Tuesday, June 18, 2024

देवांचे अवतार आणि चमत्कृति

 यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ 

परित्राणाय साधूनां विनाशायच च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ 

असे भगवंतांनी गीतेत सांगितले आहे. "जेव्हां जेव्हां धर्माला ग्लानि येऊन अधर्म बोकाळतो तेव्हां तेव्हां तो अधर्म आचरणाऱ्या दुष्टांचा नाश करून आणि धर्म आचरणाऱ्या सज्जनांचे रक्षण करून अधर्माचा नाश व धर्माचे पुनःप्रस्थापन करण्यासाठी मी (परमेश्वर) युगानुयुगे वारंवार अवतार धारण करतो" असा त्याचा अर्थ आहे. पण चराचरात भरून राहिलेला विश्वंभर असा परमेश्वर तर अनादि अनंत आहे, तो सदासर्वकाळ सगळीकडे भरलेला असतोच, मग त्याने वेगळे अवतार घेण्याला काय अर्थ आहे? असा प्रश्नही पडतो. सर्वसामान्य बुद्धीमत्ता आणि आकलनशक्ती असलेल्या लोकांना निर्गुण निराकार परब्रह्म समजणे फार कठीण किंवा जवळ जवळ अशक्य असते. गरज पडते तेंव्हा हा देव अवतार घेऊन प्रगट होतो आणि ठराविक काम करून पुन्हा अदृष्य होतो असे समजणे त्या मानाने सोपे असते. गीता सांगितली किंवा लिहिली गेली त्या काळात आतासारखे हिंदू, ख्रिश्चन, इस्लाम अशा नावांचे निरनिराळे धर्म नव्हतेच, त्यामुळे धर्म या संस्कृत शब्दाचा मूळ अर्थ नीतीमत्ता किंवा सर्वांनी योग्य प्रकाराने वागणे असा घेता येईल. सगळ्या समाजाची नीतीमत्ता रसातळाला जाते आणि समाज अधोगतीला लागतो तेंव्हा कुठल्या ना कुठल्या रूपाने देव अवतरतो आणि समाजाला पुन्हा रुळावर आणतो असा विश्वास माणसाला नकारात्मक विचारातून तग धरून राहण्याचा धीर देतो.

पुराणांमध्ये सांगितलेल्या निरनिराळ्या देवांच्या अवतारांच्या अनेक सुरस कथा पुराणिकबुवा आणि कीर्तनकारांनी रंगवून जनतेपर्यंत पोचवल्या आहेत. बहुतेक कथांची सर्वसाधारण गोष्ट अशी असते की एखादा दुष्टबुद्धि असुर खूप कठोर तपश्चर्या करतो, त्यावर प्रसन्न होऊन एक देव त्याला एक अद्भुत असा वर देतो, त्या वरामुळे त्या दानवाचे सामर्थ्य अचाट वाढल्याने तो सगळे जग जिंकून आपली मनमानी सुरू करतो. देवांनासुद्धा एकदा दिलेला वर परत घेता येत नाही, त्यामुळे सगळे देव, ऋषीमुनी वगैरे कोणा मोठ्या देवाकडे जातात आणि तो महान देव किंवा ती देवी प्रगट होऊन त्या राक्षसाचा संहार करते. यात कुठे शंकर (महादेव) हा सर्व देवांचा देव असतो, कुठे गणेश तर कुठे भगवान विष्णू . काहीवेळा  सगळ्या देवांची शक्ती असलेली आदिशक्ती दुर्गा, काली, चामुंडा अशा रूपामध्ये प्रगट होऊन त्या राक्षसाचा नायनाट करते. असुराला मिळालेले वरदान आणि त्याचा विनाश करण्याची पद्धत अशा तपशीलामध्ये थोडा थोडा फरक असतो, पण मुख्य कथानक लहानसे आणि सोपे असते. सत्याचा असत्यावर किंवा चांगल्याचा वाइटावर विजय होणारच अशा अर्थाचे असते.  अशा  बहुतेक अवतारांमधले देव युद्ध करण्यापुरते प्रगट होतात आणि काम झाल्यावर लगेच अदृष्य होतात. त्यांच्या बाबतीत जन्म, बालपण, तारुण्य, वार्धक्य, देहावसान अशा अवस्था येत नसतात. 

  पण श्रीराम आणि श्रीकृष्ण या महाविष्णूच्या दोन अवतारांची विस्तृत चरित्रे मोठ्या महाकाव्यांमधून रंगवली आहेत. यातली कथानके या अवतारांच्या जन्माच्याही आधीपासून सुरू होतात आणि त्यांचे बालपण, तारुण्य, प्रौढावस्थांमधले अनेक प्रसंग त्यात तपशीलवार दाखवले आहेत. अर्थातच त्यासाठी इतर अनेक पात्रे त्यांच्या विशिष्ट व्यक्तीरेखांसह या कथानकांमध्ये येतात आणि त्या महाकाव्यांची रंगत वाढवतात. त्या कथानकांना सखोल बनवतात.


भागवतपुराणात भगवंतांच्या चोवीस अवतारांबद्दल लिहिले आहे असे म्हणतात, पण बहुतेक लोकांना फक्त दशावतार या नावाने प्रसिद्ध असलेले दहा अवतार माहीत असतात. उरलेले १४ अवतार बहुधा पुराण सांगणाऱ्या पुराणिकांना आणि कदाचित ते पुराण भक्तिभावाने ऐकणाऱ्या श्रोत्यांनाच माहीत असावेत. पहिल्या मत्स्य अवतारात प्रलय होऊन सगळी जमीन पाण्याखाली जाते तेंव्हा मोठ्या माशाच्या रूपाने आलेले विष्णू भगवान एक मोठी होडी घेऊन जमीनीवरील सकल प्राणिमात्रांना वाचवतात, तर दुसऱ्या कूर्मावतारात ते मंदार पर्वताला आपल्या पाठीवर आधार देऊन देवदानवांचे  समुद्रमंथन शक्य करून देतात. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपु नावाचे दोन दैत्य जगाला फार त्रास देत असतात म्हणून वराह आणि नरसिंह असे दोन अवतार घेऊन त्या राक्षसांचा वध करतात. बळीराजा दानव असला तरी धार्मिक वृत्तीचा आणि देवभक्त असतो, वामन अवतारात गोड बोलून त्याच्याकडून पृथ्वी आणि स्वर्गाचे दान मागून घेतात, पण त्याला चिरंजीवत्व आणि पाताळाचे साम्राज्य देतात.  पित्याच्या आश्रमातली दैवी गुण असलेली कामधेनु गाय सहस्त्रार्जुन हा मुजोर राजा बळजबरीने घेऊन जातो आणि त्याचा मुलगा पित्याला मारतो म्हणून सूडाने पेटलेले परशुराम त्या सर्वांना मारून टाकतात. अशा पहिल्या सहा अवतारांच्या संक्षिप्त कथा आहेत. गौतम बुद्धाला खरोखरच विष्णूचा नववा अवतार मानतात याबद्दल शंका आहे आणि दहावा कल्की अवतार अजून झालेलाच नाही. यातले मत्स्य, कूर्म, वामन आणि बुद्ध हे अवतार हातात शस्त्र धारण करतही नाहीत. बाकीचे अवतार दुष्टांचा नाश करतात.

विष्णूच्या या दहा अवतारांमधल्या नृसिंह आणि परशुरामाची मंदिरे काही थोड्याच ठिकाणी दिसतात, क्वचित कुठे वराहस्वामींची देवळे आहेत, पण मत्स्य, कूर्म, वामन या अवतारांची उपासना केलेली माझ्या पहाण्यात आली नाही. अनेक देवळांमध्ये प्रवेश करताच सुरुवातीलाच जमीनीवर एक दगडाचे कासव ठेवलेले असते, पण कूर्मावतार म्हणून कुणीही त्याला देवत्व दिलेले किंवा त्याची पूजा, अर्चना, प्रार्थना वगैरे करतांना दिसत नाही. बौद्ध धर्माचा प्रसार झाल्यावर जगभर अनेक ठिकाणी बुद्धाचे विहार किंवा देवळे बांधण्यात आली आणि तिथे गौतम बुद्धाच्या सुंदर किंवा भव्य मूर्तीही ठेवण्यात आल्या. पण मुळातच गौतम बुद्धाची शिकवण निरीश्वरवादावर भर देणारी आहे आणि हिंदू धर्मीय या मूर्तींकडे भक्तिभावाने पहात नाहीत.


 श्रीराम आणि श्रीकृष्ण या दोन अवतारांचे मात्र असंख्य भक्त आहेत.  उत्तरेतले संत तुलसीदास आणि महाराष्ट्रातले समर्थ रामदास यांनी श्रीरामाच्या भक्तीचा प्रसार केला, तर सूरदास, मीराबाई, चैतन्य महाप्रभू, नरसी मेहता आदींनी श्रीकृष्णाच्या भक्तीचा. त्यांनी सुरू केलेली भक्तीपरंपरा कित्येक शतके टिकून राहिली आहे आणि देशभऱ पसरली आहे. अलीकडच्या काळात ती वाढत असलेली दिसत आहे. मोठ्या गाजावाजाने अयोध्येत भव्य राममंदिर बांधले जात आहे आणि तिथल्या रामलल्लाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठानाचा सोहळाही देशभर भव्य प्रमाणावर साजरा केला गेला. इस्कॉन नावाच्या आंतरराष्ट्रीय संस्थेने जगभरात अनेक ठिकाणी श्रीकृष्णाची वैशिष्ट्यपूर्ण देवळे बांधली आहेत आणि ती पहायलाच पर्यटकांची गर्दी होत असते. 

विठ्ठल आणि व्यंकटेश या दशावतारांमध्ये नसलेल्या विष्णूच्या दोन रूपांचे कोट्यावधी भक्त आहेत. त्यांची सविस्तर चरित्रे नाहीत, पण त्यांच्या महात्म्याच्या अनेक कथा किंवा गाथा आहेत. यातला पंढरपूरचा विठोबा दोन्ही हात कंबरेवर ठेऊन स्वस्थ उभा आहे, त्याच्याकडे कुठलेही शस्त्र नाही. तो कुठल्या भक्तासाठी दळण दळतो, कुणाची गुरे राखतो, कुणासाठी चंदन उगाळतो अशी आपल्या भक्तांची चाकरी करतो, तसेच त्यांच्यावर संकट आले तर त्यांना त्यामधून सुखरूपपणे वाचवतो अशा अनेक कथा आहेत आणि भाविकांची त्यावर गाढ श्रद्धा आहे, पण त्या कथांमध्येसुद्धा विठोबाने कुठल्याही प्रकारची हिंसा केलेली दिसत नाही. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम यासारख्या अनेक संतमंडळींनी रचलेल्या अभंगांमधून विठ्ठलाविषयी अपार भक्ती प्रस्तुत केली आणि कित्येक शतके उलटून गेली तरी आजही हे अभंग भक्तिभावाने गायिले जातात. त्या संतांनी सुरू केलेली वारकरी परंपरा कित्येक शतके टिकून राहिली आहे. आजसुद्धा आषाढी व कार्तिकी एकादशीला पंढरपूरला भरणाऱ्या यात्रेला लक्षावधी भाविक नेमाने नाचत गात जातात. महाराष्ट्रामध्ये रामकृष्णांपेक्षासुद्धा विठ्ठलाची जास्त देवळे आहेत आणि जास्त भक्त आहेत. विठ्ठल हा विष्णूचा नववा अवतार आहे असेही काही लोक मानतात.


आंध्रप्रदेशातील तिरुपति तिरुमल देवस्थानात श्रीव्यंकटेशाचे सुंदर मंदिर आहे. या देवाला उत्तर भारतात बालाजी असे म्हणतात. या तीर्थक्षेत्रात दर्शनाला येणाऱ्या भक्तांची नेहमीच प्रचंड गर्दी असते आणि हे भक्त तिथल्या हुंड्यांमध्ये इतकी दक्षिणा टाकतात की हे मंदिर भारतातले सर्वाधिक श्रीमंत देवस्थान समजले जाते. तिरुपती येथील चतुर्भुज व्यंकटेशाच्या दोन हातांमध्ये चक्र आणि गदा आहेत, पण या अवतारातही त्याने कुणा राक्षसाचे शिर छाटले किंवा दुष्टाचा चेंदामेंदा केला अशा प्रकारची कथा मी ऐकली नाही. व्यंकटेशस्तोत्र हे मराठीतले एक सुंदर स्तोत्र आहे. जुन्या काळात अनेक लोक हे स्तोत्र रोज म्हणत असत. "अन्नासाठी दाही दिशा", "उडदामाजी काळेगोरे" आणि "समर्थागृहीचे श्वान" अशासारख्या या स्तोत्रातल्या ओळी मराठी भाषेत वाक्प्रचार म्हणून वापरल्या जातात. तिरुपतीशिवाय इतर अनेक ठिकाणी श्रीव्यंकटेशाची मंदिरे आहेत. पुण्याजवळ केतकावली इथे बांधलेल्या मंदिराला प्रतितिरुपती असेही म्हंटले जाते. आमच्या जमखंडी गावाजवळ कल्हळ्ली नावाच्या जागी व्यंकोबाचे प्राचीन मंदिर आहे. त्या भागातल्या भक्तांना भेटण्यासाठी तिरुपतीच्या व्यंकटेशाने अवतार घेतला अशी मान्यता आहे.

ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिकुटाने एकत्र येऊन ते दत्तात्रेय या नावाने अवतीर्ण झाले. त्याच्या जन्माची सुरस कथा आहे, पण त्याच्या पुढील अवतारकार्याबद्दल मला तरी काहीच माहिती नाही. पुढे मध्ययुगाच्या काळात दत्तात्रेयांनी श्रीपादसरस्वति आणि नरसिंहसरस्वती या नावाने अवतार घेतले आणि अनेक भक्तांचा उद्धार केला याच्या कथा गुरुचरित्रात विस्ताराने सांगितल्या आहेत. स्वामी समर्थांनाही त्यांचा अलीकडच्या काळातला अवतार मानले जाते.  या निरनिराळ्या अवतारांच्या सहवासामुळे पावन झालेली पीठापूर, नरसोबाची वाडी,  गाणगापूर आणि अक्कलकोट ही देवस्थानेही प्रसिद्ध आहेत आणि अनेक भक्तजन तिथे दर्शनासाठी जातात.  अनेक लोक दर गुरुवारी घरीच किंवा देवळात जाऊन दत्ताचे भजन करतात. दत्तभक्तीची परंपरा मुख्यतः महाराष्ट्रात असली तरी ती कर्नाटक आणि आंध्रमध्येही काही प्रमाणात आहे. श्रीदत्तात्रेयाचे एक प्रसिद्ध मंदिर गुजराथमधील गिरनार पर्वतावर आहे, तर गाणगापूर कर्नाटकात आणि पीठापूर आंध्रप्रदेशात आहे

 

देवांच्या अद्भुत कृती : पर्वत उचलणे

आपल्या पृथ्वीवरील जमीन सपाट नाही, ती डोंगर, दऱ्या, खोरी आदिंनी भरलेली आहे. टेकड्या, डोंगर, पर्वत हे सगळे भूपृष्ठावरील उंचवटे असतात, तिथले खडक इतर ठिकाणच्या जमीनीपेक्षा उंच वर डोकावत असतात. तरी तेही जमीनीच्या खाली असलेल्या खडकांशी जोडलेलेच असतात. इतकेच काय तर समुद्राच्या खालीसुद्धा खडकच असतात. पृथ्वी तयार होत असतांना तिचे एक खडकांचे बाह्य कवच तयार झाले. त्यातल्या खोलगट भागात पाणी साठत गेले आणि महासागर तयार झाले, त्यांनी पृथ्वीचा सुमारे दोन तृतियांश पृष्ठभाग व्यापला वगैरे गोष्टी आपण भूगोलात शिकलो.  


पण पुराणातल्या काही गोष्टींमध्ये असे लिहिले आहे की कुणा देवाने एक पर्वत उचलून दुसरीकडे नेला किंवा जिथल्या तिथेच परत ठेवला.  त्यामुळे पटावर सोंगटी ठेवावी किंवा पानात भाताची मूद ठेवावी तसे हे डोंगर सुटे असतात असे मला लहानपणी वाटायचे. पुराणकाळात देव आणि दानव किंवा सुर आणि असुर जन्माला आले तेंव्हापासून त्यांचे एकमेकांशी वैर असायचे आणि ते सदैव युद्ध करत असायचे. पण कसे कुणास ठाऊक त्यांनी सर्वांनी मिळून सागराचे मंथन करायचे आणि त्याने दडवून ठेवलेली रत्ने बाहेर काढून वाटून घ्यायची असे ठरवले. त्यांनी मंदार पर्वताला उचलून आणले आणि समुद्रात ठेवले. पण तो बुडू नये म्हणून महाविष्णूंनी कूर्मावतार घेतला आणि त्या पर्वताला आपल्या पाठीवर तोलून धरले अशी कथा आहे. 

पुराणातल्या कथांमध्ये कैलासपर्वताचा उल्लेख अनेक वेळा येतो. ब्रह्माविष्णूमहेश या तीन मुख्य देवांमधल्या महेश किंवा शंकराचे कैलास हे वसतिस्थान आहे. ब्रह्म्याचा ब्रह्मलोक आणि विष्णूचा वैकुंठलोक यांचे पृथ्वीवर कुठे अस्तित्व नाही, पण कैलास नावाचा एक पर्वत हिमालयाच्या पलीकडल्या भागात म्हणजे तिबेटमध्ये आहे आणि चीनच्या ताब्यात आहे. पण काही भाविक किंवा उत्साही लोक चीनकडून परवानगी घेऊन कैलास मानससरोवराची यात्रा करतात. ती खूप कठीण असते असे तिथे जाऊन आलेले लोक सांगतात. आतापर्यंत एव्हरेस्ट या सर्वात उंच शिखरावर हजारो लोक चढून गेले असले तरी कैलासाच्या शिखरावर कोणीच चढून गेलेला नाही असे सांगतात. यात्रेकरू कैलासाच्या फक्त पायथ्यापर्यंत जाऊन परत येतात.


पण पुराणात अशी एक कथा आहे की दहा तोंडे आणि वीस हात असलेल्या रावणाने शंकरपार्वती यांच्यासह कैलास पर्वतालाच उचलून डोक्यावर धरले होते .हा प्रसंग दाखवणारे एक शिल्प वेरूळ इथे आहे. 


रामायणात एक असा प्रसंग आहे. रामरावणयुद्धामध्ये रावणाचा मुलगा इंद्रजिताने लक्ष्मणावर एक शक्ती किंवा अस्त्र टाकले ते लक्ष्मणाच्या वर्मी लागले आणि त्याला मूर्छा आली. त्यामधून  त्याचे प्राण वाचवण्यासाठी संजीवनी नावाच्या वनौषधाची आवश्यकता होती. ते वृक्ष द्रोणागिरी नावाच्या पर्वतावर होते आणि ते ठिकाण युध्दस्थळापासून खूप दूर होते. तिथे जाऊन ते औषध घेऊन येण्याचे काम फक्त हनुमानच करू शकत होता. तो लगेच उड्डाण करून मनोवेगाने त्या पर्वतावर गेला, पण त्याला वनौषधींची माहिती नसल्यामुळे त्यातली संजीवनी कुठली हे समजेना. यात वेळ घालवण्याऐवजी त्याने सरळ तो अख्खा डोंगर उचलला आणि एका हाताच्या तळव्यावर त्याला अलगद धरून तो लंकेला घेऊन गेला.

श्रीकृष्णाचे बालपण गोकुळामध्ये गेले. गायी  पाळायच्या आणि त्यांचे दूध, दही, लोणी वगैरे मथुरेच्या बाजारात नेऊन विकायचे यावर तिथल्या गोपगोपिकांचा चरितार्थ चालत असे. आकाशातल्या इंद्रदेवाच्या कृपेने तो व्यवस्थितपणे चालतो अशी त्यांची श्रद्धा होती आणि इंद्राला प्रसन्न ठेवण्यासाठी ते लोक दरवर्षी इंद्राची पूजा आणि यज्ञयाग वगैरे करत असत. श्रीकृष्णाने लहानपणीच अनेक लीला दाखवून त्या लोकांच्या मनावर छाप पाडलेली होती. त्याने गोकुळवासियांना सांगितले की आपल्या गावाजवळचा गोवर्धन पर्वत  हा आपल्या समृद्धीचे खरे कारण आहे. आपल्या गायी, गुरे या डोंगरावर जाऊन चरतात आणि धष्टपुष्ट होऊन भरपूर दूध देतात. म्हणून आपण या वर्षी इंद्राची पूजा न करता या गोवर्धन पर्वताची पूजा करावी. गोकुळातल्या लोकांनी त्याचा शब्द मानला.


पण त्यामुळे इंद्राला राग आला आणि त्याने ढगांना आज्ञा दिली की गोकुळावर जाऊन अतिवृष्टी करा. त्यामुळे अचानक तिथे मुसळधार पाऊस पडायला लागला आणि तिथले लोक घाबरून श्रीकृष्णाकडे गेले. श्रीकृष्णाने त्यांना अभयदिले आणि गोवर्धन पर्वताला उचलून आपल्या करंगळीवर तोलून धरले. सगळे गोपगोपी आपापली मुलेबाळे आणि गायीवासरे यांना घेऊन त्या गोवर्धन पर्वताच्या छताखाली सुरक्षितपणे उभे राहिले. अशा प्रकारे इंद्रदेवाचे गर्वहरण झाल्यावर त्याने श्रीकृष्णासमोर येऊन क्षमायाचना  केली.  

-------------------------




Sunday, June 09, 2024

एडिसन मेमोरियल पार्क



इंग्रजी भाषेतील डिस्कव्हरी (Discovery) आणि इन्व्हेन्शन (Invention) या दोन शब्दांसाठी मराठी भाषेत शोध हा एकच शब्द नेहमी वापरला जातो. माझे शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झाले असल्यामुळे मला आधी शोध हा एकच शब्द माहीत होता. मी त्या काळात ज्या प्रसिद्ध शास्त्रज्ञांची नावे वाचली होती त्यातल्या आर्किमिडीज आणि कोपरनिकस यांनी कदाचित एकेकच शोध लावला होता, तर न्यूटनने दहापंधरा शोध लावले असतील. त्यामुळे थॉमस आल्वा एडिसन नावाच्या माणसाने शंभरावर शोध लावले असे वाचले तेंव्हा मी मनाने त्याला जगातला सर्वात मोठा शास्त्रज्ञ ठरवले होते. पण सगळे लोक त्याला सोडून न्यूटन आणि आइनस्टाइन यांना का महान म्हणतात असा प्रश्न मला पडत होता. पुढे सायन्सचे शिक्षण इंग्लिशमध्ये घेत असतांना मला या दोन प्रकारच्या शोधांचे वेगवेगळे अर्थ समजायला लागले.

डिस्कव्हरी म्हणजे निसर्गाचे नियम, क्रम, पदार्थ किंवा ठिकाण  या आधीपासून अस्तित्वात असलेल्या गोष्टींची  माहिती  नीटपणे समजून घेऊन ती सर्वात आधी व्यवस्थितपणे जगाला सांगणे. जो माणूस हे काम करतो त्याने त्याचा शोध लावला असे सांगितले जाते, उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षण, सूर्यमालिका, प्राणवायू  इत्यादींचे शोध निरनिराळ्या शास्त्रज्ञांनी लावले. अनेक वेळा याचा विपर्यास करून न्यूटनच्या आधी जगात गुरूत्वाकर्षण नव्हतेच का? अशासारखे खोचक प्रश्न विचारले जातात. कोलंबसाला शास्त्रज्ञ म्हणत नाहीत, पण त्याने अमेरिकेचा शोध लावला होता असे म्हंटले जाते.

इन्व्हेन्शन याचा अर्थ एकादी वेगळी वस्तू सर्वप्रथम तयार करणे, उदाहरणार्थ  रेडिओ, मोटार, विमान इत्यादी. या वस्तू आधी होत्या, त्या कुठे तरी हरवल्या आणि कुणी तरी त्या शोधून काढल्या असे काही झाले नाही. थॉमस आल्वा एडिसनने विजेचा दिवा, ग्रामोफोन, सिनेमा यासारख्या शेकडो नव्या वस्तू तयार केल्या आणि जगाला देऊन माणसाचे जीवन पार बदलून टाकले. तेंव्हा तोसुद्धा महान शास्त्रज्ञ किंवा इंजिनियर होताच, पण इतर शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या निसर्गाच्या नियमांचा कौशल्याने उपयोग करून घेऊन त्याने या वस्तू तयार केल्या. त्याने स्वतः फारशी  डिस्कव्हरी केली नाही, पण तो सर्वश्रेष्ठ इन्हेन्टर होता यात शंका नाही. 

मी अमेरिकेत गेलो असतांना साउथ प्लेनफील्ड या गावात रहात होतो, तिथून जवळ असलेल्या शहराचे नाव एडिसन असे होते. एडिसन या शहराचा काही भाग म्हणजे न्यूजर्सीमधले मिनिइंडिया आहे. तिथे भारतीयांची अनेक दुकाने आणि हॉटेले  आहेत. काही रस्त्यांची नावे सुद्धा भारतीय वाटतात. त्या भागात फिरतांना भारतातल्या सगळ्या भागातली खूप मंडळी  दिसतात, काही त्या भागात राहतात तर इतर अनेक लोक न्यूजर्सीतल्या आजूबाजूच्या भागातून खरेदीसाठी तिथे येत असतात. मीसुद्धा अनेक वेळा त्या भागात जात होतो. पण मला थॉमस आल्वा एडिसनच्या नावाची पाटी तिथे कुठे दिसली नाही. चौकशी करता असे कळले की प्रसिद्ध संशोधक थॉमस आल्वा एडिसन याने पूर्वीच्या रारिटन नावाच्या गावातल्या मेन्लो पार्कमध्ये आपली पहिली प्रयागशाळा उघडली होती. तिला शोधांचा कारखाना (इन्व्हेन्शन फॅक्टरी) असे नाव त्याने दिले होते आणि खरोखरच तो तिथे एकामागोमाग एक अनेक शोध लावत गेला. पण पुढे त्याने आपला मुक्काम दुसऱ्या ठिकाणी हलवला आणि तिथे दहापट मोठी कार्यशाळा बांधली, तसेच राहण्यासाठी मोठा बंगला बांधला. त्याचा मेन्लो पार्कमधला कारखाना काळाच्या ओघात पडझड होऊन नाहीसा झाला, पण १९५४ साली रारिटनमधल्या रहिवाशांनी त्यांच्या गावाचेच नाव बदलून एडिसन असे ठेवले.

थॉमस आल्वा एडिसन जितका मोठा संशोधक होता तितकाच हुषार उद्योगपती होता. त्याने लावलेल्या नव्या शोधांचे तो लगेच पेटंट घेऊन ठेवत होता आणि त्या वस्तू कारखान्यात तयार करून चांगल्या किंमतीला बाजारात विकून त्यातून नफा मिळवत होता. त्याचा उद्योग व्यवसाय वाढल्यानंतर त्याने मेन्लोपार्कमधल्या जागेतून न्यूजर्सीमधल्याच वेस्ट ऑरेंज नावाच्या जागी स्थलांतर केले. मेन्लो पार्कमधला कारखाना पडझड होऊन नष्ट झाला पण  वेस्ट ऑरेंज या ठिकाणी त्याने बांधलेला कारखाना मात्र त्याच्या मृत्यूनंतरही सुव्यवस्थित ठेवला गेला आणि त्याचे रूपांतर थॉमस एडिसन नॅशनल हिस्टॉरिकल पार्कमध्ये केले गेले. एडिसनविषयी मनात खूप कुतूहल आणि आदर असल्यामुळे आम्ही तिथे जाऊन त्या स्मारकाला भेट दिली.


जुन्या काळातल्या आठवणींचे काळजीपूर्वक जतन करून, त्यांना अतिशय व्यवस्थितपणे मांडून त्यांचे आकर्षक असे प्रदर्शन करण्याची कला अमेरिकन लोकांनी फार चांगली विकसित केली आहे. मी मागे एकदा अॅटलांटाचे कोकाकोला म्यूजियम पाहिले होते तेंव्हाही मला याची प्रचीति आली होती. एडिसनचा हा कारखाना कदाचित जवळ जवळ शंभर वर्षांपूर्वीच बंद झाला असेल, आज तर त्यात कुठलेही नवे उत्पादन होतही नाही, तरीही हा संपूर्ण कारखाना एखाद्या वस्तुसंग्रहालयासारखा टिकवून ठेवला आहे. पूर्वीच्या काळातली सगळी यंत्रसामुग्री जिथल्या तिथे मांडून ठेवली आहे, इतकेच नव्हे तर ज्या कच्च्या मालांपासून निरनिराळ्या वस्तूंचे उत्पादन केले जात होते त्यांचे शेकडो नमूनेसुद्धा व्यवस्थित मांडून ठेवले आहेत. 


या हिस्टॉरिकल पार्कची रचना एकाद्या कारखान्यासारखीच आहे. एका तीन मजली इमारतीत मुख्य प्रयोगशाळा, हेवी मशीन शॉप आणि लाइट मशीन शॉप आहे. तीन निरनिराळ्या शेड्समध्ये मेटॅलर्जी लॅब, पॅटर्न शॉप आणि केमिस्ट्री लॅब आहेत. सिनेमा तयार करण्याच्या स्टूडिओची वेगळी शेड आहे. जगातला पहिला चित्रपट कुठे तयार केला गेला ती जागा राखून ठेवली आहे. पर्यटकांचे स्वागत करायच्या इमारतीत एका लहान सभागृहात बसून एडिसनचे जीवन आणि कार्य यावरील चित्रफिती पहाण्याची सोय आहे. दुसऱ्या एका सभागृहात  दर तासातासाला एक माणूस येऊन दहा पंधरा मिनिटांचे मनोरंजक व्याख्यान देतो आणि एडिसनने लावलेले मुख्य शोध प्रात्यक्षिकांसह चांगले समजावून सांगतो.


मुख्य इमारतीत तळमजल्यावर एका कारखान्यात प्रवेश करताच मला आमच्या इंजिनियरिंग कॉलेजमधले वर्कशॉप आठवले. मी साठ वर्षांपूर्वी तिथे शिकायला गेलो होतो तेंव्हा तिथे खूप जुन्या काळातली यंत्रे होती. एडिसन पार्कमधल्या या हॉलमध्येही एका ओळीत तसल्या सात आठ लेथ मांडून ठेवल्या होत्या आणि आठदहा फूट उंचावर आडव्या रेषेत फिरणाऱ्या एका लांबच लांब शाफ्टवरील चाकांना (पुलीजना) ती लेथ मशीन्स पट्ट्यांनी जोडलेली होती. एका टोकाला जोडलेले एक इंजिन किंवा मोटार त्या शाफ्टवरील चक्राला पट्ट्याने जोडले होते आणि ते एकटेच चाक तिथल्या सगळ्या यंत्रांना चालवेल अशी योजना होती. आम्ही गेलो तेंव्हा त्यातले काहीच प्रत्यक्षात चालवले जात नव्हते. पन्नास साठ वर्षांपूर्वीच जगातल्या सगळ्या कारखान्यांमधल्या प्रत्येक यंत्राला स्वतंत्र विजेची मोटर जोडून तिच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचीही सोय केली गेली. त्यामुळे कॉलेजनंतर मी कुठेच असा कॉमन शाफ्ट, पुलीज आणि बेल्ट पाहिले नव्हते, ते पन्नाससाठ वर्षांनी इथे पहायवा मिळाले. लेथ्सच्या बाजूला शेपिंग, मिलिंग, प्लेनिंग वगैरे इतर मशीनेही होती. हे एडिसनचे हेवी मशीन शॉप होते. वरच्या मजल्यावर लाइट मशीन शॉप होते, त्यात अधिक अचूक आणि नाजुक कामे करणारी यंत्रे होती. 


सर्वात वरच्या मजल्यावर प्रयोगशाळा होती, तसेच एडिसनने लावलेल्या विविध शोधांची माहिती दाखवणारे फलक, फोटोग्राफ्स आणि त्या शोधवस्तू मांडून ठेवल्या होत्या. त्याने विजेच्या दिव्याचा शोध लावला, पण पहिला दिवा यशस्वीपणे प्रकाश द्यायला लागला त्याआधी हजार वेळा त्याचे प्रयोग अयशस्वी झाले होते आणि यशस्वी झाल्यानंतर त्याने अनेक निरनिराळ्या आकारांचे दिवे तयार केले होते, त्यातले वीसपंचवीस प्रकार त्या प्रदर्शनात मांडून ठेवले होते. विजेचा दिवा लावायचा असेल तर आधी वीजही असायला पाहिजे. त्यासाठी एडिसनने वीज तयार करणारे जनरेटर तयार केले आणि आपल्या गल्लीत अनेक खांब उभारून त्यावर विजेचे दिवे लावले आणि त्यांना तारांनी जोडून प्रकाशमान केले. ते उदाहरण पाहून लोकांनी आपल्या घरांमध्ये वीज पुरवण्याचा आग्रह केला आणि एडिसनने ते काम केले. यात वाढ होत त्याने संपूर्ण न्यूयॉर्क शहराला वीजपुरवठा करण्याचे कंत्राट घेऊन पूर्ण केले. 


ग्रामोफोन आणि सिनेमा हे एडिसनचे इतर मुख्य शोध आहेत. त्यांचीही समग्र माहिती फलकांमधून प्रदर्शनात मांडली होती. याशिवायही त्याने अनेक लहानमोठे शोध लावले होते. केमिकल आणि मेटॅलर्जी विभागात अनेक निरनिराळी खनिजे, क्षार, धातू वगैरेंवर काम केले होते. त्यातून कित्येक नवे उपयुक्त पदार्थ तयार केले होते. त्याने हजारापेक्षा जास्त पेटंटे घेऊन ठेवली होती. त्यांच्या बाइंडिंग करून ठेवलेल्या पुस्तकांनीच सातआठ कपाटे भरली होती. तळमजल्यावरून वरच्या मजल्यांना जाण्यासाठी एक मेकॅनिकल लिफ्ट बसवली होती, पण तिचा उपयोग फक्त एडिसन स्वतःच करत होता. इतर कुणाला त्यातून जाण्याची परवानगी नव्हती. इतकेच नव्हे तर कामगारांनीसुद्धा आपला मजला सोडून कुठल्याही दुसऱ्या मजल्यावर किंवा आपली इमारत सोडून दुसऱ्या इमारतीत जाण्याला सक्त मनाई होती.


वरच्या मजल्यावरील एका हॉलमध्ये एक खास कार्यक्रम होत असे आणि तो पाहण्यासाठी त्या वेळी हजर असलेले सर्व पर्यटक तिथे जमत असत. एक वयस्क माणूस येऊन एडिसनच्या विविध शोधांची मनोरंजक माहिती देत असे आणि काही प्रात्यक्षिके करून दाखवत असे. यामध्ये ग्रामोफोनचे प्रात्यक्षिक महत्वाचे होते. त्यात एडिसनने तयार केलेला जुना ग्रामोफोन त्याने चालवून वाजवून दाखवला, तसेच त्याचा आवाज कमी अधिक करण्यासाठी काय योजना केली होती ती समजावून सांगितली. नंतरच्या काळात इलेक्ट्रॉनिक्सने हे काम अगदी सोपे केले, एक नॉब फिरवून किंवा बटन दाबून  हवा तेवढा व्हॉल्यूम अॅडजस्ट करणे शक्य झाले, पण अँप्लिफायरचा शोध लागायच्या आधी एडिसनने तयार केलेल्या ग्रामोफोनमध्ये एक लहानशी दांडी हलवून त्याच्या कर्ण्याचा आवाज मोठा किंवा बारीक करायची सोय केली होती हे पाहून आश्चर्य वाटले. 


सिनेमाचे यंत्र हा एडिसनचा आणखी एक क्रांतिकारक शोध होता.  एकापाठोपाठ एक अनेक चित्रे वेगाने पडद्यावर दाखवून  चालत्या बोलत्या चित्रांचा आभास दाखवणे ही कल्पनाच भन्नाट होती. एडिसनने त्यासाठी काय काय करावे लागेल याची योजना करून ती सगळी यंत्रसामुग्री निर्माण केली आणि प्रात्यक्षिके करून दाखवली. त्यासाठी एक वेगळी शेड तयार केली होती ती आजही दाखवला जाते.


एडिसनला प्रयोग करून पाहणे अत्यंत प्रिय होते आणि त्याच्याकडे कमालीची चिकाटी होती. प्रयोग केल्यामुळेच प्रगती होते यावर त्याचा ठाम विश्वास होता आणि मिळालेल्या अपयशाने डगमगून न जाता आपले साध्य गाठेपर्यंत तो असंख्य प्रयोग करत रहात असे. कार्यशाळा हीच त्याची प्रयोगशाळा होती आणि त्याने त्याला शोधांचा कारखाना (इन्व्हेन्शन फॅक्टरी) असे नाव दिले होते. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पहिल्याच प्रयत्नात सहसा पूर्ण यश मिळत नाहीच. पण जे अनपेक्षित परिणाम येतात त्यांची चिकित्सा करून कोणती तृटी राहिली याचे नेमके कारण शोधून काढून आवश्यक ती सुधारणा करून पुढील प्रयोग केले जातात. एडिसनला विज्ञानाची सखोल जाण असल्यामुळेच तो हे काम व्यवस्थितपणे करू शकत होता.


या संग्रहालयाच्या आवारात थॉमस एडिसनचा एक भव्य पुतळा आहे आणि दुसऱ्या एका ठिकाणी एडिसन आणि टेसला या दोघांचे पूर्णाकृति पुतळे जवळ जवळ उभे केले आहेत. अमेरिकेतल्या पद्धतीप्रमाणे कुणीही पर्यटक या पुतळ्यांच्या आजूबाजूला उभे राहून किंवा त्याच्याशी लगट करून आपले फोटो काढून घेऊ शकतो. एडिसनचा समकालीन प्रसिद्ध शास्त्रज्ञ निकोला टेसला हा डिस्कव्हरी आणि इन्व्हेन्शन या दोन्हीही गोष्टी करणारा महान शास्त्रज्ञ होता. विजेच्या उत्पादनाच्या आणि विजेचा उपयोग करून घेण्याच्या बाबतीत तो एडिसनचा प्रतिस्पर्धी होता. त्याने आल्टर्नेटिंग करंट (एसी) या प्रकारच्या विजेचा पुरस्कार केला आणि तिचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि वहन सुरू केले. एडिसनने विजेचे दिवे लावून जगाला अंधारातून प्रकाशात आणले तर टेसलाने विजेवर चालणारी यंत्रसामुग्री तयार करून यांत्रिकीकरणाला चालना दिली. मी नायगराचा धबधबा पहायला गेलो होतो तेंव्हा टेसलाचे स्मारक पाहिले होते आणि या वेळी एडिसनचे स्मारक पाहून या दोन्ही महान शास्त्रज्ञांची किमया पाहिली आणि धन्य झालो.

थॉमस आल्वा एडिसन यांच्या जीवनाबद्दल माहिती 

एडिसन, टॉमस अल्वा (११ फेब्रुवारी,१८४७ ते १८ ऑक्टोबर,१९३१).अमेरिकन संशोधक. तारायंत्र, ग्रामोफोन, प्रदीप्त दिवा (बल्ब), वीज पुरवठ्याचे देशव्यापी जाळे पसरविणारे विद्युत् जनित्र, चलच्चित्रपट प्रक्षेपक (सिनेमा प्रोजेक्टर), प्रत्याभरण (चार्जिंग) करता येणारी विद्युत् संचायक घटमाला (बॅटरी), पहिला बोलका चित्रपट, बेंझीन व कार्बोलिक अम्लाची निर्मिती यांसाठी एडिसन ओळखले जातात.

एडिसन यांचा जन्म अमेरिकेच्या ओहायओ प्रांतातील मिलान या गावी झाला. मिशिगन राज्यातील पोर्ट ह्यूरन येथील शाळेत ते तीन महिनेच शिकले.  बारा वर्षांचे असताना त्यांनी ग्रँड ट्रंक रेल्वेवर वर्तमानपत्र विकताना छपाई यंत्राशी खटपट व प्रयोग करायला सुरुवात केली. वयाच्या १५ व्या वर्षी ग्रँड ट्रंक वीकली हे साप्ताहिक सुरू केले आणि मालगाडीच्या डब्यातच प्रयोगशाळा थाटली. मात्र प्रयोगशाळेत स्फोट झाल्याने त्यांना प्रयोगशाळा बंद करावी लागली. रेल्वे स्टेशन अधिकाऱ्याच्या मदतीने ते तारायंत्र शिकले व तारायंत्र प्रचालक (ऑपरेटर) म्हणून नोकरी करू लागले.  या नोकरीच्या काळातच, त्यांनी त्यांचा महत्त्वाचा प्रचालकाशिवाय चालणाऱ्या, एकच संदेश विविध ठिकाणी पाठवू शकणाऱ्या स्वयंचलित यंत्राचा शोध लावला. त्यानंतर त्यांनी बॉस्टन शहरात नोकरी पत्करली आणि उर्वरित वेळ संशोधनासाठी दिला. तेथे त्यांनी एक मतदान यंत्र तयार केले, या करिता त्यांना १८६८ मध्ये पहिले एकस्व (पेटंट) मिळाले. न्यूयॉर्कमधील ‘गोल्ड अॅण्ड स्टाक’ तारायंत्र कंपनीत काम करत असताना तेथील यंत्रसामग्री व सेवाप्रणालीमध्ये त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणल्या. नोकरीतून उरलेल्या वेळात संशोधन करताना तारायंत्रासाठी जोडयंत्रणा तयार केली. त्यातूनच मिळालेल्या कमाईतून प्रयोगशाळा स्थापन करून स्वयंचलित वेगवान तारायंत्रणा तयार केली. त्यामुळे नेहमीच्या तारायंत्र तारांद्वारे अनेकपट अधिक संदेशवहनाची सोय झाली. त्याचवेळेस अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी शोधलेल्या टेलिफोनसाठी एडिसनने प्रेषक (ट्रान्समीटर) शोधून एक महत्त्वपूर्ण संशोधन केले.  सन १८७७ मध्ये, एडिसनने फोनोग्राफचा (मूळचा ग्रामोफोन) शोध लावला. यांत्रिक ऊर्जा वापरून प्रथमच कथिलाच्या (टीनच्या) पत्र्यावर आवाज लिहिला गेला आणि ध्वनिमुद्रण नावाचे नवीन विश्व उलगडले गेले.

विजेच्या दिव्याचा शोध जरी जोसेफ स्वॅान यांनी लावला असला, तरी विजेच्या दिव्याला लोकमान्यता मिळण्यासाठी एडिसनने सर्वांना परवडणारा, सहज हाताळता येणारा, टिकाऊ आणि सुरक्षित असा प्रदीप्त दिवा (बल्ब) तर तयार केलाच शिवाय विजपुरवठ्याचे देशव्यापी जाळे उभे केले. विजेच्या दिव्याचे घाऊक उत्पादन आणि वितरण केले.  त्यामुळे सर्वसामान्यांनी विजेच्या दिव्याला आपलेसे केले. याच विजेच्या दिव्यात नवनव्या सुधारणा केल्या. मोठ-मोठी विद्युत् जनित्रे बनविली आणि १८८२ मध्ये जगातला पहिला मध्यवर्ती वीजनिर्मिती प्रकल्प न्यूयॉर्क शहरात स्थापन केला. सन १८८८ मध्येच एडिसन यांनी चलच्चित्रपट प्रक्षेपक (कायनेटोस्कोप) शोधून काढला. यात सुटीसुटी चित्रे भराभर फिरवून हलती चित्रे अर्थात ‘सिनेमा’ निर्माण केला. चलच्चित्रपट प्रक्षेपक म्हणजेच सिनेमा प्रोजेक्टर. यानंतर एडिसनने पुनर्भारण (चार्जिंग) करता येण्याजोगी, लोह व निकेल वापरून अल्कधर्मी संचायक विद्युत् घटमाला (स्टोरेज बॅटरी) तयार केली.  ती भक्कम, टिकाऊ व उच्चक्षमतेची होती.   फोनोग्राफमध्ये सुधारणा करून व चलच्चित्रपट प्रक्षेपकाशी जुळवून पहिला बोलका सिनेमा तयार केला. विजेचे पेन, मिमिओग्राफ (सायक्लोस्टायलींग मशीन), तापमानातील अतिसूक्ष्म बदल दाखविणारा मायक्रोसिमिटर, धावत्या रेल्वेाशी संपर्क साधण्यासाठी बिनतारी  यंत्रणा अशा अनेक संशोधनानंतर एडिसनने रसायन उद्योगातही झेप घेतली. एडिसनने बेंझीन, कार्बोलिक अम्ल यांसारख्या रसायनांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणारी संयंत्र उभारून, त्यावर उत्पादन करून पहिल्या महायुद्धाच्या काळात साहाय्य केले. त्याने तापानुशीतन (अनिलींग) प्रक्रियाही शोधून काढली. ही धातू, मिश्रधातू व काच यांचा ठिसूळपणा कमी करणारी प्रक्रिया आहे. विजेवर चालणाऱ्या घरगुती व औद्योगिक यंत्राच्या क्षेत्रातील जगातील सर्वांत मोठी कंपनी ‘जनरल इलेक्ट्रीक’ एडिसननेच स्थापन केली. सन १९१५ मध्ये, अमेरिकन नौदल सल्लागार समितीचा अध्यक्ष असताना एडिसनने नौदलासाठी अनेक उपकरणे तयार केली.

एडिसन यांनी काळानुसार आधी बनविलेल्या उपकरणात अनेक सुधारणा घडवून आणल्या. सन १८८३ मध्ये एडिसन यांनी सूक्ष्म निरिक्षणावर आधारित ‘धातूच्या तप्त राखेतून इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह निघतो’ हा  महत्त्वपूर्ण शोध लावला.  हा शोध आधुनिक इलेक्ट्रॅानिक्स तंत्रज्ञानात मूलभूत आणि महत्त्वाचा ठरला. म्हणूनच या शोधाला ‘एडिसन इफेक्ट’असे नाव दिले गेले. ‘कठोर परिश्रमाला पर्याय नाही’ हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. त्यानुसार त्यांनी अपार कष्ट केले.

एडिसन यांनी विद्युत् क्षेत्र आणि संदेशवहन या क्षेत्रांमध्ये अत्यंत यशस्वी संशोधन केले असले तरी, १८८० ते १८९० च्या दशकात एडिसनने आपल्या प्रयोगशाळेत चुंबकीय खनिज अलग करण्याला प्राधान्य दिले होते.  त्यापूर्वीही प्रदीप्त दिव्यांसाठी प्लॅटिनमचा शोध घेत असताना खनिज विलग करण्यावर एडिसनने काम केले. त्याने वाळुतून लोहमिश्रीत खनिज प्लॅटिनम बाजूला करणारे उपकरण बनविले होते.  एडिसनने १४५ जुन्या खाणींचे स्वामित्व मिळविले होते. त्यातील न्यू जर्सीतील ऑक्डेन येथील खाणीवर एक मोठा पायलट प्लान्ट स्थापीत केला होता. त्यातून त्याला पैसे कमविण्याची संधी दिसत होती.  परंतु जेव्हा लोखंडाचे भाव धडाधड कोसळले तेव्हा त्यांनी ही कल्पना सोडून दिली. कोणतेही अपयश एडिसनच्या संशोधन वृत्तीला थांबवू शकले नाही. आपल्या वयाच्या ८० व्या वर्षीही त्यांचे संशोधन चालूच ठेवले.

आपल्या आयुष्यात एडिसन यांनी विद्युत्दीप आणि शक्ती संबंधी ३८९, फोनोग्राफसंबंधी १९५, टेलिग्राफ संबंधी १५०, संचायक विद्युत् घटमाला (स्टोरेज बॅटरी) संबंधात १४१ आणि दूरध्वनी  संदर्भात ३४ अशी एकूण ९०० च्या वर एकस्वे संपादित केली.

अमेरिकेशिवाय इंग्लंड, फ्रान्स व इतर देशांनी अनेक पुरस्कार, सुवर्णपदके इत्यादी देऊन एडिसन यांचा वेळोवेळी सन्मान केला. जनतेची कृतज्ञतेची पावती म्हणून एडिसनने व्रतस्थ राहून निर्मोही वृत्तीने त्यांचा स्वीकार केला. अनेक पराक्रमांनी आपले आयुष्य सार्थकी लावून एडिसन  न्यू जर्सीतील वेस्ट ऑरेंज येथे निवर्तले. सन १९५५ मध्ये एडिसन यांचे घर व प्रयोगशाळा अमेरिकन सरकारने राष्ट्रीय ऐतिहासिक वास्तू म्हणून घोषित केले.  मागच्या वर्षी म्हणजे २०२३मध्ये आम्ही या केंद्रालाच भेट दिली आणि त्याच्या निरनिराळ्या कार्यशाळा व प्रयोगशाळा प्रत्यक्ष पाहिल्या,


Saturday, June 01, 2024

अमेरिकेतला भारतीय स्वातंत्र्य दिवस

 आपण सर्वजण दरवर्षी १५ ऑगस्टला मोठ्या उत्साहाने स्वातंत्र्यदिन साजरा करत असतो. त्या दिवशी दिल्लीमधल्या लाल किल्ल्याच्या एका बुरुजावर देशाचे पंतप्रधान झेंडावंदन करतात. तो सोहळा पाहण्यासाठी  खालच्या प्रांगणामध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक आणि मुले जमा झालेली असतात. त्यांच्यासमोर प्रधानमंत्री मोठे भाषण करतात, ते खरे तर सर्व देशाला उद्देशून केलेले असते आणि टेलिव्हिजनच्या सर्व वाहिन्या त्याचे थेट प्रक्षेपण करत असल्यामुळे देशभरातले कोट्यावधी लोक ते भाषण भक्तिभावाने ऐकत असतात. आमच्या लहानपणी गावातल्या सगळ्या शाळांमधली मुले त्या दिवशी सकाळी प्रभातफेरी काढून रांगेने गावातल्या मुख्य रस्त्यांवरून फिरून अखेर मामलेदार कचेरीच्या आवारात जमा होत असत आणि तिथे तालुक्याचे मुख्य अधिकारी व नेतेमंडळी झेंडावंदन करून चार शब्द उपदेश करत असत. मोठेपणी आमच्या अणुशक्तीनगर वसाहतीतसुद्धा प्रत्येक बहुमजली बिल्डिंगमधले बहुतेक रहिवासी खाली उतरून सार्वजनिक ध्वजारोहणाचा कार्यक्रम करत असू आणि त्यानंतर देशभक्तिपर गाणी गाऊन मिठाई वाटत असू. 

आता पुण्यातल्या आमच्या ब्ल्यूरिज टाउनशिपमध्येसुद्धा आम्ही ती परंपरा जोपासली आहेच. मध्यंतरी कोविडमुळे दोन वर्षे खंड पडला होता.   गेल्या वर्षी तिथल्या रहिवाशांनी दणकेबाज कार्यक्रम करून  त्याची उणीव भरून काढली. त्या वर्षी मी तिथे हजर नव्हतो तरी वॉट्सॅपवर त्या कार्यक्रमांचे व्हीडिओ आणि फोटो पाहिले.

 गेल्या वर्षी ४ जुलै म्हणजे अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाला मी तिथे होतो. त्या दिवशी सर्वांना सुटी होती पण ती कशी मजेत घालवायची याचाच विचार सगळेजण करत होते. न्यूजर्सीमध्ये आम्ही रहात असलेल्या भागात तरी कुठल्याच प्रकारची मिरवणूक, सभा असा काही प्रकार नव्हताच. संध्याकाळी अंधार पडल्यावर एका ठिकाणी सार्वजनिक फायरवर्कचा कार्यक्रम होता. तो पहायला म्हणून आम्ही मोटारीतून गेलो तर त्या पटांगणाकडे जाणारे सगळे रस्ते दूर दूर अंतरांवरच वाहतुकीसाठी बंद करून ठेवले होते. तो पत्ता देऊन जीपीएसवरून शोध घेतांना आम्ही वळत वळत पाचसहा मैलांचा फेरा घालत आणि पुन्हा पहिल्याच ठिकाणी परत येत होतो. वाटेत एका ठिकाणी काही मंडळी रस्त्याच्या कडेला असलेल्या लहानशा उंच जागेवर उभी असलेली दिसली. तिथे रस्त्यावर हवी तिथे गाडी उभी करता येत नाही. त्यामुळे त्या लोकांच्या पलीकडे मोकळी जागा पाहून दाटीवाटीने तिथे गाडी लावली आणि आम्हीही त्यांच्या घोळक्यात सामील झालो. तेवढ्यात दुरून आकाशात आतीशबाजी सुरू झालेली दिसायला लागली.  एकामागोमाग एक अग्निबाण आकाशात उडून फुटत होते रंगीबेरंगी कण उधळत होते आणि विझून जात होते. आजकाल आपल्याकडे लग्नसमारंभामध्ये करतात तशाच प्रकारची ही रोशणाई होती आणि आम्ही ती खूप दुरून पहात असल्यामुळे फार आकर्षक किंवा डोळे दिपवणारी वाटली नाही. मी यापूर्वी युरोपअमेरिकेत काही ठिकाणी पाहिलेले लेजर शोज यापेक्षा अनेक पटींनी भव्यदिव्य होते.

मागील वर्षी १५ ऑगस्टला मंगळवार होता. त्या दिवशी अमेरिकेत सुटीचा दिवस नव्हता, सगळ्या लोकांना कामावर जायचे होते आणि सगळ्या मुख्य रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्थितपणे सुरु ठेवणे आवश्यक असते, त्यात व्यत्यय येऊ द्यायचा नसतो. म्हणून तिथल्या भारतीय रहिवाशांना आधीच्या आणि नंतरच्या रविवारी म्हणजे १३ आणि २० तारखेला स्वातंत्र्यदिवस साजरा करायला परवानगी मिळाली होती. आमच्या साउथ प्लेनफिल्ड गावातून जाणाऱ्या ओकट्री रोडवर पुढे लागणाऱ्या एडिसन या शहराच्या एका भागात पहिल्या रविवारी एक शोभायात्रा काढण्याचा कार्यक्रम ठेवला होता. त्या भागात आदल्या दिवसापासूनच रस्त्याच्या दोन्ही कडांना अमेरिकेचे आणि भारताचे राष्ट्रध्वज लावून ठेवले होते ते आम्ही पाहिले होते, पण त्या दिवशी आकस्मिक उद्भवलेल्या काही कारणामुळे आम्ही ती मिरवणूक पहायला जाऊ शकलो नाही.  २० तारखेला न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन या मुख्य भागात एक खूप मोठी शोभायात्रा निघणार होती ती पहायचे ठरवले.

न्यूयॉर्कमधली प्रचंड रहदारी, तिथे पार्किंगसाठी जागा शोधण्याचे दिव्य आणि त्यासाठी भरावा लागणारा अव्वाच्या सव्वा भुर्दंड वगैरेचा विचार करता आम्ही तिथे ट्रेनने जायचे ठरवले. आमच्या घरापासून तीनचार मैलावर असलेल्या मेट्रोपार्क नावाच्या रेल्वे स्टेशनवर गेलो, तिथल्या प्रशस्त पार्किंग लॉटमध्ये गाडी उभी केली आणि तिकीटे काढून प्लॅटफॉर्मवर गेलो. इथली रेल्वेस्टेशने सपाट जमीनीवर एका लेव्हलला नसतात. तिथे जाऊन पोचल्यावरसुद्धा एलेव्हेटर (लिफ्ट) किंवा सरकत्या जिन्यांमधून वरखाली जावे लागते. आम्हाला ते शोधून प्लॅटफॉर्मवर जाऊन पोचायला जरा जास्तच वेळ लागला आणि आमची गाडी आमच्या डोळ्यासमोरून धडधडत जातांना दिसली. आता पुढची ट्रेन येईपर्यंत वाट पहात बसणे भाग होते. पण बसायला चांगल्या खुर्च्या होत्या आणि त्या सगळ्या रिकाम्याच होत्या. आम्ही एका जागी बसलो, बरोबर आणलेले डबे उघडले आणि सँडविचेस खाऊन घेतले. 

आमच्या समोरच फक्त दोन तीन डब्यांची एक लहानशी ट्रेन येऊन उभी राहिली. माइकवर दिल्या जात असलेल्या घोषणांनुसार ती गाडीसुद्धा न्यूयॉर्ककडे जात होती. आम्ही उठून तिकडे जात होतो तेवढ्यात पुढच्या डब्यातून एक टीसीसारखा गणवेशधारी ऑफिसर उतरला आणि त्याने ही गाडी अमक्या तमक्या कंपनीची आहे, ज्यांनी आमच्या कंपनीचे तिकीट काढले असेल त्यांनीच फक्त या गाडीत चढावे असे ओरडून सांगितले. आमच्याकडे एनजे ट्रान्झिट या वेगळ्या कंपनीचे तिकीट होते म्हणून आम्ही त्या गाडीने जाऊ शकत नव्हतो. आणखी थोड्या वेळाने एनजेटीची ट्रेन आली. ती सिंगल डेकर होती. या रूटवर बहुतेक ट्रेन डबल डेकर असतात, पण या वेळेला साधी एकमजली गाडीच आली होती आणि ती प्रवाशांनी भरलेली होती. रविवार असल्यामुळे रेल्वेगाड्या रिकाम्या जात असतील असे आम्ही समजून होतो पण  कदाचित त्या दिवशी भारतीय स्वातंत्र्यदिन पहायला आणखी बरेच लोक निघाल्यामुळे जास्त गर्दी झाली असेल.  मला एक रिकामी जागा दिसली ती मी पटकन पकडली. नंतर इतरांनाही बसायला जागा मिळाल्या, पण निरनिराळ्या रांगांमध्ये.

चाळीस मिनिटांच्या प्रवासानंतर आम्ही न्यूयॉर्कच्या पेन स्टेशनाला पोचलो. आधी आम्ही गाडीत निरनिराळ्या ठिकाणी बसलो होतो आणि हा शेवटचा थांबा आल्यानंतर फलाटावर उतरून सगळे एकत्र आलो. हे पेन स्टेशनसुद्धा एक अजूबा आणि भूलभुलैयाच आहे. हे स्टेशन यायच्या आधीच आमची गाडी एका मोठ्या बोगद्यात शिरली आणि ती स्टेशनात जिथे येऊन उभी राहिली तो भागही पाताळातच होता. तिथून वर चढून बाहेर जाण्यासाठी अनेक सरकते जिने आणि कॉरीडॉर्स होते. अमूक ठिकाण या बाजूला आणि तमूक ठिकाण त्या बाजूला असे बाण दाखवणारे फलक जागोजागी दिसत होते, पण आमच्यासाठी अमूक, तमूक आणि ढमूक या सगळ्याच जागा अनोळखी असल्यामुळे त्यातून आम्हाला विशेष दिशादर्शन होत नव्हते. आम्ही आंधळ्यासारखे चाचपडत अखेर एका दरवाजामधून त्या अवाढव्य स्टेशनच्या बाहेर निघालो तेंव्हा कुठे सूर्याचा उजेड दिसला.

ही भारतीय परेड पाहण्यासाठी ३८नंबरच्या स्ट्रीटवर जायचे आहे एवढीच माहिती आमच्याकडे होती. तो रस्ता कुठे आहे हे शोधणे सुरू झाले. ७ की ८ नंबरचे दोन अॅव्हेन्यूज ओलांडून पुढे जात असतांना कुठेतरी ३३ की ३४ नंबरची पाटी दिसली त्यावर जाऊन पुढे शोधायचे होते. तेवढ्यात पोलका डॉटच्या एकसारख्या साड्या नेसलेल्या सातआठ भारतीय महिलांचा एक ग्रुप आमच्यामागून आला आणि झपाझपा पुढे गेला. त्यासुद्धा या मिरवणुकीला निघाल्या आहेत का एवढे आम्ही त्यांना विचारून घेतले आणि त्यांच्या मागेमागे जात ३८ नंबरच्या स्ट्रीटवर जाऊन पोचलो. आमच्या ओळखीची कुलकर्णी मंडळी तिथे होतीच. त्यांची मुलगी शोभायात्रेतल्या एका ढोलताशा पथकात भाग घेणार होती. खरे तर आम्ही त्यांना मेट्रोपार्क स्टेशनवरच भेटणार होतो आणि त्यांच्याबरोबर जायचे असे ठरले होते. पण आमची गाडी चुकल्यामुळे तिथे आमची चुकामूक झाली होती. ३८ नंबरच्या रस्त्यावर बरीच उत्साही भारतीय मंडळी शोभायात्रेच्या तयारीत उभी होती, पण आम्ही पोचेपर्यंत तो कार्यक्रम सुरू झाला नव्हता. 


न्यूयॉर्क शहरातही मुंबईतल्यासारखे काही उत्तर दक्षिण जाणारे लांब हमरस्ते आहेत, त्यातलाच एक मॅडिसन अॅव्हेन्यू नावाचा रस्ता आहे. त्या रस्त्याचा एक लहानसा भाग भारत दिनाच्या परेडसाठी दुपारच्या तीन तासासाठी राखून ठेवला होता.  तेवढ्या वेळासाठी त्या रस्त्याने होणारी वाहतूक  दुसऱ्या रस्त्यांवरून वळवली होती. त्या हमरस्त्याला छेद देणाऱ्या ३७, ३८ सारख्या काही उपरस्त्यांवर अनेक लोक आपापले चित्ररथ आणि पथके घेऊन येऊन थांबले होते. त्यातच एक न्यूजर्सीमधील मराठी मंडळींचे जल्लोश नावाचे ढोलताशा पथक होते.  या पथकात अनेक उत्साही तरुण आणि त्यांच्यापेक्षाही जास्त उत्साही युवती मोठमोठे ढोल आणि ताशे गळ्यात बांधून त्यांना सांभाळत आणि तालात बडवत होते, काही जणांनी मोठमोठ्या झांजा हातात घेतल्या होत्या तर अनेक मुली लेझिम वाजवत नाचत होत्या. मधून मधून कोणी तरी छत्रपती शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम्, भारतमाता की जय वगैरे घोषणा करत होता.  काही जणांनी मोठमोठे तिरंगी झेंडे आणि इतर काही झेंडे सांभाळले होते. त्यातल्या एका झेंड्यावर जाणता राजा अशी अक्षरे लिहिली होती. सर्वांनी भारतीय आणि मुख्यतः महाराष्ट्रीय परंपरागत पद्धतीची वेशभूषा केलेली होती. अनेकांनी डोक्यावर पागोटी घातली होती. 

    


त्या पथकात भाग घेणारी सुमारे पन्नास साठ मंडळी आणि त्यांचे शंभर दीडशे आप्त अशी सगळी गर्दी त्या ३८व्या रस्त्यावर जमा झालेली होती. अजून मुख्य शोभायात्रेची सुरुवात झालेली नसली तरी हे लोक त्याची पूर्वतयारी म्हणून जोरजोरात ढोलताशेझांजा बडवून जल्लोशाची वातावरण निर्मिती करत होते. तिथे आजूबाजूला कोण लोक रहात असतील आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया असतील त्या कदाचित तिथल्या लोकांच्या सोशल मीडियावर आल्या असल्या तरी त्या आम्हाला कळायचा मार्ग नव्हता.  आम्ही थोडा वेळ तिथे थांबून इतर चित्ररथ पहात पहात पुढे जाऊन मॅडिसन अॅव्हेन्यूवर गेलो आणि एक मोक्याची जागा पकडली. तिथे रस्त्याच्या कडेला एका झाडाची थोडी सावली होती, मागे एक खाद्यपेयांचे दुकान होते आणि ते घेऊन बाहेर आणून खाण्यासाठी रस्त्यावर एक बेंचही ठेवला होता.



भारत दिनाची परेड दुपारी बारा वाजता सुरू होणार आहे अशी माहिती आम्हाला मिळाली होती आणि पहिली गाडी चुकली तरीही आम्ही तिथे वेळेवर जाऊन पोचलो होतो. रस्त्यावर अनेक सजलेले चित्ररथ तसेच पायी चालणारी मंडळी जय्यत तयारीत दिसत होती. अग्रभागी संचलन करणारे सुटाबुटातले गणवेशधारी युवकही तयार होते, त्यांचा बँडही समोर उभा होता, पण परेड का सुरू होत नव्हती, ती कुणासाठी थांबली होती ते समजत नव्हते. निरनिराळ्या आवाजात इतके कर्णे किंचाळत असले तरी या परेडबद्दल काही घोषणा होत नव्हती. बघे लोकही नुसतीच चुळबुळ करत होते.


बराच वेळ वाट पाहून झाल्यानंतर एकदाचा हिरवा कंदील मिळाला आणि शोभायात्रा हलायला लागली. सर्वात पुढे दोन घोडे हळूहळू चालत होते, त्यांच्या मागे न्यूयॉर्क पोलिसांचा बँड होता. त्याच्या मागे चार तरुण चार मोठे झेंडे घेऊन चालत होते. अर्थातच त्यातला एक अमेरिकेचा आणि एक भारताचा राष्ट्रध्वज होता. उरलेले दोन कदाचित न्यूयॉर्क राज्य व न्यूयॉर्क शहर यांचे किंवा पोलिसखात्यांचे असावेत. अमेरिकेत ज्याचा त्याचा स्वतंत्र झेंडा असतो आणि तो कुणी कुठे किंवा कधी लावावा अथवा लावू नये असे काही नसते. आम्ही ज्या भागात रहात होतो तिथल्या सात आठ घरांसमोर नेहमीच रंगीबेरंगी झेंडे फडकत असायचे. मिरवणुकीतल्या ध्वजधारकांच्या मागून न्यूयॉर्क पोलिसखात्यात काम करणारे भारतीय वंशाचे वीसपंचवीस अधिकारी त्यांच्या गणवेशात शिस्तीत चालत होते. एवढीच काय ती शिस्तबद्ध परेड होती, पण त्यांच्या मागे खूप चित्ररथ आणि पायी चालणारी अनेक पथके होती.  


न्यूयॉर्कमधल्या पोलिसखात्यातील दोन विभागांच्या गाड्याही त्यांच्या संचलनामध्ये दिसत होत्या. एक संचलन पुढे निघून गेल्यानंतर मध्ये थोडी मोकळी जागा सोडून मागची पार्टी नाचत नाचत पुढे येत होती. तेलुगू लोकांच्या समूहात सगळ्यात समोर एक श्रीरामचंद्राची वेशभूषा केलेला धनुर्धर होता आणि त्याच्या बरोबर एक नखशिखांत सजलेली भारतमाता चालत होती. त्या दोघांच्या मागेमागे एक राक्षसासारखा दिसणारा माणूस दोन्ही हातात दोन आसूड घेऊन त्यांना स्वतःभोवती नुसताच फिरवत होता. मी लहानपणी कडकलक्ष्मी नावाचा एक प्रकार लहान गावातल्या रस्त्यांवर पाहिला होता हे सोंग तसेच काहीतरी दिसत होते, पण त्याच्या आसुडाचा फटका त्याला बसतच नव्हता. त्यांच्या चित्ररथावर एक मोठी गणपतीबाप्पाची मूर्ती आणि तिच्या आजूबाजूला मंदिराचा देखावा केलेला होता आणि अधून मधून  ते लोक घंटा वाजवून गणेशाचा जयजयकार करत होते. त्यांच्या मागे जल्लोश पथक ढोलताशा, झांजा वगैरे वाजवत आणि लेझिम खेळत पुढे सरकत होते.


या शोभायात्रेसाठी आंतरराष्ट्रीय योगगुरु श्री श्री रविशंकरजी एक मुख्य अतिथि होते. त्यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगचा मोठा चित्ररथ बराच मागून येत होता, पण गुरुजी त्यांच्या अनेक शिष्य किंवा भक्तांच्या बरोबर पायीच चालत येतांना दिसले. खरे तर ते आजूबाजूच्या इतर उंच लोकांच्या मागे झाकून गेले होते, त्यामुळे मला त्यांचे अगदीच ओझरते दर्शन झाले. त्यांच्या मागे मागे मिशन इन लाइफ नावाचा फ्लोट येत होता. याशिवाय  योगा कम्युनिटी या नावाचा एक वेगळा ग्रुप हातात काही फलके घेऊन या परेडमध्ये भाग घेत होता.


नवी दिल्लीमधील  गणतंत्रदिनाच्या संचलनातले चित्ररथ भारत सरकारची निरनिराळी खाती आणि काही  राज्य सरकारे यांनी तयार करवून घेतलेले असतात आणि दूरदर्शनाच्या माध्यमातून कोट्यावधी लोक ते पहात असतात. ते तयार करण्यासाठी भरपूर खर्चही केला जातो आणि वेळही दिला जातो. अर्थातच ते खरोखरच भव्यदिव्य असतात. न्यूयॉर्कच्या एका रस्त्यावरून काढलेली ही इंडिया परेड आमच्यासारख्या काही लोकांनी प्रत्यक्ष पाहिली असेल आणि आणखी काही लोकांनी ती नंतर यूट्यूबवर पाहिली असेल. त्यामुळे त्याला फारसे प्रसिद्धीमूल्य नव्हतेच. यातले सगळे चित्ररथ खाजगी संस्था किंवा कंपन्यांनी स्वखर्चाने तयार केले होते आणि त्यांचे बजेटही जास्त असायचे कारण नव्हते. त्यामुळे त्यांच्या गुणवत्तेबद्दल फार जास्त अपेक्षा ठेवण्यात अर्थ नव्हता. मुळात ते तयार केले गेले आणि काढले गेले यालाच महत्व होते.


या चित्ररथांमध्ये खूप विविधता होती.  मिशन इन लाइफ या संस्थेकडून पर्यावरणाची काळजी घेण्याचा संदेश दिला जात होता, अन्न हवे असेल तर जमीनीची काळजी घ्या असे ते सांगत होते, तर न्यूजर्सी सिद्धीविनायक नावाचे मंडळ आपल्या गणेशोत्सवाला या असे आवाहन करत होते. एका संस्थेने स्कॉटिश बॅगपाइपर्सचा बँड आणला होता, तो चक्क हिंदी गाणी वाजवत होता. तसाच एक पनामातल्या लोकांचा बँड होता. त्यांचा त्या संस्थांशी किंवा भारताशी काय संबंध होता कोण जाणे! बॉलिवुडची एक अभिनेत्री जॅकेलिन फर्नांडिस ही आणखी एक सेलिब्रिटी होती. ती मात्र एका फ्लोटवर समोर उभी राहून सर्व प्रेक्षकांना अभिवादन करत होती. तो फ्लोट कुणाचा होता ते मला आता आठवत नाही.  बादशाह मसाले ही भारतीय कंपनी आणि डंकिन डोनट्स ही अमेरिकन कंपनी आपापल्या जाहीराती करत होत्या. आहारामध्ये 'मिलेट्स' म्हणजे ज्वारी, नाचणी यासारख्या धान्यांचा वापर करा असा प्रचार करणारा एक चित्ररथ होता.  पांढऱ्या शुभ्र वेशातले ब्रह्मकुमारींचे साधक आणि भगिनींचा एक मोठा जमाव भारताचे आणि त्या संस्थेचे ध्वज घेऊन चालत होता. जगभरातल्या अनेक देशांमध्ये भगवान स्वामीनारायणाची सुंदर मंदिरे बांधणाऱ्या बीएपीएस या संस्थेने दिल्लीतल्या अक्षरधामची प्रतिकृति असलेला सुंदर चित्ररथ आणला होता. स्टेटबँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय या बँकांच्या अमेरिकेतल्या मुख्य शहरांमध्ये शाखा आहेत. त्यांनी याबद्दल माहिती देणारे फ्लोट्स ठेवले होते. एका समूहात उत्तर अमेरिकेतले मुस्लिम एकत्र चालत होते, त्याचप्रमाणे अमेरिकेत रहाणाऱ्या काश्मीर, बिहार आणि झारखंड वगैरे ठिकाणच्या लोकांच्या संघटनांचे चित्ररथ होते. मला सगळ्यात जास्त आश्चर्य याचे वाटले की फलूनदफा अशा विचित्र नावाच्या एका समूहात पिवळा गणवेश घातलेले जवळ जवळ शंभर लोक होते आणि ते सगळे मंगोल वंशीय दिसत होते. टाइम्स नाउ आणि टीव्ही एशिया या माध्यमांनीही आपली उपस्थिति दाखवणारे फ्लोट्स आणले होते. अशा प्रकारे ती एक खूप मोठी मिरवणूक होती. फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्सतर्फे न्यूयॉर्कच्या रस्त्यावरून काढलेली ही मिरवणूक भारताबाहेरील भारतीयांनी केलेला सर्वात मोठा जाहीर सोहळा आहे अशी जाहिरात केली जात होती. ती पाहतांना मलाही देशाभिमानाबरोबर थोडे आश्चर्यही वाटत होते.