Thursday, August 22, 2013

होडी ते पाणबुडी (उत्तरार्ध)

होडी ते पाणबुडी (पूर्वार्ध) - http://anandghan.blogspot.in/2013/08/blog-post_18.html
-----------------------------
मागील भागावरून पुढेः

इंग्रजी भाषेत 'बोट' आणि 'शिप' असे दोन शब्द आहेत पण त्यांची स्पष्ट अशी व्याख्या नाही. इंग्लिश भाषेतली 'बोट' म्हणजे लहान आकाराची आणि 'शिप' म्हणजे अगडबंब असे सर्वसाधारणपणे समजले जाते. 'नदी, सरोवरे वगैरेमध्ये चालते ती बोट' आणि 'समुद्रात जाते ती शिप' असेही ढोबळपणे म्हणता येईल, पण त्यांच्यामधली ही सीमारेषासुध्दा अस्पष्ट आहे. मोठ्या 'शिप्स'सुध्दा बंदरात येऊन दाखल होण्यासाठी एकाद्या खाडीमधून आत शिरतात आणि मासे पकडण्यासाठी लहान लहान 'बोटीं'मधून कोळी लोक दर्यावर ये जा करत असतात. मराठी भाषेत होडी, नाव, नौका, जहाज, गलबत वगैरे शब्द आहेत. त्यातले काही शब्द 'बोट' या अर्थाने आणि काही 'शिप' या अर्थाने वापरले जातात. 'बोट' या इंग्लिश शब्दाचा मराठीत मात्र जहाज या अर्थानेसुध्दा प्रयोग होतो. 'आगबोट' असा एक अर्धा मराठी आणि अर्धा इंग्रजी जोडशब्द फक्त यांत्रिक जहाजासाठीच उपयोगात आणला जातो. पाण्यातून चालणा-या या सर्व वाहनांच्या आकारानुसार आणि उपयोगानुसार त्यांच्या रचनेमध्येही फरक असतो.


अगदी लहानशा होडीत ती चालवणा-या आणि इतर माणसांना बसायला फक्त एक दोन फळकुटे असतात. थोड्या मोठ्या नावेत फळ्या जोडून बनवलेला सपाट पृष्ठभाग (फ्लोअर) असतो. बहुतेक लहान होड्यांमध्ये तो वरच्या बाजूला उघडा असतो, पण प्रवाशांसाठी चालवल्या जाणा-या काही नावांमध्ये त्याच्यावर हलकेसे छप्पर असते. बहुतेक वेळा उघड्या जागेला 'डेक' आणि बंद जागेला केबिन असे म्हणतात. त्यामुळे काही नावांमध्ये केबिनच्या माथ्यावर डेक असते. काही लाँचेस डबलडेकर असतात, त्यांना केबिनचे दोन मजले आणि शिवाय एकादी डेक असते. मोठ्या जहाजांमध्ये पाण्याच्या पातळीवर असलेल्या डेकच्या खाली होल्ड असतात. त्या होल्डचे अनेक कप्पे करून जहाज चालवणारी यंत्रे, इंधन, हत्यारे, औजारे, अन्नधान्य वगैरेसारख्या गोष्टी त्या कप्प्यांमध्ये ठेवतात. डेकच्या वर 'सुपरस्ट्रक्चर' उभारलेले असतात. कॅप्टन आणि इतर अधिका-यांची राहण्याची व्यवस्था, आगबोटीचे कार्यालय, नियंत्रणकक्ष (कंट्रोव रूम), संपर्काची (कम्युनिकेशन) साधने वगैरेंचा समावेश त्यात केलेला असतो.

जहाजांचा आकार सर्वच बाजूने वक्राकार असल्यामुळे त्याची मोजमापे देण्याची विशिष्ट परिभाषा आहे. ती सोबत दिलेल्या आकृतीमध्ये दाखवली आहे. आगबोटीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंतच्या अंतराला 'लांबी (लेंग्थ)' असेच म्हणतात, पण मधोमधच्या भागाच्या रुंदीला मात्र 'बीम' असे नाव आहे. डेक आणि सुपरस्ट्रक्चरचा भार तोलण्यासाठी अनेक आडव्या तुळया (बीम्स) बसवलेल्या असतात त्यातली सर्वात मोठी 'बीम' जहाजाच्या रुंदीएवढी लांब असते. जहाजाच्या बाहेरील पाण्याच्या पातळीपासून ते जहाजाच्या तळापर्यंत त्याच्या पाण्याखाली बुडलेल्या भागाच्या उंची किंवा खोली याला 'ड्राफ्ट' असे म्हणतात. आगबोटीला कोणत्याही बंदरात नेण्यापूर्वी या सगळ्या मोजमापांचा विचार करणे आवश्यक असते. त्या बंदरात किंवा गोदीमध्ये इतकी लांब आगबोट मावेल एवढी रिकामी जागा असली पाहिजे, तिचा आत जाण्याचा मार्ग बीमपेक्षा रुंद असायला हवा आणि तिथल्या पाण्याची खोली ड्राफ्टहून जास्त असली पाहिजे. असे असेल तरच ती आगबोट सुखरूपपणे बंदरात जाऊन उभी राहू शकते. आगबोटीचा जितका भाग पाण्यात बुडलेला असेल तेवढे पाणी तिने बाजूला सारून ती जागा व्यापलेली असते आणि त्या पाण्याच्या वजनाइतका पाण्याचा जोर तिला वर उचलून धरत असल्यामुळेच ती पाण्यावर तरंगत असते. त्या पाण्याच्या वजनाला डिस्प्लेसमेंट किंवा टनेज असे म्हणतात. मोठ्या आगबोटींसाठी ते हजारो टन असते.

आगबोटीचे मुख्य भाग या आकृतीमध्ये दाखवले आहेत. तिच्या सर्वात समोरच्या टोकाला 'बो' असे म्हणतात. त्याला 'आगबोटीचे नाक' म्हणता येईल. या 'बो'चा आकार नाकाप्रमाणेच निमूळता असतो. पाण्यामधून जहाज पुढे जात असतांना समोरील पाण्याचे दोन भाग होऊन ते जहाजाच्या दोन्ही बाजूला जाय़ला त्यामुळे मदत मिळते आणि पाण्याचा विरोध कमी होतो. समोरील भाग सपाट असल्यास समोरचे पाणी मागे ढकलले जाईल आणि मागे असलेल्या पाण्याच्या रेट्याने ते पुन्हा आगबोटीला धडकेल, शिवाय ते उंच उसळून आगबोटीत शिरण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी बो ला विशिष्ट आकार दिलेला असतो. त्या जागी आगबोटीतले काहीच नसते. तिची यंत्रसामुग्री मागील टोकाला पाण्याच्या खाली असते. त्या टोकाच्या डेकवरील भागाला स्टर्न असे म्हणतात. आगगाडीचे इंजिन सर्वात पुढे असते, विमानाची इंजिने त्याच्या बाजूच्या पंखांवर असतात. मोटारीचे इंजिन बहुधा पुढे असले तरी ते मागल्या चाकांना जोडलेले असते पण स्टिअरिंग व्हील पुढल्या चाकांना जोडलेले असते, आगबोटीचे इंजिन, पंखा (प्रोपेलर), सुकाणू (रडर) वगैरे सगळेच महत्वाचे भाग मागील भागात पाण्याच्या पातळीच्या खाली बसवलेले असतात. प्रोपेलरची पाती पाण्याला मागे ढकलतात आणि त्याच्या प्रतिक्रियेने आगबोट पुढे जाते. सुकाणूच्या कलण्यामुळे ती दिशा बदलते. इंग्लंड आणि अमेरिकेतल्या रस्त्यावरील रहदारीमध्ये डावा उजवा भेद असला तरी आगबोटींसाठी मात्र जगभरात सारखेच नियम आहेत. इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, रशीया, भारत, चीन अशा कुठल्याही देशाच्या आगबोटीच्या डाव्या अंगाला पोर्टसाईड असे म्हणतात. बोटीत चढण्या व उतरण्याची सोय या बाजूलाच केलेली असते. पलीकडील बाजूला स्टारबोर्ड साईड म्हणतात. समुद्रात उठत असलेल्या लाटांमुळे त्यातली जहाजे, नौका वगैरे सारखी पुढे मागे होत असतात. ती अशीच सोडली वहात वहात कुठेही जातील. ते होऊ नये म्हणून आगबोटीला भर समुद्रात किंवा बंदरात आल्यावर एका ठिकाणी स्थिर ठेवण्यासाठी मोठमोठे नांगर (अँकर) असतात. ते एका लांब आणि दणकट साखळीच्या टोकाला अडकवलेले असतात. एका रहाटाच्या (पुलीच्या) सहाय्याने ते पाण्यात सोडले की तळापर्यंत जाऊन तिथल्या गाळात रुतून बसतात. मुक्काम हलवतांना त्यांना यंत्रांच्या सहाय्याने पुन्हा वर उचलून घेतात आणि रहाटाला गुंडाळून ठेवतात.


जहाजांच्या उपयोगानुसार त्यांचे दोन मुख्य प्रकार असतात, नागरी उपयोग आणि सैनिकी सामर्थ्य. विमानांद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक सुरू होण्याच्या आधी त्रिखंडातल्या दूरच्या प्रवासासाठी आगबोट हेच मुख्य साधन होते. त्या काळात प्रवासी आणि माल या दोन्हींची वाहतूक आगबोटींमधूनच होत असे. युरोप आणि आशिया खंडांमधील विभागांना जोडणारे जमीनीवरचे चांगले रस्ते अस्तित्वातच नव्हते आणि उपलब्ध असलेले मार्ग अनेक देशांमधून आणि दुर्गम भागांमधून जात असल्यामुळे त्या मानाने सागरी प्रवास जास्त सोयीचा आणि कमी धोका असलेला असे. औद्योगिक क्रांतीमुळे मोठमोठ्या आगबोटी तयार करता येऊ लागल्याने हे शक्य झाले होते. युरोपमधील कारखान्यांना आशिया खंडातून, मुख्यतः भारतातून कच्चा माल पुरवणे आणि औद्योगिक दृष्ट्या पुढारलेल्या युरोपमध्ये तयार होणारा पक्का माल मागासलेल्या देशांमध्ये आणून विकणे हा किफायतशीर धंदा झाला होता. त्या पूर्वीच्या काळातल्या वास्कोडिगामाला आफ्रिका खंडाला मोठा वळसा घालून भारताकडे यावे लागले होते. पण आगबोटींची ये जा खूप वाढल्यानंतर हा लांबचा प्रवास कमी करण्यासाठी सुवेझचा कालवा खणून हिंद महासागर आणि भूमध्य समुद्र यांना जोडण्यात आले. त्याचप्रमाणे अमेरिका खंडाच्या पूर्व आणि पश्चिम किना-यांवरील शहरांमधील वाहतूक सुकर करण्यासाठी पनामाचा कालवा खोडून अंतर कमी करण्यात आले. केवळ आगबोटींच्या सोयीसाठी एवढे मोठे आणि कठीण प्रकल्प त्या काळात बांधले गेले यावरून एका काळी असलेले त्यांचे महत्व लक्षात येईल.

आजकाल हवाई वाहतूक स्वस्त आणि सुरक्षित झालेली आहे आणि ती अत्यंत वेगाने होत असल्यामुळे त्याला आगबोटीच्या मानाने अत्यल्प वेळ लागतो. अर्थातच प्रवाशांचा कल आता पूर्णपणे विमानाने प्रवास करण्याकडे आहे. पॅसेंजर शिप्स आता शिल्लक तरी आहेत की नाही याची शंका आहे. पण गंमत, मौज मजा करण्यासाठी आता लक्झरी क्रूझच्या सफरी निघाल्या आहेत. शहरांपासून दूर समुद्रात हळूहळू चालणा-या जहाजावर सर्व सुखसोयींनी युक्त अशा या तरंगत्या आलीशान महालांमध्ये दोन चार दिवस मौजमजा, दंगामस्ती करण्यासाठी नवश्रीमंत लोक त्यांचा लाभ घेतात. माल वाहतुकीसाठी, विशेषतः जड मालासाठी आजसुध्दा आगबोट हाच सर्वात चांगला आणि किफायतशीर पर्याय आहे. खनिजलोह, कोळसा, तेल, धान्ये, सिमेंट, साखर वगैरे अनेक वस्तूंची आयात निर्यात आगबोटींमधूनच होते. त्यासाठी आता खास प्रकारच्या आगबोटी, टँकर्स वगैरे तयार केल्या जातात. इतर वस्तूंचे जहाजांवर चढवणे आणि उतरवणे सोपे करण्यासाठी त्या कंटेनर्समध्ये ठेवल्या जातात आणि बंदरावरील क्रेन्सच्या सहाय्याने सहजपणे हाताळल्या जातात.

सैनिकी कार्यासाठी किंबहुना युध्दात उपयोगी येण्यासाठी विशिष्ट प्रकारची वेगळी गलबते पूर्वापारपासून तयार केली जात आहेत. त्या जहाजांवर तोफा, दारूगोळा आणि शस्त्रास्त्रे ठेवलेली असत आणि त्यांचा कुशल उपयोग करू शकणारे लढवय्ये तैनात असत. त्यासाठी आरमार हा सैन्यदलाचा एक वेगळा विभाग तयार केला जात असे. या आरमारांमध्ये सागरी युध्दे होत असत. इंग्लंडच्या आरमाराने एका काळी इतर मुख्य देशांच्या आरमारांवर विजय मिळवून समुद्रावर आपली निरंकुश सत्ता प्रस्थापित केली आणि त्याच्या जोरावर जगाच्या पंचखंडात आपल्या वसाहती स्थापन केल्या. काही शतके आपापसांमध्ये लढाया केल्यानंतर युरोपियन देशांनी समझोता करून आशिया, आफ्रिका आणि अमेरिका खंडांमधले भूभाग वाटून घेतले आणि ते काबीज करण्यावर लक्ष केंद्रित करून तिथे आपापल्या देशांच्या वसाहती स्थापन केल्या. औद्योगिक क्रांतीमधून निर्माण झालेल्या यंत्रसामुग्रीतून आणि दारूगोळ्यामुळे आरमारातल्या युध्दनौका अधिकाधिक सक्षम आणि आक्रामक होत गेल्या.

काळाबरोबर प्रगत झालेल्या नवनव्या प्रकारच्या तोफा आणि क्षेपणास्त्रे (मिसाईल्स) यांनी आरमारातल्या आगबोटी अधिकाधिक सुसज्ज होत गेल्या. आगबोटींमधून किना-यावरील शहरांवर हल्ले करता येऊ लागले. त्यांचा प्रतिकार आणि त्यांच्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी जहाजांना बुडवणारी टॉर्पेडोसारखी अस्त्रे तयार करण्यात आली. विमानांमधून बाँबगोळे टाकून आगबोटींना नष्ट करणे सोपे होते. त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी खास विमानविरोधी तोफा तर निघाल्याच, शिवाय लढाऊ विमानांचा ताफाच सोबत घेऊन जाणा-या अजस्त्र आकाराच्या आगबोटी (एअरक्राफ्ट कॅरीयर) तयार करण्यात आल्या. अशा आगबोटींवरून उड्डाण करता येण्याजोगी खास विमाने बनवली गेली. 

आपल्या युध्दनौका शत्रूला दिसू नयेत म्हणून त्यांना पाण्याखालून गुपचुप नेण्याच्या दृष्टीने लढाऊ विमानांच्या आगमनाच्या आधीपासूनच प्रयत्न चाललेले होते. पहिल्या महायुध्दात त्यांना जोराने चालना मिळाली आणि त्यातून  पाणबुड्या तयार झाल्या. कुठलेही जहाज पाण्यावर तरंगत असते तेंव्हा त्याचे वजन त्याने बाजूला सारलेल्या पाण्याइतके असते हे आपण पाहिलेले आहे. हे वजन वाढवत नेले की अखेर ते जहाज पाण्यात बुडते. एकदा का ते बुडले की त्यात पाणी शिरून त्याचे वजन आणखी वाढत जात असल्यामुळे त्याला सुप्रसिध्द टायटॅनिक जहाजासारखी कायमची जलसमाधी मिळते. जहाजावरील माणसे आणि सामान पाण्यात बुडून नुकसान होते. जहाज पाण्याखाली गेल्यानंतर त्याला वर आणण्यासाठी त्याचे वजन पुन्हा कमी कसे करायचे आणि त्यावरील माणसे आणि माल यांना पाण्याखाली कसे सुरक्षित ठेवायचे ही पाण्यात बुडून पुन्हा वर येऊ शकणारी जहाजे तयार करण्यामध्ये दोन मुख्य आव्हाने होती.

जहाज पाण्याखाली गेले तरी त्यातल्या माणसांना श्वासोच्छ्वासासाठी हवा लागणारच. त्यासाठी त्या माणसांना संपूर्णपणे हवाबंद (एअरटाईट) खोल्यांमध्ये ठेवणे आवश्यक आहे. पाण्याखाली गेल्यानंतरसुध्दा त्या जहाजांच्या यंत्रांनी काम करत रहायला पाहिजे आणि त्यांना चालवण्यासाठी किंवा त्यांच्या रखरखाव (मेटेनन्स) आणि दुरुस्ती (रिपेअर)साठी कामगारांना त्या यंत्रांपाशी जाण्याची आवश्यकता लागणार. अन्नपुरवठा, दारूगोळा, शस्त्रास्त्रे वगैरे पाण्यामुळे खराब होऊ नयेत आणि गरज पडताच ती तत्काळ उपलब्ध व्हायला पाहिजेत, यामुळे तीही पाण्यापासून दूर असायला हवीत. अशा प्रकारे जवळजवळ संपूर्ण आगबोटच एका प्रचंड हवाबंद खोलीच्या स्वरूपात तयार करावी लागते. प्रोपेलर आणि रडर यासारखी एरवीसुध्दा नेहमी पाण्याखाली यंत्रे तेवढी त्या हवाबंद जागेच्या बाहेरच असावी लागतात. पाणबुडीचे वजन कमी किंवा जास्त करण्यासाठी त्याच्या रचनेतच काही स्वतंत्र आणि हवाबंद मोकळ्या जागा ठेवल्या जातात. ज्या वेळी पाणबुडी पाण्यावर तरंगत असते तेंव्हा या जागा हवेने भरलेल्या असतात. तिने पाण्याखाली जायचे ठरवल्यानंतर त्या जागांमध्ये समुद्राचे पाणी भरले जाते. त्यामुळे ती जड होऊन खाली खाली जात रहाते. पण तिने सागराच्या पार तळापर्यंत जाऊन पोचणेही धोक्याचे असते. त्यामुळे तिला दोनतीनशे मीटर खालील ठरलेल्या पातळीपर्यंत जाऊ दिल्यानंतर एका कॉम्प्रेस्ड गॅस सिलिंडर्समध्ये साठवून ठेवलेली हवा त्या मोकळ्या जागेत सोडून तिथे असलेल्या पाण्यातल्या थोड्या भागाला पुन्हा बाहेर टाकले जाते. त्यामुळे तिचे खाली जाणे थांबते, पण हे करत असतांना पाणबुडी पुन्हा हलकी होऊन वर येणार नाही किंवा जड असल्यामुळे खालीही जाणार नाही या दोन्हींची काळजी घ्यावी लागते. हा समतोल अत्यंत काटेकोरपणे सांभाळून पाणबुडीला पाण्याखाली एका ठरलेल्या पातळीवर ठेवतात. या पातळीवरसुध्दा ती एका जागी स्थिर नसते, तर तिच्या गंतव्य स्थानाच्या दिशेने पुढे पुढे जात असते. इतक्या खोल पाण्यात सगळीकडे अंधारगुडुपच असतो, प्रत्यक्ष काहीच दिसू शकत नाही. सोनारसारख्या आधुनिक उपकरणांच्या सहाय्यानेच सगळी माहिती जाणून घेऊन पाणबुडीचालकाला मार्गक्रमण करायचे असते. 

पाणबुडी हीसुध्दा एक प्रकारची आगबोटच असल्यामुळे तिला चालवणारे इंजिनाचे एक मोठे धूड असते आणि त्यातल्या इंधनाचे ज्वलन होण्यासाठी खूप हवेची आवश्यकता असते. त्यासाठी महिनोंमहिने पुरेल एवढी हवा सिलिंडर्समध्ये भरून नेणे अशक्यप्राय असते. त्यामुळे इंधनावर चालणारी पाणबुडी थोडे दिवसच पाण्याखाली राहते आणि तिच्या इंजिनांना श्वास घेऊ देण्यासाठी तिला पाण्याच्या बाहेर येऊन काही काळ रहावेच लागते. अणुशक्तीचा विकास झाल्यानंतर इंधन तेलांवर चालणा-या इंजिनांच्या जागी अॅटॉमिक रिअॅक्टर बसवला गेला. त्याला काम करत राहण्यासाठी हवेची आवश्यकता नसते. अशा पाणबुडीतल्या माणसांना दीर्घ काळ पुरेल एवढा प्राणवायूचा साठा सोबत नेला आणि त्यांनी उच्छ्वासामधून बाहेर टाकलेला कर्बद्विप्राणील (कार्बन डायॉक्साईड) वायू शोषून घेण्याची व्यवस्था केली तर ती पाणबुडी महिनोगणती पाण्याखाली दडून राहू शकते. अशा पाणबुडीलासुध्दा नौसैनिकांसाठी अन्नपाणी, कपडे लत्ते वगैरे आणणे, विजेची बॅटरी चार्ज करणे अशा कामांसाठी कधी ना कधी पाण्याबाहेर यावे लागतेच, पण हे योजनापूर्वक करता येते आणि केले जाते.  . 

प्राचीनकालीन होडी ते अणुशक्तीवर चालणारी आधुनिक पाणबुडी हा जलप्रवास घडण्यात हजारो वर्षांचा कालावधी गेला. या लेखाच्या फक्त दोन भागात त्याचा अत्यंत संक्षिप्त असा आढावा घेण्याचा हा एक तोकडा प्रयत्न मी केला आहे. अरिहंत आणि सिंधूरक्षक या आधुनिक पाणबुड्यांबद्दल ज्या बातम्या अलीकडे वृत्तपत्रांमधून येऊन गेल्या त्यांचा अर्थ समजण्यासाठी या लेखात दिलेल्या माहितीचा थोडा उपयोग व्हावा असा उद्देश या खटपटीमागे आहे.   
---------------------------------------
पुढील भाग -  होडी ते पाणबुडी आणि ... मी
http://anandghan.blogspot.in/2013/08/blog-post_23.html

2 comments:

Unknown said...

Sorry for typing in english...my mobile not support marathi keypad ......Good info in marathi ....when I was kid around in 2/3 std I only knew small boats which are crossing bhatye and purngad creek at that time....and i always dreamed at that time how these small boats can cross ocean and go to america / england....just one question how displacement and tonnage are same.I think displacement and tonnage are different things....

Anand Ghare said...

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. टनेज आणि डिस्प्लेसमेंट यांच्या प्रत्येकी अनेक व्याख्या आहेत. कायदे, शुल्क, वर्गीकरण वगैरेंसाठी निरनिराळे निकष लावले जातात. पण दोन्हींचा संबंध भरलेल्या आगबोटीचे वजान आणि तिने बाजूला सारलेले पाणी यांचेशी आहे. विकीपीडियामधले पहिलेच वाक्य असे आहे.
A ship's displacement or displacement tonnage is the weight of the water that a ship displaces when it is floating; the term is defined ordinarily such that the ship's fuel tanks are full and all stores are aboard.