Saturday, February 28, 2015

बाबामहाराज सातारकर यांचे कीर्तन (उत्तरार्ध)

ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांचे हे सुश्राव्य कीर्तन एका शिवमंदिरात चाललेल्या महाशिवरात्रीच्या उत्सवामध्ये चालले होते. विठ्ठलभक्त वारकरी सांप्रदायातले बाबामहाराज आज शिवलीलेच्या कोणत्या कथेचे आख्यान लावणार आहेत याची मला उत्सुकता वाटत होती. पण कीर्तन सुरू झाल्यानंतर काही वेळाने लक्षात आले की हरिनाम हाच त्यांच्या या कीर्तनाचा विषय होता. "शिव हालाहले तापला। नामे तोही शीतल झाला।।" अशा प्रकारे त्यात शंकराचा नावापुरता उल्लेख आला होता. कुठल्याही देवाचे किंवा परमेश्वराचे नाव घेणे का आवश्यक आहे हे सांगण्यासाठी त्यांनी वळणावळणाचा मार्ग निवडला होता.

आपल्या डोळ्यांना देव दिसत नाही म्हणून काही लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत, पण जगातल्या सगळ्याच गोष्टी डोळ्यांना दिसतातच असे नाही या सत्याचा आधार घेऊन त्यातून देवाचे अस्तित्व पटवून देण्याचे अनंत तर्क सांगितले जातात. आपल्या आजूबाजूच्या हवेपासून ते प्राध्यापकाच्या मेंदूपर्यंत याची अनेक उदाहरणे मी आजवर ऐकली आहेत. "आपल्याला हवा दिसते का? पण ती असते हे आपल्याला माहीत आहे. याचप्रमाणे देव डोळ्यांना दिसत नसला तरी तो असतो.", "आपल्या या (नास्तिक) प्रोफेसराचा मेंदू कुणी पाहिला आहे का? नाही ना? मग कशावरून त्याच्या डोक्यात मेंदू आहे?" वगैरे वगैरे. बाबामहाराजांनी त्यांच्या कीर्तनात एक वेगळे उदाहरण दिले. ते म्हणाले, "मी आज तुम्हा सगळ्यांना पाहतो आहे, तुमच्यातल्या कुणाच्याच बापाला मी कधी पाहिले नसेल, पण त्यांच्या असण्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे, त्याबद्दल मला जरासुद्धा शंका नाही. मग ज्या देवाने सर्व जगाला जन्माला घातले त्याच्याबद्दल कोणाला का शंका असावी?"

बापावरून सांगतांना बापाचे नाव न घेतल्याने एकदा काय घोटाळा झाला याची एक गोष्ट त्यांनी सांगितली. एका माणसाचे त्याच्या म्हाता-या बापाशी पटत नव्हते. एकदा त्या दोघांमध्ये खडाजंगी वाद झाला आणि "आता मी तुमचे नावदेखील लावणार नाही बघा." असे तणतणत ते माणूस घराबाहेर पडला आणि ऑफीसला गेला. तो नेमका पगाराचा दिवस होता. पगार घेण्यासाठी तो माणूस कॅशियरकडे गेला. कॅशरने त्याला सही करायला सांगितले. त्याने त्याच्या सहीमघले बापाचे नाव गाळून सही केली. कॅशियरने त्याला पैसे दिले नाहीत. त्याची सही रेकॉर्डशी मॅच होत नाही असे म्हणाला. तो माणूस तणतणला, कॅशियरशी भांडला, "इथे माझा बाप काम करतो का? मी केलेल्या सामाचे पैसे मला मिळायला नकोत का?" वगैरे वगैरे. कॅशियरने नियमांवर बोट ठेवले आणि आपण त्यात बदल करू शकत नसल्याचे सांगितले.

तो माणूस चिडून मोठ्या बॉसकडे गेला, त्याच्याकडे कॅशियरची तक्रार केली. बॉसने त्याला त्याचे नाव विचारताच त्याने पुन्हा बापाचे नाव वगळून फक्त आपले नाव व आडनाव सांगितले. त्यावर साहेबाने त्याला समजावले, "हे पहा, तू नोकरीला लागलास त्या वेळी आपले पूर्ण नाव दिले होतेस आणि तशी सही केली होतीस. तुझ्या सगळ्या प्रमाणपत्रांमध्ये (सर्टिफिकेट्समध्ये) तुझे तेच पूर्ण नाव लिहिलेले आहे. यामुळे तुझी हीच अधिकृत ओळख (आयडेंटिटी) आहे. तुझ्या आयडेंटिटी कार्डवर हेच नाव आणि सही आहे. तुझे नातेवाईक, जुने शेजारी, गावातले लोक तुला अमक्या माणसाचा मुलगा म्हणून ओळखतात. तू बापाचे नाव टाकलेस तरी तुमचे नाते नाहीसे होणार नाही. तुझी आतापर्यंतची ओळखच शिल्लक राहील. ती नको असेल तर तुला ही नोकरी, हे गाव वगैरे सोडून दूर कुठे तरी जावे लागेल. त्यापेक्षा हा हट्ट सोड आणि नीट सही करून तुझा पगार घेऊन जा."

हे सांगून बाबामहाराज म्हणाले, "पाहिलेत? आपल्या बापाचे नाव सोडले तर त्या माणसाचा पगार थांबला, नोकरीवर गदा आली. त्यातून त्यालाच राग आला, दुःख झाले, मनस्ताप झाला. त्याने ते घेतले आणि त्याला पुन्हा सगळे मिळाले, त्याचे मन शांत झाले. तुम्ही देवाचे नाव घेतले नाही म्हणून तो नाहीसा होणार नाही, तरीसुद्धा तो तुमची काळजी वहातच राहणार आहे, पण त्याचे नाव घेतलेत तर तुम्हालाच अपूर्व मनःशांती मिळणार आहे.."

हा धागा धरून त्यांनी आपली कथा मूळपदावर आणली आणि पुढले निरूपण चालू ठेवले. "शिव हालाहले तापला। नामे तोही शीतल झाला।।" या अभंगाचा संदर्भ एका पौराणिक कथेशी आहे. समुद्रमंथनाच्या वेळी मेरू पर्वताची रवी करून तिला वासुकी नागाची दोरी गुंडाळली. एका बाजूला देव आणि दुस-या बाजूला दानव यांनी तिला धरून क्षीरसमुद्रात चांगले घुसळले. या मंथनात समुद्रामधून चौदा रत्ने बाहेर निघाली. हलाहल विष हे त्यातले एक होते. देव आणि दानव यांच्यापैकी कोणीच ते घ्यायला तयार नव्हते. त्या जालिम विषाने सगळी सृष्टी नष्ट होण्याचा धोका होता. त्या वेळी सर्वांनी भगवान शंकराची आराधना केली. ते प्रगट झाले आणि त्यांनी ते विष प्राशन केले. त्या विषाच्या प्रभावामुळे त्यांचा गळा निळा पडला म्हणून शंकराला नीलकंठ असेही म्हणतात. ही सगळी कथा थोडक्यात सांगून कीर्तनकारांनी पुढे सांगितले की या वेळी नीलकंठ शंकराच्या अंगाचा प्रचंड दाह होऊ लागला. तो कसा थांबवावा यावर त्यांना नामसंकीर्तनाचा उपाय सापडला. श्रीराम श्रीराम श्रीराम असा जप केल्याने त्यांना शीतलता प्राप्त झाली म्हणे. इतक्या भयंकर प्रसंगावर जर जप करण्याने मात करता येत असेल तर आपल्या जीवनात आपल्याला डिस्टर्ब करणा-या लहान सहान कारणांवर ही मात्रा खचित लागू पडणार नाही का? असा युक्तीवाद त्यांनी केला.

शंकराने हा मंत्र सुरुवातीला कोणालाही न सांगता आपल्याजवळच ठेवला होता, पण जगाच्या कल्याणासाठी तो सर्वांना कळणे आवश्यक होते. हे कसे झाले याची एक कथा बाबामहाराजांनी सांगितली. शंकरभगवान कैलास शिखरावर एकांतात बसून हा जप करायचे आणि त्यातून त्यांना अपूर्व आनंद मिळायचा हे एकदा नारदमुनींनी पाहिले आणि त्यांच्या संवयीप्रमाणे कळ लावायचे ठरवले. त्यांनी पार्वतीकडे जाऊन तिला विचारले, "तुमचा नवरा तुमच्यावर खरेच प्रेम करतो का हो?"
पार्वती म्हणाली, "अर्थातच. तुम्हाला अशी शंका का आली?"
"तसे नाही, पण तुम्ही एकदा त्याची परीक्षा करून पहाल का?"
"त्यासाठी मला काय करायला हवे?"
"त्यांना विचारा की त्यांना कशामधून सर्वात जास्त आनंद प्राप्त होतो. ते ही गोष्ट सांगतात का? हे पहा."
शंकर भगवान परत आल्यानंतर पार्वतीने त्यांना हा प्रश्न विचारला. शंकराला नामस्मरणाचे गूढ गुप्तच ठेवायचे होते. त्यांनी टाळाटाळ केली. त्यावरून त्या दोघांची जुंपली. अखेर शंकराने हार मानली आणि हा मंत्र पार्वतीला सांगितला. तिथून तो सर्वांमुखी झाला.

ही गोष्ट सांगतांना बाबामहाराजांनी पदोपदी काँटेंपररी (आजच्या काळातली) उदाहरणे देऊन त्यात रंजकता आणली. समुद्रमंथनाची गोष्ट सांगतांना ते म्हणाले, कुठल्याही (विचार) मंथनामधून जो (यशाचा) लोण्याचा गोळा निघतो तो ह़डपण्यासाठी सगळे हपापलेले असतात, पण त्यातून अपयशाचे कडवट द्रव निघाले तर ते एकमेकांवर ढकलत असतात. ते पिऊन पचवण्यासाठी एकादा खंबीर नीळकंठच पुढे येतो आणि तो पुढे सर्वांच्या आदराचा धनी होतो. शंकराला भोळासांब म्हणतात, पण तो भोळा बिळा नव्हता, कुठलाच नवरा नसतो, पण घरात शांतता रहावी म्हणून बावळटपणा दाखवतो. कुठलेही गुपित एकदा बायकोला कळले की ते गुपित रहाणार आहे का? ही काही उदाहरणे झाली.

श्रीराम हा अवतार फारच आदर्श होता, त्याच्यासारखे असामान्य आचरण करणे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे होते. त्या नंतरचा कृष्ण अवतार लोकांना थोडा जवळचा वाटण्यासारखा होता. विशेषतः त्याचे गोकुळातले बालपण, त्यातला निरागस खोडकरपणा, गोपिकांशी रचलेल्या रासलीला वगैरे गोष्टी मनमोहक होत्या. या दोन्ही अवतारातले मुख्य कार्य दुष्टांचे निर्दाळन हे होते. विठ्ठलावतारातला देव फक्त भक्तांच्या कल्याणासाठी कंबरेवर हात ठेऊन विटेवर उभा राहिला. रामाच्या हातात धनुष्यबाण तर कृष्णाच्या तर्जनीवर सुदर्शन चक्र असायचे. विठ्ठलाच्या किंवा हरीच्या हातात कोणतेही शस्त्र नाही. या तीघांची सांगड घालून तयार झालेला रामकृष्णहरी हा मंत्र संत तुकारामांना मिळाला आणि त्यांनी तो वारकरी पंथाला दिला. गेली चारपाचशे वर्षे तो पिढ्यानपिढ्या पुढच्या पिढीतल्या माळकरी वारक-यांना दिला जात आला आहे आणि त्या पंथातले लोक या मंत्राचा नियमितपणे जप करीत आले आहेत. वगैरे माहिती त्यांनी दिली.

बाबामहाराजांनी केलेल्या कीर्तनाचे माझ्या लक्षात आलेले आणि आठ दिवसानंतर टिकून राहिलेले सार देण्याचा एक तोकडा प्रयत्न मी या लेखात केला आहे. कीर्तन संपल्यावर त्यांनी असे आवाहन केले की ज्या लोकांना वारकरी होण्याची इच्छा असेल, किंवा निर्माण झाली असेल त्यांनी लगेच पुढे येऊन त्यांच्यापाशी यावे. त्यांच्या हस्ते त्या लोकांच्या गळ्यात तुळशीची माळ घालण्यात येईल. त्यानंतर त्यांनी काही नियम पाळायचे आहेत. रोज सकाळी गुरुमंत्राचा उच्चार करायचा, मांसाहार करायचा नाही, मद्यपान करायचे नाही, वर्षातून एकदा पंढरीची आणि आळंदीची वारी करायची आणि एकदा दुधिवरे गावी बाबामहाराजांनी उभारलेल्या देवस्थानाचे दर्शन घ्यायचे वगैरे सोपे नियम पाळायचे.

मी आपला मागच्या पावलांनी परत फिरलो आणि घरी गेलो.  .

1 comment:

Vijay Shendge said...

अप्रतिम लिहिताय.