Friday, June 28, 2013

बिनतारी संदेशवहन (पूर्वार्ध)

टेलिग्राफच्या सेवेची सुरुवात होऊन आता दीडशे वर्षे होऊन गेली. त्यातली जवळ जवळ सव्वाशे वर्षे तार हेच जलदगतीने संदेश पाठवण्याचे प्रमुख साधन होते. अलीकडच्या काळात बिनतारी संदेशवहन आपल्या अंगवळणी पडून आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनून गेले आहे. तार पाठवणे कालबाह्य झालेले असल्यामुळे ही ऐतिहासिक सेवा आता कायमची बंद होऊन या पिढीसोबत विस्मरणात जाणार आहे.

एका विद्युतचुंबकाच्या (इलेक्ट्रोमॅग्नेट) सभोवती विजेचा प्रवाह सोडला की लोखंडाचा एक दांडा थोडा उचलला जातो आणि बंद केला की गुरुत्वाकर्षणाने तो खाली येऊन एका पट्टीवर आदळून नाद निर्माण करतो. या तत्वावर आधारलेली सुरुवातीच्या काळातली तारायंत्रे त्या काळात क्रांतिकारी होती, पण त्यांची रचना सुटसुटीत होती. याच तत्त्वावर तयार केलेल्या एका यंत्रामध्ये एक काटा डायलवर पुढे किंवा मागे फिरत असे तर आणखी एका यंत्रातल्या कागदाच्या पट्टीवर  .  (डॉट) किंवा - (डॅश) उमटवत असे. एका युरोपियन शास्त्रज्ञाने तयार केलेल्या यंत्रामधला दांडा (रॉड) त्याने एका रसायनात बुडवून ठेवला होता, त्यातून विजेचा प्रवाह सोडला की हैड्रोजन वायूचा बुडबुडा निघत असे. अशा प्रकारच्या खुणांमधून कोणता अर्थ काढायचा याची एक परिभाषा निश्चित केली जात असे. त्यातले मोर्स कोड हे सर्वमान्य झाले आणि जगभरातले लोक त्याचा वापर करू लागले.

नंतरच्या काळात विज्ञानाच्या सगळ्याच क्षेत्रांमध्ये वेगाने प्रगती होत गेली. इंग्रजी मुळाक्षरांचे मोर्सकोडमध्ये आणि मोर्सकोडमधल्या खुणांचे पुन्हा एबीसीडीमध्ये रूपांतर करण्याचे काम यंत्रांद्वारा होऊ लागले आणि त्यातून टेलिप्रिंटर तयार झाला. दांडा आणि पट्टी याऐवजी एक थरथरणारा पडदा लावला तर त्यामधून निरनिराळे आवाज काढता येतात हे पाहून मानवी आवाज काढू शकणारे स्पीकर तयार झाले आणि त्यांचा उपयोग करून निर्माण केलेल्या टेलिफोनने एक नवा अध्याय सुरू केला. टेलीफोनमुळे संभाषण करणे शक्य होत असल्यामुळे त्याचा प्रसार वेगाने झाला, पण हे संभाषण फक्त मौखिक स्वरूपाचे असते. ते स्पष्टपणे ऐकू गेले नाही किंवा ऐकणा-याने समजण्यात काही चूक केली तर त्यावर उपाय नसतो आणि ते तपासून पाहणे अशक्यप्राय असते. टेलिग्रॅममधला संदेश लेखी असल्यामुळे तो पुन्हा पुन्हा वाचता येतो, तिस-या माणसाला दाखवता येतो, रेकॉर्डमध्ये ठेवता येतो, त्याची प्रत काढता येते वगैरे फायदे त्यात असल्यामुळे ऑफीशियल कामांसाठी टेलिग्रॅम, टेलीप्रिंटर, टेलेक्स वगैरेंवरच सर्वांची भिस्त राहिली.

या सगळ्या संदेशवहनासाठी तारांमधून जाणारा विजेचा प्रवाह हेच माध्यम असायचे. पण वातावरणामधून किंवा निर्वात पोकळीमधूनसुध्दा विशिष्ट प्रकारच्या सूक्ष्म लहरी प्रकाशाच्या वेगाने दूरवर प्रवास करतात याचा शोध लागला आणि तशा प्रकारच्या लहरी उत्पन्न करणे तसेच ग्रहण करणे यावर नियंत्रण करता आल्यानंतर बिनतारी संदेशवहनाची सुरुवात झाली. या माध्यमामधूनसुध्दा सोपे संदेश पाठवणे सुलभ असल्यामुळे याचा उपयोगसुध्दा आधी टेलिग्रॅम पाठवण्यासाठी झाला. अशा प्रकारची पहिली 'बिनतारी' 'तार' पाठवूनसुध्दा शंभर वर्षांहून जास्त काळ लोटला आहे हे कदाचित कोणाला फारसे ठाऊक नसेल.  'बिनतारी' दूरध्वनि संदेश पाठवायला त्यानंतर वीस पंचवीस वर्षे लागली. रेडिओ वेव्ह्जचा हा उपयोग करणे खूप खर्चाचे आणि कठीण असल्यामुळे सर्वसामान्य माणसाला ते परवडणारे नसावे, यामुळे त्याचा सार्वजनिक प्रसार हळूहळू झाला.

तारांमधून जाणारी वीज त्या तारेच्या एका टोकापासून निघून तिला जोडलेल्या तारांमधून ठराविक सर्किटमध्येच वाहते, पण प्रसारणकेंद्रामधून निघालेल्या रेडिओ लहरी चहूदिशांना पसरत जातात. यामुळे त्यांचा चांगला उपयोग आकाशवाणीसाठी केला गेला आणि जगभरातल्या महानगरांमध्ये रेडिओ स्टेशन्स सुरू झाली आणि त्यांच्यावरून झालेले प्रसारण घरोघरी बसलेले लोक ऐकू लागले. रेडिओलहरींचा हाच उपयोग बहुतेक लोकांना माहीत असतो. यात आणखी प्रगती झाल्यानंतर दूरचित्रवाणी (टीव्ही) सुरू झाली.

सार्वजनिक जीवनात बिनतारी संदेशवहनाचा असा उपयोग होत असला तरी काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये त्याचा उपयोग निरोप पाठवण्या आणि घेण्यासाठी होत राहिला. समुद्रात सफर करणारी जहाजे एकमेकांशी वायरलेसवर संपर्क करू लागली. त्या काळातला एक मजेदार किस्सा असा आहे. एकदा रात्रीच्या वेळी एका जहाजाचा कप्तान स्वतःच निरीक्षण करत असतांना त्याला दूर एक दिवा दिसला आणि तो थेट आपल्याच दिशेने येत आहे असे वाटल्याने त्याने संदेश पाठवला, "ताबडतोब १० अंश उजवीकडे वळ."
उत्तर आले, "तुझे जहाजच ताबडतोब १० अंश उजवीकडे वळव."
"तू माझे ऐक. मी कॅप्टन बोलतो आहे"
"तू माझे ऐक. मी ऑपरेटर बोलतो आहे"
"माझे लढाऊ जहाज आहे, माझ्याकडे दहा तोफा आणि वीस आगबोटींना बुडवता येईल इतका दारू गोळा आहे. जिवाची पर्वा असेल तर मुकाट्याने तुझे जहाज वळव."
"तुला काय करायचे असेल ते कर (आणि मसणात जा). मी दीपस्तंभावर बसलो आहे."
(मूळ कल्पना रीडर्स डायजेस्टवरून)

.  . . . . . . . . .  . . . . . (क्रमशः)

No comments: