Thursday, June 06, 2013

क्रिकेट क्रिकेट - भाग १ ते ४


मी कधीच खास अंगात ड्रेस घालून, डोक्यावर कॅप चढवून आणि पायाला पॅड्स, हातात ग्लोव्ह्ज वगैरे जामनिमा करून मैदानावर पाऊल ठेवलेले नाही. पण माझ्या साध्यासुध्या आयुष्याला विविध प्रकाराने क्रिकेटचा निसटसा स्पर्श झाला त्याच्या काही मजेदार आठवणी
. .. ....... संपादन आणि एकत्रीकरण दि. ०१-०७-२०१९
-------------------------------
क्रिकेट क्रिकेट - भाग १
फक्त तीन चार इमारतींना जोडणारी एक लहानशी गल्ली आमच्या घराजवळ आहे. ही गल्ली लांबीला फारशी नसली तरी टाउन प्लॅनिंग करतांना तिला चांगली प्रशस्त रुंद बांधून ठेवली आहे पण सकाळ संध्याकाळचा थोडा कालावधी वगळता एरवी तिच्यावर वाहनांची विशेष वर्दळ नसते. शाळेला सुटी लागलेली असल्याने बरेच वेळा गल्लीतली मुले त्यावरच 'क्रिकेट क्रिकेट' खेळत असतात. परवा मी त्या गल्लीमधून चाललो असतांना सात आठ मुले तिथे 'गल्ली क्रिकेट' खेळत होती. लाकडाच्या एका आडव्या ठोकळ्यावर तीन वर्तुळाकार भोके पाडून त्यात तीन उभे दांडे बसवलेले पोर्टेबल स्टम्प्स अलीकडे मिळतात. त्या मुलांनी एका बाजूला असले स्टम्प्स ठेवले होते. अर्थातच हे डांबरी रस्त्याचे सुपर हार्ड पिच होते आणि त्यांचा खेळ टेनिसच्या सॉफ्ट बॉलने चालला होता. पिचच्या दुसऱ्या बाजूला रस्त्यावरच खडूने रेघा मारून 'क्रीज' बनवली होती. गल्लीच्या तोंडाशी एकादी मोटरगाडी य़ेतांना दिसली की लगेच स्टंप्सना उचलून बाजूला ठेवून आणि स्वतः रस्त्याच्या कडेला जाऊन ती मुले गाडीला वाट करून देत होती. पायी चालणाऱ्यांनी मात्र स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची असल्यामुळे मी चेंडूवर लक्ष ठेवून रस्त्याच्या कडेने फुटपाथवरून जपून चालत होतो.

मी हा खेळ पहात पहात पुढे जात असतांना बॅट्समनने टोलवलेला चेंडू थोडा जास्तच उडाला आणि रस्त्याच्या कडेला लावलेल्या एका मोठ्या वृक्षाच्या फांदीला निसटता लागून त्याच्या दाट पानांमध्ये घुसला आणि एक दोन सेकंदांनंतर पानांमधून वाट काढून सरळ घरंगळत खाली उतरला. तिथे उभ्या असलेल्या मुलाने त्याला अलगदपणे झेलून घेऊन झपाट्याने रस्त्यावर स्टम्पच्या ऐवजी मारलेल्या रेषेला लावला आणि "औट, औट" असा पुकारा केला. विरुध्द संघाची मुले प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पहायला लागताच तो मुलगा म्हणाला, "मी हा त्याचा कॅच पकडला आहे आणि याला रनआउट केले आहे. म्हणजे दोघेही औट ना?"
"चल रे, एका बॉलवर कधी दोघेजण औट होतात का?" एक मुलगा उद्गारला.
"पण त्यांच्यातला कोणी तरी औट व्हायलाच पाहिजे ना?"
यावर बॅट्समन म्हणाला, "अरे, माझा टोला तुझ्या डोक्याच्या किती तरी वरून जात होता आणि मागे दुसरा कोणी फील्डरही नव्हता. म्हणजे हे झाड मध्ये आले नसते तर बॉल नक्की बाउंडरीच्या पार जाऊन चौका किंवा छक्का होणार होता. त्यासाठी मला चार किंवा सहा रन मिळायला पाहिजेत."
"आणि बाउंडरीपलीकडे गेला की बॉल डेड होतो. मग रनआउटचा प्रश्नच येत नाही." त्याचा मित्र म्हणाला,
"पण प्रत्यक्षात काय झालं आहे ते बघा ना. बाउंडरीच्या आतच आणि जमीनीवर टप्पा पडायच्या आधीच मी या बॉलचा कॅच पकडला आहे ना? आणि तो डेड व्हायच्या आतच मी याला रनआउटही केले आहे."
"टप्पा म्हणजे फक्त जमीनीवरच बॉल पडायला पाहिजे असे काही नाही हं, भिंतीला किंवा झाडाच्या फांदीला आपटून बॉल उडाला तरी तो टप्पाच झाला. आज आपण "वन टप्पा औट गेम" खेळत नाही आहोत. त्यामुळे मी काही औट झालेलो नाही." बॅट्समन म्हणाला. दुस-या बाजूचा बॅट्समन लगेच म्हणाला, "अरे मी काही रन काढायसाठी पळालो नव्हता. आपला बॉल कुठे गडप झाला ते पहायसाठी थोडा पुढे आलो होतो. आजच आत्ताच मी हा नवीन बॉल विकत आणला होता, अजून एक ओव्हरपण झाली नाही, एवढ्यात तो हरवला असता तर पंचाईत झाली असती. म्हणून मी बॉल कुठे जातो आहे ते पहात होतो."
"म्हणून तू असा रडी खेळणार का?"
"मी नाही काही, तूच रडी खेळतोय्स."
अशी हमरातुमरी सुरू होताच त्यांच्यातला एक मोठा आणि समंजस मुलगा पुढे होऊन म्हणाला, "अरे, असे भांडताय्त काय? आपण आज असे रूल्स करूया की असं झालं तर औट, तसं झालं तर नॉटऔट ..... वगैरे."
तोंपर्यंत मी पुढे चालला गेलो होतो, त्यामुळे त्याने हा विवादग्रस्त बॉल कॅन्सल केला, की ती ओव्हर किंवा मॅचचा तो भागच रद्द करून नव्याने सुरुवात केली ते काही मला समजले नाही. माझ्या मनात विचार येत होते की खऱ्याखुऱ्या क्रिकेटमध्ये किती शेकडोंनी नियम आहेत! तरीसुध्दा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्वान आणि अनुभवी मंडळी जमून त्यात सारख्या सुधारणा करत असतात, ते नियम शिकून घेऊन व्यवस्थित प्रशिक्षण मिळालेले अंपायर प्रत्येक मॅचसाठी नेमले जातात आणि तेच प्रत्येक मॅचवर नियंत्रण ठेवतात. कुठल्याही सामन्यात सारखे ऐकू येणारे 'हौज्झॅट्'चे आवाज आणि त्यावर पंचाने कोठलाही निर्णय दिला की तो ज्या बाजूच्या विरोधात गेला असेल त्यातल्या खेळाडूंनी दिलेली प्रतिक्रिया पाहता या खेळाडूंना तरी सगळे नियम नीटपणे समजलेले आहेत की नाही किंवा या नियमांची त्यांना किती पर्वा करावीशी वाटते याबद्दल शंका येते. या वेळी खेळाडूंनी काढलेले उद्गार, त्यांच्या चेहेऱ्यावरील हावभाव आणि त्यांच्या देहबोलीमधून व्यक्त झालेली नाराजी हीसुध्दा किती प्रमाणात असली तर चालेल याविषयी सभ्यपणाचे नियम केले आहेत आणि त्यांचे उल्लंघन झाल्यास खेळाडूंना दंड केला जातो असे आपण पाहतो. या ऑफिशियल क्रिकेटबद्दल इतके छापले आणि सांगितले जात आहे की ते वाचणाऱ्या आणि ऐकणाऱ्यांना अजीर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे मला त्यात भर घालायची नाही.

पण आपल्या देशात असे जागतिक नियमांनुसार खेळले जाणारे क्रिकेट फार फार तर एकादा टक्का असेल आणि आपापले नियम तयार करून स्वैरपणे खेळले जाणारे क्रिकेट नव्याण्णऊ टक्के असणार असे मला वाटते. याचे कारण क्रिकेट या अद्भुत खेळात विलक्षण लवचिकपणाही आहे. दोन तीन पासून वीसपंचवीसपर्यंत कितीही मुले जमलेली असली तरी त्यांचे दोन गट पाडून ती क्रिकेट खेळायला लागतात. तसेच घरातल्या अंगणापासून विशाल क्रीडांगणापर्यंत कुठल्याही मोकळ्या जागेत तो खेळला जातो. लगान किंवा इकबाल या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे खेड्यापाड्यातली मुले रिकाम्या शेतांमध्ये देखील क्रिकेट खेळतात. शहरांमधल्या गल्ल्यांमध्ये हा खेळ सर्रास खेळला जातोच, शहरांमध्ये कोणी 'बंद' पुकारला असल्यास मोठमोठ्या हमरस्त्यांवरसुद्धा क्रिकेट खेळणे सुरू होते. आझाद मैदान, क्रॉसमैदान, शिवाजी पार्क यासारख्या मोठ्या मैदानांवर एकाच वेळी अनेक गट क्रिकेट खेळतांना दिसतात. खेळण्यासाठी उपलब्ध असलेल्या जागेचा आकार, खेळणाऱ्यांची उपस्थिती, हवामान वगैरे पाहून आपापसातच रोजच्या रोज सोपे असे नवे नियम तयार केले जातात आणि पाळले जातात. पुढे जगभरात नावलोकिक मिळालेल्या कितीतरी खेळाडूंनी आपल्या खेळाची सुरुवात गल्लीतल्या किंवा चाळीमधल्या क्रिकेटमधून झाली असल्याचे मुलाखतींमध्ये सांगितलेले मी ऐकले आहे.

खेळाडूचा विशिष्ट गणवेश अंगावर धारण करून, पॅड्स आणि गार्ड्स वगैरे बांधून औपचारिक स्वरूपाचा क्रिकेटचा सामना खेळण्याचे भाग्य माझ्या आयुष्यात कधीच माझ्या वाट्याला आले नाही कारण मला टोपी (क्रिकेटची कॅप) घालण्याचे धैर्य कोणालाही झाले नाही. पण मला कळायला लागल्यापासून 'क्रिकेट क्रिकेट'चा खेळ मात्र माझ्या आवडीचा होता. अगदी लहान असतांना कचाकड्याच्या 'बॅटबॉल'ने आमच्या घराच्या गच्चीवर सुरुवात करून मी हळूहळू गल्लीपासून मैदानापर्यंत प्रगती केली, पण चुकूनसुध्दा कधीही मैदान गाजवले मात्र नाही. शाळेत असतांना मी माझ्या वर्गातला वयाने सर्वात लहान मुलगा होतो कारण अॅडमिशन घेण्याच्या वेळी माझ्या वयाच्या मानाने बुध्दीची वाढ जरा जास्तच झाली होती आणि अक्षरे व अंक यांचे ज्ञान घरातच झाले होते. त्यामुळे पहिलीच्या मास्तरांनी मला काय काय येते हे पाहून दुसरीत आणि त्या मास्तरांनी थेट तिसरीत नेऊन बसवून दिले होते. त्या काळात फॉर्म भरणे आणि त्याला बर्थसर्टिफिकेट जोडणे वगैरे भानगडी नव्हत्याच. माझ्या शरीराची वाढ मात्र वयाच्या मानाने थोडी हळू हळूच होत असावी. त्यामुळे माझ्या वर्गात माझे वय कमी होते तसेच वजनही सर्वात कमी होते. आमच्या वर्गातला गिड्ड्या रास्ते सुरुवातीपासून शालांत परीक्षेपर्यंत उंचीने 'डेढफुट्या'च राहिला असला तरी तोसुध्दा शक्तीच्या बाबतीत मला जरा भारीच पडत असे. यामुळे हुतूतूपासून क्रिकेटपर्यंत सगळ्या मैदानी खेळात मी नेहमी 'लिंबूटिंबू'च मानला जात असे. या परिस्थितीत क्रिकेटच्या बाबतीत मी अभिमानाने सांगावे असे काहीच माझ्या जीवनात कधीच घडले नाही, पण लहानपणच्या काही मजेदार आठवणी मात्र आहेत.

.  . . . . . . . . . 
क्रिकेट क्रिकेट - भाग २

क्रिकेटच्या खेळात दोन्ही बाजूच्या संघांमध्ये प्रत्येकी अकरा खेळाडू असतात, त्यातला जो संघ बॅटिंग करत असतो त्याचे फक्त दोनच खेळाडू मैदानात प्रत्यक्ष खेळत असतात, उरलेले मैदानाबाहेर बसलेले असतात. खेळणारा एक बॅट्समन औट झाल्यावर तो मैदानाच्या बाहेर जातो आणि दुसरा त्याची जागा घेतो. दुसरा संघ बॉलिंग आणि फील्डिंग करत असतो त्याचे सारे म्हणजे अकराही खेळाडू मैदानावर उतरून खेळात भाग घेत असतात. एवढी तरी प्राथमिक माहिती आजकाल सगळ्यांनाच असते. पण आमच्या मुलांच्या क्रिकेटमध्ये असले मूलभूत नियमसुध्दा नसायचे. दुपार टळली की मित्रमंडळी एकमेकांना बोलावून आणि ज्याच्याकडे बॅट, बॉल, स्टंप्स वगैरे जी सामुग्री असेल ती घेऊन मैदानाकडे येऊ लागत आणि जितकी मुले जमतील तेवढ्यावर खेळ सुरू करून देत. त्यासाठी दोन टीम बनवण्याचीसुध्दा गरज पडत नसे. मुलांची आपापसातच आळीपाळीने बॅटिंग आणि बॉलिंग चालत असे. एक मुलगा बॉल टाकायचा आणि दुसरा बॅटिंग करायचा. तिसरा वाट पहात फील्डिंग करायचा. बॅटिंग करणारा मुलगा औट झाला तर तिसरा त्याची जागा घ्यायचा आणि पूर्ण ओव्हरमध्ये तो औट नाही झाला तर तिसरा मुलगा बॉलिंग करायचा. चौथा, पाचवा, सहावा वगैरे मुले अशाच प्रकारे आपल्याला आळीपाळीने बॅटिंग किंवा बॉलिंग मिळायच्या संधीची वाट पहात फील्डिंग करत रहायचे. टीमच नसल्यामुळे धावा मोजायची गरज नसायची. कधी कधी तर असे व्हायचे की बॅट्समन औट होताच ती ओव्हर अर्धवट सोडून बॉलरच "माझी पाळी आली" म्हणून बॅट हातात घ्यायचा आणि त्याची उरलेली ओव्हर औट झालेला मुलगा पूर्ण करायचा. म्हणजे एका ओव्हरमध्येच बॉलर आणि बॅट्समन यांचे 'रोल रिव्हर्सल' होत असे. दोन गट बनवण्याएवढी म्हणजे दहा बारा इतकी गणसंख्या झाल्यावर लीडर टाइपची दोन मुले कॅप्टन होत आणि "मन्या, तू माझ्या टीममध्ये", "पक्या तू माझ्याकडे", "सुऱ्या तू इकडे ये", "रम्या, इकडे", "चंद्या", "नंद्या" ..... असे करून सगळ्या मुलांची दोन गटात वाटणी करून घेत. त्यानंतर उशीराने येऊन पोचलेली मुलेही एकजण या आणि दुसरा त्या अशा प्रकारे या ना त्या संघात सामील होत जात. 

जमलेल्या मुलांची संख्या वीस पंचवीस इतकी मोठी संख्या कधी झाली तरच क्रिकेटच्या नियमाप्रमाणे एक 'बॅटिंग साइड' आणि दुसरी 'फील्डिंग साइड' अशी विभागणी होत असे. एरवी दोन लहान लहान संघ बनले असले तरी त्यातले दोन बॅट्समन सोडून इतर सगळी मुले आनंदाने फील्डिंग करत, बॉलिंग मात्र फक्त विरुध्द संघाच्या मुलांनी करायची. फिल्डिंग करतांना आपल्या संघातल्या खेळाडूचा कॅच सोडायचा, त्याने मारलेला फटका अडवायचा नाही अशा प्रकारची 'चीटिंग' कोणी करत नसे. कोणीही तसे मुद्दाम केलेले आढळल्यास त्याला बॅटिंगचा चान्स मिळणार नाही एवढीशी शिक्षा असायची. शिवाय त्या दिवशीचे दोन संघ त्या खेळापुरते, दुसऱ्या दिवशी इकडची काही मुले तिकडे आणि तिकडची इकडे असे होणार असल्यामुळे त्या तात्पुरत्या संघात संघभावना कशी तयार होणार? रोजच्या खेळातला डाव जिंकण्याहरण्याला फार महत्व असायचेही नाही. खेळण्यातला आनंद उपभोगणे इतका साधा उद्देश मनात ठेवून खेळणे होत असे.   

आजकाल क्रिकेटच्या मॅचसाठी मुद्दाम वेगळी खेळपट्टी (पिच) तयार केली जाते. त्यासाठी दक्षिण आफ्रिकेमधून वाळू आणि न्यूझीलंडमधून खडी आणली अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जातात. अमाप खर्च आणि श्रम करून ती तयार केली असली तरी मॅच सुरू झाल्यानंतर संपण्याच्या आधीच ही नखरेल खेळपट्टी आपले गुण पालटत राहते. सुरुवातीला तिच्यावर टाकलेला चेंडू चांगली उसळी घेतो त्यामुळे ती जलदगती गोलंदाजांना (पेस बोलर्सना) साथ देते. तेच पिच जुने झाल्यानंतर त्यावर बॉल चांगले वळायला लागतात. त्यामुळे ते फिरकी गोलंदाजांना (स्पिनर्सना) मदत करते. असे असे घडले असे कॉमेंटेटर्स कधी कधी सांगत असतात. काही खेळपट्ट्या फलंदाजांच्या सोयीसाठी अशा प्रकारे बनवल्या जातात की त्या कुठल्याच प्रकारच्या बोलरला कसलीच साथ देत नाहीत. पिचच्या या गुणधर्मांमुळे टॉस जिंकून झाल्यावर आधी बॅटिंग करायची की फील्डिंग असा एक मोठा निर्णय कॅप्टनने घ्यायचा असतो. नाणेफेक जिंकूनसुध्दा एकादी टीम हरली तर तिच्या कर्णधाराने चुकीचा निर्णय घेतल्याबद्दल त्याला जबाबदार धरले जाते. हे सगळे वाचतांना मला तरी हसू येते. कोणची टीम जिंकणार हे जर टॉसवरच ठरत असेल तर त्या मॅचला काय अर्थ राहिला? आमच्या लहानपणच्या क्रिकेटमध्ये खेळपट्टीची भानगडच नसायची. गावाबाहेरच्या ज्या सार्वजनिक मोकळ्या मैदानावर आम्ही खेळायला जात असू तिथे मुलांची इतर टोळकीही येत, तसेच फिरायला आलेली माणसेही गवतावर बसून गप्पा मारत. त्यामुळे आमची खेळण्याची जागाच रोज बदलत असे. सोयिस्कर मोकळी जागा बघून त्यातल्या त्यात सपाट अशा जागेवर स्टंप ठोकून आणि त्याच्या आसपासचे दगड धोंडे वेचून ते बाजूला करून आमचे नित नवे पिच तयार होत असे. 

खेळाच्या इतर बाबतीतसुध्दा परिस्थितीनुसार नवनवे नियम बनवले जात आणि पाळले जात. दोन्ही बाजूला तीन तीन स्टंप ठेवणे आम्हाला कधीच शक्य होत नसे. त्यामुळे ओव्हर संपल्यानंतर विकेट कीपर त्याच्या जागेवरच उभा रहात असे, सगळे बोलर एकाच बाजूने बॉल टाकत. तिथे पॅव्हिलियन एंड, चर्च एंड अशासारख्या दोन बाजू नसत. ओव्हर झाली की दोन्ही बाजूचे बॅट्समन रन काढल्याप्रमाणे आपल्या जागा बदलत. जिथे खेळपट्टीचाच पत्ता नसायचा तिथे आखलेल्या सीमारेषा कुठून येणार? डाव सुरू करतांनाच काही खुणा ठरवून ती बाउंडरी मानली जात असे. शहरातल्या गल्लीत क्रिकेट खेळणारी मुले सुध्दा पहिल्या मजल्यावर बॉल गेला किंवा कोणाच्या खिडकीची काच फुटली कि बॅट्समन आउट, ठराविक रेषे पर्यंत बॉल गेला कि दोन रन्स, त्याच्या पुढे दुसऱ्या रेषे पर्यंत बॉल गेला कि चार रन्स, रेषेवरून गेला कि ६ धावा असे नियम करतात. फील्डर्सची संख्या कमी असली तर बॉल कुठल्या दिशेने फटकारायचा याचे नियम ठरवले जातात. आमच्या खेळात असेच काही नियम एकदा ठरवले होते, त्या दिवशी मी उशीरा पोचलो होतो. पण माझी क्षमता पाहून मला ते नियम सांगण्याची गरज कुणाला वाटली नाही. नेहमीप्रमाणे सर्वात शेवटी माझी बॅटिंगची पाळी आली. तोपर्यंत अंधार पडायची वेळ झाली होती. नेहमीप्रमाणे दोन तीन चेंडूमध्ये माझी विकेट काढून घरी परतायचा माझ्या मित्रांचा विचार होता. पण त्या दिवशी काय झाले कोण जाणे, पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर पडून उसळतांना मला दिसला आणि काही विचार न करता मी बॅट फिरवली आणि तो चेंडू लाँग लेगच्या दिशेने पार नजरेपल्याड चालला गेला. कित्येक दिवसात मी एवढा दूर फटका मारला नसल्याने मी स्वतःवर भयंकर खूष झालो होतो, पण सगळे मित्र मात्र चिडून माझ्या अंगावर धावून आले. स्टंपच्या मागच्या बाजूला ठेवायला क्षेत्ररक्षक उपलब्ध नसल्याने "कोणीही त्या बाजूला फटका मारायचा नाही, बॉलला फक्त पुढच्या बाजूलाच ढकलायचा." असा त्या दिवसापुरता नियम केला होता म्हणे. त्यामुळे माझ्या कर्माची शिक्षा म्हणून मलाच एकट्याने मागे जाऊन अंधुक होत असलेल्या प्रकाशात गवत आणि काट्याकुट्यामधून तो चेंडू शोधून आणण्याचे काम करावे लागले. करकरीत तीन्हीसांजेच्या वेळी मनातल्या मनात रामरक्षा म्हणत केलेल्या या प्रायश्चित्ताची आठवण जन्मभर राहिली.
--------------

क्रिकेट क्रिकेट - भाग ३

माझ्या लहानपणच्या काळात मामलेदार कचेरी, नगरपालिका कचेरी, पोस्ट ऑफिस आणि एक सहकारी बँक एवढीच 'ऑफिसे' आमच्या लहान गावात होती. त्या सगळ्या इमारतींमधले वातावरण थोडे गावठीच असायचे. पट्टेवाले किंवा पोस्टमन यांच्यासारखे मोजके गणवेशधारी सेवक वगळल्यास तिथे दिसणारे बहुतेक लोक अंगात सदरा (शर्ट), डोक्यावर टोपी किंवा पागोटे आणि कंबरेला धोतर किंवा लेंगा (पायजमा) अशासारख्या गावठी पोशाखात असत. गावातल्या पांढरपेशा लोकांची संख्या एकंदरीत कमीच असल्यामुळे पँट धारण करणारे तरुण कमीच दिसत पण त्यांची संख्या दिवसेदिवस वेगाने वाढत जात होती. तरीही फक्त खेळासाठी म्हणून डोक्यावरील कॅपपासून पायातील बुटांपर्यंत नखशिखांत पांढरा शुभ्र ड्रेस घालून क्रिकेटची मॅच खेळू शकणारे युवक त्यांच्यात शोधूनही निघाले नसते. त्या काळात मुलांचे 'खेळायचे वय' संपले की त्यांनी पूर्णवेळ 'कामाला' किंवा 'उद्योगधंद्याला' लागायचे अशी रीत असल्यामुळे त्या गावात मोठ्या माणसांचे मैदानी खेळांचे फारसे सामने होत नसत. मी आमच्या गावातल्या प्रौढांना हुतूतू, कुस्ती आणि व्हॉलीबॉल याव्यतिरिक्त इतर कोणता मैदानी खेळ खेळतांना पाहिल्याचे मला आठवत नाही. त्या काळात भारतात टेलिव्हिजन सुरू झालेला नसल्यामुळे घरबसल्या क्रिकेटचा सामना पाहण्याची सोयही नव्हती. थोडक्यात सांगायचे झाल्यास मी कॉलेजच्या शिक्षणासाठी शहरात आल्यानंतर क्रिकेटचा खरा नियमानुसार असा खेळ पहिल्यांदा पाहिला.

त्या काळात क्रिकेटच्या कसोटी सामन्यांच्या कॉमेंटरीचे प्रसारण रेडिओवर येत होते. पण वर्षभरामध्ये क्रिकेट या खेळाचा फक्त एकच 'सीझन' येत असे आणि त्या कालावधीतसुध्दा दोन तीन वर्षांमध्ये एकदा एकादी परदेशी टीम क्रिकेट खेळण्यासाठी भारतात येत असे किंवा आपले खेळाडू 'फॉरेन टूर'वर जात असत. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांचे संघ माझ्या शालेय जीवनाच्या आठवणीत फक्त एकेकदाच भारतात येऊन गेले असावेत. क्रिकेटची कॉमेटरी हा तेंव्हा आजच्यासारखा रोजचा मामला नव्हता. गावात प्रत्येकाच्या घरी रेडिओ असायचा नाही आणि असला तरी तो घरातल्या मुलांच्या वाट्याला क्वचितच येत असे. चुकून एकाद्या घरातल्या मोठ्या लोकांना क्रिकेटची कॉमेंटरी ऐकण्याचा षौक असलाच तर मग त्या घरातल्या मुलांच्या कानावर कॉमेंटरी पडायची. क्रिकेट टेस्ट मॅचेसच्या दिवसात अभ्यासाचे किंवा खेळायचे निमित्य करून त्या मुलाचे मित्र त्याच्या घरी जाऊन आणि थोडीशी कॉमेंटरी ऐकून धन्य होत. हॉटेले, पानपट्टीचे ठेले, सायकलीची (म्हणजे सायकली भाड्याने देण्याची) दुकाने अशा गावातल्या काही ठिकाणी नेहमीच रेडिओवर सिनेमाची गाणी मोठ्याने लावलेली असत. त्यातले काही लोक मात्र टेस्ट मॅचेस सुरू झाल्यावर गाण्यांऐवजी क्रिकेटची कॉमेंटरी लावून ठेवत. काही उत्साही लोक, मुख्यतः पोरेटोरे दुकानांच्या दारात उभी राहून ती ऐकत असत. 

आपल्या देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रजी भाषेचीही हकालपट्टी करायचा चंग त्या काळातल्या राज्यकर्त्यांनी बांधला होता. आम्ही आठवी इयत्तेत गेल्यानंतर एबीसीडी शिकण्यापासून सुरुवात केली. ए टु झे़ड ही सव्वीस अक्षरे गिरवून झाल्यानंतर हळूहळू शब्द, वाक्यरचना, व्याकरण वगैरे थोडे फार शिकेपर्यंत आमचे शालेय शिक्षण संपून गेले. शालांत परीक्षेसाठी इंग्लिश हा एक ऐच्छिक विषय होता. ज्यांनी कॉलेज शिक्षण घेण्याचा विचारही केला नव्हता अशा बहुसंख्य मुलांनी तो घेतलाच नाही. आम्हाला इंग्रजी शिकवणारे अपसंगी, दोडवाड वगैरे सरांची गणना गावामधल्या विद्वान व्यक्तींमध्ये होत असे, पण शेक्सपीयर, शॉ, वर्डस्वर्थ वगैरेंचे साहित्य ते कोळून प्यायले असले तरी एबीसीडी शिकण्याच्या पातळीवरल्या आम्हाला त्याचा काय उपयोग होणार? त्यातून त्यांची मातृभाषा कानडी असल्याने त्यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व नव्हते. आम्हाला इंग्रजी सिनेमा किंवा मालिका, डॉक्युमेंटरीज वगैरेंचे दर्शनही झाले नव्हते. या परिस्थितीत शाळेत असेपर्यंत आमचे इंग्रजी भाषेचे ज्ञान यथातथाच राहिले. शाळेमधला इंग्रजीचा तास सोडल्यास एरवी त्या भाषेतला चकार शब्द बोलण्यात किंवा ऐकण्यात येत नसे. त्या वेळी क्रिकेटच्या कॉमेटरीमधूनच त्या भाषेतली चार वाक्ये कधी तरी आमच्या कानावर पडत होती. त्याचा अर्थ लावायच्या प्रयत्नातून आमचे किंचित ट्रेनिंग होत होते. 

ऐकलेल्या कॉमेंटरीमधले फारच थोडे त्या वेळी आम्हाला समजत असे, पण पुन्हा पुन्हा ऐकून आणि शहाण्या लोकांना विचारून विचारून त्यातली क्रिकेटची परिभाषा ध्यानात येऊ लागली. इनस्विंगर, औटस्विंगर, लेग स्पिन, ऑफस्पिन, स्लिप, शॉर्ट लेग, कव्हर, हिट विकेट, क्लीन बोल्ड यासारख्या शब्दांचे अर्थ समजायला लागले. मैदानातल्या कोणकोणत्या जागांवर क्षेत्ररक्षक उभे आहेत (फील्ड प्लेसमेंट्स) हे पुन्हा पुन्हा सांगितले जात असल्यामुळे ते चित्र कल्पनेने डोळ्यासमोर येऊ लागले. पण आम्हाला त्यात त्या काळी फारसे स्वारस्य वाटत नव्हते. कोणती टीम बॅटिंग करते आहे, कोणकोण बॅट्समन खेळत आहेत, त्यांच्या आणि संघाच्या किती धावा झाल्या, किती विकेट्स गेल्या ही माहिती तेवढीच महत्वाची. अखेर कोण जिंकत आहे आणि कोण पराभूत होत आहे हे त्यावरून ठरते. यामुळे सर्वांना त्यातच इंटरेस्ट असायचा.

त्या काळात 'पियरसन' अशा इंग्लिश नावाचे एक भारतीय कॉमेंटेटर होते, त्यांचा भरदार आवाज आणि बोलण्याची स्टाईल सर्वांना इंप्रेस्सिव्ह वाटायची. 'महाराजकुमार ऑफ विजयानगरम्' एवढे लांबलचक आणि 'विझी' असे छोटेसे नाव धारण करणारे गृहस्थ अचाट लांबण लावायचे आणि त्यातले अवाक्षरही आम्हाला समजत नसे. कुठल्याशा जुन्या आठवणी घोळवून सांगता सांगता "दरम्यानच्या काळात चार विकेट पडल्या आहेत आणि आता अमके तमके क्रीजवर आले आहेत" अशी त्या सुरू असलेल्या खेळाबद्दल थोडीशी माहिती ते देत. विजय मर्चंट हे कॉमेंटेटर मात्र सर्वांचे अत्यंत लाडके होते. त्यांच्या खणखणीत आवाजात प्रत्येक शब्दाचा स्पष्ट उच्चार करून ते अक्षरशः 'बॉल टू बॉल' कॉमेंटरी करत असत, ते स्वतः एक उत्कृष्ट खेळाडू होते, त्यामुळे त्यांना क्रिकेटमधल्या खाचाखुचा चांगल्या ठाऊक होत्या आणि सोप्या शब्दात ते श्रोत्यांना समजावून सांगत असत. मुख्य म्हणजे रेडिओवरील खरखरीमधून फक्त त्यांचेच बरेचसे उच्चार आम्हाला समजत होते. तटस्थ वृत्ती न बाळगता ते खेळाशी समरस होऊन जात आणि त्यांच्या मनातली देशप्रेमाची भावना त्यांच्या कॉमेंटरीमध्ये उतरत असे.

मला गणितात पहिल्यापासूनच आवड आणि गति असल्यामुळे क्रिकेटच्या आकडेवारीचे थोडेसे वेड होते. क्रिकेटमध्ये जेवढे स्टॅटिस्टिक्स येते तेवढे अर्थकारणातदेखील कदाचित येत नसेल. कोणत्या संघाने किंवा खेळाडूने कुठे कुठे आणि कोणकोणते पराक्रम केले याची सविस्तर जंत्री वर्तमानपत्रांमध्ये, मासिकांमध्ये येत असे. आम्ही ती गोळा करून सांभाळून ठेवत होतोच, पण प्रत्येक सीझनमध्ये कितीतरी जुने रेकॉर्ड्स मोडले जात आणि नवे विक्रम प्रस्थापित केले जात असत. या सगळ्याची इत्थंभूत माहिती आम्हाला तोंडपाठ असे. एकादा बॅट्समन किंवा बोलर जरासा यशस्वी व्हायला लागला की लगेच तो कोणत्या विक्रमापासून किती दूर आहे हे पाहिले जात असे आणि नव्या विक्रमाचे वेध लागत असत. तो सामना जिंकण्याहरण्यापेक्षाही त्या सामन्यात अमूक रेकॉर्ड मो़डला जाणार की नाही याची उत्सुकता कधी कधी जास्त वाटत असे.

त्या काळातली एक मजेदार आठवण आहे. आमच्यातला अरविंद पोटे नावाचा एक मुलगा चांगला क्रीडापटू होता आणि थोडी दादागिरीही करायचा. सुरुवातीपासून शाळा सोडेपर्यंत तोच आमचा कॅप्टन असायचा. एरवी तो स्वतःला देव आनंद समजत असे आणि त्याच्यासारखा केसाचा कोंबडा ठेवून थोडे हावभावही करत असे. क्रिकेटच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू रिची बेनो त्याचा हीरो होता. फील्डिंग करतांना सिली मि़ड ऑफ या जागेवर बॅट्समनच्या अगदी पुढ्यात हा रिची उभा रहात असे आणि एकादा बॉल प्लेड करतांना किंचितसा जरी वरच्या बाजूला उडाला तर हनुमानउडी मारून त्याचा कॅच पकडत असे. अर्थातच कॉमेंटरीमध्ये ऐकून आणि वर्तमानपत्रांमध्ये वाचून ही माहिती आम्हाला मिळाली होती. असले धाडस करणे त्या काळात दुर्मिळ असायचे. आमचा अरव्यासुध्दा एकदा असा रिची बेनोसारखा सिली मि़ड ऑफला उभा राहिला असतांना योगायोगाने माझी बॉलिंगची पाळी आली होती. मलाही वेगाने बॉल टाकता येतो हे दाखवायचे म्हणून मी सगळा जोर लावून चेंडू फेकला आणि कधी नव्हे तितक्या वेगाने तो गेला, पण त्या नादात त्याची दिशा थोडी चुकली आणि सरळ अरव्याच्या पाठीवर दाणकन आपटला. 

.  . . . . . .  . . . . . . . . .  (क्रमशः)

क्रिकेट क्रिकेट - भाग ४

कॉन्व्हेंट स्कूल, मिलिटरी स्कूल, पब्लिक स्कूल यासारख्या काही शाळांमध्ये शिक्षणाबरोबरच खेळांनासुध्दा खूप महत्व दिले जाते. अशा शाळांमधून आलेली काही मुले आमच्याबरोबर इंजिनियरिंगला होती, तसेच काही मुलांनी क्लब, जिमखाना वगैरेंमध्ये जाऊन क्रिकेटचे खास प्रशिक्षण घेतलेले होते. यामुळे आमच्या इंजिनियरिंग कॉलेजमधल्या क्रिकेटचा दर्जा खूपच वरचा होता. सिलेक्शन ट्रायल्ससाठी येणाऱ्या मुलांची संख्या आणि प्रत्येकाची तयारी चांगली होती. तिथे लिंबूटिंबूंसाठी काहीच स्कोप नव्हता. मी शिकत असतांना तीनही वर्षी पुणे विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा आमच्या कॉलेजच्या संघानेच जिंकल्या. या कॉम्पिटिशनमधल्या प्रत्येक मॅचच्या वेळी आपल्या खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी आमच्या हॉस्टेलमधून मुलांच्या झुंडी त्या ग्राउंडवर जाऊन पोचायच्या. आर्ट्स अँड सायन्स कॉलेजबरोबर सामना असेल तर त्यांच्या बाजूने मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी मुलीही यायच्या हे एक अॅडेड अट्रॅक्शन असायचे. प्रत्येक चौकार, षट्कार किंवा विरुध्द संघाची विकेट यावर टाळ्या, शिट्या, आरडाओरड, नाच वगैरे मनसोक्त धांगडधिंगा घालण्याची चढाओढ चालत असे. मैदानात आमचा संघ जिंकायचाच, प्रेक्षकांमधल्या धांगडधिंग्याच्या सामन्यातसुध्दा आमचाच आवाज वरचढ असायचा. क्रिकेटमुळे कशी धुंदी चढते हे मी त्या काळात अनुभवले. तसेच प्रत्यक्ष क्रीजवर बॅट आणि बॉल यांच्या दरम्यान नेमके काय घडत असते हे दुरून पाहणाऱ्या प्रेक्षकांना नीट दिसतसुध्दा नाही हेही समजले. हजारो रुपयांची तिकीटे काढून मॅच पहायला स्टेडियमवर गर्दी करणाऱ्यांची मला धन्य वाटते. त्यापेक्षा घरबसल्या टीव्हीवर मॅच पहात असतांना क्लोज अप व्ह्यूमध्ये जास्त चांगले दाखवले जाते. आता तर अॅक्शन रिप्लेमधून ते व्यवस्थित दिसते. स्टेडियममधले प्रेक्षकही ते  मोबाईल फोनवर पाहू शकतात.

शाळेत असतांना कधी कधी आमची टीम आणि इतर मुलांच्या टीममध्ये मॅचेस होत असत. अर्थातच त्यातसुध्दा आम्हीच बनवलेल्या नियमांनुसार क्रिकेट क्रिकेटचा स्वैर खेळ होत असे. माझ्या गणितातल्या कौशल्यामुळे मला काही वेळा अशा सामन्यांमध्ये स्कोअररचे काम मात्र मिळत असे आणि माझ्या समजुतीनुसार झालेल्या धावांची संख्या आणि विकेट्स यांची नोंद ठेऊन मी स्कोअरकार्ड तयार करत असे. एका इंटरकॉलेज क्रिकेट मॅचच्या वेळी मी कुतूहलाने स्कोअररपाशी जाऊन बसलो. माझा एक मित्र सुधीर त्यासाठी एक वही घेऊन आला होता आणि प्रत्येक बॉल पिचवर कुठे पडला, त्याला बॅट्समनने कोणत्या दिशेने टोलवले, किंवा त्या बॉलने बॅट्समनला चकवले, तो चेंडू कुठे अडवला गेला, त्यावर किती धावा मिळाल्या वगैरेंची सचित्र नोंद तो ठेवत होता. आजकाल अशा गोष्टी काँप्यूटरच्या सहाय्याने अॅक्शन रिप्लेमध्ये दाखवल्या जातात, कदाचित त्या रेकॉर्डही केल्या जात असतील, पण पन्नास वर्षांपूर्वी केल्या गेलेल्या अशा तपशीलवार नोंदी पाहून मी चाट पडलो होतो.

कॉलेजला गेल्यानंतर क्रिकेटच्या बाबतीत माझी भूमिका फक्त आणि फक्त प्रेक्षकाचीच राहिली. सामन्यांची संख्या जसजशी वाढत गेली, तसतसा त्यातला माझा इंटरेस्ट कमी कमी होत गेला. अजूनही मी काही वेळा टीव्हीवर हा खेळ पहातो, पण आता त्याची तितकी क्रेझ राहिली नाही. वर्ल्ड कप सारखे सामने मात्र आवर्जून पहातो.

माझ्या मुलांच्या जन्माच्या आधीच आमच्याकडे टीव्ही आला होता आणि ते दोघेही त्यांना समज येण्याच्याही आधीपासून टीव्हीवर भरपूर क्रिकेट पहात होते. अगदी लहान असतांना सुध्दा ते निरनिराळे बोलर, बॅट्समन, फील्डर्स आणि अंपायर यांच्या विशिष्ट लकबी नक्कल करून दाखवत आणि सर्वांना हसवत असत. ते वर्ष दीड वर्षाचे झाले असतांनाच वीतभर लांबीची प्लॅस्टिकची पोकळ बॅट आणि लिंबाएवढा बॉल या वस्तू त्यांच्या खेळण्यांमध्ये जमा झाल्या आणि त्या बॅटने ते बॉलशी ठोकाठोक करायला लागले. पुढे त्या खेळण्यांचे आकार आणि प्रकार बदलत गेले असले तरी बॅटबॉल खेळतच ते लहानाचे मोठे झाले, शाळेत आणि कॉलेजात रेग्युलर क्रिकेट खेळले. ते आता ऑफिसमधल्या सहकाऱ्यांबरोबर खेळत आहेत आणि जिंकून आणलेल्या ट्रॉफीजनी आपल्या दिवाणखान्याची शोभा वाढवत आहेत. ते अगदी लहान असतांना मी घरात किंवा बाहेरच्या पॅसेजमध्ये त्यांच्या बरोबर खेळत होतो, ते थोडे मोठे झाल्यानंतर त्यांच्या मित्रांबरोबर खेळू लागले. शाळा आणि कॉलेजमध्ये सगळ्या नियमांप्रमाणे क्रिकेट खेळत असतांना बिल्डिंगच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत त्यांचे गल्ली क्रिकेटही चालत असे. खेळायला कोणी मित्र नसेल किंवा धो धो पाऊस पडत असेल अशा वेळी ते दोघेच आमच्या एकोणीसाव्या मजल्यावरच्या लिफ्टच्या लॉबीमध्ये खेळायचे. एकाने सरपटत चेंडू टाकायचा आणि दुसऱ्याने तो जमीनीलगतच परत (बॅक टू द बोलर) पाठवायचा. शेजाऱ्याचे दार म्हणजे स्टंप्स, त्याला बॉल लागला की बॅट्समन औट आणि परत केलेला चेंडू बोलरला अडवता आला नाही आणि त्याच्या मागे असलेल्या भिंतीला लागला की एक रन अशा प्रकारचे नियम ते पाळायचे. चुकून बॉल उडाला आणि कठड्यावरून खाली गेला तर मात्र तो मिळायची शक्यता फारच कमी असायची. मग त्या दिवसाचा खेळ बंद.

कधी कधी तर ते डाईस घेऊन काल्पनिक क्रिकेट खेळायचे. जगभरातले उत्तमोत्तम खेळाडू निवडून त्यांचे दोन संच बनवत आणि त्यातल्या एकेकाच्या नावाने डाईस फेकून १, २, ३, ४ किंवा ६ आकडा आला तर तितके रन्स आणि ५ आकडा आला तर औट असे स्कोअर लिहीत असत. हा खेळ एकटासुध्दा खेळू शकतो आणि खेळला जात असे. घरी काँप्यूटर आणल्यानंतर थोड्याच दिवसात क्रिकेट या खेळाची सीडी आली आणि त्यांचे त्यावर व्हर्च्युअल क्रिकेट खेळणे सुरू झाले. काँप्यूटरची क्षमता जसजशी वाढत गेली त्यासोबत या खेळाच्या सॉफ्टवेअरमध्ये अपार सुधारणा होत गेली. अगदी खरेखुरे छायाचित्र वाटेल इतके चांगले खेळाडू आजकाल या खेळामधल्या स्क्रीनवर दिसतात आणि आपण त्यांना आज्ञा देऊ त्यानुसार ते बोलिंग व बॅटिंग करतात. इतकेच नव्हे तर गॅलरीमधले प्रेक्षकसुध्दा टाळ्या वाजवून दाद देतात आणि चीअर गर्ल्स नाचतांना दिसतात. हा एक काँप्यूटर गेम आहे की प्रत्यक्ष होत असलेल्या मॅचचे थेट प्रक्षेपण आहे असा संभ्रम पडावा इतके ते रिअॅलिस्टिक वाटते.

मॅच फिक्सिंगच्या प्रकारांमुळे या खेळात अप्रामाणिकपणा शिरला असला तरी तो एक आकर्षक खेळ आहे आणि आज मनोरंजनाचे एक साधन बनला आहे असा विचार केला तर त्यात भावनात्मक रीत्या गुंतून पडण्याचे (इमोशनली इन्व्हॉल्व्ह होण्याचे) कारण नाही. नाटक सिनेमांमध्ये दाखवले जाणारे सगळेच काल्पनिक असते, त्यांच्या कथांमध्ये आपण सत्य शोधत नाही. आयपीएल हा प्रकार मला तरी यापेक्षा कधीच वेगळा वाटला नाही. त्यातही मुंबई, दिल्ली किंवा चेन्नै या नावाच्या संघांचा त्या गावांशी संबंध नसतो. जगभरातले क्रिकेटर लिलावात विकले जाऊन त्यांच्याकडे येतात आणि भाडोत्री खेळाडू म्हणून खेळतात. त्यामुळे मला त्यातला कुठलाच संघ आपला वाटत नाही आणि एक बाजू आपली नसली तर त्या खेळातल्या कुणाच्या जिंकण्याहरण्याचे आपल्याला काही वाटत नाही. तरी पण बॅट्समनांची अप्रतिम फटकेबाजी आणि फील्डरांनी उड्डाण करून किंवा जमीनीवर सूर मारून घेतलेले झेल यातली कलाकारी पाहण्यासारखी असते.

तर अशा प्रकारे निरनिराळ्या स्वरूपांमध्ये माझ्या जीवनात क्रिकेट आले आणि ते काही त्याने घेऊन ठेवलेला एका कोपऱ्याचा ताबा सोडायला तयार नाही.
 . . . . . . . . .  (समाप्त)
------------
हा लेख इथेही.
https://anandghare2.wordpress.com/2019/07/01/%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%9f-%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%9f/

No comments: