Wednesday, February 18, 2015

जुगाड पुराण (भाग ३)





कसलाही एक जुना सांगाडा घ्यायचा किंवा जोडतोड करून तयार करायचा, त्याला चाके लावायची आणि एक इंजिन बसवायचे अशा प्रकारे बनवलेली खतरनाक जुगाडे गाड्या म्हणून रस्त्यावरून जातांना कधी कधी दिसतात. पण काही वेळा याच्या विरुद्ध प्रकारदेखील पहायला मिळतात. एका ठिकाणी गायीम्हशींच्या गोठ्यासमोर उभ्या करून ठेवलेल्या ट्रॅक्टरच्या इंजिनाच्या शक्तीचे दोहन वेगळ्याच कामासाठी होत असलेले पहायला मिळाले. त्या काळात त्या लहानशा आडगावी पराकाष्ठेचे भारनियमन (लोडशेडिंग) चाललेले होते. दिवसातून कधी तरी अचानक वीज यायची आणि काही वेळाने आली तशीच एकदम गुल व्हायची. इमर्जन्सीसाठी लोकांनी घरोघरी इन्हर्टर लावलेले होते, पण वीज आलेली असतांना त्यांची बॅटरी जेवढी चार्ज होत असे तेवढी संपून जायलाही जास्त वेळ लागायचा नाही. त्यानंतर मेणबत्त्या आणि कंदिलांच्या मिममिणत्या उजेडात विजेची आराधना करत वाट पहात बसावे लागायचे. आमच्या यजमानांनी यावर तात्पुरता उपाय म्हणून कुठून तरी एक जनरेटर आणून गोठ्याजवळच्या एका कट्ट्यावर ठेवला होता आणि समोर उभ्या केलेल्या ट्रॅक्टरच्या इंजिनाला बेल्टने जोडला होता. दिवसातून दोन तीन वेळा त्या जनरेटरचा उपयोग करून इन्वर्टरची बॅटरी चार्ज केली जात होती आणि तिच्यामधूनन मिळणा-या विजेवर घरातले काही दिवे लावले जात होते आणि पंखे चालवले जात होते. मुंबईपुण्याकडून आलेल्या आमच्यासारख्या पाहुण्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ही खास व्यवस्था केली गेली होती. शेतातल्या विहिरीवरील पंप, कापलेल्या पिकाची मळणी करणारे यंत्र किंवा उन्हाळ्यात घराला थंड हवा पुरवण्यासाठी खिडकीत बसवलेल्या जंगी कूलरचा अवाढव्य पंखा यांना चालवण्यासाठी सुद्धा ट्रॅक्टरच्या इंजिनाचा उपयोग केला जात असतांना मला पहायला मिळाला आहे.

खेडेगावांमध्ये यथायोग्य साधनांचा अभाव आणि कल्पकतेने त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न यातून अशा प्रकारच्या जुगाडांचा जन्म होतो. वर दिलेल्या पहिल्या चित्रात एका मोटारसायकलीच्या चाकाला पाण्याच्या पंपाला जोडलेले आहे, तर दुस-या चित्रात सायकलीचे पॅडल मारून पिठाची चक्की फिरवली जात आहे. मध्यंतरी एक मजेदार बातमी वाचली. हातापायांचा व्यायाम करण्याची जिममधली यंत्रे एका हॉटेलात बसवली होती म्हणे आणि त्या यंत्रांना जनरेटर्स जोडून त्यातून निर्माण होणारी वीज त्या हॉटेलमध्ये वापरली जात असे. पैसे भरून महागड्या जिममध्ये जाण्याऐवजी लोकांनी एक दमडी खर्च न करता या हॉटेलात जावे, हवा तेवढा वर्कआउट करून घ्यावा आणि वर फुकट नाश्तापाणी करून घ्यावा अशी योजना तिथे होती. ती किती काळ चालली ते काही समजले नाही, पण या जुगाडाची कल्पना मजेदार होती.

भारतात इंग्रजांचे राज्य असतांना इथल्या देशी लोकांपेक्षा ते लोक किती वेगळे आहेत हे दाखवण्याची त्यांना खूप हौस असायची, त्यांच्या वागण्यामधून ते नेहमी दिसत असे. क्रिकेट नावाचा खास साहेबी खेळ त्यांनी इकडे आणला. त्यातले सगळे खेळाडू परीटघडीचा पांढरा शुभ्र पोशाख नखशिखांत परिधान करून मैदानावर उतरायचे आणि त्यावर जास्त डाग पडू नयेत याची काळजी घेत ते लोक हा खेळ बहुतकरून उभ्या उभ्या खेळत असावेत. खास डगले आणि टोपी घातलेले दोन अंपायर मैदानावरल्या त्यांच्या विशिष्ट जागी येऊन तिथे खांबासारखे उभे रहायचे आणि तिथूनच विशिष्ट प्रकारचे हातवारे करत रहायचे. बॅट्समनने कुठे उभे रहायचे, बॉलरने कसे बॉल टाकायचे, फील्डरने त्या चेंडूंना कसे झेलायचे वगैरे क्रिया आणि बॅट, बॉल, स्टंप्स, पिच, क्रीज वगैरे गोष्टींची लांबी, रुंदी नेमकी किती असायला हवी या सगळ्यांसाठी त्यांचे सतराशे साठ नियम असायचे. नेहमी इंग्रजांच्या संपर्कात असणारे किंवा त्यांचे अनुकरण करणारे राजेरजवाडे, नबाब, इंग्रजांचे मुलकी किंवा लष्करी अधिकारी वगैरे बडी मंडळी हे सगळे नियम पाळून हा इंग्रजांचा खेळ खेळतही असत. त्यातून त्यांना किती थरार किंवा आनंद मिळत असे हे सुद्धा त्यांच्या परीटघडी केलेल्या चेहे-यावर दिसले तरी ते जंटलमनपणाच्या मर्यादेत असावे यासाठी त्यांना ते जरा जपूनच व्यक्त करावे लागत असावे.

