आमच्या गावातल्या फडके गल्लीच्या कोप-यावरच्या अखेरच्या घरात माई फडके रहात असत. त्यांच्या घराचा दरवाजा मात्र त्या गल्लीत न उघडता मामलेदार कचेरीला जाणा-या हमरस्त्यावर उघडत होता. त्यांच्या घरापुढे मोकळे अंगण नव्हते. ते घरच रस्त्यापेक्षा थोडे उंचावर होते. चार पाच पाय-या चढून वर गेल्यावर येणारा त्याचा दरवाजा एका तीन खणी खोलीमध्ये उघडायचा. आमच्या माई बहुतेक वेळा त्या खोलीत बसलेल्या दिसायच्या किंवा आतल्या बाजूला गेलेल्या असल्या तरी त्यांना भेटायला बाहेरचे कोणीआले तर माई त्या खोलीत येऊन त्या लोकांना भेटायच्या. मी तरी माईंना बाजारात, रस्त्यात, अगदी देवळात किंवा इतर कुणाच्या घरी सुद्धा कधीच पाहिल्याचे मला आठवत नाही. "आज मला अमक्या ठिकाणी माई भेटल्या होत्या." असे कोणाच्या बोलण्यातही येत नसे. यामुळे माई फडके आणि त्यांच्या घरातली ती पहिली खोली यांचे माझ्या मनात एक समीकरण होऊन बसले होते.
त्यांच्या घरात आतल्या बाजूला आणखी किती खोल्या असतील ते मला कधीच समजले नाही. घरामागच्या परसात त्यांनी अनेक औषधी वनस्पती लावलेल्या असाव्यात असे मात्र मला वाटायचे. मला त्यांच्या घरात आणखी काही स्त्रीपुरुष कधी कधी दिसायचे किंवा रहात असल्याचे जाणवत असे. पण त्यांचे माईंशी नेमके काय नाते होते ते काही मला समजले नाही. लहान मुलांनी फार चोंबडेपणा करायचा नसतो अशी शिकवण असल्यामुळे मी ही कधी त्यांची चौकशी केली नाही.
विधवांच्या केशवपनाची रानटी प्रथा माझ्या जन्माच्या बरीच वर्षे आधीच इतिहासजमा झालेली होती. माझ्याहून दोन किंवा तीन पिढ्यांपूर्वीच्या दोन तीन सोवळ्या म्हाता-या बायका आमच्या गावात एकाकी जीवन जगत होत्या. त्यांचे वृध्दापकाळामुळे वाकलेले आणि खंगलेले शरीर, सुरकुतलेला चेहेरा, त्यांच्या मनात भरलेला कडवटपणा आणि बोलण्यातला तिखटपणा यामुळे लहान मुले त्यांच्या जवळ जायलाही घाबरत असत. या सगळ्याला माई मात्र अपवाद होत्या. सोवळ्या बायकांनी नेसायच्या लाल आलवणातही त्या ग्रेसफुल दिसायच्या. त्यांच्या डोळ्यात प्रेमळपणा ओतप्रोत भरलेला असायचा. त्यांच्या चेहे-यावर कमालीचा सोज्ज्वळपणा, बोलण्यात मार्दव आणि हाताच्या स्पर्शात माया होती. त्यांनी आय़ुष्यात जे काही सोसले असेल त्याची पुसटशी जाणीवही त्याच्या वागण्यात उतरली नव्हती. त्यांच्या अस्तित्वातच एक प्रकारचे मांगल्य आणि प्रसन्न भाव भरल्यासारखे वाटायचे. मी एरवी खूप बुजरा असलो तरी माईंकडे जायला केंव्हाही आनंदाने तयार असे.
माईंचे बालपण कुठल्या गावात गेले होते कोण जाणे. त्या काळात त्यांच्या गावात प्राथमिक शाळा तरी होती की नाही ? त्या शाळेमध्ये मुलींना प्रवेश देत असतील कां ? या प्रश्नांची उत्तरे बहुधा नकारार्थीच असावीत. पण माई लहानपणी शाळेत गेल्या असल्या किंवा नसल्या तरी त्या अडाणी नव्हत्या. त्यांची तल्लख बुद्धी, आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती यांचा प्रत्यय त्यांच्या बोलण्यामधून येत असेच. त्यांचे वैद्यकशास्त्राबाबतीतचे ज्ञान दांडगे होते. त्यांच्या जादूई बटव्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या व्याधीवर रामबाण घरगुती औषध असायचे.
हे अलंकारिक बोलणे झाले. प्रत्यक्षात अॅलोपाथी, होमिओपाथी, आयुर्वेद, युनानी असल्या कुठल्याही पद्धतीचे स्टॅडर्ड किंवा ब्रँडेड औषध त्या सहसा देत नसत किंवा त्यांनी सांगितलेली औषधे कुठल्याही औषधांच्या दुकानांमध्ये तयार मिळत नसत. आजारी माणसाला कोणते औषध कशा प्रकारे तयार करून द्यायचे हे माई फक्त समजाऊन सांगत असत. तुळस, बेल, दुर्वा, गवती चहा, कोरफड, अडुळसा यासारख्या वनस्पतींची पाने, आणखी कुठली फुले किंवा फळे, निरनिराळे भाजीपाले, वडाच्या किंवा पिंपळाच्या पारंब्या, आणखी कुठल्याशा झाडांची साल अशा नैसर्गिक गोष्टींचा उपयोग करायला त्या सांगत. ती सगळी झाडे आमच्या घराच्या किंवा शाळेच्या परिसरात होती आणि औषधी उपयोगासाठी त्यांची औषधापुरती तोड केली तर कोणी काही म्हणत नसत.
माईंची बरीचशी औषधे सुंठ, ओवा, ज्येष्ठमध, जायफळ, वेलदोडे, लवंग, जिरे, मिरे, दालचिनी वगैरे स्वयंपाकघरातल्या पदार्थांपासून तयार करायची असत. त्यात शहाजिरे, नाकेशर, पिंपळी वगैरे काही मसाल्याचे स्पेशल पदार्थ असत त्यांची नावेही मला आता आठवत नाहीत. सैंधव, पादेलोण, नवसागर यासारखी काही खनिजे असत. हे सगळे पदार्थ गावातल्या प्रमुख वाण्याच्या दुकानंमध्ये उपलब्ध असायच्या.
त्या काळात वन्यपशुसंरक्षणाचे कायदे झालेले नव्हते. सांबराचे शिंग, हस्तीदंत, वाघाचे कातडे, अस्वलाचे केस, कस्तुरीची गांठ असल्या दुर्मिळ वस्तूंचे लहानसे नमूने पिढ्यान् पिढ्या घरात ठेवलेले असत. त्यामागे काही शुभ अशुभाच्या समजुती असाव्यात. पण काही विशिष्ट कारणांसाठी त्यांचा उपयोग करायलाही माई कधीकधी सांगत असत.
माझी आई माईंची भक्त होती. ती दर महिना दीड महिन्यंमध्ये निदान एकदा तरी माईंना भेटून तिला स्वतःला आणि मुलांना झालेल्या किंवा पुन्हा पुन्हा होत असलेल्या बारीक सारीक दुखण्यांवर काही घरगुती इलाज विचारून येत असे. कोणच्या वेळी कशाचा काढा प्यायचा, कोणचे चूर्ण चाटवायचे, कुठला लेप लावायचा वगैरेची जी माहिती माझ्या आईला होती त्यातली बरीचशी तिला बहुधा माईंकडूनच मिळाली असावी. त्या उपायांवर माईंशी चर्चा करून ते औषधी पदार्थ तयार करण्याची कृती ती फाइन ट्यून करून घेत असे. माईंच्या मार्गदर्शनाखाली माझ्या आईने दिलेल्या औषधांमुळे आमची बरीचशी लहान दुखणी किंवा धडपडून झालेल्या छोट्या जखमा ठीक होऊन गेल्या होत्या.
कोणतीही औषधे तयार करतांना त्यासाठी काय काय भाजायचे किंवा शिजवायचे, कुटायचे, वाटायचे किंवा दळायचे आणि कोणत्या क्रमाने व कोणत्या प्रमाणात त्यांना मिसळायचे याची सविस्तर कृती माई त्यांच्या स्मरणामधून तोंडी सांगत असत आणि माझी आई ते लक्षात ठेऊन त्याप्रमाणे आचरणात आणीत असे. त्या दोघींना कदाचित कागदावर शाईने लिहिणे फारसे आवडत नसेल, पण या औषधोपचारांचे सगळे ज्ञान लिहून ठेवायची बुद्धी त्यावेळी आम्हा कोणालाही झाली नाही आणि त्या व्यक्तींच्या बरोबर ते ज्ञानही नाहीसे होऊन गेले. मुंबईला रहात असतांना त्या औषधांसाठी लागणारी द्रव्ये मिळणे अशक्यच होते, यामुळे कदाचित त्याचा प्रत्यक्षात फारसा उपयोग झालाही नसता, पण ती माहिती म्हणून जपून ठेवली गेली असती आणि कदाचित कधी तरी कोणाला तरी त्यावर संशोधन करायला देता आली असती.
माझी आई माझ्या लहानपणीची एक आठवण आवर्जून सर्वांना सांगत असे. मी तान्हे बाळ असतांना चांगले बाळसे धरले होते. उठून बसणे, उभे राहणे, चालणे, बोलणे वगैरें बाबतीत माझी व्यवस्थित प्रगति होत होती. पण मी दीड दोन वर्षांचा झालो असतांना काय निमित्त झाले कोण जाणे, एकाएकी माझ्या पायांमधली शक्ती कमी व्हायला लागली. मी उभासुद्धा राहू शकत नव्हतो, दिवसरात्र लोळत पडून रहात होतो अशी परिस्थिती आली. हा पोलिओचा प्रकोप नव्हता, पण हे कशामुळे झाले होते ते ही समजत नव्हते. त्यावर फडके डॉक्टरांचा सल्ला घेतला गेला असणारच, पण त्यानी काय निदान आणि उपचार सांगितले होते ते माझ्या आईने मला कधीच सांगितले नाही. मला गुण येत नाही हे पाहून तिने मला उचलले आणि माईंच्या समोर नेऊन ठेवले. त्यांनी माझ्या आईला विचारले, "मी सांगीन ते औषध तुम्ही त्याला द्याल?" माझ्या आईने लगेच होकार दिला.
त्यावर माईंनी त्यांच्या गड्याला हाक मारली. तो एरवी त्यांच्या मळ्यावर काम करत असे, काही कारणाने तो कधी कधी घरी येत असे तसा त्या दिवशी आला होता. माईंनी त्याला बोलावून सांगितले, "अरे आपल्या मळ्यातल्या अमक्या झाडाच्या बुंध्याशी तुला एका प्रकारचे किडे दिसतील. "
" हो माई, मी पाहिले आहेत."
"तिथे कंबरेइतका खोल खड्डा खणलास की त्या किड्यांच्या खूप अळ्या दिसतील, त्यातल्या थोड्या पकडून या वहिनींना आणून देत जा."
संध्याकाळपर्यंत त्या अळ्या आमच्या घरी पोचल्या होत्या. माझी आई शुद्ध शाकाहारीच नाही तर पूर्णपणे अहिंसक होती. डास, ढेकूण, झुरळे यांना सुद्धा ती मारत नसे, पळवून लावायचा किंवा प्रतिबंधक प्रयत्न करायची. पण तीच माझी आई त्या अळ्यांना वाटून त्यात साखर मिसळून त्याची गोळी करून मला खाऊ घालत असे. या उपचाराने खरोखरच माझ्या अंगात चैतन्य येऊ लागले आणि मी उठून उभा रहायला आणि चालायला लागलो. "मूकम् करोति वाचालम् पंगुम् लंघयते गिरीम्" हा श्लोक म्हणत असतांना मला माईंची आठवण हटकून येते.
माईंच्या निदानाच्या किमयेची आणखी एक गोष्ट माझी आई नेहमी सांगत असे. त्या काळात ती माझ्या मोठ्या भावाकडे रहात होती. असेच एकदा अचानक त्याच्या लहान मुलीचे केस पुंजक्या पुंजक्याने गळून पडायला लागले. स्थानिक डॉक्टर, त्वचारोग तज्ज्ञ वगैरेंनी दिलेल्या मलमांनी व तेलांनी काही फरक पडत नव्हता. तेंव्हा माझी आई सरळ आमच्या गावी जाऊन माईंच्या घरी जाऊन पोचली आणि माईंनी यावर आणखी एक अजब उपचार सांगितला. हस्तीदंताच्या लहानशा तुकड्याला शेगडीच्या प्रखर आंचेवर भाजून किंवा जाळून, त्याची पूड करून ती विशिष्ट प्रकारच्या तेलात मिसळून त्वचेला लावायची असे काही तरी त्या औषधाचे स्वरूप होते. या औषधाने त्या मुलीच्या डोक्यावरील टक्कल पडलेल्या भागावर भराभरा केस यायला लागले आणि लवकरच ते चांगले घनदाट आणि लांबसडक झाले.
माई त्या काळातल्या रूढीनुसार सोवळ्या बाईचे अत्यंत साधेपणाचे जीवन जगत होत्या.त्यांनी आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा व्यवसाय केला नाही. त्या कोणाकडूनही फी घेत नसत, औषधेही विकत देत नसत. त्या फक्त जवळच्या ओळखीच्या व्यक्तींनाच, त्यातही स्त्रियांनाच तपासून आपला सल्ला देत असत. त्यांच्याकडे रोग्यांच्या रांगा लागत नसत. ते करत असलेल्या या समाजकार्याच्या मुळाशी फक्त परोपकारबुद्धीच असायची. मी नोकरीसाठी मुंबईला स्थायिक झाल्यानंतर माझा गावाशी संपर्क राहिला नाही. दीर्घायुषी झाल्यानंतरही कधी तरी माईंचे पिकले पान गळून पडले, पण त्याची बातमी मला लगेच लागली नाही. कालांतराने जेंव्हा समजले त्या वेळी एक पुण्यवान व्रतस्थ व्यक्तिमत्व अंतर्धान पावले असा विचार मनात आला.

No comments:
Post a Comment