या कार्याला 'उपस्थित' राहून त्याची 'शोभा' वाढवण्यासाठी भरपूर पाहुणे मंडळी आली होती. बटूंची आई आणि वडील या दोघांच्या बाजूचे नातेवाईक होते, त्यात पुन्हा वडिलांच्या आईच्या बाजूचे मामा, मावश्या वगैरे आणि वडिलांच्या बाजूचे काका, आत्या वगैरे आणि त्यांची मुले तसेच आईच्या दोन्ही बाजूचे आप्त असे चार मुख्य गट होते. वेगवेगळ्या गटात असलेले त्यातले काही लोक एकाच गावात रहात असल्यामुळे, नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्याने, पूर्वी भेटलेले असल्यामुळे किंवा इतर काही कारणाने आधीपासून एकमेकांना ओळखत होते, तर काही जण उत्साहाने नव्या ओळखी करून घेत होते. पण बहुसंख्य लोक आपापल्या लहान लहान ग्रुपमध्येच वावरतांना दिसत होते आणि ते साहजीकच आहे. अनेक जवळचे नातेवाईकसुध्दा दूर रहात असल्यामुळे कालांतरानेच प्रत्यक्ष भेटतात, तेंव्हा त्यांच्या सहवासात वेळ घालवावा असेच कोणालाही वाटेल. पुण्यामुंबईला रहात असलेले माझेच कितीतरी आप्तजन अशा निमित्यानेच मला कुठल्याशा तिस-याच जागी भेटतात. प्रत्येक वेळा "आता आमच्या घरी यायचं हां, म्हणजे खूप गप्पा मारता येतील." अशी एकमेकांना आमंत्रणे दिली जातात आणि "नक्की येऊ." अशी आश्वासने दिली जातात, पण ती कधीच पाळली जात नाहीत असा अनुभव येतो. त्यामुळे जेंव्हा सहवासाचे चार क्षण मिळतात त्यांचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा असे वाटणारच.
मुंजीच्या आदले दिवशी बरेचसे नातेवाईक जमलेले असल्यामुळे आहेराचा कार्यक्रम त्या दिवशी करून घेतला गेला. त्या रात्री जेवणे झाल्यानंतर सर्वांना मांडवात बोलावण्यात आले. त्यात आधी एक छोटासा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर सर्व पाहुण्यांच्या ओळखी करून दिल्या घेतल्या जातील असे सांगितले गेले होते. बरीचशी मंडळी जमल्यानंतर एका भाषणाच्या वाचनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यजमान कुटुंबातल्या सर्वात ज्येष्ठ व्यक्तींबद्दल अपार आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करून झाल्यानंतर त्यांच्या मुलाने त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वाने कशी आणि केवढी मोठी प्रगती केली याचे मानपत्र वाचून झाले. याच आशयाचे आणखी एक भाषण आणि कवितावाचन झाले. हे सगळे ऐकतांना काही जण भावनावश किंवा सद्गदित झाले, काही लोकांना खूप अभिमान किंवा कौतुक वाटले. "अशी माणसं सहसा कुठे पहायला मिळतात? आपण किती सुदैवी आहोत?" असे भाव त्यांच्या चेहे-यांवर उमटत होते. काही जणांच्या कपाळावर सूक्ष्म आठ्या पडत होत्या, काही हळूच नाक मुरडत होते तर काही चेहे-यावर छद्मी हास्य उमटत होते. "अशी कितीतरी माणसं आम्ही पाहिली आहेत. आम्ही पण या सगळ्यामधूनच वर आलो आहोत ना? अंदरकूी बात आम्हाला माहीत आहे हो!" अशा प्रकारची वाक्ये बहुधा त्यांच्या मनात उठत असावीत असे त्यांच्या मुद्रांवरून वाटत होते. कुणाबद्दलही चांगले बोललेलेसुध्दा सर्वच लोक सहन करू शकतात असे नाही असा मनुष्यस्वभावच आहे.
त्यानंतर गाणी म्हणण्याला सुरुवात झाली आणि एकमेकांना आग्रह होऊ लागले, विशिष्ट गाण्यांच्या फर्माइशी होऊ लागल्या. ही अभिभाषणे आणि गायन वगैरे होत असतांना मायक्रोफोन वारंवार बिघडत होता. त्यामुळे बोलण्याची किंवा गाण्यातली लय सारखी तुटत होती. कदाचित माइक उपलब्ध होत नसल्यामुळे असेल, पण ओळखपरेड करण्याचे त्यानंतर कुणीच मनावर घेतले नाही. तेवढ्यातच 'परत आहेरा'ची पाकिटे आणि लाडूचिवड्याचे पॅकेट्स वाटायला सुरुवात झाली. त्या निमित्याने एकेका कुटुंबाला बोलावले असतांनाच त्यांची ओळख करून देणे शक्य झाले असते, पण घरातल्या मुख्य लोकांना हा कार्यक्रम शक्य तितक्या लवकर आटोपून दुस-या दिवशीच्या तयारीलाही लागायचे होते. जमलेल्या लोकांना जागेवर बसवून ठेवण्यासाठी काही जणांनी जुन्या आठवणी सांगणे सुरू केले. त्यात काही जणांनी खरोखर मजेदार किस्से सांगितले, काही जणांनी जे काही सांगितले ते थोड्या लोकांना मजेदार वाटले, उरलेल्यांना त्याचा संदर्भ लागला नाही. जमलेले लोकही हळूहळू पांगायला लागले. बरेच जण झोपायला गेले, काही लोक कामाला लागले, काही लोक मात्र मध्यरात्र उलटून गेली तरी भूतकाळाच्या आठवणींमध्ये रमून मांडवातच गप्पा मारत बसले होते.
दुसरे दिवशी सकाळी मुंजींचे मुहूर्त होते. दोन सख्ख्या भावांचे व्रतबंध होणार असले तरी ते निरनिराळ्या मुहूर्तांवर करायचे होते. दोन मुहूर्तांमध्ये फक्त दहा पंधरा मिनिटांचे अंतर होते. एका मुलाची मुंज अर्थातच त्याचे पिताश्री लावणार होते आणि एक ज्येष्ठ आप्त दुस-या मुलाला गायत्रीमंत्राची दीक्षा देणार होते. दोन कार्यांसाठी दोन हवनकुंडे मांडली होती. मुहूर्ताच्या तासभर आधी आलेल्या एका पोक्त महिलेने आयत्या वेळी गरज पडली तर उपयोगी पडेल म्हणून येतांना एका मंगलाष्टकाची प्रत आणली होती. ती नेमकी कोणत्या कवीने कोणासाठी रचली होती याचा त्यात उल्लेख नव्हता आणि त्यांनाही ते आठवत नव्हते. असे असले तरी ती कोणासाठीही चालू शकतील अशी होती. मंगलाष्टकांबद्दल मला आधीच सांगितले गेले असल्याप्रमाणे मीही थोडी जुळवाजुळव करून नेली होती. दोन निरनिराळ्या मुंजी असल्यामुळे दोन्हींचा उपयोग झाला.
लग्नाच्या वेळी रुखवत मांडायची पध्दत आहे, तशी मुंजीच्या बाबतीत आहे की नाही हे मला ठाऊक नाही. निदान लक्षात राहण्यासारखे रुखवत मी पाहिले नव्हते. या वेळी मात्र अगदी अप्रतिम अशी दोन दृष्ये एका टेबलावर मांडून ठेवली होती. खाली अक्रोड आणि त्याच्यावर सुपारी आणि दोन दोन काजू चिकटवून आणि त्यांना नाक, कान, डोळे चिकटवून किंवा रंगवून अनेक सुबक बटू तयार केले होते. एका बाजूला लहान लहान पर्णकुट्या, आजूबाजूला छोटेसे वृक्ष, बागा, झाडाखाली बसलेले तपस्वी आणि त्यांच्या समोर बसून शिक्षण घेणारे बटू, वगैरेंमधून अप्रतिम असे गुरुकुल तयार केले होते. दुस-या दृष्यात अनेक बटूंना रांगेत बसवून आणि त्यांच्यासमोर इवलीशी पाने मांडून भोजनाची पंगत केली होती.
या कार्यासाठी परगावाहून आलेल्या पाहुण्यांची बरीच संख्या होतीच, स्थानिक लोकांनी मुहूर्ताच्या वेळेला खूप गर्दी करून संपूर्ण मांडव व्यापून टाकला. त्यानंतर झालेल्या 'प्रीतीभोजा'ला निदान सात आठशे तरी माणसे जेवून गेली असावीत. पण केटररने त्यांची अगदी चोख व्यवस्था ठेवली होती. सर्वांना पुरतील एवढ्या मेलमावेअरच्या थाळ्या आणि वाडग्यांचे ढीग लावून ठेवले होते. पाणी पिण्याचे प्लॅस्टिकचे छोटे डिस्पोजेबल ग्लास तर हजारोंच्या संख्येने आणले असतील. फिल्टर केलेल्या पाण्याचे निदान शंभर तरी सीलबंद मोठे बुधले मागवले असतील. भर उन्हाळ्यात सारखी तहान लागत असते, गळ्याला शोष पडत असतो. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे लागते. सध्याच्या पाणीटंचाईच्या या दिवसात, त्यातही एका लहानशा गावात कसले आणि किती पाणी प्यायला मिळणार आहे अशी शंका अनेकांच्या मनात होती. पण हे लक्षात घेऊन स्वच्छ आणि निर्जंतुक केलेल्या मुबलक पाण्याची व्यवस्था त्यांनी केली होती, यापेक्षाही महत्वाचे म्हणजे ते इतकी व्यवस्था करू शकले होते.
जेवणाची पंगत हा प्रकार आता लहान गावांमधूनसुध्दा कमी झाला आहे. मुंजीच्या आदल्या दिवशी फक्त घरातली पाहुणे मंडळी असल्यामुळे टेबलावरल्या पंगतीची मेजवानी झाली होती. अर्थातच त्यात एक वेगळी मजा आली होती. मुंजीच्या दिवशी झालेली गावामधील लोकांची गर्दी पाहता ते शक्य नव्हते. पूर्वीच्या काळात पंगतीमध्ये प्रत्येकाच्या ताटात पक्वान्ने वाढण्याचा आग्रह करणे, खाणा-यांनी संकोच करणे, त्यात घासाघीस, चढाओढ वगैरेंमुळे एकेक पंगत जेवून उठायला खूप वेळ लागत असे. एक पंगत जेवून उठेपर्यंत इतर लोकांना ताटकळत बसावे लागत असे. दुपारच्या जेवणाची शेवटची पंगत बसायलाच संध्याकाळचे चार पाच वाजलेले मी अनुभवले आहे. बूफे पध्दतीत हा वेळ वाचत असल्यामुळे सर्वांना वेळेवर जेवण मिळू शकते आणि आजकाल सगळीकडेच बूफे सिस्टम रूढ झाली आहे. त्याला रुचिभोज असे गोंडस नावही दिले जाते. या समारंभातल्या केटररने जेवणाचे तीन चार काउंटर मांडलेले असल्यामुळे ते घेण्यासाठी फारशा लांब रांगा लागत नव्हत्या.
रात्र पडल्यानंतर 'भिक्षावळ' नावाची जंगी मिरवणूक निघाली. बटूंना बसण्यासाठी खूप सजवलेली एक घोड्याची बगी आणली होतीच, शिवाय नाचणारे दोन घोडे आणले होते. वाजंत्री, दिवे धरणारे वगैरे लोक होतेच. मध्यंतरीच्या काळात तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीचा भरपूर फायदा या मिरवणुकीत उचललेला दिसला. पूर्वीच्या काळात डोक्यावर पेट्रोमॅक्सचे दिवे घेतलेले लोक वरातीच्या बाजूने चालत असत. या वेळी वरातीच्या मागून जाणा-या एका व्हॅनमध्ये एक जनरेटर ठेवला होता आणि माणसांनी डोक्यावर धरलेले विजेचे दिवे त्याला फ्लेक्सिबल केबल्सनी जोडले होते. वरातीच्या पुढे एका सजवलेल्या व्हॅनमध्ये डीजे बसला होता आणि डीव्हीडी प्लेयर, अँप्लिपायर, स्पीकर वगैरे ठेवले होते, शिवाय बँडवालेही होतेच. मिरवणूक चालत असतांना थोड्या थोड्या अंतरावर थांबून काही जागी ती घोड्याची जोडी नाचत होती आणि बहुतेक ठिकाणी वरातीतली मुले, मुली आणि माणसे नाचून घेत होती. याच गावामध्ये सतरा अठरा वर्षांपूर्वी झालेल्या मुंजीमधल्या मिरवणुकीत थोडीच मुले काहीशी बिचकत नाचली होती, या वेळी मात्र लहान मोठे सगळेच जण फुलटू धमाल करून घेत होते. गावातली काही पोरे मोहरमच्या वाघासारखे हातवारे करतांना पाहून मात्र हसायला आले. उडवायच्या दारूच्या आतिशबाजीत तर कल्पनातीत प्रगती झाली आहे. विविध प्रकारचे फटाके, चक्रे, कारंजे, आकाशबाण वगैरे नेत्रदीपक रोषणाई आपण दिवाळीच्या दिवसात पाहतोच. या मिरवणुकीत त्यांचा उपयोग जरा जास्तच सढळपणाने केला जात होता. उंच बांबूच्या किंवा पाइपाच्या वरच्या टोकाला एक फ्रेम बांधून त्यावर अनेक प्रकारची चक्रे आणि प्रकाशझोत टाकणारे आयटम बसवले होते. ते सारे एकसाथ पेटवून दिल्यावर त्यामधून मनोरम चित्रे निर्माण होत होती. आतिशबाजीमधले खूप वैविध्य या मिरवणुकीत पहायला मिळाले. हे सगळे ग्रामीण भागात घडत होते याचे नवल होते.
एकंदरीत पाहता हा समारंभ खूपच थाटामाटात झाला, माझ्या अनुभवविश्वातल्या उपनयन समारंभांचा यापूर्वीचा उच्चांक त्याने मोडला आणि नवा उच्चांक स्थापन केला. त्या लहानशा गावातल्या लोकांनाही एक 'यादगार आणि शानदार' असा 'जनेऊ समारोह' पहायला मिळाला.
. . . . . . . . . . . . . . . . (समाप्त)
No comments:
Post a Comment