच्या मथळ्यात ' खास पुरुषांसाठी' असे जोडून दिले आहे. कदाचित त्यामुळे कुतूहलापोटी कांही टिचक्या मारल्या जातील अशी आशा आहे.  'खास पुरुषांसाठी' हे पाहून कोणी भलत्याच अपेक्षेने हा लेख उघडला तर त्यांच्या पदरी मात्र निराशा पडेल. पण दोन्ही बाजूंनी माझ्या लेखाच्या वाचनांची टीआरपी रेटिंग वाढायला मदतच होईल. वर दिलेल्या परिच्छेदात अनेक लोकांना मी वाचकवर्गातून वगळले आहे, त्याची अंशतः भरपाई होईल.

हा लेख वाचतांना कोणाच्या दुख-या नसेला स्पर्श झाला असला तर त्यांनी मला उदार मनाने माफ करावे आणि ते जमले नाही तर माझ्यावर आलेला आपला राग दोन चार दिवस जमा करून ठेवावा. त्याचा योग्य उपयोग कसा करायचा हे मी या मालिकेच्या पुढील भागात सांगणार आहे. ( तेवढेच थोडेसे अॅडव्हान्स बुकिंग !)

. . . . . . 

 भाग २  - प्रयोजन आणि नियोजन


मी एक इंजिनियर आणि सायंटिस्ट असल्यामुळे माझा जन्म कार्यशाळा (वर्कशॉप्स) आणि प्रयोगशाळांमध्ये वावरण्यात गेला. मी स्वयंपाकघराकडेसुद्धा त्याच दृष्टीकोनामधून पहात आलो आहे. म्हणून हा लेख लिहिण्याचा प्रपंच.

कारखान्यामध्ये काही तयार करायचे असते किंवा प्रयोगशाळेत प्रयोग करायचे असतात तेंव्हा त्यामागील उद्देश आणि त्यांचे उपयोग वगैरे पाहून त्यानुसार  कच्चा माल निवडतात, त्यावर कोणकोणत्या प्रक्रिया किंवा प्रयोग करायचे हे ठरवून त्यासाठी लागणारी सर्व साधने, उपकरणे आणि यंत्रसामुग्री जमवतात. त्या उत्पादनात किंवा प्रयोगात करावयाच्या कृतींचा क्रम आणि त्यांच्यासाठी लागणारा वेळ या सगळ्यांचा अंदाज वगैरे घेऊन त्यानुसार एक सविस्तर प्रोसीजर निश्चित केली जाते. ही सगळी तयारी करून झाल्यानंतर प्रत्यक्षात ती वस्तू तयार करण्याचे किंवा तो प्रयोग करण्याचे काम सुरू केले जाते. निर्मितीचे काम किंवा प्रयोग कुठे न अडता सुरळीतपणे पूर्ण होण्यासाठी ही पूर्वतयारी अत्यंत आवश्यक असते.

विशिष्ट महत्वाच्या उपयोगासाठी एकादी खास वस्तू बनवायची असेल तर त्यासाठी उत्तमोत्तम साहित्य आणून त्यावर प्रगत तंत्राने आणि काळजीपूर्वक रीतीने सगळ्या प्रक्रिया करून घेऊन ती वस्तू जास्तीत जास्त चांगली कशी करता येईल हे पाहिले जाते. पण जर दुसरी एकादी सामान्य वस्तू तांतडीने हवी असेल तर मात्र जवळ उपलब्ध असलेल्या कच्च्या मालापासून आणि उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करून ती किंवा तत्सम वस्तू लगेच तयार करावी लागते. एरवी बाजारात कोणता कच्चा माल सहज आणि रास्त भावात उपलब्ध असेल, कार्यशाळेतल्या यंत्रसामुग्रीचा, उपकरणांचा आणि कामगारांच्या कौशल्याचा कसा जास्तीत जास्त उपयोग करून घेता येईल, कोणत्या पक्क्या मालाला बाजारात चांगला उठाव असेल वगैरे बाबतींचा विचार करून कारखाने चालवले जात असतात.

स्वयंपाकघरातसुध्दा असेच घडत असते. दिवाळसणाला जावई येणार असला तर त्याला खूश करण्यासाठी जेवणात कोणकोणते बेत करायचे याचे सविस्तर नियोजन करून त्याला पंचपक्वान्नांची मेजवानी देण्याची संपूर्ण तयारी केली जाते आणि रात्री अपरात्री एकादा अगांतुक पाहुणा अचानकपणे घरी आला तर त्याला जेऊ घालण्यासाठी घरात जी काही साधनसामुग्री उपलब्ध असेल त्यानुसार पटकन तयार होण्यासारखे एक दोनच पदार्थ बनवले जातात, मग ते भातपिठले असेल, मुगाची खिचडी असेल, चटणीभाकरी असेल, पोळीभाजी असेल किंवा ब्रेडआमलेट असेल. एरवी मात्र गहू, तांदूळ, डाळी, कडधान्ये, भाजीपाला वगैरे ज्या गोष्टी बाजारात सहज उपलब्ध असतील तसेच स्वयंपाकघरात कशाचा साठा असेल ते पाहून, तसेच घरातल्या लोकांच्या आवडीनिवडी, पथ्यपाणी, उपास तापास वगैरे सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यातल्या त्यात सकस आणि चविष्ट असे खाद्यपदार्थ रोजच्या जेवणासाठी रांधले जातात.

सकाळी उठल्या उठल्या होणाऱ्या चहापानानंतर सकाळची न्याहरी (नाश्ता), दुपारचे जेवण, मधल्या वेळेतला चहा फराळ, रात्रीचे जेवण आणि झोपण्यापूर्वी दूध किंवा कॉफी अशा नाना मिषाने आपण अनंत खाद्यपदार्थ पोटात ढकलत असतो. तंत्रज्ञानाचा विचार करता ते केंव्हा तोंडात टाकायचे यापेक्षा ते कसे तयार करायचे हे जास्त महत्वाचे असल्यामुळे मी त्यांचे त्यानुसार वर्गीकरण करणार आहे. सरबतासारखे पदार्थ तयार करतांना ऊष्णतेची गरजच नसते, पण पन्ह्यासाठी ती लागते.  स्वयंपाक करतांना चटणी, कोशिंबीर, लोणचे, पापड वगैरे साइडमेनूला थोडे बाजूला ठेऊन वरणभात, पोळीभाजी यासारख्या जेवणातल्या मुख्य पदार्थांकडे आधी जास्त लक्ष दिले जाते. कुकरमध्ये वरणभात शिजत असतांना किंवा मध्येच थोडी सवड काढून इतर पदार्थ झटपट तयार केले जातात. यातल्या कुठल्याही पदार्थाची पाककृती देणे हा या लेखाचा उद्देश नाही. कोणत्या कृतीचा कशासाठी उपयोग होऊ शकेल याचे काही उल्लेख अनुषंगाने येतील.

प्रयोग किंवा उत्पादन सुरू करायच्या आधी त्यासाठी आणलेले साहित्य तपासून घेणे आवश्यक असते आणि त्यासाठी त्या साहित्याचे गुणधर्म माहीत असायला हवेत. जगातला प्रत्येक पदार्थ हा घनरूप किंवा द्रवरूप किंवा वायुरूप असतो एवढे सर्वांनाच माहीत असते. खाद्यपदार्थांपैकी दूध आणि नारळातले पाणी एवढेच नैसर्गिक रीत्या द्रवरूप असतात, अंड्यातला बलक हा बराच दाट द्रव असतो. इतर सारे खाद्य पदार्थ दिसायला घनरूप दिसतात, पण त्यात कमीजास्त प्रमाणात पाण्याचा अंश असतो. शेंगदाणे, खोबरे, सोयाबीन, काजू, बदाम यासारख्या तेलबियांमध्ये द्रवरूप तेल भरलेले असते. बहुतेक भाज्या आणि फळे यात तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात ओलावा असतो म्हणजे त्यांच्या कणाकणांमध्ये रसाच्या रूपात पाणी असते. त्यांचेमधील बहुतेक जीवनसत्वे (व्हिटॅमिन्स) आणि क्षार (मिनरल्स) पाण्यात किंवा तेलात विरघळणारे असतात.

या द्रवरूप पदार्थांचा एक गुणधर्म असा आहे की त्यांचे सतत बाष्पीभवन होत असते. त्यातले पाणी हळूहळू हवेत उडून जात असते. भाज्या आणि फळे ठेवल्या जागी सुकून जातात. उन्हाळ्यात ते वेगाने घडते. रेफ्रीजरेटरमध्येसुद्धा ते थोड्या कमी प्रमाणात पण घडतच असते. या क्रियेमध्ये त्यांच्यामधली काही सत्वे नष्ट होत असतात.

पाण्याचा दुसरा एक गुणधर्म असा आहे की ते जसे आपल्यासाठी जीवन आहे तसेच ते कीटक, जीवाणू (बॅक्टेरिया), विषाणू (व्हायरस) वगैरेंसाठीसुद्धा आहे. त्यांची वाढ ओलसर पदार्थांमध्ये झपाट्याने होते. यामुळे ओलसर किंवा दमट वस्तूंना बुरशी लागते, त्यांच्यावर माशा, चिलटे वगैरे घोंघावतात, ते पदार्थ  सडतात, कुजतात, त्यांच्यात अळ्या होतात वगैरे अनेक प्रकारे ते लगेच खराब व्हायला लागतात. रेफ्रीजरेटरमध्ये सुद्धा या क्रियाही कमी प्रमाणात पण होत असतात.

आपल्या शरीराला जसे कातडीचे संरक्षक कवच लाभलेले असते, तसे ते अनेक वनस्पतीजन्य पदार्थांवरही सालीच्या रूपात असते. ते काही प्रमाणात किड्यांना व सूक्ष्म जंतूंना आत शिरू देत नाही. ऊष्णतेमुळे हे कवच आधी सुकते आणि आतल्या रसांचे संरक्षण करते. पण भाज्या किंवा फळे सोलून किंवा चिरून जास्त वेळ ठेवली तर त्यांच्यातले रस आणि त्यातली काही जीवनसत्वे व खनिजे पाण्यासोबत हवेत उडून जातात. त्याच्या कुजण्याची क्रियासुद्धा अधिक वेगाने घडायला लागते. याखेरीज हवेमधील प्राणवायूच्या संपर्कात आल्यावर काही भाज्या व फळे यांचे ऑक्सिडेशन सुरू होते. चिरून ठेवलेल्या फोडींचे रंग बदलतांना दिसतात ते याचमुळे. हे सुद्धा आपल्या आरोग्याला हितकारक नसते.

तर स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी त्यासाठी आणलेला सर्व माल ताजा आहे की नाही हे दृष्टी, स्पर्श आणि गंध यांनी तपासायला हवे म्हणजे नजर फिरवून, हातात घेऊन आणि वास घेऊन पहायला हवा. शंका वाटल्यास चाखून पहायला हवा आणि तो किती प्रमाणात सुकला, किडला किंवा नासला आहे हे पाहून निदान तेवढा भाग काढून टाकला पाहिजे. कुजायला सुरुवात झाली असल्यास ते पूर्ण फळ किंवा शेंगच टाकून देणे बरे असते.  सुकणे, कुजणे आणि कीड लागणे या नैसर्गिक क्रिया काही प्रमाणात ती फळे किंवा भाज्या अजून शेतात असतांनाच सुरू होत असतात आणि तिथून बाजारात आल्यानंतरही चालत असतात. आपल्याला त्या संपूर्णपणे टाळता येतच नाहीत. बाजारामधून आणलेल्या मालामधून आपल्या उपयोगासाठी आपणच चांगला निर्दोष माल वेचायचा असतो.  निवडणे हा स्वयंपाकातला पहिला महत्वाचा टप्पा असतो. त्यात गफलत झाली तर ती नंतर सुधारता येत नाही.

 . . . . . . . . .. . .  . .. . . .


भाग ३ ... पूर्वतयारी


स्वयंपाकासाठी घेतलेला प्रत्येक अन्नपदार्थ निर्जंतुक असणे खाणाऱ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते. यासाठी सर्वात आधी त्या पदार्थांना पाण्याने धुवून घेणे हा साधा नेहमीचा उपाय आहे, पण त्यामागील विज्ञान समजून घ्यायला हवे. बहुतेक भाजीपाला शेतांमधून सरळ बाजारात येतो. त्यांना शेतातल्या ओल्या मातीचे कण चिकटलेले असतात. त्या कणांमध्ये रोगजंतू असण्याची शक्यता असते. जमीनीमधून उपटून आणलेल्या पालेभाज्या तर चिखलाने माखलेल्या असतात. याशिवाय शेतात घातलेली सेंद्रिय किंवा रासायनिक खते, रासायनिक जंतुनाशके वगैरेंचे सूक्ष्म कणही भाज्यांना लागलेले असतात ते मानवांना अपायकारक असतात. पाण्याने धुण्याच्या क्रियेत या सर्वाना भाज्यांपासून संपूर्णपणे दूर केले जाईल हे पहायला पाहिजे. यासाठी पुरेसा वेळ आणि पाणी खर्च करणे आवश्यक आहे. यात बचत करण्यासाठी बहुतेक पालेभाज्या धुवायच्या आधीच निवडून घेतल्या जातात. पण आधी सांगितल्याप्रमाणे बहुतेक भाज्या आणि फळे यांच्या कणाकणांमध्ये असलेली बहुतेक जीवनसत्वे (व्हिटॅमिन्स) आणि क्षार (मिनरल्स) पाण्यात विरघळणारे असतात. पुन्हा पुन्हा धुण्याच्या नादात आपल्याला उपयुक्त व आवश्यक अशी नैसर्गिक तत्वे नष्ट होणार नाहीत याची काळजीही घ्यायला हवी. हे मोजण्याचे कोणतेही साधन आपल्या घरी असत नाही. आपला अंदाज आणि अनुभव यावरूनच ते ठरवावयचे असते.

फळांच्या सालींमध्ये मुख्यतः असणारे सेल्युलोज अन्नपचनानंतर पोट साफ होण्यासाठी गुणकारक असते. यामुळे फळांना सालांसकट खाणे शक्य असल्यास त्यांच्या सालींना काढून टाकू नये. पण काही फळे किंवा फळभाज्यांच्या साली इतक्या कठीण किंवा चोथट असतात की आपण त्यांना चावून खाऊ शकतच नाही, अशा साली शिजवल्यानंतरही मऊ होत नसतील तर मात्र त्यांना काढून टाकणे आवश्यक असते. या साली जरी काढूनच टाकायच्या असल्या तरीसुद्धा आधी ती फळे सालांसकट धुणे आरोग्याच्या दृष्टीने इष्ट असते. कारण त्या फळांमधली जीवनसत्वे (व्हिटॅमिन्स) आणि क्षार (मिनरल्स) त्यांच्या रसांमध्ये सामावलेली असतात. संरक्षक सालीमुळे ती बाहेर पडत नाहीत. पण साली काढून भाज्या किंवा फळांना धुतल्यास ते उपयुक्त द्राव पाण्याबरोबर वाहून जाऊ शकतात. कुठल्याही भाज्यांना आधी बारीक चिरून नंतर धुतल्याने तर आपण त्यातली बहुतेक सगळीच सत्वे गमावून बसतो.

पिठे. कणिक, रवा, मैदा, बेसन यासारखे दळलेले पदार्थ पाण्याने धुता येणे शक्यच नसते. गहू, ज्वारी, चणे वगैरे मुळातल्या धान्यांची त्यांना दळण्याच्या आधीच आवश्यक तेवढी सफाई केली गेली असावी असे गृहीत धरावे लागते.   पण ही पिठे जराशी जुनी झाली असल्यास त्यात थोडी जाळी धरली असल्याची शक्यता असते. तशी शंका आल्यास त्यांना एकदा चाळून घ्यावे लागते. पिठांपासून तयार केले जाणारे बहुतेक तगळेच पदार्थ भाजले, शिजवले किंवा तळले जात असल्यामुळे या क्रियांमध्ये त्यांचे निर्जंतुकीकरण होतेच. पूर्वीच्या काळात घरातल्या साठवणीच्या धान्यांना अधूनमधून ऊन दाखवणे, मोठी छिद्रे असलेल्या पत्र्याच्या चाळणीतून चाळणे, सुपाने पाखडणे, निवडून त्यातले खडे बाजूला काढणे वगैरे कामे सवडीने घरीच करावी लागत असत. पण आजकाल निवडलेले धान्य आणि दळलेली पिठे दुकानात मिळायची सोय झाली आहे.

डाळ, तांदूळ, कडधान्ये वगैरेंना मात्र शिजायला ठेवायच्या आधी निदान दोन तीन वेळा पाण्यात धुवून काढायला हवे. या धान्यांमध्ये माती मिसळलेली असण्याची शक्यता कमी असली, तरी त्यांना किंचित कीड लागलेली असू शकते किंवा कीड लागू नये यासाठी त्यात बोरिक पॉवडरसारखे जंतुनाशक मिसळून ठेवलेले असू शकते, ते आपल्या पोटात गेल्यास अपायकारक ठरते. शिजवण्यासाठी घेतलेले धान्य थोड्याशा पाण्यात टाकून खळबळून घेतल्यास आपल्याला त्या पाण्यात गढूळपणा दिसला तर तो जाईपर्यंत ते धान्य धुवून घेणे बरे असते.  या धान्यांमध्ये एकाद दुसरा किडलेला  दाणा असला तर तो पाण्यावर तरंगतो आणि धुतांना टाकून दिला जातो. पण जास्त प्रमाणात कीड लागलेले धान्य खाणे इष्ट नसते कारण आपल्या डोळ्यांना दिसणारे किडे धान्यामधून काढून टाकले तरी त्यांची अंडी, अळ्या आणि त्या किड्यांनी उत्सर्जन केलेली घाण ते मागे ठेऊन जातात.

"चणे खावे लोखंडाचे, तेंव्हा ब्रह्म पदी नाचे." अशी एक म्हण आहे. लोखंडाचे सोडाच, नैसर्गिक चणे खाणेसुद्धा बहुतेक लोकांसाठी खूप अवघड किंवा अशक्य असते. त्याचे कठीण दाणे चावून चिरडण्याइतकी शक्तीच आजकाल माणसांच्या तोंडाच्या स्नायूंमध्ये नसते. पण तेच हरभरे काही तास पाण्यात भिजवून ठेवल्यावर टम्म फुगतात आणि बरेच मऊ आणि खाण्यायोग्य होतात. मूग, मटकी, चवळी यासारखी आणखी काही कडधान्ये आपण पाण्यात भिजवून फुगल्यावर खाऊ शकतो. ही भिजवलेली कडधान्ये कापडात बांधून ठेवली तर दिवसभरात अंकुरित होतात, म्हणजे मोडाच्या स्वरूपात त्यांना अंकुर फुटतात. संपूर्ण नवीन वनस्पतींना जन्म देण्याचे सामर्थ्य या बारीकशा मोडांमध्ये असल्यामुळे ते जीवनसत्वांनी भरलेले असतात आणि आरोग्यासाठी पोषक असतात.

गहू, तांदूळ, ज्वारी यासारखी तृणधान्ये पाण्यात भिजवूनसुद्धा आपण खाऊ शकत नाही आणि कशीबशी खाल्लीच तर ती पचणे कठीण असते. यामुळे या धान्यापासून तयार करायच्या खाद्यपदार्थांना भाजणे, शिजवणे, तळणे अशा अग्निदिव्यामधून जावेच लागते. काही प्रकारची ज्वारी आणि मके यांचे दाणे तीव्र आंचेवर भाजल्यावर फुटून त्यांचे रूपांतर लाह्यांमध्ये होते. चणे भाजल्यावर त्याचे फुटाणे बनतात. हे पदार्थ चविष्टही असतात आणि त्याना चावून खाणे सोपे असते. शेतातल्या हुरडा पार्टीमध्ये आपण ही सगळीच धान्ये कोवळी असतांना खाऊ शकतो, पण ते स्वयंपाकघरातले विज्ञान या सदरात येणार नाही.

तर स्वयंपाकाच्या पूर्वतयारीमध्ये खालील गोष्टी केल्या जातात.
भाजीपाला निवडणे आणि स्वच्छ धुणे,
डाळ, तांदूळ, भिजवून ठेवलेली कडधान्ये स्वच्छ धुणे
गव्हाचे किंवा ज्वारीचे पीठ, रवा, मैदा, बेसन वगैरे (गरज असल्यास) चाळून घेणे.

 . . . .  . . . . . .  . . . . . . . . . . . (क्रमशः)


  

Saturday, March 26, 2016

गुड फ्रायडे कधी साजरा करतात ?



भारतातल्या पंचांगांमधील कालगणना चंद्राच्या पृथ्वीभोवती होत असलेल्या भ्रमणानुसार केली जाते. अमावास्येला चंद्र उगवतच नाही यामुळे रात्री पूर्ण काळोख असतो.  अशा अमावास्येनंतर येणा-या शुक्ल प्रतीपदेला यातला प्रत्येक महिना सुरू होतो आणि पुढल्या अमावास्येला संपतो. एका वर्षामध्ये असे बारा महिने असतात. अशा प्रकारच्या चांद्र कालगणनेतल्या वर्षाचा कालावधी ३५४ दिवसांचा असतो. इंग्रजी कॅलेंडरचे सौर वर्ष  पृथ्वीच्या सूर्याला घातलेल्या प्रदक्षिणेनुसार होत असल्यामुळे त्याचा कालावधी सुमारे ३६५ दिवस एवढा असतो. दर तीन वर्षांमध्ये एकदा अधिक महिना धरून हा फरक भरून काढला जातो. पण पंचांग आणि कॅलेंडर यांच्या वर्षांमधल्या फरकामुळे तिथीनुसार येणारी आपली दिवाळी किंवा होळी यासारखे सण दर वर्षी निरनिराळ्या इंग्रजी तारखांना येतात .

ख्रिसमस हा पाश्चिमात्यांचा सण दरवर्षी नेमाने २५ डिसेंबरलाच येणार हे ठरलेले असते, पण त्यांचा गुड फ्रायडे मात्र दरवर्षी निराळ्या तारखेला का येतो याचे मला गूढ वाटत आले होते. फ्रायडे म्हंटल्यावर तो शुक्रवारीच येणे आवश्यक आहे एवढेच कारण घेतले तर दर वर्षी तो फक्त एका दिवसांनी मागे जायला हवा कारण बावन आठवड्यांनतर येणारा शुक्रवार ३६४ दिवसांनंतर म्हणजे वर्ष पूर्ण व्हायच्या एक दिवस आधी येईल, पण यंदाचा गुड फ्रायडे २४ मार्चला आला तर मागल्या वर्षी तो ३ एप्रिलला आला होता. हा एवढा मोठा फरक कशामुळे पडला असेल ते पहायला हवे.

याबद्दल तपास करतांना असे समजले की गुड फ्रायडे हा ईस्टर संडेच्या दोन दिवस आधी साजरा केला जातो आणि हा ईस्टरचा रविवार कधी येतो ? त्याचे एक जरासे गुंतागुंतीचे गणित आहे. वर्षामधले सगळे दिवस आणि रात्री सारख्या वेळांच्या नसतात. उन्हाळ्यात दिवस मोठा असतो तर हिवाळ्यामध्ये रात्रीचा अंधार जास्त वेळ असतो. मात्र दरवर्षामधून दोनदा दिवस आणि रात्री बरोबर बारा बारा तासांचे असतात. त्या दिवशी सूर्य बरोबर पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. याला equinox किंवा संपात म्हणतात. वसंत ऋतूमध्ये (मार्च महिन्यात) येणारा हा दिवस वसंतसंपात म्हणून ओळखला जातो आणि सप्टेंबर महिन्यात येणारा शरदसंपात असतो. यातल्या वसंतसंपातानंतर जी पौर्णिमा येते त्यानंतर येणारा पहिला रविवार हा ईस्टर संडे म्हणून मानला जावा असे  कित्येक शतकांपूर्वीच्या ख्रिश्चन धर्मगुरूंनी सर्वानुमते ठरवले म्हणे. त्या धर्मातही प्रोटेस्टंट आणि कॅथॉलिक हे मुख्य गट आणि त्यांचे अनेक उपगट आहेत, तसेच ज्यूलियन आणि ग्रेगोरियन अशी दोन कॅलेंडरे आहेत. यातून काही पाठभेद आहेत. पण बहुतेक लोक मान्य करतील त्यानुसार जे काही ठरत असेल त्या दिवशी आपल्याकडे गुड फ्रायडे साजरा केला जातो आणि सार्वजनिक सुटी दिली जाते.

दोन हजार वर्षांपूर्वी या शुक्रवारी येशू ख्रिस्ताला हाल हाल करून क्रूसावर चढवून खिळ्यांनी ठाणबंद करण्यात आले आणि मरणाची वाट पहात तसेच सोडून देण्यात आले. अशा प्रकारच्या क्रौर्याची आठवण तरी कशाला ठेवायची आणि तो दिवस सण म्हणून साजरा तरी का करायचा ?   पण असे जगभरात सगळीकडे केले जाते.  आपल्याकडेही थोर संतांच्या पुण्यतिथी साज-या केल्या जातातच. काही लोक त्या दिवशी त्या संतांच्या आठवणीने सद्गदित होत असतीलही पण एकंदरीत त्या दिवसातल्या समारंभांचे स्वरूप उत्सवासारखेच दिसते.  काही लोकांच्या मते गुड फ्रायडे हा God's Friday चा अपभ्रंश आहे  आणि काही लोक या दिवसाला   Black Fryday असेही म्हणतात. जीझस (येशू) ख्राइस्टने सगळ्या जगाच्या कल्याणासाठी स्वतःचे बलिदान केले, तो ईश्वराचा मुलगा असल्यामुळे तिस-या दिवशी म्हणजे रविवारी प्रत्यक्ष ईश्वराने त्याला  पुनरुज्जीवित केले (Resurrection)  आणि आपल्यासोबत निजधामाला नेले असे सांगितले जाते. त्यामुळे ईस्टर संडे हा तर आनंद साजरा करण्याचा दिवस झालाच.

येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस दरवर्षी ठराविक तारखेलाच साजरा केला जातो, पण हा ईस्टरचा सण तसा का केला जात नाही यालाही काही कारणे असतीलही, पण परंपरा हेच त्यातले मुख्य असावे. दोन हजार वर्षांपूर्वीच्या काळात छापील पंचांग किंवा कॅलेंडर अस्तित्वात असण्याचा प्रश्नच नव्हता. पण सात दिवसांचा आठवडा मात्र पाळला जात होता. ऋतूचक्रानुसार येणारा वसंत ऋतू, त्यातली पौर्णिमेची रात्र आणि त्यानंतर आलेला रविवार या ठळकपणे जाणवणा-या खुणांच्या आधाराने त्या दिवसाची आठवण लोकांना होत राहिली आणि त्यांनी ती परंपरागत उत्सवामधून जपून ठेवली.  

-----------------------------------------------------------------------------------------
मागच्या वर्षातला गुड फ्रायडेचा दिवस आम्हा दोघांच्याही आयुष्यातला अत्यंत क्लेशकारी दिवस होता. निव्वळ परमेश्वराची कृपा होती म्हणूनच आम्ही त्यातून वाचलो आणि आजचा दिवस पाहू शकलो. त्या दिवसाच्या आठवणी मी या स्थळावर नोंदून ठेवल्या आहेत.

देव तारी ....... मला
http://anandghan.blogspot.in/2015/05/blog-post.html

गुड फ्रायडे की very bad Friday?
http://anandghan.blogspot.in/2015/07/very-bad-friday.html
-----------------------------------------------------------

Tuesday, February 23, 2016

सोड, घे, टाक आणि दे

हा लेख मी मराठी दैनिकाच्या दि.३ एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.
 मी मराठीचे धन्यवाद. 
http://epaper.mimarathilive.com/epapermain.aspx?pgno=16&eddate=2016-4-03&edcode=820009
----------------------------------------------------------------------------------------------

सोड, घे, टाक आणि दे या चार क्रियापदांचा उपयोग आपण आपल्या दररोजच्या जीवनात  वारंवार करत असतो. आपण काही तरी सोडून दुसरे काहीतरी घेत असतो, कुणाला तरी काही तरी देऊन टाकतो किंवा काही तरी टाकून देत असतो. पण यातली क्रिया प्रत्यक्षात घडत नसतांना किंवा तसा कोणाचा उद्देश किंवा अपेक्षा नसतांना देखील त्या क्रियापदाचा नेहमी उपयोग होत असतो तो कशासाठी असेल ?

मराठी, हिंदी, कन्नड अशा बहुतेक सगळ्या भारतीय भाषांची वाक्यरचना कर्ता, कर्म, क्रियापद या क्रमाने होते.  त्यातला कर्ता किंवा कर्म यांच्याविषयी अधिक माहिती विशेषणांमधून दिली जाते आणि क्रियेबद्दल माहिती देण्यासाठी क्रियाविशेषणांचा उपयोग केला जातो. पण कदाचित तेवढ्याने भागत नसावे म्हणून काही वेळा एकाच वाक्यात दोन दोन क्रियापदांचा उपयोग कसा केला जातो हे वर दिलेल्या दुस-या वाक्याच्या  उदाहरणावरून (देऊन टाकतो, टाकून देतो) दिसतेच आहे. खंडाळ्याच्या घाटातून आगगाडीला वर चढवण्यासाठी दुसरे इंजिन लावतात त्याप्रमाणे या दुस-या क्रियापदाने पहिल्याला कदाचित जास्त जोर येत असावा. मी याबद्दलच या लेखात थोडेसे लिहिणार आहे.

माझे बालपण उत्तर कर्नाटकात गेले. त्या राज्याच्या वेगवेगळ्या विभागांमध्येसुद्धा कानडी भाषेच्या निरनिराळ्या बोली बोलल्या जातात. आमच्या भागात एकादी गोष्ट  "दे" किंवा  "घे" असे सांगतांना "क्वोट्ट बिडू" किंवा "तगोंड बिडू" असे म्हंटले जात असे. आमच्या बोलण्यातल्या मराठी भाषेवर याचा प्रभाव पडल्यामुळे आम्ही देखील "देऊन सोड", घेऊन सोड" असे बोलत असू. इतकेच नव्हे तर त्याला "बघ" हे तिसरे क्रियापद जोडून "देऊन सोड बघं, घेऊन सोड बघं." असेही सांगितले जात असे. ही बोली ऐकण्यासाठी जुन्या मराठी नाटक सिनेमांमधली बेळगावकडली पात्रे आठवावीत.

मी कॉलेजच्या शिक्षणासाठी पुण्यामुंबईकडे आलो तेंव्हा मी सुद्धा असेच बोलत असे . "देऊन सोड बघं, घेऊन सोड बघं." असे काही मी कोणाला सांगितले तर ते ऐकून माझे मित्र मला हसत असत. "मी तर हे दिलं (किंवा घेतलं,) आता मी काय सोडू आणि काय बघू?" असे ते मला खोचकपणे विचारायचे. त्यामुळे मी माझ्या बोलण्यातल्या दुस-या "सोड"ला सोडचिठ्ठी दिली आणि "बघ" ला वा-यावर सोडून दिले. आता "बघ" ला वा-यावर सोडल्यानंतर मी कोणाला आणखी काय दिले असेल ? खरे तर काहीच नाही, पण "सोडून दिले" असे म्हणण्याची पुण्यामुंबईच्या भाषेतली नवी संवय मला लागली. इकडच्या बोलीमध्ये जसे "सोडून दे" म्हणतात तसेच "देऊन टाक", "घेऊन टाक" असे ही सांगतात. आता एकादी गोष्ट दिल्यानंतर काय टाकायचे आणि ती टाकायचीच असेल तर घ्यायची तरी कशाला ? इथे "टाक" या क्रियापदाला तो अर्थच नसतो. ते फक्त अधिक जोर देणारे दुसरे इंजिन असते.

माझी पत्नी मध्यप्रदेशातली पण मराठी भाषिक आहे. तिच्या माहेरच्या लोकांच्या कानावर सारखी हिंदी भाषा पडत असल्यामुळे त्या भाषेचे संस्कार त्यांच्या मराठी बोलीवर होणारच. हिंदी भाषिक लोक  देण्याघेण्यासाठी "दे दो, ले लो" असे म्हणतात तर करण्यासाठी "कर लो आणि कर दो" हे दोन्ही पाठभेद प्रचलित आहेत. त्यांच्या अर्थांमध्ये सूक्ष्म भेद ही आहेत. त्यामुळे माझी पत्नी आणि तिच्या नातेवाइकांच्या बोलण्यात "घेऊन घे, देऊन दे, करून घे. करून दे" असे वाक्यप्रयोग येत असतात आणि त्यांना ते शुद्धच वाटतात.

आम्ही ज्या घरात जवळजवळ अर्धे आयुष्य घालवले तिथे आमचे एक शेजारी इंदूरचे भटनागर होते, ते तर शुद्ध हिंदीभाषिक होतेच आणि दुसरे नागपूरचे देशपांडे होते. त्यांच्या बोलण्यावरही हिंदी भाषेचा प्रभाव होता, शिवाय "करून राहिलो, देऊन राहिलो" वगैरे विदर्भीय थाट होता.  त्याची सरमिसळ आमच्या बोलण्यात होत गेली. खरे तर ती कुठेच गेली नाही, आमच्या बोलण्यात एकरूप होऊन ती तिथेच राहिली.

आता मला एकादा बेळगाव धारवाडकडचा माणूस भेटला तर मी ही त्याला "अरे, हे काम करून सोड बघं." असे सांगतो. पुणेकराला "देऊन टाक" सांगितले तर तो ते ऐकेल की नाही कोण जाणे, त्यापेक्षा त्याला "घेऊन टाक" म्हंटलेले बरे. इंदूरकडच्याला "देऊन देतोस का?" म्हंटले तर तो ही लगेच "घेऊन घे ना." असे म्हणेल आणि नागपूरकर तर "देऊन राहिलोय् ना बे." असे बोलेल. यातल्या शेवटच्या क्रियापदाचा शब्दशः अर्थ घेणे अभिप्रेत नसतेच मुळी !

Saturday, January 30, 2016

स्मृती ठेवुनी जाती - भाग १४ - फडके डॉक्टर आणि माई फडके (उत्तरार्ध)

आमच्या गावातल्या फडके गल्लीच्या कोप-यावरच्या अखेरच्या घरात माई फडके रहात असत. त्यांच्या घराचा दरवाजा मात्र त्या गल्लीत न उघडता मामलेदार कचेरीला जाणा-या हमरस्त्यावर उघडत होता. त्यांच्या घरापुढे मोकळे अंगण नव्हते. ते घरच रस्त्यापेक्षा थोडे उंचावर होते. चार पाच पाय-या चढून वर गेल्यावर येणारा त्याचा दरवाजा एका तीन खणी खोलीमध्ये उघडायचा. आमच्या माई बहुतेक वेळा त्या खोलीत बसलेल्या दिसायच्या किंवा आतल्या बाजूला गेलेल्या असल्या तरी त्यांना भेटायला बाहेरचे कोणीआले तर माई त्या खोलीत येऊन त्या लोकांना भेटायच्या.  मी तरी माईंना बाजारात, रस्त्यात, अगदी देवळात किंवा इतर कुणाच्या घरी सुद्धा कधीच पाहिल्याचे मला आठवत नाही. "आज मला अमक्या ठिकाणी माई भेटल्या होत्या." असे कोणाच्या बोलण्यातही येत नसे. यामुळे माई फडके आणि त्यांच्या घरातली ती पहिली खोली यांचे माझ्या मनात एक समीकरण होऊन बसले होते.

त्यांच्या घरात आतल्या बाजूला आणखी किती खोल्या असतील ते मला कधीच समजले नाही. घरामागच्या परसात त्यांनी अनेक औषधी वनस्पती लावलेल्या असाव्यात असे मात्र मला वाटायचे. मला त्यांच्या घरात आणखी काही स्त्रीपुरुष कधी कधी दिसायचे किंवा रहात असल्याचे जाणवत असे. पण त्यांचे माईंशी नेमके काय नाते होते ते काही मला समजले नाही. लहान मुलांनी फार चोंबडेपणा करायचा नसतो अशी शिकवण असल्यामुळे मी ही कधी त्यांची चौकशी केली नाही.

विधवांच्या केशवपनाची रानटी प्रथा माझ्या जन्माच्या बरीच वर्षे आधीच इतिहासजमा झालेली होती. माझ्याहून दोन किंवा तीन पिढ्यांपूर्वीच्या दोन तीन  सोवळ्या म्हाता-या बायका आमच्या  गावात एकाकी जीवन जगत होत्या. त्यांचे वृध्दापकाळामुळे वाकलेले आणि खंगलेले शरीर, सुरकुतलेला चेहेरा, त्यांच्या मनात भरलेला कडवटपणा आणि बोलण्यातला तिखटपणा यामुळे लहान मुले त्यांच्या जवळ जायलाही घाबरत असत. या सगळ्याला माई मात्र अपवाद होत्या. सोवळ्या बायकांनी नेसायच्या लाल आलवणातही त्या ग्रेसफुल दिसायच्या. त्यांच्या डोळ्यात प्रेमळपणा ओतप्रोत भरलेला असायचा. त्यांच्या चेहे-यावर कमालीचा सोज्ज्वळपणा, बोलण्यात मार्दव आणि हाताच्या स्पर्शात माया होती. त्यांनी आय़ुष्यात जे काही सोसले असेल त्याची पुसटशी जाणीवही त्याच्या वागण्यात उतरली नव्हती.  त्यांच्या अस्तित्वातच एक प्रकारचे मांगल्य आणि प्रसन्न भाव भरल्यासारखे वाटायचे. मी  एरवी खूप बुजरा असलो तरी माईंकडे जायला केंव्हाही आनंदाने तयार असे.

माईंचे बालपण कुठल्या गावात गेले होते कोण जाणे. त्या काळात त्यांच्या गावात प्राथमिक शाळा तरी होती की नाही ? त्या शाळेमध्ये मुलींना प्रवेश देत असतील कां ? या प्रश्नांची उत्तरे बहुधा नकारार्थीच असावीत. पण माई लहानपणी शाळेत गेल्या असल्या किंवा नसल्या तरी त्या अडाणी नव्हत्या. त्यांची तल्लख बुद्धी, आकलनशक्ती आणि  स्मरणशक्ती यांचा प्रत्यय  त्यांच्या बोलण्यामधून येत असेच. त्यांचे वैद्यकशास्त्राबाबतीतचे  ज्ञान दांडगे होते. त्यांच्या जादूई बटव्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या व्याधीवर रामबाण घरगुती औषध असायचे.

 हे अलंकारिक बोलणे झाले.  प्रत्यक्षात अॅलोपाथी, होमिओपाथी, आयुर्वेद, युनानी असल्या कुठल्याही पद्धतीचे स्टॅडर्ड किंवा ब्रँडेड औषध त्या सहसा देत नसत किंवा त्यांनी सांगितलेली औषधे कुठल्याही औषधांच्या दुकानांमध्ये तयार मिळत नसत. आजारी माणसाला कोणते औषध कशा प्रकारे तयार करून द्यायचे हे माई फक्त समजाऊन सांगत असत. तुळस, बेल, दुर्वा, गवती चहा, कोरफड, अडुळसा यासारख्या वनस्पतींची पाने, आणखी कुठली फुले किंवा फळे, निरनिराळे भाजीपाले, वडाच्या किंवा पिंपळाच्या पारंब्या, आणखी कुठल्याशा झाडांची साल अशा नैसर्गिक गोष्टींचा उपयोग करायला त्या सांगत. ती सगळी झाडे आमच्या घराच्या किंवा शाळेच्या परिसरात होती आणि औषधी उपयोगासाठी त्यांची औषधापुरती तोड केली तर कोणी काही म्हणत नसत.
माईंची बरीचशी औषधे सुंठ, ओवा, ज्येष्ठमध, जायफळ, वेलदोडे, लवंग, जिरे, मिरे, दालचिनी वगैरे स्वयंपाकघरातल्या पदार्थांपासून तयार करायची असत. त्यात शहाजिरे, नाकेशर, पिंपळी वगैरे काही मसाल्याचे स्पेशल पदार्थ असत त्यांची नावेही मला आता आठवत नाहीत. सैंधव, पादेलोण, नवसागर यासारखी काही खनिजे असत. हे सगळे पदार्थ गावातल्या प्रमुख वाण्याच्या दुकानंमध्ये उपलब्ध असायच्या.

त्या काळात वन्यपशुसंरक्षणाचे कायदे झालेले नव्हते. सांबराचे शिंग, हस्तीदंत, वाघाचे कातडे, अस्वलाचे केस, कस्तुरीची गांठ असल्या दुर्मिळ वस्तूंचे लहानसे नमूने पिढ्यान् पिढ्या घरात ठेवलेले असत. त्यामागे काही शुभ अशुभाच्या समजुती असाव्यात. पण काही विशिष्ट कारणांसाठी त्यांचा उपयोग करायलाही माई कधीकधी सांगत असत.

माझी आई माईंची भक्त होती. ती दर महिना दीड महिन्यंमध्ये निदान एकदा तरी माईंना भेटून तिला स्वतःला आणि मुलांना झालेल्या किंवा पुन्हा पुन्हा होत असलेल्या बारीक सारीक दुखण्यांवर काही घरगुती इलाज विचारून येत असे. कोणच्या वेळी कशाचा काढा प्यायचा, कोणचे चूर्ण चाटवायचे, कुठला लेप लावायचा वगैरेची जी माहिती माझ्या आईला होती त्यातली बरीचशी तिला बहुधा माईंकडूनच मिळाली असावी. त्या उपायांवर माईंशी चर्चा करून ते औषधी पदार्थ तयार करण्याची कृती ती फाइन ट्यून करून घेत असे. माईंच्या मार्गदर्शनाखाली माझ्या आईने दिलेल्या औषधांमुळे आमची बरीचशी लहान दुखणी किंवा धडपडून झालेल्या छोट्या जखमा ठीक होऊन गेल्या होत्या.

कोणतीही औषधे तयार करतांना त्यासाठी  काय काय भाजायचे किंवा शिजवायचे, कुटायचे, वाटायचे किंवा दळायचे आणि कोणत्या क्रमाने व कोणत्या प्रमाणात त्यांना मिसळायचे याची सविस्तर कृती माई त्यांच्या स्मरणामधून तोंडी सांगत असत आणि माझी आई ते लक्षात ठेऊन त्याप्रमाणे आचरणात आणीत असे.  त्या दोघींना कदाचित कागदावर शाईने लिहिणे फारसे आवडत नसेल, पण या औषधोपचारांचे सगळे ज्ञान लिहून ठेवायची बुद्धी त्यावेळी आम्हा कोणालाही झाली नाही आणि त्या व्यक्तींच्या बरोबर ते ज्ञानही नाहीसे होऊन गेले.   मुंबईला रहात असतांना त्या औषधांसाठी लागणारी द्रव्ये मिळणे अशक्यच होते, यामुळे कदाचित त्याचा प्रत्यक्षात फारसा उपयोग झालाही नसता, पण ती माहिती म्हणून जपून ठेवली गेली असती आणि कदाचित कधी तरी कोणाला तरी त्यावर संशोधन करायला देता आली असती.

माझी आई माझ्या लहानपणीची एक आठवण आवर्जून सर्वांना सांगत असे. मी तान्हे बाळ असतांना चांगले बाळसे धरले होते. उठून बसणे, उभे राहणे, चालणे, बोलणे वगैरें बाबतीत माझी व्यवस्थित प्रगति होत होती. पण मी दीड दोन वर्षांचा झालो असतांना काय निमित्त झाले कोण जाणे, एकाएकी माझ्या पायांमधली शक्ती कमी व्हायला लागली. मी उभासुद्धा राहू शकत नव्हतो, दिवसरात्र लोळत पडून रहात होतो अशी परिस्थिती आली. हा पोलिओचा प्रकोप नव्हता, पण हे कशामुळे झाले होते ते ही समजत नव्हते. त्यावर फडके डॉक्टरांचा सल्ला घेतला गेला असणारच, पण त्यानी काय निदान आणि उपचार सांगितले होते ते माझ्या आईने मला कधीच सांगितले नाही. मला गुण येत नाही हे पाहून तिने मला उचलले आणि माईंच्या समोर नेऊन ठेवले. त्यांनी माझ्या आईला विचारले,  "मी सांगीन ते औषध तुम्ही त्याला द्याल?"  माझ्या आईने लगेच होकार दिला.

त्यावर माईंनी त्यांच्या गड्याला हाक मारली. तो एरवी त्यांच्या मळ्यावर काम करत असे, काही कारणाने तो कधी कधी घरी येत असे तसा त्या दिवशी आला होता. माईंनी त्याला बोलावून सांगितले,  "अरे आपल्या मळ्यातल्या अमक्या झाडाच्या बुंध्याशी तुला एका प्रकारचे किडे दिसतील. "
 " हो माई, मी पाहिले आहेत."
 "तिथे कंबरेइतका खोल खड्डा खणलास की  त्या किड्यांच्या खूप अळ्या दिसतील, त्यातल्या थोड्या पकडून या वहिनींना आणून देत जा."
संध्याकाळपर्यंत त्या अळ्या आमच्या घरी पोचल्या होत्या. माझी आई शुद्ध शाकाहारीच नाही तर पूर्णपणे अहिंसक होती. डास, ढेकूण, झुरळे यांना सुद्धा ती मारत नसे, पळवून लावायचा किंवा प्रतिबंधक प्रयत्न करायची. पण तीच माझी आई त्या अळ्यांना वाटून त्यात साखर मिसळून त्याची गोळी करून मला खाऊ घालत असे. या उपचाराने खरोखरच माझ्या अंगात चैतन्य येऊ लागले आणि मी उठून उभा रहायला आणि चालायला लागलो.   "मूकम् करोति वाचालम् पंगुम् लंघयते गिरीम्" हा श्लोक म्हणत असतांना मला माईंची आठवण हटकून येते.

माईंच्या निदानाच्या किमयेची आणखी एक गोष्ट माझी आई नेहमी सांगत असे. त्या काळात ती माझ्या मोठ्या भावाकडे रहात होती. असेच एकदा अचानक त्याच्या लहान मुलीचे केस पुंजक्या पुंजक्याने गळून पडायला लागले. स्थानिक डॉक्टर, त्वचारोग तज्ज्ञ वगैरेंनी दिलेल्या मलमांनी व तेलांनी काही फरक पडत नव्हता. तेंव्हा माझी आई सरळ आमच्या गावी जाऊन माईंच्या घरी जाऊन पोचली आणि माईंनी यावर आणखी एक अजब उपचार सांगितला. हस्तीदंताच्या लहानशा तुकड्याला शेगडीच्या प्रखर आंचेवर भाजून किंवा जाळून, त्याची पूड करून ती विशिष्ट प्रकारच्या तेलात मिसळून त्वचेला लावायची असे काही तरी त्या औषधाचे स्वरूप होते.  या औषधाने त्या मुलीच्या डोक्यावरील टक्कल पडलेल्या भागावर भराभरा केस यायला लागले आणि लवकरच ते चांगले घनदाट आणि लांबसडक झाले.

माई त्या काळातल्या रूढीनुसार सोवळ्या बाईचे अत्यंत साधेपणाचे जीवन जगत होत्या.त्यांनी आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा व्यवसाय केला नाही. त्या कोणाकडूनही फी घेत नसत, औषधेही विकत देत नसत. त्या फक्त जवळच्या ओळखीच्या व्यक्तींनाच, त्यातही स्त्रियांनाच तपासून आपला सल्ला देत असत.  त्यांच्याकडे रोग्यांच्या रांगा लागत नसत. ते करत असलेल्या या समाजकार्याच्या मुळाशी  फक्त परोपकारबुद्धीच असायची. मी नोकरीसाठी मुंबईला स्थायिक झाल्यानंतर माझा गावाशी संपर्क राहिला नाही. दीर्घायुषी झाल्यानंतरही कधी तरी माईंचे पिकले पान गळून पडले, पण त्याची बातमी मला लगेच लागली नाही. कालांतराने जेंव्हा समजले त्या वेळी एक पुण्यवान व्रतस्थ व्यक्तिमत्व अंतर्धान पावले असा विचार मनात आला.

Wednesday, January 20, 2016

स्मृती ठेवुनी जाती - भाग १४ फडके डॉक्टर आणि माई फडके (पूर्वार्ध)

माझ्या लहानपणी म्हणजे पन्नास साठ वर्षांपूर्वीच्या काळातली परिस्थिती खूप वेगळी होती. त्या काळात आमच्या कुटुंबाची गणना 'खाऊन पिऊन सुखी' या वर्गामध्ये होत होती. आमचे फॅमिली डॉक्टर फडकेकाका अगदी घरच्यासारखे होते. तरीही घरातले कोणीसुद्धा ऊठसूट आमच्या डॉक्टरांकडे जात नसत. घरातल्या कोणाला सर्दीखोकला, ताप, अपचन, पोटदुखी यासारखे लहान सहान विकार झाले तर सुंठ, लवंग, दालचिनी, ओवा, मिरे, बडीशोप असले स्वयंपाकघरातले पदार्थ आणि कुंड्यांमध्ये लावलेली तुळस, गवती चहा, कोरफड वगैरे वनस्पतींची पाने यांच्यापासून माझी आई एकादे चाटण किंवा काढा करून देत असे.  त्रिभुवनकीर्ती, सूतशेखराची मात्रा, अमृतांजन, सीतोपलादि चूर्ण, च्यवनप्राश, त्रिफळा चूर्ण यासारखी काही आयुर्वेदिक औषधे, व्हिक्स, अॅस्प्रो, सारिडॉन, टिंक्चर आयोडिन वगैरेसारखी काही कॉमन इंग्रजी औषधे आणि मध, एरंडेल तेल, जुने तूप अशासारख्या गोष्टी आमच्या घरातल्या औषधांच्या कपाटात ठेवलेल्या असत. गरज वाटली तर त्यातले काही तरी दिले जात असे. बहुतेक वेळा या उपचाराने आजारी माणसाला लगेच गुणही येत असे.

दोन तीन दिवस उपचार करूनही दुखणे वाढतांना दिसले किंवा एकाएकी खूप त्रास सुरू झाला तर मग फडके डॉक्टरांना बोलावले जाई. त्या काळात टेलीफोन नव्हते आणि आमच्या घरापासून डॉक्टरांचा दवाखाना किंवा घर फक्त पाच दहा मिनिटांच्या अंतरावर असल्यामुळे जाण्यायेण्यात जास्त वेळ जात नसे. कोणी तरी फडके डॉक्टरांच्या दवाखान्यात किंवा घरी जाऊन त्यांना बोलावून आणत असे. ते देखील लगबगीने आमच्याकडे येऊन जात. घरातला माझ्यासारखा एकदा मुलगा दरवाजात थांबून डॉक्टर येण्याची वाट पहात असे. आमच्या घराकडे येणा-या बोळाच्या टोकाला डॉक्टरसाहेबांची मूर्ती दिसली की लगेच "डॉक्टर आले" अशी आरोळी ठोकून तो धावत पुढे जाऊन त्यांच्या हातातली बॅग घेऊन त्यांना सन्मानाने घरी आणत असे. दरवाजामधून आत शिरल्यानंतर अंगणातच पाण्याने भरलेली एक बादली, तांब्या, अंगाला लावायचा साबण आणि हात पुसण्यासाठी टॉवेल हे तयार ठेवलेले असायचे. एकजण डॉक्टरांच्या हातावर पाणी घालत असे आणि हात धुवून होताच त्यांना हात पुसायला टॉवेल देत असे.  

घरात शिरल्यानंतर हातपाय धूत असतांनाच डॉक्टरांकडून आजारी व्यक्तीची चवकशी सुरू होत असे. ते आमच्या घरातल्या प्रत्येकाला नावाने ओळखत होते. आजारी माणसाकडे गेल्या गेल्या "काय रे" किंवा "कायगं, बघू तुला काय झालंय्", "आ कर, जीभ बाहेर काढ" "जरा दीर्घ श्वास घे", तो धरून ठेव" असे म्हणत तपासणी करता करता धीरही देत. पोट दाबून आणि कपाळ चेपून पहात, थर्मॉमीटरने ताप मोजणे आणि स्टेथोस्कोपने छातीतली धडधड पाहून नाडीही तपासत. गरज असल्यास एक इंजेक्शन टोचत. "तुला काही फारसं झालेलं नाही, दोन दिवसात उड्या मारत माझ्याकडे येऊन बरं वाटत असल्याचं सांगशील बघ." असे आजारी माणसाला सांगून बाहेर येत. त्यांचे पुन्हा एकदा साबण लावून हात धुवून आणि पुसून होईपर्यंत त्यांच्यासाठी चहाचा कप तयार झालेला असे. आमच्या त्या घरात सोफासेट नव्हता, एक प्रशस्त असा झोपाळा होता. त्यावर बसून हलके झोके घेत चहाचे घोट घेता घेता फडके डॉक्टर घरातल्या सर्वांची चौकशी करत, शिक्षण किंवा नोकरीसाठी परगावी गेलेली मुले आणि सासरी गेलेल्या मुलींचे क्षेमकल्याण विचारत आणि सगळा अपडेट करून घेत. ते म्हणजे अगदी आमच्या घरचेच झालेले होते.  

आमचे फडके डॉक्टर गोरे पान, मध्यम बांध्याचे, किंचित स्थूल म्हणावे असे होते. त्यांचा तेजःपुंज हंसरा चेहरा आणि एकंदरीतच उमदे व्यक्तीमत्व पाहूनच रुग्णाला एक प्रकारची ऊर्जा मिळत असावी. या डॉक्टरांनी आपल्याला पाहिले आहे म्हणजे आता आपण बरे होणारच अशी त्यांना  खात्री वाटत असे. त्यांच्या दवाखान्यात येत असलेल्या रुग्णांची संख्या पाहता त्यांची प्रॅक्टिस चांगली चालत होती. यामुळे ते आमच्या गावातले एक नंबरचे डॉक्टर असणार असे मला वाटायचे. आमच्या घरी येऊन आजारी व्यक्तीला पाहून गेल्यानंतर त्यांनी कधी व्हिजिट फी मागितली किंवा त्यांनी न विचारता त्यांना कोणी आणून दिली असे मी कधी पाहिल्याचे मला आठवत नाही. कदाचित सगळ्या उपचारांचा एकत्र हिशोब केला जात असेल, पण त्याने आमच्या महिन्याच्या बजेटला कधीच भार पडला नाही इतपतच तो असायचा.

डॉक्टरांनी घरी येऊन किंवा दवाखान्यात आलेल्या रोग्याला पाहिल्यानंतर ते त्यांच्या कंपांउंडरला बोलावून त्याला औषधांबद्दल सांगायचे. त्या काळात आतासारख्या औषधी गोळ्यांच्या स्ट्रिप्स नसायच्या. कंपांउंडरच्या कपाटात ठेवलेल्या अनेक बाटल्यांमध्ये निरनिराळ्या गोळ्या किंवा पॉवडरी भरून ठेवलेल्या असत. ते त्यातल्या काही गोळ्या आणि पॉवडरी मोजून काढून त्यांना खलबत्त्यात घालून कुटायचे. त्यांच्या कपाटातल्या आणखी काही कपाटांमधल्या बाटल्या किंवा शिशांमध्ये निरनिराळ्या रंगाचे द्रवपदार्थ भरलेले असायचे. कंपांउंडर काका  त्यातले काही द्रव पदार्थ मोजून एका बाउलमध्ये घालायचे. त्यात गोळ्यांची झालेली पूड आणि थोडे पाणी मिसळून ते सगळे मिश्रण एका चपट्या उभ्या बाटलीत भरायचे आणि त्यात आणखी थोडे पाणी मिसळून तो द्राव ते एका विशिष्ट पातळीपर्यंत भरायचे. त्या काळात औषधांसाठी अशा खास बाटल्या मिळत असत. एका कागदाच्या पट्टीवर कात्रीने खाचे पाडून ती पट्टी त्या बाटलीवर चिकटवायचे.  त्या खाचांवरून एका वेळी किती डोस घ्यायचा हे समजत असे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आजारी माणसाला दिवसातून दोन तीन वेळा ते डोस दिले की झाले, इतके सोपे काम असायचे.  डॉक्टर घरी येऊन गेल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ कोणी तरी दवाखान्यात जाऊन कंपांउंडरकडून औषध घेऊन येत असे. त्यानंतर दररोज किंवा एक दिवसाआड दवाखान्यात जाऊन पुन्ही ती बाटली भरून आणायची असे.

त्या काळातले कंपांउंडर खरोखरच औषधांचे कंपांउंडिंग करत असत. आता ते काम राहिले नसल्यामुळे त्याच्या ऐवजी फार्मासिस्ट्स असतात. डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर काय लिहिले आहे हे वाचून  त्याप्रमाणे ते लोक त्यांच्या दुकानांमधल्या कपाटातल्या औषधांच्या स्ट्रिप्स आणि बॉटल्स काढून देतात. पूर्वीच्या काळातल्या डॉक्टरांची फी त्यांच्या कंपांउंडरांनी मुद्दाम तयार करून  दिलेल्या औषधांसकट फक्त एक दोन रुपये एवढीच असायची, आता डॉक्टर आणि फार्मासिस्ट या दोघांनाही शंभराच्या किंवा पाचशेच्या अनेक नोटा काढून द्याव्या लागतात. ही औषधोपचाराची व्यवस्था आता इतकी महाग झाली आहे. भारतातल्या कायद्यांप्रमाणे औषधांच्या प्रत्येक दुकानात एक तरी फार्मसिस्ट असणे आवश्यक असले तरी त्यांचे असणे किंवा नसणे आपल्याला सहसा जाणवत नाही, पण अमेरिकेत मात्र आता फार्मसिस्ट हा अत्यंत महत्वाचा घटक झाला आहे.

गावाच्या एका टोकाला असलेल्या मामलेदार कचेरीच्या समोरच फडके गल्ली होती. त्यात ओळीने रहात असलेल्या इतर फडके मंडळींच्या घरांमध्ये डॉक्टरांचे सुबक घर बाहेरूनच उठून देत असे. दरवाजातून आत जाताच असलेल्या अंगणात अगदी सपाट अशी फरशी बसवलेली होती, त्यात उजव्या हाताला माडीवर जाण्यासाठी जिना होता. त्या काळात घरांचा 'बीएचके' प्रकार कोणी ऐकलादेखील नव्हता. पारंपरिक पद्धतीनुसार अंगणातून आत गेल्यावर हातभर उंचावर केलेली पडवी किंवा ओसरी, त्याच्या आत माजघऱ, स्वैपाकघर आणि इतर खोल्या होत्या. माडीवर गेल्यावर प्रशस्त दिवाणखाना आणि इतर खोल्या होत्या. पण त्यातल्या ओसरीच्या पुढे आतल्या भागात जाण्याची संधी मला कधीच मिळाली नाही. एक दोन वेळा मी डॉक्टरांना भेटण्यासाठी जरासा भीतभीतच माडीवरच्या त्यांच्या  दिवाणखान्यात गेलो असेन. तिथली सजावटसुद्धा मला थक्क करणारीच होती. डॉक्टरसाहेबांची मेडिकल प्रॅक्टिस उत्तम चालली असली तरी त्या लहान गावात त्यातून अशी कितीशी प्राप्ती होत असेल? मला वाटते की बहुधा ते पिढीजातच श्रीमंत असावेत. त्यांच्या घरातल्या सफाईदार जमीनी आणि भिंती, त्यावरचे देखणे रंग, तिथे मांडलेले उच्च दर्जाचे फर्निचर हे सगळे मला जरा वेगळेच दिसायचे.

फडके डॉक्टरांच्या एका मुलीला सांगली की बुधगांवच्या राजघराण्यात त्या काळातल्या पटवर्धन सरकारांच्याकडे दिली होती याचे सगळ्या गावालाच कौतुक वाटत असे. त्यांचा एक मुलगा त्या काळात शाळेत शिकत होता, पण माझी त्याच्याशी ही कधी गट्टी होऊ शकली नाही.  डॉक्टरीणबाई तशा स्वभावाने चांगल्या होत्या, पण त्यांचे शहरी पद्धतीचे चांगले वागणेच आम्हा गांवढळांना कृत्रिम वाटत असावे. माझ्या आईचीही त्यांच्याशी विशेष जवळीक जुळली नव्हती.  त्यांच्यातले बोलणेही बहुधा कामापुरतेच होत असावे.  आमचे फडके डॉक्टर आम्हाला घरच्यासारखे वाटत असले तरी त्यांची ही आपुलकी एकतर्फी किंवा त्यांच्यापुरतीच राहिली. मी कधीच त्यांच्या कुटुंबाचा भाग झालो नाही.

सगळे सुरळित चाललेले असतांना अचानक एक दिवस फडके डॉक्टरांच्या निधनाची दुःखद बातमी आली तेंव्हा त्याचा सगळ्यांनाच मोठा धक्का बसला.


. . . .  . . . . . . . . . . .. . .  .. (क्रमशः)

Friday, December 18, 2015

मित्र, यार, दोस्त आणि फ्रेन्ड्स

दोन भागात लिहिलेला लेख एकत्र केला दि. ०९-०४-२०२१
- - - - - - - - - -

श्रीकृष्ण आणि सुदामा ही बालमित्रांची जोडी प्रसिद्ध आहे. जिवलग मित्रांच्या जोडगोळीना नेहमी त्यांची उपमा दिली जाते. सगळ्या पौराणिक चित्रांमध्ये अगदी छोट्या बाळकृष्णाला देखील छान इवलासा पितांबर नेसवला जात असला तरी सुदामा, पेंद्या आदि त्याच्या सवंगड्यांना बहुधा लंगोटीच नेसवलेली दिसते. कदाचित यावरूनच 'लंगोटीयार' हा शब्द प्रचारात आला असावा. पुढच्या पिढीतल्या मुलांना लंगोटी हे वस्त्र पहायलाही मिळणार नाही. तेंव्हा वयाने कदाचित याच्याही मागे जाऊन 'डायपर फ्रेंड्स' असा नवा शब्दप्रयोग रूढ होईल.

मी शाळेत शिकायला जाण्याच्या आधीपासूनचे माझेही काही लंगोटीयार होतेच. आम्ही साधारणपणे एकाच काळात अर्धी चड्डी घालायला लागलो होतो आणि शालेय शिक्षण संपेपर्यंत बहुधा हाफ पँटच घालतही होतो. पुढे मी कॉलेजशिक्षणासाठी आमचे गांव सोडून पुण्यामुंबईकडे गेलो तसे माझे बालमित्रही चहू दिशांना पांगले गेले.  मी आधी दोन वर्षे मुंबईला सायन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन इंटरमीडिएटची परीक्षा पास केल्यानंतर पुण्याला इंजिनियरिंगला गेलो. यामुळे दोन वर्षांमध्ये मुंबईला मिळालेले मित्रही नंतर पारखे झाले आणि पुण्याला गेल्यानंतर तिथे नवीन मित्र जोडले. त्यानंतर पुन्हा आमची फाटाफूट होऊन मी नोकरीसाठी  मुंबईला आलो. कॉलेजमधले इतर मित्र कुठे कुठे गेले ते ही लगेच समजले नाही. या सगळ्या घटना  १९६० च्या दशकात घडल्या.

त्या काळात सेलफोन, इंटरनेट, ई मेल, फेसबुक, ट्विटर, वॉट्सअॅप यातले काहीच नव्हते. ट्रिंग ट्रिंग करणारा साधा टेलीफोनसुद्धा माझ्या बापुड्याच्या आवाक्याबाहेर होता. पोस्टाने पत्र पाठवणे हा कोणाशीही संपर्क साधण्याचा एकमेव मार्ग असायचा आणि त्यासाठी आधी कोणाचाही नवा पत्ता तरी कळायला हवा. शिवाय मी नव्या जागी गेल्यावर तिथले वेगळे वातावरण समजून घेऊन त्यात कसेबसे रुळण्याकडेच माझे सगळे लक्ष वेधलेले असायचे आणि त्या कामात रोजच विविध प्रकारच्या अडचणीही येत असत. त्यांना सामोरे जाऊन सोडवण्यातच माझा बहुतेक सगळा वेळ आणि शक्ती खर्च होत असे. माझ्या इतर मित्रांचीही गत यापेक्षा वेगळी असायचे कारण नव्हते. या सगळ्या कारणांमुळे माझे बालमित्र तसेच कॉलेजमधलेही बहुतेक मित्र यांच्याशी नंतर फारसा संपर्क राहिला नाही आणि ते हळूहळू दुरावत विस्मरणात चालले गेले. नंतरच्या काळात कधीतरी अचानकपणे एकाद्या जुन्या काळातल्या मित्राची कुठे तरी गाठ पडली की जुन्या आठवणी ताज्या होत, एकमेकांचे पत्ते घेतले जात पण प्रत्यक्ष पत्र लिहायला बसण्यापूर्वी ते चिठोरे हरवून जात असे. अशा प्रकारे तो मैत्रीचा दुवा सांभाळून ठेवणे कठीणच होत असे.

मैत्रीचे बंध एकदा का जुळले की ते कायमसाठी अगदी मजबूत असतात असे सांगितले जाते. यावर सिनेमा नाटकांमध्ये अनेक संवाद आणि गाणी असतात आणि ती तुफान लोकप्रियही होतात. पण निदान मला तरी याबाबतीत जरा वेगळे अनुभव आले. "यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी।" असे म्हणत खरोखरच कुणावर जीव ओवाळून टाकणारा मित्र माझ्या नशीबात नव्हता किंवा माझ्या पाहण्यातही कधीच आला नाही आणि आपल्या मनात दुस-या कुणाबद्दल स्वतःपेक्षाही जास्त प्रेमभावना बाळगावी असे मलाही कधी वाटले नाही. जीवनातले कुठलेही नाते, विशेषतः मैत्रीचे नाते टिकवून ठेवण्यासाठी सतत संपर्कात राहणे आवश्यक असते असा माझा अनुभव आहे.

मी नोकरीला लागल्यानंतर मला मिळालेले मित्र मात्र अनेक वर्षे माझ्या संपर्कात राहिले. त्यातले काही जण माझे कार्यालयातले सहकारी होते, काही जणांशी कामानिमित्य भेटणे व बोलणे होत असे तर काही जण आमच्या इमारतीत किंवा आसपास रहात होते. त्यातल्या ज्या लोकांशी माझे पटत होते किंवा आमच्या वेव्हलेंग्थ्स साधारणपणे जुळायच्या त्यांची गणना मित्रांमध्ये होत गेली. त्या लोकांशी माझ्या कामाव्यतिरिक्त काही अवांतर गप्पा गोष्टी होऊ लागल्या. त्यातले ही काही जण बदली होऊन किंवा नोकरी सोडून परगावी गेले, त्यांच्या जागी काही नवीन लोक आले असे होत गेले तरी नोकरीत असेपर्यंत माझा एकंदर मित्र परिवार ब-यापैकी वाढला होता. "समानशीलव्यसनेषु सख्यम्" असे म्हणतात, त्यातले समानशील सखे मला भेटले, पण मला स्वतःलाच कोणतेही व्यसन न लागल्यामुळे मित्र मिळवण्याचा दुसरा मार्ग मात्र मला उपलब्ध नव्हता.

कालांतराने मीच सेवानिवृत्त होऊन नव्या जागी रहायला गेल्यानंतर मात्र माझा मित्रपरिवार झपाट्याने कमी होत गेला कारण आता पूर्वीच्या मित्रांच्या भेटीगाठी होणे दुर्मिळ झाले आणि टेलीफोनवरचे संभाषणही हळूहळू कमी कमीच होत गेले. एक वय उलटून गेल्यानंतर नवे मित्र जोडायची इच्छा व उमेद कमी होत गेल्याने नव्या मित्रांची संख्या वाढणेही कठीणच होते.

.  . . . . . . . . . . . .

मित्र, यार, दोस्त आणि फ्रेन्ड्स (उत्तरार्ध)

पूर्वीच्या काळात  काही लोक पेन फ्रेन्ड्शिप किंवा पत्रमैत्री करायचे. ते लोक आपल्या मनातले विचार, सुखदुःखे, कल्पना, आपली तत्वे, आपले बरे वाईट अनुभव वगैरे नाजुक गोष्टी स्वतःच्या जवळच्या लोकांशी बोलून व्यक्त करण्याऐवजी किंवा त्याशिवाय सवडीने कागदावर लिहून काढत आणि दूर देशी असणाऱ्या मित्रांना किंवा मैत्रिणींना पत्राद्वारे पाठवून देत असत. तिकडूनसुद्धा त्या पत्राला असाच उत्साही प्रतिसाद मिळाला तर मग ती मैत्री दृढ होऊन वाढत जात असे. कधी कधी हे पत्रमित्र प्रत्यक्षात भेटलेलेही नसत किंबहुना ते त्यांना शक्यही होत नसावे, पण त्यांच्या संदेशांची देवाणघेवाण मात्र पत्रांद्वारे दीर्घकाळ चालत असे. अशा प्रकारच्या मैत्रीविषयी मी फक्त पुस्तकांमध्येच वाचलेले आहे, मला कधीच त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला नाही किंवा इतर कोणाचा पहायलादेखील मिळाला नाही.

माझे वडील रिटायर व्हायच्या पंधरा वीस वर्षांपूर्वी कधी तरी एका बदलीच्या गावी गेलेले असतांना त्या खेड्यात रहात असलेल्या एका गृहस्थांच्या संपर्कात आले होते असे मी ऐकले होते. माझ्या आठवणीत तरी त्या दोघांची कधीच गांठभेट झाली नव्हती, मी त्या गृहस्थांना कधीच पाहिलेले नाही किंवा ते खेडेही पाहिले नाही. पण माझे वडील रिटायर होऊन गेल्यानंतरसुद्धा काही वर्षे या जुन्या स्नेह्याची पत्रे नियमितपणे येत असत. त्यांचेकडून आलेली पत्रे माझ्या वडिलांना वाचून दाखवायचे काम मात्र माझ्याकडे यायचे. त्यांच्या पोस्टकार्डामध्ये फक्त तिकडची खुषाली कळवलेली असायची आणि इकडची चौकशी केलेली असायची. त्या पत्रलेखनाला फारसे वाङ्मयीन किंवा साहित्यिक मूल्य नसेलही, पण त्यामधून व्यक्त होत असलेली त्या दोघांमधली खूप जवळीक मात्र मलासुद्धा चांगली जाणवत असे. या मित्राबद्दलचे माझे कुतूहल वाढतच गेले आणि अखेरपर्यंत ते एक गूढ राहिले.

माझ्याकडे घरी असलेल्या पत्याच्या वहीतले बहुतेक सगळे पत्ते आमच्या नातेवाईकांचेच असायचे. टेलिफोन नसतांनाच्या काळात त्यांच्याशी पत्रव्यवहार होत असे. त्या वहीतली फारच कमी नांवे माझ्या मित्रांची असायची. तीसुद्धा जर मला कधी काळी त्यांच्या गावी किंवा घरी जायचे असले तर तेंव्हा उपयोगी पडावी म्हणून लिहून ठेवलेली होती. त्यातल्या कुणालाही मी पत्रे लिहून पोस्टाने पाठवली नाहीतच, त्यांच्याकडूनही कधी आली नाहीत. एकंदरीतच मी टपालखात्याला फारसे कष्ट दिले नाहीत.

अलीकडच्या काळात इंटरनेटचा प्रसार झाल्यानंतर मात्र हे चित्र पार पालटले. माझ्या ईमेल्सवरील काँटॅक्ट्सची संख्या वाढतच गेली आणि त्यात मात्र काही नातेवाईकही असले तरी त्यातली बहुतांश नावे मात्र माझ्या मित्रांचीच असायची. मी काही याहू किंवा गुगल ग्रुप जॉइन केल्यावर तर मला एकदम अनेक मित्र मिळाले. मनोगत, मिसळपाव, उपक्रम, ऐसी अक्षरे यासारख्या संकेतस्थळांवर माझे नाव नोंदवले होते. तिथे काही लिहिल्यास त्यावर लगेच अनेक शेरे किंवा प्रतिक्रिया येत, मी ब्लॉग लिहायला सुरू केल्यावर त्यावरही अनेक प्रतिसाद यायला लागले. या सर्वांमधून मला काही नवे मित्र मिळाले.  फेसबुक, ट्विटर आणि वॉट्सअॅप ही तर खास सोशल नेटवर्कची साईट्स आहेत. माझे आधीपासून असलेले बरेचसे मित्र यात येत गेलेच, शिवाय कित्येक अनोळखी मित्रांची अनाहूत आमंत्रणे या नेटवर्क साईट्समधून येत असतात. मीच संपूर्ण खात्री पटल्याखेरीज कोणाला मित्र करून घेत नाही. तरी सुद्धा माझ्या या जालमित्रांची संख्या आता काही शेकड्यांमध्ये गेली आहे. तीन चार दशकांपूर्वी दूरावलेले, म्हणजे अक्षरशः हजारो किलोमीटर दूर अंतरावर गेलेले माझे काही जुने मित्र मला पुन्हा कधी भेटतील अशी मला आशाच वाटत नव्हती, पण या नव्या माध्यमांमधून मला ते पुन्हा एकदा सापडले आणि माझ्या संपर्कात आले, तेंव्हा माझ्या आनंदाला पारावार उरला नाही.

मी प्रत्यक्षात कोणाच मित्राला हाताने पत्र लिहून पाठवले नसले तरी या आभासी जगातल्या मित्रांमध्ये मात्र रोजच भरपूर पत्रव्यवहार होत असतात. एकाच वेळी एका क्लिकमधून एकच संदेश अनेकांना पाठवता येतो, त्याला अवांतर मजकूर, चित्रे किंवा ध्वनि सहजपणे जोडता येतात आणि ते सगळे क्षणार्धात अनेक ठिकाणी जाऊन पोचतात, लगेच त्याची उत्तरे येऊ शकतात आणि आपण ते आणखी कोणाला पाठवू शकतो वगैरे त्याचे अचाट फायदे आहेत. आता तर हे सगळे हाताच्या मुठीत धरता येईल इतक्या लहानशा यंत्रामधून आणि आपण जिथे असू तिथूनच करता येणे शक्य झाले आहे. आपल्या आयुष्यात असे काही आपल्याला अनुभवायला मिळेल अशी मी कल्पनासुद्धा केली नव्हती. अर्थातच यामुळे मित्र या शब्दालाच नवा अर्थ, नवे परिमाण लाभले आहे.

या आभासी जगातल्या मित्रांमध्येसुद्धा विविध प्रकार असतात. त्यातले बरेचजण आधीपासूनच आपले खरे खुरे मित्र असतात पण दूर रहात असतात. त्यांच्याशी केंव्हाही लगेच संपर्क साधणे  आता नव्या माध्यमांमधून सहज शक्य झाले आहे. आपल्याला गरज पडली की ते लगेच धावून येऊ शकतात, तसेच आपणही वेळेवर त्यांच्या मदतीसाठी काही करू शकतो. याविरुद्ध काही जालमित्र  आपल्याला फक्त इंटरनेटवरच भेटतात. त्या वेळी ते लोक खूप जवळिकेने आपले मनोगत व्यक्त करतात, सल्ले देतात, विचार मांडतात, चर्चा करतात, वादही घालतात. दूर राहूनच त्यांच्याशी केलेल्या या संवादामधून आपल्या सामान्यज्ञानाच्या कक्षा विस्तारतात, आपल्याला उपयुक्त माहिती मिळतेच, वैचारिक समाधान मिळते, आपली बौद्धिक भूक प्रज्ज्वलित होते किंवा भागते, भावनात्मक आनंद मिळतो. विशेषतः निवृत्त आयुष्यात उपलब्ध झालेला माझा बराचसा रिकामा वेळ या मित्रांशी संवाद साधण्यात चांगला जातो किंवा सत्कारणी लागतो.

ब्लॉग्ज किंवा संकेतस्थळांवर भेटणारे काही मित्र तर या आभासी जगतात टोपणनावाने वावरत असतात. त्यांनी पांघरलेल्या बुरख्यामागील व्यक्ती पुरुष आहे की स्त्री, ती तरुण आहे की वृद्ध, ती कोणत्या सामाजिक किंवा शैक्षणिक स्तरातली आहे यातले काहीच आधी कळत नाही, पण तरीही त्यांच्या लेखनामधून ते मित्रत्वाने वागत असतात. अशा लोकांशी तात्विक चर्चा करणे किंवा वितंडवाद घालणे सोपे असते आणि त्यात मजाही येते, कारण तो अनामिक मित्र दुखावला जाण्याची काळजी करायची गरज नसते.  त्यांचा समावेश मित्रांमध्ये करता येईलच का नाही अशी शंका येते, पण या लोकांचीही संमेलने भरतात, त्याला हजेरी लावली की आपल्याला बुरख्यामागले चेहेरे पहायला मिळतात.  त्यातून काही लोकांशी खरी मैत्री जमते.

मैत्री, दोस्ती, यारी, फ्रेन्ड्शिप यांच्या असंख्य छटा असतात, त्यातल्या काही दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न या भागात केला आहे.  
   

Friday, October 09, 2015

शस्त्रक्रियेनंतर

या लेखाचे दोन भाग एकत्र केले दि. ०९-०४-२०२१
- - - - - - - - - - -

दि. ३ एप्रिलला गुड फ्रायडेच्या दिवशी झालेल्या एका अपघातात माझ्या दोन्ही हातांची हाडे मोडली होती. दि. ७ एप्रिल रोजी वाशी येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेच्या पूर्वतयारीचा सविस्तर वृत्तांत मी या ब्लॉगवर पूर्वीच दोन भागांमध्ये दिला होता. आता पुढील अनुभवांच्या आठवणी या भागात देत आहे.

मी ऑपरेशन थिएटरच्या शेजारच्या दालनात पोचलो असतांनाच मला एक इंजेक्शन दिले गेले आणि एकापासून आकडे मोजायला सांगितले. मला असे वाटते की दहाचा आकडा मोजायच्या आधीच मला गुंगी आली आणि माझी शुद्ध हरपली. पुढील काही तासपर्यंत मी बेशुद्धावस्थेतच होतो. या दरम्यान मला ऑपरेशन टेबलावर ठेवून माझ्या डाव्या हाताचे मनगट आणि उजव्या हाताचा खांदा यांचेवर वीत वीतभर लांब छेद करण्यात आले. आतल्या मोडलेल्या हाडांना एकेका पट्टीच्या आधारे सांधण्यात आले. या हाडांना ड्रिलने भोके पाडली आणि न गंजणा-या विशिष्ट मिश्रधातूच्या या पट्ट्यामधून तशाच धातूचे स्क्रू पिळून त्यांच्या सहाय्याने त्या पट्ट्यांना हाडांशी घट्ट जोडून ठेवले गेले. त्यानंतर कातडीला स्टेपल करून ती जखम बंद केली गेली आणि त्यावर बँडेजेस बांधली गेली. मी पूर्णपणे बेशुद्ध असल्याने मला यातले काहीच समजले नाही. त्यामुळे नंतर कधीही त्यातले काही आठवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ही माहिती मलाही नंतर समजत गेली.

मी शुद्धीवर येत असतांना माझ्या आजूबाजूला काही माणसे वावरत असल्याची हलकीशी चाहूल मला लागल्याने मी डोळे किलकिले करून पाहिले तर माझ्या डोळ्यांसमोर एक पांढरी शुभ्र भिंत आहे असे त्यावेळी मला वाटले. बहुधा आपल्याला एकाद्या कॉरीडॉरमध्ये आणून ठेवले असावे, पण असे भिंतीकडे तोंड करून का बसवले आहे असा प्रश्नही माझ्या मनाला पडला. त्याआधीच मला एक उलटी झाली होती आणि माझ्या पोटातला थोडा द्रव बाहेर पडून तो माझ्या कपड्यांवर सांडला होता. मी सकाळी प्यालेल्या फ्रूट ज्यूसचा वास त्यांना येत होता. हेही माझ्या लक्षात आले. मला मिळालेल्या चुकीच्या सल्ल्यानुसार मी केलेले फलरसप्राशन मला थोडेसे भोंवले होते.

काही वेळाने माझ्या अगदी जवळ पावलांचा आवाज आला तेंव्हा मी डोळे उघडून पाहिले तर माझे आप्त परितोष माझ्याजवळ आले होते. "काका, कसं वाटतंय् ?" त्यांनी विचारले.  खरे तर अॅनेस्थेशियाचा असर कमी होत असतांना माझ्या सर्वांगाला प्रचंड वेदना होत होत्या, माझे दोन्ही हात खूपच ठणकत होते आणि नॉश्यामुळे पोटातून नुसते ढवळून निघत होते, पण मी मानेनेच मला ठीक वाटत असल्याची खूण केली. "तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय् ना? तुम्हाला मी दिसतोय् ना?"  परितोषने विचारले. "हो, पण तुम्ही असे आडवे कां दिसत आहात?" मी क्षीण आवाजात विचारले. परितोषना काहीच बोध झाला नाही. ते मला टा टा करीत निघून गेले. दोन मिनिटांनी शिल्पा आली. मला तीसुद्धा आडवीच दिसत होती. मी तिलाही तोच प्रश्न विचारला. "काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल." असे आश्वासन देऊन तीही परत गेली. त्या वेळी माझ्या जवळच्या फक्त दोन माणसांना तिथे येऊन फक्त मला पाहून जाण्यापुरती परवानगी मिळाली होती. त्यामुळे इतर कोणीही माझ्या जवळ येऊ शकले नाही.

माझ्या जिवाला मात्र आता एक नवाच घोर लागला होता. माझ्या दोन्ही हातांचे ऑपरेशन झाले होते हे मला ठाऊक होते, पण माझ्या डोळ्यांना हे काय होऊन बसले आहे ते समजत नव्हते. जादूगर जसे त्यांच्या चेल्याला अलगदपणे हवेत उचलल्यासारखे दाखवतात त्याप्रमाणे मला परितोष आणि शिल्पा हे दोघेही अधांतरी आडवे तरंगत असल्याचा भास झाला होता. पण त्यांना तर तसे करणे शक्यच नव्हते एवढे त्या वेळीही माझ्या बुद्धीला कळायला लागले होते. त्यामुळे मला जे काही दिसले तो नक्कीच दृष्टीभ्रम असणार. यापुढे जर मला सगळे जग असे ९० अंशांनी फिरल्यासारखे दिसणार असेल तर त्यात माझे वावरणेच कठीण होणार होते. मला काही सुचेनासे झाले. मी डोळे मिटून मनातल्या मनात गणपतीअथर्वशीर्ष म्हणायला सुरुवात केली.

त्या स्तोत्राची दोन तीन पारायणे झाल्यानंतर मी हलकेच डोळे उघडले. अजूनही मला माझी मान वळवता येत नव्हतीच. बुबुळांच्या हालचाली करून जरा इकडे तिकडे पाहिले. खालच्या बाजूला पहाताच मी झोपून राहिलो असल्याचा मला एक प्रकारचा साक्षात्कार झाला. मला भूल देण्यापूर्वी मी व्हीलचेअरवर बसलो होतो त्या वेळी पाहिलेली दृष्ये माझ्या मनःपटलावरली ताजी दृष्ये होती आणि आता पहात असलेल्या दृष्यांचा त्याच संदर्भात विचार करून माझी बुद्धी तसा अर्थ काढीत होती. त्यामुळे माझ्या डोळ्यासमोर असलेल्या आडव्या छताला मी उभी भिंत समजत होतो आणि उभी असलेली माणसे मला आडवी दिसत होती. याचा उलगडा झाल्यानंतर मी पुन्हा पुन्हा सर्व बाजूंनी जेवढे दिसत होते तेवढे पहायचा प्रयत्न करत राहिलो. अॅनेस्थेशियाचा अंमल उतरत असल्यामुळे आता माझे डोकेही जरा जास्त काम करायला लागले आणि माझी नजर आपोआप पूर्ववत झाली. मी समाधानाचा एक सुस्कारा टाकला.

...........................

शस्त्रक्रियेनंतर (उत्तरार्ध)

(या लेखाचा पूर्वार्ध लिहून झाल्यानंतर माझ्यापुढे अनेक वैयक्तिक आणि तांत्रिक अडचणी आल्यामुळे उत्तरार्ध लिहायला उसंतच मिळाली नाही. आता आज त्याला मुहूर्त मिळाला. मध्यंतरीच्या काळात बरेचसे विस्मरणही झाले आहे. यामुळे आता ज्या गोष्टी ठळकपणे आठवतात त्या लिहून काढणार आहे.)

त्या पांढ-या शुभ्र आढ्याकडे पहात मी सुन्नपणे पडून राहिलो होतो, त्यामुळे मला वेळेचे भानच राहिलेले नव्हते. अंगातला ठणका वाढत चालला होता. असा बराच वेळ गेल्यानंतर पुन्हा शिल्पा माझ्याजवळ आली. या वेळी तिच्यासोबत आलेली एक नर्स हातात चहाचा कप घेऊन उभी होती.
शिल्पा म्हणाली, "सकाळपासून तुमच्या पोटात काही नाही, कपभर चहा घ्या म्हणजे थोडी तरतरी वाटेल."
खरे तर मला काहीही खाण्यापिण्याची मुळीसुद्धा इच्छा नव्हती. पोटातले वादळ अजून धिंगाणा घालत होतेच. तरीही शिल्पाच्या आग्रहाखातर मी घोटभर चहाचे एक दोन घोट कसेबसे घशाखाली ढकलले. पण आता पोटातल्या वादळाचे रूपांतर सुनामीमध्ये होऊन माझ्या पोटात जे काही असेल नसेल ते सगळे नाकातोंडामधून वेगाने बाहेर फेकले गेले. माझ्या अंगावरचे कपडे आणि चादर वगैरे पुसून आणि झटकून त्या दोघी परत गेल्या.

मी पलंगावर मुकाटपणे पडून राहिलो होतो. माझे दोन्ही हात बँडेजमध्ये करकचून बांधलेले होते. डाव्या हाताच्या मनगटाच्या जवळच ऑपरेशन केलेले असल्यामुळे बोटांची फक्त टोके बाहेर दिसत होती. उजव्या हाताच्या दंडाजवळ हाडाचे ऑपरेशन केले होते आणि कोप-याला आधीच मोठी जखम झालेली होती, तिचे अनेक टाके घातलेले होते. त्या हाताचे मनगट मात्र मोकळे होते. डाव्या हाताला प्लॅस्टरसकट उभे धरून एका दोरीने स्टँडला बांधून ठेवले होते आणि उजवा हात कोप-यामधून मुडपून स्लीव्हमध्ये घालून गळ्यात अडकवून ठेवला होता. यामुळे दोन्ही हात तर जागच्या जागी खिळलेले होतेच, खांद्यापाशी एक लहानसे भोक पाडून तिथे एक मोठे बँडेज बांधल्यासारखे वाटत होते. माझ्या कॉटच्या बाजूला ठेवलेल्या स्टँडला तीन चार प्लॅस्टिकच्या बाटल्या उलट्या टांगल्या होत्या त्यांचेपासून निघालेल्या रबराच्या पारदर्शक नळ्या माझ्या खांद्याला बांधलेल्या बँडेजशी जोडलेल्या होत्या. मला देण्यात येणारी औषधे तसेच जीवनावश्यक द्रव्ये यांचा पुरवठा त्या नळ्यांमधून माझ्या शरीराला मिळत होता. कॅथेटर लावून आणि डायपर बांधून माझ्या उत्सर्जनाची व्यवस्था केलेली होती. माझ्या पायालासुद्धा अपघातात जखमा झालेल्या होत्याच, आता अंगात त्राणही नव्हते. यामुळे मी उठून बसूही शकत नव्हतोच, फक्त पायांचे तळवे आणि बोटे हलवू शकत होतो आणि हाताची बोटे वळवण्याचा प्रयत्न करून शकत होतो. मी एवढ्या हालचाली मात्र सारख्या करत रहाव्यात असे कोणीतरी मला सांगून गेले.

आणखी बराच वेळ गेला तोपर्यंत पोटातले ढवळणे कमी झाले होते. बहुधा त्या नळ्यांमधून माझ्या शरीरात गेलेल्या औषधांचा परिणाम झाला असावा, पण मला अजूनही काही खावे असे वाटतच नव्हते. आता माझ्यासाठी भोजन आणले गेले. ती एक खिरीसारखी सरभरीत अशी पण बेचव खिचडी होती. अन्न हे पूर्णब्रह्म असे म्हणत मी ते अतिसात्विक अन्न खाण्याचा बराच प्रयत्न केला, पण बाउलमधले अर्धेसुद्धा खाऊ शकलो नाही. माझ्यासाठी हे जेवण घेऊन आलेली शिकाऊ नर्स मात्र अन्नाच्या नासाडीवर माझी शाळा घेत होती. कोणतेही अन्नपदार्थ तयार करण्यासाठी शेतात राबणा-या शेतक-यांपासून ते भटारखान्यातल्या आचा-यांपर्यंत किती लोकांनी केवढे परिश्रम घेतलेले असतात, त्यात देशाची आणि विश्वाची किती संसाधने खर्च झालेली असतात, आपण हे सगळे वाया घालवणे योग्य आहे का ? वगैरे वगैरे वगैरे. हेच संवाद या पूर्वी मी कित्येक लोकांना ऐकवले असतील, आज ते ऐकण्याची पाळी माझ्यावर आली होती.

हे सगळे चालले असतांना मी फोर्टिस हॉस्पिटलच्या सर्जिकल आय सी यू मध्ये होतो. सगळ्या बाजूंनी बंदिस्त असलेल्या त्या जागेत दिवस किंवा रात्र हेसुद्धा समजत नव्हते. पण बहुधा दुसरा दिवस उजाडून वर आला असावा हे सकाळचा नाश्ता आल्यानंतर कळले. दुपारच्या सुमाराला आमचे सर्जनसाहेब आले. त्यांनी थोडी पाहणी आणि तपासणी केली आणि माझी प्रगति व्यवस्थितपणे चालली असल्याचा अभिप्राय देऊन मला आता वॉर्डमध्ये हलवायला हरकत नसल्याचा निर्णय दिला. त्यानंतर कोणत्या खोलीत एकादी जागा रिकामी आहे याची शोधाशोध केली गेली. ऑपरेशन व्हायच्या आधी मला ज्या कॉटवर अॅडमिट करून ठेवले होते, तिथे आता एक नवा रुग्ण आला होता. दुस-या एका कॉटवरच्या पेशंटला डिस्चार्ज मिळाला होता. त्यानंतर तिथले बेडशीट्स वगैरे बदलून मला तिथे हलवण्यात आले. ऑपरेशनसाठी जातांना मी व्हीलचेअरवर बसून गेलो होतो, परत येतांना मात्र स्ट्रेचरवरून आणणे आवश्यक होते.

या वेळी मी पूर्णपणे परस्वाधीन झालो होतो. दिवसभर आणि रात्री माझी सर्व प्रकारची सेवा शुश्रुषा करण्यासाठी दोन अटेंडंट्स ठेवलेले होतेच, शिवाय माझी दोन्ही मुले सारखी ये जा करत होती. पण हॉस्पिटलच्या नियमांप्रमाणे पेशंटच्या सोबत एका वेळी फक्त एकाच अटेंडंटने राहण्याची मुभा होती. यासाठी त्यांनी पास देऊन ठेवले होते आणि कडक सिक्यूरिटी व्यवस्था असल्यामुळे पास असल्याशिवाय कोणाला लिफ्टमध्ये पण जाऊ देत नव्हते. पासधारकाने खाली येऊन लॉबीत आलेल्या व्यक्तीला पास दिला तरच तो वर माझ्या खोलीत येऊ शकत होता. यात दहा पंधरा मिनिटांचा तरी वेळ जात होता.  पण माझ्या दिमतीला चोवीस तास कोणी ना कोणी हजर राहणेही आवश्यक होते आणि वेळोवेळी डॉक्टरांना भेटणे किंवा गरजेचे सामान आणून देणे वगैरेसाठी आणखी एकाद्या माणसाला अधून मधून यावे लागत होते. यासाठी माझ्या मुलाने एक सविस्तर पत्र लिहून डॉक्टरांची तात्पुरती परवानगी घेतली. त्यामुळे बरीच सोय झाली. रात्रीच्या वेळी मला पूर्णपणे अनोळखी अटेंडंटवर सोपवणे माझ्या मुलाला फारसे पटत नव्हते. त्याने स्वतःच रात्रपाळीला माझ्यापाशी थांबायचे ठरवले.

माझ्यावर ऑपरेशन्स केलेल्या जागांमधून एक एक नळी बाहेर काढून लहानशा डब्यांना जोडून ठेवली होती. याला ड्रेन म्हणत. या ड्रेन्समधून किती गाळ बाहेर पडत आहे याची रोज पाहणी केली जात होती. एक दोन दिवसातच त्यातली गळती थांबल्यावर त्या डब्या काढून टाकल्या गेल्या. आणखी एक दोन दिवसांनी कॅथेटर काढून टाकण्यात आले आणि पॉटची व्यवस्था केली गेली.  मला नळ्यांमधून देण्यात येणारी औषधे कमी कमी होत गेली. खांद्यावर जोडलेली सेंटरलाईन काढून उजव्या हाताच्या मनगटापाशी आयव्ही लावले गेले. गरज पडेल तेंव्हापुरताच त्याचा उपयोग होऊ लागला. अशा प्रकारे मला कॉटशी बांधून ठेवलेलले बंध सुटत गेले. माझी अवस्था बुटक्या लोकांनी बांधून टेवलेल्या गलिव्हरसारखी झाली होती, त्यातून मोकळे झाल्यावर केवढा तरी आनंद झाला.

मला हातावर जोर देणे शक्यच नव्हते आणि त्याशिवाय उठून बसताही येत नव्हते. हॉस्पिटलमधल्या कॉटचा मागचा भाग शक्य तितका वर करून आणि माझ्या पाठीला आधार देऊन बसवणे सुरू झाले. त्यानंतर खांद्याच्या खाली धरून उभे करता येऊ लागले.  मुख्य म्हणजे मी आता अटेंडंटच्या आधारे टॉयलेटला जाऊ शकत होतो. रूममध्ये येऊन दोन तीन दिवस झाल्यानंतर रोज एक फिजिओथेरॅपिस्ट येऊन भेटून जायची. आधी तिने एक लहानसे खेळणे हातात दिले आणि त्यातले गोळे फुंकर मारून उडवायची प्रॅक्टिस करवून घेतली. माझा श्वास पुरेसा नीट चालत आहे याची खात्री झाल्यानंतर पुढचे व्यायाम करायचे होते. उभा राहिल्यानंतर हाताला धरून मला माझ्या खोलीच्या खिडकीपाशी नेऊन बाहेरचे जग दाखवले. त्यानंतर कॉरीडॉरमध्ये दोन मिनिटे, पाच मिनिटे, दहा मिनिटे असे चालवत धीम्या गतीने पंधरा मिनिटांपर्यंत मजल नेली. त्यानंतर तेवढ्याच वेळात पण गती वाढवत नेऊन जास्त अंतर चालवून आणले. अशा प्रकारे हळूहळू माझ्या अंगातले त्राण वाढत गेले तसा माझा आत्मविश्वास वाढत गेला.

आमचे सर्जन डॉ.यादव दररोज एक फेरी मारून त्रोटक विचारपूस करतच होते. त्यांचा सहाय्यक जरा अधिक तपासणी करून जात असे. हॉस्पिटलचा मेडिकल विभाग इतर अनेक प्रकारच्या तपासण्या करत होता. दररोज दिवसातून ती चार वेळा ब्लड प्रेशर मोजणे ही एक कसरत असायची. दोन्ही हात बँडेजमध्ये असल्याने आणि एका पायाला जखम झाली असल्यामुळे उरलेल्या जागेत कसेबसे ते उपकरण लावून त्यातला आकडा पाहणे सगळ्या नर्सेसना जमत नसे. त्या अंदाजाने काही तरी लिहून ठेवायच्या. मग डॉक्टरांना शंका आली की पुन्हा ते तपासले जायचे हे रोजचेच होते. माझ्या आठवणीप्रमाणे मला थरमॉमीटर लावण्याची वेळ आलीच नाही, पण तपमानाची नोंद मात्र होत असावी.

प्रत्येक आहारापूर्वी रक्तातल्या शर्करेची तपासणी होत असे, पण एवढ्या मोठ्या नामवंत हॉस्पिटलमधले आमच्या वॉर्डमधले त्याचे उपकरण मात्र कधी कधी बेभरवशाचे निघत असे. माझ्या बोटाला सुई टोचून रक्ताचा थेंब बाहेर निघाल्यानंतर ते उपकरण चालत नसल्याचे सिस्टरच्या लक्षात येत असे. मग दुस-या वॉर्डमधून वेगळे ग्लुकोमीटर आणून टेस्ट करून त्यानुसार इन्सुलिनचे प्रमाण ठरवले जात असे. हे सगळे होईपर्यंत आणलेले खाद्यपदार्थ थंडगार होत असत. याबद्दल एक दोनदा  तक्रार करून झाल्यानंतर मी  त्यांना न जुमानता खाणे सुरू केले.  

दररोज अगदी नियमितपणे एक डायटीशियन येऊन मला भेटून जात असे. पण माझ्या फाइलींमध्ये डॉक्टर लोकांनी काय काय लिहून ठेवले होते कोण जाणे. तिच्याकडे माझ्यासाठी फारच कमी पर्याय उपलब्ध असायचे. कसल्याशा प्रकारचा खिचडा हे माझे मुख्य अन्न असायचे. यापूर्वी मला फक्त तांदूळ व मुगाच्या डाळीची खिचडी आणि उपासाची साबूदाण्याची खिचडी एवढेच प्रकार ठाऊक होते. इथे रोज निरनिराळी तृणधान्ये आणि कडधान्ये यांच्या कण्यांच्या मिश्रणांना शिजवून बाउलमध्ये भरून आणले जात असे. आज त्यात ज्वारी आहे की ओट्स की नागली आणि मुगाची डाळ आहे की मसूरीची की उडिदाची याचा सस्पेन्स थोडा चेंज म्हणून बरा वाटायचा. मात्र जेवणाशिवाय इतर वेळी मिळत असलेले निरनिराळ्या फळांचे काप आणि सूप्स मनापासून आवडत. सकाळी नाश्त्यामध्ये आधी नुसतेच ओट्स असत, दोन तीन दिवसांनंतर कधी बिनतेलाचा उत्तप्पा किंवा घावन मिळायला लागला. ब्रेड बटर सँडविच असे काही मिळू शकेल का असे विचारल्यावर त्या विदुषीने सांगितले की व्हीट ब्रेड मिळेल पण त्याला बटर किंवा जॅम लावता येणार नाही आणि सँडविचमध्ये टोमॅटो घालता येणार नाही की बरोबर खायला ऑमलेटही मिळणार नाही. यामुळे मी माझ्या या सगळ्या इच्छा पुढे घरी गेल्यानंतर पूर्ण करण्यासाठी राखून ठेवल्या.  चार पाच दिवस दोन्ही वेळच्या भोजनामध्ये फक्त खिचडा खाऊन झाल्यानंतर माझ्या ताटात एक चपाती अवतरली, त्यानंतर दुसरी, तिसरी यायला लागली. उकडलेल्या भाजीपाल्यांमध्ये थोडे तिखटमीठ पडायला लागले. चांगले रुचकर असे जेवण मिळायला लागेपर्यंत माझी घरी परतण्याची वेळ झाली होती. हॉस्पिटलच्या किचनमधल्या आचा-यांच्या हातालासुद्धा चंव असू शकते एवढे मात्र त्यातून समजले.

माझी पुरेशी प्रगती झाल्यानंतर इंजेक्शन्सची गरज संपून औषधाच्या फक्त गोळ्या आणि सायरप घ्यायचे राहिले, वेळोवेळी बीपी, शुगर वगैरे पहायची आणि रोजच्या रोज डॉक्टरने तपासण्याची गरज राहिली नाही, तेंव्हा मला डिस्चार्ज देण्यात आला. आता मी माझ्या कुटुंबासमवेत राहणार होतो, माझ्यासाठी माझ्या कुटुंबियांना करावी लागणारी दगदग वाचणार होती आणि हॉस्पिटलची बिले भरावी लाणार नव्हती. अजूनही माझे दोन्ही हात बांधलेले असल्यामुळे घरी गेल्यानंतरसुद्धा दोन तीन आठवडे तरी मी पूर्णपणे परस्वाधीनच राहिलो होतो. यामुळे घरी गेल्यानंतरसुद्धा दिवसा व रात्रीसाठी सेवकांची सोय करावी लागलीच.  त्यानंतर हळूहळू सुधारणा होत मी हाताच्या हालचाली करायला लागलो, आधी घरातल्या घरात आणि नंतर बिल्डिंगच्या सभोवती फे-या मारायला लागलो. मला साधारणपणे हिंडण्याफिरण्यायोग्य व्हायला आणखी तीन महिने लागले. तरीही दोन्ही हात पूर्णपणे पूर्ववत झाले नाहीतच. होण्यासारखी सुधारणा आता झाली आहे, उरलेली कदाचित हळूहळू होईल असे डॉक्टरांनी सांगितले आणि हे काम पूर्ण झाले असल्याचे जाहीर केले.


Sunday, September 27, 2015

"गणपतीबाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या


http://lalbaugkaraja.com/wp-content/uploads/2014/09/Lalbaugcha-Raja-Visarjan-20141.jpg
मी नोकरीसाठी मुंबईला आलो तेंव्हा मित्रांसोबत दादरला रहात होतो. आम्ही सर्वजणच त्या भागतल्या सर्व सार्वजनिक गणेत्सवांमध्ये रोजच अतीशय उत्साहाने प्रेक्षक म्हणून सहभागी होत होतो.  अनंत चतुर्दशीला तर तासन् तास रस्त्यांवरून भटकत राहून दिसतील तेवढ्या खाजगी आणि सार्वजनिक गणपतींच्या मिरवणुका आणि मूर्ती, सजावट वगैरे पहात होतो. लग्न करून आधी चेंबूर आणि नंतर अणुशक्तीनगरला रहायला गेल्यावर कित्येक वर्षे या दिवशी बसने शहरात जाऊन शक्य तो दुमजली बसच्या वरच्या भागात बसून दिसतील तेवढ्या मिरवणुका आणि प्रतिमा पाहून त्यांना आपल्या डोळ्याात साठवून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. पुढे वयोमानानुसार तेअवघड होत गेले.  टीव्ही वरील अनेक वाहिन्यांमधून त्यांचे दिवसभर प्रक्षेपण होऊ लागल्यानंतर तेच पहायला लागलो.

मी संसार थाटल्यानंतर दरवर्षी आमच्या घरीच पाच दिवसाचा गणेशोत्सव साजरा करायला लागलो. एकदा नाइलाजाने तो तीन दिवसांचाच करावा लागला तेवढा अपवाद वगळला तर दर वर्षी अधिकाधिक उत्साहाने ते करत गेलो. माझ्या दोन्ही मुलांनीही वेगळ्या ठिकाणी संसार मांडल्यानंतर आपापल्या घरी हे उत्सव सुरू केले आणि ते इंग्लंड किंवा अमेरिकेत असतांनाही सुरू ठेवले. एकदा आम्हीही या वेळी पुण्याला गेलेलो असल्यामुळे तिथल्या घरातल्या उत्सवात तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने सहभाग घेतला होता.

या वर्षी प्रकृतीअस्वास्थ्यामुळे आम्ही वाशीच्या घरी घरापुरता उत्सव साधेपणाने साजरा करायचे ठरवले होते. आयत्या वेळी आम्ही दोघेही आजारी पडलो आणि मुलाला पुण्याहून बोलावून घेतले. ते दोघे लगेच आलेच आणि एक दिवस पुण्याला जाऊन त्यांच्या मुलींनाही घेऊन आले. गणेशचतुर्थीच्या आधी माझी पत्नीही हॉस्पिटलमधून घरी आली आणि आम्ही उत्साहाने गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली. पण दुस-याच दिवशी मलाच हॉस्पिटलमध्ये अॅडमिट व्हावे लागले आणि मला कळायला लागल्यापासून या वर्षी प्रथमच मी या उत्सवापासून दूर राहिलो. घरातल्या गणेशाला निरोपसुद्धा देऊ शकलो नाही, याची मनाला चुटपुट लागून राहिली.

आज अनंतचतुर्दशीला मी कुठेच बाहेर जाऊ शकत नव्हतो. गावोगावी होत असलेल्या ठिकठिकाणच्या विसर्जनाच्या मिरवणुका आणि दृष्ये  घरी टीव्हीसमोर बसून पहात राहिलो. हे कार्यक्रम पहात असतांना अचानक आमच्या जिन्यामधूनच "गणपतीबाप्पा मोरया"चा जल्लोष ऐकू आला आणि दारात जाऊन पाहिले तोपर्यंत आमच्या बिल्डिंगमधल्याच एका भाडेकरूने बसवलेल्या गणेशाच्या मूर्तीला विसर्जमासाठी खाली  नेत असलेले पाहिले. मी लगेच खिडकीशी जाऊन उभा राहिलो. आमच्या खिडकीच्या खालीच एक व्हॅन उभी होती आणि तिच्या मागच्या भागात ही मूर्ती ठेवली जात होती. मला तिचे पूर्ण दर्शन घडले. मी तिला दोन्ही हात जोडून नमस्कार केला, प्रार्थना केली आणि "पुढच्या वर्षी लवकर या" असे म्हणत  या गणेशमूर्तीलाच मनोमन निरोप दिला. "गणपती बाप्पा, आता पुढच्या वर्षी पुन्हा मला पहिल्यासारखाच पूर्ण उत्सव साजरा करायची संधी द्या." अशी मनोमन प्रार्थना केली.



Thursday, September 24, 2015

गणपतीबाप्पांची इच्छा




आपण सगळ्या चांगल्या कामांची सुरुवात गणपतीचे स्मरण करून करतो. श्रीगणेशा हा या ब्लॉगवरचा पहिला भाग होता. पुढे त्या वर्षी मी एका मोठ्या आजारामुळे अंथरुणाला खिळलो होतो आणि हा ब्लॉग कदाचित बंदच पडेल असे वाटत होते.  त्या वर्षीचा गणेशोत्सव आला. घरी बसल्या बसल्या आणि पडल्यापडल्या गणेशाची अनंत रूपे पाहून आपल्या परीने ती वाचकांना दाखवण्याचा प्रयत्न करायचे असे मी ठरवले. गणपतीच्या कृपेनेच मी त्याच्या कोटी कोटी रूपांपैकी काही निवडक रूपे दाखवू शकलो.  'कोटी कोटी रूपे तुझी' ही मालिका मी ओळीने ११ दिवस ११ भागात लिहू शकलो. त्या संपूर्ण कालावधीत माझा संगणक व्यवस्थित चालला, आंतर्जालाशी माझा संपर्क खंड न पडता होत राहिला आणि माझी तब्येत सुधारत गेली, माझा उत्साह आणि आत्मविश्वास वाढत गेला. असे व्हावे ही गणेशाचीच इच्छा आणि लीला असणार.

त्यानंतरच्या काळातसुध्दा मी दरवर्षी माझ्या परीने या ब्लॉगवर गणेशोत्सव साजरा करत राहिलो. 'गणेशोत्सव आणि पर्यावरण' या विषयावर लेखमाला लिहून त्यात दोन्ही बाजूचे मुद्दे मांडले.त्या मालिकेत मी सर्व बाजूने विचार करणारे लेख दिले होते. लोकमान्य टिळकांच्या वेळच्या गणेशोत्सवाची आठवण करून देणारे त्यांचेच लेख दिले. आजच्या काळात होत असलेल्या उत्सवाबद्दल लिहितांना त्यातल्या काही सकारात्मक बाबींकडे लक्ष वेधण्याचा आणि नकारात्मक किंवा वादग्रस्त गोष्टींच्या मागची कारणपरंपरा शोधण्याचा अल्पसा प्रयत्नही केला. गणपतीची स्तोत्रे, कहाण्या, गाणी वगैरेंकडे लक्ष पुरवले, काही जुनी, काही नवी गीते, काही स्तोत्रे, काही स्तोत्रांचे अर्थ वगैरे देण्याचा प्रयत्न केला. गणपतीच्या अनेक नावांची यादी संकलित करून दिली. गणपती आणि चंद्रदेव, स्यमंतकमणी यांच्या कहाण्या सांगितल्या. एका वर्षीच्या  वर्तमानपत्रांमध्ये गणेशोत्सवावर छापून आलेल्या लेखांचा आढावा घेतला. अशा प्रकारे दर वर्षी मी या दिवसात श्रीगणेशासंबंधी काही ना काही लिहीत राहिलो.

या वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या एका अपघातात आम्ही दोघेही जबर जखमी झालो होतो. देवाधिदेवाच्या म्हणजे गणपतीच्या कृपेनेच त्यातून बचावलो. त्या काळात मी सतत त्याचाच धावा करत होतो. माझ्या दोन्ही हातांचे ऑपरेशन करावे लागले होते. अलका त्या अपघातामधून सावरते ना सावरते तोपर्यंत तिची काही जुनी दुखणी पुन्हा उफाळून वर आली तर काही नव्या व्याधी उद्भवल्या. यामुळे आम्ही चिंताग्रस्तच होतो. गोकुळाष्टमीच्या सुमाराला आम्हा दोघांच्या प्रकृती जरा स्थिरावल्या. गणपतीबाप्पाचे स्मरण करून त्याचे आभार मानण्यासाठी या वर्षीचा गणेशोत्सव अगदी साधेपणाने निदान घरच्या घरापुरता साजरा करायचा असे आम्ही ठरवले. दरवर्षी आम्ही दोघेही मिळून गणपतीची मूर्ती निवडण्यासाठी जात होतो. या बाबतीत अलका जरा चोखंदळ असल्यामुळे त्या ठिकाणी ठेवलेले सगळे गणपती तासभर निरखून पाहून झाल्यावर आम्ही त्यातून आपल्याला हवी त्या आकाराची, रंगाची आणि मुद्रेमधली मूर्ती निवडत होतो. या वर्षी ते शक्यच नव्हते. मी एकटाच लोटलीकरांच्या केंद्रात गेलो आणि पाच मिनिटात निर्णय घेऊन एका सुबक मूर्तीची ऑर्डर दिली. माझ्या हातांच्या नाजुक अवस्थेमुळे या वर्षी मला फारशी सजावट करता येणार नव्हतीच. टेबलावर एकादा पाट मांडून त्यावर आसन पसरायचे आणि त्यावर या मूर्तीची स्थापना करायची असे मनोमनी ठरवले.

पुढचे दोन तीनच दिवस ठीक गेले आणि अलकाला खोकल्याचा त्रास सुरू झाला. तो इतका वाढत गेला की ११ तारखेला तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावे लागले. त्या आधी झालेली जागरणे आणि पडलेला ताण या गोष्टी मलाही सोसल्या नाहीत आणि संसर्गही झाला असणार. मी घरी आल्या आल्या माझ्या अंगात भरपूर ताप भरला. लगेच मुलाला पुण्याहून बोलावून घेतले आणि ते दोघेही दुस-या दिवशी वाशीला येऊन हजर झाले. पहिल्या दिवशी तर उदय पूर्णवेळ माझ्यासोबत घरीच राहिला आणि शिल्पा एकटीच हॉस्पिटलमध्ये अलकाजवळ गेली. दोन दिवसांनी माझ्या अंगातला ताप उतरल्यानंतर मी त्यांच्यापुढे गणेशोत्सवाचा विषय काढला आणि यंदा तो साधेपणाने घरच्या घरापुरता साजरा करायचा असल्याचे सांगितले. तोपर्यंत गणेशचतुर्थी  जवळ आली होती.  ते दोघेच जाऊन मी ऑर्डर केलेली मूर्ती घेऊन आले. गुरुवारी गणेशचतुर्थी होती त्याच्या आधी मंगळवारी अलकालाही हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. आमच्या दोन्ही नाती पुण्याला आजोळी राहिल्या होत्या.  शिल्पा पुण्याला जाऊन त्यांना घेऊन आली. काही वर्षांनंतर पुन्हा आम्ही एकत्र येऊन हा उत्सव साजरा करायचा अशी गणपतीबाप्पाची इच्छा होती. सगळी मंडळी जमल्यावर सर्वांना उत्साह आला. उदयने डेकोरेशनचे थोडे सामान आणले आणि त्या चौघांनी मिळून ब-यापैकी सजावटही करून घेतली.

या वर्षीच्या गणेशचतुर्थीला बाहेरच्या कोणा आप्तेष्ट, शेजारी किंवा मित्रांना बोलावणे शक्यच झाले नव्हते. आम्हीच गणेशाच्या मूर्तीला जिन्यापर्यंत नेऊन वाजत गाजत घरात आणले, दारात येताच त्याचे निरांजने ओवाळून स्वागत केले आणि मखरामध्ये स्थापना केली. आम्ही दोघेही अजून धडधाकट झालेलो नव्हतोच. त्यामुळे आम्ही बसल्या बसल्या सगळा सोहळा पाहिला, पूजाविधीमध्ये किंचित मार्गदर्शन केले आणि आरत्या म्हंटल्या. नैवेद्यासाठी लागणारे तळलेले मोदक आणि पंचखाद्य वगैरे पदार्थ त्या गडबडीतही आदल्या दिवशीच करून ठेवले होते, खव्याचे आणि चॉकलेटचे मोदक दुकानामधून आणले. फळफळावळ आणली आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा गणपतीबाप्पाला व्यवस्थित नैवेद्य दाखवले.

गुरुवारी गणपतीचे आगमन झाल्यानंतर आणखी एक दिवस वाशीला राहून शनिवारी पुण्याला परत जायचा विचार असल्याचे उदयने सांगितले. तोपर्यंत त्यांचा इथला मुक्काम आठवडाभर होत होता.  ते दोघे अचानक इकडे निघून आल्याने त्यांची तिकडली काही कामे अर्धवट राहिली होती, त्याच्या मुलींनी पुण्यातल्या त्यांच्या कॉलनीमधल्या सार्वजनिक उत्सवात भाग घेण्यासाठी नाव नोंदवले होते, गाण्यांची कसून तयारी केली होती. त्यांचा कार्यक्रम शनिवारीच होणार होता आणि त्यांना तो चुकवायचा नव्हता वगैरे कारणे होती आणि आता आमची तबेत आम्ही सांभाळू शकू असे वाटायला लागले होते. त्यामुळे आम्ही त्यांना थांबायला सांगितले नाही.

माझ्या अंगातला ताप उतरला असला तरी अजूनही मला थोड्या हालचाली करताच दम लागत होता. त्यामुळे शुक्रवारी डॉक्टरकडे जाणे आवश्यक होतेच. तिथे ईसीजी काढल्यावर डॉक्टरांना काही शंका आल्या आणि घाबरण्याचे कारण नसले तरी एकदा हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांना तो दाखवून येण्याचा सल्ला डिस्पेन्सरीमधल्या डॉक्टरीणबाईंनी दिला.  फक्त ईसीजी दाखवून परत येण्यासाठी आम्ही दोघे हॉस्पिटलमध्ये  गेलो, पण तिथे गेल्यावर तिथल्या डॉक्टरांनी मला अॅडमिटच करून घेतले. आता उदय, शिल्पा वगैरे सगळेजण पुण्याला परत जाऊ शकत नव्हते.  कोणीतरी इथे असणे आवश्यक झाले होते. त्यामुळे उदय इकडे थांबला आणि मुलींना घेऊन शिल्पा शनिवारी पुण्याला गेली. मुलींच्या शाळांना सुट्या असल्यामुळे रविवारी सकाळीच ते लोक वाशीला परत येणार होते आणि मग उदय पुण्याला जाणार होता. पण त्या दिवशी पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झाला. त्याचा जोर इतका वाढला की त्यांना तर पुण्याला थांबावे लागलेच पण आज आईला एकटीला घरी सोडून मला भेटायला तू हॉस्पिटलमध्येसुद्धा येऊ नकोस असे मी उदयला बजावले. पावसाचा जोर रात्रीपर्यंत  कमी झाल्यावर पुण्याला गेलेली मंडळी परत आली.

रविवारी सकाळीच ते लोक इकडे आले असते तर उदय लगेच पुण्याला जाऊन सोमवारी त्याच्या ऑफिसात हजर होणार होता, पण गणपतीबाप्पाला ते मंजूर नसावे. मीही हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झालेलो असल्यामुळे गणपतीचे विसर्जन कोण करेल हा एक प्रश्न होताच. त्यामुळे उदयने त्याचा मुक्काम एका दिवसाने वाढवला. सोमवारी संध्याकाळपर्यंत मलाही डिस्चार्ज मिळणार असल्याचे त्याच दिवशी सकाळी ऐकल्यावर मी विसर्जनाच्या आधी घरी जाऊन पोचू शकेन अशी एक आशा निर्माण झाली होती. पण तिथून निघायच्या आधी मला एका हृदयरोगतज्ज्ञाला दाखवायचे होते. बाहेरून व्हिजिट करायला येणारा तो डॉक्टर केंव्हा भेटेल हे कोणी सांगू शकत नव्हता. गणपतीची उत्तरपूजा आणि विसर्जन करण्यापूर्वी मला घरी घेऊन यायचे म्हणून इतर लोक माझ्यासाठी थांबले असते तर कदाचित विसर्जनाला खूप उशीर झाला असता आणि त्या दिवशी गौरीगणपतींचे एकत्र विसर्जन असल्यामुळे रस्त्यात तसेच तळ्यावर प्रचंड गर्दी झाली असती. यावर बरेच वेळा फोनवर उलटसुलट चर्चा करून झाल्यावर मी उदयलाच विसर्जन करून घ्यायला सांगितले.

हॉस्पिटलमधल्या माझ्या तपासण्या आणि त्यावरील कागदी कारवाया उरकून मला प्रत्यक्ष डिस्चार्ज मिळायला रात्रीचे आठ वाजून गेले.  त्यामुळे आमचा निर्णय तसा बरोबर ठरला. पण मला मात्र चुटपुट लागून राहिली. त्या दिवशी मी गणपतीच्या विसर्जनासाठी तळ्यापर्यंत जाऊ शकलो नसतोच, पण निदान घरातली पूजा बघितली असती, आरती म्हंटली असती. घरात आरत्या चाललेल्या असतांना मी सेलफोनवरून त्या ऐकाव्यात आणि हॉस्पिटलमध्येच मनातल्या मनात म्हणाव्यात असा प्रयत्नही केला.  पण नेमक्या त्याच वेळी मला हॉस्पिटलमधल्या अशा विभागात नेले होते जिथे मोबाईलचा सिग्नलच येत नव्हता. या वर्षी गणपतीबाप्पाला माझ्याकडून एवढी सेवा करून घ्यायची नव्हती अशी त्याचीच इच्छा होती असे म्हणायचे. त्याआधी सकाळच्या वेळी बेडवरच बसून मी अथर्वशीर्षाची आवर्तने मात्र केली होती.

अशा प्रकारे या वर्षीच्या आमच्या घरातल्या गणेशोत्सवात अनपेक्षित घटना घटत गेल्या. त्यांचा क्रम आणि टाइमिंग यांचा विचार केल्यास मन थक्क होते. अखेर आपणा सर्वांचा कर्ता करविता तोच असल्याची खात्री पटावी असा हा अनुभव होता. त्वमेव केवलम् कर्ताSसि, त्वमेव केवलम् धर्ताSसि,  त्वमेव केवलम् हर्ताSसि असे जे म्हणत होतो त्याची प्रचीती येत होती.
   







Tuesday, September 08, 2015

मानवी संबंध (उत्तरार्ध) - प्रेमबंध

आधीचा भाग : मानवी संबंध (पूर्वार्ध) -जुळणे आणि तुटणे
http://anandghan.blogspot.com/2015/08/blog-post_29.html

आपण माणसामाणसांमधल्या संबंधांचा विचार करतो त्यावेळी बहुतेक वेळा तो विचार त्यांच्या आपसातल्या चांगल्या संबंधांबद्दल असतो. जवळच्या किंवा सर्वात आतल्या वर्तुळातल्या लोकांशी सर्वांचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि घनिष्ठ संबंध असतात, माणसांमाणसांमधले अंतर जसजसे वाढत जाते तसतशी त्या  संबंधांची वीण सैल होत जाते. थोड्या बाहेरच्या वर्तुळातल्या लोकांशी सर्वांचे सलोख्याचे संबंध असतात आणि दूरच्या इतर लोकांशी कामापुरते वरवरचे संबंध असतात. ज्यांच्याबद्दल मनात वैरभाव किंवा द्वेष असतो त्यांच्याशी सहसा कोणी संबंध ठेवतच नाहीत आणि ठेवलेच तर ते औपचारिक तोंडदेखले खोटे खोटे असतात, म्हणजे खरे तर ते नसल्यातच जमा असतात.  काही वेळा मात्र एका माणसाला दुसरा माणूस जवळचा वाटत असतो पण तो मात्र पहिल्या माणसापासून दूर दूर रहात असतो असे अनुभवसुद्धा येतात. यामुळे त्यांचे परस्परसंबंध गुंतागुंतीचे होतात.  दोन व्यक्तींमध्ये चांगले संबंध प्रस्थापित होत असतांना त्यामधून आपुलकीची भावना निर्माण होते. आपुलकी आणि प्रेमाच्या धाग्याने ते लोक एकमेकांशी बांधले जातात, म्हणून त्यांना संबंध असे म्हणायचे. हे बंधन का आणि कसे होत असेल?

परमेश्वराने किंवा निसर्गाने जगातल्या सर्वच प्राणिमात्रांना स्वतःचा जीव वाचवण्याची एक जबरदस्त अंतःप्रेरणा (Instinct) दिलेली आहे. किडामुंगींपासून वाघ, सिंह. हत्ती वगैरेंपर्यंत प्रत्येक जीव स्वसंरक्षणासाठी सदोदित धडपडत असतो. आपल्या जिवाला धोका आहे असे वाटताच तो लपून बसतो, पळून जातो किंवा शत्रूवर प्रतिहल्ला चढवतो. प्रत्येक सजीव प्राण्याच्या शरीराला अन्नाची गरज असते म्हणूनमुळे ते शोधत तो फिरत असतो आणि त्याला विश्रांती व निद्रा यांची गरज असते म्हणून त्यासाठी तो निवारा पाहतो.  या दोन्हींचा समावेशसुद्धा त्या प्राण्याच्या जीव वाचवण्याच्या मूलभूत प्रेरणेबरोबरच करता येईल. या बाबतीत प्रत्येक प्राणी हा मुख्यत्वे स्वार्थीच असतो. सशक्त शाकाहारी प्राणी दुसऱ्या कमजोर प्राण्याच्या समोरचे अन्न बिनदिक्कतपणे खायचा प्रयत्न करतात तर मांसाहारी प्राणी दुसऱ्या प्राण्यांनाच खाऊन टाकतात. निवाऱ्याच्या बाबतीतसुद्धा निसर्गामध्ये बळकावणे चाललेले असते. सगळे नागोबा आयत्या बिळातच घुसून वास्तव्य करतात. तसे पाहता माणूससुद्धा त्याच्या मूळ स्वभावाने स्वार्थीच असतो, संस्काराने त्याच्यात बदल होतात. त्याशिवाय इतरही काही कारणे असतात.

समस्त प्राणीमात्र नेहमी स्वतःचा स्वार्थ पहात असले तरी त्यांना इतर प्राणीमात्रांच्या सोबतीनेही रहायचे असते. कदाचित त्यात त्यांना अधिक सुरक्षित वाटत असेल. म्हणजे हा सुद्धा आपला जीव वाचवण्याचाच एक भाग झाला. तशा प्रकारची दुसरी अंतःप्रेरणाही त्याला मिळत असते. यामुळेच जगातले बहुतेक प्राणी, कीटक, मासे, पक्षी वगैरे जीव कळप करून राहतात. तसे रहात असतांना त्यांना स्वतःच्या स्वार्थाला थोडी मुरड घालणे, थोड्या गोष्टी इतरांसाठी सोडणे, इतरांचा थोडा त्रास सोसणे वगैरे करणे भाग असते. एकाद्याने तसे नाही केले तर कळपातले इतर प्राणी त्याला हुसकावून लावतील अशी भीती असते. बहुतेक सगळी माणसेसुद्धा लहानमोठ्या समूहांमध्ये राहणेच पसंत करतात. आपले कुटुंब, वस्ती, गाव, प्रदेश, देश, जग  किंवा कुटुंब, पोटजात, जात, धर्म अशा चढत्या भाजणीने त्यांच्या समूहाच्या व्याख्या बदलत जातात एवढेच. त्याचे वागण्याचे नियम त्यानुसार ठरत जातात आणि ते पाळण्याची गरज त्यांना वाटते. ते करत असतांना स्वार्थाला बाजूला ठेवावे लागतेच.

पण या सगळ्यांच्या पलीकडे जाणारी आणखी एक दिव्य अशी अंतःप्रेरणा माणसाला तसेच इतर जीवांना मिळत असते.  प्रत्येक प्राणी किंवा पक्षी आपल्या पिलांवर माया करतात, त्यांचे जिवापाड संरक्षण करतात, त्यांच्यासाठी अन्नाची तरतूद करतात. यात त्यांचा कसलाही स्वार्थ नसतो किंवा हा परस्पर सहकाराचा भागही नसतो. यात शुद्ध आपुलकी आणि प्रेम असते. पक्षी जोडप्याने रहात असतात, त्यांनाही आपल्या जोडीदाराविषयीसुद्धा विशेष असे काही वाटत असणार. एका कळपातल्या प्राण्यांमध्ये एक प्रकारची जवळीक निर्माण होत असते. पाळीव प्राणी नेहमीच त्यांना पाळणाऱ्यांशी मायेच्या नात्याने जोडले जातात.  हे मुके जीव त्यांच्या डोळ्यांमधून किंवा अंगलटीला येऊन प्रेम व्यक्त करतात. कुत्रा हा प्राणी तर अत्यंत इमानदार समजला जातो. त्यांचे हे वागणे हे नैसर्गिक स्वार्थभावनेच्या विरुद्ध असले तरी होत असते. ते कशामुळे होत असेल ?

सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांचा पगडा सर्व माणसांच्या आचार आणि विचारांवर असतो आणि त्यानुसार ती वागत असतात असे आपल्या प्राचीन शास्त्रांमध्ये लिहिले आहे सांगितले जाते. प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत या तीन गुणांचे प्रमाण मात्र निरनिराळे असते. दुसऱ्याकडील वस्तू हिसकावून किंवा लुबाडून घेणे, तिचा विध्वंस करणे ही राक्षसी वृत्ती माणसातल्या तम या वाईट गुणाच्या प्रभावामुळे येते. आपल्याला हवे असेल ते आपल्या प्रयत्नाने आणि परिश्रमाने मिळवण्याची धडपड सर्वसाधारण माणसे करत असतात. ही मानवी वृत्तीची क्रिया त्यांच्यातल्या रज या गुणामुळे त्यांच्याकडून घडत असते. काही दुर्मिळ लोक स्वतः उपाशी राहून आपला घास भुकेल्यांना भरवतात, इतरांचा फायदा व्हावा यासाठी स्वतः तोशीस सोसतात. इतरांना सुखी करण्यात स्वतःचा आनंद शोधतात. अशा लोकांची गणना देवमाणूस म्हणून केले जाते. परोपकार, दया, माया, भक्ती, सचोटी, कृतज्ञता वगैरे दैवी गुण माणसातल्या सत्त्वगुणामधून येतात. प्रेमाची भावना हे सत्त्वगुणाचे सर्वात सुंदर असे रूप आहे.  प्रेमळ लोक सात्त्विक प्रवृत्तीचे असतात किंवा सात्त्विक लोक प्रेमळ असतात असे आपण पाहतोच. प्रत्येक माणसाच्या अंगात काही प्रमाणात सत्त्वगुण असतात आणि जे कोणी लोक त्याला आपलेसे वाटत असतात त्यांच्यासंबंधी त्यालासुद्धा प्रेम, माया, ममता वगैरे वाटत असते, तो त्यांची काळजी करतो आणि घेत असतो.

प्रेम ही भावना बांधून ठेवणारी असते. त्याने माणसे एकमेकांशी जोडली जातात आणि राहतात. माणसांना जन्मतःच आईचे प्रेम मिळते आणि ते मिळत राहते. वडील, भाऊ, बहीण, आजी, आजोबा, काका, काकू वगैरे घरातील इतर व्यक्तींचा लळा त्यांना सहवासातून लागत जातो. त्यात हळूहळू इतर नातेवाईक, शेजारी, शिक्षक वगैरेंची भर पडत जाते. पुढे त्यांचा स्वतःचा मित्रपरिवार निर्माण होतो आणि तो वाढत जातो. तरुण वयात ते आपल्या जोडीदाराची निवड करतात. नैसर्गिक आकर्षणामुळे त्यांच्या एकमेकांवर वसलेल्या प्रेमाचे धागे खूप घट्ट होतात. ते बंध त्यांना इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्वाचे वाटायला लागतात. अगाध मित्रप्रेमाविषयी खूप लिहिले गेले आहे. देश, धर्म यांच्याविषयी वाटणाऱ्या प्रेमासाठी कित्येक भक्तांनी बलिदान केलेले आहे. देवभक्तीमध्ये लीन झालेल्या व्यक्तीला इतर कशाचेच भान रहात नाही. इतकेच काय पण लेखक, कवी, गायक, नटनट्या यांच्यावरील एकतर्फी प्रेमापोटी माणसे वेडी होतात. आवडत्या नेत्याचे अनुयायी आपले तनमनधन त्याला अर्पण करतात.

या सगळ्याच्या मागे असलेले प्रेमबंध हे समान कारण असते.  ज्या व्यक्ती, संस्था किंवा समाज यांच्याविषयी आपल्याला आपुलकी वाटत असते, त्याच्या संबंधातले सगळे काही जाणून घ्यायला, ऐकायला, बोलायला आपल्याला आवडते, त्याला काही होणार तर नाही ना किंवा कसे होणार याची चिंता वाटते आणि काही बिनसले तर दुःख होते, त्याला यश मिळाले तर आनंद होतो. कारण आपण त्याच्याशी जोडले गेलेले असतो. ग्वाटेमालात एकादा अपघात झाला किंवा सोमालियात  दंगल झाली आणि त्यात जीवित वित्त यांची हानी झाली असे आपण बातम्यांमध्ये वाचले किंवा ऐकले तर क्षणभर हळहळ वाटेल, पण तसे काही पुण्यामुंबईला घडले तर आपण बेचैन होऊन जातो कारण ज्यांच्याबद्दल आपल्याला प्रेम वाटते अशा अनेक व्यक्ती तिथे रहात असतात किंवा काही कारणाने तिथे गेलेल्या असतात, आपल्याला त्यांची काळजी वाटते,  तिथल्या काही जागांना आपल्या भावविश्वात स्थान असते, त्या ठिकाणच्या नेमक्या परिस्थितीची माहिती मिळवण्यासाठी आपण धडपड करतो. या सर्वांशी आपण बांधले गेलेलो असल्यामुळे तिथे काय घडले याचा आपल्यावर परिणाम होतो.

या विषयावर असंख्य लोकांनी अगणित वेळा अमाप लिहिले असले तरी पुन्हा त्यालर लिहावे वाटते कारण या विषयाबद्दल आपल्याला आणि वाचकांना वाटणारा जिव्हाळा आणि प्रेमबंध.

Saturday, August 29, 2015

मानवी संबंध (पूर्वार्ध) -जुळणे आणि तुटणे

संबंध या शब्दाची व्याप्ती फार विस्तृत आहे. ते व्यक्तीव्यक्तींमधले असतात तसेच इतर सजीव प्राणी, निर्जीव वस्तू, घटना किंवा विचार, सिद्धांत वगैरे अॅब्स्ट्रॅक्ट गोष्टींशीसुद्धा असतात.  आपल्या परिचयातल्या काही व्यक्ती त्यांच्या घरात कुत्रा किंवा मांजर पाळतात, ग्रामीण भागात काही लोकांच्या गोठ्यात गायीम्हशी असतात. त्या मुक्या प्राण्यांशी या लोकांचे घट्ट संबंध जुळलेले असतात. आपण त्यांच्याकडे जात येत असलो तर ते प्राणी आपल्याला ओळखायला लागतात आणि आपल्यालाही त्यांच्याबद्दल काही वाटायला लागते. शिवाय ते लोक आपले आहेत असे जरी म्हंटले की त्यांच्याकडल्या प्राण्यांशीसुद्धा आपला अप्रत्यक्ष संबंध जुळतोच. आपले कपडे, पुस्तके, घर वगैरें निर्जीव पदार्थ आपल्याला जीव की प्राण वाटायला लागतात. आपल्या आयुष्यात घडलेल्या महत्वपूर्ण घटनांचा संबंध आपल्याशीच नव्हे तर आपल्या भूतकाल, वर्तमानकाळ किंवा भविष्यकाळाशीही असतो. आपले विचार, मते, इच्छा, आकांक्षा, आवडी निवडी वगैरेंचा आपल्याइतका इतर कोणाशीच निकटचा संबंध नसतो.

आपण आधी त्यातल्या मानवी संबंधांबद्दल विचार करू. बहुतेक वेळा हे संबंध आपोआप किंवा योगायोगाने जुळतात, काही लोक त्याला सुदैवाने किंवा दैवयोगाने असेही मानतात. मूल जन्माला येताच त्याचे आई वडील, भाऊबहिणी, आजोबा आजी, काका. मामा, मावशी, आत्या वगैरे सगळ्या नातेवाईकांशी नातेसंबंध ही जन्माला येतात. शाळाकॉलेजात जाताच शिक्षक, प्राध्यापक, सहविद्यार्थी वगैरेंशी संबंध निर्माण होतात, तसेच नोकरीला लागताच सहकाऱ्यांशी होतात. पति किंवा पत्नी यांच्याबरोबरचे लग्न ठरवून केले जात असले तरी त्या क्षणी सासुरवाडीकडच्या सगळ्या नातेवाईकांशीसुद्धा आपले संबंध आपोआप जुळतात. खरेदी विक्रीचा व्यवहार ठरवून केला गेला तरी त्यामधून ग्राहक आणि विक्रेता यांच्याकडल्या इतर लोकांशीही संबंध येत राहतो. अशा प्रकारे बहुतेक सगळे मानवी संबंध आपोआप जन्माला येतात, अगदी थोड्या लोकांच्या बाबतीत मात्र आपण मुद्दाम प्रयत्न करून तो जुळवून आणतो.

मानवी संबंध आपणहून जन्माला येत असले तरी ते संबंध टिकवून ठेवणे मात्र जवळजवळ पूर्णपणे संबंधित व्यक्तींच्या हातात असते. संबंध आलेल्या व्यक्तीशी आपण कसे वागतो, कसे बोलतो याचप्रमाणे तो कसा प्रतिसाद देतो यावर ते अवलंबून असते. यासाठी दोन व्यक्तींनी सतत एकमेकांच्या संपर्कात राहणे आवश्यक असते, निदान ते उपयुक्त तरी असतेच. संपर्क तुटला की संबंधांवर धूळ साचायला लागते आणि ते विस्मृतीत जायला लागतात. आपल्याला  रोजच्या जीवनात जी माणसे भेटतात त्यांच्याशी आपण कधी गरजेनुसार कामापुरते बोलतो किंवा कधी कधी अवांतर गप्पाही मारतो. बोलणे झाले नाही तरी एकादे स्मितहास्य करून किंवा हात हालवून जरी त्याचे अभिवादन केले तरी त्यामधून आपले संबंध टिकून रहायला मदत होते. शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायामुळे अनेक लोकांना घर, गाव किंवा देशसुद्धा सोडून दूर जावे लागते. माझ्या लहानपणी पोस्टाने पत्र पाठवणे एवढाच संपर्कात रहाण्याचा एकमेव मार्ग उपलब्ध होता. पत्र पोचून त्याचे उत्तर यायला कित्येक दिवस लागत असत. यामुळे अशा प्रकारचा संपर्क फक्त अगदी निकटच्या निवडक लोकांशी ठेवला जात असे. मी तिशीमध्ये आल्यानंतर माझ्याकडे टेलीफोन आला आणि मला निदान काही स्थानिक लोकांशी तरी केंव्हाही बोलणे शक्य झाले. क्रमाक्रमाने एसटीडी आणि आयएसडी यांची सोय झाली आणि जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या आपल्या आप्तांशी बोलणे शक्य झाले. सुरुवातीला या सोयी महाग असल्यामुळे त्यांचा उपयोग जरा जपूनच केला जात असे. आता त्याही आपल्या आवाक्यात आल्या आहेत.

इंटरनेट सुरू झाल्यानंतर ई मेलद्वारे संदेश पाठवणे सुलभ आणि फुकट झाले. टेलीफोनच्या सोयी झाल्यानंतर व्यक्तीगत पत्रव्यवहार जवळजवळ संपुष्टात आला होता. ई मेलमधून त्याला एका वेगळ्या रूपामध्ये नवजीवन मिळाले. हाताने पत्रे लिहिण्याऐवजी लोक त्यांना संगणकावर टाइप करायला लागले. ऑर्कुट, फेसबुक, गूगलप्लस वगैरेंमुळे त्याला आणखी उधाण आले आणि आता ट्विटर आणि व्हॉट्सअपवर तर लहान लहान संदेशांचे महापूर यायला लागले आहेत. या सर्वांमध्ये एक अशी सोय आहे की आपण एकच संदेश एकाच वेळी कित्येक लोकांना पाठवू शकतो आणि त्यांचे प्रतिसादसुद्धा एकाच वेळी सर्वांना मिळतात. हे सगळे अगदी क्षणार्धात होते. यामुळे संपर्क साधून आपापसातले संबंध टिकवून ठेवणे आता खूप सुलभ झाले आहे. आंतर्जालावरली किंवा या मायानगरीतली ही माणसे प्रत्यक्ष आयुष्यात कामाला येतात का? असा प्रश्न विचारला अनेक वेळा जातो. त्याचे उत्तर असे आहे की ही सगळीच माणसे खरोखरच आपल्या उपयोगी पडू शकत नसली तरी एकाद दुसरा तरी मदतीसाठी पुढे येतोच. मुख्य म्हणजे आपली अडचण त्याला लगेच समजते.  एरवीच्या शांततेच्या काळात या मंडळींशी गप्पा मारून किंवा चर्चा करून आपल्याला एक प्रकारचा मानसिक किंवा बौद्धिक आनंद मिळत असतो.  आज माझे सुमारे तीनचारशे अशा प्रकारचे जालमित्र आहेत. त्यांच्याशी निरनिराळ्या विषयांवर गप्पा मारता मारता किंवा फक्त त्यांनी टाकलेल्या पोस्ट वाचत व चित्रे पहात पहातसुद्धा सारा दिवस आरामात चालला जातो.

संबंध टिकवून ठेवणे आपल्या हातात असते आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. ते तोडून टाकणे किंवा वाढू न देणे सुद्धा आपल्याच हातात असते आणि त्यासाठी विशेष काही करावेही लागत नाही. शिवाय आपल्याला ज्यांच्याशी संबंध ठेवायचे असतात तोच जर त्यासाठी उत्सुक नसेल तर मात्र आपण काही करूही शकत नाही. संबंध ठेवले गेले नाहीत तर ते आपल्या आप क्षीण होत होत नाहीसे होतात. काही वेळा काही अप्रिय घटना घडतात त्यामुळे ते तुटले जातात किंवा मुद्दाम तोडले जातात.  दुधाने तोंड पोळलेला माणूस ताकसुद्धा फुंकून पितो याप्रमाणे  वाईट अनुभव आलेले काही लोक कोणत्याही अनोळखी किंवा अविश्वसनीय व्यक्तींपासून  थोडे अंतर राखूनच राहतात. काही वेळा एका काळी जवळची वाटत असलेली  माणसेसुद्धा कोणत्याही कारणाने एकमेकांपासून दूर गेल्यामुळेच संपर्कात रहात नाहीत आणि त्यामुळे ती माणसे हळू हळू मनानेही दूर जातात. आत्मकेंद्रित वृत्तीची (इन्ट्रोव्हर्ट) काही माणसे तुसडी किंवा माणूसघाणीच असतात. त्यांचे कुणावाचून काहीसुद्धा अडत नाही याचीच त्यांना घमेंड असली तर त्यांचे कुणाशीही चांगले संबंध जुळतच नाहीत.

संपर्क जोडणे आणि वाढवणे हे गुण लहान मुलांमध्ये भरपूर जास्त प्रमाणात असतात.  ती पटकन कोणालाही आपलेसे करतात. पण त्याचप्रमाणे हे सहजपणे जुळलेले संबंध ती लगेच विसरूनसुद्धा जातात. जसजसे वय वाढत जाते, जगाचे अनुभव येत जातात, टक्केटोणपे खाल्ले जातात त्यानुसार माणसे याबद्दल विचार करायला लागतात. कोणाशी किती प्रमाणात जवळचे संबंध ठेवावे हे ठरवायला लागतात. त्या संबंधामधून होत असलेल्या आणि होऊ शकणाऱ्या नफ्यातोट्याचा विचार करायला लागतात.  अशा प्रकारचे संबंध किती विशुद्ध आहेत आणि त्यात किती आपमतलबीपणा आहे हे चांचपून पहातात. लहानपणी जुळलेले संबंध सहसा पूर्णपणे तुटत नाहीत. ती व्यक्ती चारपाच दशकांनंतर जरी भेटली तरी पूर्वीच्या आठवणी उसळून वर येतात. हे काही प्रमाणात मोठेपणी भेटलेल्या व्यक्तींसंबंधातसुद्धा घडत असते. पूर्वीच्या काळी जवळ आलेली एकादी व्यक्ती कित्येक वर्षांनंतर नुसती भेटली तरी आपल्याला केवढा आनंद होतो! आपण तिच्याशी पहिल्याच जवळकीने छान बोलतो, त्यानंतर आपण पुन्हा एकमेकांना निवांतपणे भेटू असे नेहमी बोलले जाते. पण क्वचितच ते अंमलात आणता येते. ज्या कारणांमुळे आपले संबंध कमजोर झालेले असतात ती कारणे शिल्लक असली तर ते नव्याने जुळलेले पूर्वीचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी मनापासून खूप प्रयत्न केले जात नाहीत. माझ्या नात्यातली किंवा मैत्रीतली अशी कित्येक माणसे आहेत जी मला अचानक एकाद्या समारंभात भेटतात, त्या वेळी ती अत्यंत आपुलकीने बोलतात, एकमेकांना पुन्हा सवडीने भेटत रहायच्या योजना आखतात आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या एकाद्या समारंभातच भेटतात आणि अशा प्रकारे पूर्वीच्या भेटींची पुनरावृत्ती होत रहाते.

या विषयावर लिहावे तितके थोडे आहे. जे दोन चार ठळक मुद्दे आठवले तसे लिहिले आहेत
. . . .  . . . . .  पुढील भाग : मानवी संबंध (उत्तरार्ध) - प्रेमबंध
http://anandghan.blogspot.com/2015/09/blog-post.html

Friday, August 07, 2015

शस्त्रक्रियेची पूर्वतयारी - भाग २

मी अँब्युलन्समध्ये जाऊन झोपलो त्या वेळी माझ्या डोक्याला झालेली जखम ठणकत असली तरी ते काम करत होते आणि अंगात अशक्तपणा आलेला असला तरी माझ्यात बोलायचे त्राण होते. मी उदयला विचारले, "सगळी कागदपत्रे घेतलीस ना रे?" हो म्हणत त्याने हातातला लिफ़ाफ़ा दाखवला. त्यात फक्त एक रेफ़रल लेटर होते, माझ्या दोन्ही हातांच्या अमक्या अमक्या हाडांचे ऑपरेशन आणि मॅनेजमेंट एवढेच त्यात लिहिलेले होते आणि इतर ठराविक छापील मजकूर होता, बीएआरसी हॉस्पिटलमध्ये याआधी केलेल्या तपासण्यांचे रिपोर्ट, तिथे दिलेली औषधे वगैरेंचे एकादे डोसियर मला अपेक्षित होते, ते नव्हते. एवढ्यात ड्रायव्हरने गाडी सुरू केली आणि आम्ही मार्गस्थ झालो. फोर्टिस हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी विचारले तर त्यांना काय सांगायचे हा माझ्या मनात उठलेला प्रश्न उदयला विचारायचे राहूनच गेले. त्यासाठी कदाचित उदयला आणखी एक फेरी मारावी लागली असती, पण त्याची गरज पडली नाही. माझ्या एक्सरे फिल्म आमच्याकडेच होत्या, तेवढ्यावरच काम भागले. जिथे आमचा अपघात झाला होता ती जागा वाशीकडे जात असतांना वाटेत आली . आता त्या भयानक घटनेचा मागमूसही तिथे राहिलेला नव्हता. त्यानंतर कित्येक हजार गाड्या त्या स्पॉटवरून गेल्या असतील. त्यातल्या लोकांना आमच्या वाट्याला आलेल्या भोगाची पुसटशी जाणीवही व्हायचे काही कारण नव्हते.

अँब्युलन्समधून उतरल्यावर मला फोर्टिस हॉस्पिटलच्या कॅज्युअल्टी विभागात दाखल करण्यात आले. त्यासाठी असलेला एक सविस्तर फॉर्म उदयने भरल्यानंतर मला त्यावर सही करायची होती, पण ते शक्यच नव्हते, डावा अंगठाही बँडेजमध्ये बंद होता, मंग उजव्या हाताच्या अंगठ्याला शाई लावून ठसा उमटवला गेला. तिथल्या नर्सने मात्र स्पिरिट लावून ती शाई लगेच पुसून टाकली, बीएआरसी हॉस्पिटलमध्ये डाव्या अंगठ्याला लावलेला रंग पुसट होत निघायला आणखी चार पाच दिवस लागले. अॅडमिशनच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी उदय फोर्टिस हॉस्पिटलच्या अकाउंट्स आणि अॅडमिन डिपार्टमेंट्सकडे ये जा करत होता आणि कॅज्युअल्टीत डोकावून माझ्यावरही लक्ष ठेवत होता. त्या दिवंशी बहुधा ते काम पूर्ण झालेच नाही, त्यातले उरलेले शेपूट त्याने दुस-या दिवशी सकाळी आल्यावर पूर्ण केले. इकडे कॅजियुअल्टीतले डॉक्टर आणि नर्सेस मात्र त्यांच्या कामाला लागले होते. त्यांनी पुन्हा माझ्या सर्व शरीराची संपूर्ण तपासणी केली, हातांवरची बँडेजेससुद्धा उलगडून आणि प्लॅस्टर कापून काढून आतल्या हातांना तपासले. नुकताच एकादा अपघात होऊन आलेला मी एक नवा रुग्ण असावा अशा प्रकारे त्यांचे काम चालले होते.

थोड्याच वेलात डॉ.सिद्धार्थ यादव यांचे आगमन झाले. त्यांचे उंचेपुरे आणि भारदस्त व्यक्तीमत्व याचीच कोणावरही अनुकूल छाप पडत असणार. हे सर्जन आपले ऑपरेशन करणार आहेत हे पाहून त्या अवस्थेतही मला बरे वाटले. डॉक्टरसाहेबांनी आल्या आल्या भराबर सारी कागदपत्रे वाचून त्यांच्या सहाय्यकांच्या नोंदी पाहिल्या. माझे एक्सरे फोटो लक्षपूर्वक पाहून सांगितले की दोन्ही हातांमध्ये प्लेट्स घालाव्या लागतीलच. "आपण उद्या दुपारी ऑपरेशन करून घेऊ" असे त्यांनी सांगितले तेंव्हा तर मला आश्चर्याचा एक लहानसा धक्काच बसला. त्यापूर्वी करायच्या तपासण्यांची एक मोठी यादी त्यांनी सहाय्यकांना पटापट सांगितली. डॉक्टर निघण्याच्या तयारीत असतांनाच डॉक्टर असलेला माझा भाचा श्री तिथे येऊन पोचला. त्याने वैद्यकीय भाषेत काही चर्चा केली त्यावरून मला एवढेच समजले की उजव्या हाताचे जे हाड मोडलेले आहे त्याला हे लोक ह्यूमरस असे म्हणतात. माझे हे हाड़ इतक्या जोराने ठणकत होते की यातल्या ह्यूमरसपणाला (विनोदाला) मी दाद देऊ शकत नव्हतो.

डॉक्टर यादव यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी लगेच सुरू झाली. माझ्या शरीरातल्या रक्तातल्या अनेक घटकांची पुन्हा एकदा नव्याने तपासणी आणि मोजणी करायची होती. त्यासाठी लागणारे रक्त कुठून आणि कसे काढायचे हा प्रश्न होताच. उजवा हात स्लिंगमधून बाहेर काढून त्याच्या मनगटाच्या शेजारी दोन तीन ठिकाणी सुया खुपसून पाहिल्यावर एका जागी त्यांना रक्ताचा झरा  (व्हेन) सापडला. दोन तीन टेस्ट ट़्यूबमध्ये त्यातल्या रक्ताचे नमूने काढून घेतले गेले. रक्तदाब कसा तपासा़यचा हा दुसरा प्रश्न होताच. उजव्या पायाच्या घोट्याच्या आसपास थोडीशी मोकळी जागा मिळाली तिथे बीपी मीटरचा पट्टा गुंडाळून त्याची झाली तशी नोंद केली. त्या वेळी मला मूत्रविसर्जनाचा काही त्रास होत नसला तरी ऑपरेशन करण्यासाठी त्य जागी एक कॅथेटर जोडून ठेवणे गरजेचे होते. ते लावून त्याला प्लॅस्टिकच्या नळीने एक पिशवी जोढून आणि बांधून ठेवली. शरीरामध्ये इंजेक्शने देण्यासाठी उजव्या हाताच्या पंजावर एक आय व्हीसाठी सुई खुपसून ठेवली. माझे शरीर आता पूर्णपणे कॅज्युअल्टीमधील डॉक्टर्स व नर्सेस यांच्या ताब्यात होते. त्यावर जे जे काही चाललेले होते ते स्वस्थपणे पाहणे आणि त्यातून ज्या वेदना होतील त्या सोसणे एवढेच मी करू शकत होतो.

त्यानंतर फोर्टिस हॉस्पिटलच्या निरनिराळ्या विभागांमधून  माझी ट्रॉलीवरली वरात हिंडायला निघाली. एकापाठोपाठ एक आणखी काही तपासण्या करून घ्यायच्या होत्याच. सर्वात आधी आम्ही स्कॅनिंग सेक्शनमध्ये गेलो. स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी उपयोगात येतात तशा बोगी हर्थ फर्नेसेस मी अनेक ठिकाणी पाहिल्या होत्या, एक दोन वेळा इलेक्ट्रिक क्रिमेटोरियमही पाहिले होते, तिथल्या यंत्रांची आठवण मला त्या स्कॅनरला पाहून  झाली. माझ्या ट्रॉलीची उंची तिथल्या बोगीएवढी वाढवून समान केली. मग चार जणांनी चार कोप-यात धरून माझ्या अंगाखालील बेडशीटसकट मला उचलले आणि त्या बोगीवर ठेवले. कारखान्यांमध्ये असते तशी क्रेन वापरली नाही नशीब. मग मला कुशीवर वळवून हळूच माझ्या अंगाखालची बेडशीट काढून घेतली. ऑपरेटरला सोडून बाकी सारे जण त्या खोलीबाहेर गेले. गळ्यात शील्डिंगचे जाड आवरण अडकवून ऑपरेटर माझ्या जवळ आला. मी केंव्हा श्वास घ्यायचा, धरून ठेवायचा, सोडायचा, किती निस्तब्ध रहायचे वगैरे सूचना पटापटा सांगून तो पॅनेलपाशी गेला. मी होकारारार्थी मानसुद्धा हलवली नाही.  

त्याने त्या यंत्राचे बटन दाबताच माझी बोगी हलायला लागली आणि आधी झरकन पुढे सरकली. माझे मस्तक त्या यंत्राच्या कमानीत शिरल्यानंतर तिचा वेग मंदावला आणि ती अत्यंत सूक्ष्म गतीने पुढे मागे सरकायला लागली.  त्या कमानीच्या आत एक प्रचंड आकाराची रिंग होती. एक क्ष किरणाचा झोत त्या रिंगमध्ये गोल गोल फिरत सर्व बाजूंनी माझ्या मस्तकामधून आरपार जात होता आणि पलीकडच्या बाजूला असलेल्या सेन्सर्समध्ये त्याचे रेकॉर्डिंग होत होते. मी भीतीने पटकन माझे डोळे मिटून घेतले, पण तरीही ते तीव्र किरण माझ्या पापण्यांच्या आत जाऊन डोळ्यांच्याही आरपार थेट मेंदूमध्ये जाणार होतेच. पण तेवढ्या एक्स्पोजरमुळे त्या अवयवांना इजा होण्याची शक्यता फार कमी होती. माझे डोके अत्यंत हळूहळू  त्या यंत्राच्या पूर्णपणे आत जाऊन पुन्हा बाहेर आल्यावर त्यााचे घरघरणे थांबले आणि अशा प्रकारे माझा सीटी स्कॅन पूर्ण झाला. त्यानंतर माझ्या खांद्याचा थ्री डी स्कॅन करायचा होता. त्यासाठी मला पुन्हा एकदा त्या यंत्रामधून आतबाहेर केले गेले.

मेंदू आणि खांद्याचे स्कॅनिंग संपल्यानंतर माझ्या हृदयाचा टू डी इकोकार्डिओग्रॅम काढायचा होता. त्यासाठी वेगळ्या खोलीत नेण्यात आले.  तिथल्या डॉक्टरने एक सेन्सर माझ्या छातीवरून फिरवत फिरवत आत काय चालले आहे याची स्क्रीनवर पाहून तपासणी केली. यावेळी आतल्या रक्ताभिसरणाचे खळखळाटासारखे आवाज मलाही मोठमोठ्याने ऐकू येत होते.  आपल्या हृदयामध्ये आपले रक्त अशा प्रकारे उसळ्या घेत असते हे मी प्रथमच अनुभवले आणि सळसळते रक्त असे का म्हंटले जाते हे समजले.

अखेर एकदाचे मला माझ्या खोलीत नेण्यात आले तोंपर्यंत जेवणाची वेळ टळून गेली होती, पण माझ्यासाठी जेवण आणून ठेवलेले होते ते चार घास पोटात ढकलणे आवश्यक होते. दुस-या दिवशी ऑपरेशन असल्यामुळे कडकडीत उपासच घडणार होता. रात्री एक ब्रदर (मेल नर्स) येऊन मला सांगून गेला की दुसरे दिवशी सकाळी सातच्या आत मी थोडा नाश्ता करू शकतो आणि त्यानंतर अकरा वाजेपर्यंत फक्त द्रवरूप पदार्थ सेवन करू शकतो. अकरा वाजल्यानंतर मात्र पाण्याचा थेंबसुद्धा प्यायचा नव्हता. त्यानुसार पहाटेच मला उठवून साडेसहालाच काही खायला दिले गेले आणि त्यासोबत माझी औषधे दिली गेली. त्यानंतर मलाही काही खाण्यापिण्याची इच्छा नव्हतीच. शिवाय एकापाठोपाठ एकेक कामे चालली होती.  एक न्हावी येऊन सर्वांगावरचे केस भादरून गेला. त्यानंतर आलेल्या सुपरवायजरला त्यात काही न्यून दिसले म्हणून त्याने हजामाला पुन्हा पाचारण करून जास्त तुळतुळीत हजामत करवून घेतली. मला आयव्हीमधून देण्यात येत असलेल्या औषधांच्या बाटल्या तर एका पाठोपाठ एक कोणी ना कोणी सारखे येऊन बदलून जात होते. मध्येच एकादी परिचारिका येऊन नाडीचे ठोके, रक्तदाब, रक्तातल्या प्राणवायूचे प्रमाण, तापमान वगैरे मोजून जात होती.  माझ्याकडे खूपच लक्ष दिले जात होते.

आदले दिवशी केलेल्या रक्ताच्य तपासण्या, सीटी स्कॅन, थ्रीडी स्कॅन, टूडी एको वगैरेंचे रिपोर्ट्स येऊन त्या त्या विषयातल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी पाहून झाल्यावरच ऑपरेशनला अनुमती मिळणार होती. आमच्या हॉस्पिटलमध्ये यात निदान दोन तीन दिवस जातात, पण इथे सगळे  समांतर चालले होते. या सगळ्या गोष्टी समाधानकारक असणारच असे गृहीत धरून एकेक कामे उरकवली जात होती. ऑपरेशन तर दुपारी होणार होते. तोपर्यंत अंगात थोडी शक्ती शिल्लक रहावी अशा सूज्ञ विचार करून पावणेअकराच्या सुमाराला मीच माझ्या मुलाला एकादा ज्यूस मागवायला सांगितले. रूम सर्व्हिसने तो येणार असल्याची चिन्हे न दिसल्याने तो स्वतः खाली गेला आणि मोठ्या मिनतवारीने फ्रूटीचे एक पॅकेट घेऊन अकरा वाजायच्या आत वर आला आणि मीही तहान भूक लागलेली नसतांनाच ते प्राशन केले.  

ठरल्या वेळी म्हणजे सुमारे दीड पावणेदोन वाजता मला ऑपरेशन थिएटरकडे नेण्यात आले. पहिल्या दरवाजामधून आत गेल्यावर तिथल्या वेगळ्या गणवेशातल्या स्टाफने माझा ताबा घेतला.  माझ्या व्हीलचेअरला ढकलत असतांना एकाने सहज म्हणून विचारले,  "सकाळपासून काही खाल्ला प्याला नाहीत ना?"
 "अजीबात काही खाल्ले नाही" मी उत्तर देत देत माहिती सांगितली, "फक्त थोडासा फळांचा रस घेतला."
"काय?" असे म्हणत तो जागच्या जागीच थबकला.
"अहो आम्हाला काल असेच सांगितले होते." मी गयावया करत म्हंटले.
"द्रवरूप पदार्थ म्हणजे फक्त पाणी प्यायला परवानगी असते" त्याने नवीनच व्याख्या सांगितली. आता एवढ्या कारणाने माझे ऑपरेशन रद्द होणार की काय? मला चिंता लागली. पण त्या गणवेशधारकांच्या म्होरक्याने पुढे जायचा निर्णय घेतला आणि मला पुढच्या दालनात नेता नेताच एक इंजेक्शन दिले गेले. त्यानंतर काही सेकंदांमध्येच माझी शुद्ध पूर्णपणे हरपली.