Tuesday, September 08, 2015

मानवी संबंध (उत्तरार्ध) - प्रेमबंध

आधीचा भाग : मानवी संबंध (पूर्वार्ध) -जुळणे आणि तुटणे
http://anandghan.blogspot.com/2015/08/blog-post_29.html

आपण माणसामाणसांमधल्या संबंधांचा विचार करतो त्यावेळी बहुतेक वेळा तो विचार त्यांच्या आपसातल्या चांगल्या संबंधांबद्दल असतो. जवळच्या किंवा सर्वात आतल्या वर्तुळातल्या लोकांशी सर्वांचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि घनिष्ठ संबंध असतात, माणसांमाणसांमधले अंतर जसजसे वाढत जाते तसतशी त्या  संबंधांची वीण सैल होत जाते. थोड्या बाहेरच्या वर्तुळातल्या लोकांशी सर्वांचे सलोख्याचे संबंध असतात आणि दूरच्या इतर लोकांशी कामापुरते वरवरचे संबंध असतात. ज्यांच्याबद्दल मनात वैरभाव किंवा द्वेष असतो त्यांच्याशी सहसा कोणी संबंध ठेवतच नाहीत आणि ठेवलेच तर ते औपचारिक तोंडदेखले खोटे खोटे असतात, म्हणजे खरे तर ते नसल्यातच जमा असतात.  काही वेळा मात्र एका माणसाला दुसरा माणूस जवळचा वाटत असतो पण तो मात्र पहिल्या माणसापासून दूर दूर रहात असतो असे अनुभवसुद्धा येतात. यामुळे त्यांचे परस्परसंबंध गुंतागुंतीचे होतात.  दोन व्यक्तींमध्ये चांगले संबंध प्रस्थापित होत असतांना त्यामधून आपुलकीची भावना निर्माण होते. आपुलकी आणि प्रेमाच्या धाग्याने ते लोक एकमेकांशी बांधले जातात, म्हणून त्यांना संबंध असे म्हणायचे. हे बंधन का आणि कसे होत असेल?

परमेश्वराने किंवा निसर्गाने जगातल्या सर्वच प्राणिमात्रांना स्वतःचा जीव वाचवण्याची एक जबरदस्त अंतःप्रेरणा (Instinct) दिलेली आहे. किडामुंगींपासून वाघ, सिंह. हत्ती वगैरेंपर्यंत प्रत्येक जीव स्वसंरक्षणासाठी सदोदित धडपडत असतो. आपल्या जिवाला धोका आहे असे वाटताच तो लपून बसतो, पळून जातो किंवा शत्रूवर प्रतिहल्ला चढवतो. प्रत्येक सजीव प्राण्याच्या शरीराला अन्नाची गरज असते म्हणूनमुळे ते शोधत तो फिरत असतो आणि त्याला विश्रांती व निद्रा यांची गरज असते म्हणून त्यासाठी तो निवारा पाहतो.  या दोन्हींचा समावेशसुद्धा त्या प्राण्याच्या जीव वाचवण्याच्या मूलभूत प्रेरणेबरोबरच करता येईल. या बाबतीत प्रत्येक प्राणी हा मुख्यत्वे स्वार्थीच असतो. सशक्त शाकाहारी प्राणी दुसऱ्या कमजोर प्राण्याच्या समोरचे अन्न बिनदिक्कतपणे खायचा प्रयत्न करतात तर मांसाहारी प्राणी दुसऱ्या प्राण्यांनाच खाऊन टाकतात. निवाऱ्याच्या बाबतीतसुद्धा निसर्गामध्ये बळकावणे चाललेले असते. सगळे नागोबा आयत्या बिळातच घुसून वास्तव्य करतात. तसे पाहता माणूससुद्धा त्याच्या मूळ स्वभावाने स्वार्थीच असतो, संस्काराने त्याच्यात बदल होतात. त्याशिवाय इतरही काही कारणे असतात.

समस्त प्राणीमात्र नेहमी स्वतःचा स्वार्थ पहात असले तरी त्यांना इतर प्राणीमात्रांच्या सोबतीनेही रहायचे असते. कदाचित त्यात त्यांना अधिक सुरक्षित वाटत असेल. म्हणजे हा सुद्धा आपला जीव वाचवण्याचाच एक भाग झाला. तशा प्रकारची दुसरी अंतःप्रेरणाही त्याला मिळत असते. यामुळेच जगातले बहुतेक प्राणी, कीटक, मासे, पक्षी वगैरे जीव कळप करून राहतात. तसे रहात असतांना त्यांना स्वतःच्या स्वार्थाला थोडी मुरड घालणे, थोड्या गोष्टी इतरांसाठी सोडणे, इतरांचा थोडा त्रास सोसणे वगैरे करणे भाग असते. एकाद्याने तसे नाही केले तर कळपातले इतर प्राणी त्याला हुसकावून लावतील अशी भीती असते. बहुतेक सगळी माणसेसुद्धा लहानमोठ्या समूहांमध्ये राहणेच पसंत करतात. आपले कुटुंब, वस्ती, गाव, प्रदेश, देश, जग  किंवा कुटुंब, पोटजात, जात, धर्म अशा चढत्या भाजणीने त्यांच्या समूहाच्या व्याख्या बदलत जातात एवढेच. त्याचे वागण्याचे नियम त्यानुसार ठरत जातात आणि ते पाळण्याची गरज त्यांना वाटते. ते करत असतांना स्वार्थाला बाजूला ठेवावे लागतेच.

पण या सगळ्यांच्या पलीकडे जाणारी आणखी एक दिव्य अशी अंतःप्रेरणा माणसाला तसेच इतर जीवांना मिळत असते.  प्रत्येक प्राणी किंवा पक्षी आपल्या पिलांवर माया करतात, त्यांचे जिवापाड संरक्षण करतात, त्यांच्यासाठी अन्नाची तरतूद करतात. यात त्यांचा कसलाही स्वार्थ नसतो किंवा हा परस्पर सहकाराचा भागही नसतो. यात शुद्ध आपुलकी आणि प्रेम असते. पक्षी जोडप्याने रहात असतात, त्यांनाही आपल्या जोडीदाराविषयीसुद्धा विशेष असे काही वाटत असणार. एका कळपातल्या प्राण्यांमध्ये एक प्रकारची जवळीक निर्माण होत असते. पाळीव प्राणी नेहमीच त्यांना पाळणाऱ्यांशी मायेच्या नात्याने जोडले जातात.  हे मुके जीव त्यांच्या डोळ्यांमधून किंवा अंगलटीला येऊन प्रेम व्यक्त करतात. कुत्रा हा प्राणी तर अत्यंत इमानदार समजला जातो. त्यांचे हे वागणे हे नैसर्गिक स्वार्थभावनेच्या विरुद्ध असले तरी होत असते. ते कशामुळे होत असेल ?

सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांचा पगडा सर्व माणसांच्या आचार आणि विचारांवर असतो आणि त्यानुसार ती वागत असतात असे आपल्या प्राचीन शास्त्रांमध्ये लिहिले आहे सांगितले जाते. प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत या तीन गुणांचे प्रमाण मात्र निरनिराळे असते. दुसऱ्याकडील वस्तू हिसकावून किंवा लुबाडून घेणे, तिचा विध्वंस करणे ही राक्षसी वृत्ती माणसातल्या तम या वाईट गुणाच्या प्रभावामुळे येते. आपल्याला हवे असेल ते आपल्या प्रयत्नाने आणि परिश्रमाने मिळवण्याची धडपड सर्वसाधारण माणसे करत असतात. ही मानवी वृत्तीची क्रिया त्यांच्यातल्या रज या गुणामुळे त्यांच्याकडून घडत असते. काही दुर्मिळ लोक स्वतः उपाशी राहून आपला घास भुकेल्यांना भरवतात, इतरांचा फायदा व्हावा यासाठी स्वतः तोशीस सोसतात. इतरांना सुखी करण्यात स्वतःचा आनंद शोधतात. अशा लोकांची गणना देवमाणूस म्हणून केले जाते. परोपकार, दया, माया, भक्ती, सचोटी, कृतज्ञता वगैरे दैवी गुण माणसातल्या सत्त्वगुणामधून येतात. प्रेमाची भावना हे सत्त्वगुणाचे सर्वात सुंदर असे रूप आहे.  प्रेमळ लोक सात्त्विक प्रवृत्तीचे असतात किंवा सात्त्विक लोक प्रेमळ असतात असे आपण पाहतोच. प्रत्येक माणसाच्या अंगात काही प्रमाणात सत्त्वगुण असतात आणि जे कोणी लोक त्याला आपलेसे वाटत असतात त्यांच्यासंबंधी त्यालासुद्धा प्रेम, माया, ममता वगैरे वाटत असते, तो त्यांची काळजी करतो आणि घेत असतो.

प्रेम ही भावना बांधून ठेवणारी असते. त्याने माणसे एकमेकांशी जोडली जातात आणि राहतात. माणसांना जन्मतःच आईचे प्रेम मिळते आणि ते मिळत राहते. वडील, भाऊ, बहीण, आजी, आजोबा, काका, काकू वगैरे घरातील इतर व्यक्तींचा लळा त्यांना सहवासातून लागत जातो. त्यात हळूहळू इतर नातेवाईक, शेजारी, शिक्षक वगैरेंची भर पडत जाते. पुढे त्यांचा स्वतःचा मित्रपरिवार निर्माण होतो आणि तो वाढत जातो. तरुण वयात ते आपल्या जोडीदाराची निवड करतात. नैसर्गिक आकर्षणामुळे त्यांच्या एकमेकांवर वसलेल्या प्रेमाचे धागे खूप घट्ट होतात. ते बंध त्यांना इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्वाचे वाटायला लागतात. अगाध मित्रप्रेमाविषयी खूप लिहिले गेले आहे. देश, धर्म यांच्याविषयी वाटणाऱ्या प्रेमासाठी कित्येक भक्तांनी बलिदान केलेले आहे. देवभक्तीमध्ये लीन झालेल्या व्यक्तीला इतर कशाचेच भान रहात नाही. इतकेच काय पण लेखक, कवी, गायक, नटनट्या यांच्यावरील एकतर्फी प्रेमापोटी माणसे वेडी होतात. आवडत्या नेत्याचे अनुयायी आपले तनमनधन त्याला अर्पण करतात.

या सगळ्याच्या मागे असलेले प्रेमबंध हे समान कारण असते.  ज्या व्यक्ती, संस्था किंवा समाज यांच्याविषयी आपल्याला आपुलकी वाटत असते, त्याच्या संबंधातले सगळे काही जाणून घ्यायला, ऐकायला, बोलायला आपल्याला आवडते, त्याला काही होणार तर नाही ना किंवा कसे होणार याची चिंता वाटते आणि काही बिनसले तर दुःख होते, त्याला यश मिळाले तर आनंद होतो. कारण आपण त्याच्याशी जोडले गेलेले असतो. ग्वाटेमालात एकादा अपघात झाला किंवा सोमालियात  दंगल झाली आणि त्यात जीवित वित्त यांची हानी झाली असे आपण बातम्यांमध्ये वाचले किंवा ऐकले तर क्षणभर हळहळ वाटेल, पण तसे काही पुण्यामुंबईला घडले तर आपण बेचैन होऊन जातो कारण ज्यांच्याबद्दल आपल्याला प्रेम वाटते अशा अनेक व्यक्ती तिथे रहात असतात किंवा काही कारणाने तिथे गेलेल्या असतात, आपल्याला त्यांची काळजी वाटते,  तिथल्या काही जागांना आपल्या भावविश्वात स्थान असते, त्या ठिकाणच्या नेमक्या परिस्थितीची माहिती मिळवण्यासाठी आपण धडपड करतो. या सर्वांशी आपण बांधले गेलेलो असल्यामुळे तिथे काय घडले याचा आपल्यावर परिणाम होतो.

या विषयावर असंख्य लोकांनी अगणित वेळा अमाप लिहिले असले तरी पुन्हा त्यालर लिहावे वाटते कारण या विषयाबद्दल आपल्याला आणि वाचकांना वाटणारा जिव्हाळा आणि प्रेमबंध.

No comments: