संबंध या शब्दाची व्याप्ती फार विस्तृत आहे. ते व्यक्तीव्यक्तींमधले असतात तसेच इतर सजीव प्राणी, निर्जीव वस्तू, घटना किंवा विचार, सिद्धांत वगैरे अॅब्स्ट्रॅक्ट गोष्टींशीसुद्धा असतात. आपल्या परिचयातल्या काही व्यक्ती त्यांच्या घरात कुत्रा किंवा मांजर पाळतात, ग्रामीण भागात काही लोकांच्या गोठ्यात गायीम्हशी असतात. त्या मुक्या प्राण्यांशी या लोकांचे घट्ट संबंध जुळलेले असतात. आपण त्यांच्याकडे जात येत असलो तर ते प्राणी आपल्याला ओळखायला लागतात आणि आपल्यालाही त्यांच्याबद्दल काही वाटायला लागते. शिवाय ते लोक आपले आहेत असे जरी म्हंटले की त्यांच्याकडल्या प्राण्यांशीसुद्धा आपला अप्रत्यक्ष संबंध जुळतोच. आपले कपडे, पुस्तके, घर वगैरें निर्जीव पदार्थ आपल्याला जीव की प्राण वाटायला लागतात. आपल्या आयुष्यात घडलेल्या महत्वपूर्ण घटनांचा संबंध आपल्याशीच नव्हे तर आपल्या भूतकाल, वर्तमानकाळ किंवा भविष्यकाळाशीही असतो. आपले विचार, मते, इच्छा, आकांक्षा, आवडी निवडी वगैरेंचा आपल्याइतका इतर कोणाशीच निकटचा संबंध नसतो.
आपण आधी त्यातल्या मानवी संबंधांबद्दल विचार करू. बहुतेक वेळा हे संबंध आपोआप किंवा योगायोगाने जुळतात, काही लोक त्याला सुदैवाने किंवा दैवयोगाने असेही मानतात. मूल जन्माला येताच त्याचे आई वडील, भाऊबहिणी, आजोबा आजी, काका. मामा, मावशी, आत्या वगैरे सगळ्या नातेवाईकांशी नातेसंबंध ही जन्माला येतात. शाळाकॉलेजात जाताच शिक्षक, प्राध्यापक, सहविद्यार्थी वगैरेंशी संबंध निर्माण होतात, तसेच नोकरीला लागताच सहकाऱ्यांशी होतात. पति किंवा पत्नी यांच्याबरोबरचे लग्न ठरवून केले जात असले तरी त्या क्षणी सासुरवाडीकडच्या सगळ्या नातेवाईकांशीसुद्धा आपले संबंध आपोआप जुळतात. खरेदी विक्रीचा व्यवहार ठरवून केला गेला तरी त्यामधून ग्राहक आणि विक्रेता यांच्याकडल्या इतर लोकांशीही संबंध येत राहतो. अशा प्रकारे बहुतेक सगळे मानवी संबंध आपोआप जन्माला येतात, अगदी थोड्या लोकांच्या बाबतीत मात्र आपण मुद्दाम प्रयत्न करून तो जुळवून आणतो.
मानवी संबंध आपणहून जन्माला येत असले तरी ते संबंध टिकवून ठेवणे मात्र जवळजवळ पूर्णपणे संबंधित व्यक्तींच्या हातात असते. संबंध आलेल्या व्यक्तीशी आपण कसे वागतो, कसे बोलतो याचप्रमाणे तो कसा प्रतिसाद देतो यावर ते अवलंबून असते. यासाठी दोन व्यक्तींनी सतत एकमेकांच्या संपर्कात राहणे आवश्यक असते, निदान ते उपयुक्त तरी असतेच. संपर्क तुटला की संबंधांवर धूळ साचायला लागते आणि ते विस्मृतीत जायला लागतात. आपल्याला रोजच्या जीवनात जी माणसे भेटतात त्यांच्याशी आपण कधी गरजेनुसार कामापुरते बोलतो किंवा कधी कधी अवांतर गप्पाही मारतो. बोलणे झाले नाही तरी एकादे स्मितहास्य करून किंवा हात हालवून जरी त्याचे अभिवादन केले तरी त्यामधून आपले संबंध टिकून रहायला मदत होते. शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायामुळे अनेक लोकांना घर, गाव किंवा देशसुद्धा सोडून दूर जावे लागते. माझ्या लहानपणी पोस्टाने पत्र पाठवणे एवढाच संपर्कात रहाण्याचा एकमेव मार्ग उपलब्ध होता. पत्र पोचून त्याचे उत्तर यायला कित्येक दिवस लागत असत. यामुळे अशा प्रकारचा संपर्क फक्त अगदी निकटच्या निवडक लोकांशी ठेवला जात असे. मी तिशीमध्ये आल्यानंतर माझ्याकडे टेलीफोन आला आणि मला निदान काही स्थानिक लोकांशी तरी केंव्हाही बोलणे शक्य झाले. क्रमाक्रमाने एसटीडी आणि आयएसडी यांची सोय झाली आणि जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या आपल्या आप्तांशी बोलणे शक्य झाले. सुरुवातीला या सोयी महाग असल्यामुळे त्यांचा उपयोग जरा जपूनच केला जात असे. आता त्याही आपल्या आवाक्यात आल्या आहेत.
इंटरनेट सुरू झाल्यानंतर ई मेलद्वारे संदेश पाठवणे सुलभ आणि फुकट झाले. टेलीफोनच्या सोयी झाल्यानंतर व्यक्तीगत पत्रव्यवहार जवळजवळ संपुष्टात आला होता. ई मेलमधून त्याला एका वेगळ्या रूपामध्ये नवजीवन मिळाले. हाताने पत्रे लिहिण्याऐवजी लोक त्यांना संगणकावर टाइप करायला लागले. ऑर्कुट, फेसबुक, गूगलप्लस वगैरेंमुळे त्याला आणखी उधाण आले आणि आता ट्विटर आणि व्हॉट्सअपवर तर लहान लहान संदेशांचे महापूर यायला लागले आहेत. या सर्वांमध्ये एक अशी सोय आहे की आपण एकच संदेश एकाच वेळी कित्येक लोकांना पाठवू शकतो आणि त्यांचे प्रतिसादसुद्धा एकाच वेळी सर्वांना मिळतात. हे सगळे अगदी क्षणार्धात होते. यामुळे संपर्क साधून आपापसातले संबंध टिकवून ठेवणे आता खूप सुलभ झाले आहे. आंतर्जालावरली किंवा या मायानगरीतली ही माणसे प्रत्यक्ष आयुष्यात कामाला येतात का? असा प्रश्न विचारला अनेक वेळा जातो. त्याचे उत्तर असे आहे की ही सगळीच माणसे खरोखरच आपल्या उपयोगी पडू शकत नसली तरी एकाद दुसरा तरी मदतीसाठी पुढे येतोच. मुख्य म्हणजे आपली अडचण त्याला लगेच समजते. एरवीच्या शांततेच्या काळात या मंडळींशी गप्पा मारून किंवा चर्चा करून आपल्याला एक प्रकारचा मानसिक किंवा बौद्धिक आनंद मिळत असतो. आज माझे सुमारे तीनचारशे अशा प्रकारचे जालमित्र आहेत. त्यांच्याशी निरनिराळ्या विषयांवर गप्पा मारता मारता किंवा फक्त त्यांनी टाकलेल्या पोस्ट वाचत व चित्रे पहात पहातसुद्धा सारा दिवस आरामात चालला जातो.
संबंध टिकवून ठेवणे आपल्या हातात असते आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. ते तोडून टाकणे किंवा वाढू न देणे सुद्धा आपल्याच हातात असते आणि त्यासाठी विशेष काही करावेही लागत नाही. शिवाय आपल्याला ज्यांच्याशी संबंध ठेवायचे असतात तोच जर त्यासाठी उत्सुक नसेल तर मात्र आपण काही करूही शकत नाही. संबंध ठेवले गेले नाहीत तर ते आपल्या आप क्षीण होत होत नाहीसे होतात. काही वेळा काही अप्रिय घटना घडतात त्यामुळे ते तुटले जातात किंवा मुद्दाम तोडले जातात. दुधाने तोंड पोळलेला माणूस ताकसुद्धा फुंकून पितो याप्रमाणे वाईट अनुभव आलेले काही लोक कोणत्याही अनोळखी किंवा अविश्वसनीय व्यक्तींपासून थोडे अंतर राखूनच राहतात. काही वेळा एका काळी जवळची वाटत असलेली माणसेसुद्धा कोणत्याही कारणाने एकमेकांपासून दूर गेल्यामुळेच संपर्कात रहात नाहीत आणि त्यामुळे ती माणसे हळू हळू मनानेही दूर जातात. आत्मकेंद्रित वृत्तीची (इन्ट्रोव्हर्ट) काही माणसे तुसडी किंवा माणूसघाणीच असतात. त्यांचे कुणावाचून काहीसुद्धा अडत नाही याचीच त्यांना घमेंड असली तर त्यांचे कुणाशीही चांगले संबंध जुळतच नाहीत.
संपर्क जोडणे आणि वाढवणे हे गुण लहान मुलांमध्ये भरपूर जास्त प्रमाणात असतात. ती पटकन कोणालाही आपलेसे करतात. पण त्याचप्रमाणे हे सहजपणे जुळलेले संबंध ती लगेच विसरूनसुद्धा जातात. जसजसे वय वाढत जाते, जगाचे अनुभव येत जातात, टक्केटोणपे खाल्ले जातात त्यानुसार माणसे याबद्दल विचार करायला लागतात. कोणाशी किती प्रमाणात जवळचे संबंध ठेवावे हे ठरवायला लागतात. त्या संबंधामधून होत असलेल्या आणि होऊ शकणाऱ्या नफ्यातोट्याचा विचार करायला लागतात. अशा प्रकारचे संबंध किती विशुद्ध आहेत आणि त्यात किती आपमतलबीपणा आहे हे चांचपून पहातात. लहानपणी जुळलेले संबंध सहसा पूर्णपणे तुटत नाहीत. ती व्यक्ती चारपाच दशकांनंतर जरी भेटली तरी पूर्वीच्या आठवणी उसळून वर येतात. हे काही प्रमाणात मोठेपणी भेटलेल्या व्यक्तींसंबंधातसुद्धा घडत असते. पूर्वीच्या काळी जवळ आलेली एकादी व्यक्ती कित्येक वर्षांनंतर नुसती भेटली तरी आपल्याला केवढा आनंद होतो! आपण तिच्याशी पहिल्याच जवळकीने छान बोलतो, त्यानंतर आपण पुन्हा एकमेकांना निवांतपणे भेटू असे नेहमी बोलले जाते. पण क्वचितच ते अंमलात आणता येते. ज्या कारणांमुळे आपले संबंध कमजोर झालेले असतात ती कारणे शिल्लक असली तर ते नव्याने जुळलेले पूर्वीचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी मनापासून खूप प्रयत्न केले जात नाहीत. माझ्या नात्यातली किंवा मैत्रीतली अशी कित्येक माणसे आहेत जी मला अचानक एकाद्या समारंभात भेटतात, त्या वेळी ती अत्यंत आपुलकीने बोलतात, एकमेकांना पुन्हा सवडीने भेटत रहायच्या योजना आखतात आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या एकाद्या समारंभातच भेटतात आणि अशा प्रकारे पूर्वीच्या भेटींची पुनरावृत्ती होत रहाते.
या विषयावर लिहावे तितके थोडे आहे. जे दोन चार ठळक मुद्दे आठवले तसे लिहिले आहेत
. . . . . . . . . पुढील भाग : मानवी संबंध (उत्तरार्ध) - प्रेमबंध
http://anandghan.blogspot.com/2015/09/blog-post.html

No comments:
Post a Comment