देशातल्या आपल्या सर्वसामान्य लोकांनी, विशेषतः लहान मुलांनी मात्र या खेळाला जुगाडू वृत्तीची नवी परिमाणे देऊन त्याला आपलेसे करून टाकले. इंग्रजांच्या मूळ क्रिकेटचे पाच दहा ढोबळ नियम घेऊन आणि बाकीचे सगळे धाब्यावर बसवून किंवा आपापसात वेगळे कायदे ठरवून हा खेळ गल्लीबोळातून, चाळीमधल्या मोकळ्या जागेत, इतकेच काय भररस्त्यांवरसुद्धा खेळला जाऊ लागला, हुतूतू, खोखो, कुस्ती यासारख्या अस्सल भारतीय खेळांपेक्षासुद्धा हे जुगाड क्रिकेट जास्त प्रमाणात खेळले जाऊ लागले आणि त्यातून सर्वांनी अमाप आनंद लुटला. आजही तो अशाच उत्साहाने जिकडे तिकडे बेधडक खेळला जातो. या खेळाच्या सध्याच्या जुगाडांमध्ये कसलाही चेंडू, कुठलीही फळी, पुठ्ठा, बांबूचे तुकडे आणि विटांचा ढीगदेखील कसा उपयोगाला आणला जातो हे वरील चित्रातच पहावे.

गेली कित्येक शतके पाहता इंग्लंड आणि अमेरिकेतल्या दोन दोन राजकीय पक्षांमध्ये दरवेळी चुरशीच्या निवडणुका होऊन त्यातल्या विजयी पक्षाचा राज्यकारभार त्या देशांमध्ये चालत आला आहे. स्वतंत्र झालेल्या भारतात सुरुवातीच्या काळातली बरीच वर्षे काँग्रेस पक्षाचे एकछत्री राज्य होते. त्या पक्षाची शकले झाल्यानंतर गेली अनेक वर्षे अनेक पक्षातल्या लोकांनी एकत्र येऊन या देशाचा राज्यकारभार चालवला आहे. किंबहुना असे म्हणण्यापेक्षा कदाचित असे म्हणता येईल की काँग्रेस किंवा भाजप या मुख्य पक्षांनी परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या भिन्न पक्षांचा टेकू (आधार) घेऊन आपला गाडा कसाबसा रेटला आहे. या राजकीय जुगाडांमधला कधी एक टेकू निसटायचा तर कधी दुसरा निखळून पडायचा, मग त्यावेळी तिसरा किंवा चौथा शोधून त्या जागी बसवायचा, काही वेळा पुन्हा पहिल्याला घासून पुसून जागेवर ठेवायचे असे सगळे गेली अनेक वर्षे चालत आले आहे. नावे घेऊ नयेत, पण ज्या नेत्यांना हे कौशल्य जमेल असे पक्षातल्या लोकांना वाटले त्यांना पंतप्रधानपदी बसवले गेले, ज्यांनी ते जुगाड यशस्वीपणे सांभाळले ते टिकले आणि ज्यांना हे काम जमले नाही ते स्वतःच कोसळले. या जुगाडू राजकारणाचे अनेक तोटे झाले असतील, पण देशात संपूर्ण अनागोंदी माजली नाही, बरीचशी काम होत राहिली, देशाची प्रगती होत राहिली हे देखील कमी महत्वाचे नाही.    

जुगाडांबद्दल लिहायचे झाल्यास आमीरखानच्या थ्री ईडियट्स या सिनेमाचा उल्लेख करणे अत्यावश्यक आहे. त्यातल्या रँचो या मुख्य पात्राचा या सिनेमाच्या सुरुवातीच्या भागात प्रवेश होताहोताच तो एक झटपट जुगाड रचून त्याच्या हॉस्टेलमधल्या रॅगिंग करायला आलेल्या एका गुंड सीनीयरला विजेचा जोराचा झटका देतो. त्यानंतरचे दोन तास तिथला डीन असलेल्या व्हायरसला तो आपल्या निरनिराळ्या जुगाडू प्रयोगांनी सळो की पळो करून सोडतो आणि पाऊसपाणी व वादळवा-यामुळे घरात अडकून पडलेल्या एका अडलेल्या गर्भवती महिलेचे बाळंतपण जुगाडांच्या पराकाष्ठेने करून अखेर सगळे ऑल ईज वेल् करून देतो. या अद्भुत कामगिरीसाठी त्या रँचोला जुगाडसम्राट, जुगाडशिरोमणी, जुगाडविभूषण किंवा जुगाडरत्न असा एकादा खिताब द्यायला हवा.

तर असे आहे हे जुगाडपुराण! जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत त्या माणसाकडे अडचणींशी झगडून त्यांच्यावर मात करण्याची झुंजार वृत्ती आहे, ते करण्यासाठी लागणारी कल्पकता आहे, धारिष्ट्य आहे, तोपर्यंत निरनिराळ्या स्वरूपांची जुगाडे होतच राहणार आहेत. जय जुगाड ! 

.  . . . . . . . . . . .. (समाप्त)


No comments: