Wednesday, February 04, 2015

स्मृती ठेवुनी जाती - भाग १३ - अप्पा

स्मृती ठेवुनी जाती - भाग १३ - अप्पा (पूर्वार्ध)

माझ्या आयुष्यातल्या निरनिराळ्या टप्प्यांवर मला भेटलेली आणि माझ्या आठवणींच्या पानांवर आपले कायमचे ठसे उमटवून गेलेली अशी अनेक माणसे आहेत. या लेखमालेत मी त्यांच्यातल्या एकेकाबद्दल चार शब्द लिहीत आलो आहे. आतापर्यंतच्या दहा भागातल्या प्रत्येक व्यक्तीचे नाव, गाव, त्यांचा माझ्याशी जुळलेला संबंध यांच्यासंबंधी मी सविस्तर लिहिले आहे. या लेखाच्या नायकाला मात्र मी फक्त 'अप्पा' एवढेच म्हणणार आहे. लेख वाचल्यानंतर कदाचित त्याचे कारणही समजेल.

हा अप्पा साधारणपणे माझ्याच वयाचा होता, तो कदाचित माझ्याहून थोडा लहान असेल, पण अपटुडेट पोशाख, आकर्षक हेअरस्टाइल आणि एकंदरीतच आरशाचा चांगला उपयोग करून घेण्याच्या त्याच्या संवयीमुळे तो माझ्याहून जरा जास्तच तरुण दिसत असे. त्याच्या देखण्या चेहे-यावरील तरतरीतपणा आणि बेदरकारीची छटा वगैरे मिळून तो राजबिंडा दिसत असे. बोलण्यातली चतुराई, हजरजबाबीपणा, मिश्किलपणा वगैरेंमधून ते ऐकणा-यावर त्याचा चांगला प्रभाव पडत असे. तो मला पहिल्यांदा भेटला त्या वेळी आम्ही दोघेही विशीत होतो. त्या मेळाव्यातल्या सर्व लोकांबरोबर तो मिळून मिसळून वागत होता, वडीलधारी मंडळींचा आदर, समवयस्कांची मनमुराद थट्टामस्करी आणि लहान मुलांशी गोड बोलून त्यांना आपलेसे करणे हे सगळे त्याला सहज जमत होते. यामुळे तो सुद्धा तिथल्या सर्वांच्या गळ्यातला ताईत झालेला दिसत होता. त्याचे दिसणे, बोलणे, वागणे या सगळ्यांमुळे मलाही तो पहिल्याच भेटीत थोडा जवळचा वाटला होता. 

पहिला ठसा (फर्स्ट इम्प्रेशन) हा कायम स्वरूपाचा असतो असे म्हणतात, पण ते पूर्णपणे खरे नसावे. आपल्याला कोणताही माणूस पहिल्यांदा भेटतो त्या वेळची एकंदर परिस्थिती, आपली मनस्थिती आणि त्या माणसाचे त्या वेळचे दिसणे, बोलणे वागणे वगैरेंवरून आपण त्याला जोखत असतो. त्याचा ठसा आपल्या मनावर उमटत असतो. तो गडद असला तर दीर्घकाळ टिकून राहतो. पुसट असला तर काळाबरोबर विरून जातो. ती व्यक्ती त्यानंतर पुन्हा पुन्हा भेटली आणि त्या वेळीही आपल्यावर तिचे तसेच इम्प्रेशन पडले तर तो ठसा अधिक गडद होत जातो. पण दरम्यानच्या काळात आपल्याला अनेक अनुभव येऊन गेले असतात, त्यामधून प्रगल्भता आलेली असते, आपला दृष्टीकोन बदललेला असतो, मूड वेगळा असू शकतो आणि त्या माणसातही बदल झालेला असतो, त्याचे दुसरे काही पैलू आपल्या समोर येतात. त्यातून वेगळे इम्प्रेशन तयार झाले तर तो आधीच्या ठशावर पडून वेगळे आकार दिसायला लागतात. अशा प्रकारे त्याच्याबद्दलच्या आपल्या धारणा बदलत असतात. अप्पाच्या बाबतीत असेच काहीसे होत गेले.

अप्पाबद्दल लिहितांना मला पु.लंचा नंदा प्रधान आठवतो. अप्पासुद्धा त्याच्यासारखा देखणा होता आणि श्रीमंत घराण्यात जन्मला होता. इतर लोकांवर छाप पाडण्यासाठी नव्हे तर स्वतःची आवड म्हणूनच तो नेहमी स्टाइलिश कपडे घालायचा. मी त्याला एकदा विचारले, "तुमचा हा नवा शर्ट खरंच मस्त आहे, कुठून आणलात?"
त्याने किंचित बेदरकारपणे उत्तर दिले, "कुणास ठाऊक? माझ्याकडे असे पंच्याहत्तर शर्ट आणि अशा पंचेचाळीस पँट्स आहेत."
ते उत्तर ऐकून मी क्षणभर अवाक् झालो. मला समजायला लागल्यापासून मी घातलेल्या सगळ्या कपड्यांची बेरीज एवढी झाली नसती आणि त्यातला एकही कपडा अप्पाच्या अंगातल्या कपड्यांच्या तोडीचा नव्हता. त्या वेळी अप्पा जर खरे बोलत असला तर माझ्या मते ती निव्वळ उधळपट्टी होती आणि जर त्याने थाप मारली असेल तर असला बडेजाव दाखवण्याचा मला तितकाच तिटकारा होता. त्यामुळे त्या वक्तव्याचे खरे खोटे करण्यात मला काही स्वारस्य नव्हते. आम्हा दोघांच्या विचारांमध्ये केवढी मोठी दरी आहे याची जाणीव मात्र मला झाली.

तो श्रीमंत घराण्यात जन्मला होताच. मराठेशाहीच्या काळातल्या त्याच्या पूर्वजांनी मुलुखगिरी करून काही ठिकाणच्या जहागिरी मिळवल्या होत्या. सात पिढ्यांनी बसून खाल्ले तरी कमी होणार नाही इतकी मालमत्ता त्यांनी त्या ऐतिहासिक काळात जमवली होती. त्यानंतर आलेल्या सव्वादीडशे वर्षांच्या इंग्रजी अंमलात होऊन गेलेल्या पाचसहा पिढ्यांनी बहुधा तेच काम केले असावे. त्या काळातही त्यांच्या घरात जितके अन्न शिजवले जात असेल त्याच्या अनेकपटीने जास्त अन्नधान्य त्यांच्या शेतात पिकत असे आणि गोठ्यातल्या गाय़ीम्हशींपासून त्यांना मुबलक दूधदुभते मिळत असे. त्यामुळे तसे पाहता (अक्षरशः) खाण्यावर त्यांचा फारसा खर्च होतच नसावा. नोकरचाकरांना त्यांच्या सेवेचा मोबदला शेतात पिकलेल्या धान्याच्या स्वरूपात देण्याची पद्धत त्या काळात रूढ होती. जो काही रोख खर्च होत असे तो देवधर्म, दानधर्म, पोशाख, दागदागिने, मौजमजा, शौक वगैरेंसारख्या बाबींवर होत असेल. काही जण कदाचित जास्तच शौकीन असावेत. त्यांचे खर्च भागवल्यानंतर आणि पिढी दर पिढी वाटण्या होत गेल्यानंतरही अप्पाच्या वडिलांच्या कुटुंबाकडे बरीच मालमत्ता आली होती. त्यांच्या अवाढव्य वाड्यातले फक्त स्वयंपाकघर किंवा न्हाणीघरसुद्धा माझ्या संपूर्ण वन रूम किचन घरापेक्षा मोठे होते. दिवाणखाना तर प्रेक्षणीय होता. त्यात दोन्ही बाजूला नक्षीदार आकाराचे कोरीव खांब रांगेने उभे केलेले होते आणि त्यांना जोडणा-या कलाकुसर केलेल्या सुंदर कमानी होत्या. छताला टांगलेल्या मोठमोठ्या हंड्या आणि झुंबरे त्याची शोभा वाढवत होती. पुरातन काळामधली सुबत्ता त्यातून दिसत होती.

त्या काळात त्यांच्या शेतातल्या सगळ्या कामांची व्यवस्था पाहणारे जिराती ठेवलेले असायचे, शेतीविषयक नांगरणी, पेरणी, राखण, मळणी वगैरे सगळी कामे ते कुळांकडून किंवा शेतमजूरांकडून करवून घेत असत. घरातली सगळी कामे गडीमाणसे करत, बाजारातल्या वस्तू घरी बसून मागवल्या जात असत आणि दुकानदारांकडून त्या घरपोच मिळत, या सगळ्या बाबी सांभाळणे आणि पैशाअडक्यांचा हिशोब ठेवणे यासाठी दिवाणजी असत. मालक मंडळींना स्वतः इकडची काडीसुद्धा उचलून तिकडे ठेवायची कधी गरज पडत नसे. अप्पाच्या जन्माच्या काळात असा सगळा थाट होता. घराण्याचा वारस म्हणून त्याचे भरपूर लाड केले जात असत, तो मागेल ते त्याला मिळत असे

नंदा प्रधान या वल्लीबद्दल पु.लंनी लिहिले आहे की (त्याच्यासारख्या) यक्षांना काही शाप असतात असे म्हणतात, अप्पाच्या बाबतीतही काहीसे तसेच म्हणता येईल. त्याने स्वतः याबाबत कधी खंत व्यक्त केली नाही की तक्रारीचा रडका सूर काढला नाही. इतर कुणाला आपल्याबद्दल कणव वाटावी, कुणी आपल्याला सहानुभूती दाखवावी हेच त्याला बहुधा मान्य नसावे. पण आयुष्यात त्याला खूप काही सहन करावे लागले होते हे मला इतरांकडून कळत गेले.  तो चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्मला होता (बॉर्न विथ सिल्हर स्पून). त्याच्या आईने त्याला रोज चांदीच्या वाटीत केशरमिश्रित दूध प्यायला दिले असेल. पण दुर्दैवाने त्याला हे सुख जास्त दिवस लाभले नाही. त्याच्या लहानपणीच ती माउली अचानक देवाघरी गेली. अप्पाच्या वडिलांनी दुसरा विवाह केला, त्या भार्येपासून त्यांना आणखी दोन मुलगे झाले आणि त्यानंतर वडिलांचाही मृत्यू झाला. अप्पाची सावत्र आई चांगली होती, पण ती पुण्यासारख्या शहरातल्या आधुनिक वातावरणात वाढली होती आणि डबलग्रॅज्युएट होती. पतिनिधनानंतर काही काळाने आपल्या दोन मुलांना घेऊन ती पुण्याला रहायला गेली. अप्पा काही काळ त्या आईसोबत, काही काळ काकाकडे, काही काळ मामाकडे रहात मोठा झाला.

कॉलेज शिक्षणासाठी तो त्याच्या मामांकडे पुण्याला राहिला होता. मामाही गडगंज श्रीमंत होते, त्यांनीही आईबापाविना पोरक्या झालेल्या आपल्या भाच्याचे सगळे लाड पुरवले. अप्पाने कॉलेजात कुठल्या विषयात प्राविण्य मिळवले ते माहीत नाही, पण तो शहरातला छानछोकीपणा मात्र शिकला, त्याला सिगरेटचे व्यसनही बहुधा त्या काळातच लागले असावे. शिक्षण संपल्यावर तो आपली इस्टेट सांभाळण्यासाठी गावी परत गेला. माझी आणि त्याची भेट होण्यापूर्वीच हे सगळे होऊन गेले होते. त्याचे लग्न होऊन तो संसाराला लागला. आपण त्याच्या पत्नीला माई म्हणू. ती ही त्याच्यासारखी उत्साही आणि हंसतमुख होती, पण अधिक विचारी आणि व्यवहारी होती. म्हणजे काही प्रमाणात त्याला अनुरूप आणि काही प्रमाणात पूरक होती. म्हणजे ती काही प्रमाणात त्याला अनुरूप आणि काही प्रमाणात पूरक होती. त्यांची जोडी चांगली जमेल आणि त्यांचा संसार सुखाचा होईल असेच सर्वांना वाटले होते.  

----

स्मृती ठेवुनी जाती - भाग १३ - अप्पा (उत्तरार्ध)

अप्पाच्या जन्माच्या नंतरच्या काळात भारतातली सामाजिक परिस्थिती झपाट्याने बदलत गेली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पूर्वीची सगळी संस्थाने भारतात विलीन करण्यात आली त्याप्रमाणे जहागिरी सुद्धा खालसा केल्या गेल्या. लोकशाहीमध्ये सरसकट माणशी एक मत असल्यामुळे जमीनमालकाला फक्त एकच मत आणि त्यावर काम करणा-या अनेक मजूरांनाही प्रत्येकी एक मत असा हिशोब झाला. अर्थातच जास्त मतदारांचा फायदा होऊ शकेल अशी लोकाभिमुख धोरणे सरकारकडून आखली गेली, समाजवादी समाजरचनेच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू झाली आणि त्याला अनुसरून "कसेल त्याची जमीन" आणि "वसेल त्याचे घर" अशी बोधवाक्ये तयार झाली. कमाल जमीनधारण कायदा, कूळकायदा वगैरेसारखी बिले विधानसभांमध्ये पास करून घेऊन त्यांची अंमलबजावणी सुरू झाली. आजच्या काळातल्या वंशजांनी आपल्या वाडवडिलांनी जुन्या काळात केलेली कमाई स्वस्थ बसून खाण्याचे दिवस राहिले नाहीत. सरकारच्या या धोरणांना प्रत्यक्षात मूर्त स्वरूप देणारी बरीचशी राजकारणी मंडळी आणि सरकारी अधिकारी हे सुद्धा जमीनदार किंवा सुखवस्तू वर्गांमधून आलेले असल्यामुळे ते काम जरा संथ गतीने केले गेले आणि त्यात काही पळवाटा सोडण्यात आल्या. 

दरम्यानच्या काळात काही हुषार लोकांनी त्या पळवाटांचा त्यांच्या फायद्यासाठी उपयोग करून घेतला. काही जमीनमालकांनी आपण स्वतःच शेतकरी असल्याचे जाहीर केले, त्यासाठी त्यांनी रोज भर दुपारच्या उन्हातान्हात किंवा रात्रीच्या अंधारातसुद्धा शेतावर जाऊन शेतात चाललेली कामे पहायला सुरुवात केली आणि शक्य तेवढ्या जमीनीची मालकी वाचवून घेतली. त्यातल्या काही लोकांनी कालांतराने त्या क्षेत्रात प्राविण्य मिळवून शेतमालाच्या उत्पन्नात घसघशीत वाढही करून घेतली. काही जणांना कृषीतज्ज्ञ, कृषीपंडित वगैरे उपाधीसुद्धा मिळाल्या. पण हे करण्यासाठी त्यांना मानसिक तयारी आणि बरेच शारीरिक श्रम करावे लागले. ज्यांना हे शक्य नव्हते किंवा ज्यांचा शेतीकडे अजीबात ओढा नव्हता अशा लोकांचा त्यांच्या वडिलोपार्जित जमीनीवरला ताबा सैल होत सुटत गेला. अप्पाच्या बाबतीत बहुधा तसेच झाले असावे. अंगात सफारी सूट परिधान केलेला अप्पा कपाळावर आलेली जुल्फे एका हाताने मागे सारीत दुस-या हातातल्या काठीने शेतातल्या पिकात शिरलेल्या ढोरांना पळवतो आहे किंवा टाइट जीन्स आणि चितकबरे टी शर्ट घालून चिखलात उभा राहिलेला अप्पा पाटाचे पाणी एका बाजूच्या पिकाकडून दुसरीकडे वळवत आहे अशी चित्रे माझ्या डोळ्यासमोर काही केल्या येत नाहीत. त्याने स्वतः शेती करण्याचा मार्ग चोखाळला नाही. यामुळे त्याला शेतीमधून मिळणारे उत्पन्न आटत गेले असणार आणि कदाचित त्याला त्याच्या मालकीच्या जमीनी मिळेल त्या भावाने विकून टाकाव्या लागल्या असतील.

अप्पाने त्याच्या अवाढव्य वाड्याच्या काही भागात भाडेकरू ठेवले होते, पण घरभाडेनियंत्रण कायद्याने घरांची भाडी स्वातंत्र्यपूर्व काळातल्या आकड्यांवर गोठवली गेली होती. त्यानंतर महागाई भडकत गेली, सगळ्या वस्तूंचे भाव कित्येक पटींमध्ये वाढत गेले, पण घराची भाडी मात्र स्थिर राहिली. घराच्या दुरुस्तीचा खर्चच त्याच्या भाड्याच्य़ा तुलनेत फार जास्त व्हायला लागला. यामुळे अप्पाच्या उत्पन्नाचे हे साधनही कमी कमी होत गेले. त्याच्या मालकीची एवढी मोठी टोलेजंग वास्तू असली तरी त्यामधून त्याला जास्त उत्पन्न मिळत नव्हते, उलट तिच्या दुरुस्तीचा खर्च मात्र वाढत चालला होता. थोडक्यात सांगायचे झाल्यास त्याची खर्चिक वृत्ती आणि कमी होत चाललेले उत्पन्न यांचा मेळ जमेनासा झाला. त्याला आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काही उपाय करणे भाग पडायला लागले होते.

यासाठी त्याने नेमके काय केले हे मला कधीच नीटसे समजले नाही. कोणाकडे नोकरी करायची असल्यास त्यातून परावलंबित्व येते, वेळेची शिस्त पाळावी लागते, वरिष्ठांनी सांगितलेले नेहमी ऐकावे लागते तसेच काही वेळा त्यांची बोलणीही ऐकावी लागतात. कलंदर वृत्तीच्या अप्पाला हे नक्कीच जड गेले असते. प्रत्यक्षात त्याला हवी तशी नोकरी मिळाली की नाही, त्याने ती टिकवून धरली की नाही वगैरेबद्दल मला नेमके काही समजले नाही, पण त्याने कुठे नोकरी धरली असल्याचे मी कधी ऐकलेही नाही. अप्पाच्या मालकीचे एक सिनेमा थिएटर होते. त्यातून त्याला नियमित उत्पन्न मिळत असे. कदाचित त्याने इतरही काही उद्योग व्यवसाय केले असतील, काही पैसे त्या व्यवसायांमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवले असतील. कमाईचे आणखीही काही मार्ग चोखाळले असतील.

माझी नोकरी आणि संसाराचा व्याप वाढत गेल्यावर मला कुठेही जाण्यासाठी वेळ मिळेनासा झाला. मी अगदीच आवश्यक अशा समारंभांना जाऊन उभ्या उभ्या उपस्थिती लावून येत असे. तेवढ्या वेळात जे कोणी ओळखीचे लोक भेटत त्यांची तोंडदेखली विचारपूस करत असे. "तुम्ही कसे आहात?", "सध्या कुठे असता?" आणि वाटल्यास "तुमची तब्येत आता कशी आहे?" एवढेच प्रश्न विचारत असे. "तुम्ही काय करता?" हा प्रश्न मला नेहमीच जरा  आगाऊपणाचा वाटत असल्यामुळे मी तो कुणालाही कधीच विचारला नाही. आपणहून कोणी ती माहिती दिली तर ती लक्षात रहात असे. काही लोक इतरांच्या बाबतीतली माहिती देत असतात. काही समारंभांमध्ये माझी आणि अप्पाचीही अशी ओझरती गाठ पडत असे. त्याने आपणहून मुद्दाम माझ्याकडे यावे किंवा मी त्याच्याकडे जावे असे कोणते कारणच नव्हते आणि आम्ही बिनाकारणाचे एकमेकांकडे जावे इतकी जवळीक आमच्यात झाली नव्हती. तो कसलासा बिझिनेस करतो एवढेच मला दुस-या कोणाकोणांकडून अधून मधून कळत असे. 

"अजगर करे न चाकरी पंछी करे न काम । दास मलूका कह गये सबके दाता राम ।" असा एक दोहा आहे. सुस्त अजगर किंवा स्वैर पक्षी यांनासुद्धा त्यांचे खाणे भगवान श्रीराम मिळवून देतो (मग तो आपल्याला का नाही देणार?) अशा अर्थाच्या या वचनावर बरेच दैववादी लोक विसंबून असतात. अजगर आणि पक्षी यांनासुद्धा आपली शिकार किंवा भक्ष्य स्वतःच शोधावे लागते आणि झटापट करून मिळवावे लागते याचा विचार कदाचित त्यांच्या मनात येत नसेल. आमचा अप्पा रामाचा परमभक्त नव्हता, देवी हे त्याचे श्रद्धास्थान होते. नवरात्राच्या उत्सवात तो काहीही न खाता पिता तीन तीन तास साग्रसंगीत पूजा करायचा. देवीची अनेक स्तोत्रे त्याला तोंडपाठ होती आणि त्यांच्या सामूहिक पठणाच्या कार्यक्रमात अप्पाचा खडा आवाज ठसठशीतपणे वेगळा ऐकू येत असे. त्या कार्यक्रमातला तो लीड सिंगर असायचा. इतर लोक त्याच्या आवाजात आपला आवाज मिसळत असत.

आपले ठीक चालले आहे असेच तो वर वर सांगत असला तरी वस्तुस्थिती वेगळी असल्याचे इतरांकडून कानावर येत होते. शेतजमीनींनंतर थिएटरही त्याच्या हातातून गेले होते. पूर्वजांकडून वंशपरंपरेने त्याच्याकडे आलेल्या मौल्यवान वस्तू एक एक करून विकल्या जात होत्या. मोठमोठी पुरातन भांडी, वाड्यातली झुंबरे, हंड्या वगैरे अनावश्यक वस्तू तर नाहीशा झाल्याच, दिवाणखान्यातले नक्षीदार खांब, कमानी आणि दरवाजेसुद्धा विकले गेले असे समजले. या सगळ्या काळात आमच्या गाठीभेटी क्वचितच झाल्या होत्या. कधी अचानक त्याच्याशी गाठ पडली तरी ती औपचारिकतेच्या पलीकडे जात नव्हती. 

मी एका कार्यक्रमामध्ये माईला पाहिले आणि माझ्या पोटात धस्स झाले. तिचा मूळचा प्रफुल्लित चेहरा पार कोमेजून गेला होता, तिची सडसडीत अंगकाठी खंगून अगदी अस्थिपंजर झाली होती, ती अकालीच थकल्यासारखी दिसत होती. गेले बरेच दिवस तिला बरे वाटत नव्हते आणि तिच्या उपचारासाठी अप्पाने पुण्यात घर केले असल्याचे समजले. ते एक कारण होतेच, शिवाय माई आणि अप्पा या दोघांचेही काही जवळचे आप्त आधीपासून पुण्यात रहात होते आणि काहीजण सेवानिवृत्तीनंतर पुण्याला स्थाईक झाले होते. कदाचित त्यांच्या आधाराची आवश्यकता वाटल्यामुळेही त्या दोघांनी लहान गावातला आपला प्रशस्त वडिलोपार्जित वाडा सोडून मोठ्या शहरातल्या लहानशा घरात येऊन रहाण्याचा निर्णय घेतला असावा. या उपचारांनी माईला गुण आलाच नाही. तिने कायमचा निरोप घेतल्याची दुःखद बातमी एक दिवस समजली. त्याबरोबर हे ही कानावर आले की अप्पाची तब्येतसुद्धा खालावत चालली होती. त्याला नेमका कोणता आजार झाला होता याची कोणी वाच्यता करत नव्हते.

त्या काळात माझ्या मुलाचे लग्न ठरले. झाडून सगळ्या आप्तस्वकीयांना या कार्यासाठी आमंत्रण द्यायचे होते. त्यांची यादी करून प्रत्येकाचा अद्ययावत पत्ता, फोन नंबर वगैरे माहिती आम्ही गोळा केली आणि कामाला लागलो. या यादीत अप्पाचा नंबर बराच वर होता. त्याने माझ्या मुलाला एके काळी अंगाखांद्यावर खेळवले होते. शिवाय पूर्वीच्या आठवणी काढल्या तर कोठल्याही मेळाव्यात त्याच्या असण्यामुळे चैतन्य सळसळत असे. लग्नकार्यांमध्ये तर त्याच्या उत्साहाला उधाण येत असे. वरातीत नाचण्यापासून ते पंक्तीत आग्रह करण्यापर्यंत सगळ्या गोष्टीत तो हौशीने सर्वात पुढे असायचा. वाजंत्रीवाल्यांपासून मांडव सजवणारे आणि आचारी वाढप्यांपर्यंत सगळ्यांना तो धाकात ठेवत असे. नव-या मुलाला झोकदार फेटा बांधावा तर तो अप्पानेच असे ठरलेले होते. त्याच्याकडे असलेले खास खानदानी जरतारी पागोटे कडक इस्त्री करून तो त्यासाठी घेऊन यायचा. आमच्या अशा किती तरी मजेदार जुन्या आठवणी अप्पाशी जोडलेल्या होत्या. तो आला नाही तर त्याची उणीव सर्वांना भासणार हे उघड होते.

पण या वेळी त्याला बोलवावे की नाही यावर निर्णय करणे कठीण जात होते. हे लग्न ऐन हिवाळ्यात आणि उत्तर भारतातल्या कडाक्याच्या थंडीत होणार होते. अप्पाच्या बिघडलेल्या प्रकृतीबद्दल जे ऐकले होते, त्यावरून त्याला तिथे येणे कितपत झेपेल याची शंका वाटत होती. तरीही त्याचा बिनधास्त स्वभाव माहीत असल्यामुळे तो कशालाही न जुमानता तिथे येईल अशीही शक्यता होती. पण तिथे आल्यावर त्याची तब्येत जास्तच बिघडली तर त्या अनोळखी गावात किती धावपळ करावी लागेल आणि ती कोण करेल हा मोठाच प्रश्न होता. दुसरी अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला जडलेल्या अवघड आणि संसर्गजन्य व्याधीसंबंधी थोडी कुजबुज व्हायला लागली होती. लग्नाला आलेल्या प्रत्येक पाहुण्याची स्वतंत्र व्यवस्था करणे शक्यच नसल्यामुळे मंगल कार्यालयात सगळे एकत्रच राहणार हे उघड होते. कोणासाठी खास वेगळी व्यवस्था करायचीच झाली तर मुलीकडच्या मंडळींना तसे करण्यासाठी काय कारण सांगावे? ते तशी व्यवस्था करू शकतील का? असे प्रश्न मनात येत होते. लग्नकार्याला आलेल्या प्रत्येक पाहुण्यावर सारखे लक्ष ठेवता येत नाही. त्यातला कोणी तरी अप्पाला त्याच्या आजाराबद्दल काही अनुचित बोलला तर पंचाईत होईल आणि त्याच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी कोणी स्वतःच ते कार्य सोडून चालला गेला तर? सगळेच अशुध्द आणि अवघड होऊन बसले असते. 

तो आला असता तर त्याला सगळ्यांमध्ये मिसळू देणेही अवघड आणि तो बाजूला वेगळा बसून राहिला तरी तेही जास्तच खटकणार. काय करावे ते आम्हाला सुचेना. हे कार्य निर्विघ्न पार पडावे, त्यात गडबड गोंधळ होऊ नये असे आम्हाला वाटले. आपण व्यक्तिशः अप्पाच्या मनाचा कितीही विचार केला आणि त्याला सन्मानाने वागणूक दिली तरी इतर सर्व लोकांबद्दल तशी खात्री देता येणार नाही असेच वाटले. हो नाही करत त्याला बोलावणे करण्याचे टाळले गेले. वाटल्यास नंतर त्याचा दोष टपालखात्यावर टाकू असे मनोमन ठरवले. अर्थातच हे काही लोकांना खटकले आणि त्यावरून थोडे गैरसमज, रागावणे, रुसणे वगैरेही झाले, पण त्याला काही इलाज नव्हता.

त्या घटनेनंतर बराच काळपर्यंत आमचा अप्पाशी थेट संपर्क झालाच नव्हता. त्याच्या अगदी जवळच्या एका नातेवाईकाच्या लग्नाला आम्ही गेलो होतो. ते लग्न गावातलेच असल्यामुळे तो येणार अशी आमची अपेक्षा होती आणि तो आलाही. तो आला म्हणण्यापेक्षा त्याला स्ट्रेचरवरून आणले गेले असे म्हणावे लागेल. त्याला मी पहिल्यांदा पाहिले तेंव्हा तो अत्यंत देखणा, तल्लख, चपळ तसाच मस्तीखोर आणि खट्याळ होता. निरनिराळ्या युक्त्या प्रयुक्त्या योजून तो इतरांना हसवत, चिडवत आणि क्वचित थोडेसे रडवत असे. अशा चैतन्यमूर्ती अप्पाला निश्चेष्ट पडलेल्या अवस्थेत पहावे लागेल अशी कल्पनाही मी कधी केली नव्हती. त्याच्या अंगात हिंडण्याफिरण्याचे त्राण नव्हतेच. त्याला एका खोलीत झोपवून ठेवले होते, तिथूनच तो सगळा सोहळा पहात होता आणि ऐकत होता. आम्ही त्याला भेटायला गेलो तेंव्हा आम्हाला पाहून त्याने एक मंद स्मित केले, क्षीण आवाजात एक दोन शब्द बोलला. तेवढ्यानेही त्याला त्रास होत असल्याचे जाणवत होते. पूर्वीच्या अप्पाच्या सावलीपेक्षाही तो फिका पडला होता. त्याला लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा देऊन आम्ही तिथून हळूच काढता पाय घेतला. यानंतर पुन्हा त्याची भेट घडेल की नाही याची शाश्वती वाटत नव्हतीच. तसा चमत्कार घडलाही नाही. त्याच्या आठवणीच तेवढ्या शिल्लक राहिल्या.     

No comments: